Mahesh Mhatre

हल्ली शोधपत्रकारिता बहुतेक संघटनांमधून लोप पावत चालली आहे. काही मोजके शिलेदार मात्र या क्षेत्रात अजूनही किल्ला लढवत आहेत. अशीच एक संघटना म्हणजे अमेरिकेतली ‘प्रोपब्लिका’.
हल्ली शोधपत्रकारिता बहुतेक संघटनांमधून लोप पावत चालली आहे. काही मोजके शिलेदार मात्र या क्षेत्रात अजूनही किल्ला लढवत आहेत. अशीच एक संघटना म्हणजे अमेरिकेतली ‘प्रोपब्लिका’. तसे पाहायला गेल्यास ‘प्रोपब्लिका’ ही इंटरनेट पत्रकारितेतही अग्रणी म्हणावी लागेल. कारण मॅनहॅटनमध्ये या संघटनेची ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणारी न्यूजरूम आहे. पूर्णपणे नेट कंटेन्टच्या स्वरूपात स्टो-या बनवल्या जातात आणि त्या विविध मीडिया कंपन्यांना मोफत पुरवल्या जातात.

अल्पावधीतच ‘प्रोपब्लिका’च्या बातमीदारांनी दोन पुलित्झर पुरस्कार पटकवले आहेत. अत्यंत निष्णात संपादक, अनुभवी पत्रकारांची ही संघटना पाश्चिमात्य बातमीदारीच्या जगतात आदराचा विषय ठरली आहे. संघटनेचे संस्थापक पॉल ई. स्टायगर यांचे मंगळवारी ‘ग्लोबल एडिटर्स नेटवर्क’ परिषदेच्या पहिल्या सत्रात बीजभाषण होते. त्यांचे विचार ऐकणे हा वेगळाच अनुभव होता.
 
खुद्द स्टायगर हे ‘लॉस एंजलिस टाइम्स’ आणि ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकांचे संपादक होते. गत काळातील, सध्याच्या स्थितीतील आणि भविष्यातील पत्रकारितेविषयी त्यांनी विचार मांडले. ‘आमच्या काळात सारे काही भरभरून असायचे. प्रचंड नफा, बहुशहरी आवृत्त्या, जाहिरातींमधून सतत वाढत जाणारे उत्पन्न असा पसारा होता. खप वाढत नसला, तरी प्रस्थापित कंपन्यांच्या त्या विश्वात छोटया कंपन्यांना प्रवेश करणे खडतर होते. याउलट परिस्थिती आता आहे. बातम्यांच्या क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी अडथळा असा राहिलेलाच नाही. नवीन तंत्रज्ञानामुळे एखादा ब्लॉग नेटवर टाकणे सोपे झाले आहे. असा ब्लॉगही बातम्यांचा स्रेत ठरू शकतो,’ स्टायगर सांगत होते. सतत होणारा बदल हा हल्लीच्या पत्रकारितेचा स्थायीभाव आहे. एखादी भन्नाट कल्पना कोणाच्या डोक्यात आली, की ही पत्रकारिता वेगळे वळण घेते. त्यामुळे पारंपरिक मीडिया संस्थांचे महत्त्व आजही असले, बदलत्या पत्रकारितेचे नेतृत्व त्यांच्याकडे राहिलेले नाही, याकडे स्टायगर यांनी लक्ष वेधले. ‘त्यामुळे ब-याच कमी खर्चात हल्ली अनेक कंपन्या वाचकांपर्यंत बातम्या घेऊन येतात. पण खर्चकपातीचा एक तोटा म्हणजे दर्जा आणि आवाका राखताना नाकी नऊ येतात.’
 
‘प्रोपब्लिका’ संघटनेकडे मोठा कर्मचारीवर्ग असला, तरी ती केवळ देणग्यांच्या जोरावर चालवली जाते. अर्थात असे असले, तरी तिचे उद्दिष्टे कायम आहेत. ‘जुलमी सत्ताधीशांपासून लोकहिताचे रक्षण करणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशा पत्रकारितेविषयी आजही आकर्षण आहे. आम्ही जेव्हा सुरुवात केली, त्यावेळी अवघ्या १७ जागांसाठी १४०० अर्ज आले होते. मोठया कंपन्यांकडून अनेक अनुभवी पत्रकार आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना योग्य पगारही दिले. भागीदारी हे आमच्यासाठी महत्त्वाचे साधन ठरले. छोटया-मोठया अनेक संस्थांसाठी आम्ही प्रकल्प राबवले. यातून दोघांचाही फायदा झाला.’ मग तरीही ‘प्रोपब्लिका’ ना नफा तत्त्वावर का चालवली जाते या प्रश्नावर स्टायगर यांचे उत्तर होते, ‘शोधपत्रकारिता हा कोणत्या मीडिया कंपनीसाठी सर्वाधिक महागडा प्रकार असतो. त्यामुळे आम्ही सिंडिकेशन करून बातम्या विकायचे ठरवले, तर त्या कोणी घेणार नाही. त्यापेक्षा अधिक व्यापक आणि उदारमतवादी अ‍ॅप्रोच ठेवल्यामुळे अधिकाधिक वाचकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. यातून समाजाचे हित साधल्याचा आनंद मिळत राहतो.’

Leave a Reply