पर्यटन हा आजकाल अत्यंत किफायतशीर आणि अनेकांच्या हाताला काम मिळवून देणारा व्यवसाय बनत चालला आहे. निव्वळ पर्यटनावर राज्यातील किंवा देशातील लोक चांगले जीवन जगू शकतात, याचे उदाहरण स्वित्झर्लंडलडने जगासमोर सादर केले. त्यापाठोपाठ छोटया-छोटया देशांनीही आपल्याकडील चांगल्या गोष्टींचे योग्य ‘मार्केटिंग’ करून जगातील जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे खेचण्याचा गेल्या तीन-चार दशकांत जणू चंगच बांधला. त्यामुळे सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया आदी राष्ट्रांची अर्थव्यवस्था सुधारली, तर इजिप्त, तुर्कस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांतील अर्थकारणाला ब-यापैकी आधार लाभला. आपल्याकडे केरळने पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती कशी करावी, याचे उदाहरणच सगळ्यांपुढे ठेवले आहे. काश्मीरने तर दहशवादाच्या वणव्यातही पर्यटनाचे रक्षण आणि संगोपन केले. राजस्थान हा परदेशी पर्यटकांसाठीचा आवडता प्रांत, पण त्या तुलनेत महाराष्ट्रात ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि कोणत्याही पर्यटकाला आवडतील अशी डझनावारी ठिकाणे आहेत; परंतु कोकण वगळता महाराष्ट्राच्या कोणत्याही क्षेत्राने पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत, त्यामुळे परदेशात विशेषत: पॅरिससारख्या जगातील सगळ्यात जास्त पर्यटकांना आकर्षित करून घेणा-या शहरात गेल्यानंतर आपल्याकडे स्वच्छता, सौंदर्य, सुविधा आणि सहकार्याकडे बघण्याची दृष्टीच नसल्याचे लक्षात येते. निसर्गाने सौंदर्याची भरभरून उधळण केली असतानाही लोकांच्या अकार्यक्षमतेमुळे या परमेश्वरी देणगीचा उपयोग करून घेतला जात नाही. सुजाण आणि सजग लोकांनी हे कुठेतरी थांबवले पाहिजे.
फ्रान्सच्या या भेटीआधी बरोब्बर अकरा वर्षापूर्वी जून महिन्यात पॅरिसला भेट देण्याचा योग आला होता. बेल्जिअममधील ब्रुजी आणि ब्रसेल्स या दोन शहरात होणा-या जागतिक संपादक परिषदेत सहभागी होण्यासाठी पहिला मुक्काम पॅरिसमध्ये करावा लागला होता आणि परततानाचे सहा दिवस ‘जीवाचे पॅरिस’ करण्यात घालवले होते. त्याच दिवसादरम्यानची एक गोष्ट मात्र मनात कायमची घर करून राहिली.
आपल्याकडे ज्याप्रमाणे बाहेरून आलेल्या पर्यटकांना बसमधून ‘मुंबई दर्शन’ घडवतात, त्याप्रमाणे पॅरिसमध्येही उघडया टपाच्या बसमधून शहराचे धावते दर्शन घडविले जाते, पण तो कार्यक्रम सुरू होण्याआधी पॅरिस शहराचा समग्र इतिहास सांगणारा माहितीपट दाखवण्यात येतो. त्या माहितीपटाच्या शेवटी एक वाक्य पडद्यावर झळकले..
पॅरिस तुमच्या श्वासात भरून घ्या आणि तुमच्या आत्म्याचे पोषण करा थोर विचारवंत, भविष्याचा वेध घेणारा मानवतावादी लेखक व्हिक्टर ह्युगो यांच्या या वाक्याने पॅरिसबद्दलच्या सगळ्या ‘ऐकीव’ कल्पना साफ पुसून टाकल्या होत्या. आजही ते वाक्य अक्षरश: जगताना म्हणजे पॅरिसमध्ये फिरताना मन आणि आत्मा सुखावत असतो. लहानपणी शम्मी कपूरच्या सिनेमात ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ पाहताना गंमत वाटली होती; परंतु तेच प्रेमासाठी, सभ्यता-संस्कृती आणि छायाप्रकाशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर प्रत्यक्ष पाहताना येणारी अनुभूती अवर्णनीय. एका लेखकाने छान लिहिलंय, ‘तुम्हाला जर खरोखर पॅरिस पाहायचे असेल, तर रस्त्यावर या.’ होय, पॅरिसचे रस्ते म्हणजे या शहराची खरी ओळख, हे रस्ते दिवसा जितके सुंदर दिसतात, आखीव-रेखीव वाटतात, तेवढेच रात्रीही खुलतात. दिवसा मोटारी अंगाखांद्यावर खेळविणा-या या रस्त्यांच्या अंगणात रात्री कलाकार, चित्रकार, विविध वाद्य वाजविणारे, चमचमीत खाद्य पुरविणारे आणि या सगळ्या रंगीबेरंगी जत्रेत सामील होण्यासाठी प्रेमाने आलेले लोक गर्दी करतात. मध्येच एखादा बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा कलंदर पोरा-टोरांच्या घोळक्यात धम्माल प्रयोग करताना दिसतो. तर कुठे आयुष्याची संध्याकाळ आणखी सुरम्य करण्यासाठी छान-छान कपडे घालून आलेले आजी-आजोबा अवती-भवतीचे विश्व विसरून सुखसंवादात मग्न झालेले दिसतात. अवघ्या वातावरणावर जणू आनंदाची, चैतन्याची तृप्त साय पसरलेली असते.’
मागील भेटीच्या वेळी मला पॅरिसमधील विलक्षण प्रतिभावंत आणि अतिवास्तववादाचा अभिनव आविष्कार करणा-या सल्वादोर दाली यांच्या ‘मॉन्त मात्रे’ या उपनगरातील स्टुडिओत जायची तीव्र इच्छा झाली होती. त्यांच्या ‘नोबेलिटी ऑफ टाइम’, ‘युनिकॉर्न’ आणि ‘द स्नेल अॅण्ड द एन्जल’ यांसारख्या आगळ्या-वेगळ्या शिल्पांचा ठसा मनावर कायम होता. एका संध्याकाळी मी आणि रवी बोरटकर पत्ता विचारत, विचारत ‘एस्पेस दाली’च्या वाटेवर पोहोचलो आणि मन एका अननुभूत आनंदाने मोहरून गेले. सगळा रस्ता संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी उजळून निघाला होता. माझे पाय थबकले. मी मागे वळून पाहिले. डाव्या हाताला असलेले पांढ-या शुभ्र रंगाचे घर एखादी नवयौवना लाजल्यावर जशी गोरीमोरी होते, तसे सलज्ज भाव घेऊन उभे होते. त्या घराला एक सज्जा होता. त्या सज्जावर, दर्शनी भागात हातभर लांब अशी फुलांची कुंडी होती. ती कुंडी लालचुटूक फुलांनी काठोकाठ भरलेली होती. प्रतिभावान कलाकार दालीच्या चित्र-शिल्प दुनियेत प्रवेश करण्याआधीच बाहेरच्या भागातील वातावरणनिर्मितीने पर्यटकांना सुखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मन वेडावून गेला होता.
दाली या कलंदर प्रतिभावंताने ‘अतिवास्तववादी’ (सर्रिआलिस्टिक) चित्र-शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्याच्या काळातील ‘पेज-३’ पार्टी वर्तुळात दालीच्या प्रत्येक कृतीला ‘गॉसिप्स’, खमंग चर्चेत स्थान असे. टोकदार मिशांनी त्याच्या बेफाम व्यक्तिमत्त्वाला अधिक चमत्कारिक बनवलेले होते. मुलुंडचे आमदार सरदार तारा सिंग हे जसे मिशीला ‘फिक्सा’ (एक प्रकारचे चिकट द्रव्य) लावून मिशी बाकदार ठेवतात, तसेच काहीसे दाली करायचा. त्यामुळे एका फोटोमध्ये तो आपल्या मिशीच्या सहाय्याने एक चित्र काढण्याचा प्रयत्न करतोय, असे जेव्हा पाहायला मिळाले तेव्हा हसू आवरले नाही. त्याचा कलंदरपणा तिथेच थांबत नाही किंवा त्याच्या अतिवास्तववादी विचारांना अभिव्यक्त होण्यासाठी चित्र-शिल्प एवढेच माध्यम पुरेसे नाही. हे दाली यांच्या कल्पनेतून जन्मलेल्या सुगंधातून लक्षात येते. पॅरिस हे शहरच गंधाळलेले असते. तुम्ही कुठेही फिरा, अगदी रस्त्यावर असलात तरी लगतच्या दुकानातील स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर वेगवेगळ्या सुगंधांनी, अरोमांनी तुमच्या रोमारोमात चैतन्य निर्माण होते. अगदी छोटेसे उपाहारगृह असो वा गर्दीने गजबजलेला एखादा पब, सुपरमार्केट असो वा छोटेसे परदेशी चलन देणारे दुकान, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फुलांची सजावट दिसेल आणि त्यासोबत अनुभवता येईल मादक गंध. हा अवघ्या शहराचा गंधच कदाचित दालीच्या अंतरंगातील प्रतिभावंताला आव्हान देऊन गेला असावा आणि त्यातून खास दाली अत्तराची निर्मिती झाली असावी. तर असा दालीचा कलंदरपणा खरे तर विक्षिप्तपणा युरोपातील सगळ्याच कलाकारांच्या जगण्याचा अविभाज्य हिस्सा होता; परंतु तेथील समाजाने त्यांना नुसतेच समजून नाही घेतले तर त्यांचा यथायोग्य सन्मानही केला. काहींचा हयातीत तर काहींचा मृत्यूनंतर. आमच्या देशातील कलारसिकांना अजून तेवढी प्रगल्भता आलेली नाही. अन्यथा आपल्या कुंचल्याच्या फटका-याने जगाला वेड लावणा-या एम. एफ. हुसेन यांना आम्ही देशोधडीला लागू दिले नसते. आमच्या पंढरपूरच्या मातीत जन्मलेल्या या मराठमोळ्या कलंदर व्यक्तिमत्त्वाला काही ‘चित्रनिरक्षर’ लोकांमुळे सोसावा लागलेला त्रास आणि अवघ्या भारतीय समाजाने त्यांच्याकडे फिरवलेली पाठ, हे सारे मला जगप्रसिद्ध ‘लुव्र’ संग्रहालय फिरताना आठवत होते, खटकत होते. मागील पॅरिसभेटीच्या वेळी या लुव्र म्युझियमला भेट देण्याचे एकमेव कारण होते लिओनार्दो-दा-विंची याचे अप्रतिम चित्र ‘मोनालिसा’. मोग-याच्या अर्धोन्मीलित कळीप्रमाणे अस्फुट हास्य असणारी ‘ती’ लावण्यवती गेल्या अनेक वर्षापासून लोकांना मोहवत आहे. ११ वर्षापूर्वी ते चित्र प्रथम पाहिलं तेव्हा त्यातील त्रिमितीची, थ्री-डीची जादू विलक्षण भावली होती, पण त्यानंतर आलेल्या ‘द दा विंची कोड’ या भन्नाट कादंबरीने त्या चित्रामागील कल्पनारम्य कथानकाची केलेली अद्भुतरम्य मांडणी मला चित्रापेक्षा कितीतरी पट आवडली होती. त्यामानाने त्या कादंबरीवर निघालेला चित्रपट तेवढा मनाला भिडला नाही, पण त्या कादंबरीने सबंध लुव्र म्युझियमलाच एक वेगळे व्यक्तिमत्त्व बहाल केलेले आहे. ख्रिश्चन धर्मातील काही गूढ आणि रहस्यमयी कल्पना-दंतकथांना आधुनिक जीवनाशी जोडून डॅन ब्राऊन यांनी या कादंबरीचे कथानक रचले आहे. कलेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या पॅरिस नगरीचे लुव्र संग्रहालय सगळ्यात मोठे आकर्षण समजले जाते. मागच्या खेपेला लुव्र कसे पाहायचे, हे ठाऊकच नसल्याने सगळा वेळ एकेक जगप्रसिद्ध चित्र, शिल्प शोधण्यात आणि युरोपीय रसिकांच्या कलाजाणिवा पाहून थक्क होण्यातच गेला होता. या वेळी मात्र ती चूक होऊ दिली नाही, पॅरिसमध्ये पाय टाकण्यापूर्वी ‘द दा विंची कोड’चे पारायण केले होते. शिवाय ‘लुव्र’शी संबंधित ब-याच गोष्टी वाचल्या होत्या, त्यामुळे डॅन ब्राऊनच्या कादंबरीतील ‘मसाला’ वास्तवापासून खूप दूर असल्याचे स्पष्ट झाले होते.
लुव्र संग्रहालयात प्रवेश करताना एक भले मोठे काचेचे पिरॅमिड दिसते. तसे पाहिल्यास दोन छोटे आणि एक महाकाय पिरॅमिड, असा तीन काचेचा पिरॅमिडचा देखणा डोलारा लुव्रमध्ये तुमचे स्वागत करतो. १९८४ मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँस्वा मितराँ यांच्या कल्पनेतून या पिरॅमिडची निर्मिती सुरू झाली. आयएमपी या विश्वविख्यात तज्ज्ञाने त्याचा आराखडा तयार केला. सहाच महिन्यांपूर्वी मला अमेरिकेतील क्लिव्हलँड शहरात याच लेओह मिन्ग पेई यांच्या प्रतिभेतून साकारलेले ‘रॉक अॅण्ड रोल हॉल ऑफ फेम अॅण्ड म्युझियम’ पाहायला मिळाले होते. लुव्र संग्रहालयाला भेट देणा-या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे त्याच्या, ‘लुव्र राजवाडया’च्या मुख्य आवारात, ज्याला नेपोलियन बोनापार्टेचे नाव दिले आहे, तेथे खूप गर्दी होत होती. त्या गर्दीला सुनियोजितपणे आवरण्यासाठी आणि वाट देण्यासाठी या पिरॅमिडची उभारणी झाली; पण डॅन ब्राऊनच्या ‘द दा विंची कोड’मधील फ्रँस्वा मितराँ यांच्या संदर्भातील गूढता वाढवणारा उल्लेख आणि ६६६ या सैतान संकल्पनेशी संबंधित आकडयाचा (जो खोटा आहे) या पिरॅमिडशी जोडलेला संबंध, यामुळे फ्रान्समध्ये जोरदार वादळ उठले होते. काहींनी तर राष्ट्राध्यक्ष मितराँ यांची इजिप्तमधील फॅरोह यांच्याशीही तुलना केली. अजूनही ख्रिश्चन धर्मातील गूढमार्गी लोक या आणि अशा काही नव्या कथानकांच्या शोधात असतातच, त्यातून नवी कादंबरीही बाहेर येते. लोक ती मोठया चवीने वाचतात आणि विसरतात.
लुव्रच्या प्रवेशद्वारी उभे असलेले हे तीन पिरॅमिड मात्र मोठया झोकात देशोदेशीच्या पर्यटकांचे स्वागत करीत असतात. पंधरा वर्षापूर्वी आणि त्यानंतरही अनेकदा या पिरॅमिडच्या निर्मितीची गरजच काय, असा आवाज उठवणारे लोक आता कमी झाले आहेत. पेई यांच्या या लोकविलक्षण शिल्पाकडे आता प्राचीन कला आणि आधुनिक स्थापत्यशास्त्राचा सुरेख संगम म्हणून पाहिले जाते. तुम्ही या मुख्य पिरॅमिडच्या मधोमध उभे राहिल्यास अवती-भवतीची गर्दी आणि डोक्यावरील अवकाशाला लाभलेले काचेचे बहुमितीय छप्पर या दोन्हींच्या पोकळीतून लुव्र संग्रहालय तुम्हाला साद घालत असल्याचा आभास होतो आणि आपले पाय जगातील सगळयात मौल्यवान कला खजिन्याकडे वळतात.
हे संग्रहालय फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी राजाचा राजवाडा होते. विविध राजांनी त्यांच्या व्यक्तिगत संग्रहासाठी जगभरातील कलात्मक वस्तू गोळा केल्या होत्या. क्रांतीच्या नेत्यांनी नेत्यांनी राजवाडय़ाचे कलासंग्रहालयात रूपांतर करण्याचे ठरवले आणि त्यानुसार १७९३ पासून हा कलासाठा लोकांना पाहण्यासाठी खुला झाला. नंतरच्या काळात फ्रान्समधील सगळय़ाच समर्थ नेत्यांनी, त्यात नेपोलियन बोनापार्टेचाही समावेश होतो, भल्या-बु-या सगळया मार्गानी जगातील कलात्मक वस्तू लुव्र संग्रहालयात आणण्याचा सपाटा लावला. त्यामुळे सध्या काही मैल लांबी असलेल्या, तीन इमारतीत पसरलेल्या या संग्रहालयात आज ३० लाख कलात्मक वस्तू आहेत. त्यात सहा हजार मौल्यवान चीजवस्तूंचा आणि पाच हजारांहून अधिक महत्त्वपूर्ण शिल्पांचा समावेश आहे. रोमन, ग्रीक आणि प्राचीन इजिप्तमधील पुरातन चित्र-शिल्पांपासून १९व्या शकतातील मॉनेट, देगा, रेनॉयर आदींच्या कलाकृतींपर्यंत एकाहून एक सरस गोष्टी या संग्रहालयात पाहायला मिळतात. त्यामुळे देशोदेशीचे पर्यटक, चित्रकार आणि कलेचे अभ्यासक येथे येतात आणि कलाविश्वात हरवून जातात.. संध्याकाळी संग्रहालय बंद होण्याची घंटी वाजेपर्यंत मी वेगवेगळय़ा कलादालनात फिरत राहिलो. बाहेर आलो तेव्हा संध्याकाळची सोनकिरणे अवघ्या आसमंतावर पसरलेली होती आणि अचानक दिवसा ब-यापैकी रूक्ष भासणारा आयफेल टॉवर, दिव्यांच्या तेज:पुंज प्रकाशात न्हाऊन निघालेला दिसला. त्याच्या सौंदर्याचा दीपत्कार जणू पॅरिसच्या ऐश्वर्याचा साक्षात्कार होता.. त्याच्या दर्शनाने तन आणि मन शांत झाले आणि पावले सीन नदीच्या पुलाकडे वळली.
Categories:
आवर्तन