Mahesh Mhatre

फ्रान्सच्या राजधानीत उतरल्यानंतर पहिल्यांदा भावली ती येथील आल्हाददायक हवा. ‘ग्लोबल एडिटर्स नेटवर्क’ या संघटनेतर्फे आयोजित तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रमांची परिषद बुधवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी गेले दोन दिवस पॅरिसनगरीत उतरत असलेल्या प्रतिनिधींसाठी जणू उत्तम वातावरणनिर्मितीच झालेली दिसते! येथील हॉटेल दा व्हिल येथे तीन दिवस ही परिषद होत आहे. ही वास्तू म्हणजे पॅरिसची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. अगदी सन १३५७ पासून ही इमारत या प्राचीन नगरीचे राजकीय आणि सामाजिक केंद्र बनून गेलेय.

पॅरिस आणि परिसरातील तब्बल एक कोटी २० लाख नागरिकांचा प्रशासकीय कारभार येथूनच चालतो. पॅरिसचे महापौर बर्ट्रांड डेलानू यांनी या परिषदेत विशेष लक्ष घातलेले दिसते. ते २००१पासून या पदावर कार्यरत आहेत. सुमारे ४०० हून अधिक संपादक, लेखक आणि व्यवस्थापक या परिषदेसाठी आले आहेत. बहुतेक सत्रे हॉटेल दा व्हिलच्या प्रसिद्ध कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होतील. याशिवाय सालोन बर्ट्रांड येथे प्रदर्शने भरतील. इतक्या मोठया आणि वेगळ्या परिषदेचे यजमानपद भूषवण्याचा मान आणि जबाबदारीही पॅरिसच्या स्थानिक प्रशासनाची राहणार आहे.
 

ज्या अनेक विषयांवर चर्चा आणि मंथन होणार आहे, त्यांतील बहुतेकांचा विचारही भारतात सुरू झालेला नाही. छाती दडपून जाईल इतक्या वेगाने आणि विविध प्रकारांमध्ये बदलत पत्रकारिता चाललीये. जगभरात वृत्तपत्रे बंद पडत आहेत. पण बातम्यांची गरज किंवा बातम्यांचा प्रवाह कमी झालेला नाही. हा बदल आत्मसात करण्यावाचून आम्हा भारतीयांपुढे पर्याय नाही, हे निव्वळ या परिषदेची कार्यक्रमपत्रिका पाहूनच जाणवत राहते.
 
विषयांचे वैविध्य तरी किती! आजवर भारतात तरी ड्रोन आणि हॅकिंगच्या माध्यमातून पत्रकारिता ही कल्पनाही कोणाला सुचली नसेल. स्मार्टफोन, टॅब्लेट ही बातम्यांची नवीन माध्यमे ठरणार आहेत, त्यांना अनुरूप बदल कसे घडवायचे, इंग्लंडमधील ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ प्रकरणातून काय बोध घ्यावा, चीनमधील पत्रकारिता आणि तिच्यासमोरील आव्हाने, सीरियासारख्या यादवीग्रस्त देशातली पत्रकारिता.. पॅरिसमधील ही परिषद या विषय वैविध्यांमुळे क्रांतिकारी आणि पथदर्शी ठरू शकते.
भारतातून मोजकेच प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत.  परंतु युरोपातून आणि अमेरिकेतून आलेल्या प्रतिनिधींची संख्या प्रचंड आहे.

Leave a Reply