Mahesh Mhatre

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ‘ग्लोबल एडिटर्स नेटवर्क’ परिषदेमध्ये गुरुवारी ‘डेटा जर्नलिझम अ‍ॅवॉर्ड’ या पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली. झपाटयाने विस्तारत चाललेल्या पत्रकारिता क्षेत्रात अचूकता आणि प्रावीण्याचे महत्त्व लक्षात घेऊन आकडेवारीच्या आधाराने होणा-या पत्रकारितेबद्दल दिले जाणारे अशा प्रकारचे हे एकमेव आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.

आकडेवारीच्या साहाय्याने विविध मुद्दय़ांकडे लक्ष वेधणा-या पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचा या पुरस्कारांचा उद्देश आहे. आकडेवारीच्या आधाराने एखाद्या मुद्दयाचे, एखाद्या समस्येचे सखोल विश्लेषण केले जाते. अनेक महत्त्वाच्या मुद्दयांना प्रकाशझोतात आणता येते.


यंदाच्या या पुरस्कारांसाठी एकूण ३०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी ७२ प्रवेशिकांना अंतिम यादीत स्थान देण्यात आले. ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्या विजेत्यांनी एखाद्या समस्येचे कथन करण्याची त्यांची क्षमता दाखवून दिली आहे. प्रत्येक श्रेणीतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला २००० युरो, डीजेए प्रमाणपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार विजेत्यांच्या निवडीसाठी अतिशय नामवंत प्रसारमाध्यमांमधील २० परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये प्रोपब्लिकाचे संस्थापक पॉल स्टाईगर, गार्डियनच्या डेटाब्लॉगचे संपादक सायमन रॉजर्स आणि डेटा ड्रिव्हन जर्नलिझम.नेटच्या संपादक लिलियाना बुनेग्रू यांचा समावेश होता.

या पुरस्कारांची चार प्रमुख श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. १)आकडेवारी आधारित शोधपत्रकारिता (डेटा ड्रिव्हन इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिझम २) आकडेवारी आधारित उपयोजन (डेटा ड्रिव्हन अ‍ॅप्लिकेशन), आकडेवारीच्या आधारे वृत्तकथन (स्टोरीटेलिंग विथ डेटा) आणि डेटा जर्नलिझम वेबसाइट किंवा विभाग अशा या चार श्रेणी आहेत.

त्यामध्ये मोठी प्रसारमाध्यमे (बिग मीडिया) आणि लहान प्रसारमाध्यमे (स्मॉल मीडिया) अशीदेखील विभागणी आहे.
 
पुरस्कार विजेते याप्रमाणे -
‘डेटा ड्रिव्हन स्टोरीटेलिंग’(बिग मीडिया)
पुरस्कार विजेते : ‘ गे राइट्स ऑफ स्टेट’ साठी अमेरिकेचे गार्डियन

केवळ गे व्यक्तींच्या विवाहांची संख्या न देता, अमेरिकेतील प्रत्येक राज्यातील आकडेवारीचे वर्गीकरण दाखवणारा नकाशा तयार करून गार्डियनने गे व्यक्तींच्या हक्कांची माहिती दिली होती. अतिशय गुंतागुंतीच्या विषयाची माहिती सोप्या पद्धतीने कशा प्रकारे वाचकांसमोर मांडायची याचे हे उत्तम उदाहरण आहे.
 
‘डेटा ड्रिव्हन स्टोरीटेलिंग’(स्मॉल मीडिया)
पुरस्कार विजेते : ‘आर्ट मार्केट फॉर डमीज’साठी जाँ एबिएटसी आणि आस्क मिडिया

जगातील कलेच्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे आणि त्याच वेळी कलाप्रेमी बनण्याचे मार्गदर्शन ‘आर्ट मार्केट फॉर डमीज’मधून मिळते. जगातील अतिशय महागडया कलात्मक वस्तू आणि त्यामध्ये आलेले नवे प्रकार यांची सफर घडवणारे हे वृत्तांकन आहे. चीनमध्ये या वस्तूंसाठी असलेली मोठी मागणी आणि तेथील बाजारपेठ यांची माहिती देणा-या या वृत्तांकनाद्वारे अशा प्रकारचे वृत्तांकन केवळ मोठया प्रसारमाध्यमांची मक्तेदारी नसल्याचे दाखवून दिले आहे. आर्ट मार्केट फॉर डमीजला केवळ हा पुरस्कारच मिळालेला नाही तर ‘पीपल्स चॉइस अ‍ॅवॉर्ड’देखील मिळाला आहे.
 
‘डेटा ड्रिव्हन इन्वेस्टिगेशन’ (बिग मीडिया)
पुरस्कार विजेते : ‘अर्जेटिनाज सिनेट एक्सपेन्सेज,
२००४-२०१३’साठी ला नेशन फॉर अर्जेटिना ला नेशनने आकडेवारी संक्षिप्त केली आणि राजकारण्यांना प्रकाशझोतात आणले. अर्जेटिनाच्या सिनेटकडून केल्या जाणा-या खर्चाची आकडेवारी जनतेसमोर असूनही, ती समजण्यास किचकट होती. ही आकडेवारी अतिशय सोप्या पद्धतीने कोणतीही गुंतागुंत न करता सादर झाली आणि त्यामुळे अनेक आश्चर्यकारक बाबी प्रकाशझोतात आल्या. अर्जेटिनाचे उपाध्यक्ष अमादो बुदो यांच्या खर्चाच्या न्यायालयीन चौकशीचे प्रकरण पुन्हा सुरू करण्यात आले.

‘डेटा ड्रिव्हन इन्वेस्टिगेशन’ (स्मॉल मीडिया)
पुरस्कार विजेते : ‘चिल्ड्रन इन केअर
’साठी मीडिया वेल्स पाळणाघरात असलेल्या मुलांच्या समस्या मीडियावेल्स चिल्ड्रन इन केअरने मांडल्या आहेत. इंग्लंडच्या तुलनेत वेल्समध्ये अशा प्रकारच्या मुलांची संख्या पाच पटीने वाढली असल्याकडे या वृत्तांकनात लक्ष वेधण्यात आले आहे. या आकडेवारीचा वापर करून राजकीय, भौगोलिक भेदभाव अधोरेखित करण्यात आला आहे.
 
‘डेटा जर्नलिझम वेबसाइट’ किंवा विभाग
पुरस्कार विजेते : ‘कनेक्टेड चायना’साठी थॉमसन रॉयटर्स

चीनच्या अधिकारक्षेत्राची माहिती रॉयटर्सच्या कनेक्टेड चायनामधून मिळते. यामध्ये त्यांनी ब-याच मोठया प्रमाणावर दिलेल्या आकडेवारीबरोबरच ‘ग्राफिक्स’चा वापर केला आहे. चीनमधील नेत्यांच्या अधिकारक्षेत्राची वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर कशा प्रकारे विभागणी झाली आहे, याची सविस्तर माहिती देणारे हे वृत्तांकन आहे.
 
‘डेटा ड्रिव्हन अ‍ॅप्लिकेशन’ (बिग मीडिया)
पुरस्कार विजेते : ‘द ग्रेट ब्रिटिश क्लास कॅल्क्युलेटर’साठी बीबीसी

ब्रिटनच्या समाजातील दर्जा व त्याबाबतची प्रणाली याचे अतिशय सखोल विश्लेषण यात करण्यात आलेले आहे. वृत्तकक्षाच्या पलीकडे जाऊन कशा प्रकारे आकडेवारीच्या आधारावर वृत्तांकन करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
 
‘डेटा ड्रिव्हन अ‍ॅप्स’ (स्मॉल मीडिया)
पुरस्कार विजेते : ‘ला पेरिटर’साठी पॅरिस वी डू डेटा
पुरुष आणि स्त्रियांच्या वेतनाची तुलना करणा-या आणि त्यामध्ये असलेल्या तफावतीवर प्रकाशझोत टाकणारे हे वृत्तांकन आहे. त्यामध्ये काही प्रकारची प्रश्नावली आणि विविध प्रकारची माहिती देण्यात आली आहे. आकडेवारी आणि रचना यांचा समतोल साधत स्त्री-पुरुषांमधील भेदभावाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

Leave a Reply