मराठी भाषा म्हणजे काय, असा प्रश्न कुणी विचारला, तर माझे उत्तर असेल.. मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारदार. मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड, मराठी संताजी-धनाजीची स्फूर्ती, मराठी सावरकरांची कीर्ती, मराठी महन्मंगल मूर्ती शारदेची.
मराठी जनाबाईची आवड, सावता माळीयाची कावड,
कुसुमाग्रजांचा आधारवड, माझी मराठी.
मराठी म्हणजे हर हर महादेव,
मराठी म्हणजे जय भवानी
निधडी छाती आणि स्पष्ट वाणी, माझी मराठी.
मराठी म्हणजे लोकमान्यांची शक्ती,
महात्मा फुले यांची युक्ती.
गाडगे महाराजांची भक्ती, आंबेडकरांची नीती
मराठी म्हणजे बालगंधर्वाचे गान, लतादीदींची तान
किर्लोस्करी शान आणि
यशवंतराव चव्हाणांचे भान.
मराठीसाठी आमचे सारे काही.
होय, तिच्यासाठी करू सारे कष्ट..
तिच्याच बोलीत बोलू ‘जय महाराष्ट्र’!
भाषा म्हणजे मानवी विकार आणि विचारप्रदर्शनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन. हजारो वर्षाच्या मानवी उत्क्रांतीमध्ये भाषासुद्धा बदलत गेल्या. जन्म-मरणाचे माणसांच्या आयुष्यात होणारे सोहळेही भाषा अनुभवत गेल्या, यापुढेही अनुभवत राहतील; पण भाषांच्या अस्तित्वाशी संबंधित सगळयाच बदलांकडे बघायला लोकांकडे वेळ असतोच असे नाही. त्यामुळे जेव्हा एखादा समाज आपल्या भाषेपासून तुटत जातो, तेव्हा जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो आपल्या हाताने भाषेला पर्यायाने संस्कृतीला संपवत असतो. आज आपल्या महाराष्ट्रात हेच घडताना दिसतेय. आमच्या राज्यातील सुशिक्षित आणि श्रीमंत वर्गाची संवादाची भाषा इंग्रजी किंवा हिंदी झाली आहे. आपला पत्रव्यवहार किंवा अन्य कारभार करण्यासाठी आम्ही इंग्रजीला प्राधान्य देणे प्रतिष्ठेचे आणि सोयीचे मानतो. आमच्या आधीच्या पिढयांनी स्वातंत्र्यापूर्वीच इंग्रजीला ‘ज्ञानभाषा’ घोषित केल्यामुळे गाव-खेडयातील ज्ञानाभिमुख मंडळींनी इंग्रजी शाळांमध्ये ‘हजेरी’ लावणे क्रमप्राप्त होते. विशेष म्हणजे ज्या लोकांचे समाज अनुकरण करीत असतो त्या राजकीय-सामाजिक नेत्यांकडून, सिनेसृष्टीतील तारे-तारकांकडून आणि विचारवंतांकडून मराठीऐवजी हिंदी-इंग्रजीचा ज्या पद्धतीने जाहीर पुरस्कार केला गेला, ती सगळी पद्धतच खेडया-पाडयातील नवशिक्षित, अल्पशिक्षित वर्गाची दिशाभूल करणारी आहे. सध्या महाराष्ट्रात साधारणत: ७६ हजार दहावीपर्यंतच्या आणि सहा हजार १२वी पर्यंतच्या मराठी शाळा आहेत. गेल्या काही वर्षापासून नव्या मराठी शाळांना परवानगी देणे बंद झाले आहे. शासनाने हा निर्णय घेतला कारण मराठी शाळांसाठी परवानगी मिळवून काही हुशार ‘शिक्षणसम्राटां’नी त्यात इंग्रजी माध्यमाचे वर्ग घुसविण्यास सुरुवात केली होती. काही शाळांनी ‘सेमी इंग्लिश’ म्हणजे अर्धा मराठी - अर्धा इंग्रजी अभ्यासक्रम सुरू केला होता. तर ‘बालमोहन’सारख्या अत्यंत प्रतिष्ठित शाळांना इंग्रजीच्या ‘गुरुमंत्रा’ची गरज भासू लागली होती. मात्र शासनाच्या या ‘रोगापेक्षा उपाय जालीम’ तोडग्यामुळे ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे अक्षरश: पेव फुटले. शहरी भागातील मराठी माध्यमांच्या मनपा शाळा ओस पडू लागल्या. यंदा दहावीच्या, एसएससी बोर्डाच्या परीक्षेला मुंबई विभागातून तीन लाख आठ हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक लाख २८ हजार म्हणजे ३३ टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजीत उत्तरे लिहिली. मुंबई बोर्डातील ही परिस्थिती आणि अन्य विभागातील विद्यार्थ्यांची स्थिती यात फारसा फरक नाही, असे शिक्षण खात्यातील अधिका-यांशी बोलताना कळले.
एसएससी परीक्षा मराठी माध्यमातून देणा-या मुंबई बोर्डातील विद्यार्थ्यांची संख्या एक लाख ५३ हजार होती. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांनी मराठी माध्यम स्वीकारलेले होते. वाढत्या इंग्रजीच्या प्रभावामुळे ही स्थिती आलेली आहे. थोडक्यात सांगायचे तर आमच्या मोबाइलपासून संगणकापर्यंतच्या सर्व डिजिटल व्यवहारातून मराठी बाद झालेली आहे. विविध दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम असो वा घरातील अनौपचारिक बोलणेही हिंदी वा इंग्रजीमिश्रित (खरे तर प्रदूषित) असलेच पाहिजे, असा जणू पायंडाच पडलाय आणि सगळयात महत्त्वाचे म्हणजे आजवर ज्या प्राथमिक-माध्यमिक शिक्षणामुळे मराठी भाषा टिकली, विस्तारली त्या शैक्षणिक प्रांगणातूनच मराठीला हुसकावून लावण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. या अशा मन अस्वस्थ करणा-या पार्श्वभूमीवर जेव्हा ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या’, अशी हाकाटी सुरू होते, त्या वेळी हसावे की रडावे, असा प्रश्न पडतो.
मराठी आणि महाराष्ट्र या दोन्ही शब्दांचा उगम ज्यामध्ये झाला त्या म-हाटयांच्या लोकजीवनात गेल्या दोन-अडीच हजार वर्षापासून अनेक चढ-उतार आले. प्रत्येक वादळाला सह्याद्रीच्या छातीने भिडणारी मराठी मनगटं कायम बळकट राहिली. महाराजिक-महाराष्ट्रिक- महारट्टिक-मरहट्टे आणि म-हाटे अगदी आरंभीच्या काळापासून राकट-तापट, मानी-सहनशील म्हणूनच ओळखले जात. म्हणूनच या लोकांमुळेच भाषेला महाराष्ट्री-मरहट्टी-म-हाटी आणि मराठी म्हणून ओळखले जाऊ लागले. इ.स. ७७८ मध्ये लिहिल्या गेलेल्या उद्योतनसुरी यांच्या ‘कुवलयमाला’ या ग्रंथात विविध अठरा देशी भाषांचा उल्लेख करताना ‘मरहट्टी’चा उल्लेख आढळतो. बाराशेहून अधिक वर्षापूर्वी मराठी भाषेचे वर्णन करताना लेखकाने जे शब्द वापरले आहेत, ते वर्णन आजही म-हाटी लोकांस लागू पडते.
दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसले य।
दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे॥
दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे॥
याचा अर्थ असा होतो की, ‘मरहट्टे’ म्हणजे धसमुसळे, काळेसावळे, सहनशील, अभिमानी, शीघ्रकोपी आणि ‘दिण्णले, गहिल्ले’ (आत्ताच्या भाषेत ‘दिले-घेतले’) बोलणारे लोक. ज्या शालिवाहन शकाचा आजही मराठी लोकांना अजूनही विसर पडलेला नाही, ते शककर्ते सातवाहन घराणे म्हणजे महाराष्ट्राचे आद्य राजघराणे. आजचे पैठण आणि त्या काळातील प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी होती. सुमारे साडेचारशे वर्षे नर्मदेपासून दक्षिण भारतापर्यंत राज्य करणा-या सातवाहन राजांनी महाराष्ट्रीला-प्राकृतला आपली राजभाषा केली होती. संपूर्ण राज्यकारभार आणि लोकव्यवहार महाराष्ट्री भाषेत होत असे. या सातवाहन घराण्यातील ‘हाल’ या राजाने ‘गाथासत्तसई’ म्हणजेच ‘गाथा सप्तशती’ हा काव्यसंग्रह दोन हजार वर्षापूर्वी लिहिला होता. त्यामुळे त्याच्या काही शतके आधी म-हाटी भाषा अस्तित्वात होती, हे आपण सिद्ध करू शकू, असा मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणा-यांचा पवित्रा आहे. याआधी तमिळ, तेलुगू, कन्नड या लोकभाषांना आणि संस्कृत या देववाणीला हा दर्जा मिळालेला आहे. तसे पाहायला गेल्यास मराठीच्या प्राचीनत्वाने या आधीच ही भाषा ‘संस्कृतोद्भव्’ म्हणजे संस्कृतपासून जन्मलेली आहे, या काही पंडितांच्या दाव्यातील हवा काढून घेतली होती. तरीही मराठीतील काही ‘पोथीनिष्ठ’ मराठीचा संस्कृतशी संबंध जोडतात. वस्तुत: मराठीतील शब्दसंख्या ९० हजार ते एक लाखाच्या घरात जाते. त्यातील जेमतेम १५ टक्के शब्द संस्कृत आहेत. त्यामुळे मराठीला ‘अभिजात भाषा’ दर्जा देण्याच्या या प्रयत्नात पुन्हा एकदा मराठीच्या स्वतंत्र अस्तित्वाची चर्चा होत आहे, ही या सगळ्या खटाटोपातील जमेची बाजू मानली पाहिजे.
माझा म-हाठाचि बोलु कवतिके। परि अमृतातेही पैजा जिंके।
ऐसी अक्षरेचि रसिकें। मेळवीन।।
असे छातीठोकपणे सांगणा-या ज्ञानेश्वर महाराजांनी एका अर्थाने मराठी भाषेला ज्ञानभाषा केली होती. तेराव्या शतकात ज्ञानोबा माऊलींनी संस्कृत आणि ब्राह्मण-पंडितांच्या ताब्यात असलेले धर्मज्ञान देशी मराठी भाषेत सांगणे हे फार मोठे बंड होते. तसे पाहायला गेल्यास या बंडाळीची सुरुवात अकराव्या शतकापासूनच सुरू झाली होती. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, महानुभाव पंथ आणि लिंगायतांनी लोकभाषेतून धर्म सांगायला सुरुवात केली होती. काबूल-कंदाहापर्यंत पोहोचलेल्या सर्वज्ञ चक्रधरांच्या महानुभाव संप्रदायाने तर मराठीला आपली धर्मभाषाच करून टाकली होती. तसे पाहायला गेल्यास चक्रधर स्वामी गुजरातेतून महाराष्ट्रात आले होते. त्यांना मराठीचे, महाराष्ट्राचे प्रेम असण्याचे कारण नव्हते; परंतु तसे झाले नाही. निर्मळ मनाच्या, मोकळया-ढाकळया स्वभावाच्या, फटकळ म-हाटी लोकांच्या ते प्रेमात पडले असावेत. म्हणून त्या काळात संस्कृतचा प्रभाव असतानाही त्यांची शिष्यमंडळी विद्वान पंडितांना, ‘‘तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा : मज श्री चक्रधरे तिरुपिली म-हाटी : तियाचि पुसा’ असे बेधडकपणे सांगत असायचे. चक्रधरांसोबतच दत्त, नाथ आणि लिंगायत संप्रदायासारख्या पंथांनी मराठीला धर्मव्यवहारात महत्त्वाचे स्थान दिल्याने ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम महाराज आदी संतांना आपले वाङ्मय मराठीत निर्माण करणे शक्य झाले होते. पैठणच्या एकनाथ महाराजांनी मराठीत लिखाण करू नये, मराठीत धर्मज्ञान सांगू नये यासाठी त्यांच्यावर घरातूनच दबाव होता; परंतु त्याला न जुमानता ‘संस्कृतवाणी देवे केली मग मराठी काय चोरापासून झाली?’ असा प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवले होते. खरे तर या अशा सा-या बंडखोर भाषाप्रेमींमुळेच आजवरचा मराठीचा प्रवाह झालेला आहे. अखिल भारतीय पुरोगामी लेखक परिषदेच्या २२ मे १९४३ मध्ये मुंबईत झालेल्या अधिवेशनात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि वाङ्मयाचे अभ्यासक कॉ. श्रीपाद अमृत डांगे अध्यक्ष होते. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात डांगे यांनी मराठीच्या उगमाचा मुद्दा फारच आक्रमकपणे मांडला होता. ते म्हणाले होते की, ‘मराठी भाषेचा व वाङ्मयाचा जन्मच मुळी दलित जनतेने आपल्या पिळवणुकीविरुद्ध उभारलेल्या बंडातून झाला आहे. या बंडखोरांनी आपले विचार महानुभाव, नाथ, लिंगायत इत्यादी पंथांच्या वाङ्मयातून व्यक्त केले. इसवी सनाच्या आठव्या शतकापासूनची हिंदू सरंजामी जुलूमशाही व तिच्याविरुद्ध जनतेने केलेले बंड यातूनच अव्वल मराठी वाङ्मय उगम पावले. त्या वेळच्या सरंजामी ब्राह्मणशाहीचे रक्तशोषक पुरस्कर्ते व त्यांची राज्यसंस्था यांनी त्या वेळी ‘चतुर्वर्ग- चिंतामणि’सारखे प्रचंड विधिग्रंथ निर्माण करण्याचे काम चालवले होते. या ग्रंथात हिंदू गृहस्थ, शेतकरी, जमीनदार इत्यादींनी करावयाच्या दोन हजार व्रतांचे वर्णन आहे. वर्षाच्या ३६५ दिवसांवर या दोन हजार व्रतांच्या निमित्ताने दक्षिणादान व ब्राह्मणभोजनाचे ओझे चढविण्यात आले होते. ही भोजने म्हणजे परोपजिवीवर्गाची चैनबाजी; दक्षिणा म्हणजे त्यांच्या दलालांची फी व पिळल्या जाणा-या लोकांवर कराची लादणूक. आता हा ‘चतुर्वर्ग- चिंतामणि’ विस्मृतीच्या उदरात गडप झाला आहे; पण त्याच काळात, त्याच परिस्थितीत ज्ञानेश्वरांनी जनतेच्या हक्कांसाठी लढा दिला. पिळवणा-यांच्या ‘व्रतबद्ध’ मार्गाने न जाता जनतेने स्वत:च्या जोरावर, स्वतंत्रपणे मोक्षाचा मार्ग शोधावा, या हक्कासाठी ज्ञानदेवाने लढा केला. स्त्रिया, शुद्र आणि वैश्य यांना ज्या परमेश्वरी स्वर्गात, श्रीकृष्णाच्या वचनानुसार स्वातंत्र्य मिळणार होते, त्या स्वर्गाची किल्ली ज्ञानेश्वरांने लोकांना स्वत:च्या भाषेतून म्हणजे मराठीतून दिली. त्यासाठी ज्ञानदेवांना छळ सोसावा लागला, पण ज्ञानेश्वरी हा युगप्रवर्तक ग्रंथ ठरला.. अशाप्रकारे दलितांनी उभारलेल्या बंडातून आमच्या वाङ्मयाचा जन्म झाला’, असे कॉ. डांगे म्हणाले होते.
थोडक्यात काय तर भाषा, संस्कृती आणि लोकजीवन या मराठी समाजाच्या तिन्ही अंगांनी प्रस्थापितांविरोधात सततचा झगडा देत आपले अस्तित्व जपले; परंतु आज अवघे जग एकविसाव्या शतकात संगणक युगातून डिजिटल विश्वात यशस्वी घौडदौड करू लागले असताना आम्ही मराठमोळे लोक मात्र आमच्या पारंपरिक कल्पनांना कवटाळून बसलो आहोत. आमच्यातील शिकल्यासवरल्या लोकांनी या बदलत्या वातावरणात स्वत:ला यथास्थितपणे ‘बदलवून’ घेतले. त्यामुळे त्यांच्या पुढील पिढयांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि माहिती- तंत्रज्ञानाच्या मार्गावरून इंग्लंड-अमेरिकेची वाट धरली. ज्यांच्या घरातील मुले परदेशी गेली त्या मध्यमवर्गीयांनादेखील सुनेचे वा मुलीचे बाळंतपण किंवा मुलाची/जावयाची बदली या किंवा अशा स्वरूपाच्या कारणामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचे ओझरते का होईना दर्शन घडत गेले. परिणामी भारतात परतल्यावर पाश्चिमात्य समाज-संस्कृती किती चांगली आहे आणि आपली मुले-नातवंडे तेथे किती सुखात आहेत, हे सांगण्याची जाहिरात केली जाते. या सगळ्याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष दुष्परिणाम शिकणा-या वर्गावर होतो. ‘इंग्रजी शिक्षण घेऊन अमेरिकेत जायचे’ हा एकमेव कार्यक्रम घेऊन विद्यार्थी कामाला लागतात. या सगळ्या कष्टमय प्रवासात विद्यार्थ्यांचे पालक त्यांचे नुसते मार्गदर्शक वा वाटाडे नसतात तर ते सहप्रवासी होतात. मुलाच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून ते विविध मालिकांचे ‘व्यसन’ सोडतात आणि टीव्हीकडे पाठ फिरवतात. दहावी-बारावी आणि पदवीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या घरात सिनेमा, राजकारण, शेजारपाजा-यांच्या घरातील गॉसिप्स आदी विषयांवर चर्चा होत नाही. मोबाइल- इंटरनेट आदी आधुनिक तंत्रालाही घराबाहेर काढलेले असते. कधी वडील, तर कधी आई मोठया कष्टाने साठवलेली रजा घेऊन मुला-मुलीच्या सोबत राहतात. ज्या वयात मुलांनी खेळले पाहिजे, फिरले पाहिजे, नवी स्वप्ने पाहण्यासाठी जगाचा अनुभव घेतला पाहिजे, त्या वयात पालकांच्या मानगुटीवर बसलेली अमेरिकन सुखकल्पनेची भुते त्यांना कधी गणित तर कधी भौतिक वा रसायनशास्त्राच्या रूपाने भिववत असतात. त्या अफाट मानसिक ताणामुळे तणावग्रस्त झालेली मुले परीक्षेशिवाय दुस-या कशाचाच विचार करायला तयार नसतात. आठवीपर्यंत, काही ठिकाणी जेमतेम दहावीपर्यंत मराठी हा विषय अभ्यासाला असतो. त्यानंतर या विद्यार्थ्यांचा मराठीशी संबंध तुटतो. भाषेशी संबंध तुटला की संस्कृतीशी संबंध कमी होत जातो. आपल्याकडे संस्कृतीसाठी इंग्रजीतील ‘कल्चर’ आणि ‘हेरिटेज’ या अर्थानेही पाहिले जाते आणि ‘सिव्हिलायझेशन’ (सभ्यता) या अर्थानेही पाहिले जाते. त्यामुळे ‘मराठी संस्कृती’ म्हटली की लग्नसमारंभातील नऊवारीपासून मोदक लाडवापर्यंत, लेझीम-कुस्तीपासून फेटय़ापर्यंत अनेक गोष्टी समोर येतात. या सगळ्या गोष्टी मराठी संस्कृतीशी फक्त नावापुरत्याच मर्यादित असतात. त्यांना मराठी समाजातील वास्तवाची कल्पनादेखील नसते. आणि असली तरी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची अजिबात इच्छा नसते. मध्यंतरी मराठी लोककला-लोकजीवनावर आधारलेला एक रंगीबेरंगी कार्यक्रम पाहाण्याचा योग आला. फक्त मनोरंजन हे एकच सूत्र हाती घेतलेला चलाख सूत्रधार त्या कार्यक्रमात दिसला. त्याने तो सबंध कार्यक्रम भव्य-दिव्य व्हावा यासाठी देखणा रंगमंच, उंची कपडे, आकर्षक वाद्यवृंद आणि उत्तम नर्तक-गायक अशी नजर लागण्याजोगी सज्जता केली होती. एखाद्या मराठी समजणा-या विदेशी वा महाराष्ट्राबाहेरील व्यक्तीने समजा तो ‘शो’ पाहिला, तर महाराष्ट्र आजही सुखी-संपन्न शेतक-यांचा प्रांत आहे, असा त्याचा गोड गैरसमज होऊ शकतो. येथील आदिवासी म्हणजे छान आयुष्य जगणारी ‘रानची पाखरं’ आहेत, असे वाटू शकते. महाराष्ट्रातील विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्यांनी दोन लाखांचा आकडा केव्हाच पार केला आहे. आदिवासींमधील कुपोषणाने होणारे बालमृत्यू असोत वा रोजगारासाठीचे स्थलांतर यामुळे आदिवासींच्या भाषा-वेषभूषा- नृत्य-धर्मविधी आदी सगळ्याच गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत; परंतु त्या तीन तासांच्या भरगच्च कार्यक्रमात या विषयांचा साधा उल्लेखही झाला नाही, कारण आमचा अवघा समाज त्या चलाख निवेदकाप्रमाणे सोयीच्या सांस्कृतिक प्रतीकं आणि प्रतिमांमध्ये रमलेला आहे. त्यामुळे आम्हाला प्रश्नांचा विचार करणे आवडत नाही, कारण त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या कटकटीतून आपोआप सुटका होते, पण ‘सेलिब्रेशन’ करण्याची एकही संधी आम्ही सोडू इच्छित नाही. होय, उत्सव मग तो गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गुढीपाडवा किंवा साई भंडारा असो किंवा साहित्य संमेलनाचा वार्षिक उरूस, आम्ही आमचे ठेवणीतले कपडे चढवून नाचायला, मिरवायला तय्यार. होय, मराठीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेली काही विद्वानांची धडपड ही अशीच मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करून उत्सवासाठी आसुसलेली दिसते. आज मराठी प्राथमिक-माध्यमिक शाळेतून हद्दपार होत आहे. संभाषण संपर्क व्यवहारातून दूर फेकली जात आहे. त्याचे दु:ख वाटणारे भाषाप्रेमी आज महाराष्ट्र देशी असते, तर त्यांनी या ‘अभिजात दर्जा’साठी उडया मारणा-या मंडळींचे कान उपटले असते. आणि मुख्य म्हणजे मराठीच्या अस्तित्वाशी संबंधित विषयांवर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले असते. आज महाराष्ट्रात इंग्रजीचा प्रभाव वाढत असताना जी मराठी शिकवली जाते, त्या मराठीचे व्याकरण सदोष आहे. त्यात बदल करण्याचा ना शासन पातळीवरून प्रयत्न होतोय, ना साहित्यिक वा भाषातज्ज्ञांना त्याची चिंता वाटते; परंतु या सगळ्या निराशाजनक वातावरणात आपण गप्प बसण्याची गरज नाही. होय, मराठीच्या व्याकरणात काही अतिहुशार मंडळींनी अशा काही गफलती करून ठेवलेल्या आहेत की, त्या आताच सुधारल्या नाहीत तर मराठीच्या अस्तित्वाला आणखी धोका निर्माण होईल. मराठी भाषेचे १८ शुद्ध लेखनविषयक नियम आहेत. मराठी साहित्य महामंडळाने १९६२ मध्ये १४ नियम बनवले होते. त्यात दहा वर्षानी आणखी चार नियमांची भर पडल्याने ते १८ झाले. हे नियम पक्षपाती आहेत. मुख्य म्हणजे मराठीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारणारे आहेत. आम्ही जेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्या वेळी तरी या ‘कर्मठ’ नियमांकडे पाहिलेच पाहिजे. या नियमांमुळे मराठीत आलेल्या १४ ते १५ टक्के शब्दांना आपले ‘संस्कृत रूप’ टिकविण्याची मुभा दिली गेली. परिणामी या १५ टक्के शब्दांमुळे मराठीचे अभिजातपण हिरावून घेतले आहे. आज मराठीत चार प्रकारचे वर्ण किंवा वर्ग आहेत. तत्सम, म्हणजे संस्कृतमधून आलेले शब्द. उदा. अक्षता, अखंड, लीला, समीक्षा, पर्ण इ. दुसरा शब्दांचा प्रकार आहे, तद्भव. म्हणजे संस्कृतमधून मराठीत येतांना ज्यात बदल झाला ते शब्द. उदा. चक्रचे चाक, अग्नीचे आग, दुग्धचे दूध इ. शब्दांचा तिसरा प्रकार आहे देशी. हे सारे असे शब्द आहेत, ज्यांचा उगम महाराष्ट्राच्या काळ्या मातीतच झाला आहे. या देशी शब्दांमधून ‘महाराष्ट्री’ लोकसंस्कृती झळकते. उदा. गुडघा, कंबर, दगड, धोंडा, चिमणी, झोप, लुगडे, डोंगर इत्यादी आणि याशिवाय आपल्या भाषेतील चौथा प्रकार आहे परभाषी शब्दांचा. हे शब्द परकीय प्रवासी, व्यापारी व आक्रमकांबरोबर महाराष्ट्रात आले आणि इथल्या लोकांच्या ओठांवर बसले. त्यात कानडी, तेलुगू, गुजराती आदी लगतच्या राज्यातील भाषांचे शब्द आहेत, शिवाय हिंदी, फारसी, उर्दू, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जपानी आणि मेक्सिकन शब्दही माय मराठीच्या आश्रयाला आले आणि इथलेच झाले; परंतु आमच्या कर्मठ भाषाशास्त्रींनी मराठीचे व्याकरण सिद्ध करताना संस्कृत शब्दांना म्हणजे ‘तत्सम’ शब्दांना वेगळा नियम आणि तद्भव, देशी आणि परभाषेतील शब्दांना वेगळा नियम अशी भाषिक गोची करून ठेवली आहे. त्याबद्दल ना शाळेतील शिक्षक काही चर्चा करताना दिसताहेत, ना कुण्या साहित्यिक-कवीने या क्लिष्ट नियमांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
आज मराठी वृत्तपत्रे आणि दूरदर्शन वाहिन्या यांचा प्रसार-प्रभाव वेगाने वाढतोय; परंतु पुढील दशकात डिजिटल क्रांतीमुळे मराठी मोबाइल-संगणक यांच्या संयोगाने अधिक विस्तारू शकते, परंतु भाषेतील संदिग्ध -हास्व-दीर्घविषयक नियम हा या भावी प्रवासातील सगळ्यात मोठा अडसर ठरतोय. या नियमातून ‘तत्सम’ शब्दांना ब-यापैकी सूट दिली आहे, त्यामुळे नव्या पिढीत फार मोठा संभ्रम पसरलेला आहे आणि हाच घोळ वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्यांमधून पाहायला मिळतो. हा सारा भाषिक गोंधळ आताच सावरला गेला तर ख-या अर्थाने मराठीचे मराठीपण तर टिकेलच, पण इंटरनेट आणि जागतिकीकरणाच्या युगात तिचे आयुष्यही वाढेल. मुख्य म्हणजे आमच्या भाषातज्ज्ञांनी पुण्या-मुंबईच्या लोकांच्या बोलीला खरी मराठी ठरविण्याचा याआधी प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामीण लोकजीवनात महत्त्वाचे ठरलेले अर्थवाही शब्द शहरी बोलीपासून दूर राहिले. सगळ्यात दु:खाची गोष्ट म्हणजे ग्रामीण शब्द नाकारणा-या या पुण्या-मुंबईतील सोवळ्या मराठीने इंग्रजी शब्द-संस्कार आणि संस्कृती मोठय़ा प्रेमाने स्वीकारली, म्हणून आज शहरी मराठी संभाषणावर इंग्रजी-हिंदीचे अतिक्रमण झालेले दिसते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल तेव्हा मिळेल. तो नाही मिळाला तरी काहीच फरक पडणार नाही. त्याआधी आपण आपल्या मायमराठीला संस्कृत, हिंदी आणि इंग्रजीच्या मगरमिठीतून सोडवले तरी आम्ही, ‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’’ असे बोलण्यास आम्ही पात्र ठरू.
Categories:
आवर्तन