मध्यंतरी आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या विविध एफ. एम. चॅनेल्सवर एक काव्यात्म जाहिरात प्रसारित केली जायची. ‘शुभवाणी, लाभवाणी, आकाशवाणी’ कोणत्याही व्यावसायिकाला आवडेल अशी ‘शुभ-लाभ’ या व्यापारी वर्गाच्या आवडत्या प्रतीकांची गुंफण करून ती जाहिरात केली गेली होती.. परवा लालकृष्ण अडवाणी यांच्या नाराजीनामा नाटयाच्या सुमारास ती जाहिरात पुन्हा आठवली. संघ परिवार व भाजपमध्ये असलेल्या व्यापारी वृत्तीच्या नेतृत्वाने ‘ना शुभवाणी, ना लाभवाणी, अडवाणी’ अशी भूमिका घेतल्याने ‘लोहपुरुष’ अडवाणी ‘मोहपुरुष’ बनले आहेत. तर नरेंद्र मोदींना राष्ट्रीय प्रचारप्रमुखपद मिळाल्याने सगळ्याच भाजप नेत्यांना ‘नमो नम:’चा मंत्र जपण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक मुशीतून तयार झाला आहे. त्यामुळे भाजप वर वर कितीही धर्मनिरपेक्षतेची, जात-वर्ग ऐक्याची सोंगे आणत असला तरी भाजप नेतृत्वाचा मूळ पिंड वर्णवर्चस्ववादी हिंदुत्वाचाच आहे, हे तमाम भारतीय जनता जाणते. रामायण - महाभारतातून प्रसवलेल्या आणि पुढे जगभर पसरलेल्या नीती आणि नातेविषयक कल्पना भाजपएवढया अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने मानल्या नाहीत, कारण अवघ्या भारतीय संस्कृतीने ज्यांच्या जगण्या-वागण्याकडे ‘आदर्श’ म्हणून पाहिले ते प्रभू श्रीराम आणि पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण यांचा फक्त भाजपनेच राजकीय स्वार्थासाठी वापर करण्याचे धाडस दाखविले. सत्ता हस्तगत होण्यासाठी ज्या रामजन्मभूमी आंदोलनाचा वणवा भाजपने देशभर पेटवला ती रामजन्मभूमी ‘मुक्त’ करण्याची घोषणा पूर्ण करण्यासाठी किंवा ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा सत्यात उतरविण्यासाठी भाजपने साधे प्रयत्नही केले नाहीत. हे जेव्हा या देशातील धर्मभोळ्या लोकांच्या लक्षात आले, त्या वेळी त्यांनी भाजपला असा धडा शिकवला की, अजूनही भाजपची गाडी रुळावर आलेली नाही. खरे सांगायचे तर नजीकच्या काळातही भाजपची ही दु:स्थिती सुधारण्याची शक्यता नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांच्यासारख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाचा आशीर्वाद असलेल्या नेत्याची भाजप अध्यक्षपद दुस-यांदा पटकावण्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि त्यापाठोपाठ ‘भीष्म पितामह’ लालकृष्ण अडवाणी यांच्या वयाच्या ८५व्या वर्षी प्रचारप्रमुख होण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण केले गेले. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची ‘इच्छापूर्ती’ होऊ नये, यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी यशस्वी प्रयत्न केले आणि एका अर्थाने ‘अटलजी - अडवाणी’ या मुखवटा आणि चेहऱ्याचे युग संपुष्टात आल्याचे सिद्ध झाले. नरेंद्र मोदी यांना भाजपने २०१४ च्या निवडणुकीसाठी प्रचारप्रमुख केल्यामुळे मोदी यांचा अखिल भारतीय स्तरावर नेता म्हणून मिरवण्याचा मार्ग खुला झाला आहे. हे सारे घडवून आणण्यासाठी मोदी यांनी अधिकृतपणे ११०० कोटी आणि अनधिकृतपणे काही हजार कोटी रुपये आजवर जाहिरातबाजी, स्वत:च्या प्रतिमानिर्मितीवर उडवले. राष्ट्रीय नेत्याचा दर्जा देऊन पक्षाने मोदी यांच्या पंतप्रधानपदी बसण्याच्या महत्त्वाकांक्षेलाही ‘हवा’ दिली आहे; परंतु या सगळ्या गडबडीत गडकरी, अडवाणी, अरुण जेटली, सुषमा स्वराज आदी किमान डझनभर नेत्यांच्या सुप्त राजकीय आकांक्षा मारल्या गेल्या आहेत. ते गप्प बसणे कठीण दिसते.
रा. स्व. संघाने ‘मोदीत्व’ म्हणजेच आक्रमक हिंदुत्वाच्या बळावर देश काबीज करण्याची तयारी केली आहे, पण मोदींचा आजवरचा इतिहास पाहता, आपल्या विरोधकांचा पूर्ण खात्मा करणे, त्यांचे अस्तित्व संपवणे, यावर भर देणे त्यांना विशेष आवडते. त्यासाठी ते सर्व मार्ग वापरतात. ज्या पद्धतीने मोदी गटाने गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ मिळू न देता त्याने तो मान अडगळीत पडलेल्या राजनाथ सिंग यांच्या पदरात पडेल अशी व्यवस्था केली आणि आता अडवाणींना संघामार्फत अप्रत्यक्षपणे ‘आम्हाला तुमची गरज उरलेली नाही’ असे सुनावले, ते सारे मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ओझरते दर्शन आहे. पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे, हे त्यांच्या सहका-यांनाही ठाऊक नाही. थोडक्यात सांगायचे तर, भाजपमधील सत्तासंघर्ष निवडणुकीआधीच तीव्र झाल्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाकडून फारशी चमकदार कामगिरी होणार नाही, हे स्पष्ट होऊ लागले आहे.
कौरव आणि पांडव यांच्यातील ‘महाभारता’च्या युद्धाला तोंड फुटण्याआधी देवव्रत भीष्म म्हणजे कौरव पक्षातील सर्वात ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तीने एक घोडचूक केली होती. अगदी लालकृष्ण अडवाणी यांनीही तशीच चूक केली आहे. आपल्या प्रतिज्ञेचा, त्यागाचा आणि सामर्थ्यांचा प्रचंड अभिमान असलेल्या भीष्म पितामह यांनी युद्ध सुरू होण्यापूर्वी कौरवांच्या बाजूच्या रथी-महारथींची स्तुती आणि तुलना केली होती. त्यादरम्यान सूतपुत्र राधेय-कर्ण याच्याबद्दल बोलताना त्यांनी अनेक कुत्सित आणि अपमानास्पद शब्द वापरले. हा सूतपुत्र ‘अर्धरथी’ आहे अशा शब्दात भीष्माने कर्णाची अवहेलना केली होती. त्या अवहेलनेमुळे कर्ण भयंकर संतापला होता. त्या रागातूनच तो उद्गारला, ‘हा म्हातारा, या युद्धात सेनापती असेल, तर मी लढणारच नाही.’
नितीन गडकरी यांना बाजूला सारण्यात जेव्हा मोदी गटाला यश आले, तेव्हापासून अडवाणी यांनी कधी नितीशकुमार यांच्या तोंडून तर कधी अन्य पक्षातील लोकांच्या माध्यमातून मोदी हे पंतप्रधानपदाचे दावेदार होऊच शकत नाहीत, असे वदवले होते. आपले एकेकाळचे तारणहार अडवाणी हे आपल्या विनाशासाठी टपले आहेत, याची मोदी यांनाही कल्पना आली होती. त्यामुळेच त्यांनी अडवाणींची यथायोग्यपणे कोंडी करण्याची व्यवस्था करवली. गोव्यातील बैठकीच्या एक आठवडा आधी जेव्हा अडवाणी यांना मोदी प्रचारप्रमुख होणार याची खात्री झाली होती; परंतु तरीही हा भाजपचा ‘भीष्म’ हातातील शस्त्रे खाली ठेवायला तयार नव्हता. आपला अखेरचा हल्ला त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या आडून केला. भाजपात फक्त मोदी हेच श्रेष्ठ मुख्यमंत्री नाहीत, शिवराज तर खूपच चांगले आहेत, असे तिरकस अस्त्र सोडून अडवाणींनी भाजपमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे चिडलेल्या मोदी यांनी रा. स्व. संघातील सगळ्या बडय़ा लोकांपर्यंत आपली नाराजी पोहोचवली. इतकेच नव्हे तर ‘मला गुजरातमध्ये अजून खूप काम करायचे आहे, इतक्यात मला दिल्लीची जबाबदारी नको’ असेही सांगून टाकले होते. त्यामुळे अडवाणी यांनी गोव्याच्या बैठकीवर ‘आजारी’ असल्याचे कारण सांगून बहिष्कार टाकला, तरी संघनेतृत्व बधले नाही. मोदी यांनी तर एक पाऊल पुढे टाकून अडवाणी यांच्या घरापुढे निदर्शने करण्यासाठी माणसे पाठवली. या निदर्शकांनी अडवाणींची हलक्या भाषेत संभावना केली. जसा सूतपुत्र कर्ण भीष्म पितामहांना ‘म्हातारा’ म्हणाला होता, अगदी तसेच शब्द या मोदीभक्तांनी उघडपणे उच्चारले. त्यामुळे अडवाणी यांची काय स्थिती झाली असेल, याची कल्पना करवत नाही. महाभारतातील या भीष्म-कर्ण संघर्षाची सध्याच्या राजकारणात होत असलेली पुनरावृत्ती तिथेच थांबत नाही. भीष्म पितामहांचे युद्धात पतन झाल्यानंतर कर्णासमोरील मोठा अडथळा दूर झाला होता. साक्षात भीष्माचा पाडाव झाल्याने कौरव सेना हतबल झाली असताना कर्णाचे युद्धक्षेत्रावर आगमन झाले. महाभारतात हे सगळे सत्तांतराचे नाटय़ अत्यंत सुरेख पद्धतीने मांडलेले दिसते. भीष्म गेल्यामुळे घाबरलेला कौरव पक्ष कर्णाच्या नावाने पुकारा करू लागला होता आणि आपला परममित्र दुर्योधन संकटात आहे, हे समजताच कर्ण रणांगणावर धावला. त्याने सगळ्यात प्रथम काय केले, तर पितामह भीष्म यांच्या देहाचे दर्शन घेण्यासाठी तो धावला. महाभारतकार त्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतात, ‘वीरशय्येवर निजलेल्या त्या भरतश्रेष्ठ आणि पराक्रमी भीष्माला कर्णाने पाहिले. आर्त झालेला, अश्रूंनी डोळे डबडबलेला भावविभोर कर्ण रथामधून खाली उतरला. त्याने दोन्ही हात जोडून भीष्माना नमस्कार केला आणि नंतर खाली वाकून पायाही पडला.’
पक्षाच्या राष्ट्रीय प्रचारप्रमुखाची सूत्रे गोव्याच्या प्रतिनिधी सभेमध्ये स्वीकारताना ज्या नरेंद्र मोदी यांनी राजनाथ सिंह यांची मनसोक्त स्तुती केली होती; परंतु ज्या अडवाणी यांनी २००२ साली गुजरातच्या जातीय दंगलीतील सहभागामुळे मुख्यमंत्रीपद अडचणीत आलेले असताना मोदी यांना अभय दिले होते, त्या अडवाणींना मोदी विसरले. त्यांनी अडवाणींना अनुल्लेखाने मारले, पण दुस-या दिवशी अडवाणींनी राजीनामास्त्र उगारताच, मोदी यांनी अडवाणी यांची स्तुती केली, त्यांचा आशीर्वाद मागितला, पण त्यातील ‘कृत्रिमता’ कर्णाच्या कृत्रिम किंवा औपचारिक नमस्कारासारखीच होती.. राजीनामा दिल्यानंतर अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर शरशय्येवर पडलेले भीष्म आणि श्रीकृष्णाचे विश्वरूपदर्शन यांचा उल्लेख केला होता. त्यामुळेच खरे तर मला महाभारत युद्धातील भीष्म-कर्ण संघर्ष जाणवला. आता महर्षी व्यास यांनी रचलेल्या महाभारतातील कथानक जसे पुढे जाते, भीष्म पितामह ‘राजधर्म’ सांगायला लागतात, तसे अडवाणी यांनी मात्र करू नये. नाही म्हणायला ‘हल्लीच्या भाजप नेत्यांचे स्वत:चे असे व्यक्तिगत उद्देश आहेत आणि त्यानुसार ते काम करतात,’ असे विधान करून त्यांनी आपल्या ‘नाराजीनामा’ पत्रालाही वैचारिक डूब दिली होती. तसे त्यांनी यापुढे करू नये, कारण त्यांनी देशात कट्टर धर्मवादी राजकारण करून जे वातावरण प्रदूषित केले आहे, त्यावर कुणी प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे उत्तर नसेल. नरेंद्र मोदी नामक हिंसक कारवायांचे समर्थन करणा-या व्यक्तीला का मोठे केले, याचेही समर्पक कारण त्यांना देता येणार नाही. आता यापुढे भाजपची होणारी फरफट आणि दुर्दशा घरात बसून पाहणे एवढेच त्यांच्या हाती उरले आहे. जसे शरशय्येवर पडलेले पितामह भीष्म कौरव सेनेतील एकेक दिग्गजांचा पाडाव होताना व्यथित होत गेले, अगदी तशीच स्थिती अडवाणी यांची होणार आहे. त्यांच्या दुर्दैवाने त्या ‘विनाश पर्वा’ची सुरुवात राजीनामा मागे घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत झाली आहे. मोदी यांच्या कडवट हिंदुत्वाला आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्वाला आरंभापासून विरोध करणारे बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड)चे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी पहिला घाव घातला आहे. बिहारमध्ये भाजपच्या ९१ आमदारांच्या साथीने मुख्यमंत्रीपदी बसलेल्या नितीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. देशाची सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपसाठी हा फार मोठा धक्का आहे. सध्या नितीशकुमार यांच्याकडे २० खासदारांचे प्रभावी पाठबळ आहे. मोदी यांची प्रचारप्रमुख म्हणून नेमणूक होताच नितीशकुमार यांच्यासारखा मोहरा बाजूला गेला. त्यांना रोखण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी दोन वेळा फोन केले; परंतु काहीच उपयोग झाला नाही. जनता दल (यु) रालोआतून बाहेर पडल्यानंतर भाजपबरोबर फक्त शिवसेना आणि अकाली दल हे दोनच नाव घेण्यासारखे पक्ष उरतील. अटलजी-अडवाणी युगात दोन अंकी मित्रपक्ष असल्याचा अभिमान मिरवणा-या रालोआची ही स्थिती होईल, असे अडवाणी यांनी स्वप्नातदेखील पाहिले नसेल; परंतु कडवट धर्मवादाच्या लाटेवर स्वार होऊन त्यांनीच भाजपला हिंदुत्ववादी पक्ष ही ओळख दिली होती, त्यामुळे त्यांना अल्पकालीन यशही सत्तेच्या रूपाने मिळाले होते. आता पुन्हा रा. स्व. संघाच्या सत्ताकांक्षी नेतृत्वाला यशाची भूक लागली आहे आणि त्या अभिलाषेमुळेच अटल-अडवाणी युगाचा अंत झालेला आहे. त्या अंतामध्ये आणि मोदीत्वाच्या उदयामध्ये भाजपच्या -हासाची बिजे दडली आहेत.
मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील आगमनामुळे भाजपच्या थोडयाच शिल्लक राहिलेल्या मित्रपक्षांमध्ये फाटाफूट सुरू झाली आहे. मात्र मोदी यांच्याएवढेच चांगले प्रशासन चालविणा-या, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांना मोदी यांना मिळणारे अवाजवी महत्त्व किती मान्य आहे, त्याविषयी अजून उघडपणे चर्चा सुरू झालेली नाही; परंतु गेल्या पाच निवडणुकांमध्ये गुजरातचा गांधीनगर मतदारसंघ ज्या अडवाणी यांनी ‘आपलासा’ केला होता तो मतदारसंघ मोदी यांच्याशी झालेल्या उघड भांडणानंतर अडवाणींसाठी ‘सुरक्षित’ राहिलेला नाही, त्यामुळे अडवाणी यांनी मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान यांच्याशी जुळवून घेत २०१४ च्या निवडणुकीसाठी नवा मतदारसंघ शोधलेला आहे. मोदी यांची खुनशी कार्यपद्धती पाहता ते अडवाणींची ही ‘गुजरात ते मध्य प्रदेश रथयात्रा’ सुरळीतपणे पार पडू देणार नाहीत. परिणामी शिवराजसिंहासोबत त्यांचे शीतयुद्ध सुरू होईल. येथे रा. स्व. संघाच्या नेतृत्वातही भाजपप्रमाणे फूट पडण्याची शक्यता निर्माण होईल.
‘‘भाजपमधील अडवाणी, अरुण जेटली, तसेच रा. स्व. संघातील अनेक दिग्गज क्रिकेटचे ‘फॅन’ आहेत, त्यामुळे क्रिकेटमधील ‘बेटिंग’ची अनेक प्रकरणे बाहेर येत असताना या मंडळींनी मोदी यांच्या नावावर ‘जुगार’ खेळणे समजण्यासारखे आहे’’, अशी मार्मिक प्रतिक्रिया ‘फेसबुक’वर वाचली. त्या वेळी संघिष्टांच्या भ्रमिष्टपणाचे हसूही आले आणि भीतीही वाटली. होय, १९९२ मध्ये याच मंडळींनी रामजन्मभूमीचा वाद निर्माण करून मुंबईसह देशभर दंगली घडवल्या होत्या, त्या वेळी भाजपला शिवसेनेनेही साथ दिली होती. लालकृष्ण अडवाणी यांच्या आक्रमक भाषणांनी देशातील देवभोळ्या खेडुतांना आणि नवश्रीमंत, मध्यमवर्गीयांना काल्पनिक हिंदू राष्ट्राची स्वप्ने दाखवली होती. परिणामी १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतांपैकी ११.५ टक्के मते मिळविणा-या भाजपला १९९१ च्या निवडणुकीत चक्क २० टक्के हिस्सा मिळाला. मात्र मतांच्या तुलनेत लोकसभेमध्ये जागा वाढल्या नव्हत्या, पण पुढे १९९६, १९९८ आणि १९९९ च्या निवडणुकीत भाजपच्या यशाची कमान चढती राहिली; परंतु २००४ आणि २००९ च्या निवडणुकीने भाजपला फक्त अपयशच दिले नाही तर सत्तेच्या काळात सोबत असलेले सतरा मित्रपक्षही अपयशाने तोडले. आता २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपसोबत रालोआत फक्त शिवसेना आणि अकाली दल हे नाव घेण्याजोगे पक्ष उरले आहेत. सेनाप्रमुखांच्या निधनाने विकल झालेल्या शिवसेनेला पर्याय म्हणून प्रदेश भाजपकडून राज ठाकरेंच्या मनसेची चाचपणी सुरू आहे. या ‘फडणविशी’ कारवायांमुळे सेनानेतृत्व विचलित झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर अडवाणी बाजूला फेकल्यामुळे भाजपची सगळी गणिते बिघडलेली आहेत आणि ही गणिते सोडविणे हे मोदी यांच्यासाठी फारसे सोपे नाही.
पक्षाच्या राष्ट्रीय प्रचार समितीचा प्रमुख होणे ही गोष्ट आजवर कोणत्याच पक्षात जेवढी गाजली नव्हती, तेवढी मोदी यांच्या निवडीमुळे चर्चेत आली आहे. अडवाणी यांनी गोव्याच्या बैठकीकडे पाठ फिरवली, ही वस्तुस्थिती भाजपच्या प्रवक्त्यांनी ‘आजारपणात’ बदलविणे, गोव्यातील प्रतिनिधी सभेच्या दोन दिवस आधीच अटलबिहारी बाजपेयी यांच्या मृत्यूची अफवा पसरणे आणि त्याच सुमारास सर्वच राष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांमध्ये मोदी हेच प्रचारप्रमुख होणार अशा बातम्या छापून येणे, हा काही योगायोग नव्हता. गेल्या दोन वर्षापासून मोदींच्या ‘प्रतिमा प्रतिष्ठाना’साठी झटणा-या काही माध्यमतज्ज्ञांच्या प्रयत्नांची ती कमाल होती, त्यामुळे अडवाणी गट भयंकर संतापला. साक्षात यशवंत सिन्हा पुढे आले. त्यांनी या सगळ्या बातम्यांचे खापर माध्यमांवरच फोडले. ‘देशातील प्रसारमाध्यमे आपल्या पक्षातील अंतर्गत विषयांमध्ये अकारण हस्तक्षेप करीत आहेत,’ असा कांगावा अडवाणींच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या सिन्हा यांनी केला, पण त्यांना मोदींच्या मीडिया मॅनेजर्सविरोधात बोलण्याची हिंमत झाली नाही.
मुख्य म्हणजे मोदी गटाच्या या सा-या आक्रमक भूमिकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाचा संपूर्ण पाठिंबा होता. ज्या हिंदू संस्कृतीचा संघ परिवार उदो उदो करतो.. घरातील ज्येष्ठ मंडळींचा आदर करावा, त्यांच्या विचारांचा सन्मान करावा वगैरे.. याच नेमक्या त्याच्या भारतीय मूल्यांना संघ परिवाराने अडवाणी नाराजीनामा प्रकरणात उघडपणे पायदळी तुडविलेले दिसले. मोहनराव भागवत या साठीतील संघचालकांनी पंच्याऐंशी वर्षीय अडवाणी यांच्या नाराजीचा थोडाही आदर केला नाही आणि त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, असा ‘आदेश’ दिला. राजनाथ सिंह यांनी भलेही तो ‘सल्ला’ होता, असे सांगितले होते; परंतु प्रत्यक्षात तो अडवाणी यांना दिलेला आदेश होता. मुख्य म्हणजे जो रा. स्व. संघ आपण बिगर राजकीय संघटना असल्याचा नेहमी आव आणत असतो. काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कामात हस्तक्षेप करतात अशी टीका करीत असतो, त्या संघ परिवाराने मोदी प्रकरणात घेतलेल्या भूमिकेने त्यांचा आधीच जीर्ण झालेला मुखवटा उडून गेला आहे. महात्मा गांधी यांच्या निर्घृण हत्येपासून १९९१ ची दंगल, गुजरातमधील २००२ चा हिंसाचार, आदिवासी भागातील ख्रिश्चन धर्मप्रचारकांवरील हिंसक हल्ले अशा एक ना अनेक प्रकरणात रा. स्व. संघाचा हिंस्र् चेहरा उघड झाला आहे. फक्त राजकारण करताना संघीय लोक आपली नखे आणि तीक्ष्ण दात लपवितात आणि अधिकार मिळताच ती बाहेर काढतात. ‘इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांनी आपल्या दमदार अग्रलेखात रा. स्व. संघाच्या या दुतोंडीपणावर टीकेची झोड उठवली. ते म्हणतात, ‘लोकशाहीप्रधान व्यवस्थेमध्ये एका राजकीय पक्षाचे उत्तरदायित्व निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहणा-या एखाद्या संघटनेकडे असणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.’
त्यामुळे आजवर बिगर राजकीयपणाचे ‘भगवे’ सोवळे नेसून भाजपचे ‘कमळ’ हातात धरून बसलेल्या संघ परिवाराने निवडणुकीच्या खुल्या मैदानात उतरावे.
Categories:
आवर्तन