Mahesh Mhatre


इसवी सन पहिल्या ते पंधराव्या शतकापर्यंत भारत अक्षरश: सुवर्णभूमी म्हणूनच ओळखला जात होता. येथील सुबत्ता आणि संपत्तीच्या सुरस कथांनी युरोपियन जग भारताकडे आकर्षित झाले. मायकल एडवर्ड्स यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडिया’ या ग्रंथात पोर्तुगाल आणि इंग्लंडची पावले आपल्या देशाकडे कशी वळली, याचा सुरेख मागोवा घेतला आहे. एडवर्ड्स लिहितात, पंधराव्या शतकात पोर्तुगीज सत्ताधारी पोपच्या आशीर्वादाने अत्यंत प्रभावशाली बनले होते. त्यामुळे इस्लामच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे ही आपली जबाबदारी आहे, अशी त्यांची भावना झाली होती. त्याच भावनेतून भूमध्यसागरीय देशातील इस्लामी सत्ताधा-यांचा भारत आणि चीनच्या व्यापारावर असलेला प्रभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी भारताकडे मोर्चा वळवला होता. त्यामधूनच, १४९८ मध्ये केप ऑफ गुड होपला वळसा घालून वास्को-द-गामा कालिकतच्या किना-यावर पोहोचला. भारतभूमीवर समुद्रमार्गाने झालेले ते पहिलेच आक्रमण होते. तत्पूर्वी सगळी आक्रमणे खबर खिंडीतून झाली होती.. वास्को-द-गामाच्या कालिकतमधील आगमनाची संपूर्ण कहाणी ‘अ जर्नल ऑफ द फर्स्ट व्हायेज ऑफ वास्को-द-गामा’ या पुस्तकात सांगितली आहे. त्यात एका ठिकाणी हा धाडसी दर्यावर्दी उद्गारतो, ‘भारताची ही सफर किती भाग्याची आहे, दोस्तानो, देवाला धन्यवाद द्या. सोने, हिरे, रत्नांनी खच्चून भरलेल्या भूमीत आपण आलो आहोत.’ पोर्तुगीजांसह इंग्लंड, फ्रान्स आदी देशांनी भारताचे ऐश्वर्य अक्षरश: धुवून नेले आणि आपले देश संपन्न बनवले.. संपन्न भारतभूमीत पुन्हा सुवर्णयुग अवतरू शकते, ते काही कठीण नाही. त्यासाठी किमान दोन-चार पिढयांनी स्वत:ला कामात गाडून घेणे गरजेचे आहे. मात्र तसे करण्याऐवजी शोभन सरकार नावाच्या एका साधुबाबाच्या स्वप्नावर विश्वास ठेवून आमचे सरकार गुप्तधनाच्या शोधात निघाले आहे.. त्यामुळे आमच्या सरकारची जगभरात शोभा झाली, हे मात्र खरे! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘स्मशानातलं सोनं’ ही कथा एकेकाळी प्रचंड गाजली, आता हे ‘स्वप्नातलं सोनं’ गाजत आहे.


आपल्या भारतवर्षात सोन्याची अजिबात कमतरता नाही. पण सोन्यासारखी कर्तबगार माणसे दिवसेंदिवस कमी होत आहेत. अवघ्या जगात जेवढे सोने दररोज अंगावर घातले जात असेल, त्याच्या किती तरी पट सोने आमच्या देवी-देवतांच्या मंदिरात सापडेल. सोन्याचा मुकूट घालून नव-याच्या थाटात नाचणारे आसाराम किंवा खिसाराम बापूंसारखे हजारो आधुनिक संत, सोन्याची चप्पल घालणारे आणि सोन्या-नाण्यांच्या सहवासात राहून ‘सगळं जग हे असत्य आणि असार आहे’ असा उपदेश करणारे सत्यसाईबाबासारखे ‘राजमान्य’ बाबा आणि असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व असते, हे स्वत:च्या वर्तनाने दाखवून देणा-या नटयांसारख्या शेकडो राधा माँ किंवा मीरा माताजी यांच्या आश्रमांची, मठांची जर झडती घेतली तर थिरूअनंतपुरमच्या मंदिरातील अब्जावधी रुपयांच्या खजिन्याच्या दसपट संपत्ती सापडेल. जगाला शहाणपण शिकविणा-या या तथाकथित संतांनी सध्या भारतीय समाजात जो धुमाकूळ घातलाय, तो जेवढा संतापजनक आहे तेवढाच चिंताजनकही आहे. मुळातच देवभोळा असणारा आपला भारतीय समाज नेहमीच त्यागाला सन्मान देत आला आहे; कारण जगातील सगळ्याच संस्कृतींमध्ये भोगापेक्षा त्यागाचा मार्ग अनुसरणा-यांनी समाजाला खरी दिशा दाखवलेली दिसते. आपल्याकडे तर अडीच हजार वर्षापूर्वी जैन आणि बुद्ध धम्म तत्त्वज्ञान मांडणारे भगवान महावीर आणि भगवान बुद्ध हे दोघेही सर्वसत्ताधीश राजपुत्र होते, पण त्यांनी राजवैभवाचा त्याग करून जीवनाचे अंतिम सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. अत्यंत खडतर तपश्चर्या करून अंतिम सत्य कळल्यावर त्या दोघा महामानवांनी जगाला आपले सत्याचे आकलन उकलून दाखवले होते.

महावीर यांच्या जैन आणि बुद्ध यांच्या बौद्ध तत्त्वज्ञानाच्या पाठोपाठ भारतात आठव्या शतकात शंकराचार्यापासून सुरू झालेली ही वैचारिक अभिसरणाची क्रांती विविध टप्पे पार करीत गुरुनानक यांचा शीख पंथ, संत कबिरांचे क्रांतदर्शी तत्त्वज्ञान सामान्य लोकांना थेट देव आणि देवत्वाजवळ नेणारे नाथपंथी, दत्तसंप्रदायी, महानुभाव, वारकरी, लिंगायत आदी नवे विचार प्रांतोप्रांती पसरल्याने अवघ्या भारताला अध्यात्मिक आत्मानंदाचे जणू घुमारे फुटले होते. त्या अध्यात्मज्ञानाने भलेही व्यक्तिगत वा सामाजिक पातळीवर भारताचे भले झाले असेल; परंतु त्यातील जातिप्रथेसारख्या अमानवी चालीला जोर देणा-या कुप्रथा-परंपरांनी ‘अवघा मानव एक’ सांगणा-या नव्या विचारांना या भूमीत कधीच रुजू दिले नाही. परिणामी सारा समाज जाती-जमातींच्या चौकटीत विभागून बंदिस्त बनला. आज अवघे जग पृथ्वीच्या मर्यादा भेदून अवकाशात झेपावण्याची स्वप्ने पाहत असताना आम्ही मात्र स्वत:ला आपल्याच चाकोरीत अडकवून बसलो आहोत. या धर्मभोळ्या चौकटीनेच आजवर हिंदुस्थानाचा घात केला आहे. फार दूर कशाला जायचे, अगदी पेशवाईच्या अस्तकाळातील उदाहरणेच बघा, पुरोहितांच्या, पूजा-यांच्या, ज्योतिषी आणि भिक्षुकांच्या सल्ल्याने राज्य करणा-या पेशव्यांनी बंदुका-तोफखाना घेऊन आलेल्या सुसज्ज गो-या पलटणींचा सामना यज्ञ, व्रत, वैकल्याच्या जोरावर करण्याचा प्रयत्न केल्याची डझनावारी उदाहरणे सापडतात. त्या धर्मकृत्यांनी आजवर ना कधी देश वाचवला, ना धर्म, पण तरीही आम्ही हे धर्मश्रद्धेचे जोखड झुगारून द्यायला तयार नाही. त्यातील फोलपणा दाखवून देणा-या अंधश्रद्धा विरोधी चळवळीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची दिवसाउजेडी हत्या होते, खुनी मोकाट आणि गृहमंत्री सुसाट सुटतात; परंतु एखादा शोभन सरकारसारखा ‘शो मॅन’ बाबा उठतो आणि आपल्याला स्वप्नात सोने दिसल्याचे जाहीर करतो, तेव्हा सारी सरकारी यंत्रणा त्या भोंदू बाबाच्या स्वप्नातील सोन्याचा शोध घेण्यासाठी खोदाखोद करताना दिसते, अशा प्रसंगी हसावे की रडावे हा प्रश्न पडण्यापेक्षा या भंपक समाजाने जगावे की मरावे या विचारावर लक्ष केंद्रित होते. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नोकरशाहीला सत्ताधारी वर्गाच्या मदतीने शोभन बाबाने खोदकामाला जुंपण्यापुरता हा भंपकपणा मर्यादित नाही, त्याने आमच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ वेडया सगळ्याच वृत्तवाहिन्यांना आवश्यक असणारी चटपटीत आणि मसालेदार बातमी दिली, परिणामी जवळजवळ पन्नासहून अधिक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी लखनौपासून ५० कि.मी. अंतरावरील दांडिया खेरा या दुर्गम खेडयात पोहोचले आणि त्यांच्या ‘थेट प्रक्षेपणा’ने एक हजार टन सोन्याचे वृत्त देशभर गेले. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या ‘खाद्यावर’ जगणा-या नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याने या हजार टन सोन्याची बातमी पाहताच त्यावर टुणकन उडी मारली. अर्थात एका साधूच्या स्वप्नाची केंद्र सरकार दखल घेते आणि स्वप्नातील सोन्यासाठी प्रत्यक्षात खोदकाम सुरू करते, हा मूर्खपणा आहे, हे सांगायला मोदींची गरज नव्हती, पण कुणी त्यावर बोलण्याआधी आपण प्रतिक्रिया द्यावी, आणि ‘सबसे तेज’चा मान मिळवावा या हेतूने मोदींनी पुरातत्त्व विभागाच्या खोदकामावर खोचक टीका करताना केंद्रातील काँग्रेस सरकारला बोचकारून घेतले. त्यावर काँग्रेसकडून प्रतिवाद होणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. मोदींनी शोभन बाबा आणि केंद्र सरकारची खिल्ली उडविल्यानंतर अवघ्या तिसेक तासांत अशी काही जादू झाली की, मोदींनी शोभन बाबाचे पायच पकडले. आपला त्या एकूण खोदकामावरील आक्षेप मागे घेता घेता त्यांनी शोभन महाराजांच्या तपश्चर्येचे एक मोठे, प्रशस्तिपत्रही बहाल केले. पंतप्रधानपदाच्या आकांक्षेने भारलेल्या मोदींच्या प्रत्येक भाषणात स्वकर्तृत्वाच्या अभिमानासोबत इतरांबद्दल वाटणा-या दु:स्वासाचा दर्प कायम जाणवत असतो. इतरांबद्दल कडवट विधाने करताना ते इतके आक्रमक असतात की, ती परत घेण्याची सोयच उरत नाही. शोभनबाबाच्या स्वप्नाने प्रेरित झालेल्या केंद्र सरकारवर ते त्याच कडवट आवेशात तुटून पडले होते, पण बाबांची ‘पॉवर’ मोदींपेक्षा जास्त असावी, त्यांनी मोदींना शरण येण्यास भाग पाडले. थोडक्यात सांगायचे तर, आजवर कधीच प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या शोभन सरकार नामक साधूने हजारो टन सोन्याचे पिवळे धम्मक स्वप्न दाखवून फक्त केंद्र सरकारच नव्हे तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचेही डोळे दिपवून टाकले आहेत.

होय, सोने या एका शब्दातच भल्या-भल्यांना ‘मोहवून’ टाकण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच असेल कदाचित अगदी पुराणकाळापासून सोने हे भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक जीवनमूल्याशी निगडित झालेले दिसते. भारतीय माणसासाठी सोने केवळ मौल्यवान धातू नसतो, तर तो दागिना आजी-पणजी वा आईच्या आठवणीशी निगडित असतो. वाईट दिवसांत, आर्थिक अडचणीत सोने मनाला आधार देते, तर चांगल्या दिवसांत ते तुमचे सौंदर्य आणि ‘स्टेटस’ वाढवणारे असते. म्हणून प्रत्येक भारतीय घरात मग ते घर गरिबाचे असो वा श्रीमंताचे सोने जपण्याचा अट्टहास दिसतो. आंतरराष्ट्रीय बाजारात वर्तवण्यात येणा-या शक्यतांनुसार जगातील सर्वाधिक सोने भारतात आहे. नाण्यापासून खाण्यापर्यंत, दागिन्यांपासून शर्ट-दुपट्टयापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सोने ‘वापरण्यात’ भारतीय लोक आघाडीवर दिसतात. सध्या भारतीय घरांमध्ये २० हजार टन सोने असावे असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत साधारणत: ६२ हजार अब्ज रुपये होईल. हा आकडा आपल्या जीडीपीच्या (सकल राष्ट्रीय उत्पन्न) साधारणत: पन्नास टक्के एवढा आहे. शोभन महाराज या साधुबाबाने फक्त उनाव जिल्ह्यातील गावात एक हजार टन सोने मिळेल, असे सांगितले, शिवाय आणखी एका गावात अडीच हजार टन सोने पडलेले आहे, असा दावा साधू महाराजांचा आहे, त्यांच्या मते २१ हजार टन सोने कुठे कुठे दडलेले आहे, हे त्यांना स्वप्नात दिसले आहे, म्हणजे सध्या संबंध देशात आहे त्यापेक्षा जास्त सोने मिळवून देण्याचा दावा या साधूने केला आहे. त्यासाठी त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील लढायांचा आधार घेऊन आपल्या स्वप्नांचा अर्थ जाहीर केला. आता स्वप्न आणि सत्य यातील फरक जाणणा-या नेत्यांनी खरे तर या गुप्तधनाच्या चर्चेत पडण्याचे कारण नव्हते; परंतु पुरातन वास्तू आणि गुप्तधनाच्या दंतकथा हे प्रत्येक गावाचे सांस्कृतिक संचित असते. त्याचा संबंध फक्त गावगप्पांशी असावा, पण जर त्याला कुणी खरे मानायला लागले तर आधीच अंधश्रद्धेने पछाडलेला आमचा समाज आणखी गैरसमजांच्या जाळ्यात अडकत जाईल. शोभन बाबाला सरकार आणि प्रसिद्धीमाध्यमांनी मोठा केल्यामुळे गुप्तधनाच्या दंतकथांनी भारलेल्या गावोगावच्या बेकार तरुणांना आता चेव न आला तरच नवल. नाही म्हणायला विदर्भ आणि मराठवाडयात तर गुप्तधनाचा शोध घेणे, हे हजारो तरुणांचे जीवनध्येय बनलेले आहे. दररोज संध्याकाळपासून पडीक वास्तू आणि भग्नावशेष शोधत फिरणा-या या बेकार तरुणांच्या टोळ्यांनी पोखरलेल्या निर्जन गढया, प्राचीन इमारती पाहिल्या की आपल्याकडील ‘सामूहिक मूर्खश्रद्धांची’ कीव करावीशी वाटते. २१ नखांचा कासव, दुतोंडी साप आणि काही विशिष्ट काळातील नाणी शोधत गुप्तधनाची आस जपणारे तरुणांचे तांडे गावोगावी फिरत असतात. त्यांच्या त्या फिरतीला प्रेरणा असते भोंदू मांत्रिकांची. गुप्त खजिन्यावर एक नाग राखण करीत असतो, त्या नागाचा ‘बंदोबस्त’ करून सारे सोने-नाणे व्यवस्थितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी मांत्रिकाची असते. म्हणून या सा-या कधीच प्रत्यक्षात न येणा-या प्रक्रियेत मांत्रिकाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते, जर तो बदमाश असेल तर तो नरबळीसुद्धा मागतो, परिणामी या खेळात एखाद्या लहान बाळाचा हकनाक बळी जातो. एकूणच काय तर फार कष्ट न करता अफाट सोने मिळविण्याची लालसा जशी बेकार माणसाला कोणत्याही थराला नेते तद्वत सरकार नामक यंत्रणाही सोन्याचे नाव काढताच कंबर कसून कामाला लागते, हे या एकूण प्रकरणाने सिद्ध झाले आहे. आता फक्त गावोगावी अशा खोदकामाला शासकीय ‘आशीर्वाद’ मिळू नये, एवढीच आशा करणे आपल्या हाती आहे, कारण खजिन्याची आशा भलती डोकं फिरवणारी असते. शोभन बाबाने ज्या दोन गावात खजिने आहेत असे जाहीर केले आहे, तेथील ग्रामपंचायतींनी त्या एकूण खजिन्यापैकी ३० टक्के रक्कम गावाच्या विकासावर खर्च झालीच पाहिजे असे ठराव केले आहेत. तर ज्या राजा राव रामबक्षसिंग याने शोभन सरकारला स्वप्नात येऊन गुप्त खजिन्याचा पत्ता दिला, त्याचे भरमसाट वारसदार आता पुढे आले आहेत. ते तर म्हणताहेत, ‘निम्मा खजिना आम्हाला द्या’, म्हणजे उद्या समजा साधूच्या स्वप्नाप्रमाणे सोने मिळालेच तर, त्यातील जास्तीत जास्त हिस्सा आपल्याला मिळावा यासाठी उत्तर प्रदेशातील त्या दुर्गम खेडयांमध्ये दंगलच माजेल, तशी ती आजही सुरू आहे, पण सगळ्यात जास्त धमाल येईल जेव्हा त्या खोदकामातून दगड-मातीशिवाय दुसरे काहीच हाती लागणार नाही आणि शोभन सरकारसोबत केंद्र सरकारचीही सगळ्या जगासमोर ‘शोभा’ होईल.

तीन महिन्यांपूर्वी शोभन बाबांनी जेव्हा केंद्र सरकारला पत्र लिहून या सोनेरी स्वप्नाची कहाणी विशद केली होती, तेव्हापासून आपल्याकडील सोन्याची आयात कमी व्हावी यासाठी शासकीय पातळीवरून हालचाली सुरू होत्या. अर्थात या दोन्ही घटनांचा तसा परस्परसंबंध नाही; परंतु सोन्याची आयात, ही आपल्या अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. गेली अनेक वर्षे पेट्रोलियम पदार्थाच्या खालोखाल आम्ही दुस-या कोणत्या पदार्थाची आयात करत असू तर ते आहे, सोने. भारतात दररोज सरासरी सव्वादोन ते अडीच टन म्हणजे एखाद्या लहान हत्तीच्या वजनाएवढे सोने लोक खरेदी करतात. त्यातील बहुतांश सोने घरातच राहाते, म्हणजे ती खरेदी अर्थशास्त्रीय परिभाषेनुसार ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ होते. ज्या गुंतवणुकीला पुढे चलनात येण्याची शक्यता फार कमी असते, त्याचा अर्थव्यवस्थेवर अकारण ताण येणे क्रमप्राप्त असते. 

आपल्याकडे गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या आर्थिक तणावाला हा सोन्याचा हव्यासही कारणीभूत आहे; पण त्याकडे लक्ष देण्यास कुणालाच वेळ नाही. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे मार्च २०१२ ते मार्च २०१३ मध्ये भारताने तब्बल ५४ दशलक्ष डॉलर्स किमतीचे सोने आयात केले होते. अमेरिकेत गेल्या महिन्यात सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने जी ओबामा सरकारची कोंडी केली होती, त्यातही ५४ दशलक्ष डॉलर्सच्या गृह / वाहतूक बिलांचा आकडा लक्षणीय होता. येथे तो यासाठी उल्लेखनीय वाटतो, कारण तो आमच्या एका वर्षाच्या सोने खरेदीसाठी झालेल्या गुंतवणुकीएवढाच आहे. भारतातील मंदिरातील सोने, हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. श्री तिरुपती बालाजी, शिर्डी साईबाबा आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात खूप सोने येते अशी आजवर समजूत होती; परंतु श्री गुरुवायूर मंदिरातील सोन्याच्या खजिन्यांनी सगळ्या जगाचे डोळे दिपवले. या श्री पद्मनाभ मंदिरातील ११० फुटांचा सोन्याचा ध्वजदंड, ही सगळ्यात मोठी वस्तू, त्याशिवाय हजारो सुवर्णमुद्रा, देवाचे दागिने, भांडी आणि हिरे-माणके त्या खजिन्यात मिळाले, अजूनही एक मुख्य खजिना उघडायचा बाकी आहे. त्यातही याहून जास्त दागदागिने असतील असे म्हटले जात आहे. खरे खोटे श्री पद्मनाभच जाणे. पण जाणकारांच्या मते आज जी संपत्ती उघड झाली आहे, त्यातून भारताच्या शिक्षण खात्याचा पुढील पाच वर्षाचा खर्च निघू शकतो. श्रीमंत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या तिरुपती बालाजीकडे भरपूर सोने आहे. त्यातील दोन हजार २५० किलो सोने स्टेट बँकेत ठेवले आहे; परंतु तिरुपती मंदिरातील सोने-नाणे चोरीला जाण्याची एक परंपराच आहे. २००९ मध्ये तर तेथील मुख्य पूजाऱ्यानेच देवाचे एक किलो वजनाचे दोन हार पळवल्याची कबुली दिली होती. एका भक्ताने तिरुपतीला ३०० सोन्याची नाणी अर्पण केली होती. ती त्याच दिवशी कशी गायब झाली याचा गेली दहा वर्षे तपास सुरूच आहे. देशातील सर्वच मंदिरांतून भक्तांनी देवाला दिलेले सोने-नाणे ‘इतरत्र’ जात असते. त्याची कुठे नोंद नसते, ना कधी चर्चा होते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात आता अधिकृतपणे १५० किलोहून अधिक सोने आहे, पण या मंदिरातील दानपेटया राखण्यासाठी मध्यंतरी एका विश्वस्ताच्याच सुरक्षा एजन्सीला नेमले होते, त्यामुळे दानपेटया फोडताना हजर असणा-या ‘त्या’ हुशार विश्वस्ताला काहीही करण्याची मुभा होती. शिवाय सिद्धिविनायकाचा ‘प्रसाद’ हवा तसा हडपण्याचे स्वातंत्र्यही होते, थोडक्यात सांगायचे तर ‘वर्ल्ड गोल्ड काउन्सिल’च्या अंदाजानुसार भारतातील विविध मंदिरांत दोन हजार टन सोने आज पडून आहे. त्या सोन्याला ‘धावते’ करण्यासाठी मंदिरांना लोकसेवेत सहभागी करवून घेणे गरजेचे आहे. अन्यथा लोकांच्या दानावर मोजके लोक मस्तवाल होण्याची परंपरा सुरूच राहील.

आपल्या घरात, मंदिरात किंवा अन्य कुठेही असणारे सोने हे आता आपल्याला जपलेच पाहिजे, कारण नजीकच्या भविष्यात सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ‘मूल्य’ बदलणार आहे. गतवर्षी चीनने जगातील दुस-या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असणा-या जपानची जागा पटकावून अमेरिकेला धोक्याचा इशारा दिला; परंतु आपली प्रत्येक आर्थिक खेळी अत्यंत सावधपणे, चाणाक्षपणे आणि धूर्तपणे खेळणा-या चीनने दुसरा नंबर पटकावताना अजिबात गाजावाजा केला नाही की, विजयोत्सव साजरा केला नाही. कारण त्यांना अमेरिकेचे आर्थिक वर्चस्व मोडून पहिल्या क्रमांकाचे धनी व्हायचे आहे. त्याउलट आपल्याकडे काहीच नसताना काही अर्थपंडित भारत आता आर्थिक महासत्ता होणारच, असे गाजर गेली दहा-बारा वर्षे दाखवत आहेत. त्याउलट चीनचे नेतृत्व प्रत्येक पाऊल सजगपणे टाकताना दिसते. भारत, रशियासह ‘ब्रिक्स’ देशांच्या आघाडीची स्थापना करून स्वतंत्र आर्थिक निधीची उभारणी असो वा डॉलर्सची गंगाजळी वाढवण्याचा प्रश्न असो, चीनने कायमच अमेरिकेला मात देण्याची व्यूहरचना केलेली दिसते. आज जगातील महत्त्वाचे चलन असणारे अमेरिकेचे डॉलर प्रबळ आहे, म्हणून अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत आहे. अमेरिकेने बाजारात आणलेल्या डॉलरच्या एकूण चलनापैकी ७० टक्के चलन चीन, भारतासह जगातील विविध देशांकडे आहे, पण चीनने अमेरिकेची ही दादागिरी मोडण्यासाठी सोन्याचा व्यापारातील सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. शिवाय ‘ब्रिक्स’ देशांनी आपापल्या चलनात व्यवहार करण्याची मुभा घेतल्याने डॉलरच्या प्रभुत्वाला आव्हान मिळाले आहे. एकीकडे आपले चलन युआन मजबूत करीत असताना चीनने आपला सोन्याचा साठा वाढवण्याचा सपाटा लावलाय, चिनी सत्ताधारी आपल्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यांचा कधीच गवगवा करीत नाहीत, हे आपण सारे जाणतोच. आपल्याकडील सोन्याचा साठा किती आहे, हेसुद्धा त्यांनी जगापासून दडवून ठेवले आहे. दोन वर्षापूर्वी एका अहवालात चीनने आपल्याकडे १० हजार टन सोने असल्याचे जाहीर केले होते, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे त्यापेक्षा जास्त सोने असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे आणि गेल्या वर्षभरापासून चीनने सोने खरेदी करण्याचा सपाटा लावलाय. २०१३ च्या पहिल्या तिमाहीत ५०० टन, त्यानंतरच्या तिमाहीत ९०० टन सोने खरेदी करून चीन आपला सुवर्णसाठा वृद्धिंगत करत आहे. एकीकडे अमेरिकेचे चलन, डॉलर आपल्या ताब्यात घेत असताना, चीन इराणपासून ‘ब्रिक्स’ देशांपर्यंत सगळ्यांना अमेरिकेचे चलन वापरू नका, असा संदेश देत आहे. सोन्याला संस्कृतमध्ये ‘हिरण्य’ म्हणतात, ‘-हि’ म्हणजे ज्याचा नाश होत नाही ते. आजच्या आधुनिक काळातही सोन्याने आपला मूळ ‘अर्थ’ जपला आहे. डॉलर वा रुपयाचे अवमूलन होते, पण सोन्याचे भाव कधीच फार खाली येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती लक्षात घेऊन चीनने आपला सुवर्णसाठा वाढवायला सुरुवात केली आहे अर्थतज्ज्ञांच्या मते, चीनकडे जेव्हा मुबलक सोने जमा होईल, त्या वेळी ते आपल्या परकीय चलनाच्या साठयातील डॉलर्स जगाच्या बाजारपेठेत ओततील. चलनात प्रचलित असलेल्या एकूण डॉलर्सपैकी अमेरिकेच्या ताब्यात फक्त ३० टक्के डॉलर्ससाठा आहे. उर्वरित ७० टक्के डॉलर्सपैकी ३५ ते ४० टक्क्यांहून जास्त डॉलर्स आज चीनच्या ताब्यात आहेत. ते खुल्या बाजारपेठेत आल्यावर अमेरिकी डॉलर्स आणि बॉण्ड्सचे कंबरडे मोडेल. डॉलर्सच्या बाजारमूल्यात घसरण होऊन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा परिणाम होईल. मुख्य म्हणजे महागाईमुळे तेथील जगणे मुश्कील होऊन बसेल, असे आज दबक्या आवाजात बोलले जात आहे.. एकीकडे साधूच्या स्वप्नावर विश्वास ठेवून जमिनीतील सोने शोधायला निघालेला भारत आणि दुसरीकडे आपल्या जनतेला पुन्हा सुवर्णकाळात नेण्यासाठी प्रयत्न करणारा चीन, या दोन परस्परभिन्न घटनाक्रमांकडे पाहताना मन अस्वस्थ होते.. उद्विग्न होते.

Categories:

Leave a Reply