Mahesh Mhatre

बाळासाहेबांच्या अनुपस्थितीतील पहिल्याच दस-या मेळाव्यात अत्यंत वाईट पद्धतीने अपमानित होऊन मनोहरपंतांना व्यासपीठावरून खाली उतरावे लागले. 

ऐन उमेदीच्या काळात शिवसेनेतील मान्यवर नेत्यांचा तेजोभंग करण्याची एकही संधी न सोडणारे मनोहर जोशी हे अत्यंत बिलंदर राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत कूटनीतीचा यशस्वी वापर करून मनोहरपंतांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचे पत्ते कापले. त्यांच्या या कूटनीतीच्या खेळाने अनेकदा मोकळय़ा मनाचे बाळासाहेबही आश्चर्यचकित होत असत. त्यामुळेच असेल कदाचित; बाळासाहेबांच्या हयातीत मनोहरपंतांनी आपल्या उपद्रवमूल्याच्या जोरावर एक वेगळा दबदबा प्रस्थापित केला होता. पण नियती मोठी विलक्षण असते. बाळासाहेबांच्या अनुपस्थितीतील पहिल्याच दस-या मेळाव्यात अत्यंत वाईट पद्धतीने अपमानित होऊन मनोहरपंतांना व्यासपीठावरून खाली उतरावे लागले. आजवर जोशीसरांनी आपल्या मार्गातील अडथळे किंवा संभाव्य प्रतिस्पर्धी ठरतील, अशा डझनावारी सेना नेत्यांना ‘ताप’ दिल्याचे सर्वश्रुत आहे. वामनराव महाडिकांपासून तर नजीकच्या काळातील सुभाष देसाई आणि संजय राऊत यांच्यासारख्या अनेकांना महत्त्वाच्या पदांवरून ‘तडी’ किंवा दिवाकर रावतेंसारख्यांना मुंबईबाहेर ‘तडिपार’ केले होते. पण आता मात्र वार्धक्याने थकलेल्या त्याच मनोहरपंतांविरोधात असभ्य भाषेत दसरा मेळाव्यात घोषणाबाजी होणे, हा नियतीचा ‘जे पेरले ते उगवले’ हा न्याय म्हणावा लागेल. 

मनोहर जोशी स्वत:च्या नावापुढे ‘प्रिन्सिपॉल’ ही उपाधी लावत असत. सेनेच्या राजकारणात अगदी सुरुवातीच्या काळात शिकलेल्या लोकांचा भरणा कमी होता. रांगडय़ा, राडेबाज आणि रोखठोक स्वभावाच्या नेत्या-कार्यकर्त्यांत त्यामुळेच ‘जोशी’ आडनावाच्या शिकलेल्या वाटणा-या सरांची एक वेगळी छाप पडली आणि आपोआपच आरंभापासून जोशीसरांकडे सेनेचे पौरोहित्य आले. त्यात त्या काळातही मनोहरपंतांकडे मोटारकार होती. नव्याने जन्मलेल्या शिवसेनेच्या प्रमुखाला पंतांच्या गाडीचा आधार असे. परिणामी संघटना ‘चालवण्या’साठी कर्तृत्व, वक्तृत्व असा एकही गुण नसलेल्या जोशीसरांना गाडीचे ड्रायव्हिंग करता करता, सेना कशी चालवायची, हे सांगण्याचा अधिकारही मिळाला. मनोहरपंतांच्या या कौशल्याचे पहिले आणि मोठे बळी ठरले वामनराव महाडिक. शिवसेनेचे पहिले नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार अशा सगळय़ा पदांचे मानकरी ठरलेले वामनराव सेनेत अतिशय लोकप्रिय होते. बाळासाहेबांच्या आदेशासाठी जान कुर्बान करणा-या शिवसेनेचे ते खरे प्रतिनिधी होते. पण पंतांनी त्यांच्यासाठी अशी अडथळय़ांची शर्यत उभी केली की, तो रांगडा मावळा विविध पराभवांच्या गर्तेतच फिरत राहिला. मला आठवते, युती सरकार आले त्या वेळी त्यांच्याकडे एक अत्यंत दुर्लक्षित महामंडळ देऊन पंतांनी त्यांची बोळवण केली होती. एकदा तर मंत्रालयात प्रवेशद्वारावरच वामनरावांची गाडी पोलिसांनी अडवली होती. शिवशाहीत सेना-भाजप सत्तेवर असल्यामुळे आपलेच सरकार आहे, या थाटात वामनराव मंत्रालयात येत होते. पण पोलिसांनी प्रवेशद्वारावर त्यांना अडवले. त्यांनी आपली ओळख देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तुम्हाला गाडी आत घेऊन जाता येणार नाही, हे सांगताच, वामनरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांचा आरडाओरडा ऐकून आम्ही काही पत्रकारही तिकडे धावलो. वामनराव पोलिसांचा आपल्याच खास शिवसैनिक स्टाइलने उद्धार करत होते. त्यानंतर आम्हा पत्रकारांशी बोलताना ते एकाच माणसाबद्दल खूप कडवटपणे बोलले, त्यांचे नाव होते, मुख्यमंत्री मनोहर जोशी.

वामनराव महाडिकांनंतर मनोहरपंतांनी दिवाकर रावते यांना ‘टार्गेट’ केले होते. दादरमधील उत्तम संघटनकौशल्य असणारे, अभ्यासू आणि हुशार राजकारणी म्हणून दिवाकर रावते आकारास येत होते. त्याच वेळी सावध झालेल्या पंतांनी दिवाकर रावते यांची आधी मराठवाडा आणि त्यानंतर विदर्भात ‘तडिपारी’ करून आपल्या मतदारसंघात दुसरा प्रतिस्पर्धी उभा राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली. छगन भुजबळ यांचे अस्तित्व तर मनोहरपंतांना नेहमी खटकत असे. कारण होते भुजबळ यांचे तुफानी वक्तृत्व आणि धाडसी नेतृत्व. साधारणत: १९८५नंतर सेना मुंबई-ठाणे आणि कोकणच्या सीमा ओलांडून पुढे जाऊ लागली.

महाड येथे झालेल्या अधिवेशनात ‘आता घोडदौड महाराष्ट्रात’ ही घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. त्यासाठी भुजबळ जिवाचे रान करून महाराष्ट्रभर भ्रमण करत होते. त्यांच्या तडाखेबंद भाषणांनी बहुजन समाज मोठय़ा प्रमाणात सेनेकडे येत होता. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनाकृत ‘शेतकरी सेने’ची सूत्रे भुजबळ यांच्याकडे जाणार, हे स्पष्ट झाले होते. पण त्या वेळी नंदू घाटे यांना पुढे करून मनोहरपंतांनी भुजबळांना पहिला दणका दिला आणि पुढे हा संघर्ष फारच वाढला. १९९०ला मुख्य विरोधी पक्ष बनलेल्या सेनेकडे विरोधी पक्षनेतेपद आले होते. वास्तविक पाहता, त्यावर खरा अधिकार भुजबळांचा होता. पण पंतांनी बाळासाहेबांना पटवून ते पद पटकावले आणि त्यामुळे आलेल्या नैराश्यातून भुजबळांना सेनेतून बाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. ३ मे १९९६च्या ‘लोकप्रभा’मध्ये भुजबळांनी आपल्या पक्षत्यागानंतर पुन्हा सेनेत जाण्याच्या मार्गात मनोहर जोशी कसे अडथळा बनून उभे होते, याची एक अत्यंत चांगली आठवण सांगितली होती. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब हे दोघे माझ्या माता-पित्यांसारखे होते. माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी शिवसेना सोडली. पण जेव्हा काही जणांनी पुन्हा बाळासाहेबांची माफी मागून सेनेत प्रवेश केला, त्या वेळी माँसाहेब बाळासाहेबांना म्हणाल्या होत्या, या लोकांना तुम्ही चुकलं म्हणून माफ केलंत, त्यांना संघटनेत परत घेत आहात, मग भुजबळ तर आपलेच आहेत, त्यांना परत घ्यायला काय हरकत आहे? माँसाहेब बोलत असताना, बाळासाहेब उद्विग्न अवस्थेत बसले होते. तेवढय़ात बाळासाहेब काही बोलण्याआधी आमचे ‘मित्र’ (मनोहर जोशी) कडाडले, ‘नाही, त्याला आता परत घ्यायचे नाही.’ त्यांच्या त्या वाक्याने माँसाहेब नाराज झाल्या. परंतु आपण काही सूचित न करता, माँसाहेबांनी मला संघटनेत परत घ्यावे, असे बाळासाहेबांना सूचित करणे, हे त्यांच्या विशाल हृदयाचे द्योतक आहे, असे भुजबळ म्हणाले होते.

मनोहरपंतांनी भुजबळांनंतर बाळासाहेबांच्या व्यक्तिगत प्रेमातील अत्यंत महत्त्वाचा नेता सेनेबाहेर जाईल, याची काळजी घेतली. त्यांचे नाव नारायण राणे. बाळासाहेबांनी ज्यांना मुख्यमंत्रीपद दिले होते, त्यांना नंतर नंतर बाळासाहेबांची साधी भेटही मिळू नये, अशी कपटकारस्थाने करण्यात पंत आघाडीवर राहिले. अगदी तशाच पद्धतीने त्यांनी नवी मुंबईचे ‘शहेनशहा’ गणेश नाईक यांना अत्यंत अपमानास्पद पद्धतीने सेनेबाहेर घालवण्याचा प्रयत्न केला. ही झाली मोठय़ा नेत्यांची गोष्ट. गुलाबराव गावंडे, सुभाष देसाई व संजय राऊत यांच्यासारख्या थेट स्पर्धेत नसलेल्या अन्य मंडळींनाही पंतांनी सोडले नाही. आपल्या कूटनीतीने सख्खा भाचा सुधीरभाऊ जोशी यांनाही त्यांनी ‘धडा’ शिकवला होता.

त्यामुळे पंतांची दसरा मेळाव्यातील हकालपट्टी हे त्यांनी लावलेल्या कूटनीतीचे फळ म्हणावे लागले. यापूर्वीच्या अनेक दसरा मेळाव्यांत जेव्हा छगन भुजबळ, नारायण राणे किंवा गणेश नाईक या सेना सोडून गेलेल्या नेत्यांवर बाळासाहेब टीका करीत तेव्हा शिवसैनिकांतून घोषणाबाजी होत असे. त्या घोषणा ऐकून सुखावणारे मनोहरपंत कान खाजवीत मिश्कीलपणे हसायचे. या वेळच्या दस-या मेळाव्यात मात्र विपरीत घडले. पंत रडले आणि नियती हसली.

Categories:

Leave a Reply