Mahesh Mhatre

इतिहास हा माणसाला प्रेरणादायी असतो. त्यावर आबालवृद्ध पिढयान् पिढ्या प्रेम करत आलेले दिसतात. शेकडो, हजारो वर्षे होऊन गेलेल्या किंवा होऊन गेल्याची निव्वळ चर्चा असणा-या व्यक्ती, प्रतिमा आणि घटनांचा प्रभाव आपण आनंदाने जगतो. कदाचित त्याच प्रेमाच्या भावनेतून ‘इतिहासाची पुनरावृत्ती होतेच’ असा सार्वत्रिक समज उगम पावला असावा.. तर असा हा इतिहास भारतात लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम राष्ट्रप्रेमाशी जोडला. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी सत्तेबरोबर लढताना समाजातील इस्लामी वर्चस्वाचा पगडा कमी करण्यासाठी लोकमान्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव ‘सार्वजनिक’ केले. एकीकडे बहुजनवर्गाला धर्मवादी करत असतानाच टिळकांनी समाजातील अभिजनांना पटवून देण्यासाठी ‘दि आर्टिक होम इन वेदाज’ या पुस्तकाच्या माध्यमातून आर्यवंशाचे मार्गक्रमण समजावून सांगितले. ते तेथेच थांबले नाहीत, त्यांनी ‘गीतारहस्य’ लिहून सुशिक्षित वर्गाच्या राष्ट्रप्रेमाला धार्मिक अधिष्ठान दिले. परिणामी तिकडे युरोपात त्याच काळात नवमतवादी बुद्धिमंत धर्माचे वर्चस्व मोडून काढत होते आणि मानवाधिष्ठित समाजमूल्यांची प्रस्थापना करण्यासाठी लढाई लढत होते, त्या काळात आम्ही भारतीय मात्र इतिहासाच्या भूतकाळाच्या जंजाळात शिरत होतो. भारतीय राष्ट्रीयत्वाची हाक देणा-या टिळकांच्या नेतृत्वाखाली तमाम भारत धर्म, वंश आणि परंपरांचा अभिमान शिकवणा-या इतिहासाच्या जाळ्यातून अद्याप बाहेर आलेला नाही. आता तर नरेंद्र मोदी आधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर करून ते इतिहासाचे जाळे अधिक व्यापक बनवित आहेत, ही गोष्ट भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे. पुढच्या दिशेने केलेला प्रवास आम्हाला धोक्याच्या वळणावर नेणारा असेल, पण लक्षात घेतो कोण?


गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘इतिहासप्रेम’ सर्वश्रुत आहे. त्यांनी इतिहासाची मोडतोड करून, लोकांची दिशाभूल करण्याचा जो सपाटा लावलाय तोही मन भेदरवून टाकणारा. मोदी यांना जो आक्रमक हिंदुत्ववाद अपेक्षित आहे तो मानणारे बहुतांश सगळेच लोक इतिहासाशी नको त्या पद्धतीने खेळणारे. त्यांचे हे विचित्र वर्तन कट्टर इस्लामी धर्मवाद्यांच्याही वर्ताण होत चाललेले दिसते. हे सारे आपल्या लोकशाहीच्या मूळ गाभ्याल्याच हात घालणारे आहेत. भारतीय इतिहासाच्या ज्येष्ठ अभ्यासिका वेंडी डोनिगर यांचे ‘द हिंदूज : अ‍ॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री’ हे पुस्तक सद्या वादाच्या भोव-यात सापडले आहे. प्रसिद्ध पुस्तक कंपनी ‘पेंग्विन’तर्फे २००९मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. जगभरातील भारतविषयक अभ्यासकांना आकर्षित करून घेणा-या या पुस्तकाला ‘बेस्ट सेलर’ म्हणून मान्यताही मिळाली होती, पण २०१०मध्ये ‘शिक्षा बचाव आंदोलन’ या फुटकळ हिंदुत्ववादी संघटनेने या पुस्तकाला हिंदू धर्मविरोधी ठरवत कोर्टात दावा दाखल केला होता आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या ‘पेंग्विन’तर्फे सलमान रश्दी यांचे ‘द सॅटनिक वर्सेस’ प्रसिद्ध झाले होते, कट्टर धर्माधांना न जुमानता जगभर पोहोचले होते, त्याच पुस्तक कंपनीने कायद्याच्या छोट्या लढाईत हार मानली आणि देशभरातील वेंडी डोनिगर लिखित वादग्रस्त पुस्तकाच्या प्रती परत बोलावल्या. हा सारा घटनाक्रमच धक्कादायक. योगायोग पण पाहा ना कसा असतो. बरोबर २५ वर्षापूर्वी १४ फेब्रुवारी १९८९ रोजी इराणचे कर्मठ धर्मगुरू आयातुल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या ‘द सॅटनिक वर्सेस’ या पुस्तकाच्या विरोधात फतवा काढला होता. जगभरातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या लोकांना जागे करणारा तो फतवा फक्त पुस्तकाविरोधात नव्हता, तर विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या व्यक्तीविरोधात होता. खोमेनी आणि त्यांच्यासारखे कडवे धर्मवादी मुक्तविचार स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यासाठी खूनखराबा करायलाही तयार होते. त्यामुळे १९८९ ते पुढील १०-१२ र्वष रश्दी यांना अक्षरश: लपूनछपून जगावे लागले. ते वाचले, पण विचारस्वातंत्र्य जपण्याच्या या लढाईत अनेक लेखक, प्रकाशक आणि पुस्तकविक्रेते मात्र अक्षरश: भरडून निघाले. जुलै १९९१मध्ये जपानमधील साहित्याचे प्राध्यापक आणि रश्दी यांच्या पुस्तकाचे भाषांतरकार हितोशी इगाराशी यांची सुकुबा विद्यापीठाच्या आवारातच हत्या केली गेली. त्याच महिन्यात रश्दी यांचे पुस्तक इटालियन भाषेत लिहिणा-या इट्टोर कॅपइओलो यांना त्यांच्या घरात घुसून क्रूर पद्धतीने मारहाण झाली. ऑक्टोबर १९९३मध्ये विल्यम न्यागार्ड यांनी रश्दी यांचे पुस्तक नार्वेमध्ये प्रसिद्ध केले होते. त्यांची ओस्लोत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याशिवाय रश्दी यांची पुस्तके विकणा-या अनेक पुस्तकालयांवरही हल्ले झाले, पण तरीही पेंग्विन कंपनीचे व्यवस्थापन घाबरले नव्हते. आपल्या विचाराच्या लढाईपासून मागे हटले नव्हते. अपवाद फक्त भारतासारख्या देशांचा. जिथे इस्लामिक देशांच्या आधी रश्दींच्या वादग्रस्त पुस्तकांवर बंदी आली होती. केवळ त्या देशांमध्येच ते पुस्तक उपलब्ध नव्हते. अन्यत्र सगळीकडे जीवाच्या कराराने प्रकाशक आणि लेखक मुक्त विचारांचा लढा प्राणपणाने लढत होते. रश्दी यांचे ‘द सॅटनिक वर्सेस’ हे पुस्तक आधुनिक युगातील विचारस्वातंत्र्याचे प्रतीक बनून गेले होते. पण आज २५ वर्षानंतर त्याच पेंग्विन कंपनीने वेंडी डोनिगर यांचे वादग्रस्त पुस्तक दिल्लीतील एका भुक्कड संघटनेच्या कोर्टबाजीला घाबरून मागे घ्यावे, याचे आश्चर्य वाटते आणि खेदही. एकेकाळी परम सहिष्णू असणारे, दुस-यांच्या मतांचा आदर करणारे भारतीय लोक इतिहासाच्या बाबतीत किती टोकाचे बदलले आहेत, याचे हे उत्तम उदाहरण आहे. इंटरनेटवर या बदलत्या मानसिकतेचे घडणारे दर्शन तर खूपच भयप्रद वाटते. सोशल नेटवर्किंग साइट्सवर चालणारे तथाकथित बौद्धिक वादविवाद तर बहुतांश अशाच ऐतिहासिक व पौराणिक विषयांशी संबंधित असतात. तिथे आमच्या धर्म वा महापुरुषांविषयीच्या भावना किती ‘दिखावू’ झाल्या आहेत हे तर दिसतेच, पण महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचे अनुकरण करण्याऐवजी आम्हाला त्यांच्या नावावर वादंग घालण्यातच रस आहे, हे दिसते. या वाद घालण्याच्या प्रवृत्तीतून राजकीय वादळे निर्माण होतात आणि त्यातून उगम पावते हिटलरी सेन्सॉरशिपचे दबावतंत्र. हल्ली नाटक, सीरियल, सिनेमा वा अन्य एखादा कार्यक्रम बंद पाडण्यासाठी हीच स्वयंघोषित सनातनी सेन्सॉरशिप मदत करते. वेंडी यांच्या पुस्तक प्रकरणाने या धर्मवेड्या सेन्सॉरशिपचा हिडीस चेहरा जगासमोर आला आहे, त्यामुळे भारतीयांच्या चांगल्या प्रतिमेला तडा गेला.

आपल्या भारतीय समाजात वर्तमानाच्या नोंदी करून ठेवण्याची पद्धत नाही. अगदी अलीकडच्या काळातील ऐतिहासिक साधनांसाठीही आम्हाला पाश्चात्त्य संशोधकांकडे पाहावे लागते. एखाद्या विषयासाठी स्वत:ला वाहून घेणे किंवा आयुष्यभर एका विषयाचा ध्यास घेऊन काम करणे, ही गोष्ट आपल्या संशोधकांना फार आवडते, असे उदाहरण हल्लीच्या काळातही दुर्मीळ, त्याउलट पाश्चात्त्य देशात विमानाचा शोध लागण्यापूर्वी व नंतरही हवेत विविध साधने वापरण्याच्या प्रयत्नात शेकडो उत्साही संशोधकांनी प्राण गमावले. इतकंच काय तर सायनाइड या जहाल विषाची चव कशी असते, हे जगाला सांगावे. त्याद्वारे पुढील पिढयांच्या शास्त्रीय ज्ञानात भर टाकावी, यासाठी अनेकांनी त्या विषाची खरोखर परीक्षा घेतली. दुर्दैवाने अजून एकालाही त्याची चव सांगण्याएवढा काळही जगता आलेले नाही; पण त्यामुळे सायनाइडची चव घेण्याची ऊर्मी मात्र कमी झालेली नाही. ही ज्ञानतृष्णा आमच्याकडे दिवसेंदिवस कमी होत आहे.

भारतीयांना भूतकाळाचे बरेच कौतुक आहे. तसे ते बहुतांश समाजात दिसतेच, पण आपल्याकडे या भूतकाळाच्या, खरं तर इतिहासाच्या खुणा जपण्याची, ऐतिहासिक घटनांचा पद्धतशीर अभ्यास करण्याची मात्र अजिबात परंपरा नाही, त्यामुळे आम्ही सातत्याने आमचा ‘इतिहास’ विसरून गेलो, परिणामी आमचा ‘भूगोल’ बदलला, हे ढळढळीत सत्य आहे. एकेकाळी ‘हिंदुकुश’ पर्वतावर चालणारे मंत्रपठण, बामियान परिसरात घुमणा-या बुद्धवंदना पुढे अजानच्या आर्त हाकेतून तोफा-बंदुकांच्या आवाजात कशा परिवर्तित झाल्या, हे सारे जाणतात, तरीही आमचे वर्तन बदलत नाही. म्हणूनच असेल कदाचित भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा भारतीय लोकांनी आपल्या नजरेतून आपला इतिहास लिहायला सुरुवात केली, त्या वेळी पाश्चात्त्य देशातील संशोधक त्यांची थट्टा करायचे. मोठ्या टिंगलीने म्हणायचे, ‘भारताला भूतकाळ आहे, इतिहास नाही.’ पण तरीही न थकता आर. सी. मुजुमदार, रोमिला थापर आदी मंडळी काम करत गेली. इतिहासकार राजवाडे ते दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्यापर्यंतच्या विविध प्रकारे इतिहासाचा ‘मागोवा’ घेणा-या लोकांनी अनेक अप्रकाशित गोष्टी आमच्यापर्यंत आणल्या, म्हणून आज ज्याचा आपण अभिमान बाळगतो ते राष्ट्रीयत्व आकारास आले हे आम्ही विसरू नये. इतिहासकार जेव्हा एखाद्या व्यक्ती वा काळाचा सर्वागाने वेध घेत असतात, त्या वेळी त्यांना मदत होते त्या काळातील ऐतिहासिक साधनांची. आधुनिक काळाचा मागोवा घेताना वर्तमानपत्रे, पुस्तके आदी गोष्टींचा उपयोग होतो. तद्वत प्राचीन काळाचा इतिहास अभ्यासायचा असेल तर तत्कालीन शिलालेख, स्तंभलेख, गुहेतील लिखाण किंवा ताम्रपटासारख्या साधनांचा आधार घ्यावा लागतो. सम्राट अशोक याने आपल्या काळातील राज्यकारभार कसा आहे, हे शिलालेखातून लिहून ठेवले होते, म्हणून आपल्याला कळले. शिवाजी राजांच्या आज्ञापत्रात राज्यकारभाराविषयीच्या आज्ञा किती लोककल्याणकारी होत्या, याचे आपल्याला दर्शन घडते. याशिवाय त्या काळातील नाणी, दागिने आदी साधनांवरून, हत्यारे, धर्मग्रंथ, औजारे, काव्यग्रंथ आदींच्या माध्यमातून ऐतिहासिक काळाचा अंदाज लावता येतो; परंतु ही सारी साधने जीवनाच्या एकेक अंगापुरती वा विशिष्ट विषयापुरती मर्यादित असतात, त्यामुळे त्यातून घडणारे इतिहासदर्शनही पुरेसे समाधानकारक नसते. या पार्श्वभूमीवर वर्तमान काळातील पत्रकारांवर आपल्या समाजाच्या सर्वागाचे चित्रण वृत्तपत्र वा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शब्दबद्ध करण्याची जबाबदारी किती मोठी आहे, हे लक्षात येते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील चुकीचे ऐतिहासिक संदर्भ किंवा गुजरातच्या माध्यमिक शाळांमध्ये शिकवला जाणारा चुकीचा इतिहास या दोन गोष्टींचा आम्ही जेवढ्या गांभीर्याने निषेध करतो, तेवढय़ाच गांभीर्याने वृत्तपत्रातील लिखाणही झाले पाहिजे. ते वस्तुनिष्ठ असावे, प्रत्यक्षानुभवावर आधारित असावे आणि मुख्य म्हणजे त्यात व्यक्तिगत आकस किंवा प्रेम व्यक्त होत नसावे. पण काळ कोणताही असला तरी, आमच्या देशातील बहुतांश लोकांना ‘वर्तमान’ आहे, तसा स्वीकारणे शक्य वाटत नाही आणि सगळा गोंधळच झालेला दिसतोय.

आमचा इतिहास खूप रोमांचक, थरारक आणि मन मोहविणारा आहे. विविध भाषा, लोकसमूह आणि धर्ममतांचे रंगीबेरंगी तुकडे जोडून हिंदुस्थानी संस्कृतीचा लोभस पट बनलेला दिसतो, पण आमच्या देखण्या सांस्कृतिक संचिताचे विविध पदर दाखविण्यासाठी इतिहासतज्ज्ञांनी जसे पुढे येणे आवश्यक होते, तसे मोठ्या प्रमाणावर घडले नाही. अगदी आमच्याकडील महापुरुषांची जीवनचरित्रे जरी चांगल्या प्रमाणात लिहिली गेली असती तरी खूप मोठे काम झाले असते, त्यामुळे तरी अनेक गोष्टींवरून उद्भवणारे वाद टळले असते. आमची इतिहासाविषयीची अनास्था एवढी की, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख ठाऊक नसावी आणि त्याहून दुर्दैवाची बाब म्हणजे कोण्या एका जेम्स लेन नामक विदेशी अभ्यासकाने लिहिलेल्या पुस्तकातील विधानांनी आमच्या समाजात फूट पडावी, इतिहासाविषयीच्या या एकूण अनास्थेमागील कारणांची सखोल मीमांसा करणारा अभ्यासपूर्ण निबंध इतिहासतज्ज्ञ मिहीर बोस यांनी लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, ‘इतिहासविषयक लिखाणामध्ये फार कमी रुची असणे ही खूप जुनी गोष्ट. आपल्या पूर्वजांना कवी हे इतिहासतज्ज्ञांपेक्षा जास्त मोठे वाटायचे, नव्हे तर त्यांना असा विश्वास होता की, कवी हे चांगल्या पद्धतीने इतिहास लिहू शकतात, असे वाटायचे. त्यामुळे कवी कल्हण ज्याने ‘राज तरंगिणी’ या दीर्घकाव्याद्वारे १२ व्या शतकात काश्मिरात राज्य करणाऱ्या राजवटीचा इतिहास लिहिला होता, तो आपल्या ग्रंथाची सुरुवातच, ‘अन्य कुणी नाही, फक्त कवीच भूतकाळ आपल्या मधुर काव्यातून परत आणू शकतो. आणि जर त्याच्या कलेने हे साध्य झाले नाही, तर बुद्धिमत्तेचा उपयोग काय? या शब्दात करतो.’ एकूण काय तर १२ व्या शतकात जे काश्मिरात घडले तेच त्यानंतर ७०-८० वर्षात महाराष्ट्रात घडले. ‘रुक्मिणी स्वयंवर’ लिहिणारा कवी नरेंद्र याने आपल्या नावावर काव्य लिहावे, यासाठी तत्कालीन देवगिरीचा राजा रामदेवराय याने त्याच्यावर दबाव आणला होता. नरेंद्राला सोन्या-नाण्याची लाचही देऊ केली होती, अशी एक कथा प्रचलित आहे. त्यावरून तत्कालीन राजांची आपल्या परिसरात लिहिल्या जाणाऱ्या कवितांवर किती नजर होती हे स्पष्ट होते. रामदेवरायाच्या या ‘काव्यप्रेमा’विषयी ज्ञानेश्वर महाराज जाणून असावेत, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटून तिस-या ओवीमध्ये रामदेवरायाचा आवर्जून उल्लेख केला आहे. माऊली म्हणतात,

तेथ यदुवंश विलासू। जो सकळ कळा निवासू।
न्यायाते पोषी क्षितीषु। श्री रामचंद्र।।

ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीवरून त्यांचा आध्यात्मिक अधिकार जेवढा मोठा व वाङ्मयीन जाण जेवढी चांगली, तेवढेच वर्तमानाचे भानही चांगले होते, हे लक्षात येते, त्यामुळे कवी नरेंद्रला आपल्या कविता आणि स्वत्त्व जपण्यासाठी जसे महानुभाव संप्रदायाच्या आश्रयार्थ जावे लागले किंवा सर्वज्ञ चक्रधर यांना राजरोषामुळे ‘उत्तरापंथे गमन’ करणे भाग पडले होते, तसे काही ज्ञानेश्वरांच्या बाबतीत घडले नाही. अर्थात, आपल्याकडे इतिहासही धर्माच्या कसोटयांवरच मांडला जात असल्यामुळे त्याच्या तटस्थ मूल्यमापनाचा कधी प्रश्नच आला नाही. अर्थात, पांढरपेशा किंवा तथाकथित सुशिक्षित वर्गापेक्षा ग्रामीण भागातील लोकवाङ्मयाने नेहमीच ते धाडस दाखवले. फक्त इतिहासच नव्हे तर पुराणकालीन देवतांनाही या लोकवाङ्मयाने वेगळ्या नजरेतून तपासले. लोकरामायण आणि लोकमहाभारत ऐकताना या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. गरोदर सीतेला वनात सोडणारा राम असो वा द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत थांबणारा कृष्ण असो, या गावखेडयातील माता-भगिनींच्या ओव्यांनी, गीतांनी त्यांची परखड चिकित्सा केली. हे इथे आपण लक्षात घेतले पाहिजे, म्हणूनच वस्तुनिष्ठ विवेचन फार महत्त्वाचे वाटते.

आपल्या ‘मिथ अ‍ॅण्ड रिअ‍ॅलिटी’ (ज्याचे वसंत तुळपुळे यांनी मराठीत ‘पुराणकथा आणि वास्तवता’ असे भाषांतर केले) या अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकात दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी भारतीय इतिहासावर वेगळ्या परीप्रेक्ष्यातून लिहिले होते. त्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. ‘हिस्टरी इन सायन्स’ या ग्रंथात बर्नाल यांनी ‘कोसंबींच्या या पुस्तकामुळे प्रथमच भारतीय इतिहासाची संगती लागण्यास सुरुवात झाली,’ असे म्हणणे ही कोसंबी यांच्या कामाला मिळालेली पावती होती. १९६२ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाने स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहासलेखनाला दिशा दिली. आपल्या प्रस्तावनेच्या पहिल्याच परिच्छेदात कोसंबी सांगून टाकतात, ‘या सर्व लेखनांत एक समान सूत्र आहे. ते हे की, यातील सर्व लिखाण उत्खननातील पुरावे आणि वाङ्मयातील पुरावे यांची सांगड घालून त्यावर आधारलेले आहे, ज्यांची स्वदेशप्रीती वास्तवतेच्या कक्षा ओलांडून पलीकडे गेलेली आहे, असे आमचे भारतीय समीक्षक आमचा हा अस्थानी दिलेला भर पाहून नाके मुरडणे आणि त्याबद्दल आपली नापसंती दाखविणे शक्य आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या सुंदर कमलपुष्पाकडे दुर्लक्ष करून एखाद्याने लोकभ्रमाच्या क्षुद्र डबक्याकडे आपले लक्ष केंद्रित करण्याची खरोखर काय जरुरी आहे? परंतु खरोखर मुद्दा हाच आहे, ज्याला थोडीसुद्धा सौंदर्यदृष्टी आहे, त्याला कमळाच्या सौंदर्याचा आस्वाद घेणे शक्य असते; परंतु ज्या जीवशास्त्राच्या प्रक्रियेमुळे दलदल आणि चिखल यातून कमळाची निर्मिती झाली ती प्रक्रिया शोधून काढण्यासाठी बरेच शास्त्रीय संशोधन करावे लागते आणि ते फार कष्टाचे असते,’ असे कोसंबी स्पष्ट करतात. इतिहासलेखनासाठी दिशा दिग्दर्शक ठरणारे कोसंबी यांचे विचार आजच्या पत्रकारितेसाठीही तेवढेच मार्गदर्शक आहेत. कारण बातमी म्हणून जेव्हा एखाद्या घटनेचा आम्ही वेध घेतो, त्या वेळेस त्याच्यामागील कारणांची मालिका नेहमीच दुर्लक्षित राहते. आज वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होणारे लेख-बातम्या उद्या रद्दी होतात, हे वास्तव आहे. पण वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारा शब्दन् शब्द हा ‘सामाजिक दस्तावेज’ असतो. त्याला वर्तमानात जेवढी किंमत असते, तेवढेच भविष्यातही मोल असते. या सामाजिक दस्तावेजामधून समाजाचे बहुआयामी दर्शन घडू शकते, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे वर्तमानपत्राने दिलेली माहिती किंवा प्रबोधनात्मक सूचना ही सार्वकालिक ठरते.

वृत्तपत्रीय भाषेत बातमीला ‘ष्टोरी’ म्हणतात. खरं सांगायचे तर ‘ष्टोरी’ म्हणजे कथा, पण पत्रकार, बातमीदार आपल्या बातमीला ‘ष्टोरी’ म्हणतात. इंग्रजी पत्रकारितेत उगम पावलेल्या या शब्दामागे जगभरात लिखाण-वाचन संस्कृती प्रचलित होण्यापूर्वी प्रसिद्ध असणा-या ‘कथाकथन’ पद्धतीची लोकमान्यता कारणीभूत असावी. लेखनकला अगदी अलीकडच्या काळापर्यंत मोजक्या लोकांची मक्तेदारी होती. त्यामुळे लिखित साहित्याला मर्यादित वाचक होते. त्याउलट मौखिक परंपरेतून चालत आलेले पिढीजात ज्ञान हाच आमचा ऐतिहासिक आधार बनलेला होता. फरक एवढाच की, पाश्चात्त्य समाजाने पंधराव्या शतकापासून आपला ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपण्यासाठी छपाईयंत्राचा आधार घेतला. त्याउलट छपाईतंत्राचा परिचय होण्यास आम्हाला अठरावे शतक उजाडावे लागले. नाही म्हणायला तत्पूर्वी म्हणजे जर्मनीत गुटेनबर्ग यांनी १४३९ मध्ये मुद्रणकलेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर १५५६ मध्ये गोव्यातील जेजुईट धर्मगुरूंनी मुद्रणतंत्र भारतात आणले होते; पण आपल्याकडील एकाही शासकाला हे नवे तंत्र स्वीकारावे वाटले नाही, त्यामुळे अठराव्या शतकानंतर, प्रामुख्याने ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी मुद्रणकलेचा भारतात प्रसार झाला आणि परिणामी आमचा ऐतिहासिक वारसा जपणारी मौखिक परंपरा नष्ट झाली. आमची ही मौखिक परंपरा वेद-पुराणे यांच्या जोडीला स्थानिक इतिहासाची नोंद करणा-या कथा-काव्यपूर्ण लोकवाङ्मयाने परिपूर्ण होती. थियोडर बेनफे हा जागतिक लोकवाङ्मयाचा अभ्यासक भारताला जागतिक लोककथांचे जनकत्व उगाचच बहाल करीत नाही. आज वर्तमानपत्रात येणा-या बातमीचे किंवा लेखाचे माणसागणिक रूप बदलताना दिसते. लोककथाही तशीच सांगणा-याच्या वकुबानुसार खुलणारी आणि खुलविणारी. आपल्याकडे कथाश्रवणाला एक धार्मिक अधिष्ठान आहे. तेवढाच तोलामोलाचा सन्मान प्रसिद्ध होणा-या प्रत्येक शब्दाला आहे, त्यामुळे जेव्हा गुजरातच्या एका पाठय़पुस्तकात एक ना दोन तब्बल एकोणसाठ चुका पाहायला मिळतात, तेव्हा आमच्या इतिहासाकडे पाहण्याच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते. आम्ही पाश्चात्त्य देशातील प्रगतीचा, सुबत्तेचा आणि आर्थिक संपन्नतेचा हेवा करतो; परंतु आम्हाला त्यांच्या वक्तशीरपणाचा, ध्येयवेडेपणाचा आणि कामावर मनस्वी प्रेम करण्याच्या वृत्तीचा अंगीकार करावासा वाटत नाही. आमच्याकडे इतिहासकार राजवाडे, ज्ञानकोषकार केतकर, डी. डी. कोसंबी यांच्यासारखे ध्येयासक्त लोक होऊन गेले. त्यांच्यामुळे आम्हाला आमच्या समाजाचा इतिहास ख-या अर्थाने कळला. अन्यथा आपले काही खरे नव्हते. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही ठरविले तर अजूनही सुरुवात करता येईल, पण ती आपल्याला शालेय पातळीपासून करावी लागेल, पण तिथेच जर घोळ होत असेल तर आम्ही आमच्या भावी पिढयांना चुकीच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करू. इतिहास ही मनाला भूल पाडणारी गोष्ट आहे. अगदी अनाडी माणसालाही इतिहास पुरुषांबद्दल अपार प्रेम असते. त्यांच्याबद्दल काही वाचले वा ऐकले नसेल तरी माणसे इतिहासप्रसिद्ध महापुरुषांवर प्रेम करतात. माणसाला वेडा करण्याची ताकद इतिहासात असते. म्हणून शालेय पुस्तक असो वा वृत्तपत्र, त्याद्वारे चुकीचा इतिहास पसरवून सामाजिक भ्रम निर्माण करणे हे नवे राजकीय तंत्र आहे. या तंत्राने आजवर जगात अनेकदा उत्पात माजवलाय, पण प्रसारमाध्यमे जागृत असतील तर तसे होणार नाही. भारतीय लोकशाहीचा चौथा खांब असणा-या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या हाती लोकजागृतीचे सामर्थ्य आहे. त्याचा सकारात्मक पद्धतीने वापर झाला, तर १२१ कोटी लोकांचा हा देश अधिक चांगल्या पद्धतीने चालेल. भारताकडे लोक जगातील सर्वाधिक मोठे लोकशाहीप्रधान राष्ट्र म्हणून पाहत असतात. लोकशाहीच्या या ठेव्यावर या देशातील चाळीस कोटींहून अधिक गरीब, दुर्लक्षित लोकांचे जीवनमान आधारित आहे. आजवर ज्ञात असलेल्या इतिहासात या माणसांनी अन्याय, अत्याचारच भोगलेला दिसतो. लोकशाही दुबळी झाली तर सगळ्यात जास्त मोठा फटका या मागास-दुबळ्या वर्गाला बसेल. त्यामुळे इतिहासाशी इमान राखून वर्तमानाला आकार देत भविष्य घडविण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.

Categories:

Leave a Reply