Mahesh Mhatre

आपल्या जिवंतपणी आख्यायिका बनण्याचे भाग्य लाभलेले खुशवंत सिंग वयाच्या शंभरीत पदार्पण करीत आहेत, ही खरोखरच ‘खुशखबर’ आहे. सुप्रसिद्ध संपादक, सातत्यपूर्ण लिखाण करणारे स्तंभलेखक, इतिहासतज्ज्ञ आणि प्रकांड पंडित म्हणून ते ओळखले जातातच, पण त्याहीपेक्षा त्यांची जास्त प्रसिद्धी झाली, त्यांच्या बिनधास्त वागण्या-लिहिण्याने. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांना आपल्या लेखणीचा ‘प्रसाद’ देण्याची संधी लाभलेले जे काही मोजके संपादक सध्या हयात आहेत, त्यात खुशवंत सिंग यांचे नाव अग्रगण्य ठरते आणि म्हणूनच या शंभरीत पदार्पण करणा-या ‘तरुण, तडफदार’ संपादक-पत्रकाराला मानाचा मुजरा करणेही औचित्यपूर्ण वाटते.

सध्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणात प्रचंड गोंधळ आणि अनागोंदी माजलेली दिसतेय. एखाद्या विषयावर सखोल अभ्यासपूर्ण, सडेतोड विचार व्यक्त करण्याची भारतीय परंपरा जवळजवळ लुप्त होत चालली आहे. ज्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे, त्यांच्याकडे आपल्या विचारांचा उच्चार करण्याचे धैर्य नाही आणि ज्यांच्याकडे उच्चार करण्याचे सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे विचार करण्याची कुवत नाही, अशी शोचनीय स्थिती सर्वत्र बनलेली दिसतेय. त्यामुळे कधी ‘बाल साहित्य’ हिंसक आंदोलनाला प्रेरणा देताना दिसते तर कधी ‘कुमार वाङ्मय’ तत्त्वचिंतकाचा आव आणत नीतीबाह्य गोष्टींना भाव मिळवून देताना दिसते. सरदार खुशवंत सिंग यांनी उभ्या आयुष्यात कधी असा भंपकपणा केला नाही. जे काही केले ते खुलेआम आणि बिनधास्त केले. त्यांच्या त्या मनस्वीपणाला मन:पूर्वक सलाम.

खुशवंत सिंग यांचा जन्म फाळणीपूर्व काळात एका धनाढय़ परिवारात झाला. त्यांचे वडील सरदार शोभा सिंग हे मोठे बिल्डर होते. ज्या पाच प्रमुख लोकांनी नवी दिल्लीला आकार दिला, त्यापैकी ते एक. लंडनच्या किंग्ज कॉलेजात कायद्याचे शिक्षण घेऊन आपला मुलगाही मोठा वकील व्हावा, असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण लंडनहून परतलेले खुशवंत सिंग बहुतांश वेळ आपल्या लाहोरमधील लेखक-पत्रकार मित्रांमध्येच व्यतीत करायचे. फाळणीनंतर त्यांचे सारे कुटुंब भारतात आले आणि खुशवंत सिंग यांची साहित्य लेखनाशी नाळ अधिक घट्ट झाली. त्याच दरम्यान फाळणीच्या ताज्या अनुभवावर आधारित ‘मानो माजरा’ गावावरील कहाणी लिहिली. त्यांच्या त्या लिखाणाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून दाद मिळाली. पुढे तिच कहाणी ‘ट्रेन टू पाकिस्तान’च्या रूपात १९५६मध्ये प्रसिद्ध झाली आणि खुशवंत सिंग लेखक म्हणून प्रस्थापित झाले. पुढे त्यांनी पत्रकारितेचा रस्ता पकडला आणि त्यांच्या धाडसी स्वभावाला व्यापक व्यासपीठ मिळाले. ‘दि इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’मध्ये त्यांनी संपादक म्हणून सूत्रे स्वीकारली त्या वेळी त्या साप्ताहिकाचा खप होता एक लाख. पण, वर्षभरात वेगवेगळ्या शक्कली लढवून त्यांनी तो खप चार लाखांवर नेला आणि देशात अक्षरश: हंगामा केला. ‘टाइम्स’ वृत्तसमूहात काम करताना त्यांनी उत्तम पत्रकारांच्या अनेक पिढय़ा घडवल्या. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेल्या एम. जे. अकबर, बाची करकरिया, बिक्रम वोहरा, जे. आय. एस. कालरा यासारख्या संपादकांनी १९८०-९०नंतरच्या भारतीय पत्रकारितेला दिशा दिली.

खुशवंत सिंग यांनी ‘ए हिस्ट्री ऑफ सिख्स’ लिहिताना जे गांभीर्य दाखवले तेवढीच रसिकता ओतून ‘सेक्स, स्कॉच अ‍ॅण्ड स्कॉलरशिप’ लिहिले. गांधी घराण्याशी त्यांचा खूप घरोबा होता. पण तरीही आणीबाणी विरोधात खुशवंत सिंग उभे राहिले. भिंद्रनवालेंचा दहशतवाद टोकाला पोहोचला होता, त्या वेळीही ते निर्भीडपणे त्यांच्या विरोधात लिहीत होते. एकूणच काय तर या ‘रगेल’ आणि ‘रंगेल’ माणसाने आयुष्यात जे काही केले ते अगदी मन लावून केले. कशाचीही भिडभाड न ठेवता खुशवंत सिंग मनातील भाव व्यक्त करत राहिले. मजा, मस्ती, मदिरेचा धुंद आनंद घेत जगले आणि चक्क शंभरीपर्यंत पोहोचले. म्हणून या ‘बाप’ संपादकाला प्रणाम!

Categories:

Leave a Reply