Mahesh Mhatre

कवी, लेखक किंवा अन्य कोणताही कलावंत जेव्हा ‘व्यक्त’ होतो, तेव्हा त्याच्या त्या अभिव्यक्तीमागे असंख्य प्रेरणा असतात. त्यातील ब-याच प्रेरणा खुद्द कवी वा कलावंताला पण अनोळखी असतात. त्यामुळे जेव्हा एखादा समीक्षक कवितेची वा चित्राची समीक्षा करतो तेव्हा तो हमखास चुकीच्या निष्कर्षावर काथ्याकूट करत बसतो. नामदेव ढसाळ या महाकवीच्या कवितांनी तर मराठीतील मर्यादित भावविश्वाला गावकुसाबाहेरील अफाट अवकाशाचे ज्ञान करून दिले होते. त्यामुळे त्यांच्या कवितांनी मध्यमवर्गीय मराठी वाचक-समीक्षकांचे डोळे विस्फारले गेले. ढसाळांच्या आक्रमक भाषाशैलीने, नव्या प्रतिमा चिन्हांनी समीक्षक नामक प्राणी सैरावरा पळून गेले. त्यामुळे ढसाळांना काही फार फरक पडला नाही. मराठी भाषेचे मात्र अतोनात नुकसान झाले. ऑस्वॉर्न या सौंदर्यशास्त्रावर अधिकारवाणीने लिहिणा-या तज्ज्ञाने एका ठिकाणी ‘कलाकृती हा एक सजीवबंध असतो’ असे म्हटले होते, उदाहरणच द्यायचे तर ढसाळांची कविता पाहू. त्यांच्या प्रत्येक कवितेचा पोत इतका घट्ट असतो की, त्यातून एक शब्दही तुम्हाला काढता येत नाही किंवा त्याला तुमचे ठिगळही लावता येत नाही; कारण त्यांच्या कवितेत सजीवबंध रसरसून भरलेला होता. भृतृहारी, जो रसिक होता, कवी, राजा, विचारवंत, तत्त्वज्ञही होता. तो एके ठिकाणी म्हणतो, ‘ज्याच्या कवितेत रस आहे, त्या कवीला म्हातारपण आणि मृत्यूचे भय नसते.. तो कवी अमर असतो.


‘रामायणा’मध्ये एक कथा आहे. प्रभू श्री रामचंद्र अनवाणी पायाने वनवासातील बिकट वाट चालत होते. चालता-चालता रस्त्यात एक मोठी शिळा पडलेली दिसली. साहजिकच रामाने त्या शिलाखंडावर पाय ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि अचानक त्या दगडातून शापित अहिल्या प्रगटली. त्यापुढील कथाभाग सगळयांना ठाऊक आहे. या कथेत शापभ्रष्ट अहिल्येचा रामाकडून ‘अपघाताने’ उद्धार झालेला दिसतोय. मार्गातून जाता-जाता सहजपणे झालेले ते काम होते. मुख्य म्हणजे त्यात ‘चमत्कार’ होता. अशक्य आणि असंभवनीय घटनाक्रमाचा परिपाक होता. तरीही ती अहिल्येची कथा अवघ्या भारतीय जनमनाने हजारो वर्षापासून ऐकली, समजून घेतली; नामदेव ढसाळ या महाकवीने तर आपल्या अवती-भवतीच्या दुनियेत पसरलेल्या दुर्लक्षित आणि शापित विश्वाची चित्तरकथा लिहिली. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारवंशात जन्मलेल्या या ‘आधुनिक तुकारामा’ने शापित जगावर शब्दांचे ‘सर्चलाइट’ सोडले. मार्क्‍स-माओ-बुद्धाच्या जीवनलक्षी प्रकाशाने त्या शापितांची आयुष्ये उजळविण्याचा अथक प्रयत्न केला. ढसाळांच्या कवितेने मराठी भाषा नव्या शब्द-चिन्ह-प्रतिमांनी सजली. शोषितांच्या, दु:खितांच्या नव्या जाणिवांनी हळवी बनली; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मानवमुक्तीच्या ध्यासाने, धगधगणा-या ढसाळांच्या कवितेने दाखवलेल्या प्रकाशरेघांनी अनंत दगड-धोंडे, आवाढव्य शिळाखंड ‘जिवंत’ झाले. त्यांना कवितेचे कंठ फुटले, ‘चळवळ’ करणारे हात उठले, म्हणून नामदेव ढसाळ यांची कविता मोठी आहे. मराठीला हवे असलेले आत्मभान देणारी, आपल्याभोवतीच्या शापित विश्वाची जाण देणारी आणि त्याद्वारे राष्ट्रीय पातळीवर मान आणि आंतरराष्ट्रीय वाङ्मयात सन्मान मिळवून देणारी..

नामदेवरावांच्या जीवनसंघार्षातून उमललेली ही कविता मराठीच काय, तमाम भारतीय साहित्याला नवी होती. ‘गोलपिठा’ला प्रस्तावना लिहिताना नाटककार विजय तेंडुलकर यांनी त्याचा खास उल्लेख केलाय. ते लिहितात, ‘पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लँड’ – निर्मनुष्यप्रदेश – जेथून सुरू होतो, तेथून नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे मुंबईतील ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते. हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे, उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणा-या मनुष्यदेहांचे, असोशी वाहणा-या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणा-या तरुण रोगी देहांचे, बेकारांचे, भिका-यांचे खिसेकापूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे; दग्र्याचे आणि क्रुसांचे, कुरकुरणा-या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे; गांजाच्या खाटल्याचे, त्याच खाटल्यावरच्या कोप-यात झोपलेल्या गोजीरवाण्या मुलाचे. त्या मुलाला ‘शरीफ’ बनविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगीत कुंटणखान्याची रखवाली करणा-या क्षयरोगी बापाचे, हिजडयांचे, हातभट्टयांचे, अध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकडयाचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणा-या उनचिकट रक्ताचे, वाफा ओकणा-या पाणचट लालभडक चहाचे; स्मगलिंगचे, नागव्या चाकूंचे, अफूचे.. हे ढसाळच्या भोवतालचे आणि त्याला कायम वेढून राहिलेले जग, अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते. नामदेव ढसाळ कदाचित तसाच जगला असता; परंतु त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हिनदीन समाजाला क्रोध दिला.

माणूसपणाचे हे महत्त्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळा कपाळावर डागले, असे तेंडुलकरांनी तब्बल चाळीस वर्षापूर्वी लिहिले होते. अशाच एकदा गप्पा रंगात आल्या असताना मी ढसाळांना गोलपिठा, गांडूबगीचा आणि दलित पँथरच्या जन्माच्या काळातील मानसिक उलथापालथी संदर्भात थेट प्रश्न विचारला. नेहमीच्या मिश्कील शैलीत हसत, दुर्बिणीसारखे डोळे रोखत ते बोलू लागले, ‘‘कविता ही माझ्या आयुष्यातील अपरिहार्य घटना होती, मी ज्या घरात, संस्कारात वाढलो, तिथे गाणे होते, वाजविणे होते. ती शब्द आणि तालाची साथ घेऊनच माझे बालपण गेले. वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच कवितेचा कोंब प्रगट झाला होता, पण पुढे परिस्थिती अशी आली की, प्रतिकूल काळाने चोहोबाजूने हल्ला केला. त्यात माझ्या जगण्याच्या अवती-भवतीचे भयाण वास्तव होतेच; पण ज्याच्या ओढीने मी स्वत:ला बदलायला पाहत होतो ते सोफिस्टिकेटेड जगही माझ्याविरुद्ध असलेले दिसले. घरापासून राजकारणापर्यंत सगळीकडे भंपकपणा ठासून भरलेला दिसत होता, म्हणूनच जगाला अभिप्रेत असणारी शस्त्रे, चाकू किंवा मशिनगन हातात घेण्यापेक्षा कविता हाती घेतली होती. सगळा मस्तीचा माहौल होता. मी तो काळ मनसोक्त जगलो, हक्कांसाठी लढलो, भांडलो, सगळी चैन केली. खरे तर तो सगळा अस्थिरतेचा आणि असुरक्षिततेचा काळ, पण त्याचीच मला ओढ आणि सवय लागून गेलीय.’’ ढसाळांचे हे प्रामाणिक बोल त्यांच्या गद्य-पद्य लेखनातही तसेच उमटतात, म्हणून ते वेगळे. ढसाळांपूर्वी, सतराव्या शतकात होऊन गेलेल्या तुकाराम महाराजांनी असा अंतर्बाहय़ निर्मळपणा जगाला दाखवून दिला होता. तुकोबांच्या जगण्यात जो रोखठोपणा होता, तोच अभंगात उमटलेला दिसतो. तुकोबांचा कोणत्याही अभंग घ्या, त्यात साधेपणा, सच्चेपणा आणि सरळपणा ठासून भरलेला दिसेल. शब्द, कल्पनांची वा ओढूनताणून आणलेल्या प्रतिमांचे तुकारामांना कधीच आकर्षण नसावे; पण जेथे गरज असते तेथे त्यांचे शब्द आपापल्या ठिकाणी चपखलपणे बसलेले असतात. त्यामुळे त्यांच्या अभंगातील अभिव्यक्ती जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणा-या सुभाषितांच्या तोडीची बनली. ढसाळांचे लिखाणही वरवर भडक, आक्रमक आणि काही प्रमाणात आक्रस्ताळेपणाचे वाटत असले तरी त्यांची नाळ तुकोबांच्या कवित्वशक्तीशी जोडलेली होती. ढसाळांनी जगण्याचा धांडोळा घेताना प्रकट केलेली अभिव्यक्ती ही विश्वात्मक होती, म्हणून दि. पु. चित्रेंसारखा कवी ढसाळांना ‘आधुनिक तुकाराम’ म्हणून संबोधतो. विशेष म्हणजे ढसाळांना आपल्या कवितेतील या वेगळेपणाची पूर्णपणे जाणीव होती; पण त्या जाणिवेला त्यांनी कधी अहंकाराचा वारा लागू दिला नाही. अन्यथा चार-दोन कथा-कवितांच्या जोरावर आकाशाला हात लावायला निघाल्यांसारखी त्यांचीही अवस्था होऊ शकली असती; पण मुळातच सरळ रेषेत जगणा-या ढसाळांनी कवितेच्या प्रांतात कधी वाकडी वाट धरलेली दिसली नाही, ते लिहीत राहिले साध्या माणसासाठी, साध्या माणसासारखे. त्यामधूनच त्यांच्या ‘मातीने घडविलेल्या साध्या माणसारखा’ या कवितेत हे साधेपण अगदी सहजपणे व्यक्त होते..

‘निर्जन बेटावर दीर्घकाळ वावरणा-या बाईसारखी
माझी कल्पना नाही एकलकोंडी, वांझ
दाराच्या फटीतून पाहावे चोरून
आणि ऐकावे बोलणे
असे गूढ काहीच नाही माझ्या जीवनात
म्हणून तर, अनाहुताची पावले मला येतात ऐकू
गुपचूप पाठीशी उभ्या राहणा-या कुणीतरी
माणसांवर मीही ठेवतो नजर
असे उगवतात माझ्याही पाठीला डोळे
स्वत:च्या कोषात वावरणा-या किडयांना मी असतो अनभिज्ञ
मी हृदयातली वादळे लपवून ठेवत नाही
चारचौघांसारखा मीही हाकतो नांगर
असहय़ झालं की मीही आयबहीण काढतो माझ्या शत्रूची
भर रस्त्यात धरतो त्याची गचुंडी
होतो असंस्कृतातला असंस्कृत
अलौकिकातल्या दुनियेतला मी कुणी हिरा नाही
मातीने घडविलेल्या
साध्या माणसासारखा
मीही घडवलेला गेलो आहे एक कवी म्हणून
माझ्या ओठात
कविताच नव्हे तर
शिवीही असते
क्रोधाला गोंजारणारी’

अशा सहजसोप्या पद्धतीने अभिव्यक्त होणारे ढसाळ विलक्षण कठीण पद्धतीच्या चढ-उतारांना तोंड देत आयुष्य जगले. बालपणापासून तारुण्य आणि अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हा ‘पँथर’ कधी सामाजिक, कौटुंबिक तर कधी शारीरिक संघर्षात मग्न असलेला दिसायचा. मध्येच कधी तरी राजकीय आखाडयात उडी मारून एकच धुरळा उडवून देणे ढसाळांना आवडायचे आणि म्हणूनच आपण ढसाळांच्या समग्र आयुष्याचा, वेगवेगळया दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. तरच त्यांची कविता आपल्याला कळेल. ढसाळ हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्मलेल्या पिढीचे प्रतिनिधी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतील समाजवादी संरचना अस्तित्वात येणार, अशी आशा सगळेच जण बाळगून होते. त्यात महात्मा गांधी यांनी ‘ग्रामस्वराज्य’ ही खेडयांना स्वायत्तता देणारी अभिनव कल्पना मांडली होती. ‘खरा भारत खेडयात आहे, खेडयाकडे चला’ असे गांधीजी वारंवार सांगत होते. त्यामुळे गावखेडयातील हरिजन-गिरिजन आणि उपेक्षितांच्या सर्वागीण उत्थानासाठी देशभरात कामे सुरू झाली होती. गांधीवादाचा विचारवसा हाती घेतलेले शेकडो सुशिक्षित लोक आपले व्यक्तिगत आयुष्य विसरून सामाजिक कामाला जोडले गेले होते. त्यामुळे त्याचा एकूण परिणाम महाराष्ट्रातील समाजस्थितीवर होणे साहजिकच होते; परंतु तरीही गांधीवादी लोकचळवळीचा तेवढासा प्रभाव महाराष्ट्रात पडला नाही; कारण येथील बहुजनांनी फुले आणि आंबेडकर या दोन विचारधारा आपल्याशा केल्या होत्या. त्या विचारांच्या प्रभावाने भारावलेल्या पिढयांनी ‘प्रबोधना’साठी वृत्तपत्रांसोबत, नाटक, जलसा आणि थेट संपर्काचा मार्ग पत्करल्याने देशातील अन्य कोणत्याही प्रांतांपेक्षा महाराष्ट्रातील दलित आणि बहुजनवर्ग जागृत होता, नाही म्हणायला आपल्या राज्यातील दलितांची स्थिती त्या काळात जशी होती, अगदी तशीच, किंबहुना त्याहून भयंकर स्थिती उत्तर भारतात होती; पण महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून एक सुयोग्य वातावरण निर्माण केले होते.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी शेणगोटयाचा, शिव्याशापाचा मारा सहन करीत शिक्षणाचे महत्त्व लोकांना ओरडून सांगितले. छत्रपती शाहू राजांनी तर आजपासून शंभर वर्षापूर्वीच्या काळात ‘जातीनिहाय राखीव जागा’ आपल्या राज्यात दिल्या होत्या. त्यांच्या द्रष्टया नेतृत्वाने बहुजनांना ज्ञानसन्मुख होण्याचा आग्रह केला. अगदी त्याच काळात बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी सामाजिक समतेला, शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन देण्याचा धडाका लावला होता आणि या सा-या पार्वभूमीवर डॉ. आंबेडकर यांनी पिढयान् पिढया होत असलेल्या धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक अत्याचाराच्या विरोधात एल्गार उठवला होता. ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’ ही प्रतिज्ञा जाहीर करून त्यांनी पोथिनिष्ठ, परंपराप्रिय आणि झापडबंद धर्ममरतडांना हादरे दिले. डॉ. आंबेडकर यांनी नागरीकरणाने बदललेल्या पाश्चात्त्य जगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला होता. स्वत: अर्थतज्ज्ञ असल्यामुळे औद्योगिकीकरणाने सुरू झालेली नागरीकरणाची प्रक्रिया भारतातही अपरिहार्य आहे. ही वस्तुस्थिती बाबासाहेब जाणत होते आणि म्हणूनच जेव्हा गांधी सगळ्या लोकांना ग्रामस्वराज्याचे रक्षण करा, खेडयाकडे चला असे सांगत होते, त्या वेळी डॉ. आंबेडकर त्याच्या एकदम विरुद्ध, ‘शहराकडे चला’ असे दलितांना सांगत होते. कारण ग्रामव्यवस्थेने जातिव्यवस्थेवर आधारित गावगाडा चालू ठेवताना सगळ्यात जास्त शोषण केले होते दलितांचे. इंग्रजांनी आपली सत्ता बळकट करण्यासाठी खेडयातील ग्रामव्यवस्था आधीच तोडली आहे, जर ती पुन्हा गांधी मार्गाने प्रस्थापित झाली, तर पुन्हा दलित-शोषित गावगाडयाला जुंपले जातील, हे डॉ. आंबेडकर जाणून होते. दलितांना दया नको तर त्यांचे अधिकार मिळावेत याच दृढ इच्छेतून बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही नवी त्रिसूत्री आपल्या लोकांसमोर मांडली. एकीकडे देशाची राज्यघटना लिहिताना बाबासाहेब ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या जीवनमूल्यांना भारतीय भूमीत रुजविण्याचा प्रयत्न करीत होते आणि दुसरीकडे गुलामाला गुलामीची जाणीव करून देत त्याला गुलामी विरुद्ध उठावाची प्रेरणा देत होते. विशेष म्हणजे, हे सारे करताना तत्कालीन राजकीय वा-यांप्रमाणे बाबासाहेब साम्यवाद किंवा समाजवादाची कास धरत नाहीत.

आपल्या खेडयापाडयात बसणा-या, सर्वच बाबतीत दुर्बल असणा-या भाऊबंदांना सक्षम करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मार्ग शोधला. कबीर आणि बुद्धाचे जीवनलक्षी तत्त्वज्ञान आणि पाश्चात्त्य देशात मिळविलेले आधुनिक ज्ञान याच्या मिश्रणातून स्वतंत्र ‘आंबेडकरवादी विचारधारा’ निघाली, फुले-शाहू महाराजांनी ज्या भूमीची आधीच मशागत करून ठेवली होती, त्या महाराष्ट्रात या आंबेडकरी विचारधारेने विद्रोहाची लक्ष-लक्ष समाजाभिमुख सूर्यफुले पिकवली. ‘शब्दांनीच घरे-दारे पेटतात,’ याची अक्षरश: प्रचिती देणा-या सूर्यफुलांच्या शेतीत ढसाळ नावाचा पांगारा फुलून आला होता. पांगारा हे झाड भलते वेगळे. शिशिरात त्याच्या काटेरी अंगावरील हिरव्या पानांचे अस्तर पिवळट पडून झडून जाते आणि वसंतात त्याच्या ओक्या-बोडक्या अंगाला लालचुटूक फुले लगडून जातात. म्हणून या झाडाला रक्तमंदार किंवा रक्तपुष्पही म्हणतात. हे झाड जेव्हा फुलांनी बहरलेले असते, तेव्हा ते लाल रंगाने पेटलेले दिसते. ढसाळांची सारी शब्दफुले तशीच रक्तरंजित आणि जगणेही हिरव्या सुखसौष्ठवाला नाकारणारे. म्हणून ते सगळयांच्या नजरेत भरले. त्यांच्या फुलांनी वणव्याची चाहूल दिल्यामुळे अवती-भवतीचा आसमंत काही काळ तप्त तर बराच काळ असंतुष्ट बनला होता. ढसाळांना त्याची पर्वा नव्हती. आंबेडकरांचा विचार घेऊन ते लिहीत होते आणि अचानक ‘समाजाभिमुख सूर्यफुलांनी’ नवी दिशा पत्करली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या ज्ञानदानाने तरारून वर आलेल्या या सूर्यफुलांनी ‘सत्ताभिमुख’ होण्याचा मार्ग शोधला. ही सत्ता फक्त राजकीय नव्हती, ती शासकीय, निमशासकीय सेवेतील होती. शैक्षणिक संस्थांमधील आणि ताकदवार संघटनांमधील होती.

आपल्या आधीच्या पिढयांनी शोषण सहन केले. या रागापोटी ही सूर्यफुले हातात सापडेल त्यावर आग ओकू लागली. जी ऊर्जा या नव्या सत्ताधा-यांनी उर्वरित दीनदुबळयांच्या विकासासाठी खर्च करणे अभिप्रेत होती, ती नको त्या कारणांसाठी वाया जाऊ लागली. त्यामुळे महाराष्ट्रातील पँथर, रिपाइं आणि अवघ्या आंबेडकरी चळवळीची शकले उडाली. तर तिकडे उत्तरेत फुले-शाहू-आंबेडकरांच्या वैचारिक पुण्याईने सत्ता मिळवणा-या मायावतीजींना गरीब माणसापेक्षा महापुरुषांच्या पुतळ्यांचाच पुळका आलेला दिसला. या सगळया विचित्र बदलांकडे ढसाळ डोळसपणे पाहायचे. त्यावर कडवटपणे बोलायचे आणि झटकन विषय बदलायचे. तिनेक आठवडयांपूर्वी माझ्या मोबाइलवर त्यांचा फोन आला. मोबाइल स्क्रीनवर ‘नामदेवदादा’ हे नाव बघून दचकलोच, कारण ते अतिदक्षता विभागात आहेत, याच्या बातम्या आम्हीच छापल्या होत्या. पलीकडून तोच उत्साही आणि प्रेमळ आवाज आणि इकडच्या तिकडच्या गप्पांनंतर ‘कधी भेटायला येतोस’, असा हुकमी प्रश्न. मी दुस-याच दिवशी सकाळी-सकाळी बॉम्बे हॉस्पिटलात पोहोचलो. केसरकर, सलीमभाई तिथेच होते आणि पाहता, पाहता गप्पांचा फड रंगला. खरं सांगायचं तर तेच बोलत होते, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर काय-काय करणार हे सांगत होते. तेवढयात त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाले, ‘तुझं लिखाण मी वाचतो नेहमी, बरं असतं, स्वाध्याय मात्र कधी सोडू नको’. अरे, तोच तर आपला खरा ‘अ‍ॅसेट’ (बलस्थान) असतो.’ पौर्वात्य-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, साहित्य अक्षरश: कोळून प्यायलेल्या आणि शब्दांशी मस्ती करणा-या ज्ञानमहर्षीची ती वाक्ये अजूनही कानात घुमताहेत आणि वारंवार डोळयासमोर येते प्रतिकूल परिस्थितीच्या हलाहलाचे प्राशन करूनही जीवनात कडवटपणाला अकारण थारा न देणा-या दादांचा प्रसन्न चेहरा. ढसाळ यांच्या जाण्याने ख-या अर्थाने मराठीतील ‘दादा’ कवी गेला आहे. त्यांची जागा कोण घेणार?

Categories:

Leave a Reply