Mahesh Mhatre

गुजराती लोकांचे खाण्यावर विलक्षण प्रेम. ते जेवढे प्रेम पैशावर करतात, तेवढेच खाण्यापिण्यावर, त्यामुळे गुजरातीत उजव्या हाताला, उजवा म्हणण्याऐवजी ‘जमणा हात’ म्हणजे ‘खाण्यासाठीचा हात’ म्हटले जाते. तर अशा या खाद्यप्रेमी गुजराती समाजाची सुरतेवर खूप माया आहे; कारण सुरती फरसाण, पेढा, बर्फी आणि सुरती उंधियूने गुजराती समाजाचे पिढयान् पिढ्या पोषण केले. इतिहासकाळापासून समृद्ध बाजारपेठेमुळे सुरती लोक छानछोकी आणि खाण्यापिण्याचे शौकिन बनले नसते तरच नवल, तर अशा लोकांना गुजरातेत ‘सुरती लाला’ म्हणण्याची प्रथा आहे. आणि त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी तर पिढ्यान् पिढ्या म्हणी, वाक्यांमधून अजरामर झालेल्या दिसतात. त्यामधूनच ‘सुरतमा जमण अने काशीमा मरण’ म्हणजे जेवायचे असेल तर सुरतेत आणि मरायचे असेल तर काशीत, अशी म्हणही प्रचलित झालेली दिसते, तर अशा या गुजराती समाजाच्या आवडीचा विषय असणा-या सुरतेचा इतिहास शिवाजी महाराजांच्या दोन स्वा-यांनी बदलला. त्यानंतर सुरत बदसुरत झाली आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनत गेली.. मोदींनी रायगडावर येऊन मराठ्यांचा वेगळा इतिहास मांडण्याची चूक केली, म्हणून पुन्हा एकदा सुरतेवर प्रकाशझोत टाकणे भाग पडले.


इतिहासाची मोडतोड करून खोटय़ा गोष्टींचा भडीमार करत समाजात संभ्रम निर्माण करायचा आणि त्या सामाजिक गोंधळाचा फायदा घेऊन आपला हेतू तडीस न्यायचा, ही जर्मन हुकूमशहा अ‍ॅडाल्फ हिटलर व त्याचा उजवा हात मानल्या जाणा-या जोसेफ गोबेल्स यांची कपटनीती जगप्रसिद्ध आहे. भारतीय राजकारणात या अफवा प्रचारतंत्राचा वापर करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खूप लाभ उठवलेला दिसतो. महात्मा गांधी, पंडित नेहरूंपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेकांच्या व्यक्तिगत चारित्र्याविषयी वा फाळणीसारख्या मुद्दयाविषयी खोट्या गोष्टी प्रसृत करत संघाने अनेक पिढय़ांची डोकी बिघडवली. त्याच प्रचारतंत्राने मुस्लीम वा ख्रिश्चन धर्माविषयीचे अपसमज समाजात रूढ करण्याचे संघीय कारस्थानही सर्वपरिचित आहे, त्यामुळे असेल कदाचित भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांनी रायगडावर येऊन जो खोटेपणा केला त्याला संघातील तमाम मराठी नेतृत्वाची मूक संमती असावी. गोबेल्सने आपल्या फसव्या प्रचारतंत्राचा आरंभ करण्याआधी हिटलरने ‘माइन काम्फ’मधून खोट्या गोष्टींना ऐतिहासिक सत्य बनविण्याची सुरुवात केली होती. ‘बिग लाय’ म्हणजे वारंवार मांडलेले खोटेपण हे लोकांना भुलविण्यासाठी कसे उपयोगी पडते, हे हिटलरने आपल्या पुस्तकातील दहाव्या प्रकरणात अगदी सविस्तरपणे मांडले आहे. त्याचाच आधार घेऊन गोबेल्सने ‘खोटे बोलावे, पण रेटून बोलावे’ असे तंत्र प्रचलीत केले, त्यामुळे तत्कालीन जर्मन आकाशवाणीवर प्रसारित होणारे कार्यक्रम लाउडस्पीकरच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतील, याकडे गोबेल्सचे लक्ष होते. त्या सर्व कार्यक्रमांमधून ज्यूद्वेषासोबत आर्य लोकांच्या महानतेचा एककलमी प्रचार जर्मन लोकांना आकर्षित करत असे. गोबेल्स त्या तंत्रात इतका वाक्बगार होता की, त्याने युरोपातील अन्य देशांतही या प्रचारयुद्धाचा फैलाव केला. त्यासाठी आर्यवंशाचा अभिमानी विचारवंत फ्रेडरिक नित्शेपासून नॉस्ट्रॅडेमसच्या भविष्यवाणीपर्यंत मिळेल त्या साधनाचा, विचारांचा गोबेल्सने लोकांची दिशाभूल करण्यासाठी वापर केला. मोदी हे अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आणि हिटलरच्या हुकूमशाही आदर्शावर विश्वास दाखवून काम करत आहेत. ही वस्तुस्थिती सर्व जण जाणतात. आजवर मोदींचे हे ‘खोटे प्रचार सत्र’ देशातील विविध प्रांतात सुरू होते, त्यामुळे त्याबद्दल फारसा विचार करण्याची गरज वाटत नव्हती. अर्थात तरीही ‘प्रहार’ने सातत्याने मोदींच्या या खोट्या बुरख्याआड दडलेले सत्य स्वरूप लोकांसमोर उघड करण्याचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलेले आहे; कारण आमचा विरोध नरेंद्रभाई या व्यक्तीला नाही, तर ‘मोदित्वा’च्या हुकूमशाही प्रवृत्तीला रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच कर्तव्यभावनेतून आम्ही नरेंद्र मोदी यांनी रायगडावरील सभेत केलेल्या खोट्या विधानाचा अभ्यास केला.

काय म्हणाले होते मोदी? तर ‘सुरतेवरील शिवाजी राजांच्या स्वारीला स्थानिक गुजराती लोकांनी मदत केली होती.’ शिवाजी राजांवर इतिहासकारांनी अन्याय केला असे म्हणायचे आणि महाराजांचे गुणगान गायचे. त्यामुळे शिवप्रेमी मराठी मन आनंदात आहे, हे पाहून सुरतेच्या स्वारीत ‘गुजरात्यांनी मदत केली’ हे खोटे वाक्य ऐतिहासिक सत्य असल्याच्या थाटात बोलायचे, ही मोदींची प्रचारपद्धती अतिशय घातक आहे; कारण मराठी लोकांना भुलविण्यासाठी आता नव्याने मोदी शिवाजी राजांच्या नावाचा वापर करू पाहत आहेत. याआधी शिवबा राजांच्या नावाचा पक्षीय वाढीसाठी आणि समग्र राजकारणासाठी वापर करणारी शिवसेना आता जवळ-जवळ नेस्तनाबूत होत चालली आहे. जोवर बाळासाहेब या पंचाक्षरी मंत्राचा महाराष्ट्रातील राजकारणावर पगडा होता, तोवर भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा होत असे; पण मोदींसारखा दादला मिळाल्यामुळे भाजप आता शिवसेनेला जुमानत नाही, याची प्रचिती ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर झालेल्या मोदींच्या ‘निर्धार सभे’तही आली. मात्र तेथेच न थांबता आता मोदींनी शिवतेज वेगळ्या पद्धतीने ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. त्यासाठी सुरतेच्या स्वारीत महाराजांना गुजराती लोकांनी मदत केली, या खोट्या दाखल्यासोबत महाराजांनी दोनदा सुरतेची स्वारी केवळ औरंगजेबाची संपत्ती लुटण्यासाठी केली, हे धडधडीत खोटे विधान केले. आता त्यांच्या या खोटेपणाविरोधात गुजरातेतील शिवद्वेष्टे लोक पुढे येत आहेत. होय, छत्रपतींनी जी सुरतेवर दोनदा स्वारी केली आणि तेथील मोगल, डच, फ्रेंच अधिकारी, वखारवाले आणि स्थानिक गुजराती व्यापा-यांकडून जी लूट केली होती, त्याबद्दल वाईट शब्दांत बोलले जाते. आजही गुजराती लोक फक्त शिवाजी महाराजांचाच नाही, तर समग्र मराठी समाजाचा किती द्वेष करतात हे एकदा नव्हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. मुख्यत: संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये तर या मराठीद्वेषाने कहर केला होता. त्या द्वेषामधूनच तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या हुकमाने १०८ मराठी आंदोलकांना दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्या होत्या. पण तो हुतात्म्यांचा रक्तसाक्षी इतिहास विसरून आम्ही मराठी लोकांनीच मोरारजीभाईंना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर पुढे राजकारण किती घसरत गेले, हे सर्वश्रृत आहे. एकूणच काय तर शिवाजी महाराजांनी इतिहासात केलेल्या कामगिरीचे देशातील सर्व प्रांतांत कौतुक होते, पण गुजराती माणूस मात्र त्यासंदर्भात हातचे राखूनच बोलत असतो. नव्या पिढीतील गुज्जू तरुणांचा हा शिवद्वेष इंटरनेटवर तर हमखास पाहायला मिळतो. विशेषत: ‘देशी गुज्जू डॉट कॉम’सारख्या वेबसाइट्स तर महाराजांचा एकेरी उल्लेख करून ते आणि अन्य विदेशी ‘लुटारू’ केवळ सुरतेच्या वैभवामुळेच आकर्षित झाले होते, असे धडधडीतपणे लिहितात. अगदी नरेंद्र मोदी यांचीही तशीच भावना असेल, पण राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्रीय समाजाला पूर्णपणे डावलणे अशक्य असल्यामुळे, नाईलाजाने का होईना त्यांना शिवबा राजांवर स्तुतिसुमने उधळावी लागत आहेत, पण त्यासाठीही खोट्याचा आधार घेतल्यामुळे त्यांचे गुजराती भाईबंदसुद्धा चिडलेले दिसताहेत. मोदींनी शिवाजी राजांची स्तुती करताना इतिहासकारांना दिलेला दोष गुजराती इतिहासकार मकरंद मेहता यांना रुचलेला नाही. त्या विरोधात बोलताना मेहता यांनी मोदींना घरचा आहेर दिला. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराजांनी सुरतची दोनदा लूट केली होती. त्याचा सारा इतिहास ‘सुरत’: सोनानी मूरत’ या माझ्या पुस्तकात प्रसिद्ध केला आहे. विशेष म्हणजे, त्या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन मोदीजींनी केले होते, त्या वेळी भाषण करताना मोदी यांनी सुरतलुटीचा उल्लेख ‘औरंगजेबाच्या संपत्तीची लूट’ असा केला नव्हता’, अशी आठवण मेहता यांनी करून दिली आहे.

होय, सुरतवरील महाराजांनी केलेल्या दोन स्वाऱ्या हा विषय आजही गुजराती अस्मिता जपणा-यांसाठी एक दुखरी जखम आहे. कारण महाराजांनी १६६४ मध्ये सुरत लुटली त्या वेळी दिल्ली मोगल साम्राज्याचे राजकीय सत्ताकेंद्र होते, तर सुरत ही मोगलांची आर्थिक राजधानी होती. साधारणत: १६६१ नंतर शाहिस्तेखानाने पुण्यात ठाण मांडून शिवाजी राजांच्या वाढत्या हिंदवी स्वराज्याची कोंडी केली होती. शाहिस्तेखानाने स्वराज्यात घातलेला धुमाकूळ महाराजांनी रामनवमीच्या मुहूर्तावर संपवला. रात्री अकस्मात हल्ला चढविल्यामुळे घाबरलेला खान ‘या तौबा’ करीत दिल्लीला पळाला होता, पण स्वराज्याची तोवर प्रचंड हानी झाली होती. खजिना रिकामा झाला होता. स्वराज्याची नव्याने उभारणी करण्यासाठी मोठा निधी हवा होता, त्यामुळे तत्कालीन महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेल्या सुरतेकडे महाराजांची नजर जाणे साहजिक होते. अर्थात त्याला कारणही तसेच होते. शिवबा राजे यांचे राजकीय काम जरी पुणे-रायगड जिल्ह्यांच्या अवती-भवतीच्या परिसरात केंद्रित झालेले असले तरी त्यांची नजर दिल्लीपासून दक्षिणेपर्यंतच्या प्रत्येक घडामोडींवर असायची. त्यामुळे सुरतेची श्रीमंती त्यांना ठाऊक होती. औरंगजेबाच्या खजिन्यात निव्वळ जकातीपोटी सुरतेतून १२ लाख रुपये जमा व्हायचे. सुरतच्या सामुद्रिक आणि व्यावसायिक स्थानामुळे फ्रेंच, डच, इंग्रज आदी विदेशी सत्तांनी आपल्या वखारी तिथे काढल्या होत्या. अरब, हबशी, चिनी असे विविध वंशाचे, देशांचे व्यापारी सुरतेत येत-जात असत. भारतीय मसाले, जड-जवाहीर, रेशमी वस्त्रे, सुगंधी द्रव्ये आदी वस्तूंच्या व्यापारामुळे सुरतेला जागतिक अर्थकारणात एक महत्त्वाचे स्थान होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, मक्केला जाणारे यात्रेकरू सुरतमधून प्रवास सुरू करीत, त्यामुळे त्या काळात ‘सूर्यपूर’ या नावाने ओळखली जाणारी सुरतनगरी ‘मक्केचे द्वार’ म्हणून प्रसिद्ध होती. विशेष म्हणजे आर्थिकदृष्टया संपन्न असणा-या या शहराची संरक्षण व्यवस्था म्हणावी तेवढी कडेकोट नव्हती, सुरतेवरील स्वारीनंतर जवळपास दीडशे वर्षानी ग्रँड डफ याने, ‘मराठय़ांचा इतिहास’ लिहिला. त्यात त्याने ‘कंपनी सरकार’च्या दस्तऐवजांचा आधार घेत महाराजांच्या स्वारीचे वर्णन आणि विश्लेषण केले आहे.

ग्रँट डफ याच्या मते, औरंगजेबाने सुरतेच्या सुरक्षेसाठी नेमलेला सुभेदार इनायत खान याच्याजवळ फक्त एक हजार सैनिक होते, तर राजगड ते सुरत असे जवळपास दीडशे मैलाचे अंतर कापून महाराजांनी आठ ते नऊ हजार सैनिकांसह सुरत गाठली होती. ज्या दिवशी, पाच जानेवारी २०१४ रोजी नरेंद्र मोदी रायगडावर आले होते, नेमक्या त्याच दिवशी, पण ३४९ वर्षापूर्वी, म्हणजे पाच जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराज सुरतेच्या उंबरठयावर, घणदेवी येथे धडकले होते. एवढ्या मोठया सैन्यासह हा कोणता सरदार येत आहे, या भीतीने सुरत शहर हादरून गेले होते. इतिहासाचे भान नसलेल्या मोदींना हा संदर्भ ठाऊक असण्याचे कारण नाही, पण आम्ही मराठयांनी तरी इतिहास स्मरून स्वत:चे अस्तित्व जपण्याची आवश्यकता आहे.

शिवाजी राजांचे हेरखाते खूपच सशक्त आणि सतर्क होते. त्या गुप्तहेरांचा प्रमुख बहिर्जी नाईक हा तर अफलातून माणूस. अनेक भाषा, कला आणि कौशल्य अवगत असणा-या या अष्टपैलू हेराने सुरतेची खडान् खडा माहिती गोळा केली होती. ती माहिती फक्त शहरवाटा किंवा लष्करी ताकद यापुरती मर्यादित नव्हती, त्याने सुरतेतील सा-या अर्थकारणाचा आलेख शिवबा राजांसमोर मांडला आणि स्पष्ट मत दिले, ‘महाराज, सुरत मारील्याने अगणित द्रव्य मिळेल.’ सभासद बखरीत यासंदर्भात सविस्तर माहिती पाहायला मिळते. बहिर्जी नाईक तेवढयावर थांबला नाही. त्याने सुरतेची मोहीम फत्ते करायची असेल, तर तुम्ही स्वत: आले पाहिजे, असा आग्रह धरला. मुख्य म्हणजे महाराजांनी तो मानला म्हणून हिंदवी स्वराज्याला आकार मिळाला.

एक हजार सैनिकांच्या बळावर सुरतेची सुभेदारी करणारा इनायत खान हासुद्धा अन्य मुगल सरदारांसारखा भ्रष्ट आणि दुष्ट होता. त्यामुळे परदेशी वखारी आणि श्रीमंत व्यापारी यांच्याकडे खासगी सुरक्षा यंत्रणा होती. आज ज्या पद्धतीने सुरक्षा एजन्सीजचे रक्षक रक्षणार्थ नेमण्याची पद्धत आहे, तद्वत त्या काळी ऐपतबाज लोक खासगी सुरक्षा रक्षकांच्या टोळ्या नेमायचे. शिवाजी राजांनी त्या सगळ्या व्यवस्थेचाही अभ्यास केला. मुख्य म्हणजे, फ्रेंच, डच वा इंग्रज वखारीतील सैन्याकडे आधुनिक हत्यारे असल्यामुळे खूप सावध हालचाली करण्याची गरज होती. त्यानुसार आपली ओळख लपवत, मोगल सरदार असल्याची बतावणी करत, शिवाजी राजे आणि त्यांचे आठ-नऊ हजार सैनिक निघाले होते. साधारणत: पाचेक हजार मदतनीस, जे रसद पुरवणे, पर्यायी संरक्षण व्यवस्था करणे आदी कामासाठी आधीच विविध टप्प्यांवर पोहोचले होते. गुप्तहेरांमार्फत महाराज या पुढे गेलेल्या लोकांच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे, राजे सुरतेत पोहोचण्याआधी हे लोक वेशांतर करून सुरतेच्या गल्लीबोळात घुसले होते; त्यामुळे मोदींनी रायगडावर सांगितले की, स्थानिक गुजराती लोकांनी सुरतेच्या स्वारीत महाराजांना मदत केली. त्यात काडीएवढेही तथ्य नाही. आणि समजा मोदी यांना आपली माहिती खरी वाटत असेल, तर त्यांनी ‘त्या’ मदतीचा एक तरी पुरावा सादर करावा, आम्ही त्याच रायगडावर मोदींचा सत्कार करू.

मोदी यांचे ‘ते’ विधान नुसते खोटे नाही, तर लोकांची दिशाभूल करणारे आहे. गुजराती लोकांचा शिवाजी राजांच्या स्वराज्याशी काहीच संबंध नव्हता, तो संबंध जोडून खोटा इतिहास रचण्याचा अत्यंत हिणकस प्रकार मोदी यांनी महाराष्ट्राच्या काही भाजप नेत्यांच्या उपस्थितीत केला. शिवाय शिवभक्त भिडे गुरुजीही तिथे हजर होते, पण त्या उपस्थितांपैकी एकाही मर्द मावळ्याला आपल्या इतिहासाचे विद्रुपीकरण करणा-या मोदींना रोखण्याची बुद्धी झाली नाही, हे अवघ्या मराठी जनतेसाठी लांच्छनास्पद आहे.

सुरतेवर स्वारी करण्यासाठी गेलेल्या शिवाजी राजांवर कपटी इनायत खानाने वकिलाच्या रूपात मारेकरी घातला होता. त्याने बोलणी करण्याच्या निमित्ताने राजांच्या जवळ जाऊन अंगरख्यात लपवलेला बिचवा बाहेर काढला होता. ‘अखंड सावधान’ असणा-या शिवबा राजांनी चित्त्याच्या चपळाईने हालचाल केली आणि त्या वकिलाला काही कळायच्या आत त्याच्यासकट छावणीत हजर असलेल्या चार मुगलांची डोकी आणि विसेक लोकांचे हात उडविण्यात आले. या प्रसंगानंतर महाराजांवर जीव टाकणारे मावळे सुडाच्या भावनेने पेटले. त्यांच्या क्रोधाग्नीत निम्म्याहून अधिक सुरत जळून भस्मसात झाली. विरजी व्होरा, हाजी कासम बेग, हाजी जहीद बेग सारख्या धनाढ्य लोकांसह पोर्तुगीज, डच आणि मोगल खजिने मराठ्यांच्या ताब्यात आले. मुख्य म्हणजे या सा-या गदारोळात महाराजांनी धार्मिक कार्य करणारे मिशनरीज, मशिदी आणि महिलांना कोणताही त्रास होऊ नये याची जातीने काळजी घेतली. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे फ्रेंच प्रवासी फ्रॅन्कायस बर्नियर याने लिहिलेले ‘ट्रॅव्हल्स इन मुघल इंडिया’ हे प्रवासवर्णनपर पुस्तक होय. तो लिहितो, ‘हा उल्लेख करायला मी विसरलो होतो, सुरतेच्या स्वारीदरम्यान शिवाजी, पवित्र शिवाजी यांनी फादर अँब्रोज यांच्या परिसराला अभय दिले होते. त्यांच्या घरा-दाराला हात न लावता शिवाजी म्हणाले, हे लोक चांगले आहेत, त्यांना कुणी त्रास देता कामा नये.’

शिवाजी राजांच्या स्वारीमुळे धनदांडग्यांना भलेही ताप झाला असेल, पण सर्वसामान्य नागरिकांना, धार्मिक कामे करणा-यांना आणि एकूणच निष्पाप लोकांना महाराजांच्या कुठल्याच मोहिमेचा कधी त्रास होत नसे. महाराजांच्या आज्ञापत्रात तसे दंडक घातले होते आणि जो कुणी त्या नियमांच्या विरुद्ध वर्तन करील, त्याला जी शिक्षा दिली जाई, त्यामुळे इतर कोणी तसे दुर्वर्तन करण्यास धजावत नसत, त्यामुळे सुरतेवरील दोन्ही मोहिमांमध्ये शिवाजी राजांकडून स्थानिकांना कोणताच त्रास झाला नव्हता, त्यामुळे सर्वसामान्य गुजराती माणसाच्या मनात शिवाजी राजांबद्दल आकस असण्याचे काहीच कारण नाही, पण वस्तुस्थिती तशी नाही. गुजराती समाजातील धनाढ्य वा बलाढय़ लोकांच्या मनात मात्र शिवाजी आणि मराठी लोकांबद्दल एक अढी असते. ती कधी व्यक्त तर कधी सुप्त स्वरूपात दिसत असते. अगदी मोदीही त्याला अपवाद नाहीत, मग महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी लोकांसमोर शिवाजी महाराजांचे मोठेपण सांगताना इतिहासाची मोडतोड करतात, त्या वेळी त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते; पण या सगळ्या गुजराती मानसिकतेमागे कोणती कारणे आहेत, याचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी छत्रपतींच्या सुरतेवरील स्वारीसंदर्भातील काही महत्त्वाचे पुरावे पाहणे गरजेचे आहे. आपल्या मराठी समाजात इतिहास लेखन आणि सामाजिक स्थितीची नोंद ठेवण्याची पद्धत नाही. पाश्चिमात्य आणि मोगलांकडे ती कला होती. त्यामुळे मराठीत शिवाजी राजांच्या जगण्याचा आलेख यथायोग्य पद्धतीने उपलब्ध नाही. त्यांच्या आयुष्याचे संदर्भ विशेषत: विदेशी प्रवासी आणि अधिका-यांच्या नोंदीत वाचायला मिळतात. असाच एक अत्यंत महत्त्वाचा संदर्भ राजांच्या सुरतेवरील दोन्ही स्वा-यांच्या संदर्भात उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे तो इंग्लिश भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून ओखळल्या जाणा-या ‘द लंडन गॅझेट’या दैनिकात २० फेब्रुवारी १६७२ रोजी पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेला आहे. शिवाजी राजांच्या सुरतेवरील स्वारीची माहिती सुरतेत असणा-या इंग्रजी अधिका-यांनी त्या दैनिकाच्या प्रतिनिधीला पत्रस्वरूपात पाठवली होती. ती जशीच्या तशी छापताना ‘द लंडन गॅझेट’च्या संपादकांनी-अलेप्पो यांनी महाराजांचे भारतातील राजकीय महत्त्व उघडपणे मान्य केलेले दिसते. बातमीच्या पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे, ‘‘शिवाजी, एक बंडखोर ज्याने मोगलांना अनेक लढायांत चारीमुंडय़ा चीत केले आहे. तो आता जवळजवळ संबंध देशाचा शासनकर्ता बनलेला आहे.’’ पण त्याच्या पुढील परिच्छेदात आलेली माहिती अधिक मनोरंजक आणि गुजराती ‘आकसावर’ प्रकाशझोत टाकणारी दिसते. सुरतेच्या गव्हर्नरने आपल्या पत्रांमध्ये असे स्पष्टपणे लिहिले होते की, ‘सुरतेवरील शिवाजी राजांच्या स्वा-यांमुळे इंग्रजांनी आपली वखार मुंबईस हलविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला स्थानिक धनिक मंडळींनीही पाठिंबा दिला होता.’ या सगळ्याचा परिणाम होऊन सुरत शहरातील व्यापाराचे केंद्र मुंबईकडे सरकले आणि एकेकाळी आंतरराष्ट्रीय नकाशावर महत्त्वाचे स्थान असणारे ते शहर ओसाड नगरी बनले. तर इकडे कोळी-आग्री लोकांच्या वसाहती असणारी मुंबई आणि सात बेटांची भूमी देशाची आर्थिक राजधानी बनण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा सारा इतिहास ‘सुरत : सोनानी मूरत’ मानणा-या गुजराती अभिजनांना खटकत असतो, पण त्याला आपला नाईलाज आहे. तुम्हाला इतिहास खटकतो, म्हणून तुम्ही मराठी इतिहास बदलण्याचे प्रयत्न कराल, तर मोदी असो वा अन्य कुणी, आम्ही तुमची गय करणार नाही..

Categories:

Leave a Reply