Mahesh Mhatre

बुद्धगयेतील बोधीवृक्ष आणि वज्रासन यांना बौद्ध धर्मात खूप महत्त्व आहे. अवघ्या दीड महिन्यापूर्वी वैशाख पौर्णिमेला बुद्धगयेत लाखो लोक दर्शनासाठी गोळा झाले होते. साधारणत: त्याच सुमारास आपल्या केंद्रिय गुप्तचर विभागाने बुद्धगयेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्धधर्मीय आणि मुस्लिमांमधील संघर्षाची पार्श्वभूमी या स्फोटांना असल्याचे बोलले जात आहे. जिथे बुद्धवंदना व्हायची, तिथेच हिंसाचारी स्फोट घडवले गेले. या पार्श्वभूमीवर तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रज्ञा-शिल व करुणेच्या उपदेशाची आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची आजही किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते.

अडीच हजार वर्षाहून जास्त काळापासून भारत आणि चीन, जपान, कोरिया, श्रीलंकेपासून युरोप-अमेरिकेत पसरलेल्या बौद्ध धर्मात बुद्धगयेचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच बुद्धगयेत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचे पडसाद जगभरात उमटले. बौद्धधर्मीय उपासक आपल्या पंचशील-अष्टशीलाचे पालन करताना ज्या ‘वंदना’ (प्रार्थना) करतात, त्यामध्ये त्रिरत्नवंदना, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, चैत्यवंदना आणि सगळ्यात शेवटी बोधिवंदना केली जाते.


यस्य मूले निसिन्नोव सब्बारि विजयं अका।
अहल्पि ते नयस्सामि बोधी राजा नमत्थू ते॥

या प्रार्थनेद्वारे भगवान बुद्ध यांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्या बोधिवृक्षाला नमस्कार करण्यात येतो. प्रत्येक बौद्धधर्मीयाची बुद्धगया आणि तेथील भगवान बुद्ध यांचे वज्रासन, सम्राट अशोक यांनी बांधलेला बुद्धविहार या सगळयाबद्दल अपार श्रद्धा असते. वैशाख पौर्णिमा हा भगवान गौतमबुद्ध यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. याच दिवशी त्यांचा जन्म झाला. बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाणही याच दिवशी झाले. त्यामुळे बुद्धगयेत वैशाख पौर्णिमेला, म्हणजे दीड महिन्यापूर्वी लाखो लोक बुद्धगयेत दर्शनासाठी गोळा झाले होते. साधारणत: त्याच सुमारास आपल्या केंद्रीय गुप्तचर विभागाने बुद्धगयेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे बिहारच्या गृहविभागाला कळवले होते. मुख्यमंत्री नितीशकुमार, ज्यांच्याकडे गृहखातेही आहे, ते त्या सुमारास नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या प्रभावाचा सामना कसा करावा याच्या विवंचनेत होते. त्यांनी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे दहशतवाद्यांना बॉम्बस्फोट मालिका घडवणे सोपे गेले. सुदैवाने स्फोटाच्या वेळी जास्त भाविक त्या परिसरात नव्हते. अन्यथा एकापाठोपाठ झालेल्या दहा स्फोटांनी खूप अनर्थ घडवला असता. खरे तर दहशतवाद्यांनी १३ ठिकाणी बॉम्ब ठेवले होते. मात्र तीन बॉम्ब निकामी झाल्याने त्यांचा स्फोट झाला नाही.

भारत स्वतंत्र झाल्यापासून आजवर बुद्धगयेच्या तोडीच्या एकाही बौद्धधर्मीय तीर्थक्षेत्रावर असा दहशतवादी हल्ला झाला नव्हता. तसे पाहिले तर गयेतील बोधिवृक्ष आणि लगतच्या विहारावर काही पंडे आणि साधूंनी कब्जा केला होता. एका मठाच्या महंतांनीही त्या जागेवर आपला हक्क असल्याचा दावा केला होता. त्यामुळे बौद्धधर्मीयांच्या काही संघटनांनी ‘रामजन्मभूमी आंदोलन’च्या धर्तीवर ‘बुद्धगया मुक्ती’साठी आंदोलनेही केली होती. गेल्या सहा-सात वर्षामध्ये विशेषत: उत्तर प्रदेशात मायावती सत्तेवर आल्यानंतर या पवित्र स्थळी बौद्धधर्मीयांना मुक्त संचाराची मुभा मिळाली होती. गौतम बुद्ध यांच्या जीवनकाळात त्यांनी साधारणत: ४५ वर्षे भ्रमण केले. ज्या लुम्बिनी क्षेत्रात तथागत बुद्ध जन्मले ते नगर आता नेपाळच्या हद्दीत येते. वाराणसी अर्थात काशीजवळच्या सारनाथ येथे त्यांनी ज्ञानप्राप्तीनंतरचा पहिला धर्मोपदेश दिला. त्यास धर्मचक्र प्रवर्तन असेही म्हणतात. पुढे श्रावस्ती येथील जेतवनात त्यांनी अनेक वर्षावास केले. राजगृह किंवा नालंदा विश्वविद्यालय, वैशाली नगरी जेथे आम्रपालीला बुद्धांनी धर्मोपदेश दिला आणि महिलांना भिक्षुणी संघात प्रवेश देण्याचा निर्णयही याच ठिकाणी झाला होता. विद्यमान गोरखपूर रेल्वे स्थानकाजवळच्या कुशीनगर येथे ८०व्या वर्षी बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. थोडक्यात सांगायचे तर प्रामुख्याने भारताच्या उत्तरेकडील भागातच तथागत बुद्ध यांनी धर्मप्रसार केला. इसवीसन पूर्व ५६२ मध्ये जन्मलेल्या या प्रज्ञावान राजपुत्राने २९व्या वर्षीच ज्ञानप्राप्तीसाठी राज्य आणि गृहत्याग केला होता. अंतिम ज्ञानाच्या शोधात निघालेल्या राजपुत्र गौतमाला एक गोष्ट समजली ती म्हणजे, ‘ओल्या लाकडाचे कितीही घर्षण केले तरी आग निर्माण होत नाही; पण सुक्या लाकडांना एकावर एक घासून अग्नी निर्माण होतो.’ थोडक्यात काय तर वासना-विकाराने व्यापलेले तन-मन शुद्ध करणे आवश्यक आहे, हे त्यांना जाणवले. त्यांनी पराकोटीचे उपवास आणि ध्यानाच्या विविध प्रकारांच्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीची पराकाष्ठा केली. अगदी आपला देह इतका झिजवला की, ते मृत्यूच्या अगदी दारात गेले होते आणि तोच खरे तर त्यांच्या साधनावस्थेतील अत्यंत महत्त्वाचा क्षण असावा. तप-उपवासाच्या माध्यमातून अंतिम सत्यापर्यंत जाणे शक्य नाही, हे त्यांना कळून चुकले आणि त्यांची बुद्धत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.

सगळी प्रलोभने, मानसिक ताण-तणाव आणि ध्यानमार्गात येणारे अनंत अडथळे दूर करून गौतमांनी आत्मनियंत्रण आणि स्थितप्रज्ञता प्राप्त केली आणि रात्रीच्या अंतिम प्रहरात त्यांच्या दृढनिश्चयी मनात आत्मज्ञानाचा उदय झाला. बुद्धाने यज्ञयाग-कर्मकांड आणि भ्रामक कल्पनांमध्ये गुंतून, रुतून पडलेल्या भारतीयांना आपले ज्ञान दिले. त्यासाठी सर्वप्रकारचा मान-अपमान पचवला, खरे तर त्यांच्या मनात सर्वसामान्यांबद्दल करुणेचा उदय झाल्यामुळे ते आयुष्यभर कार्यरत राहिले. आपल्या पहिल्या प्रवचनापासून बुद्धाने आपल्या धर्मात देव आणि आत्मा या संकल्पनांपासून फारकत घेतली होती. ‘जगातील ९० टक्के माणसे दु:खी आहेत. त्या दु:खी लोकांना दु:खमुक्त करणे हे आपले पहिले काम आहे,’ असे बुद्धांनी मानले आणि प्रस्थापितांचा विरोध पत्करून ‘मोठय़ा धाडसाने आपली तात्त्विक बैठक अशाश्वतावर, अनात्मवादावर आणि ईश्वरी अस्तित्व नाकारून उभारली. मुख्य म्हणजे कोणत्याही दोन टोकांमधील ‘मध्यममार्ग’ स्वीकारून बुद्धांनी जगाला नवी दिशा दिली. आज अडीच हजार वर्षानंतरही त्यांच्या विचारांचा प्रवास आणि प्रवाह जोरात सुरू आहे. विशेषत: भौतिक प्रगतीची परमावधी गाठलेल्या युरोप-अमेरिकेत सध्या बुद्ध तत्त्वज्ञानाला प्रचंड मागणी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तर बुद्धमार्ग अनुसरण्याची अक्षरश: लाटच आली आहे. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह शेकडो बौद्ध विचारवंत युरोप, अमेरिकेत बुद्धविचारांचा प्रसार करताना दिसतात.
तथागत बुद्धांचे महानिर्वाण इसवीसन पूर्व ४८३ मध्ये झाले, त्यानंतर साधारणत: दोनशे वर्षानी सम्राट अशोक यांनी बौद्धधर्म स्वीकारला. भारतातील सर्वशक्तिमान राजा असणा-या या मौर्यकुलीन सम्राटाला कलिंगमधील भीषण लढाईने ‘माणसात’ आणले आणि बुद्ध तत्त्वज्ञानाने त्याला ‘प्रज्ञावान’ बनविले. बुद्ध तत्त्वज्ञान व्यवहारात आणून त्याची आचरणात आणता येईल, अशी सूत्रबद्ध रचना केली आणि त्याला ‘धम्म’ असे नाव दिले. सम्राट अशोकाने ख-या अर्थाने बुद्धाचा धम्म भारताबाहेर नेला. आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांच्यासह शेकडो बौद्ध भिख्खूंना त्याने श्रीलंका, म्यानमार (ब्रह्मदेश) आणि लगतच्या देशांत पाठवले. ज्या वेळी अशोकपुत्र महेंद्र भिक्षू बनून श्रीलंकेत गेला, तेव्हा तेथील राजा देवानांप्रिय तिष्ण याने महेंद्रासोबतच्या काषायवस्त्र परिधान केलेल्या भिक्षूंकडे बोट दाखवून विचारले, ‘‘भारतात आणखी असे भिक्षू आहेत?’’ त्यावर महेंद्र उत्तरला, ‘‘जम्बूद्वीप (भारताचे प्राचीन नाव) अशा काषायवस्त्रधारींनी उजळून काढलेले आहे.’’ म्हणजे त्या काळी गावोगावी, प्रत्येक नगर परिसरात बौद्ध धम्माच्या भिक्षू, उपासकांचे अस्तित्व जाणवत होते. बुद्ध तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा विचार सांगतो की, कुठलीही गोष्ट कायम स्थिर नसते. अगदी त्यानुसार आज भारतात बुद्ध धम्म पूर्वीएवढा प्रभावी नाही. महंमद इब्र कासम याने इ. स. ७१२ मध्ये सिंध देशावर स्वारी केली, तेव्हापासून पेशावर, काबूल, कंदाहापर्यंत पसरलेल्या धम्म प्रभावाला ओहोटी लागली. आठव्या शतकानंतर शंकराचार्यानी धडाकेबाज मोहीम उघडून भारत उभा-आडवा पादाक्रांत केल्याने सनातन धर्माला बळ लाभले. त्यानंतर बौद्धमत मानणा-यांची संख्या दिवसेंदिवस घटत गेली. अखेर १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस उगवला आणि भारतात पुन्हा एक धम्मचक्र प्रवर्तन पर्व सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूरच्या भूमीवर दीक्षा देऊन दस-याच्या दिवशी ‘धर्मोल्लंघन’ केले होते. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा त्रिसरणाचे नाद गुंजायला लागले होते. मुख्य म्हणजे आम लोकांना नव्याने बौद्ध तत्त्वज्ञानाचा परिचय झाल्याने बुद्धाच्या स्पर्शाने पावन झालेल्या स्थानांना भेटी देणा-यांचे प्रमाणही ढले. बुद्धगयेतील बोधिवृक्ष आणि वज्रासन यांना बौद्ध धर्मात खूप महत्त्व आहे. त्यामुळे बौद्धधर्मीयांची ती श्रद्धा लक्षात घेऊन अतिरेक्यांनी त्या पवित्र भूमीवर बॉम्बस्फोट घडविण्याची आगळीक केली आहे. सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे म्यानमारमध्ये सुरू असलेल्या मुस्लीम आणि बौद्धधर्मीयांतील दंगलींचा सूड म्हणून बुद्धगयेत स्फोट मालिका घडवली गेली, असा आपल्या गुप्तचर यंत्रणांचा कयास आहे. अर्थात ‘इंडियन मुजाहिद्दीन’सह अनेक अतिरेकी संघटनांनी या आधीही बौद्धधर्मीयांना पवित्र असणा-या या स्थानांवर अतिरेकी कारवाया करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यात बरेच तथ्य आहे. इस्लामी दहशतवाद्यांनी बुद्धगयेत बॉम्बस्फोट घडवण्यामागील कारणांसंदर्भात एका वरिष्ठ पोलिस अधिका-याला विचारले असता त्याने सांगितले, ‘‘गेल्या काही महिन्यांपासून म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्त्वाखाली मुस्लिमांविरोधात उघडउघड हल्लाबोल सुरू आहे. बुद्धगयेतील स्फोटमालिका हे त्या दंगलसत्राचे पडसाद आहेत.’’ ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या नावावर ट्विटरवर ‘९ धमाके हमने करवाये’, अशी फुशारकी मारली गेली, त्यामुळेही कदाचित अशी वृत्ते प्रसिद्ध झाली असावीत.

तसे पाहिले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर बौद्धधर्मीय आणि मुस्लिमांमधील संघर्ष फक्त म्यानमारमध्येच नाही, तो चीनमध्येही आहे. थायलंडमध्येही आहे; परंतु त्या घटनांचे पडसाद कधीच भारतभूमीवर उमटले नव्हते. वास्तविक पाहता चीनमध्ये तर जिनजिआंग या मुस्लीमबहुल प्रांतात चिनी सरकारने स्थानिक मुस्लिमांवर इतके निर्बंध लादलेत की, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तिकडे घरामध्ये कुराणाची प्रत ठेवायची असेल, तरीही सरकारची परवानगी घ्यावी लागते. एवढा कडक अंकुश असूनही पाकिस्तानच्या मदतीने चीनमध्ये काही अतिरेकी गट कार्यरत असलेले दिसतात. थायलंडमध्ये तर मुस्लीम-बौद्धधर्मीयांमधील लढाई रस्त्यावर आली आहे. २००७ मध्ये मुस्लीम अतिरेक्यांनी दक्षिण थायलंडमधील याला प्रांतात आठ बुद्धधर्मीयांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हापासून आजतागायत दोन समाजातील हिंसक संघर्ष थांबलेला नाही. मुख्य म्हणजे थायलंडची राणी सिरीकीत यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेऊन बौद्धधर्मीयांना लष्करी प्रशिक्षण देऊन शस्त्रसज्ज केल्याने हे प्रकरण वाढले. राणीच्या आदेशाने गावागावातील ‘ऑर रोर वॉर’ (गाव संरक्षणदल) यांची हिंमत वाढली आणि संघर्ष अधिक चिघळला. म्यानमारमध्ये तर बौद्ध भिख्खू या दंगलीत आघाडीवर दिसतात. गतवर्षी रखिने आणि यंदा शान प्रांतात बौद्ध विरुद्ध रोहिंग्या मुस्लिमांमध्ये जोरदार ‘युद्ध’ जुंपले आहे. ‘टाइम’ मॅगेझिनच्या ताज्या अंकात ‘द फेस ऑफ बुद्धिस्ट टेरर’ या शीर्षकाखाली वादग्रस्त बौद्ध धर्मगुरू विराथू यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अर्थात, म्यानमारने तत्काळ त्या अंकावर बंदी घातली आहे. म्यानमारमधील दंगलीचे पडसाद आता मलेशियातही उमटू लागले आहेत. त्यामुळे भारतातील बुद्धगयेमधील बॉम्बस्फोट मालिकांचा संबंध या आंतरराष्ट्रीय घडामोडींशी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेमके सत्य आज ना उद्या बाहेर येईलच; परंतु ज्या गौतम बुद्धांनी आपल्या उपदेशाने जगभरात शांती निर्माण करण्याचा अथक प्रयत्न केला, त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीत दहशतवादाचे लोण पोहोचणे निषेधार्हच आहे.

दोन हजार वर्षे, साधारणत: सोळाव्या शतकापर्यंत भारतात बौद्ध धर्माचा आणि बौद्ध मताचा चांगलाच प्रभाव होता. चीन, जपान असो वा पाश्चिमात्य देशातील विद्वान मंडळींना अंतिम सत्याच्या शोधासाठी भारतातच यावे लागत असे. चौथ्या शतकात आलेला चिनी प्रवासी फा-हियान, सातव्या शतकात आलेला ह्यू-एन-त्संग आणि इ-त्सिंग यांनी भारतभर भ्रमण करून लिहिलेले प्रवासवर्णन वाचताना आजही त्या काळातील सुखी-संपन्न भारताचा अभिमान वाटतो. बुद्धगयेला ह्यू-एन-त्संग इ. स. ६४० च्या सुमारास पोहोचले होते. त्यांनी त्या वेळचे फार सुरेख वर्णन केले आहे. ते लिहितात, ‘‘बोधिवृक्षाच्या भोवती विटांची उंच आणि भक्कम भिंत बांधून त्याचे संरक्षण केले आहे. मुख्य दरवाजा निरंजना नदीकडे पूर्वेला आहे. दक्षिणेकडील दरवाजा फुलांनी युक्त असलेल्या तलावाकडे जाणारा आहे. पश्चिमेकडून पर्वताचे संरक्षण आहे. उत्तरेकडच्या दरवाजाने एका मोठया संघारामात जाता येते. येथे अनेक पवित्र स्थळे, विहार आणि स्तुप आहेत. येथे असलेले तथागतांचे वज्रासन विश्वाचा मध्यबिंदू आहे. ते शंभर पावलांच्या परिघाचे आहे.’’

वज्र म्हणजे भक्कम, अविनाशी. कोणताही आघात सहन करू शकणारे. ते जर एवढे भक्कम नसते तर, ज्याने वज्रसमाधी घेतली आहे, त्याला कोणीच आधार देऊ शकले नसते. ते जर एवढे भक्कम नसते, तर पृथ्वी आधारहीन झाली असती. ही जागा ज्ञाननिधी म्हणूनही ओळखली जाते. जरी सर्व पृथ्वी पायापासून हादरली तरी ही जागा हलणार नाही, असे ह्यू-एन-त्संग यांनी १३६० वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे.. बुद्धाचे तत्त्वज्ञान चिकित्सेवर आधारित आहे. ते आपल्या अनुयायांना स्पष्टपणे सांगत, ‘कोणतीही गोष्ट मी सांगतो म्हणून मान्य करू नका. तर्काच्या आधाराने जर ती बाब तुम्हाला पटली तरच तिचा स्वीकार करा. जसे बीजातून फळ व फळातून बीज निघते, तसेच कर्मातून निश्चित फळ व फळातून कर्म निघते’.. तथागत बुद्ध यांनी लोकांचे दु:ख कमी करण्यासाठी करुणा आणि प्रेमाचा वर्षाव केला, आणि अवघ्या भारतवर्षात एक सामाजिक सौख्याचे, सद्भावाचे आणि समृद्धीचे पर्व निर्माण केले होते. आज आम्ही त्यांनी सांगितलेले पंचशील आणि अष्टशील विसरलो आहोत, अगदी स्वत:ला बौद्धधर्मीय म्हणवणारेही बुद्धविचारांचा आदर करताना दिसत नाहीत, आचरण करणे ही तर फार पुढची गोष्ट. आम्ही सारे भारतीय बुद्धविचार विसरलो, त्यामुळे देशातील समाजस्वास्थ्य बिघडले आहे.. मुली-महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झालेली दिसते. भ्रष्टाचारात तर आम्ही जगात आघाडीवर आहोत, गरिबी, दु:ख आणि दैन्य यामुळे भारतातील ७० टक्क्यांहून अधिक जनता हैराण झालेली दिसते. या पीडितांच्या दु:खमुक्तीसाठी भारतात पुन्हा एकदा ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ कार्य सुरू झाले पाहिजे. त्यासाठी समाजातील ज्ञानी-विचारवंतांनी पुढे येणे गरजेचे आहे. बुद्धगयेतील दहशतवादी हल्ला ज्या अज्ञानातून झाला आहे, ते अज्ञान फक्त ज्ञानी-प्रज्ञावंत लोकांच्या प्रयत्नाने संपेल. बुद्धांनी प्रज्ञा-शील आणि करुणेचा उपदेश करताना लोकांना अहिंसेवर आधारित निर्मळ प्रेमाचा मार्ग दाखवला, म्हणून आज अडीच हजार वर्षानंतरही जग त्यांचे स्मरण करते, पूजा करते, पण आपल्या देशातील प्रज्ञावंतांना त्यांच्या या प्रेममार्गाचा विसर पडला आहे. स्वामी विवेकानंदांनी एका भाषणात सांगितले होते, ‘‘तुमच्या मनात इतरांविषयी ओलावा असतो का? असेल तर तुमची वाटचाल योग्य दिशेकडे सुरू आहे आणि तुमच्या मनात कोणाविषयी ओलावा नसेल तर तुम्ही प्रकांडपंडित असला तरी काही उपयोग नाही. कोरडे पाषाण राहाल तुम्ही. जगाचा इतिहास तुम्ही वाचला आहे का? महापुरुषांचे, प्रेषितांचे सामर्थ्य कशात असते? त्यांच्या बुद्धीत असते का? कोण्या प्रेषिताने तत्त्वज्ञानावर वा तर्कशास्त्रातील कठीण प्रश्नांवर भाष्य लिहिले आहे का? असल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. ते शब्दही अगदी मोजकेच बोलले. ख्रिस्ताची करुणा तुमच्यात प्रकटू द्या, म्हणजे तुम्हीही ख्रिस्तच व्हाल, बुद्धाच्या थोर प्रेमाचा उदय तुमच्या हृदयात झाला, म्हणजे तुम्हीही बुद्धच व्हाल.’’ स्वामीजींच्या या उद्गारांप्रमाणे जर भारतवर्षातील प्रत्येकांच्या मनात अगदी बुद्धगयेत बॉम्ब ठेवणा-या दहशतवाद्यांच्याही हृदयात करुणेचा आणि प्रेमाचा उदय झाला, तर देशातील अज्ञानाची काळरात्र क्षणात नष्ट होईल.
याच आशयाची खूपच सुंदर आणि आशयघन कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली आहे. भारताच्या सर्वागीण विकासासाठी ते तथागत बुद्धांना आवाहन करतात..
हे प्रशांत हे विमुक्त हे प्रनंत
करुणाघन करो धरा को कलंकशून्य

हिंसा से मत्त धरा नित्य निठूर द्वंद्व
घोर कुटिल पथ उसका, लोभ जटिल बंध
नूतन तव जन्म हेतू विकल सकल प्राणी
करो त्राण महाप्राण दो अमृतवाणी
विकसित हो प्रेमपद्म चिर मधुर निस्यंद।। १।।

दानवीर आवो दो त्याग कठीण दीक्षा
महा भिक्षू लो समस्त प्रहंकार भिक्षा
लोक भूल जाये शोक खंडित हो मोह
उज्ज्वल हो ज्ञानसूर्य उदय समारोह
सकल भुवन प्राण पाये नयन पाये अंध।। २।।

हे प्रशांत हे विमुक्त हे प्रनंत
करुणाघन करो धरा को कलंकशून्य     

Categories:

Leave a Reply