Mahesh Mhatre

महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि समंजस लोकनेत्यांची परंपरा आहे. थोर विचारवंत असलेले बाळासाहेब भारदे हे त्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे नाव. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर विधानसभेचे सभापती झालेल्या भारदेबुवांनी ‘विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनताजनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता! प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक!’ या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या; परंतु गेल्या आठवडय़ात विधिमंडळात झालेल्या आमदार-फौजदार हाणामारीने विधानसभेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे. ज्या घटनेने या सा-या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली, ती घटना तशी पाहिली तर क्षुल्लक. त्यात गाडी वेगाने नेणारा आमदारांचा वाहनचालक जेवढा दोषी, तेवढाच आमदारांना अरे-तुरे करणारा फौजदारही दोषी ठरतो. परंतु या एका घटनेने राज्यात ‘खाकी विरुद्ध खादी’ पोलिस विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवा वाद निर्माण केला आहे.. ‘लोकशाही म्हणजे शांततामय मार्गाने समाज परिवर्तनाची प्रक्रिया. शांततेच्या नावाखाली स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली अशांततेला उत्तेजन मिळू नये. हा समतोल साधण्यासाठी संसदीय परंपरेची जपणूक सर्वानीच कटाक्षाने केली पाहिजे’, असे बाळासाहेब भारदे यांचे सांगणे होते. आमच्या राज्यातील फक्त खाकी-खादीधारी मंडळींनी नाही, तर प्रसारमाध्यमांतील सर्व जबाबदार लोकांनीही ही जबाबदारीची जाणीव प्राणपणाने जपली पाहिजे.
लोकशाही चार आधारस्तंभांवर उभी आहे. पोलिस-प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, हे या चार स्तंभांपैकी दोन स्तंभ आहेत. जर हे दोन स्तंभच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तर आमची लोकशाही कशाच्या आधारावर उभी राहील? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सतत भेडसावतो आहे. वेगाने वाहन चालवण्याच्या एका आमदाराशी निगडित घटनेचे विधिमंडळात संबंधित फौजदाराला आमदारांकडून मारहाण होण्यात पर्यवसान झाले. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला. पुढे संबंधित आमदारांना विधिमंडळातून निलंबित करण्यात आले. त्यांना अटक होऊन सुटकाही झाली. तिकडे सहाय्यक फौजदार सूर्यवंशी यांना पुढील उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. थोडक्यात सांगायचे तर रस्त्यावरील एका छोटया बाचाबाचीचे रूपांतर पोलिस विरुद्ध लोकप्रतिनिधी या संघर्षात झाले. विशेषत: काही पोलिस अधिका-यांनी बुधवारी, २० मार्च रोजी ज्या पद्धतीने विधिमंडळातून बाहेर पडतानाच आमदारांना अटक करण्याची ‘फिल्डिंग’ लावली होती, ती घटनासुद्धा आमदारांनी फौजदाराला मारहाण करण्याएवढी गंभीर होती. एरवी सहाय्यक फौजदाराचे अस्तित्व ज्या आयपीएस अधिका-यांच्या दृष्टीने अगदी नगण्य असते, ते राज्यातील तमाम आयपीएस अधिकारी संघटितपणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे धावले. जणूकाही अवघ्या पोलिस दलाचे अस्तित्व धोक्यात आले होते. अन्य कोणत्याही लोकशाहीप्रधान देशात असा मस्तवालपणा खपवून घेतला गेला नसता; परंतु भारतात तो आम्हाला इंग्रजांच्या काळापासून अंगवळणी पडलाय. पोलिस हा शब्द उच्चारला की, पारतंत्र्यातील भारतीयांमध्ये भीतीची भावना दाटून येणे अपरिहार्य ठरावे, अशी इंग्रजांची अपेक्षा होती; परंतु स्वातंत्र्यानंतरही गेल्या सहा दशकांत ही स्थिती बदलली नाही, हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही. आजही आमचा पोलिसदादा भले तो रस्त्यावर उभा असो किंवा अन्य कुठे, त्याला सामान्य नागरिकाशी कसे बोलावे याचे भान नसते; कारण त्याला दिल्या जाणा-या प्रशिक्षणात फक्त गुन्हेगारांशी कसे वागावे, गुन्हे कसे शोधावे आदी विषयांचाच भाग जास्त असतो. आज मुंबई-महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलिस अधिकारी वगळता बहुतांश पोलिस कर्मचारी ग्रामीण भागातून, गरीब-मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले असतात. खाकी वर्दी अंगावर आल्यानंतर मिळणारे अधिकार पेलण्याएवढी त्यांची मानसिक क्षमता नसते. परिणामी त्यांच्या हाती सापडणारी प्रत्येक व्यक्ती ‘खाकी’च्या दबावाने ‘खाली’ होत जाते, तरुण आमदार क्षितिज ठाकूर आणि सहाय्यक फौजदार सचिन सूर्यवंशी यांची बाचाबाची पाहिल्यावर, तर पोलिसांची ही अरेरावी वृत्ती प्रकर्षाने उठून दिसते. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना एका लोकप्रतिनिधीशी जर एक फौजदार इतक्या उद्धटपणे बोलू शकतो, तर सामान्य नागरिकाचे काय होत असेल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटणे स्वाभाविक होते. अर्थात तसे झाल्याने विचारप्रवृत्त होण्याएवढी बुद्धी पोलिसांमध्ये शिल्लक राहिलीय का, असा प्रश्न उपस्थित होतो.

विधिमंडळात आमदारांनी फौजदाराला मारहाण केल्यामुळे काही वृत्तवाहिन्यांनी मारहाण करणा-या लोकप्रतिनिधींना ‘मवाली-गुंड’ म्हटले; परंतु एका आमदाराला ‘अरे-तुरे’ करणारा फौजदार खाकी वर्दी परिधान करण्याच्या पात्रतेचा नाही, असे बोलण्याचे तारतम्य कोणत्याच वृत्तवाहिनीने दाखवले नाही. राजकारणी हे माध्यमांसाठी नेहमीच ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आगपाखड करणे सोपे जाते, परंतु ज्या पोलिसांचे ‘सद्रक्षणाय - खलनिग्रहणाय’ हे बोधवाक्य आहे, ते पोलिस दल रक्षकाऐवजी कसे भक्षक बनले आहे, त्याच्या कहाण्या दररोज वृत्तपत्रांत येत असतात. ‘पैसे दिले की, पोलिसांना खिशात घालता येते,’ याची खुलेआम रस्त्यावर पोलिसांकडूनच जाहिरात होत असते. त्यामुळे समाजात पोलिसांबद्दलचा आदरयुक्त दबदबा संपुष्टात आला आहे. उरलीय फक्त दहशत व कुचेष्टा. ही स्थिती बदलण्यासाठी खरे तर सर्व पातळ्यांवरून बदल झाले पाहिजेत. सर्वप्रथम पोलिसांनी, त्यांच्या बडय़ा साहेबांनी आपल्या बदल्या-बढत्यांसाठी लोकप्रतिनिधींसमोर हात बांधून उभे राहाणे बंद करावे. पोलिसांना लागलेली पैसे खाण्याची सवय बंद करण्यासाठी गृहमंत्रालयाने त्यांना ‘आर्थिक सुरक्षा’ प्रदान करणे गरजेचे आहे. अन्यथा पोलिसांची ‘फक्त काय द्यायचे ते बोला’ ही भाषा बदलणार नाही.

आज तुम्ही कोणत्याही ‘पोलिस लायनी’त जा, ती पोलिस वसाहत किती गचाळ अवस्थेत आहे, हे पाहून हादरून जायला होईल. पोलिसांच्या सुट्टय़ा, कामाचे तास, मिळणारे वेतन आणि उद्दाम वरिष्ठांचा त्रास या गोष्टी वारंवार चर्चेत येतात, पण त्यातच आमचे वेठबिगारासारखे राबवले जाणारे पोलिस रस्त्यावर इतक्या भडकपणे का वागतात, याची कारणे दडलेली असतात, याचा कुणी विचार करीत नाही. आयपीएस अधिका-यांच्या संघटनेने ज्या तत्परतेने फौजदार-आमदार संघर्षात भूमिका घेतली, तेवढया तत्परतेने त्यांनी पोलिसांच्या सुविधा-कामाचे तास आदी विषयांमध्ये लक्ष घालावे. मुख्य म्हणजे वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडे ऑर्डर्ली, वाहनचालक, शरीररक्षक आणि हरकामे म्हणून काम करणा-या पोलिसांना अन्य सन्मानाची कामे करण्यास मुभा दिली तरी या वरिष्ठ अधिका-यांना शेकडो पोलिसांचा दुवा मिळेल.

आज पोलिस विरुद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष चिघळत चाललाय. एका फौजदाराला मारहाण झाली म्हणून पोलिस दलाने दबावाचे राजकारण करून दोन आमदारांना पोलिस कोठडीत टाकले; परंतु कन्नडचे तरुण आमदार हर्षवर्धन यांना जेव्हा पोलिसांनी ढोरासारखे बडवले होते, त्या वेळी सर्वपक्षीय आमदार एकत्र आल्याचे चित्र दिसले नव्हते. एका लोकप्रतिनिधीला दिवसाढवळ्या मारहाण करूनही संबंधित पोलिस अधिकारी मोकळे राहिले, ही बाब येथे आपण विसरता कामा नये. ज्येष्ठ विचारवंत आणि विधानसभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे यांनी विधिमंडळातील एका चर्चेत म्हटले होते, ‘डोकी फोडून चालते ती हुकूमशाही आणि डोकी मोजून चालते ती लोकशाही.’ आमच्या अजूनही विकसनशील असलेल्या देशाला, सर्वाना समान वागणूक देणारी लोकशाही हवी आहे. आम्हाला मग्रूर पोलिस-प्रशासन जसे नको, त्याचप्रमाणे मस्तवाल लोकप्रतिनिधीही नकोत. आम्हाला हवेत गांधीजींच्या संकल्पनेतील सत्ता हे सेवेचे साधन मानणारे आणि स्वत:ला जनसेवक समजणारे पोलिस आणि राज्यकर्ते, न्यायालय आणि प्रसारमाध्यमे.. आणि हे होण्यासाठी आमच्या तरुण पिढीचे सर्वागीण प्रबोधन झालेच पाहिजे.

‘तारुण्य’ या एका शब्दामध्ये सबंध देशाला, समाजाला नव्हे तर अवघ्या युगाला ‘तारून नेण्याचे’ सामर्थ्य असते. अयोध्येचा श्रीराम आणि गोकुळीचा श्रीकृष्ण यांनी जसा आपला लोकविलक्षण पराक्रम तारुण्यातच आरंभला, अगदी त्याच पद्धतीने आमच्या शिवबाराजांनी अगदी सोळाव्या वर्षीच रायरेश्वराला रुधिराभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली होती. अवघ्या महाराष्ट्राची ‘माऊली’ होण्याआधी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून भारतात आध्यात्मिक क्रांतीचे वादळ उठवले होते. स्वातंत्र्यचळवळीत तर हजारो तरुणांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि भारताला मुक्तीची वाट-पहाट दाखवली होती. अशी ही तरुणाईची किमया जशी राष्ट्रीय वा सामाजिक स्तरावर पाहायला किंवा अनुभवायला मिळते, तद्वत ती आपल्या व्यक्तिगत जगण्यातही अनुभवायला येत असते. एक संस्कृत सुभाषित सांगते की, ‘किमस्ति कश्चिद सावियेति लोके यस्य निर्विकारं यौवनम् तिक्रान्तम्’ (भावार्थ - या अफाट सृष्टीत ज्याचे तारुण्य निर्विकार तऱ्हेने गेले असा कोणी आहे काय?) अर्थात असा कुणीच माणूस या आलम दुनियेत पाहायला मिळणार नाही की, ज्याने आपल्या युवावस्थेत काही तरी ‘भन्नाट’ गोष्ट केलेली नाही. होय, प्रत्येक युवक अगदी तसाच असतो वाहत्या वा-यासारखा. ‘युवा’ हा शब्द उलट केला तर तयार होतो ‘वायू’. या अफाट ताकदीच्या वा-यासमोर भल्यामोठया इमारतीही टिकत नाहीत. होत्याचे नव्हते करण्याची ताकद या वायुशक्तीत असते; परंतु त्याच वा-याच्या वेगाला जर आम्ही ऊर्जानिर्मितीसाठी वापरले तर अंधारलेल्या काळोखी वस्त्यांना रोषणाईचा प्रकाशवर्ख लाभू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात सांगायचे तर अफाट शक्तिसामर्थ्य असलेल्या तारुण्याला बेभान होण्यापासून रोखले, तर त्याला आपल्या आयुष्याचे भान येऊ शकते आणि ज्या तरुणाला ऐन उमेदीच्या काळात आपल्या जबाबदारीची जाण आली, तर तो तरुण पुढील आयुष्यात हमखास पराक्रम गाजवतो.

परवा विधिमंडळात आमच्या तरण्याबांड आमदारांनी एका रांगडय़ा फौजदारावर ज्या पद्धतीने हात चालवला, ते पाहून तारुण्याची ऊर्जा कशी चुकीच्या दिशेने चालली आहे, हे स्पष्ट झाले. क्षितिज ठाकूर, राम कदम, जयकुमार रावल, राजन साळवी आणि प्रदीप जयस्वाल या पाच तिशी-चाळिशीच्या आसपासच्या तरुण आमदारांना कायदा हातात घेतल्यामुळे एक वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. महाराष्ट्राच्या विधिमंडळीय इतिहासाला काळिमा फासणारा हा सगळा घटनाक्रम. मुख्य म्हणजे या सा-या मारहाणीत पुढे असणारे सर्वपक्षीय आमदार तरुण असणे, ही बाब आपल्या लोकशाहीच्या भविष्यासाठी मारक ठरू शकते.

आमच्या देशातील संपूर्ण राजकीय चळवळीचा पाया महात्मा गांधीप्रणीत अहिंसा, शांती आणि संयमावर आधारलेला होता. गांधी-विचारांचा हा पगडा पंडित नेहरूंसारख्या उच्चविद्याविभूषित तरुणावरही झाला होता. म्हणून एका ठिकाणी ‘शक्ती’विषयी लिहिताना ते म्हणतात, ‘शक्ती ही शारीरिक बळात नसते. ती असते दुर्दम्य अशा इच्छेमध्ये’. पंडितजींकडे ही दुर्दम्य इच्छाशक्ती आयुष्याच्या अखेपर्यंत होती. म्हणून तरुणांच्या तडफेने त्यांनी देशाविदेशात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवला. आमच्या आजच्या तरुणाईने विशेषत: सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणांनी, आपला सारा शक्तिस्रेत सकारात्मक दिशेने नेण्याची गरज निर्माण झालेली आहे. संपूर्ण जगात आज भारत तरुण देश आहे, ही बातमी आता नवी नाही. भारतात ६० कोटींच्या आसपासची लोकसंख्या पंचविशीच्या आतील आहे. या तरुणाईला तरुण नेतृत्वच दिशा दाखवण्यास जास्त समर्थ असते. शिवबाराजे यांनी वयाच्या १७ व्या वर्षी आदिलशाहीच्या ताब्यातील तोरणागड जिंकून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्याच वर्षात शिवबांनी कोंढाणा (सिंहगड) आणि पुरंदर हे सैनिकी हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचे किल्ले जिंकून मावळ प्रांतासह सबंध पुणे परिसरावर नियंत्रण मिळवले होते. हे पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, शिवबा राजांना अगदी अल्पवयात अफाट यश आणि अधिकार मिळाले होते. सत्तेची धुंदी डोक्यात जाण्याच्या त्या तरुण वयात त्यांनी स्वत:च्या वर्तनावर ठेवलेले नियंत्रण विशेष महत्त्वाचे वाटते.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी शिवाजी महाराजांच्या या थोरवीचे अत्यंत समर्पक शब्दांत वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘शिवाजीची योग्यता स्वयंसिद्ध आहे. अलेक्झांडरप्रमाणे शिवाजीने आपल्या स्नेह्यासोबत्यांस ठार मारिले नाही. ज्युलियस सीझरप्रमाणेआपल्या बायकोस सोडून दिले नाही. नेपोलियन बोनापार्टने जसा डफ डांगियाचा वध केला तसा शिवाजीने कोणाचा वध केला नाही. क्रॉम्वेलने आयरिश लोकांस सरसहा ठार मारिले, त्याप्रमाणे शिवाजीने कोण्या प्रांतातील लोकांची कत्तल उडविली नाही. फ्रेडरिक दी ग्रेटप्रमाणे शिवाजीच्या अंगी दुर्गुण नव्हते.’

‘शिवाजीचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायणतेचे व परधर्मसहिष्णूतेचे होते. दोन-चारशे लढाया मारून त्यात विजयी होणे, तीन-चारशे किल्ले मैदानात, डोंगरावर व समुद्रतीरावर बांधणे, नवीन सैन्य तयार करणे, नवीन आरमार निर्मिणे, नवीन शहरे वसविणे, नवे कायदे करणे, स्वभाषेला उत्तेजन देणे, स्वत: पद्यरचना करणे, कवींना आश्रय देणे, स्वधर्माचे संरक्षण करणे, गोब्राह्मणांचा प्रतिपाळ करणे, सारांश स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे या लोकोत्तर कृत्यांनी जर कोण्या पुरुषाने या भूमंडळीला अक्षय ज्ञानी करून ठेविले असेल तर ते शिवाजीनेच होय. शिवाजीची खासगी वर्तणूक व सार्वजनिक पराक्रम इतके लोकोत्तर होते की, त्याच्याशी तुलना करण्यास जी जी म्हणून व्यक्ती घ्यावी ती या नाही त्या गुणाने शिवाजी महाराजांहून कमतरच दिसेल,’ असे राजवाडे आवर्जून सांगतात. उठसूठ शिवबा राजेंचे नाव घेणा-या सर्वच जबाबदार लोकप्रतिनिधींनी आणि लोकनेत्यांनी महाराजांचे चरित्र आणि चारित्र्य समजून घेतले पाहिजे.

छत्रपतींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगातून त्यांच्या मनाचा मोठेपणा झळकतो. बालभारतीच्या पुस्तकात वा. भा. फाटकांनी महाराजांच्या जीवनातील एका कथेला काव्यरूप दिलेले सगळ्यांना आठवत असेल, कोणताही लवाजमा न घेता एकटेच रपेटीला निघालेल्या शिवाजी राजांना सावळ्या नावाचा तरणाबांड चौकीदार अडवतो आणि ओरडून सांगतो, ‘खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधडया उडवीन राई राई एवढय़ा.’ तुम्ही वीनापरवाना ही वेस ओलांडून जाऊ शकत नाही, हे सांगताना हातात फारसा शस्त्रसाठा नसूनही वीर सावळ्या आपल्या कर्तव्यात कसूर होऊ नये, यासाठी सज्ज असतो. जेव्हा घोडयावर बसलेला शस्त्रसज्ज स्वार त्याला आपल्या शस्त्रांचा धाक दाखवतो, तेव्हा तो उलटा जबाब देताना, आपल्या शिवबा राजांच्या सामर्थ्यांचे वर्णन करून मी कशाला घाबरत नाही, असे सांगतो. खरे तर त्याने शिवाजी राजांना प्रत्यक्ष कधीच पाहिलेले नसते, त्यामुळे त्याचा हा गोंधळ उडालेला असतो. इथे छत्रपतींचे आकाशाएवढे मन अधिक विशाल झालेले दिसते. सध्याच्या युगात प्रत्येक ठिकाणी, ‘तुला माहितीय, मी कोण आहे ते?’ किंवा ‘तू मला ओळखले नाहीस?’ असे म्हणून ‘थांब, मी कोण आहे ते तुला दाखवतो’ असे गल्लीबोळातील नेता, कार्यकर्ताही म्हणतो, पण आपला रस्ता अडवून ‘राई एवढे तुकडे करीन’ अशी दमबाजी करणा-या सावळ्यासारख्या सामान्य चौकीदाराचे महाराजांनी फक्त बोलणे सहन केले नाही, तर त्याच्या कर्तव्यबुद्धीची परीक्षाही घेतली आणि त्या परीक्षेत जेव्हा तो उत्तीर्ण झालेला दिसला तेव्हा..

ऐका शिवबाचे हे स्वर -

आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा
खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधडया
उडवीन राई राई एवढया..

Categories:

Leave a Reply