Mahesh Mhatre

चालणे ही प्रक्रिया तशी पाहिली तर अत्यंत साधी, पण आदिमानव जेव्हा चालण्याचे तंत्र शिकला तेव्हापासूनच ख-या अर्थाने मानवजातीच्या सर्वागीण विकासाला गती आली. हल्ली रस्ते गाडयावाल्यांच्या ताब्यात गेल्याने मात्र रस्त्यावर चालणे धोकादायक आणि कंटाळवाणे बनलेले दिसते. ‘जो चालतो, त्याचे नशीबही चालते’ अशी एक जुनी म्हण आहे. म्हणूनच महात्मा गांधी, विनोबाजी आवर्जून सांगायचे, ‘चरैवैती, चरैवैती.. चालत राहा!’


वृत्तपत्रांमध्ये दररोज नवनवीन, वेगवेगळ्या बातम्या येतच असतात. चालू घडामोडींची लोकांना माहिती देणे हेच खरे वर्तमानपत्रांचे प्रयोजन. परंतु या विविध बातम्यांच्या गर्दीत कधी तरी अशी बातमी वाचनात येते की माणूस पुरता हादरून जातो. ५ मार्च २०१३ रोजीच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये अगदी एका कोप-यात प्रसिद्ध झालेली शंभर शब्दांची छोटीशी बातमी अशी होती..

..अतिवेगाने जाणा-या मोटारीखाली चिरडल्या गेलेल्या तीन वर्षाच्या झोया मैनुद्दीन शेख या मुलीच्या कुटुंबीयांनी विनोबा भावे पोलिस स्टेशनमधील अधिका-यांकडे बेदरकारपणे गाडी चालवणा-या चालकाला खुनाच्या आरोपाखाली अटक करावी, अशी मागणी केली आहे. गेल्या आठवडयात कुर्ला बस डेपोजवळ रस्त्यावर खेळणा-या झोयाचा मोहम्मद खानच्या कारखाली चिरडून मृत्यू झाला होता.

पोलिसांनी खानला तात्काळ अटक केली; परंतु दोनच दिवसांत त्याची जामिनावर मुक्तता झाली. झोयाच्या वडिलांनी, मैनुद्दीन यांनी कुल्र्याच्या दंडाधिका-यांकडे मोहम्मदचा जामीन नामंजूर करा, अशी याचना केली होती. आपल्या निवेदनात त्यांनी सांगितले, ‘खानने माझ्या मुलीचा खून केला आहे. अपघातानंतर मी त्याला विचारले, काय रे, तुला माझी मुलगी दिसली नाही? त्यावर तो उद्गारला होता.. मला वाटले रस्त्यावर कुत्रा झोपला असावा.’

रस्त्यावर चालणा-या बहुतांश लोकांकडे मोहम्मद खानसारखे लोक अगदी याच ‘नजरेने’ पाहतात. त्यामुळे भारतात दररोज डझनावारी पादचारी कुत्र्याच्या मौतीने मरतात. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा आस्थापनेतर्फे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, महामार्गावर होणा-या अपघाती मृत्यूंपैकी जवळपास ६० टक्के लोक पायी चालणारे असतात. विविध रुग्णालयांतील व्यवस्थापनांच्या मते एकूण अपघाती मृत्यूंमध्ये एक तृतियांश किंवा एक चतुर्थाश हे पादचा-यांचे असतात.

देशात दरवर्षी सुमारे १० हजार पादचारी मृत्युमुखी पडतात. त्यापैकी निम्म्याहून अधिक लोक १६ ते ४५ वर्षे या वयोगटांतील असतात, असे शासकीय आकडेवारी सांगते. आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर होणा-या अपघातांत जखमी झालेल्या लोकांना वैद्यकीय मदत वेळेवर न मिळणे, हे या मृत्यूंचे मुख्य कारण असते. ब-याचदा अपघातात जखमी झालेली व्यक्ती काही काळाने दगावते; परंतु तिच्या मृत्यूची नोंद शासकीय दफ्तरी होत नाही. तीच गत खेडयातील पादचा-यांची होते.

रस्त्यावर चालणारे, रस्ता ओलांडणारे ग्रामीण भागातील बहुतांश लोक अल्पशिक्षित असतात. त्यांना वाहनांच्या वेगाचा अंदाज नसतो. परिणामी ते रस्त्यावरील अपघातात हकनाक बळी पडतात किंवा कायमचे जायबंदी होतात. शहरी भागातील पादचा-यांची समस्या आणखी वेगळी आहे. मुंबई, ठाणे वा पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढत्या नगरीकरणाने प्रचंड वाहने आणली; पण या वाहनांना पार्किंगसाठी जागा आहे की नाही, याचा विचार ना प्रशासनाने केला ना नागरिकांना तो महत्त्वाचा वाटला. परिणामी शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढतच गेली.

गेल्या वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, मुंबईत प्रत्येक किलोमीटरमागे ६७४ मोटारी होत्या. संबंध राज्यासाठी हे प्रमाण दर किलोमीटरमागे फक्त ७८ होते. यंदाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल काही दिवसांतच जाहीर होईल. त्यात हे प्रमाण आणखी वाढलेले असेल. सध्या मुंबईच्या रस्त्यावर उतरणा-यांमध्ये ५० टक्के लोक असे असतात, ज्यांच्याकडे सायकल असते वा ते पायी चालतात. सुमारे ४० टक्के लोक प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. ‘बेस्ट’ बस सेवा शहरातील ३५ टक्के प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवते. रिक्षा वा टॅक्सीचा वापर करणा-यांचे प्रमाण मुंबईत फक्त २५ टक्के आहे.

रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमार्फत, ‘बेस्ट’तर्फे ६० टक्क्यांहून अधिक प्रवाशांचा भार उचलला जातो, मात्र आपण जर बेस्ट बसेसचे रिक्षा-टॅक्सींच्या तुलनेत प्रमाण पाहिले तर ते अत्यल्प वाटते. बेस्ट बस रस्त्यावरील फक्त १० टक्के जागा व्यापतात. त्याउलट रस्त्यावरील जेमतेम १० टक्के प्रवाशांना सेवा देणा-या कार ६० टक्क्यांहून अधिक जागा अडवताना दिसतात. त्यामुळे छोटया-मोठया सगळ्याच रस्त्यांवर दोन्ही बाजूला गाडया पार्क केलेल्या असतात. पदपथ हे लोकांना चालण्यासाठी नसून फेरीवाल्यांना व्यवसाय-धंदा करण्यासाठी आहेत.

थकून-भागून घरी परतणा-या चाकरमान्यांना ‘शॉपिंग’ करण्यासाठी आहेत, असा हल्ली सार्वत्रिक समज झालेला आहे. त्याशिवाय पदपथ हे सर्वधर्मीय देवांच्या वस्तीचे आवडते ठिकाणही बनलेले दिसतात. काही भाविक तर पदपथावर उभे राहूनच आपले देवधर्माचे काम अत्यंत प्रेमाने करताना दिसतात. पदपथावर आणखीही ब-याच गोष्टी होताना दिसतात. कुणी तिथे वर्षानुवर्षे राहतात, झोपतात, अगदी स्वयंपाकही करतात. कुणाला पदपथावर जुगार, तर कुणाला कॅरम खेळायला आवडते.

थोडक्यात सांगायचे तर पदपथ हा जरी पादचा-यांची सुरक्षा आणि सुविधा म्हणून बांधला असला तरी पादचारी सोडून इतर सगळ्या घटकांना तो हवा तसा वापरता येतो. पायी चालणारा पदपथ सोडून रस्त्यावर येतो आणि अपघाताचा बळी ठरतो, ही वस्तुस्थिती आज जेवढी भयावह आहे, त्यापेक्षा जास्त गंभीर होत जाईल. कारण आपल्या महाराष्ट्र राज्यात नगरीकरणाचा वेग प्रचंड आहे. रस्त्यावर चालणा-यांना जो वाईट अनुभव मुंबई-पुण्यात येत असतो, अगदी तोच अनुभव उद्या रत्नागिरी वा अकोल्यातील लोकांना मिळेल.

२०२६ पर्यंत देशातील ३८ टक्के लोक म्हणजे १४० कोटी लोक शहरी भागात राहणारे असतील. केंद्रीय नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री दीपा दासमुन्शी यांनी लोकसभेतील एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक ८ कोटी १३ लाख असणार आहे आणि २०२६ मध्ये मुंबईची लोकसंख्या २ कोटी ६३ लाख असेल, असा अंदाज केंद्रीय नगरविकास विभागाने वर्तवलेला आहे.

शहरात आणि राज्यात होऊ घातलेल्या या प्रचंड लोकसंख्यावाढीच्या तुलनेमध्ये आम्ही पर्यायी व्यवस्था काय उभी करीत आहोत, असा प्रश्न विचारला तर प्रशासनाकडे उत्तर असेल काय? खरे सांगायचे तर आज ज्या पद्धतीने रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडलेला दिसतोय, त्यामध्ये फार काही बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण कोणतीही योजना आखताना लोकांची सुविधा, सुरक्षा आणि भविष्यातील गरज याचा विचार करू नये, असे जणू आमच्या योजनाकर्त्यांनी ठरवलेले दिसतेय.

अगदी साधे उदाहरण द्यायचे तर मुंबईतील बहुचर्चित ‘स्काय वॉक’चे घेता येईल.

सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ७५० कोटी रुपये खर्चून ३७ स्कायवॉक उभारलेले आहेत. सौंदर्यदृष्टी वा कलात्मक नजर नसलेल्या सरकारी बाबूंनी पादचा-यांच्या सोयीच्या नावाने उभारलेल्या या सांगाडयांचा वापर कोणत्या कामासाठी होतो, याची एमएमआरडीएचे नवनियुक्त आयुक्त मदान यांनी माहिती घेतली पाहिजे. कारण त्यांच्याच कार्यालयाने या सर्व स्कायवॉकची पाहणी करून जे सर्वेक्षण केले आहे, त्यानुसार ३७ पैकी फक्त १० स्कायवॉकचा वापर जास्त प्रमाणात होतो. उर्वरित स्कायवॉकवर प्रेमीयुगुले, रिकामटेकडे आणि भिका-यांचीच गर्दी असते. परिणामी ज्या मुंबईकरांना पादचा-यांसाठी ही सुविधा निर्माण केली होती, ते मात्र रस्त्यावरच असतात. जीव धोक्यात घालून रस्ते ओलांडतात.

जून २०११ मध्ये स्कायवॉक वापरणा-यांची संख्या १२ लाखांच्या आसपास होती. लोकांना या कल्पनेचे नावीन्य वाटले असावे, म्हणून त्यांनी ‘आकाशमार्गा’ला पसंती दिली होती; परंतु मे २०१२ मध्ये स्कायवॉक वापरणा-यांची संख्या ७ लाखांवर घसरली. त्यामुळे बिथरलेल्या एमएमआरडीए प्रशासनाने शहरात आणखी नवे स्कायवॉक उभारण्याची कल्पना बाजूला ठेवलेली दिसते, परंतु याचा अर्थ रस्त्यावर चालणा-या पादचा-याला वाढत्या वाहनांच्या गर्दीत ‘रामभरोसे’ सोडण्याचा शासनव्यवस्थेला अधिकार आहे असे नाही. आज जगातील सगळ्याच प्रगत देशांमध्ये जेव्हा रस्ते वाहतुकीचा विचार केला जातो, त्या वेळी पायी चालणा-यांची सगळ्यात जास्त काळजी घेतली जाते.

आपल्या देशात बरोबर याच्या उलट कृती करण्यात आमच्या सरकारी बाबूंना आनंद होतो. पुढारलेल्या देशात ज्या रस्त्यावर अतिवेगवान वाहने असतात, त्या रस्त्याच्या जवळही पादचारी जाऊ शकत नाही. मग रस्ते ओलांडण्याची गोष्ट तर दूरच राहिली. जिथे गरज असेल तेथे सायकलस्वार आणि पादचारी यांच्यासाठी स्वतंत्र रस्ते, स्वतंत्र सिग्नल यंत्रणा केलेली असते. मुख्य म्हणजे आपल्याकडे जसे गाडीत बसलेले लोक पायी चालणा-यांकडे तुच्छतेने पाहतात, रस्ते वापरण्याचा अधिकार फक्त गाडय़ा उडवणा-यांसाठी आहे, असे वागतात. तसे चित्र प्रगत देशात पाहायला मिळत नाही.

आपल्याकडे चांगले शिकले-सवरलेले लोक ज्या पद्धतीने गाडय़ा हाकतात, जोरजोरात कर्णे वाजवून गोंधळ घालतात आणि सर्वात क्लेषदायक म्हणजे क्षुल्लक कारणावरून ज्याप्रकारे भांडतात हे सगळे वर्तन ‘किळसवाणे’ या सदरात मोडते. मात्र या विषयावर फार कुणी कधी बोलताना दिसत नाही; कारण ज्या पादचा-याला या सगळ्यांचा फटका बसतो, तो गाडीवाल्यांना प्रत्येक वेळी रोखू शकत नसतो. त्यामुळे आजघडीला मुंबईत रस्त्यावर चालणे अत्यंत कठीण बनले आहे. वेगाने जाणारे दुचाकी वा चारचाकी स्वार कधी अकस्मात काळ बनून येतील याचा नेम राहिला नाही, त्यामुळे भारतातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये परदेशी पर्यटक येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटतेय.

वास्तविक पाहता, २०-३० वर्षापूर्वी जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर आजच्यासारख्या गाडया नव्हत्या, त्या वेळी बरेच उत्साही पर्यटक शहराच्या कानाकोप-यात मुक्तपणे फिरताना, मुंबईच्या रंगीबेरंगी जीवनाचा आस्वाद घेताना दिसायचे, पण आता तसे दिसत नाही. रस्त्यांवर गाडयांची गर्दी आणि पदपथावर फेरीवाल्यांपासून भिका-यांपर्यंत सगळ्या नको त्या गोष्टींचे अतिक्रमण यामुळे मुंबई, पुणे, ठाणे आदी सर्वच शहरातील नागरिकांच्या चालण्यावर बंधने आली आहेत. चालण्यावर बंधने येण्याचा थेट संबंध नागरिकांच्या आरोग्याशी जोडता येईल.

खरे तर पाच महिन्यांपूर्वी ‘प्राइस वॉटर हाऊस-कूपर्स’तर्फे ‘सिटीज ऑफ अपॉच्युनिटी २०१२’ हा २७ शहरांच्या स्थितीचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्या अहवालात मुंबई हे शहर जगातील सर्व महानगरांमध्ये राहण्यासाठी अयोग्य आहे, असा निष्कर्ष काढला होता. सुविधा सुरक्षा आणि आरोग्य याबाबतीत २७ शहरांमध्ये मुंबईचा २४ वा क्रमांक लागला होता. या एका गोष्टीवरून आपण मुंबईसह देशातील सर्वच महानगरातील जगणे किती अवघड झाले आहे, याची कल्पना करू शकतो. ‘वर्ल्ड हार्ट फेडरेशन’ने तर शहरी जीवनातील अनेक त्रुटींवर प्रकाशझोत टाकताना मुंबईकरांच्या बदललेल्या जीवनशैलीवर टीका केली आहे.
शहरी वातावरणातील वाढत्या हृदयविकाराच्या धोक्यांचा आढावा घेताना फेडरेशनने लहानपणापासून मुलांवर होणा-या चुकीच्या संस्काराची अक्षरश: चिरफाड केली आहे. आज मुंबईतील ७ ते १० टक्के मुले उच्च रक्तदाब आणि १५ ते १६ टक्के मुले हाय कोलेस्टरॉलमुळे धोक्याच्या सीमारेषेजवळ घोटाळताना दिसतात. शाळा अगदी जवळ असली तरी रस्त्यावरील धोक्यांमुळे पालक त्यांना चालत न जाण्याचा सल्ला देतात. तीच गोष्ट खेळांची. पूर्वी पटांगण जवळ नसले तरी मुलांना घराजवळच्या रस्त्यांवर खेळण्याचा हक्क होता. आता रस्त्यांना पार्किंग लॉटचे रूप आल्यामुळे तोही पर्याय उरलेला नाही, त्यामुळे फारशी शारीरिक हालचाल ठावूक नसलेल्या या विद्यार्थीवर्गाला फास्टफूड आणि जंक फूडमुळे स्थूलता येते.

मुलांप्रमाणे मोठय़ांचीदेखील हीच गत झाली आहे. अगदी जवळच्या अंतरावर काम असले तरी स्कूटर वा कार वापरण्याची लोकांना सवय झालेली दिसते. त्यामुळे पायी चालणे ही गोष्ट मागासलेपणाचे किंवा गरिबीचे लक्षण बनले आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना सायकल चालवण्याचा अभिमान वाटे, हल्ली मुलाला दहावी होण्याआधीच स्कूटर मिळते. त्यामुळे सायकलला पॅडल मारत घाम गाळणार कोण?

चालण्याला भारतीय संस्कृतीत एक वेगळे स्थान आहे. ऐतरेय उपनिषदातील ‘चरैवैती, चरैवैती’ म्हणजे ‘चालत राहा, पुढे चालत राहा’ हे सूत्र. तर अशा या चालण्याच्या व्यायामाला पाश्चिमात्य संस्कृतीतही मोठे स्थान आहे. इंग्रजीत तर ‘वॉकिंग इज द किंग, ऑफ ऑल एक्सरसाइजेस’ अशी म्हण आहे. अभिजात संस्कृतीसाठी आग्रही आणि प्रसिद्ध असलेल्या फ्रेंच लोकांमध्येही चालण्याला फार प्रतिष्ठा आहे. मी स्वत: २००२ मध्ये पॅरिसच्या रस्त्यावर, उद्यानात रमतगमत चालणा-या सर्व थरांतील लोकांचा हा चालण्याचा आनंद पाहिला आहे; परंतु त्यांच्या या सवयीमागील कारण २००७ साली लक्षात आले.

त्या वेळी आपल्या रगेल आणि रंगेल वागण्यामुळे प्रसिद्ध असणारे निकोलास सारकोझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. एकदा धावण्याचा सराव करीत असताना ते धडपडले. मग खास विमानाने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्या घटनेने फ्रेंच लोक प्रचंड चिडले. कारण काय होते..? तर राष्ट्राध्यक्ष सारकोझी यांनी आपल्या पूर्वसुरींप्रमाणे खानदानी चालण्याच्या व्यायाम करण्याऐवजी ही धावाधाव करण्याची कसरत करणे असंस्कृतपणाचे आहे, असे बहुतांश फ्रेंच अभिजनांचे मत होते. विचारवंत अ‍ॅलन फिंकीनक्राऊट यांनी तर राष्ट्राध्यक्ष सारकोझी यांनी चालण्याच्या आध्यात्मिक प्रक्रियेचा अनुभव घ्यावा आणि धावणे, जी सामान्य शरीरसाधनेची क्रिया आहे, तिचा त्याग करावा असे सुचवले होते.

थोडक्यात सांगायचे तर, अशा या सर्वमान्य चालण्याच्या साध्या परंतु अत्यंत उपयुक्त व्यायामाला आम्ही बहुतांश भारतीय विसरत चाललो आहोत. नाही म्हणायला हल्ली काही अतिहुशार धर्मप्रेमी लोकांनी आमच्या तरुणाईला वर्षभर शिर्डीचे साईबाबा आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दारात ‘दिंडी’ दरवाजाने नेले आहेच. ते चालणे शरीराला क्लेषदायक आणि ब-याचदा रस्त्यावरच्या बेदरकार वाहन चालकांमुळे जीवघेणेही ठरताना दिसते. साईबाबांच्या दरबारात जाण्यासाठी मुंबईहून दररोज सरासरी एक तरी दिंडी निघतेच. या दिंडीत सामील होणारे बहुतांश तरुण असतात.

नोकरी-धंदा किंवा चांगले जीवनध्येय हाती आलेले नसल्यामुळे यातील बरेच तरुण गोंधळलेले असतात. असे हे मानसिकदृष्टया अस्वस्थ असणारे तरुण जेव्हा महामार्गावर चालतात, तेव्हा त्यांची शारीरिक स्थिती अत्यंत वाईट होते. पाय सुजतात, फुटतात अवघे शरीर थकून जाते, तरीही ते चालतात. कारण धर्म नामक अफूची गोळी त्यांचे दु:ख काही काळापुरते दूर करत असते. मात्र अशा गर्दीतील मुलांचे रस्त्यावर होणारे अपघात-मृत्यू आता दिवसेंदिवस वाढत आहेत.

अगदी आषाढी-कार्तिकीच्या वारीतही वारकरी ट्रकखाली चिरडले जाण्याचे प्रमाण हल्ली-हल्ली वाढलेले दिसते. एकीकडे लोक चालायचे विसरत चालले आहेत, तर दुसरीकडे धर्म-कर्माच्या नावावर चालणा-या लोकांचे जीवन असुरक्षित बनलेले दिसतेय. म्हणून आता समाजातील विचारी लोकांनी चालण्याला, पूर्वीच्या काळी ज्याला ‘गमनयोग’ म्हणून ओळखले जात असे, त्या सहजसोप्या व्यायामाचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक वाटते.

विख्यात तत्त्वज्ञ, विचारवंत आणि मार्गदर्शक जे. कृष्णमूर्ती हे चालण्यासाठी खूप प्रसिद्ध होते. दीर्घायुष्य लाभलेल्या कृष्णमूर्ती यांनी आयुष्याच्या अंतापर्यंत चालण्याच्या व्यायामाचा त्याग केला नाही. त्यांचे चालणे म्हणजेच एक प्रकारचे ध्यान असे. बौद्धधर्मीय तत्त्वज्ञांनी चालण्यातून ध्यान साधण्याची एक वेगळीच पद्धत विकसित केली आहे. जी मौनाच्या गुहेतून निसर्गाच्या आल्हाददायक सान्निध्यात जातानादेखील आपल्या मनाची अपार शांती ढळू देत नाही.

चालताना जेव्हा पाय एका मागोमाग एक असे तालबद्धपणे उचलले जातात, तेव्हा शरीराला गतीसोबत एक आनंददायी लय लाभत असते. जेव्हा तुमचे मन या लयीत लयाला जाते, तेव्हा शरीराचे जडपण आणि दडपण आपोआप संपुष्टात येते. फक्त आपल्याला आपली ‘चाल’ बदलवता आली पाहिजे. भगवान गौतम बुद्ध आपल्या प्रत्येक प्रवचनाच्या शेवटी ‘चरैवैती, चरैवैती’चा पुकारा करीत. ‘चालत राहा, पुढे जात राहा’ जीवनाच्या प्रवासातील थांबे.. कधी सुखाचे तर कधी दु:खाचे, कधी आशेचे तर कधी निराशेचे.. येतच राहतात, येतच राहतील.

आम्ही मात्र चालत राहावे..
जीवनगाणे गात राहावे..
चरैवैती, चरैवैती!

Categories:

Leave a Reply