Mahesh Mhatre



शंभरी गाठलेल्या हिंदी सिनेमाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली. आरंभी तो पुराणांमध्ये रमला कारण तत्कालिन भारतीय समाजालाही पौराणिक चमत्कृतीचे आकर्षण होते. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी सिनेमाचे सामाजिक भान जागे झाले. त्यानंतर दर आठ-दहा वर्षानी हिंदी सिनेमा कात टाकून नवा अवतार धारण करताना दिसत गेला. आजही ही बदलाची प्रक्रिया सुरू आहे. या बदलत्या रूपातील हिंदी सिनेमाने सामाजिक वास्तव कधी नव्हे एवढय़ा प्रमाणात स्वीकारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विवाहबाह्य संबंध, समलिंगी संबंध, जबरदस्त हिंसाचार अशा एक ना अनेक नको वाटणा-या गोष्टी समाजातून सिनेमात झिरपत आहेत. हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या काळातील सिनेमा आणि आजचे चित्रपट यांची तुलनाच करता येत नाही. काळ बदलला, कायदे बदलले, जगण्याचे वायदे बदलले. हिंदी चित्रपटांची लोकप्रियता मात्र कायम तशीच राहिली. कारण सिनेमा हे भारतीयांच्या जगण्याचे प्रतिबिंब मानले जाते.. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जाण्याने रूपेरी पडद्यावरील हे आभासी वास्तव हलले..

दक्षिण कोरियाच्या गंगवॉन प्रांतातील एका छोटय़ा शहरात भारतातून आलेल्या आम्हा पाच जणांसाठी स्वागत सोहळा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात एक मध्यमवयीन कोरियन स्त्री सगळ्यांच्या पुढे येऊन बसली होती. तिच्या नजरेत प्रचंड औत्सुक्य दिसत होते. आम्हा भारतीय मंडळींकडे पाहून तिने आल्या-आल्या हात जोडून ‘नमस्कार’ केला. औपचारिक कार्यक्रम संपल्या-संपल्या त्या बाई आमच्या दिशेने धावल्या. जणू काही जुने ओळखीचे लोक भेटावेत एवढ्या आपुलकीने त्यांचे बोलणे सुरू झाले.. त्यांना इंग्रजी येत नव्हते आणि आम्हाला त्यांचे कोरियन समजत नव्हते. मात्र, त्यांच्या बोलण्यातील ‘राजेशी.. कना’ हा वारंवार येणारा शब्द मला वेगळा वाटत होता. त्याला जोड मिळाली बाईंच्या कोरियन उच्चारातील गाण्याची.. त्या कोरियन उच्चारात म्हणत होत्या.. ‘चल, चल मेरे साथी, ओ मेरे हाथी’ आणि 15 मिनिटांच्या त्या कोरियन संभाषणाची आम्हाला उकल झाली.. मी जोरात म्हणालो, ‘हाथी मेरे साथी’ बाईंनी अत्यानंदाने मान डोलावली आणि आपल्या पर्समधील राजेश खन्नाचा देखणा फोटो माझ्यासमोर धरला.. आणि जणू काही त्यांच्या भोवतालचे जग अस्तित्वातच नसावे असे मानून त्या बाई ‘बाबू मोशाय’च्या देखण्या चेह-याकडे अनिमिष लोचनांनी पाहू लागल्या.. तिची समाधी भंग न करता आम्ही हळूच सटकण्याची योजना आखत असतानाच बाई भानावर आल्या आणि थेट आयोजकांकडे गेल्या..

ही घटना आहे, मे 2005 मधील. ज्यावेळी भारतीय सिनेरसिकांनी एकेकाळचा ‘सुपरस्टार’ राजेश खन्ना यांच्याकडे पाठ फिरवली होती. त्यावेळी एका वेगळ्याच देशात, हिंदी भाषा न समजणा-या स्त्रीवर राजेश खन्ना नामक जादूचा करिश्मा मन थक्क करणारा होता. त्यानंतर वर्षभरातच मुंबई विमानतळावरील प्रतीक्षालयात असेच अचानक ते समोर आले. थकलेल्या देहावर वृद्धत्वाने अतिक्रमण केले होते. मात्र, राजेश खन्नांचे ‘सुपरस्टार’पण त्यांच्या तेजाळलेल्या डोळ्यांत साठलेले दिसत होते. त्यांच्या बरोबर असलेल्या दोन लोकांची अनुमती घेऊन मी त्यांच्याजवळ गेलो. आपली ओळख देऊन बोलायला लागलो.. त्यांची नजर मात्र अवती-भवतीच्या गर्दीवर भिरभिरत होती. कुणी त्यांच्याकडे पाहिल्यास ते तत्काळ हात उंचावून प्रतिसाद देत होते.. मात्र, कोरियातील अनुभवाबद्दल बोलायला सुरुवात करताच त्यांनी खास स्टाइलमध्ये मान वळवली. दाढीत हरवलेल्या मिश्किल हास्याला डोळ्यांवाटे प्रगट करत ते हुंकारले, ‘आगे क्या हुआ?’ मी मोठ्या उत्साहाने त्या त्यांच्या चाहतीने पर्स पासून घरापर्यंत सर्वत्र राजेश खन्ना कसा साठवून ठेवला आहे, याची माहिती दिली. सगळे बोलणे लक्षपूर्वक ऐकल्यावर केसावरून हात फिरवत ते एकच वाक्य उद्गारले, ‘हम आज भी सुपरस्टार है।’..
भावुकता, भाविकता आणि भव्यता या तिन्ही शब्दांचे परमोच्च आविष्कार अनुभवणाऱ्या राजेश खन्ना या भारताच्या पहिल्या सुपरस्टारला आपण आयुष्याच्या अंतापर्यंत सुपरस्टार आहोत, असेच वाटत होते. नव्हे, तो जगलाही त्याच थाटात. पण सुपरस्टारपदाचे वलय गेल्यावर त्याच्या त्या शाही थाटामधील चमचमाट निघून गेला. त्याचा थाट मग थट्टेचा विषय झाला. परिणामी ‘गॉसिप’च्या इंधनावर चालणा-या बॉलिवुडसाठी मग राजेश खन्ना एक चर्चेचा ‘टॉपिक’ बनला..
गेल्या चार-सहा महिन्यांपासून त्यांच्या आजाराच्या बातम्यांमुळेच ते चर्चेत आले होते.. आता राजेश खन्ना यांच्या जाण्याने मध्यमवर्गाच्या बदलत्या जाणीवा पडद्यावर व्यक्त करणारा काळ संपला आहे.
राजेश खन्ना यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवेश हासुद्धा एखाद्या सिनेमात शोभावा असाच नाटय़पूर्ण ठरला. 1965 मध्ये हिंदी चित्रपटनिर्मात्यांच्या संघटनेने नवोदित कलाकारांच्या शोधासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. ‘फिल्मफेअर’मासिकाचासुद्धा त्यात सहभाग होता. ती स्पर्धा जिंकणा-या कलाकाराला चांगल्या नामवंत दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी मिळणार असल्यामुळे स्पर्धा तगडी होती. राजेश खन्ना ती जिंकला आणि ‘आखरी खत’ या सिनेमापासून त्याचा रंगतदार प्रवास सुरू झाला. त्याच काळात 1965 च्या भारत-पाक युद्धातील यशाने १९६२च्या चीनविरोधातील अपयशाचे नैराश्य पुसून टाकायला सुरुवात केली होती. शहरी मध्यमवर्गाला पाकिस्तानवरील विजयाने मिळालेला आत्मविश्वास नवनव्या उद्योगधंद्यांमधून प्रतिबिंबीत होऊ लागला होता. तिकडे ग्रामीण भारतात ज्येष्ठ कृषितज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी 1963 मध्ये रुजवलेल्या ‘हरितक्रांती’चे पीक जोमाने फोफावू लागले होते. लोकोत्तर पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी इंदिरा गांधी यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला होता. अगदी त्याच काळात राजेश खन्ना नामक गारूड हिंदी सिनेसृष्टीवर पडलेले दिसले.
‘खन्ना युग’ अवतरण्यापूर्वी हिंदी सिनेमावर ‘मॅटिनी आयडॉल’ दिलीपकुमार, ‘शोमन’ राजकपूर आणि ‘चॉकलेट हिरो’ देव आनंद या त्रिमूर्तीचा पगडा होता. दिलीपकुमार हे मध्यमवर्गीय संवेदनशीलतेचे आणि नैराश्यवादाचे प्रतिनिधी बनले होते. त्यांच्या ‘ट्रॅजेडी’वरही लोक प्रेम करत होते. राजकपूर नुकत्याच शहरी वातावरणाचा अनुभव घेणाऱ्या ‘अनपढ, गवार’माणसांच्या भोळेपणाला ‘कॉमेडी’च्या साच्यात बसवताना दिसत होते, तर पूर्णपणे पाश्चात्य वेष आणि केशभूषा करून आलेले देव आनंद साहेबी थाटाने लोकांना भुलवत होते. पन्नासच्या दशकातील दु:खी आणि ‘प्यासा’ गुरुदत्त यांच्या जोडीने सैगल-दिलीपकुमारने सगळ्या चित्रपटसृष्टीला रडवण्याचा चंग बांधला होता. साठच्या दशकात पुन्हा दिलीपकुमार, राजकपूर आणि देव आनंद यांच्या त्रिकुटाने हिंदी चित्रपट रसिकांना वेगवेगळ्या पद्धतीने रिझवण्याचा प्रयत्न चालवला होता, मध्येच लवचिक बांध्याच्या तगडय़ा शम्मी कपूरने ‘याऽहू’ करून आरोळी ठोकून ‘जंगली’पणाचा एक नवाच ट्रेण्ड आणला होता. जॉय मुखर्जीपासून कोवळ्या जितेंद्पर्यंत सगळ्या मंडळींनी शम्मी कपूरची स्टाइल उचलून एक नवा ‘कल्ट’ निर्माण केला होता. आपल्या समोरच्या नटीला छळून पटवणा-या या ‘शम्मी कल्ट’वाल्या नटांची काही काळ नवश्रीमंत वर्गाला भुरळ पडली होती. अगदी मध्यमवर्गीयसुद्धा काही काळ त्या मानेला झटके देत मुलींना थेट भिडणा-या हिरोंच्या प्रेमात पडले होते. अगदी त्याच सुमारास राजेश खन्नाने पडद्यावर एण्ट्री घेतली.
प्रख्यात सिनेपत्रकार देवयानी चौबळ यांचे आणि राजेश खन्ना यांचे मैत्रीपूर्ण संबंध हा बॉलिवुडमधील चर्चेचा विषय होता. गिरगावातील ठाकूरद्वारच्या गल्लीत राहाणा-या जतीनचा राजेश खन्ना कसा झाला, या प्रवासाची देवयानी साक्षीदार होती. बेधडक आणि बिनधास्त लिहिणा-या ‘देवी’ची अवघ्या हिंदी सिनेसृष्टीला दहशत होती. राजेश खन्नाला आपण घडवला, असा तिचा दावा होता. तो खरा किंवा खोटा यात आता पडण्याचे कारण नाही. कारण देवी चौबळ राजेश खन्नाची अनेक गुपिते घेऊन फार आधी मरण पावली. आता आपले ‘सुपरस्टार’सुद्धा कालवश झालेत; पण देवीच्या एका लेखात राजेश खन्नाच्या महत्त्वाकांक्षेचा फार सुंदर उल्लेख आलाय. ती लिहिते, ‘त्याच्या ‘स्ट्रगल’च्या काळामध्ये तो अनेक चित्रपट निर्मात्यांचे उंबरे झिजवायचा, त्याच काळात चित्रपटनिर्मात्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत तो पहिला आला आणि त्याचा रूपेरी पडद्यावरील प्रवास सुरू झाला. त्याकाळात मिळेल त्या वाहनाने त्याचा प्रवास सुरू असायचा. असेच एकदा तो आणि मी व्हिक्टोरियाने गिरगावकडे चाललो होतो. नेहमी आपल्या नवनव्या कल्पना सांगणारा राजेश त्यावेळी गप्प होता. एका ठिकाणी त्याने माझ्या हातावर थोपटले आणि भावुकपणे उद्गारला, ‘देवी, एक ना एक दिन मैं स्टार नही, सुपरस्टार बनूंगा।’
यशाचे आकाश कवेत घेण्याची राजेश खन्नाची आकांक्षा मध्यमवर्गाच्या बदलत्या मनोवृत्तीचे प्रतीक होती. कोणतीही पार्श्वभूमी नसताना सिनेसृष्टीतील सर्वोच्च स्थान हस्तगत करण्याचा आत्मविश्वास जसा राजेश खन्नाला मिळाला, तसाच विविध क्षेत्रात काम करणा-यांना मिळत होता. त्यात भर पडली इंदिरा गांधी यांच्या धडाकेबाज निर्णयाची. 1969 मध्ये राजेश खन्नाचा ‘आराधना’ सुपरहिट होण्याच्या पाच-सहा महिने आधीच इंदिरा गांधी यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करून देशाच्या अर्थकारणाला वेगळी दिशा दिली होती. जुनाट वळणाच्या मोरारजी देसाई यांच्याकडील अर्थखाते त्यामुळे आपसूक बाईंच्या हाती आले आणि मंत्रिमंडळातील त्यांचा एकमेव स्पर्धक पुढील पाचेक वर्षासाठी बाद झाला. इंदिराजींच्या पोलादी मनोवृत्तीला साजेसे निर्णय सुरू झाले. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाने अर्थकारणाला वेग आला. शेतकरी, बलुतेदार यांच्यापर्यंत पोहोचणे सक्तीचे झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत झाली. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांच्या खिशात पैसा खुळखुळू लागण्याच्या काळात राजेश खन्नाच्या सिनेमांची चलती सुरू झाली.
1971 मध्ये तर इंदिराजींच्या आक्रमक हल्ल्यात पाकिस्तानची दोन शकले झाली. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून बाईंनी बांगलादेशाची निर्मिती केली. पाकिस्तानी सैन्याला हात बांधून शरण यावे लागले, याचा अवघ्या देशाला आनंद झाला होता. त्याच काळात राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’ बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाने आणि गुलाबी अदाकारीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणा-या राजेश खन्नाला वाढत्या मध्यमवर्गाने डोक्यावर उचलून धरले. कारण वाढत्या आर्थिक स्थैर्याने मध्यमवर्गीयांच्या आर्थिक संकल्पना बदलत चालल्या होत्या. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सदानंद सुवर्णा यांच्या मते, ‘चित्रपट हे चार प्रकारचे असतात. एक फक्त मनोरंजनासाठी बनवलेला, दुसरा माहितीपट, ज्यातून लोकांना माहिती दिली जाते. उर्वरित जाहिरात, व्यावसायिक चित्रपट आणि लोकांचे जीवनानुभव समृद्ध करणारे कलात्मक सिनेमे. सिनेमा हा खऱ्या अर्थाने ‘एक्स्परिमेंटल’ माध्यम आहे. त्यांचे तुम्ही जेवढे ‘प्रयोग’ करता तेवढा त्याचा अनुभव येत असतो.’
परंतु, पूर्वी जसे सामान्य लोकांचे जगणे लोककलांमधून, लोकगीतांमधून प्रतिबिंबीत होत होते, तद्वत आधुनिक चित्रपटांनी बदलत्या समाजाचे दर्शन घडवण्याची सुरुवात केली होती. त्यात राजेश खन्ना यांना बदलत्या मध्यमवर्गाने आपला प्रतिनिधी मानल्याने भारतीय समाजकारणावर झालेला परिणाम लक्षणीय ठरला. राजेश खन्ना मध्यमवर्गाला आर्थिक स्थैर्याने पडू लागलेल्या गुलाबी स्वप्नात अगदी फिट्ट बसले. त्यामुळे त्यांच्या तोंडी आलेल्या ‘मेरी सपनों की रानी कब आयेगी तू’ हा मध्यमवर्गीय तरुणांच्या मनातील प्रश्न घर, कॉलेज आणि चौकात घुमू लागला.. बदलत्या स्वकेंद्रित आकांक्षा आणि मनोरंजनाच्या नव्या संकल्पना यामुळे भारतीय मध्यमवर्गाला आणीबाणीनंतरच्या लोक-आंदोलनानंतर रस्त्यावर उतरलेले पाहाणे दुर्मीळ बनले.
भारतीय स्वातंत्र्यलढय़ामध्ये आपले ज्ञान-मान आणि धन देशासाठी अर्पण करणारा मध्यमवर्ग हा नेहमीच त्यागासाठी पुढे होता; पण 1975 ते 77चा काळ वगळता हा वर्ग स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकंदर विकासाऐवजी व्यक्तिगत विकासात गुंतलेला दिसू लागला. 80 च्या दशकानंतर तर हुशार भारतीय तरुणांनी इंग्लंड-अमेरिकेतच आपले ‘करियर’ होऊ शकते, असे मानून छेडलेली ‘छोडो भारत’ मोहीम आजही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. दुनियेत काहीही उलथापालथ होवो, आम्ही भले आणि आमचे घर भले, अशी भावना बाळगणा-या मध्यमवर्गाला राजेश खन्नाचे गुलछबूपण भावले.

1969 पासून सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांनी आलेले स्थैर्य आणि 1971च्या बांगलादेश  मुक्तिसंग्रामाने दिलेला जबरदस्त आत्मविश्वास यामुळे एरवी देव, देश आणि धर्माचा विचार करणारा मध्यमवर्ग स्वैर, स्वच्छंदी बनला होता. त्याच सुमारास प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’, ‘दो रास्ते’, ‘खामोशी’, ‘सच्चा झुठा’, ‘कटी पतंग’, ‘आनंद’, ‘आन मिलो सजना’, ‘हाथी मेरे साथी’, ‘दुश्मन’, ‘अमर प्रेम’, ‘बावर्ची’ अशा एकापाठोपाठ ‘हिट’ चित्रपटांना लोक गर्दी करू लागले होते.

खरे पाहाता, ‘नमक हराम’नंतर राजेश खन्ना यांची गाडी उताराला लागली होती; परंतु ती वस्तुस्थिती स्वीकारायला त्यांची मध्यमवर्गीय मनोवृत्ती तयार नव्हती. बदलत्या सामाजिक संदर्भानी उपेक्षित नवशिक्षित तरुणांमध्ये विद्रोहाचा अंगार चेतवला होता. राजेश खन्ना यांच्या लक्षात हा बदल आला नाही. म्हणून अमिताभ बच्चनला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा ‘दीवार’मधील विजय सुस्थापित मध्यमवर्गापेक्षा अस्वस्थ लोकमानसाला भावला. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’मध्ये अमिताभ समोर पुन्हा राजेश खन्ना येणार, असे निश्चित झाले होते. मात्र, ‘आनंद’ आणि ‘नमक हराम’मधील ‘राजेशाही’वर्तनाने कंटाळलेल्या बच्चनने सावधपणे त्यांचा पत्ता कट केला. परिणामी रवीच्या भूमिकेसाठी शशी कपूर आला आणि त्या एका भूमिकेच्या बळावर स्टार होऊन गेला. राजेश खन्नाने बदलत्या काळाची पावले ओळखली असती तर बच्चन-खन्ना असे विलक्षण समीकरण अनेकदा पाहायला, अनुभवायला मिळाले असते; परंतु तसे झाले नाही..
बदलत्या मध्यमवर्गाला काळाच्या प्रवाहाने इतके बदलले की, त्यांना जशी नामदेव ढसाळांची कविता आवडू लागली,दुष्यंतकुमारची गझल आकळू लागली, अगदी त्याचप्रमाणे ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ आवडू लागला. इतका की, त्यांना राजेश खन्ना यांच्या गुलछबूपणाचा कंटाळा आला. पुढे दर पाच-सहा वर्षानी नव-नवे सुपरस्टार जन्माला येऊ लागले. पण, राजेश खन्नाप्रमाणे राज्य करणे कुणालाच जमले नाही. अगदी अमिताभ बच्चनलाही.
सध्याचा मध्यमवर्ग पाहिला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, या मध्यवर्गाचे मानसिक वय चाळीशीच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळेच असेल कदाचित आजचे सगळे सुपरस्टार, मग तो शाहरूख खान, आमिर वा सलमान खान असो; अजय देवगण वा अक्षयकुमार असो, सगळे जण चाळीशीच्या आसपासचे आहेत. त्यांच्या वाढत्या वयाला न शोभणा-या भूमिका ते करताना दिसतात. पण आमच्या मध्यमवर्गाला ते आवडते; कारण पस्तीस - चाळीस वय झाले तरी आपण सुंदर, सुडौल दिसलेच पाहिजे, असा अट्टाहास तमाम स्त्री-पुरुषांच्या जगण्यात दिसतोय. कुठलेही वर्तमानपत्र उघडा, वजन कमी, पोट कमी किंवा चरबी कमी करण्याच्या देशी-विदेशी औषधोपचारांची, क्लिनिक्सची किंवा व्यायामशाळांची जाहिरात डोळ्यासमोर येतेच. गल्लोगल्ली उघडलेल्या ‘जिम’मध्ये हजारो रुपये भरून घाम गाळणे, ही आजची ‘फॅशन’ बनली आहे. तुमचे वजन कमी असणे, हा ‘स्टेटस सिम्बॉल’ बनतोय.

बदलत्या मध्यमवर्गाचे हे प्रतिबिंब सिनेमात पडणे अपरिहार्य ठरते. परवा, सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला‘कॉकटेल’ नामक सिनेमा पाहिला. मजेसाठी फॅशनेबल प्रेयसी आणि लग्नासाठी ‘ट्रॅडिशनल’ बायको हवी, असा मतलबी मध्यमवर्गाच्या सोयीचा संदेश देणारा हा चित्रपट चांगलाच चालतोय.. ज्येष्ठ पत्रकार अनिल ठकरानी यांनी ‘फेसबुक’वर एक मस्त टिप्पणी केलीय. ते म्हणतात, ‘कॉकटेल’बद्दल अनेकांनी केलेली परीक्षणे माझ्या वाचनात आली आहेत. पण माझ्या एका मित्राने पाठवलेला एक ओळीचा लघुसंदेश मला अत्यंत समर्पक वाटतो. तो मित्र लिहितो, ‘‘कॉकटेल, चाळीशीचा एक माणूस आणि त्याच्या दोन मुलींची कथा.’’

सैफ अली खान आणि त्याच्या निम्म्या वयाच्या दोन अभिनेत्रीच्या प्रेमाच्या त्रिकोणाचे हे असे वर्णन खरे असले तरी आमच्या ‘आधुनिक’ विचारसरणीच्या मध्यमवर्गाला ते आता आवडणार नाही. कारण पूर्वी काळानुसार बदलणारा मध्यमवर्ग आता काळाच्या पुढे धावू लागलाय.. यह सिनेमा नही, जिंदगी का नया राज है बाबू मोशाय.. चलो अब तुम भी जिंदगी के आगे दौडना सिखो.. यहाँ थकना मना है।

Categories:

Leave a Reply