‘महाराष्ट्र’ या नावातच महानता दडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रधर्म, छत्रपती शिवाजी महाराजांना थोरले महाराज, शहाजीराजांनी शिकवला तेव्हापासून त्यातील महान तत्त्वांचा म-हाटमोळ्या लोकांना चांगलाच परिचय झाला आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥’ हे महाराष्ट्र गीत लिहिताना म-हाटी मनांचा महाउद्गारच व्यक्त केला होता. त्या गीतामधील भाव आणि आशय आजही स्फूर्तिदायक वाटतो. ते लिहितात, ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे’ तो महाराष्ट्र. ‘धर्म राजकारण एकसमवेत चालती’ तो महाराष्ट्र. आणि शेवटी ते म्हणतात, ‘सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो.. देह पडो सत्कारणी ही असे स्पृहा.. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. ‘ महाराष्ट्र धर्मा’चे असिधाराव्रत घेण्यासाठी ‘नवनिर्माणा’चा ध्यास घेतलेले राज ठाकरे पुढे येत आहेत. ‘महाराष्ट्रधर्मा’ला नव्या युगात नव्याने प्रतिष्ठा मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी नियतीने त्यांच्यासमोर ठेवली आहे. ती ते किती गांभीर्याने घेतात हे येणारा काळच सिद्ध करेल.
एकूणच काय तर आसामात बोडो-मुस्लीम निर्वासितांमध्ये सुरू असलेल्या दंग्याने मुंबई-पुण्यात अस्वस्थता निर्माण केली आहे. एरव्ही ईशान्य भारतात पूर किंवा भूकंपाने हजारो कुटुंबांची वाताहत होण्याच्या बातम्या आल्या तरी ज्या शहरातील सर्वधर्मीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दयेचा पाझर फुटत नाही, त्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवणा-या मुंबापुरीत काही मुस्लीम संघटना पोलिसांच्या साक्षीने हैदोसहुल्ला घालतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिस व माध्यमांच्या पुळक्याने राज ठाकरे रस्त्यावर उतरतात, हा सारा घटनाक्रम अनाकलनीय वाटतो. आपली गोंधळलेली समाजस्थिती दर्शवणा-या या घटनाक्रमामध्ये भविष्यात येऊ घातलेल्या संकटांची पदचिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत; पण लक्षात घेतेय कोण?
मुस्लिमांना स्वतंत्र देश देण्याच्या मुद्यावर भारताची फाळणी झाली. त्यातून पाकिस्तानची निर्मिती होण्याआधी अखंड भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिमांची लोकसंख्या 23 टक्के होती. फाळणीनंतर स्वतंत्र भारतातील मुस्लिमांची संख्या नऊ टक्क्यांवर आली आणि आता ती 12 टक्क्यांवर पोहोचलेली दिसते. त्याउलट पाकिस्तानातील, बांगलादेशातील हिंदू, शीख, ख्रिश्चन या धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटलेले दिसते. बांगलादेशात फाळणीच्या वेळी हिंदूंचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के होते. ते आता 10 टक्क्यांच्या खाली उतरलेले दिसते. फाळणीपासून पाकमधील हुकूमशहा, लष्करशहांनी भारताविरोधात कारवाया करून सातत्याने आपल्या आर्थिक प्रगतीत अडथळे आणण्याचे काम केले आहे. काश्मीर, पंजाब आणि ईशान्य भारतातील दहशतवादी संघटनांना सतत सक्रिय ठेवून पाकने आमच्या सीमा असुरक्षित ठेवल्या. वेगवेगळ्या नावाने काम करणा-या इस्लामी दहशतवादी गटांमार्फत भारतातील महत्त्वाच्या शहरात दहशतवादी हल्ले चढवण्यात पाक गुप्तचर संघटना सहा दशकांपासून कार्यरत असलेली दिसते. एकीकडे पाकने भारताविरोधात ‘प्रॉक्सी वॉर’ (अप्रत्यक्ष युद्ध) पुकारलेले असताना भारताच्या मेहरबानीवर निर्माण झालेल्या बांगलादेशानेही आपले ‘रंग’ दाखवलेले आहेत. गेल्या चार दशकांत बांगला नागरिकांनी भारतीय भूमीत अतिक्रमण करण्याचा सपाटा लावला आहे. बांगलादेशाची भारताला लागून असणारी 2145 किलोमीटरची सीमा अक्षरश: खुली आहे. 1998 मध्ये ‘फ्रंटलाइन’ने या विषयावर खास कव्हर स्टोरी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 500 ते 1000 गोरगरीब बांगलादेशी नागरिक दररोज या ‘मोकळ्या’ सीमेतून भारतात घुसतात आणि भारतीय बनून जातात. भारतात घुसल्यावर निर्वासितांना सर्वप्रथम आसाम, त्रिपुरा, मणिपूरसारख्या लगतच्या राज्यांत ‘जागा’ मिळते. तिथून ते मुंबई, दिल्ली, नागपूरसारख्या शहरांत पसरतात, ही शासकीय आकडेवारी सांगते.
स्थलांतर हा मानवी विकासाचा मूलभूत गुण आहे. आजवर मानवी संस्कृतीने केलेली प्रगती ही स्थलांतराच्या संघर्षशील वृत्तीमुळेच शक्य झाली आहे, हे ऐतिहासिक सत्य मान्य केले तरी बांगलादेशातून होणा-या स्थलांतराचा भारताला बसणारा फटका दुर्लक्षित करता येत नाही. कारण बांगलादेशातून भारताच्या दिशेने होणारे स्थलांतर ‘उपाशी घरात पाहुण्यांची गर्दी’सारखे आहे. अर्थात बांगलादेशातून होणा-या या स्थलांतराच्या कारणांचाही आपण विचार केला पाहिजे. तो विचार ना शासकीय पातळीवर होताना दिसतोय, ना वैचारिक लिखाण करणारे त्याची वस्तुस्थिती मांडताहेत. मग राज ठाकरे वा अबू आझमी यांच्याकडून तशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल, असे मला वाटते.
बांगलादेशाच्या भौगोलिक आणि सामाजिक दुरवस्थेत स्थलांतराची कारणे दडलेली आहेत. स्थलांतराचे सगळ्यात मोठे कारण आहे, लोकसंख्येची घनता. बांगलादेशातील दर चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता 1143 म्हणजे भारताच्या तिपटीहून अधिक व जगात सर्वोच्च आहे. एक लाख 44 हजार चौरस किमी भूभागात तिकडे 16 कोटींच्या आसपास लोक राहतात. भारताच्या 1/25 भूभाग असणा-या त्या देशात भारताच्या 1/7 लोकसंख्या असल्यावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा पडणारच. परिणामी स्थलांतर अपरिहार्य ठरते.
आणखी दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘ग्लोबल वॉर्मिग’. जगातील एकूणच निसर्गसाखळीमध्ये जे प्रचंड बदल झाले आहेत, त्याचा थेट परिणाम बांगलादेशात जाणवू लागलेला आहे. सालाबादप्रमाणे पुरामुळे बेजार होणा-या या देशातील अनेक गावे नजीकच्या काळात कायमची पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोटासाठी, जीव वाचवण्यासाठी भारताच्या मोकळ्या सीमांमधून बांगलादेशी घुसतात. या स्थितीमध्ये बांगलादेशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी तेथील शासनाने प्रयत्न केलेत, असे चित्र दिसत नाही. त्याउलट तेथील लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढतच चाललेली दिसते. बांगलादेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2017 मध्ये त्यांची लोकसंख्या 24 कोटींपर्यंत जाऊ शकते. जो देश 15 कोटी लोकांना आज सांभाळू शकत नाही, त्या देशाकडे आणखी नऊ कोटी लोकांना पोसण्याचे सामर्थ्य नजीकच्या पाच वर्षात येण्यासाठी काहीतरी ‘ईश्वरी चमत्कार’ होण्याची गरज आहे. तसे काही होणार नसल्याने ही जादा लोकसंख्या भारताच्या गळ्यात येऊन पडणार, असा धोका समोर दिसत असताना आमच्या देशातील सरकारनामक यंत्रणा गप्प आणि ठप्प आहे.
सध्या ज्या आसामात स्थानिक बोडो विरुद्ध बांगलादेशी घुसखोर यांच्यात युद्ध भडकलेले आहे, तेथील 23 पैकी 10 जिल्ह्यांमध्ये बांगला घुसखोरांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. रिकाम्या सरकारी जागा आणि जंगलातील आदिवासींच्या ताब्यातील भूक्षेत्रांवर कब्जा करून या घुसखोरांनी सीमेलगतच्या आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय आदी राज्यांत स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. कम्युनिस्टांच्या वर्चस्वाखाली राहिलेल्या आणि आता ममता बॅनर्जी यांच्या हातात आलेल्या पश्चिम बंगालात तर 56 विधानसभा मतदारसंघांत बांगला घुसखोर उमेदवार निवडून आणू शकतात, एवढी त्यांची ताकद आहे. या सगळ्या घुसखोरीमागे बांगलादेशातील अभिजन, बुद्धिमतांचे सैद्धांतिक अधिष्ठानही आहे. बांगलादेशालगतच्या ईशान्य भारतातील सर्व राज्यांत घुसण्याचा, राहण्याचा बंगाली लोकांना नैसर्गिक हक्क मिळाला पाहिजे, असे हे विचारवंत सातत्याने लिहीत असतात. बोलत असतात. त्याला स्थानिक माध्यमांमधून प्रसिद्धी मिळते. त्यामुळे स्थलांतराच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळते. बरं, हा प्रकार तेथेच संपत नाही. त्यामधून आता ईशान्य भारतातील सहा राज्यांच्या ‘मुस्लीम बंगभूमी’ राष्ट्राची मागणी जोर धरू लागली आहे. हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे.
थोडक्यात सांगायचे तर बांगलादेशी घुसखोर भारताची दुसरी फाळणी करण्यासाठी टपलेले आहेत. त्यांना वेळीच टिपून ठेचले पाहिजे; परंतु त्याआधी आम्ही सर्वानी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. बांगलादेशी वा पाकिस्तानी घुसखोर जेव्हा भारतात येतो, त्यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांपासून रेशनकार्ड, मतदारयादीत नाव नोंदवणा-या सरकारी कर्मचा-यांपर्यंत सर्वाना चिरिमिरी देऊनच भारतात स्थिरावतो. भ्रष्टाचाराच्या या देशविरोधी कृत्याबद्दल या सरकारी नोकरांना ना खंत ना खेद. अगदी लोकांच्या रक्षणार्थ नेमलेले पोलिस दलही याला अपवाद नाही. लोकांनी निवडून दिलेले ‘व्होट बँक’ जपणारे राज्यकर्तेही याहून वेगळे नाहीत. मग या देशाच्या सुरक्षेला, एकूण व्यवस्थेला काय अर्थ उरतो?
सुज्ञ नागरिक म्हणून आपण सा-यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ‘रणरागिणी’ इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे करून आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. जगातल्या लष्करी इतिहासात तोड नाही, असा अद्वितीय पराक्रम आमच्या लष्कराने केला होता. आमच्या ताकदीने निर्माण झालेल्या बांगलादेशीयांना पुढील अनेक वर्षे भारताने पोसले; परंतु भिकारी मनोवृत्ती असलेल्या बंगाल्यांनी आपली बांडगुळी वृत्ती स्वतंत्र देश मिळाल्यावरही सोडली नाही. गेल्या चार दशकांत बांगलादेशीय घुसखोरांनी भारतीय भूमीवर अतिक्रमण सुरूच ठेवलेले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हा मुद्दा ठासून मांडला असता तर त्यांच्या मोर्चाच्या खटाटोपाला तात्त्विक अधिष्ठान लाभले असते. त्यांच्या त्रोटक भाषणामुळे तो सारा उपक्रम शक्तिप्रदर्शनाचा प्रयोग ठरला. सध्या आसाम दंग्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी घुसखोरांचा ज्वलंत प्रश्न देशपातळीवर गाजवण्याची संधी राज ठाकरे यांनी हुकवली, याबद्दल मनापासून वाईट वाटणे साहजिक आहे. कारण आज ज्या पद्धतीने आपली लोकसंख्या वाढत आहे आणि नैसर्गिक साधने घटत आहेत, ते पाहता भारताच्या सर्व सीमा सील करण्यासाठी मोठी मोहीम उघडण्याची आवश्यकता निर्माण झालेली दिसते. ते करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल, तर लोकांमध्ये त्यासंदर्भात जागृती करणे हे राजकीय नेते, पत्रकार आणि सामाजिक संघटना यांचे आद्य कर्तव्य आहे.
खरे सांगायचे तर आपला देश वाचवणे हा प्रत्येक भारतीयाचा धर्म आहे. राज ठाकरे यांनी मोठ्या तो-यात सांगितले की, मला फक्त एकच धर्म समजतो, तो म्हणजे ‘महाराष्ट्रधर्म’. हा महाराष्ट्रधर्म बाराव्या शतकापासून महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी पुढे आणला. ते स्वत: गुजराती होते. त्यांनीच मराठीला धर्मभाषा करून अटकेपार पोहोचवले. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर, नामदेवांनी आध्यात्मिक लोकशाही स्थापन करून त्या महाराष्ट्रधर्मासाठी भूमी तयार केली. संत तुकारामांच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणातून आणि संत रामदासांच्या व्यावहारिक चातुर्यातून महाराष्ट्रधर्माला विचारांची बैठक मिळाली. तोवर शहाजीराजांच्या शौर्याचा आणि तेजाचा वारसा लाभलेल्या शिवाजी महाराजांनी मावळभूमीत स्वराज्य स्थापण्याची तयारी सुरू केली होती. छत्रपती झाल्यानंतर महाराजांच्या प्रत्येक मोहिमेची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊ लागली. त्यावेळी रामदास स्वामींनी छत्रपतींच्या महापराक्रमाचे गुणगान गाताना लिहिले होते, ‘‘तुम्ही झाला म्हणून महाराष्ट्रधर्म काहीतरी राहिला.’’ पुढे ते महाराजांना मोठ्या प्रेमाने विनवतात, ‘‘आपण धर्मस्थापनेची कीर्ती उत्तरोत्तर अशीच सांभाळली पाहिजे.’’ ही कीर्ती/प्रसिद्धी कायम राहण्यासाठी काय केले पाहिजे, याबद्दल ते सुचवतात, ‘‘अमर्याद फितवेखोर लोकांचा नाश करावा, न्यायाच्या सीमांचे भान ठेवावे, तुरुंग बांधावे, सशस्त्र स्वार जमवावे.’’ त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ‘‘मराठा तितुका मेळवावा; जगात सगळीकडे महाराष्ट्रधर्म वाढवावा.’’
रामदास स्वामींनी आपल्या काव्यात छत्रपतींना ‘महाराष्ट्र राज्य करावे। जिकडे तिकडे॥’ अशी विनंती केली आहे. कारण छत्रपतींनी महाराष्ट्रात निर्माण केलेली सुरक्षा, सुव्यवस्था आणि त्यातून आलेली सुबत्ता रामदासांनी पाहिली आणि अनुभवलेली होती. छत्रपतींचे स्वराज्य संकुचित नव्हते. ते सर्वधर्म व भाषांच्या पलीकडे जाणारे होते. आचार्य विनोबा भावे यांनी 1923 साली ‘महाराष्ट्रधर्म’ या नावाने एक मासिक सुरू केले होते. त्या मासिकाच्या पहिल्याच अंकात त्यांनी मासिकाचे नाव ‘महाराष्ट्रधर्म’ असे का ठेवले याचे विवेचन केले होते. ते म्हणतात, ‘‘महाराष्ट्र म्हणजे रूढ अर्थाने एक प्रांत, पण त्याच शब्दाने ‘महाराष्ट्र’ म्हणून सबंध हिंदुस्थानचा बोध होऊ शकेल. आणि ‘राष्ट्रसंघ’ अशा अर्थाने ‘विश्वभारती’ असा अर्थही निघू शकेल. आमच्या प्रांताचा विशिष्ट महाराष्ट्रधर्म, देशाचा समान महाराष्ट्रधर्म आणि जगाचा सार्वभौम महाराष्ट्रधर्म अशा तिहेरी अर्थाने हा शब्द योजिला आहे.’’ विनोबा इथेच थांबत नाहीत. ते म्हणतात, ‘स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या विषयीच्या शिवाजी महाराजांच्या कल्पना उदार होत्या. महाराष्ट्रधर्म हा प्रथमदर्शनी जरी वामनासारखा दिसला, तरी वस्तुत: तो दोन्ही पावलांत विराट विश्व व्यापणा-या त्रिविक्रमासारखा होता. त्याचे एक पाऊल महाराष्ट्रीय, दुसरे राष्ट्रीय आणि तिसरे अतिराष्ट्रीय आहे.’
राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्रधर्म’ महाराष्ट्राच्या चतु:सीमेत बंद केला आहे. त्यांना खरोखर ‘महाराष्ट्रधर्म’ वाढवायचा असेल तर संकल्पनेचा मूळ अर्थ समजून घेतला पाहिजे..
Categories:
आवर्तन