Mahesh Mhatre

‘युवा’ हा शब्द उलट लिहिला की ‘वायू’ हा शब्द तयार होतो. विशेष म्हणजे, दोन्ही शब्दांमधून सारखाच अर्थ ध्वनित होतो. शक्ती, सामर्थ्य, चपळाई आणि नवनवोन्मेषशालि प्रतिभा म्हणजे तरुणाई. हे लखलखते तारुण्य आज अवघ्या भारतवर्षाला लाभले आहे. भारताचे आजचे सरासरी वय 25 आहे. पुढील 10 वर्षात या तरुणाईतून 40 कोटी बुद्धिमान तरुणांची फौज जगभरातील महत्त्वाच्या पदांवर आरूढ झालेली दिसेल, असे भाकीत ‘द इकॉनॉमिस्ट’ या अत्यंत प्रतिष्ठित साप्ताहिकाने व्यक्त केले आहे. अवघ्या जगाला भारताच्या या सुप्तशक्तीची जाणीव झाली आहे. अशा वेळी भारताचे नेतृत्व एका सुजाण, संयमी आणि सुसंस्कृत तरुणाकडे गेले पाहिजे. त्या तरुणाकडे सगळे जग ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून पाहत असेल; परंतु सद्य:स्थितीतील भारताचे राजकारण पाहता, हा गांधी घराण्याचा वारसदार पंतप्रधानपदाचा सगळ्यात योग्य उमेदवार आहे...
‘युवा’ हा शब्द उलट लिहिला की ‘वायू’ हा शब्द तयार होतो. विशेष म्हणजे, दोन्ही शब्दांमधून सारखाच अर्थ ध्वनित होतो. शक्ती,सामर्थ्य, चपळाई आणि नवनवोन्मेषशालि प्रतिभा म्हणजे तरुणाई. हे लखलखते तारुण्य आज अवघ्या भारतवर्षाला लाभले आहे.भारताचे आजचे सरासरी वय 25 आहे. पुढील 10 वर्षात या तरुणाईतून 40 कोटी बुद्धिमान तरुणांची फौज जगभरातील महत्त्वाच्या पदांवर आरूढ झालेली दिसेल, असे भाकीत ‘द इकॉनॉमिस्ट’ या अत्यंत प्रतिष्ठित साप्ताहिकाने व्यक्त केले आहे. अवघ्या जगाला भारताच्या या सुप्तशक्तीची जाणीव झाली आहे. अशा वेळी भारताचे नेतृत्व एका सुजाण, संयमी आणि सुसंस्कृत तरुणाकडे गेले पाहिजे. त्या तरुणाकडे सगळे जग ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून पाहत असेल; परंतु सद्य:स्थितीतील भारताचे राजकारण पाहता, हा गांधी घराण्याचा वारसदार पंतप्रधानपदाचा सगळ्यात योग्य उमेदवार आहे. राहुल गांधी यांच्या राजकारणाला पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू, आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या त्याग-बलिदानाची परंपरा आहे. तरीही शक्य असताना थेट सत्तापद न घेता राहुल यांनी देश आणि देशवासियांना समजून घेण्यासाठी तब्बल आठ-नऊ वर्षे पणाला लावली. गांधी-नेहरूंनी ज्याप्रमाणे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’साठी अनेक वर्षे खर्ची घातली, त्याप्रमाणे गोरगरिबांचा भारत समजून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी प्राथमिक मेहनत घेतली. त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणा-यांनी ही बाब समजून घेतली पाहिजे.. येणारा भविष्यकाळ हा राहुल गांधी आणि उसळत्या तरुणाईचा आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पक्षाचे भारतीय जनतेशी एक वेगळे नाते आहे. त्या नात्यामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही निवडणुकांचा अपवाद वगळता भारतीयांनी सातत्याने काँग्रेसला सत्तासूत्रे बहाल केली. भारताच्या ग्रामीण भागात आजही काँग्रेस पक्ष गांधी-नेहरूंचा पक्ष, या भावनेने पाहिले जाते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूला 18 वर्षे झाली आहेत, तरीही दुर्गम, आदिवासी भागात इंदिरा गांधी आणि हाताचा पंजा यांच्यामधील अद्वैत कायम आहे.

याला कुणी व्यक्तिपूजेचे स्तोम म्हणेल किंवा मागासलेपण समजून नाके मुरडू शकेल; परंतु त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही.काँग्रेसचे राष्ट्रीय राजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व कमी होत नाही. चार महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुखपत्रे‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायझर’ या दोन्ही प्रकाशनातील अग्रलेखात 2014 मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा सत्तेवर येणे अशक्य आहे, असे स्पष्टपणे लिहिले होते. विशेष म्हणजे, या अग्रलेखामागील कारणमीमांसा करताना या संघीय मुखपत्रांनी एकमुखाने मान्य केले होते की, ‘भाजपात कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची संख्या जास्त झाली आहे.’ रा. स्व. संघाच्या या मताला जणू पुष्टी देण्यासाठीच गेल्या महिन्याभरात भाजपाच्या नेतृत्वाच्या मुद्यावरून प्रचंड वादळ उठलेले पाहायला मिळाले.त्यात कधी लालकृष्ण अडवाणी यांची ‘रागवाणी’ ऐकायला मिळाली तर कधी संजय जोशी विरुद्ध नरेंद्र मोदी या सामन्याची ‘पोस्टर्स’रंगलेली पाहायला मिळाली. हल्ली भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनासुद्धा पंतप्रधान होण्याची स्वप्न्न पडत आहेत. त्यासाठी त्यांनी नागपूरचा मतदारसंघ ‘राखीव’ करून घेतला आहे. तिकडे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज २०१४ साल कधी उजाडते आणि भाजपाचे भावी पंतप्रधान म्हणून आपले नाव केव्हा घोषित होते, याकडे डोळे आणि कान लावून बसले आहेत. त्यामुळे हल्ली त्यांना देशातील प्रश्न - समस्या दिसतच नाहीत, असे दिल्लीतील राजकीय वर्तुळात बोलले जाते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रणव मुखजी यांच्याकडे राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सोपवल्यामुळे युवा नेते राहुल गांधी यांची पंतप्रधानपदाची वाट सुकर झाली आहे.. गेल्या गुरुवारी, जेव्हा देशभरातील लोकप्रतिनिधी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी मतदान करत होते, त्याच वेळी राहुल गांधी यांनी आपण सक्रिय राजकारणात उतरणार, असे सूतोवाच केले. हा काही निव्वळ योगायोग नव्हता.

राष्ट्रीय काँग्रेसच्या एकंदर वाटचालीत तब्बल पाच दशके योगदान देणा-या प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा यथोचित सन्मान केल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी राहुल गांधी यांच्या आगमनाचे सूतोवाच केले होते. गेली आठ-नऊ वर्षे सत्ताचक्राच्या अवती-भवती फिरणा-या राहुल गांधी यांनी या सत्ताचक्राची गती समजून घेण्याचा प्रयत्न केला असावा; परंतु त्या प्रत्यक्ष चक्राचा जेव्हा तुम्ही भाग होता, त्यावेळी कुणाबरोबर आणि कसे ‘फिरावे’ लागते याचा त्यांना अनुभव नाही. तसेच सत्ताचक्र योग्य पद्धतीने फिरत राहावे यासाठी काय करावे लागते, याचीही त्यांना फारशी माहिती असेल असे वाटत नाही; परंतु सत्ताचक्र हे कोणत्याही अन्य चक्रासारखेच असते.

पूर्वी गावखेडय़ात यासंदर्भात ‘जात्यावर बसली की ओवी सुचते,’ अशी म्हण प्रचलित होती. ती म्हण पाहिल्यावर सत्ताचक्र हाती घेणा-या नवख्या माणसालाही राजकारणात अचानक ‘गती’ येऊ लागते, हे एकदा नव्हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेली आठ-नऊ वर्षे राजकीय उमेदवारी करणाऱ्या राहुल गांधी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी दर्शवणे तरुण भारताच्या तरुण मतदारांसाठी आनंददायी ठरले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतातील तरुणाईच्या एकंदर उत्साहाची वारंवार चर्चा होत आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या आज पंचविशीच्या आतील आहे. 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या पस्तिशीच्या आत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाची सूत्रे तरुणाईच्या हाती जावीत, असा मतप्रवाह असणे साहजिकच आहे. तरुणाईची ही इच्छा आज पूर्ण करेल, असा एकच पक्ष राष्ट्रीय पातळीवर आहे, तो म्हणजे काँग्रेस पक्ष. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत या पक्षाने सर्वाधिक मते मिळवली होती. लोकसभेच्या सर्वाधिक जागाही काँग्रेसलाच मिळाल्या होत्या. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत दुभंगलेल्या भाजपाला, थकलेल्या कम्युनिस्टांना शह देण्याचे सामर्थ्य फक्त काँग्रेसमध्येच आहे आणि देशाला युवा नेतृत्व देण्याची क्षमताही काँग्रेसमध्ये आहे.

राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने ग्रामीण भारताचे दौरे केले आहेत, त्याच्या एकशतांश दौरेही भाजपाच्या एकाही नेत्याने केल्याचे ऐकिवात नाही. महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आत्महत्या असोत वा दुष्काळग्रस्तांच्या व्यथा राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेऊन प्रश्न समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आजी इंदिराजी आणि वडील राजीव गांधी या दोघांना दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आल्यामुळे राहुल गांधी यांना अगदी लहान वयापासूनच सुरक्षाकवचाची सवय झाली आहे.देश-विदेशात शिक्षण घेताना, सार्वजनिक क्षेत्रात वावरताना सुरक्षाकवच तुम्हाला समाजापासून वेगळे पाडत असते. असे असताना या युवा नेत्याची लोकसंपर्काची नाळ कधीच तुटली नाही, हे विशेष. फार क्वचित माध्यमांसमोर येणाऱ्या, खरे तर पत्रकारांना टाळणा-या राहुल गांधींनी गेल्या आठ वर्षात सत्तेच्या वर्तुळात वावरूनही ‘सत्तासंसर्ग’ होऊ दिला नाही. टीका करणा-यांनी खालची पायरी गाठली तरी स्वत:चा तोल जाऊ दिला नाही, याला राजकीय परिपक्वता म्हणता येईल. किंबहुना नेहरू घराण्याची ती पिढीजात परंपरा राहुलना लाभली आहे, असेही मानता येईल.

‘द इकॉनॉमिस्ट’च्या ताज्या अंकामध्ये जगातील महत्त्वाचे देश, तेथील लोकसंख्येचे सरासरी वय आणि लोकनेत्यांचे सरासरी वय याचे विश्लेषण करणारा एक उत्तम लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतातील तरुणाईचा आणि वृद्ध नेतृत्वाचा त्यात खास उल्लेख आहे.भारतातील लोकसंख्येचे सरासरी वय 25 असले तरी सरकार चालवणा-या लोकप्रतिनिधींचे वय 65 आहे, म्हणजे सर्वसाधारण जनता आणि राज्यकर्ते यांच्या वयात 40 वर्षाचे अंतर आहे. चीनमधील लोकसंख्येचे सरासरी वय 35 असल्यामुळे साहजिकच तेथे हे वयाचे अंतर कमी आहे; परंतु प्रगत देशांपैकी अमेरिका, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीत राज्यकर्ते आणि आम जनतेच्या सरासरी वयात फक्त आठ वर्षाचा फरक दिसतो. ‘ब्रिक’ देशांपैकी एक असलेल्या रशियात तरुण लोकप्रतिनिधींची संख्या सर्वाधिक आहे. तेथील लोकांचे सरासरी वय 38 असले तरी सत्ताधारी वर्गाचे सरासरी वय केवळ 47 असल्याचे ‘द इकॉनॉमिस्ट’चे म्हणणे आहे.

हे सारे येथे सांगण्यामागील मुख्य कारण आहे, ते म्हणजे या संपूर्ण अभ्यासपूर्ण लेखाचा निष्कर्ष. या लेखाचे एकूण सार असे आहे की, जगातील सगळ्यात श्रीमंत आणि बलवान देश मानल्या गेलेल्या अमेरिकेत तरुण लोकसंख्या आणि वृद्ध लोकप्रतिनिधी असे अपवादात्मक प्रमाण वगळता, सर्वच प्रगत देशात राजकीय नेतृत्व दिवसेंदिवस तरुण होताना दिसते. तर भारतासारख्या प्रगतीशील देशामध्येच लोकसंख्या तरुण असली तरी सत्तेची सूत्रे वरिष्ठ नागरिकांच्या हातात आहेत. त्यामुळे एकूणच विकसनशील देशांच्या विश्वात पांढ-या केसांच्या नेत्यांना स्वीकारायचे प्रमाण वाढताना दिसते, अशी टिपणी ‘द इकॉनॉमिस्ट’ने केली आहे; कारण या सगळ्याचा विकासाच्या राजकारणाशी संबंध आहे.

राजीव गांधी यांच्या निमित्ताने असे युवा नेतृत्व भारताला 21 वर्षापूर्वी मिळाले होते. राहुल यांच्याप्रमाणेच राजीवजींचे बहुतांश वास्तव्य शिक्षणाच्या निमित्ताने देशाबाहेरच झाले होते, तरीही इंदिराजींच्या निर्घृण हत्येनंतर त्यांनी ज्या पद्धतीने देशाचा विकास सुरू केला, तो ख-या अर्थाने एकविसाव्या शतकाचा वेध घेणारा होता. माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांती करताना राजीवजींनी सर्वसामान्य जनतेचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते. ‘मला ग्रामीण भारताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे,’ हा एकच ध्यास भाषणांमधून मुलाखतींमधून ते व्यक्त करत असत. त्यामुळे राजीवजींच्या काळात प्रथमच भारताकडे उगवती अर्थसत्ता म्हणून जग पाहू लागले होते. त्यांच्याआधी इंदिराजींनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला दिलेल्या बळकटीमुळे देशाला जागतिक नकाशावर मानाचे स्थान लाभले होते. दुर्दैवाने 1991 मध्ये ‘तामिळी वाघां’च्या दहशतवादी हल्ल्यात भारताचा हा तरुण नेता मृत्युमुखी पडला. त्यांना अधिक आयुष्य लाभले असते, तर आज भारत विकसित देशांच्या पंक्तीत बसला असता.

राहुल गांधी यांना आपल्या पित्याचे स्वप्न पूर्ण करण्याची इतिहासदत्त संधी 2014 च्या निवडणुकीत मिळेल; कारण त्यावेळी पंतप्रधान डॉ. सिंग यांचे वय 81 असेल. मनमोहन सिंग वगळता फक्त प्रणव मुखर्जी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते.तेही आता राष्ट्रपती झाल्याने राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षातून विरोध होण्याचे काही कारण दिसत नाही. विरोधकांमधील सुंदोपसुंदीमुळे काँग्रेसला निवडणुकीत यश मिळवणेही कठीण दिसत नाही. परंतु त्यासाठी गेल्या दशकात काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने देशाच्या र्सवकष विकासासाठी केलेले प्रयत्नही लोकांसमोर गेले पाहिजेत. आज मनमोहनसिंग सरकारच्या कारभाराची चर्चा करताना सगळ्यात आधी मुद्दा येतो भ्रष्टाचाराचा, परंतु याच भ्रष्टाचाराला उघडे पाडण्यासाठी मनमोहनसिंग सरकारने माहितीच्या अधिकाराचा कायदा मंजूर केला होता. एकंदर कारभारात पारदर्शीपणा असावा, या हेतूनेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता,याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. आज समाजसेवक अण्णा हजारे, बाबा रामदेव भ्रष्टाचारमुक्त समाजजीवनाची मागणी करताना दिसताहेत. त्यांच्या मागण्या स्वागतार्ह आहेत. भलेही त्या व्यवहार्य नसतील; पण त्यामागील हेतू प्रामाणिक असल्याने आधी आम जनतेचा त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर दर आंदोलनागणिक हा भर ओसरत गेलेला दिसला. कारण अण्णा-बाबा आणि त्यांच्या अवतीभवतीच्या लोकांच्या हेतुबद्दल लोकांना शंका येऊ लागली.

काँग्रेसने केलेल्या कामांना जर चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत नेले असते तर हा लोकक्षोभाचा भडका उडालाच नसता. फक्त‘आरटीआय’चा कायदाच नव्हे तर काँग्रेसने देशातील शेतक-यांची 70 कोटी रुपयांची कर्जे माफ केली. जागतिक दडपण न जुमानता‘मनरेगा’सारखी कोटय़वधी लोकांना जगायचे बळ देणारी योजना अमलात आणली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि अन्नसुरक्षा विधेयक याद्वारे प्राथमिक सुविधांना अग्रक्रम दिला. पायाभूत सुविधांसाठी खास प्रयत्न केले. मुख्य म्हणजे जगात आर्थिक मंदीचे चढ-उतार सुरू असताना मनमोहन सिंग सरकारने देशाचे सुकाणू अत्यंत कुशलतेने सांभाळले. हे सगळे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट दिसत असताना सबंध काँग्रेस पक्ष दोन-पाच भ्रष्ट मंत्र्यांमुळे झाकोळला जावा, हे दुर्दैवी आहे. म्हणून आता शंभरी पार केलेल्या पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी तरुण नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे.

तरुण नेतृत्व आल्यानंतर पक्षाची सर्व थरात वाढ होते. हे काँग्रेसने यापूर्वी दोन वेळा अनुभवले आहे. सर्वप्रथम आणीबाणीच्या काळात आपल्या बेधडक वर्तनाने बदनाम झालेल्या संजय गांधी यांनी तरुणाईला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल 100 तरुणांना रिंगणात उतरवले होते. युवक काँग्रेसच्या या शिलेदारांचा ‘जनता लाटे’ने धुव्वा उडवला होता. परंतु त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये आणि एकंदर राजकारणात त्या युवा वर्गाचे अस्तित्व ठळकपणे जाणवू लागले.त्यानंतर राजीव गांधी यांनी तरुणाईला प्राधान्य दिले. प्रशासनापासून लोकप्रतिनिधींच्या निवडीपर्यंत सगळ्या ठिकाणी त्यांनी तरुण रक्ताला वाव दिला.

आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री त्यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. राहुल गांधी यांनी गेल्या आठ वर्षात युवक काँग्रेसला नवी दिशा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मुख्य म्हणजे निवडणुकीद्वारे नेतृत्व निर्णय घेण्याची जी पद्धत त्यांनी सुरू केली, त्याचा अन्य पक्षांनाही कित्ता गिरवावा लागणार आहे. त्यांच्या ‘जवळच्या’ वर्तुळात सर्व थरांतील बुद्धिवंतांचा भरणा दिसतो.केवळ राजकीय घराण्यातील तरुण नेत्यांपुरते आपले सर्कल मर्यादित राहणार नाही, याची राहुल नेहमीच दक्षता घेतात. मित्रमंडळीत‘आर.जी’, या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल गांधी यांच्या या गोतावळ्यात प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.

उत्तर प्रदेशातील ताज्या निवडणुकीत राहुल गांधी यांचे नेतृत्व पणाला लागले होते. त्या निवडणुकीत ‘टीम राहुल’ प्रथमच सक्रियपणे लोकांसमोर आली होती; परंतु देशातील सर्वात मोठय़ा उत्तर प्रदेशने ‘टीम राहुल’ला पराभवाचा धक्का दिला. त्या पहिल्याच धडय़ातून राहुल गांधी यांना देशातील जातीय राजकारणाच्या गणिताची कल्पना आली असावी. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील युवा वर्गाचा प्रतिभाशाली जोश आणि जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचे अनुभव, याचे परिणामकारक रसायन तयार होऊ शकते. नव्हे ते तसेच घडायला हवे, तरच 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल. येत्या निवडणुकीत काँग्रेसपुढे सगळ्यात मोठा मुद्दा असेल चांगल्या प्रतिमेचा. भ्रष्टाचाराच्या आरोपाने काळवंडून निघालेल्या काँग्रेस नेतृत्वाला राहुल यांच्या को-या करकरीत नेतृत्वाचा निश्चितच फायदा होईल. त्यांच्या युवा नेतृत्वाचा जोष अवघ्या पक्षसंघटनेत ऊर्जा निर्माण करू शकेल. त्या जोरावर काँग्रेस गमावलेली पत आणि हरवलेला विश्वास पुन्हा प्राप्त करेल.. भारताच्या एकंदर विकासासाठी राहुल गांधी यांचे सक्रिय होणे अपरिहार्य बनले होते.. तो निर्णय त्यांनी घेतला असल्याने प्रतीक्षेचा काळ संपला आहे.. आगामी ‘राहुलपर्वा’ची चाहूल लागू लागली आहे.

गांधी विरुद्ध मोदी!

सध्या फेसबुक, ट्विटर आदी सोशल नेटवर्किंग साईट्सवर राहुल गांधी यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने टीका करणारे गट सक्रिय झालेले दिसतात. अगदी उघडपणे आम्ही राहुल गांधी यांचा द्वेष करतो, असे सांगणारे हे लोक नथुराम गोडसेचा वारसा सांगणारे आहेत. तसे पाहायला गेल्यास याच रा. स्व. संघाच्या मंडळींनी गेल्या वर्षीपासून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार ठरवण्याचा आटापिटा सुरू केला आहे. मोदी यांच्या गुजरातमधील कार्यकर्तृत्वाचा त्यांनी उदो उदो करणे,याबद्दल कुणाला आक्षेप असल्याचे कारण नाही; परंतु त्या जोडीला या संघीय प्रचारकांनी राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचा चंग बांधला आहे, त्याबद्दल चिंता वाटते. कुजबूज मोहिम (व्हिस्परिंग कॅम्पेन) सुरू करून एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यभंजन करण्यात संघाचा कुणीच हात पकडू शकत नाही. महात्मा गांधींपासून थेट सोनिया गांधी यांच्यापर्यंत त्यांनी हीच कारस्थाने केली आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधातील ही इंटरनेटवरील शेरेबाजी यापुढील काळात अधिक तीव्र होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. मुळात मोदी, ज्यांचे हात 2002 च्या गुजरात दंगलीत रक्तरंजित झाले आहेत, त्यांना भारतातील सुजाण जनता देशाचे नेतृत्व बहाल करणे दूर, त्यांच्याच पक्षातील सहकारी नेता मानायला तयार नाहीत. राहुल गांधी यांच्या शर्यतीतही त्यांना उभे राहायला मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. संघाच्या लोकांनी ती नाकारली तरी तिच्यातील सत्यता कधीच कमी होणार नाही.

मोदी हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्या हिंदुत्वात मुस्लिम पद्धतीची टोपी घातलेलीही चालत नाही. उलट तिकडे राहुल गांधी समाजाच्या सर्व थरांतील लोकांमध्ये जाऊन मिसळण्याचा प्रयत्न करताहेत.. देशाला असा माणुसकी असलेला पंतप्रधान हवा.रावणसुद्धा उत्तम प्रशासक आणि राजा होता. त्याने आपल्या लंकेतील नागरिकांना सोन्याची घरे दिली होती. हे जितके खरे आहे,तेवढेच तो इतरांवर अत्याचार करणारा, लोकांच्या बायका पळवणारा राक्षस होता, हेही खरे आहे. मोदींच्या विकासाची स्तुती करणाऱ्यांनी त्याच्या राक्षसी वर्तनाची जरा माहिती घ्यावी. त्यासाठी संघाचेच संजय जोशी किंवा हरेन पंड्या यांचे नातेवाईक काय म्हणतात ते पाहा.. मगच मोदींची गांधींशी तुलना करा..!

बदलता समाज, बदलते नेतृत्व

समाज काळानुरूप बदलत असतो. तद्वत नेतृत्वही बदलत जाते. कधी समाजाच्या मुशीतून नेतृत्वाला आकार मिळतो तर कधी दूरदृष्टी असलेल्या कर्तबगार नेत्याच्या कर्तृत्वाने समाजाची जडणघडण होताना दिसते. आजच्या घडीला तरुणाई ज्या पद्धतीने बदलत आहे ते पाहता, एकंदर समाजाचा विचार करणारी तरुणांची फौज देश घडवण्यासाठी उभी राहणो आवश्यक आहे. सुमारे शंभर वर्षापूर्वी सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीच्या र्सवकष विकासासाठी तरुण पिढीला आवाहन केले होते. त्यांच्या हाकेला ‘ओ’देऊन शेकडो उच्चशिक्षित तरुणांनी लौकिक सुखाकडे पाठ फिरवली. साधुत्व स्वीकारून, देश हाच देव आहे, दरिद्रीनारायणाची सेवा हिच खरी इश्वरसेवा आहे, असे मानून देशाच्या कानाकोप-यात सेवाकेंद्रे उघडली. त्याच काळात महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या पूज्य ठक्कर बाप्पा, ताराबाई मोडक, अनुताई वाघ आदी निष्ठावंत समाजसेवकांनी आदिवासींच्या उद्धाराचे काम हाती घेतले. अगदी आरंभापासून महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचा देशातील सामाजिक बदलांवर खूप चांगला परिणाम होत होता.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी प्रस्थापित अभिजनवर्गाचा विरोध पत्करून सुरू केलेल्या सामाजिक कामामुळे महाराष्ट्राला विचारी बनवले. ‘सुधारक’कर्ते आगरकर यांनी महाराष्ट्रातला विवेकाचे अधिष्ठान दिले. शाहू महाराजांनी लोककल्याणाचा आदर्श प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणातून संघटन आणि संघर्षाचा नवा ‘पॅटर्न’ यशस्वी करून दाखवला.या लोकोत्तर समाजसुधारकांनी अज्ञान-अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुंतलेल्या गोरगरिबांना मुक्तीचा मार्ग दाखवला. आजही भारताला अशा समाजसुधारकांची गरज आहे; कारण अंधश्रद्धेने गाव-खेडय़ातील लोकांपासून नवश्रीमंत मडळींपर्यंत सगळय़ांनाच ग्रासले आहे. बुवा,बाबा आणि माताजींच्या भंपक विचारांनी टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून थेट घरातच शिरकाव केला आहे. त्यामुळे तरुणाई सिद्धीविनायकाच्या रांगांमध्ये आणि शिर्डीच्या पदयात्रांमध्ये रमलेली दिसते किंवा व्यसनांच्या विळख्यात अडकलेली दिसते. या युवाशक्तीला बेरोजगारीच्या जाचाने गुन्हेगारीच्या आश्रयार्थ जावे लागते तर फसव्या तत्त्वज्ञांनाच्या भुलथापा त्यांना नक्षलवाद किंवा दहशतवादाच्या मार्गावर कसे नेतात, हेही पाहायला मिळते. हे सारे थांबवण्यासाठी देशात बुद्धिवादी आणि विवेकी विचारसरणी विकसित झाली पाहिजे. ते काम फक्त सर्वधर्मसमभाव मानणा-या काँग्रेसच्याच माध्यमातून होऊ शकते. मुख्य म्हणजे त्याची धुरा घेण्यास राहुल गांधी हेच समर्थ आहेत.‘युवा’ हा शब्द उलट लिहिला की ‘वायू’ हा शब्द तयार होतो. विशेष म्हणजे, दोन्ही शब्दांमधून सारखाच अर्थ ध्वनित होतो. शक्ती, सामर्थ्य, चपळाई आणि नवनवोन्मेषशालि प्रतिभा म्हणजे तरुणाई. हे लखलखते तारुण्य आज अवघ्या भारतवर्षाला लाभले आहे. भारताचे आजचे सरासरी वय 25 आहे. पुढील 10 वर्षात या तरुणाईतून 40 कोटी बुद्धिमान तरुणांची फौज जगभरातील महत्त्वाच्या पदांवर आरूढ झालेली दिसेल, असे भाकीत ‘द इकॉनॉमिस्ट’ या अत्यंत प्रतिष्ठित साप्ताहिकाने व्यक्त केले आहे. अवघ्या जगाला भारताच्या या सुप्तशक्तीची जाणीव झाली आहे. अशा वेळी भारताचे नेतृत्व एका सुजाण, संयमी आणि सुसंस्कृत तरुणाकडे गेले पाहिजे. त्या तरुणाकडे सगळे जग ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून पाहत असेल; परंतु सद्य:स्थितीतील भारताचे राजकारण पाहता, हा गांधी घराण्याचा वारसदार पंतप्रधानपदाचा सगळ्यात योग्य उमेदवार आहे...

Categories:

Leave a Reply