‘महाराष्ट्र’ या नावातच महानता दडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रधर्म, छत्रपती शिवाजी महाराजांना थोरले महाराज, शहाजीराजांनी शिकवला तेव्हापासून त्यातील महान तत्त्वांचा म-हाटमोळ्या लोकांना चांगलाच परिचय झाला आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥’ हे महाराष्ट्र गीत लिहिताना म-हाटी मनांचा महाउद्गारच व्यक्त केला होता. त्या गीतामधील भाव आणि आशय आजही स्फूर्तिदायक वाटतो. ते लिहितात, ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे’ तो महाराष्ट्र. ‘धर्म राजकारण एकसमवेत चालती’ तो महाराष्ट्र. आणि शेवटी ते म्हणतात, ‘सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो.. देह पडो सत्कारणी ही असे स्पृहा.. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. ‘ महाराष्ट्र धर्मा’चे असिधाराव्रत घेण्यासाठी ‘नवनिर्माणा’चा ध्यास घेतलेले राज ठाकरे पुढे येत आहेत. ‘महाराष्ट्रधर्मा’ला नव्या युगात नव्याने प्रतिष्ठा मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी नियतीने त्यांच्यासमोर ठेवली आहे. ती ते किती गांभीर्याने घेतात हे येणारा काळच सिद्ध करेल.
सीएनएन-आयबीएन आणि हिस्टरी चॅनल तसेच ‘आऊटलुक’ साप्ताहिकातर्फे ‘गांधीजीनंतरचा सर्वश्रेष्ठ भारतीय कोण?’ अशी एक भली मोठी स्पर्धा घेतली गेली. लोकांना शंभर मान्यवर भारतीयांमधून एकाची निवड करण्यास सांगण्यात आले होते. त्यात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वाधिक मते मिळाली आणि त्यांना सर्वश्रेष्ठ भारतीय घोषित करण्यात आले. आम्हाला हा एकूण प्रकारच कोड्यात टाकणारा वाटतो, तरीही बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत विजयी होण्यासाठी मते न देणा-या भारतीयांनी आता त्यांच्या निर्वाणानंतर 61 वर्षानी ‘मत’ दिले, त्यांचे सर्वश्रेष्ठत्व मान्य केले याचा आनंदही आहे! महापुरुषांच्या ‘प्रतिमा’पूजनात रमलेल्या आम्ही भारतीयांनी त्यांच्या ‘प्रतिभा’साधनेचा पुरस्कार करणेही देशहितासाठी आवश्यक आहे.
‘युवा’ हा शब्द उलट लिहिला की ‘वायू’ हा शब्द तयार होतो. विशेष म्हणजे, दोन्ही शब्दांमधून सारखाच अर्थ ध्वनित होतो. शक्ती, सामर्थ्य, चपळाई आणि नवनवोन्मेषशालि प्रतिभा म्हणजे तरुणाई. हे लखलखते तारुण्य आज अवघ्या भारतवर्षाला लाभले आहे. भारताचे आजचे सरासरी वय 25 आहे. पुढील 10 वर्षात या तरुणाईतून 40 कोटी बुद्धिमान तरुणांची फौज जगभरातील महत्त्वाच्या पदांवर आरूढ झालेली दिसेल, असे भाकीत ‘द इकॉनॉमिस्ट’ या अत्यंत प्रतिष्ठित साप्ताहिकाने व्यक्त केले आहे. अवघ्या जगाला भारताच्या या सुप्तशक्तीची जाणीव झाली आहे. अशा वेळी भारताचे नेतृत्व एका सुजाण, संयमी आणि सुसंस्कृत तरुणाकडे गेले पाहिजे. त्या तरुणाकडे सगळे जग ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून पाहत असेल; परंतु सद्य:स्थितीतील भारताचे राजकारण पाहता, हा गांधी घराण्याचा वारसदार पंतप्रधानपदाचा सगळ्यात योग्य उमेदवार आहे...
आमच्यातील प्रत्येक जण प्रथम आपल्या कुटुंबाचा, मग जातीचा, काही वेळा प्रांताचा तर कधी धर्माचा विचार करत असतो. अगदी जाती-धर्माचा, प्रांत-भाषेच्या अभिमानासाठी कोणतीही ‘लढाई’ लढायला तयार असतो. पण मी भारतीय आहे, मला माझ्या देशाचा पर्यायाने माझ्या देशबांधवांचा विकास करायचा आहे, असे म्हणणारे आणि मानणारे फार कमी दिसतात, हे आमच्या स्वातंत्र्याचे सर्वात मोठे अपयश आहे. 65 वर्षापूर्वी आम्हाला स्वातंत्र्य मिळाले, पण ते स्वातंत्र्य कसले होते, ते आम्हाला अद्यापि समजलेले नाही.
पाणी आणि वीज या दोन्ही गोष्टी आजच्या युगात अत्यावश्यक बनल्या आहेत. त्यांच्या उपलब्धतेमुळे जगणे सहजसोपे झालेले दिसते. परंतु, त्याची कमतरता जगणे अशक्य करू शकते, याचा अनुभव आपण सारे घेत आहोत. दुष्काळाने देशातील 12 राज्यांना घेरले असतानाच सलग दोन दिवस 22 राज्यांनी काळोखाचा ‘अनुभव’ घेतला.. तोंडचे पाणी पळवणाऱ्या आणि डोळ्यांसमोर अंधार आणणा-या या समस्यांशी लढण्यासाठी सरकारआधी आपणच सा-यांनी कंबर कसली पाहिजे.