Mahesh Mhatre

भारतीय संस्कृतीमध्ये मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण मानले जाते. पूर्वीच्या काळी हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला जात असे. हल्ली कोणालाच तसे करावेसे वाटत नाही. वृद्धाश्रम हा माता-पित्यांच्या उपकारातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असे समजणा-यांची संख्या जशी वाढत आहे, तशीच ‘फेसबुक’ वा ‘ट्विटर’वर ‘सापडणारा’ वर्ग म्हणजे समाज, असा गैरसमज दिवसेंदिवस दृढ होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कितीही निवडणुका आल्या आणि गेल्या तरी समाजातील दु:खी-पीडितांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी आपण समाजसेवेसाठी आयुष्य झोकून देणा-या आमटे कुटुंबीयांसारख्या मंडळींना साथ दिली पाहिजे. २८ एप्रिल ते दोन मे २०१४ या दरम्यान डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’चे छायाचित्र-प्रदर्शन डोंबिवलीत भरणार आहे. श्रीगणेश मंदिर संस्थान येथे दररोज सकाळी १० ते  रात्रौ ९.३०पर्यंत हे प्रदर्शन खुले राहील. कुणी तरी नेता आपले आयुष्य बदलेल, अशा भ्रमात राहण्यापेक्षा स्वबळावर जग बदलणा-या आमटे कुटुंबीयांचे काम तमाम मुंबई-ठाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळेल. आपापल्या आर्थिक ताकदीनुसार त्या समाजसेवेच्या गोवर्धनाला हातभार लावता येईल. राजकारणाएवढीच आपण समाजकारणामध्येही रुची दाखवली तर देश नक्कीच बदलेल.


लोकसभा निवडणुकीच्या ९ टप्प्यांपैकी ६वा टप्पा २४ एप्रिल रोजी पार पडला. ७ एप्रिलपासून सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया १२ मे रोजी संपणार आहे. म्हणजे १२० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात सरकार निवडण्यासाठी पाच आठवडे लागतात. या सबंध प्रक्रियेसाठी झालेल्या खर्चाचे आकडे सध्या बाहेर येत आहेत. ‘द सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ या भारतीय थिंक टँकनुसार २०१४च्या निवडणुकीत पाच मिलियन डॉलर्स खर्च झाले आहेत. २००९ मध्ये विविध राजकीय पक्षांनी केलेला प्रचार असो किंवा मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी वापरलेले वेगवेगळे मार्ग असोत, त्या सगळ्या प्रकारापेक्षा वेगळे मार्ग यंदाच्या निवडणुकीत वापरले गेले आणि त्यात पैशाचा झालेला अफाट वापर सर्वच लोकशाहीप्रेमी नागरिकांना विचार करायला लावणारा आहे.


२००९ च्या निवडणुकीत जेवढा खर्च झाला होता, त्याच्या तिप्पट खर्च या निवडणुकीत झाल्याचा अंदाज ‘द सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने व्यक्त केला आहे. पाश्चिमात्य देशाप्रमाणे आपल्याकडे सुरू झालेली आक्रमक प्रचारपद्धती, सोशल मीडियाचा वाढता वापर आणि विविध उद्योगसमूहांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नोंदवलेला सहभाग, यामुळे प्रचारातील पूर्वीची पारंपरिक पद्धत मोडीस निघालेली दिसली. या पूर्वी निवडणुका म्हणजे गाजणा-या प्रचारसभा, मिरवणुका आणि थेट लोकांपर्यंत जाण्याची प्रथा आता कालबाह्य ठरू पाहत आहे. एका नामवंत इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार सर्वच राजकीय पक्षांनी लोकांपर्यंत जाण्यासाठी सर्वच प्रसारमाध्यमांचा वापर केलेला दिसतो. २००९ मध्ये सर्व राजकीय पक्षांचे जाहिरात बजेट ८३ मिलियन डॉलर्स होते. यंदा ते ३०० मिलियन डॉलर्सवर गेले असावे. एकूणच काय तर आपल्या निवडणूक प्रक्रियेत या सगळ्या बदलांमुळे पैशाला जास्त महत्त्व आले आहे. २०१२ मध्ये अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला जेवढा खर्च आला होता, त्याच्या खालोखाल खर्च करून आम्ही आमचे मायबाप सरकार निवडणार आहोत.

या निवडणुकीत काही राजकीय पक्षांच्या बाजूने धनिकशाही मोठय़ा प्रमाणात पुढे आल्यामुळे पैशाबरोबरच, दारू, अमली पदार्थ आणि सोने याचा अमाप साठा निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी देशभरातून पकडलेला आहे. २३ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २२ तारखेपर्यंत देशभरातून ३०० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, एक लाख ३३ हजार लिटर दारू आणि तीन टनहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. आपल्या महाराष्ट्रातदेखील तब्बल २५ कोटी रुपयांचा काळा पैसा पकडण्यात आला. गमतीचा भाग म्हणजे हा सारा काळा पैसा आमचा आहे, असे सांगण्याऐवजी तो आमचा नाही, असा आटापिटा सा-या राजकीय पक्षांकडून होताना दिसणे एकूणच लोकशाही प्रक्रियेला घातक आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक तरुणाईचा उत्साह चर्चेत राहिला. या तरुणाईला भुलवण्यासाठी जर दारू आणि अमली पदार्थ वापरले गेले, तर त्याचे दूरगामी परिणाम खूप भयानक होऊ शकतात. एकूणच काय ज्या पद्धतीने आमची निवडणूक प्रक्रिया कार्यरत आहे, ती पद्धत आणि त्यातील पैशाचा खेळ आम्हाला प्रगतिपथावर नेणारा नक्कीच नाही.

जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणा-या आपल्या देशात सर्वसामान्य माणसांचा विचार केंद्रभागी असावा, असे अपेक्षित होते. परंतु आजवरचा अनुभव असा आहे की, सर्वच क्षेत्रांत सामान्य माणसांचा विचार मागे पडत चालला आहे. आपल्या निवडणुकीत सुधारणा व्हावी यासाठी सर्व स्तरावर चर्चा होत असते. आज आम्ही लोकसभेच्या उमेदवारांसाठी होत असलेल्या पैशाचा चुराडा पाहत आहोत. त्या सभागृहातील अकरा खासदारांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते, हे आपण वृत्तवाहिन्यांवर पाहिले आहे. विशेष म्हणजे, या लाचखोरीच्या प्रकरणात सर्वपक्षीय खासदार सहभागी झाले असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये सिद्ध झाले होते, मग आपण कोणत्या प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडून देतो, याचाही विचार होणे गरजेचे आहे.

२००४ च्या १४ व्या लोकसभेत ५४३ पैकी १५२ खासदार कोटय़धीश होते. १५ व्या लोकसभेत त्यांची संख्या ३०० वर गेली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेटमंत्र्यांची सरासरी संपत्ती साडेसात कोटी असल्याचे ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ या संस्थेने एका अहवालात म्हटले होते. एकूणच काय तर आपल्या गरिबांच्या देशात सत्तेची सूत्रे एकूणच धनाढय वर्गाकडे गेलेली आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे तर या धनिक वर्गाचे प्रतिनिधीच मानले जातात. मोदी आणि त्यांच्या धर्म व धनदांडग्या समर्थकांनी आज राजकारणात जो पैशाचा प्रभाव वाढवला आहे, त्याचा समाजावर मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. आज आम्ही एकीकडे जागतिक महासत्ता होण्याच्या गमजा मारतोय, पण प्रत्यक्षात आमच्या देशातील गरिबीचा विचारच केला जात नाही. ज्या अमेरिकेच्या प्रगतीचा हेवा करतो तेथील नागरीसुविधा, व्यक्तिस्वातंत्र्य आणि सरकारी सेवांची बरोबरी करण्याचा साधा विचारही भारतीय राज्यकर्त्यांच्या मनाला शिवत नाही, हे सारे चित्र उद्वेगजनक आहे. स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्य माणसांच्या दु:खाशी एकरूप होणारे महात्मा गांधी बॅरिस्टर असूनही एखाद्या खेडवळ माणसाच्या पोशाखासारखा पंचा नेसायचे. बॅरिस्टर असूनही त्याचा राजकीय जीवनात कधी उल्लेख न करणारे सरदार वल्लभभाई पटेल शेतक-यांप्रमाणे जाडे-भरडे धोतर नेसत असत. अफाट श्रीमंतीत वाढलेले पंडित नेहरू खादीचे सुती कपडे वापरताना दिसायचे. पंतप्रधान असूनही देशातील अर्धपोटी नागरिकांचा विचार करून आठवडयातील एक वेळ न जेवणारे लालबहादूर शास्त्री आम्हाला ठाऊक आहेत आणि म्हणूनच या बदललेल्या काळाची चिंता वाटते.

आजही देशातील गरिबीचे प्रमाण कमी होत नाही. शेजारच्या चीनने १९८१-२०१० या काळात केलेली अफाट प्रगती आपल्या डोळ्यांसमोर आहे. या काळात चीनमधील ९४ टक्के गरिबांचे जीवनमान सुधारले. त्या उलट आपल्याकडे मात्र सुधारणांचा वेग कायम मंदावलेला. गेल्या सात निवडणुकांमध्ये मतदारांनी आघाडी सरकारला दिलेल्या कौलाने हा सगळा गोंधळ झाला असावा, असे तज्ज्ञ सांगतात. १९८९ ते २००९ पर्यंतच्या सर्वच सरकारांमध्ये प्रांतीय पक्षांचे प्राबल्य वाढल्यामुळे राष्ट्रीय ध्येयधोरणांवर कायम परिणाम होत राहिला. पण तरीही कोणत्याच राजकीय पक्षाने व स्वयंसेवी संस्थेने ही बाब मतदारांच्या नजरेसमोर आणली नाही. या निवडणुकीतही या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होताना दिसली नाही. सगळीकडे ‘अब की बार मोदी सरकार’ या घोषणांचाच कहर होता. त्या घोषणांच्या गदारोळात देशातील दु:खी-कष्टी, गोरगरिबांचे प्रश्न मागे पडले. जगातील तीन कुपोषित मुलांपैकी एक मुलगा भारतीय असतो. या देशात जन्मणा-या नवजात बाळांपैकी दर तिसरे बाळ मृत्युमुखी पडताना दिसते. या गोष्टीची फारशी चर्चा या निवडणूक प्रचारात होताना दिसली नाही. आपल्या देशातील जवळपास २६ टक्के लोक निरक्षर आहेत. जगाच्या तुलनेत बघाल, तर जगातील एकूण निरक्षरांच्या संख्येपैकी ३७ टक्के निरक्षर एकटय़ा भारतात पाहायला मिळतात. अडाणी लोकांच्या बाबतीत जसे आपल्या देशाचे नाव चर्चेत आहे, तेवढेच माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीतील आपले योगदानही जगप्रसिद्ध आहे. हे दोन ध्रुव साधण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे भारत अब्जाधीशांचा देश म्हणून जगात गाजत असतो, तर दुसरीकडे आमच्या भुकेकंगालांची स्थिती जगाचे लक्ष वेधून घेत असते. जगातील प्रगत देशांत मोटारीपासून मोबाइलपर्यंत विविध वस्तूंच्या आधारे लोकांच्या जीवनमानाची तुलना केली जाते, त्यानुसार पाहिले तर आपल्याकडील ५० टक्क्यांहून अधिक घरात संडास-बाथरूमसकट सोयी-सुविधांचा अभाव दिसतो. युरोपीय देशांमध्ये दर हजार लोकांपैकी ५००पेक्षा जास्त लोकांच्या घरात मोटारकार असते. चीनमध्ये ते प्रमाण ५८ तर आपल्याकडे दर हजारी फक्त १८ जणांकडे कार असलेल्या दिसतात. अगदी युद्धग्रस्त अफगाणिस्तान किंवा सुदानसारख्या देशांतही जास्त लोकांकडे कार असतात. आपण मात्र सर्वच क्षेत्रांत मागासलेले दिसत आहोत आणि त्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समाजाचे हे मागासलेपण दूर करण्यासाठी जे समाजसेवक धपडताहेत, त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण पुढे येणे गरजेचे आहे. आजवर आम्ही विदेशातील बिल गेट्स किंवा वॉरन बफे यांच्यासारख्या दानशूर श्रीमंतांच्या कथा ऐकल्या होत्या. आता ‘विप्रो’च्या अझीम प्रेमजी यांच्यामुळे भारतीय कोटयधीशांच्या खजिन्यातील पैसा गरजू लोकांपर्यंत जाण्याची सुचिन्हे निर्माण झाली आहेत. अझीम प्रेमजी यांनी बारा हजार दोनशे कोटींहून अधिक रक्कम ग्रामविकास, आरोग्य, शेती, पर्यावरण आणि समाज विकासासारख्या विविध क्षेत्रांत खर्च केली आहे. मंदिरे बांधणा-या मठांना देगण्या देणा-या धर्मभोळ्या श्रीमंतांपेक्षा समाजाभिमुख विचार करणा-या श्रीमंतांची आज जास्त गरज आहे. सामाजिक कामासाठी देणगी देणा-या दानशुरांची यादी ‘हुरुन इंडिया फिलान्थ्रॉफी लिस्ट’द्वारे जाहीर होत असते. गतवर्षीच्या यादीत दहा कोटींतून अधिक रुपये सामाजिक कामासाठी दान देणा-या उद्योजकांची नावे प्रसिद्ध झाली होती. त्यात अझीम प्रेमजी यांच्याखालोखाल ‘एचसीएल’ ग्रुपचे शीव नाडर यांचा नंबर लागतो. त्यांनी आपल्या ‘शीव नाडर फाउंडेशन’च्या माध्यमातून तीन हजार कोटी खर्च केले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे जीवन बदलून गेले आहे. उद्योजक जी. एम. राव हे दानशूरतेच्या यादीत तिस-या क्रमांकावर, तर दक्षिण बंगळूरुतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले नंदन निलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी हे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी पाचशे तीस कोटी रुपये विविध कामांसाठी खर्च करून समाजष्टऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. समाजभान असलेला उद्यमशील विचारवंत ज्याने ‘आधार’च्या माध्यमातून भारतीय व्यवस्थेला दिशा देण्याचा प्रयत्न केला असे निलेकणी यांच्यासारखे लोक राजकारणात येत आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. आज स्वत:च्या विश्वात रंगलेल्या आम्ही लोकांनी आमच्या अवतीभवतीच्या दु:खी आणि वंचितांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. अन्यथा हा सर्वच क्षेत्रांत मागे राहणारा दुबळा वर्ग कोणत्याही क्षणी बंड करून उठेल आणि ते होणे कोणाच्याच फायद्याचे नसेल, फार दूर कशाला जायचे आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली-चंद्रपूर परिसरातील वाढत्या नक्षल कारवाया बघा. आजवर जंगलापुरत्या सीमित असलेल्या या हिंसक कारवाया आता पुणे-मुंबई आणि डोंबिवलीत येऊ घातल्या आहेत, तरीही आम्हाला समाजातील गोरगरिबांचे आपण काही देणे लागतो असे वाटत नाही, म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक काम करणा-या निरलस आणि सेवाभावी कार्यकर्त्यांकडे सर्वच समाजाने लक्ष देण्याची वेळ आली आहे.

सुमारे सात दशकांपासून सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या बाबा आणि साधनाताई आमटे यांच्या ‘आनंद’वनाचा परिचय नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांचे आयुष्य सुखी आणि समृद्ध बनविण्यासाठी आमटे दाम्पत्याने आपल्या आयुष्याचा होम केला. अत्यंत श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या बाबांनी वैयक्तिक सुख आणि स्वार्थाला तिलांजली देऊन झिडकारलेल्या कुष्ठरोग्यांना नवजीवन दिले. त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. पु. ल. देशपांडे यांच्यापासून नाना पाटेकर यांच्यापर्यंतच्या सर्वच क्षेत्रांतील लोकांनी बाबांच्या या समाजकार्यात आर्थिक योगदान दिले. अगदी कोणताही गाजावाजा न करता. पुलं किंवा नाना यांच्याप्रमाणे अनेक लोक आनंदवनाशी जोडलेले आहेत. बाबांचे सुपुत्र डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश हे आपल्या संपूर्ण परिवारासह हा समाजसेवेचा यज्ञ धगधगता राहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. आनंदवनात डॉ. विकासदादांबरोबर त्यांची पत्नी डॉ. भारती, चिरंजीव कौस्तुभ, त्यांची पत्नी पल्लवी यांच्यासह सर्व सहकारी बाबांचे काम पुढे नेण्यासाठी झटत आहेत. तर तिकडे गडचिरोलीच्या जंगलात हेमलकसा परिसरात डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचे १९७३ साली सुरू झालेले काम आज चार दशकांनंतरही सुरू आहे. आता तर प्रकाशदादांचा मुलगा डॉ. दिगंत, त्याची पत्नी डॉ. अनघा, दुसरा मुलगा अनिकेत, त्याची पत्नी समीक्षा हे सारे या सामाजिक कार्यात उतरले आहेत. दरवर्षी लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजार गरीब आदिवासींना आरोग्य सुविधा दिली जाते. प्रकाशदादांच्या या संपूर्ण प्रकल्पात जे सेवाकार्य चालते ते लोकांच्या देणग्यांवर, त्यामुळे त्यांच्याकडे येणा-या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना अनेकदा इच्छा असूनही चांगल्या सुविधा देता येत नाहीत. आधीच अंधश्रद्धा, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अभावांनी ज्यांचे आयुष्य ग्रासले आहे, त्या जंगलातील आदिवासींना माणूस म्हणून जगवावे आणि वागवावे असा त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळे त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण त्यांच्या जवळचा होऊन जातो. तुम्ही प्रत्यक्ष तिथे गेलात तर दिसेल, बनियनवर असलेले डॉ. प्रकाश एका वेळी अनेक रुग्णांच्या आजाराची मोठया आस्थेने आणि प्रेमळपणे तपासणी करतात. तिथे येणारे रोगी कसे असतात, याचा शहरातील लोक विचारदेखील करू शकत नाहीत. हिंस्र् श्वापदांच्या हल्ल्यात चेहरा फाडलेला एखादा माणूस असू शकतो, कुणी झाडावरून पडलेला आणि जबर जखमी झालेला तरुण असू शकतो, तर एखादी बाळंतपणात अडलेली बाई असू शकते. आमटे कुटुंबीय दिवस-रात्र त्यांना विनामूल्य सेवा देण्यासाठी झटत असतात. त्यांचे हे काम फक्त दु:खी, कष्टी माणसांपुरते मर्यादित नाही, तर जखमी झाल्यामुळे किंवा जंगलातील बदलत्या भौगोलिक स्थितीमुळे मरणप्राय जीवन जगणा-या पशुपक्ष्यांनाही प्रकाशदादांनी ‘आमटेज अ‍ॅनिमल पार्क’मध्ये अभय दिलेले आहे. हे प्राणी एरव्ही हिंस्त्र वाटत असले, तरी प्रकाशदादांशी असणारी त्यांची सलगी ब-याचदा थक्क करणारी असते. विषारी साप असो किंवा वाघ, सिंह यांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर उपचार करणे किंवा त्यांना लळा लावणे हे कसे शक्य आहे, असे मी प्रकाशदादांना विचारले होते, त्यावर उत्तर न देता प्रकाशदादांनी सर्पगरुडाचा पिंजरा उघडला. ते आत जाताच तो भलामोठा पक्षीराज त्यांच्याजवळ आला आणि त्यांनी हात पुढे करताच तो हातावर बसला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवून दादांनी त्याच्याकडे एक क्षण पाहिले आणि हात वर फेकला तसा तो गरुड उंच उडाला. पुन्हा थोडय़ा वेळाने तो येऊन हातावर बसला आणि दादांनी हाताला झटका देताच पंख फडफडवत उडून गेला. त्याच्याकडे स्नेहार्द नजर टाकत प्रकाशदादांनी पिंजरा बंद केला आणि म्हणाले, ‘हा जो सर्प-गरुड आहे याचं वैशिष्टय़ असं आहे की, हातात पंजात आलेली कोणतीही सजीव गोष्ट तो आकाशात घेऊनच उडतो, त्याच्या पंजाची पकड अशी असते की, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सहजासहजी सुटू शकत नाही. तो तुम्हाला इजा करणारच, पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, प्राणी व पक्षी कोणताही असो त्यांच्या संवेदना खूप तीव्र असतात. त्यांना भलेही नीट दिसणार नाही किंवा ऐकू येणार नाही, पण आपल्या रक्तदाबावरून त्यांना परिस्थितीचा अंदाज येतो. साधारणत: माणसाला जेव्हा राग येतो, तेव्हा त्याचा रक्तदाब वाढतो आणि जेव्हा आपण भयभीत होतो, तेव्हाही रक्तदाब वाढतो. जेव्हा आपल्याला त्या प्राण्याची भीती वाटते तेव्हा ते समजण्याएवढी जाणीव नसल्यामुळे त्याला असे वाटते, समोरचा माणूस आपल्यावर हल्ला करायला आला आणि त्यामुळे तो प्राणी प्रतिहल्ला करायला सिद्ध होतो. सापाचा दंश किंवा बिबटयाचा हल्ला या गोष्टी त्यामुळेच होतात.’ आमटेंचे हे वन्यप्राणीप्रेम आता त्यांच्या नातवंडांतही उतरलेले दिसते. त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्पाच्या कुठल्याही कोप-यात असलात तर ही पशुपक्ष्यांची मांदियाळी कधीच तुम्हाला एकटे सोडत नाही. १९७३ मध्ये सुरू झालेले हेमलकसातील हे काम आता दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. तेथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत चालली आहे. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवरेपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे, ज्या इमारतीने आजवर लक्षावधी आदिवासी रुग्णांना उपचार दिले ती नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. निवडणुकीच्या या सगळ्या गदारोळात तीस हजार कोटींचा चुराडा होतो, पण डॉ. प्रकाश आणि विकास यांच्या समाजकार्यासाठी पाच कोटी जमवताना दमछाक होते, ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. दिल्लीत ‘नमो’ येवो किंवा ‘रागा’, जो कोणी समाजातील स्थिती बदलेल, त्याला अवघा देश साथ देईल.   

ऑनलाइन देणगी पाठवावयाची असल्यास खाली दिलेल्या खात्यात देणगी जमा करता येईल.

S. B. Account Name : Maharogi Sewa Samiti, Warora 
S. B. Account No. : 20244238823 (Bank of Maharashtra, Bhamragad branch)
IFSC : MAHB0001108

पत्ता : लोक बिरादरी प्रकल्प, मु. : हेमलकसा, तालुका-पोस्ट : भामरागड, जिल्हा : गडचिरोली, पिनकोड : ४४०७१०. महाराष्ट्र.

Categories:

Leave a Reply