Mahesh Mhatre


विख्यात कवी पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ कादंबरीमध्ये लच्छी नामक मुलीची खूप मनोवेधक कहाणी सांगितली आहे. लच्छी आणि मोर ही रूपके वापरून पु. शि. आपल्याला सुचवितात की, ‘तुम्हाला मोर पाहिजे असेल तर तुम्ही स्वत:च मोरस्वरूप होऊन गेले पाहिजे.’ सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटप्रेमही अगदी त्या लच्छीच्या मोरप्रेमासारखे मनस्वी, यशस्वी आणि ओजस्वी. आणि म्हणूनच असेल कदाचित सचिनच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रसिद्धी मिळूनही तो कधी वादग्रस्त ठरताना दिसत नाही. क्रिकेट म्हणजे सत्ता स्पर्धा, वादविवाद; पण त्यात सचिन मात्र कुठेही नाही. एवढेच कशाला जेव्हा अवघे क्रिकेटविश्व मॅचफिक्सिंग आणि बेटिंगच्या कृष्णछायेने घेरले असताना ‘आमचा’ सचिन मात्र उजळ माथ्याने बॅटीचा लखलखाट करताना दिसत होता. म्हणून सचिनने क्रिकेटमधून निवृत्त होणे, ही घटना लोकांना नकोशी वाटत होती; पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, अगदी ज्याप्रमाणे आपल्या लाडक्या लतादीदी वाढत्या वयोमानामुळे गायच्या थांबल्या, तसा ‘क्रिकेटचा देव’ सचिनही आपले मैदानावरील ‘अवतारकार्य’ संपवून जगण्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज होत आहे. त्याच्या या नव्या खेळीसाठी शुभेच्छा देणारा हा खास विशेषांक ‘प्रहार’ने तुमच्यासमोर आणला आहे. त्यात विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर, माजी यष्टिरक्षक किरण मोरे, नामवंत क्रिकेट पंच माधवराव गोठोस्कर, क्रिकेटपटू अमोल मुजुमदार, सिने-नाटय कलावंत संजय मोने, दिवंगत क्रीडा समीक्षक अभिजीत देसाई यांच्यासह अनेक नामवंतांचे सचिनचे वेगळेपण सांगणारे लेख आहेत.


आपला सचिन निवृत्त होतोय.. यापुढे भारतीय क्रिकेटचे काय होणार यापेक्षा आपले काय होणार, हाच प्रश्न कोटयवधी भारतीयांना सतावतोय, कारण सचिन आणि भारतीय क्रिकेट हे गेल्या दोन तपांचे, २४ वर्षाचे समीकरण तमाम रसिकांच्या अंगवळणी पडले आहे. ज्या वयात आपल्या घरातील मुले अकरावीला आर्ट्सला जाऊ की सायन्सला, याचा विचार करीत असतात, त्या अत्यंत कोवळ्या वयात सचिन नामक जिवंत दंतकथा क्रिकेटच्या मैदानावर आकारास येऊ लागली. पाकिस्तानच्या आक्रमक खेळाडू आणि आगाऊ प्रेक्षकांच्या साक्षीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा करणारा सचिन आज जगातील सगळे महत्त्वाचे विक्रम खिशात घालून उभा आहे आणि म्हणूनच असेल कदाचित सबंध जगाला या क्रिकेटच्या विक्रमादित्याला निरोप देताना गलबलून येत आहे.

लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका खूपच गाजत आहेत. तिकडे पंतप्रधान होण्यासाठी आतुर झालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी टीव्ही चॅनेल्समधील वातावरण गरम झाले आहे, तर महागाईने आधी लोकांच्या जेवणातील कांदा अदृश्य केला. आता ८० रुपये किलो झालेल्या टोमॅटोवर गायब होण्याची वेळ आली आहे. दिवाळे काढून दिवाळी जात असतानाच गोरगरीब घरात अत्यावश्यक वस्तूंच्या महागाईने उत्पन्नाचे सर्वच स्रोत जागच्या जागी आटविण्याचा, संपविण्याचा जणू चंग बांधला आहे आणि या सगळया पार्श्वभूमीवर ‘आपला सचिन’ क्रिकेटपासून दूर जाणे, ही गोष्ट समाजाच्या सर्व थरातील लोकांना दु:खदायक वाटते, यातच सचिनच्या व्यक्तिमत्त्वाचे थोरपण लक्षात येते.

आजकाल जसे राजकारणातील मंडळींना राज्य कारभाराव्यतिरिक्त अन्य विषयांत जास्त पडावेसे वाटत नाही, तद्वत सर्वसामान्य माणसेही आपल्या घरापलीकडे पाहण्यास उत्सुक नसतात. अशा काहीशा उदासीन वातावरणात सचिनच्या क्रिकेटमधील निवृत्तीने सर्वसामान्य लोकांच्या मनातील कातरता आणि व्याकूळता अधिक वाढवलेली दिसते. गेल्या आठवडयापासून ‘प्रहार’कडे सचिनविषयी भावना व्यक्त करणा-या रसिकांच्या पत्रांचा ओघ सुरू आहे. त्या पत्रांमधील भावना आणि जिव्हाळा मन हेलावून टाकतो आणि अर्थात ती लोकप्रियता मन मोहवूनही जाते; पण गेली दोन तपे सचिनची वाटचाल या लोकप्रियतेच्या, तर कधी अपयशाच्या लाटांवर हिंदकळत सुरूच होती. आता त्याची नजर किना-यावर स्थिरावलेली आहे. इतकी प्रदीर्घ काळ देशाची सेवा करणा-या या अतुलनीय क्रीडापटूने आता भारतात क्रिकेटसह अन्य खेळांच्या विकासासाठी आपले योगदान दिले पाहिजे. ऑलिंपिकच्या पदकांचा ज्या वेळी विषय निघतो त्या वेळी आपला १२० कोटींचा देश त्या यादीत अगदी तळाला असलेला दिसतो आणि अगदी छोटे-छोटे देशही त्या स्पर्धेत आपल्या पुढे असतात. सचिनने जर मनावर घेतले तर हे चित्र बदलू शकते. सध्या राज्यसभेत खासदार म्हणून बसणा-या सचिन आणि अन्य तरुण खासदारांनी अखिल भारतीय पातळीवर प्रभावशाली ठरू शकेल अशी ‘क्रीडा योजना’ आणणे ही आजची गरज बनली आहे. आम्हाला खेळ आणि खेळकर वृत्तीची जोपासना करण्याची बालपणापासून सवय लागली तर मोठेपणी होणा-या रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकारासारख्या रोगांपासून दूर राहणे शक्य होईल; त्यामुळे मैदानी खेळांचा विकास शालेय स्तरापासून झाला, तर एशियाड आणि ऑलिंपिकमध्ये आपली मुले-मुली चमकतीलच, पण त्याचबरोबर ‘सगळ्यात तरुण’ असणा-या आपल्या देशातील तरुणाई समर्थ आणि सशक्तही होईल.. सचिनने आम्हाला फक्त क्रिकेटच नव्हे तर कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस अशा विविध खेळांतही त्याच्यासारखे विक्रमादित्य निर्माण करून भारताला नवी दिशा दाखवावी.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सचिनने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत स्वत:च्या आचरणाने उभा केलेला आदर्श सर्वच तरुणाईला प्रेरणादायी आहे. अगदी लहानपणापासूनच सचिनने फॅमिली, फिटनेस, फेम आणि फायनान्स या चार ‘एफ’ची ज्या पद्धतीने काळजी घेतली, त्याला अक्षरश: तोड नाही. १९९१नंतर आलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या वा-याने भारतीय मध्यमवर्ग आधी सुखासीन आणि मग रोगाधीन होत गेला. सध्या जगातील सर्वात जास्त रक्तदाब, मधुमेह वा हृदयरोगी भारतात जास्त आढळण्यामागे तेच महत्त्वाचे कारण आहे, पण बरोबर त्याच कालखंडात ज्याने त्रिखंडात कीर्ती गाजवली तो सचिन मात्र स्वत:ची शारीरिक, कौटुंबिक आणि आर्थिक तंदुरुस्ती शाबूत ठेवतो, ही बाब नुसतीच कौतुकास्पद नाही, तर अनुकरणीय आहे. कारण त्याने जपलेल्या चार ‘एफ’पैकी एक जरी कोसळला तरी यशाची चव निघून जाते. पण आमचा सचिन मात्र यशोशिखरावर चढूनही ‘हवा’ डोक्यात जाऊ देत नाही, हे तुम्ही-आम्ही सा-यांनी पाहिलेय. कदाचित म्हणूनच सचिनचे मैदानावरून जाणे आपल्या सगळ्यांनाच जास्त दु:खदायक आणि चटका लावणारे असावे.

Categories:

Leave a Reply