Mahesh Mhatre


भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अत्यंत महत्त्व आहे. आमचे तुकाराम महाराज तर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे म्हणतात. नदीला ‘गंगा मैया’, तर जमिनीला ‘धरती माता’ मानणारे भारतीय दूध देणाऱ्या गायीलाही देवत्व देतात; परंतु प्रत्यक्षात आमच्या देशातील प्रत्येक नदी प्रदूषित झालेली दिसते. जगातील कोणत्याच देशात होत नसेल एवढी जमिनीची प्रचंड धूप फक्त भारतातच होते. एवढेच नाही तर आम्ही आमच्या हवेलाही प्रदूषित करून टाकलेले आहे. गेल्याच आठवडयात फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सिन आणि जर्मनीच्या कोलोन गावाजवळून जाणारी -हाईन या दोन्ही नद्यांच्या स्वच्छ आणि सुंदर पात्रांतून सुमारे ५० ते ६० किलोमीटर प्रवास करण्याची संधी मिळाली. या संपूर्ण जलप्रवासात नदीच्या पात्रात एकही प्लॅस्टिकची पिशवी वा इतर कुठलाही कचरा वा निर्माल्य पाहायला मिळाले नाही. दोन्ही नद्यांच्या काठांवर छान झाडी, उद्याने, मनोरंजन केंद्रे आणि काही अंतरावर हॉटेल्स पाहायला मिळत होती. कुठे एखाद् दुसरा माणूस निवांतपणे मासेमारी करताना दिसायचा. नद्यांमधून फिरणा-या बोटी-जहाजांमधून पाण्यात काहीही खाली पडणार नाही, याची सगळेच जण दक्षता घेत होते. पर्यावरणरक्षणाची एवढी काळजी घेणारा हा युरोपियन समाज नदी, पर्वत वा धरती मातेला देवत्व न देता हे जपतो आणि आम्ही भारतीय नदी-धरती-झाडे अशा सगळ्याच निसर्ग प्रतीकांचा अमानुष विध्वंस करताना त्यांची पूजा करण्याचा आव आणतो. हा विरोधाभास फक्त युरोपच नाही, तर सगळ्याच प्रगत देशांत फिरताना दिसतो.. उत्तराखंडाची ही आपत्ती निसर्गाच्या रौद्रतांडवातून आलेली दिसत असली तरी तिचा उगम मानवी चुकांच्या डोंगरातून झालेला आहे, हे आपण मान्य केलेच पाहिजे.

शाम ढलनेसे पहलेही
सूरज का रंग लाल होने लगता है
गहराने लगती है
आकाश की सियाही
धुआँ उडाते
दुपहियों - कारो - कारखानों से
दिन में ही रात उतर आती है।

अनगिनत पेडों की बे आवाज कातिल
काले अजगर सी सडके
हरियाली निगल रही है
खेतों की क्यारिंयापर
क्रंक्रिट जंगल उग गए है!

बेतरतीब विकास के कैंसरने
मासूम फिजा को लील लिया है
ये शहर है या नरक बस रहा है?

याद रख
आज किये की सजा
तेरे कल को जरूर भुगतनी पडेगी
शायद नवीन प्रलय का दिन
अधिक दूर नही..


कविवर्य रफत आलम यांची ही कविता. खरे तर काही वर्षापूर्वीच प्रकाशित झालेली, पण गेल्या अनेक दिवसांपासून कानात घुमत आहे. विशेषत: उत्तराखंड आणि हिमालयाच्या आसपासच्या भागात आलेल्या प्रलयंकारी आपत्तीच्या बातम्या वाचताना, पाहताना आणि ऐकताना कवितेची ओळ न् ओळ आठवत राहते. ‘प्रलय का दिन अधिक दूर नही..’चा भयसूचक इशारा मनात भीतीची अनुभूती उमटवत राहतो. पण अत्यंत प्रतिकूल वातावरणात संकटात सापडलेल्या आपल्या देशबांधवांच्या मदतीला जीवाच्या कराराने धावून आलेले सैनिक मनाला धीर देतात. संततधार पावसात, ढगाळ वातावरणात धाडसाने हेलिकॉप्टरसह झोकून देणारे आमचे ‘शक्तिमान’ पायलट पाहून ऊर अभिमानाने भरून येतो आणि या नैसर्गिक आपत्तीपासून काही तरी शिकून आम्ही बोध घ्यावा, असा विचार मनात भिरभिरू लागतो.

दोन आठवडयांपूर्वी, रविवार १५ जूनपासून उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग, उत्तरकाशी आणि चमोली जिल्ह्यात ढगफुटी, पर्जन्यवृष्टी आणि महापुराने अक्षरश: थैमान घालायला सुरुवात केली. फक्त तीन-चार दिवसांत या रौद्रभीषण निसर्ग तांडवाने ‘चारधाम यात्रे’साठी प्रसिद्ध असलेल्या या परिसराला मंदाकिनी नदीच्या वेगवान प्रवाहासोबत वाहून नेले. त्यात देशविदेशातून आलेले पर्यटक होते, साधू होते, पुजारी होते आणि मुक्या जनावरांचे कळपही होते. बेफाम नदीच्या अफाट वेगाने पर्वतरांगांमधील अवजड दगडांनाही चेंडूप्रमाणे खेळवत खाली आणले होते, मग त्यासमोर माणसांचा वा त्यांच्या घरांचा काय टिकाव लागणार होता..?

उत्तराखंड, अवघ्या दहा वर्षापूर्वीच उत्तर प्रदेशच्या महाकाय छत्रछायेतून बाहेर आलेल्या या चिमुकल्या राज्याला ‘देवभूमी’ म्हणतात. दहा वर्षात या राज्याने सात मुख्यमंत्री पाहिलेत. अनैतिक प्रकरणांसाठी वादग्रस्त ठरलेल्या एन. डी. तथा नारायण दत्त तिवारी यांच्यापासून भाजपच्या ‘चमको’ बी. सी. खंडुरींपर्यंत सगळे मुख्यमंत्री या नवनिर्मित राज्याला न्याय देण्यात असमर्थ ठरले. खरे तर त्यामुळेच लोकांनी कधी भाजप तर कधी काँग्रेसच्या हाती सत्तासूत्रे दिली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये काँग्रेसने भाजपला पराभूत केले. १३ जिल्ह्यातील ६३ लाख मतदारांनी भाजपच्या अवघ्या दोन आमदारांना निवडून दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्याकडून लोकांना आणि काँग्रेसलाही मोठया अपेक्षा होत्या, पण सत्तेत येऊन सहा महिनेही पूर्ण झाले नाहीत, तोच भाविक, पर्यटक आणि विविध सेवा देण्याच्या कामात गुंतलेल्या हजारो लोकांवर अक्षरश: समस्यांचे आकाश कोसळले. तुलनेने लहान आणि अल्पवयीन असलेल्या उत्तराखंड प्रशासनाला हे नैसर्गिक संकटाचे आव्हान पेलणे शक्य नव्हते. तसे ते महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यालाही अनेकदा शक्य झालेले नाही. फार दूर कशाला जा, आपत्ती व्यवस्थापन किंवा राज्य चालवणा-या सनदी बाबूंच्या भाषेत ज्याला ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ म्हणतात, त्याची पुरेशी जाण तालुका-जिल्हा पातळीवर अद्याप निर्माण झालेली नाही. अगदी राजधानी मुंबईतही सगळे आलबेल आहे का? तर तसेही नाही. आमच्या सत्तेचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयाच्या एका कोप-यात आग लागते. आगीचे कारण काही मोठे नव्हते; परंतु आमच्याकडे अग्निशमनाचे यंत्र आणि तंत्र जाणणारी माणसेच नसल्याने सगळ्या जगाच्या समोर मंत्रालय धडधडा पेटत राहिले. निष्पाप जीव आगीच्या झळीने, श्वास कोंडून मरतात. त्यांचे आक्रोशही व्यवस्थेला जागे करत नाहीत. होय, अगदी आज जरी कोणत्याही शासकीय इमारतीत तशी दुर्घटना घडली तर ‘आपत्ती व्यवस्थापन’ नावाचा प्रकार त्या दुर्घटनेत सगळ्यात प्रथम भस्मसात होईल. उत्तराखंडमध्येही सगळ्या मुख्यमंत्र्यांनी निसर्ग वा मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापनाकडे ठरवून दुर्लक्ष केले. त्यामुळे आज दोन आठवडयानंतर आपण उत्तराखंडच्या एकूण दु:स्थितीकडे पाहतो, त्या वेळी बिनडोक शासनव्यवस्थेच्या मूर्खपणाचा राग आल्याशिवाय राहत नाही.

चारधाम यात्रा म्हणजे यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ या पवित्र धर्मस्थळांचे दर्शन घेण्याची शेकडो वर्षापासूनची प्रथा आहे. शीख पंथाचे पवित्र हेमकुंड साहिब गुरुद्वाराही त्याच परिसरात असल्याने पंजाब-हरयाणातील शीख-जाट लोकांसाठी या परिसराची यात्रा ‘दुहेरी पुण्य’ किंवा ‘डबल बोनान्झा’ असते. आपण आपल्या परिसरातील कोणत्याही वृद्ध व्यक्तीला विचारा की, साठ किंवा सत्तरच्या दशकात कुणी चारधाम यात्रेला गेले होते का, त्यांचे उत्तर नकारार्थीच येईल; कारण त्या काळात चारधाम यात्रेला जाण्यासाठी योग्य रस्ते वा अन्य सुविधा नव्हत्या. खर सांगायचे तर त्या काळात ही यात्रा भाविकांच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांची परीक्षा असे, त्यामुळे भक्तिमार्गात पुढे गेलेले साधू-संत किंवा सात्त्विक वृत्तीचे लोक ‘तप’ म्हणून या यात्रेला जात. आता ही यात्रा म्हणजे स्वर्गात नेण्याची ‘गॅरंटी’ देणारे धर्मकृत्य बनली आहे. मध्यंतरी अमरकंटकच्या जंगलात मला एक तरुण नागा साधू भेटला होता. आपल्याच मस्तीत मग्न असणारा, प्रथमदर्शनी उग्र आणि भीतीदायक वाटणारा त्याचा चेहरा मी मुंबईहून आलेलो आहे, हे ऐकताच प्रसन्नपणे उजळला आणि गप्पा सुरू झाल्या. बहुतांश धार्मिक स्थळे आम्ही पायीच कसे फिरतो, आमची तिकडे कोण व्यवस्था करतो, याविषयी त्याने मोकळेपणाने माहिती दिली. हिमालयातील पर्यटकांच्या वाढत्या गर्दीने तो भडकलेला दिसला. तो म्हणाला, ‘‘अहो, उन्हाळा-पावसाळा या दोन ऋतूंत आम्ही पूर्वी सहजपणे चारधाम आणि त्याच्यावरील पहाडी भागात साधनेसाठी जायचो, पण आता वाढत्या गर्दीमुळे आम्हाला तिकडे फिरकायचीसुद्धा इच्छा होत नाही, त्यामुळे जेव्हा हिवाळा वाढतो आणि पर्यटकांची गर्दी ओसरते, तेव्हा आम्हाला चारधामच्या दिशेने जाणे सोपे पडते..’’

उन्हाळ्यात तुम्ही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री वा जमुनोत्री या चारधामांच्या परिसरात गेलात, तर हरिद्वारपासून माणसांचे लोंढे, गाडय़ांचे ताफे निसर्गाला हानिकारक ठरणा-या एकूण एक गोष्टी घेऊन ‘देवभूमी’च्या दिशेने निघालेल्या दिसतात. पर्यटकांनी खचाखच भरलेल्या बसगाडया सुमो, मोटारी आणि मोटरसायकल धुळीचे लोट उडवत जात असतात. त्या गाडीत बसलेले सारे देवभक्त दर्शनार्थी प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, गुटखा किंवा वेफर्सची वेष्टने दारे-खिडक्यांतून फेकतात. ध्वनिप्रदूषण, हवाप्रदूषण आणि पाणीप्रदूषणाची एकही संधी सोडायची नाही, असा जणू निर्धार केलेल्या भक्तिवान पर्यटकांनी खरे तर गेल्या तीन दशकांत ‘देवभूमी’ उत्तराखंडचा विध्वंस केला आहे. दहा-पंधरा दिवसांच्या प्रवासात, छान खात-पित देवदर्शन करून आयुष्य सार्थकी लावण्याची ही ‘कल्पना’ १९९१ नंतरच्या जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण (जाउखा किंवा खाउजा) या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आलेल्या आर्थिक स्थैर्याने देशभर पसरवली. मध्यमवर्गाच्या हाती पैसा खुळखुळू लागताच, पर्यटनक्षेत्राला बहर आला. जागोजागी कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे ‘ट्रॅव्हल एजन्सी किंवा एजंटां’चे रंगीबेरंगी फलक दिसू लागले. या पर्यटनामध्ये श्रीमंत पर्यटकांसाठी विदेशवारी, मध्यमवर्गीयांसाठी माथेरान - महाबळेश्वर आणि गरिबांसाठी धार्मिक स्थळांची यात्रा असे आर्थिक स्तरानुसार गट पडले. विदेशात जाणा-यांचे देशी पर्यटनही पंचतारांकित असल्यामुळे त्यांना नाशिकला जायचे असो वा काशीला, ताज वा तत्सम फाईव्हस्टार हॉटेल स्वागताला तयार असतात. शिवाय तिथे जाण्यासाठी खास विमान वा चॉपरची व्यवस्था असते. मध्यमवर्गीयसुद्धा देवाच्या नावावर चार पैसे उडवून स्वत:ला ‘पवित्र’ करण्याचा पवित्रा घेऊन असतो; परंतु मध्यमवर्गातील खालचा वर्ग आणि गरीब यांच्या यात्रांबद्दल न बोललेलेच बरे. माणसी पाच ते सात हजार प्रवास खर्च किंवा काही ठिकाणी दहा हजार रुपये खर्च आकारून महिनाभर फिरवून आणणा-या या संस्थांनी गावोगावी आपले ‘एजंट’ पसरवलेत. त्या मंडळींच्या माध्यमातून दररोज हजारो प्रवासी चारधामला येतात. खरे तर हरिद्वारपासून या सगळ्या धार्मिक व्यवहारांची साखळी सुरू होते. प्रवासी-वाहने-हॉटेल्स-पंडे-पुजारी आणि अंतिमत: देव, अशा विविध घटकांना एकमेकांत घट्टपणे गुंफत (खरे तर अडकवत) या साखळीने उत्तराखंडाच्या देवभूमीला विनाशाच्या दिशेने नेले आहे. पर्यावरणाचा -हास झाला, म्हणून उत्तराखंडात नैसर्गिक आपत्ती आली, असे म्हणणा-या भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र आणि हिमालयातील बदलांचा अभ्यास करणा-या तज्ज्ञ मंडळींनी हे खरे तर जगाला ओरडून सांगायला हवे.

फार जास्त नाही तर, चाळीस-पन्नास वर्षापूर्वी उंच देवदार वक्षांनी नटलेल्या या चारधाम परिसरात नैसर्गिक सौंदर्याचा साक्षात्कार होत असे. त्यामुळे इथवर येणे शक्य नव्हते तरीही जीवनाच्या अंतिम सत्याचा, सोप्या भाषेत सांगायचे तर ईश्वरी आविष्काराच्या अनुभूतीचा शोध घेऊ इच्छिणारे मोजके साधक या दिशेने येत. त्यातील किती लोक आपल्या जगात परत जात वा इकडच्याच गुहेला घर बनवून राहत, याचा बाहेरच्या जगाला पत्ता नव्हता.

परंतु मध्यम व उच्च मध्यमवर्गाकडे आलेल्या श्रीमंतीने चारधामप्रमाणे देशातील सगळ्याच धार्मिक ठिकाणांकडे गर्दी करायला सुरुवात केली. या गर्दीसोबत आलेल्या प्रदूषणाने सगळ्यात आधी अमरनाथच्या बर्फाने बाबाला गुप्त होण्यास भाग पाडले. हिमालयात पूर्वी दूर असणा-या या धार्मिक स्थळी नैसर्गिकपणे तयार होणारे बर्फाचे शिवलिंग, हा काही मोजक्या लोकांच्या आकर्षणाचा विषय होता. तीच गोष्ट काश्मीरच्या माता वैष्णोदेवीची. खडतर यात्रा, हे या दोन्ही ठिकाणांचे वैशिष्टय; परंतु हिंदी सिनेमांनी या आणि अशा अनेक धर्मस्थळांना चमत्कारिक वलयांसह लोकांपुढे नेले. मग काय, आधीच भोळ्या भक्तीत रमणाऱ्या आमच्या भारतीय मंडळींना ‘चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है’ असा भास न होतो तरच नवल. वेडय़ा भक्तांच्या टोळ्या पायी वाहनांनी देवाच्या दारी धावू लागल्या. नव्या अर्थव्यवस्थेत निर्माण झालेला आर्थिक वेग अनेकांसाठी असह्य होता. परिणामी या नवमध्यमवर्गात आर्थिक अस्थिरतेचे भोवरे निर्माण झाले. कधी त्या अस्थिरतेच्या गर्तेत गटांगळ्या खात, तर कधी लाटेवर आरूढ होऊन ऐश करणा-या या नवमध्यमवर्गाला देव आणि आधुनिक संतांच्या दरबारात भावनिक आधार सापडला आणि आपोआप देशभरातील या दुर्बल तन-मन असणा-या मंडळींचा ओघ चारधाम वा तत्सम यात्रांकडे वळला. आज आम्हाला मंदाकिनी नदीच्या प्रलयंकारी प्रवाहामुळे वाहून गेलेल्या नदीकाठच्या इमारती, धर्मशाळा आणि आश्रम दिसताहेत. मात्र आम्ही गेल्या दोन-तीन दशकांपासून निसर्गाच्या मुळावर आलेल्या मानवी अतिक्रमणाकडे पाहून न पाहिल्यासारखे केले, त्याचे काय?

पर्यटकांच्या दररोजच्या वाढत्या गर्दीला पाणीपुरवठा करणे, हे उत्तराखंड सरकारपुढे एक आव्हान होते, त्यातून विविध धरणांची उभारणी सुरू झाली. त्या धरणांसाठी जे खडक फोडले, स्फोट करून डोंगर हटवले, त्यामुळे या चारधाम परिसरातील भूस्खलनाचा वेग वाढला. डोंगर, नदीचे काठ आणि संधी मिळाली तिथे नदीच्या पात्रातही हॉटेल्स-आश्रम-इमारती बांधल्या गेल्या. बेछुट वृक्षतोड, रेती आणि मातीचा अवैध उपसा याला तर गेल्या दशकात अक्षरश: ऊत आला होता; परंतु या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचे धाडस ना काँग्रेस सरकारकडे होते ना भाजप सरकारकडे तशी हिंमत होती. प्रत्येक सरकारला पर्यावरणरक्षणापेक्षा भाविकांच्या भावनांची चिंता होती, त्यामुळे ‘कॅग’च्या अहवालात भागीरथी आणि अलकनंदा परिसरातील जलविद्युत प्रकल्पांमुळे चारधाम क्षेत्रातील डोंगराळ भाग धोक्यात आहे, असे स्पष्टपणे सांगितले असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शास्त्रज्ञांनी हिमालयन पर्वतराजीतील वितळणा-या बर्फाचा धोका किती वेगाने वाढत आहे, असा इशारा दिला होता, तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते आणि म्हणूनच माणसांनी केलेले ‘अत्याचार’ ज्या क्षणी निसर्गाला असह्य झाले, त्या वेळी त्याने एका फटक्यात माणसाला आणि त्याच्या देवांना भुईसपाट केले.
निसर्गाचे हे ‘होत्याचे नव्हते’ करण्याचे सामर्थ्य आमच्या आधीच्या पिढयांनी ओळखले होते. त्यांनी म्हणूनच नदीला, पर्वताला, आकाशाला, वा-याला घाबरून त्यांचे देव बनवले. माणूस शेती करू लागला, घर बांधून राहू लागला. तसे त्याच्या माणसासारख्या देवांना, माणसासारखे कपडे घालायची आणि नैवेद्य खायची सवय लागली. त्यांचा राग-लोभसुद्धा माणसांसारखाच बनला. पाव किलो पेढयाचा नैवेद्य ठेवणा-याला आमचे देव पावू लागले, नवस पूर्ण न करणा-यांवर रागावू लागले, मग अधिकाधिक लोक त्या देवांकडे धावू लागले. या सा-या धावपळीत जल, जन, जमीन आणि जंगल पायदळी तुडवले गेले. उत्तराखंड हे या मानवी हव्यासाचे आणि अतिक्रमणाचे बळी ठरले आहे. गेले दोन आठवडाभर जलप्रलयाने तिकडे एवढा हाहाकार उडवला, तरीही आमचे देवभोळे लोक सुधारायला तयार नाहीत, अगदी परवाचीच बातमी आहे.

‘‘उत्तरकाशीच्या पुढे अलकनंदा हायड्रोपॉवर कंपनीचे जिथे काम सुरू होते, तिथे धारी देवीच्या मूर्तीची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे.’’ प्रकल्पाच्या आड येणा-या या मंदिरातील मूर्तीला १७ जूनला हलवण्यात आले होते. स्थानिक लोकांच्या मते, त्या देवीची मूर्ती हलवल्यामुळे तिचा कोप झाला आहे. उत्तराखंडची एकूण आपत्ती ही कोपाचीच परिणीती आहे, असे लोक म्हणू लागले. त्यांनी कंपनी व्यवस्थापनावर दबाब आणला, दमदाटी केली. अखेर व्यवस्थापन नमले आणि त्यांनी मूर्तीची पुन्हा स्थापन केली.. अजूनही हजारो लोक अन्न-पाण्याशिवाय चारधाम परिसरात राहताहेत. शेकडो मृतदेह अंत्यसंस्काराची वाट न पाहता मातीत मिळू लागले आहेत. सगळ्याच प्रदेशात साथीच्या रोगांनी एक नवे आव्हान उभे केले आहे. पर्यटक, भाविकांसह स्थानिक मंडळीही जिवाच्या भीतीने सुरक्षित ठिकाणाकडे वाटचाल करताहेत. आमचे जवान प्राण धोक्यात असूनही मदतकार्यात गुंतलेले आहेत.. तर तिकडे धारी देवीच्या दर्शनाला, तिचा कोप शांत करायला लाडू-पेढे, खण-नारळ घेतलेल्या अबालवृद्ध भाविकांची, भोळ्या माय-माऊलींची गर्दी उसळलेली आहे.. मला असे वाटते की, आजवर कोणाला ठाऊक नसलेले धारी देवीचे मंदिर आता ‘जागृत स्थान’ म्हणून लोकप्रिय होण्यास वेळ लागणार नाही..   

Categories:

Leave a Reply