Mahesh Mhatre

आपल्या देशात टोकाचे दारिद्रय आणि ‘अँटिलिया’च्या उंचीची श्रीमंती आहे. त्यामुळे जगातील पहिल्या दहा धनाढयांमध्ये जशी भारतीय नावे आहेत, तद्वत विश्वातील सर्वात जास्त दरिद्री – भुकेकंगाल आपल्याच देशात आढळतात. हा विरोधाभास सर्वच क्षेत्रांत ठळकपणे प्रकट करण्याची जणू स्पर्धाच लागलीय. सिनेमा आणि दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांवर जसे चकचकीत – चमचमीत कार्यक्रम पाहण्यास मिळतात, तद्वत क्रिकेटसारख्या खेळाला झटपट मनोरंजनाचे माध्यम बनविण्यात आले आहे. लोकांच्या दैनंदिन गरजा पुरवण्यापेक्षा त्यांचे मनोरंजन करण्याला सगळीच माध्यमे प्राधान्य देऊ लागली आहेत. त्यामुळे आज ‘इंडियन प्रीमियर लीग’चा जो मनोरंजनाचा ‘शो’ सुरू झालाय, तो दिसायला आकर्षक असला तरी ‘घुणाक्षर-न्याय’ आहे.. संस्कृत साहित्यात हा ‘घुणाक्षर-न्याय’ प्रसिद्ध आहे. ‘घुणाक्षर’ या शब्दांत ‘घुण’ आणि ‘अक्षर’ हे दोन शब्द आहेत. ‘घुं’ आवाज करणारा भुंग्यासारखा एक प्रकारचा किडा असतो, जो लाकूड पोखरतो. पोखरता पोखरता छिद्राला असा काही आकार मिळतो की, ते एखादे अक्षरच वाटावे. त्या किडयाने अक्षर गिरवण्यासाठी काही लाकूड पोखरलेले नसते; परंतु अनायासे त्यातून अक्षर निर्माण झालेले असते. म्हणूनच अचानक किंवा अकल्पित काही ‘कलात्मक’ घडले, तर ते घुणाक्षर-न्यायाने घडले असे म्हणतात.. पैसे कमावण्यासाठी निर्माण झालेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या टी-२० सामन्यांच्या झगमगाटाने आज जगाचे डोळे दीपले आहेत; परंतु कृषिमंत्री शरद पवार यांच्यासारख्या मान्यवरांनी या ‘आयपीएल’एवढेच ‘बीपीएल’ म्हणजे दारिद्रयरेषेखालील लोकांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे; परंतु तसे न होता, ‘आयपीएल’ जनतेच्याच पैशावर डल्ला मारताना दिसते. हे सगळे आता थांबवलेच पाहिजे.
आपल्या देशात कचरा, गोंगाट आदी नको त्या गोष्टी जशा ‘सर्वव्यापी’ (सगळीकडे दिसणा-या, खरे तर पिडणा-या) आहेत, तद्वत क्रिकेट हा खेळही सर्वत्र, सर्वकाळ पाहायला मिळतो.. मला आठवतेय, टळटळीत उन्हाळ्यातील ‘ती’ दुपार. मेळघाटातील धारणीसारख्या दुर्गम-आदिवासी गावातील एक रखरखीत पठार आणि शेकडो बघ्यांच्या गर्दीत सुरू असलेला क्रिकेटचा थरार, टाळ्या-शिटया आणि आरोळ्या. चौकार आणि षटकार मस्त धमाल, मनोरंजन, फुल्टू टाइमपास.

चित्र दुसरे : मुंबईतील गिरणगावची एक गल्ली. वेळ मध्यरात्रीची. भगभगीत दिव्यांनी अरुंद गल्लीचा कोपरान्कोपरा प्रकाशमान. सोबत क्रिकेटप्रेमाने ‘पेटलेले’ तरणेबांड मराठा गडी. बॅट आणि प्लॅस्टिकच्या बॉलच्या सहाय्याने रंगलेले ‘बॉक्स क्रिकेट’. ओरडा, शिव्या आणि कलकलाट. आजूबाजूच्या शेकडो चाळक-यांची झोप-शांती आणि मध्यरात्रीचा काळोख घालविणारी सात्त्विक दहशत, म्हणजे क्रिकेट..

गरीब-मध्यमवर्गीय घराघरांमध्ये प्रसिद्धी आणि श्रीमंतीचे स्वप्न पेरणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आधी इंग्रजांचा म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळ आमच्या तत्कालीन राजे-रजवाडयांनी स्वीकारला. ज्यांच्या नावाने आज ‘रणजी सामने’ भरवले जातात, त्या रणजींपासून पतौडीच्या नवाबापर्यंत अनेक राजांनी खेळल्यामुळे क्रिकेटला भारतीय समाजमनाने आपलेसे केले. तसे पाहायला गेल्यास ब्रिटिश राजवटीच्या संसर्गाने तत्कालीन राजे-सरदार आणि अभिजन वर्गाला पाश्चिमात्य पोषाख, आहार-विहार, भाषा आणि विचार यांची चांगलीच भुरळ पडली होती. पतियाळा संस्थानातील एक वरिष्ठ अधिकारी दिवाण जर्मनीदास यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिकांच्या जगण्यावर ‘द किंग्ज’ आणि ‘द क्वीन्स’ ही दोन अत्यंत सरस आणि सुरस कहाण्यांनी भरलेली पुस्तके लिहिली आहेत. त्यात इंग्रजाळलेल्या संस्थानिकांना पाश्चिमात्य संस्कृतीचे किती आकर्षण होते, याचे जागोजागी वर्णन आढळते. थोडक्यात सांगायचे तर स्वातंत्र्यपूर्वकाळात वरिष्ठ इंग्रज अधिकारी आणि आपले राजे ब-याचदा सुटीच्या दिवसांत थंड हवेच्या ठिकाणी राहात असत. क्रिकेट खेळण्यासाठी किमान दोन संघांची आणि दोन पंचांची गरज असे. हा २४ चा आकडा पूर्ण करण्यासाठी स्थानिकांची गरज पडे. त्यामधून एरवी ब्रिटिश अधिका-यांना घेऊन शिकारीला जाणा-या आमच्या राजे-सरदारांना क्रिकेटची दीक्षा मिळाली. ज्या राजपुत्रांना इंग्लंडमध्ये शिकण्याची संधी लाभली होती, त्यांना तर क्रिकेटचा पूर्ण परिचय असल्याने ते ब्रिटिश अधिका-यांच्या अधिक जवळ गेले. आज ज्या पद्धतीने भारत – पाकिस्तानातील मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी ‘क्रिकेट डिप्लोमसी’चा वापर केला जातो, तद्वत विविध संस्थांनिकांकडून तेव्हा ‘शाही सामने’ आयोजित केले जात. अशा सामन्यांना स्थानिक नागरिक ‘फुकटचे मनोरंजन’ म्हणून गर्दी करायचे. पुढे ‘यथा राजा-तथा प्रजा’ या न्यायाने ब्रिटिशांच्या या खेळाचे संस्थानिकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत संक्रमण झाले. खरे पाहायचे तर हा खेळ भारतीयांना नवा नव्हता. ‘चेंडू-फळी’ म्हणून तो शतकानुशतके भारतात प्रचलीत होताच. अगदी गोकुळातील श्रीकृष्णसुद्धा हा खेळ खेळले होते. कालियामर्दनाची जी कथा आहे, त्यात चेंडू-फळीचा उल्लेख येतो. भगवान श्रीकृष्णाने आपल्या फळीने (अर्थात बॅटने) चेंडू असा फटकावला की, तो थेट ‘कालिया डोहात’ जाऊन पडला होता.. पुढील कथा सर्वाना ठाऊक आहे. तर असा हा इंग्लिश-भारतीय संकरातून उभा राहिलेला खेळ अल्पावधीत लोकप्रिय झाला. स्वातंत्र्यानंतर इंग्रज जरी देशातून निघून गेले तरी इंग्रजी प्रथा-परंपरांनी आपले मोठेपण दाखवणारा श्रीमंत वर्ग देशात राहिला होताच. त्याच मंडळींनी क्रिकेटला जपले आणि वाढवले. अर्थात साथी राम मनोहर लोहिया यांच्यासारखा ज्येष्ठ समाजवादी नेता अगदी आरंभापासून क्रिकेटच्या विरोधात आवाज उठवत होता. कबड्डी, हॉकीसारख्या देशी खेळांना भारतात महत्त्व मिळाले पाहिजे, असे लोहियाजींचे म्हणणे होतेच, शिवाय क्रिकेट हा ब-यापैकी आरामात खेळायचा खेळ आहे, असे त्यांचे मत होते.

क्रिकेटमध्ये फुटबॉलसारखा व्यायाम नसतो. शिवाय फुटबॉल जागतिक स्तरावर खेळला जातो, मात्र क्रिकेट हाताच्या बोटावर मोजता येतील एवढयाच राष्ट्रांत खेळतात, असे लोहियाजी स्वातंत्र्यानंतरच्या जडणघडणीच्या काळातच सांगत होते; परंतु त्यांच्या सल्ल्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. परिणामी जसजसा नागरी समाज आणि मध्यमवर्ग वाढत गेला, तसा क्रिकेट भारताचा ‘राष्ट्रीय खेळ’ बनत गेला.

होय, आज जरी कागदोपत्री, शासनदरबारी हॉकीला भारताचा ‘राष्ट्रीय खेळ’ म्हणून राजमान्यता असली तरी, हॉकीला पूर्वीसारखी लोकमान्यता राहिलेली नाही, हे सर्वश्रुत आहे; कारण गेल्या पन्नास वर्षात क्रिकेटनामक वटवृक्षाने भारतीय लोकांचे हृदयाकाश असे व्यापले आहे की, तेथे अन्य खेळांना वाढायला जागाच उरलेली नाही. तुम्ही जगातला कोणत्याही मोठा देश घ्या, तेथे एकापेक्षा अनेक खेळ प्रसिद्ध असलेले दिसतात. अमेरिकेचेच उदाहरण घ्या, तेथे बेसबॉल, बास्केटबॉल, बर्फावरील हॉकी आणि अमेरिकन फुटबॉल प्रचंड लोकप्रिय आहेत. इंग्लंडमध्ये क्रिकेटसोबत फुटबॉल आणि रग्बी प्रसिद्ध आहेत. तीच गोष्ट ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, चीन वा न्यूझीलंडची. शिवाय त्या देशात ऑलिंपिकवर नजर ठेवून पदकमालिकेत उच्च स्थानावर नेणा-या खेळांकडेही लक्ष असते; पण आमच्याकडे मात्र खेळ म्हणजे क्रिकेट आणि पैसा-प्रसिद्धी म्हणजे क्रिकेट असे समीकरण बनले आहे. उर्वरित खेळांमध्ये अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पराक्रम गाजवला, तरी सामान्य क्रिकेटपटूंच्या नशिबी येणारा पैसा-प्रसिद्धीचा ओघ त्या खेळाडूंकडे येत नाही. जागतिक स्तरावर पराक्रम गाजवणारा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, टेनिसपटू लियांडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा किंवा सायना नेहवाल यांच्यासारख्या खेळाडूंकडे भारतीयांनी क्रिकेटपटूंच्या तुलनेत दुर्लक्षच केले. या मागील सामाजिक कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर समाजशास्त्रज्ञांना जगात सर्वत्र आढळणारा ‘ट्रेण्ड’ भारतात सापडला. जगामध्ये सगळीकडे नागरीकरणाच्या वेगाने एखाद्या खेळाच्या राष्ट्रीयीकरणाला मदत केलेली दिसते. ग्रामीण भागातून शहराकडे आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी खेचल्या गेलेल्या लोकांचे स्थलांतराने सामाजिक बंध तोडून टाकले होते. शहरात त्यांना नवी ओळख निर्माण करण्यासाठी क्रिकेटसारख्या खेळाने मदत केली. परिणामी शहरी मध्यमवर्गाच्या नव्या पिढीला रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून हा खेळ अधिक कळत गेला. त्या नव्या पिढीने उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुट्टीत तो आपापल्या गावी नेला. त्यामुळे खेडयातील कबड्डी, खो-खो, आटयापाटया, लंगडी, लगोरी, चोर-पोलिस, डबा एैसपैस, पोहणे, झाडावर चढणे, जंगलात फिरणे आदी खेळ वा खेळसदृश गोष्टी कमी झाल्या. आताशा नामशेषच झाल्या आणि गेल्या अर्ध्या शतकात संपर्काच्या माध्यमांच्या जोडीला क्रिकेटही भारतभर पोहोचले.

क्रिकेटच्या या जलद प्रसारासाठी त्याची ‘सर्वाना परवडणारा’ खेळ ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरली. आपल्या देशातील श्रीमंतातील श्रीमंत अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून या खेळाचा जेवढा आनंद घेऊ शकतो, तेवढयाच तन्मयतेने एखादे गरीब-खेडवळ मुलांचे टोळकेही त्या खेळाची मजा लुटू शकते. खेडोपाडयात आजही लाकडाचे फळकूट ‘बॅट’ म्हणून, तर तीन ओबडधोबड दांडकी ‘स्टम्प्स’ म्हणून वापरली जातात. त्यासाठी काहीच खर्च येत नाही. रबरी वा प्लॅस्टिकच्या बॉलसाठी प्रत्येकी रुपया-दोन रुपये जमा केले की खेळ सुरू. क्रिकेटच्या या किफायतशीरपणामुळे हा खेळ गोरगरिबांपर्यंत पोहोचला, हे वास्तव क्रिकेटचे विरोधकही नाकारणार नाहीत; परंतु क्रिकेटने देशातील अन्य खेळांची वाढ होऊ दिली नाही. परिणामी १२१ कोटी लोकांच्या भारताला ऑलिंपिक स्पर्धेत दहासुद्धा पदके मिळत नाहीत.

‘क्रिकेट हा ३० टक्के शारीरिक आणि ७० टक्के मानसिक स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे’, असे बोयटा डॅम्पनर यांनी एका ठिकाणी म्हटले आहे ते खरेही आहे. मुळात या खेळात एकावेळी दोन फलंदाज, यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्याव्यतिरिक्त इतर खेळाडूंना फारसे श्रम पडताना दिसत नाही. जेव्हा चेंडू या उर्वरित क्षेत्ररक्षकांकडे जातो त्याचवेळी त्यांना धावण्याचे किंवा फलंदाजाचे धावा अडवण्यासाठी सतर्कता दाखवण्याचे श्रम पडतात. शहरीकरणाच्या माध्यमातून नव्याने उदयाला आलेल्या भारतीय मध्यमवर्गाला स्वातंत्र्यानंतर क्रिकेटचे वेड लागण्यास या खेळातील आरामदायीपणा नक्कीच कारणीभूत ठरवा असावा. मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात सरावासाठी आलेल्या मुलांच्या पालकांशी बोलण्याचा योग आला होता. सहज म्हणून मी एका पालकाला मुलाला क्रिकेटपटू बनवण्यामागील कारण विचारले.

त्यावर ते गृहस्थ सहजपणे उद्गारले, ‘क्रिकेट हा खेळ ब-यापैकी संथपणे खेळला जातो. विशेषत: क्षेत्ररक्षण करताना खेळणा-याला अनेकदा कंटाळा येईल, अशी स्थिती असते. मुलांमध्ये क्रिकेटसोबत हे सारे सहन करण्याची सवय रुजावी, यासाठी मी त्याला या खेळाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.’ त्यांनी असे मत व्यक्त केले तरी प्रत्यक्षात पाहिले तर क्रिकेट हा खेळ जसा शरीराला म्हणावा तेवढा व्यायाम देत नाही, तद्वत विजय मिळविण्यासाठी, भीमपराक्रम करण्यासाठी क्रिकेट हा खेळ प्रेरक ठरत नाही. आज भलेही एकदिवसीय आणि आयपीएलच्या टी-२० क्रिकेट स्पर्धामुळे आपल्याला क्रिकेटचे अत्यंत आकर्षक आणि फॅशनेबल स्वरूप दिसत असले तरी भारतीयांच्या अनेक पिढया पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेटचा वेध घेत वाढल्या. पाच दिवस चालणा-या आणि ब-याचदा अनिर्णित अवस्थेत संपणा-या या खेळाने आम्हा भारतीयांच्या मनोवृत्तीवर अत्यंत प्रतिकूल परिणाम केलेला आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. विशेषत: भारताला जागतिक महासत्ता करण्याची स्वप्ने जो मध्यमवर्ग पाहत होता, त्याच मध्यमवर्गाने या आरामदायी खेळाला मोठे केले; परंतु फुटबॉल, हॉकी वा खो-खो खेळणा-यांकडे जसे शारीरिक सामर्थ्य व विजिगीषू वृत्ती असते तसे क्रिकेट खेळणा-यांकडे नसते. याचा दुष्परिणाम आपल्याला राष्ट्रीय स्तरावर झालेला दिसतोय. गेल्या दोन दशकांत आर्थिकदृष्टया सुखावलेल्या आमच्या मध्यम व निम्न मध्यमवर्गीय लोकांमध्ये मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आणि तत्सम आजार ‘साथीच्या रोगांप्रमाणे’ वाढत आहेत.

दुर्दैवाने आमचे क्रीडा धोरण आखणा-यांना या वस्तुस्थितीची अजूनही जाण झालेली दिसत नाही. त्यामुळे प्राथमिक शाळांपासून मुलांच्या क्रीडाविषयक जाणिवा विकसित करण्याचे शिस्तबद्ध प्रयत्न आपल्याकडे होताना दिसत नाहीत. फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित झाल्यामुळे हा सारा गोंधळ उडालेला आहे आणि आता त्यात ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या माध्यमातून सुरू झालेल्या टी-२० या झटपट क्रिकेटने या खेळाचे स्वरूपच बदलून टाकलेले दिसते. खरे पाहायला गेले तर ‘इंडियन प्रीमियर लीग’चा जन्म होण्याआधी ‘झी’ वृत्तसमूहाचे सर्वेसर्वा सुभाषचंद्र गोयल यांच्या सुपीक डोक्यातून ‘इंडियन क्रिकेट लीग’ अर्थात ‘आयसीएल’ची कल्पना बाहेर पडली होती. फुटबॉलच्या धर्तीवर क्रिकेटमध्ये क्लब स्थापन करावे आणि त्यांचे सामने आयोजित करताना ‘मनोरंजन’ हे एकमात्र ध्येय समोर ठेवावे, ही सुभाषचंद्र यांची योजना होती. त्या योजनेला तसा प्रतिसादही मिळू लागला होता. सुनील गावस्कर यांचा पुत्र रोहन गावसकर हाही ‘आयसीएल’च्या एका संघात खेळत होता. जशी या झटपट क्रिकेटला तरुणांची मान्यता लाभतेय, अशी भारतीय क्रिकेट संघटनेतील दिग्गजांना जाणीव झाली, तशी ‘आयसीएल’ची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातील सगळ्यात मोठा प्रयत्न झाला तो त्यांना क्रीडांगणांपासून रोखण्याचा. ‘बीसीसीआय’ने सुभाषचंद्रांच्या प्रयत्नांना खीळ घालत असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून आपली स्वत:ची ‘इंडियन प्रीमियर लीग’ स्थापन करण्याची अनुमती मिळवली. कृषिमंत्री शरद पवार यांनी या नव्या कल्पनेला संपूर्णपणे व्यावसायिक रूप देण्यासाठी ललित मोदी नामक चाणाक्ष व्यावसायिकाला हाताशी धरले. तरुण व उत्साही ललित मोदी हे एका उद्योगसमूहाशी संबंधित असल्यामुळे उद्योग व बॉलिवुडमधील उच्चपदस्थांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्या संबंधातून ‘आयपीएल टी-२०’ची धम्माल सर्कस तयार झाली. ऐंशीच्या दशकात उदयाला आलेल्या कॅरी पॅकर नामक तिरसट धनाढय़ाने जशी ‘पॅकर सर्कस’ सुरू केली होती, त्या सर्कशीत जगातील नामवंत खेळाडू ‘विकत’ घेऊन, आपला नवा खेळ मांडला होता, अगदी त्यात पद्धतीने ‘आयपीएल’ने अधिकृतपणे खेळाडूंचा लिलाव सुरू केला. पूर्वी गुलामांवर बोली लावून त्यांना विकत घेण्याची पद्धत होती, आज जग प्रगत झाले असतानाही तसे करणे चुकीचे आहे, तो मानवाधिकारांचा भंग आहे. असे सांगत काही लोक न्यायालयात गेले. अजून त्यावर निकाल लागलेला नसला तरी कोटय़वधी रुपयांची माया जमवून क्रिकेटपटू या वीस-वीस षटकांच्या सामन्यात खेळत आहेत. पुढेही खेळत राहतील. कारण या झटपट क्रिकेटने खेळाचे स्वरूपच बदलले आहे. शाहरूख खानपासून प्रीती झिंटापर्यंत एकाहून एक सरस सिनेनट संघमालक बनल्यामुळे या स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले. बडय़ा उद्योजकांनी, मग त्यात वादग्रस्त सुब्रतो रॉयपासून विजय मल्यापर्यंतचे सर्व उलाढाली करणारे लोक उतरल्याने टी-२०ला खरी ‘किंमत’ आली. पहिल्या वर्षी विकले गेलेले खेळाडू आणि संघाच्या किमती आणि आता त्यांचे चढलेले भाव याचा जरी विचार केला तरी आपल्याला हा फरक ठळकपणे दिसतो. बरं, या क्रिकेटच्या व्यावसायिकपणाचा भारतीय क्रिकेटला लाभ झाला असता तरी आपल्याला त्याबद्दल काही हरकत नव्हती; परंतु या प्रीमियर लीगच्या स्थापनेमुळे खूप जास्त क्रिकेट खेळले जाऊ लागले. त्या अति खेळामुळे आणि त्यात मिळणा-या अतिपैशामुळे आमच्या क्रिकेटपटूंचा दर्जा खाली गेला आहे. त्याचे काय?

नव्या खेळाडूंना ‘इंडियन प्रीमियर लीग’मुळे अफाट पैसे मिळतात. पंचविशीदेखील न ओलांडलेल्या या मध्यमवर्गीय घरातील मुलांना करोडो रुपयांपाठोपाठ सर्व प्रकारच्या आमिषांचा स्वीकार करावा लागतो. अनेकदा ती आमिषे नाकारण्याचाही त्यांना अधिकार नसतो. त्यामुळे त्यांच्या जगण्यावर होणारे परिणाम भयंकर धक्कादायक असतात; परंतु पैशाच्या दुनियेत असा कोणाचा भावनिक विचार करण्यासाठी कुणालाच वेळ नसतो. सुनील गावसकर यांनी गायलेले क्रिकेटच्या खेळावर आधारित एक मराठी गाणे ब-याच वर्षापूर्वी लोकप्रिय ठरले होते.

या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला आमच्या तरुण खेळाडूंची आता अगदी तीच अवस्था झालेली आहे. सगळ्या मोहमयी आमिषांचा सामना करीत त्यांना आपली वैयक्तिक – सांघिक कामगिरी टिकवून ठेवावी लागते, अन्यथा जर एकदा प्रभावळीतून बाहेर पडलात, तर कधी त्यांचा विनोद कांबळी होईल याचा नेम नसतो.

थोडक्यात सांगायचे तर आजवर भारतात क्रिकेटला ‘धर्म’ आणि क्रिकेटपटूंना ‘देव’ मानण्याची जणू प्रथाच पडली होती. क्रिकेटच्या वेडामुळे भारतीयांना जात-धर्म आणि भाषा या भेदांमधून मुक्त केले आणि एकत्र आणले, हे मान्य. क्रिकेट हा अवघ्या भारतीयांना साधणारा एक दुवा ठरला हेसुद्धा खरे. क्रिकेटचा सामना सुरू असल्यावर ऑफिसला दांडी मारणे, हे पुण्यकर्म मानण्याची एकेकाळी आपल्याकडे परंपरा होती. भारत-पाक सामना सुरू असेल तर रस्त्यावर चिटपाखरूदेखील फिरकत नसे. विश्वचषक सामने तर अनेक कुटुंबांसाठी ‘जागरण’ ठरायचे; परंतु आता ‘आयपीएल’च्या झटपट क्रिकेटने या खेळातील थरार, स्पर्धेच्या जागी मनोरंजनाचा बार उडवून दिला आहे. त्याला ‘चीअरगर्ल्स’ची झणझणीत जोड आणि सोबत सिनेतारेतारकांची लक्षणीय उपस्थिती, या सगळ्यांमुळे झटपट क्रिकेट हा फटाफट फुटणारा फटकेबाज फटाका बनलाय. नव्याने पाहणा-या कोणत्याही व्यक्तीचे डोळे त्याच्या आतषबाजीच्या दीपत्काराने दिपून जाणे साहजिक आहे; परंतु ज्यांनी हे झटपट किक्रेटचे ‘फॅड’ देशात वाढवले आणि पसरवले त्या शरद पवारांपासून मुकेश अंबानींपर्यंतच्या जाणत्या मंडळींनी, ‘आयपीएल’एवढेच ‘बीपीएल’ म्हणजेच दारिद्रयरेषेखालील लोकांकडे लक्ष दिले पाहिजे. ‘आयपीएल’मध्ये होणा-या हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नापैकी काही रक्कम तरी चाळीस कोटींहून अधिक संख्येने असणा-या भुकेकंगाल लोकांपर्यंत जावी, दुष्काळग्रस्तांना कायमस्वरूपी मदत व्हावी अशी अपेक्षा आम्ही आमच्या प्रेमाच्या प्रतिसादावर उभ्या राहिलेल्या क्रिकेटकडून करीत आहोत.. लोकांचे पैसे गरजू लोकांपर्यंत जाण्यास कुणाचाच आक्षेप नसेल, अशी आम्हाला आशा वाटते.

Categories:

Leave a Reply