Mahesh Mhatre

एकटया-दुकटया तरुणीची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, अपहरण आणि खून या प्रकारांना सध्या देशभरात अक्षरश: ऊत आला आहे. स्त्रीकडे बघण्याचा परंपरागत दृष्टिकोन हे याचे सगळ्यात मोठे कारण आहे. शिक्षणाने स्त्री समर्थ झाली तरी ती म्हणजे उपभोगाचे साधन, मूल देणारे यंत्र, फुकट राबणारी नोकर हाच संकुचित आणि अमानुष विचार आपल्या समाजाने वर्षानुवर्षे केला. त्यातून स्त्रीचे प्रत्येक टप्प्यावर शोषण झाले. आज महिलांवर अत्याचार करून गाजवला जाणारा ‘पुरुषार्थ’ याच बुरसट विचारसरणीचा परिपाक आहे. त्यामुळे स्त्रीत्वाचा अपमान करणा-या प्रवृत्तीचा नायनाट करायचा तर स्त्रीला देवीचा दर्जा देण्याची गरज नाही तर तिच्याशी समान पातळीवर नाते जोडायला हवे.


सुप्रसिद्ध इंग्रजी कवी विल्यम ब्लेक यांची ‘रुग्ण गुलाब’ ही कविता मराठीतील थोर कवयित्री शांता शेळके यांनी अनुवादित केली आहे. ‘मधुसंचय’ या अनोख्या पुस्तकात शांताबाईंच्या शब्दातून उतरलेली ती कविता आज प्रकर्षाने आठवते..

कविवर्य विल्यम ब्लेक लिहितात,
अरे सुंदर गुलाबाच्या फुला
रुग्णावस्था आली आहे तुला!
रात्रीच्या गरजणा-या वादळातून
आलेल्या एका नगण्य कीटकाला
सापडली तुझी किरमिजी हर्षाची सुंदर सुखशेज
घुसला तो तिथे..
आणि त्याच्या गुप्त काळ्या प्रेमातिरेकाने
टाकले तुझे मुग्ध जीवन उद्ध्वस्त करून!

दिल्लीमधील नराधमांच्या टोळीने चालत्या बसमध्ये ज्या दुर्दैवी मुलीवर बलात्कार केला, त्या मुलीच्या तन-मनावर झालेल्या अत्याचाराच्या बातम्या वाचताना ‘अरे सुंदर गुलाबाच्या फुला.. रुग्णावस्था आली आहे तुला!’ या कवितेच्या ओळी डोळ्यापुढे आल्या आणि अंगाचा थरकाप उडाला. बलात्कार हा शब्द फिका वाटावा इतका भयंकर अत्याचार नशिबी आलेल्या त्या दुर्दैवी मुलीचा गुन्हा कोणता? तिच्यावर असा दु:खद प्रसंग का ओढवला? याचे शास्त्रशुद्ध विवेचन होणे आज गरजेचे आहे, परंतु आपल्या देशात तशी विचार करणारी बुद्धिमंत मंडळी उरलेली नाहीत. त्यामुळे ‘भलता रोग आणि सलते उपाय’ सुरू असल्याचा अत्यंत तापदायक प्रकार पाहायला मिळतोय. आपली राजधानी म्हणून दिल्ली जेवढी प्रसिद्ध आहे, त्यापेक्षा जगभरात बलात्काराच्या घटनांची, स्त्रियांच्या असुरक्षिततेची राजधानी म्हणून ती कुख्यात बनली आहे.

आज नाही, गेल्या दोन दशकांपासून दिल्लीने आपला हा बदनामीचा दुलरकिक कायम ठेवलाय, कसोशीने जपलाय. महाभारत काळात द्रौपदीचे वस्त्रहरण मुकाटपणे सहन करणारी ही इंद्रप्रस्थनगरी स्त्रियांच्या सन्मानासाठी इतिहासात कधीच प्रसिद्ध नव्हती, त्यामुळे ‘ती दिल्ली दूर होती’ तेच बरे होते. परंतु स्त्रियांचा अपमान, उपमर्द आणि अत्याचारासाठी आता दिल्ली काय आणि डोंबिवली काय, कुठेच काही फरक उरलेला नाही. एकटया-दुकटया तरुणीची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, अपहरण आणि खून या प्रकारांना देशभरात अक्षरश: ऊत आला आहे. एकीकडे आम्ही मोठया अभिमानाने आमचा देश जगात सगळ्यात जास्त तरुण आहे, याचा डांगोरा पिटत आहोत. तर दुसरीकडे आमच्या या उत्साही तरुणांचा ‘पुरुषार्थ’ स्त्रियांवर अत्याचार करताना सिद्ध होतोय. आजची तरुणाई कुठे चालली आहे, तिचे असे वाहवत जाणे देशाला कुठे नेणार आहे, याचा कुणीच विचार करताना दिसत नाही, कारण कुठल्याही रोगाची संपूर्ण चिकित्सा करून यथायोग्य उपचार, वेळ पडल्यास शस्त्रक्रिया करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आमच्या देशात अस्तित्वात उरलेली नाही.


त्यामुळे आमच्या समाजाला लागलेला हा सामाजिक दुर्वर्तनाचा रोग कधीच बरा होताना दिसला नाही. तात्पुरत्या उपायाने त्या रोगाचे स्वरूप बदलत असते. समजा बलात्कार रोखण्यासाठी पोलिस सजग झाले, प्रसारमाध्यमांनी आरडाओरड केली तर आत्महत्यांचे प्रमाण वाढते किंवा शिकलेल्या तरुणांमध्ये इतर प्रकारच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेले दिसते. हे आपण सारे गेल्या काही वर्षापासून अनुभवतोय, तरीही या सामाजिक समस्येवर चिंतन आणि मंथन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न होत नाही, याचा अर्थ आमचा समाज कोडगा झालाय का?


परवा अमेरिकेत एका माथेफिरू तरुणाने एका शाळेत घुसून काही बालक आणि शिक्षकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्याच्या गोळीबारात मरण पावलेल्या बालकांच्या निष्पाप चेह-यांकडे पाहिल्यावर कोणाही संवेदनशील माणसाच्या हृदयाला पाझर फुटेल, पण त्या माथेफिरू तरुणाने निरागसतेच्या दवबिंदूने सजलेल्या त्या अजाण बालकांना रक्ताच्या थारोळ्यात पाहायचा हव्यास धरला आणि त्यातून असे हत्याकांड घडले, त्यामुळे जगातील बलाढय महासत्तेचा सर्वोच्च सत्ताधीशही भांबावला.

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्या दुर्दैवी घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना आपले अश्रू आवरू शकले नाहीत. अवघी अमेरिकाच नाही, तर जग हलवून सोडणा-या त्या हत्याकांडावर अमेरिकन लोकांची, प्रशासनाची प्रतिक्रिया आपण लक्षात घेतली पाहिजे. ते म्हणाले, ‘‘त्या तरुणाला बालकांवर गोळीबार करावा असे का वाटले असेल, याची सामाजिक कारणे शोधून काढावी लागतील. कारण एकटयादुकटया माणसाला दोष देऊन, जमल्यास फाशी देऊन हा प्रश्न सुटणार नाही. ही सामाजिक विकृती निर्माण झाली. आमच्या समाजाची प्रकृती बिघडली आहे. तिच्यातील रोग दूर केले तरच अशा घटना टळतील किंवा कमी होतील.’’ अमेरिकन तंत्रज्ञान, जीवनशैली, खाद्यपदार्थ, दारू, अत्तर आदींचा हव्यास धरणा-या आणि ‘अमेरिकन ड्रीम्स’मध्ये रमून तिकडेच स्थायिक होण्याचा ध्यास घेणा-या आमच्या लोकांनी सामाजिक प्रश्नाकडे पाहण्याची, ही अमेरिकन विचारपद्धतीही आता स्वीकारली पाहिजे. होय आमच्या देशात, आमच्या आया-बहिणींवर होणा-या अत्याचाराचा पद्धतशीर बिमोड झालाच पाहिजे.

एरवी स्त्रियांना मातेचा, देवीचा दर्जा देणारा आमचा भारतीय समाज अत्यंत भंपक आहे. अपवाद फक्त मातृसत्ताक कुटुंबपद्धती असणा-या ईशान्य भारत, केरळ आणि दक्षिणेतील काही भागांचा. उर्वरित सर्व प्रदेशांत स्त्री म्हणजे उपभोगाचे साधन, मुले देणारे यंत्र, घर-शेती व अन्य व्यवसायात फुकट राबणारी नोकर असे तिचे स्थान होते. मोगलांच्या आक्रमणाआधी हिंदू धर्माने, विशेषत: मनुस्मृतीने स्त्रियांच्या सामाजिक वावरावर बंधने आणली. तिचा अधिकार मर्यादित केला. एकेकाळी मातृसत्ताक कुटुंबात दुर्गा, काली, लक्ष्मी वा सरस्वती बनून सगळी कार्य प्रसन्नवदनाने, अष्टावधानाने पार पाडणारी स्त्रीशक्ती हिंदू धर्मातील कर्मकांडाने सुपारीच्या किमतीची केली. पुरुष मोठा वृक्ष तर स्त्री नाजूक वेल आहे. पुरुष सबल तर स्त्री अबला आहे. स्त्री म्हणजे पुरुषाची सावली, नाजूकशी बाहुली आहे, असे काव्यात्म उदात्तीकरण करत त्याला जगदंबा, कालीमाता अशा पराक्रमी देवतांची जोड देत पुराणकथांनी भारतीय स्त्रीला भूल दिली, भुरळ पाडली आणि त्या बेसावध अवस्थेत तिला परंपरेच्या चिरेबंद चौकटीत बंदिस्त केले. आजही ती चौकट वेगवेगळ्या स्वरूपात स्त्रियांभोवती फिरताना दिसते. परंतु शिक्षणाने समर्थ झालेल्या स्त्रिया जेव्हा जाणत्या झाल्या, कमावत्या झाल्या तेव्हा, तेव्हा ही चौकट त्यांच्या गळ्याभोवती पाश आवळताना दिसली. आजही परिस्थिती वेगळी नाही.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांचे त्यावेळी वय होते फक्त २१ वर्षे. सावित्रीबाई त्यांच्याहून लहान, पण आचार आणि विचाराने महान असलेल्या या जोडप्याच्या लोकोत्तर कार्याला समाजाने काय दिले? शेणगोटे! शिक्षणप्रसाराच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या त्या माऊलीने पुण्यातील सनातन्यांचे दगड, शिव्याशाप सहन केले. महात्मा फुले तिथेच थांबले नाहीत, त्यांनी १८५४ मध्ये दलितांसाठी शाळा काढली. तत्कालीन विधवांची स्थिती अत्यंत दयनीय होती, त्या दुर्दैवी लेकीबाळींच्या दु:खनिवारणार्थ फुले दाम्पत्याने ‘१८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह’ ही अगदी घरगुती स्वरूपाची संस्था काढली. ‘आमच्या घरी प्रसूतीसाठी या आणि मूल इथेच ठेवून जा’ अशी काळाच्या पुढे नजर ठेवणा-या फुल्यांनी ‘विधवा विवाहा’ची पोकळ चर्चा नाही केली तर तसे विवाह प्रत्यक्षात घडवून आणले. हे करताना त्यांनी अपार कष्ट उपसले, यातना, अपमान सोसले म्हणून भारतीय समाजाला रूढीच्या बंधनातून सुटण्याचा मार्ग मिळाला.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या कामामुळे स्त्रियांना जगण्याचे भान आले. आपल्या अधिकारांची जाण आली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीत स्त्रिया उतरल्या, शाळा-महाविद्यालयात जाऊ लागल्या आणि पुढे तर नोकरीही करू लागल्या. भारतातील पहिल्या स्त्री-डॉक्टर म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या लिखाणात शिक्षणाने आलेला स्त्रीशक्तीचा हुंकार जाणवतो. त्या म्हणतात, ‘‘स्त्री-पुरुषांनी आपापले रक्षण करावे आणि एकमेकांवर निर्वाहाकरिता किंवा कोणत्याही गोष्टीकरिता अवलंबून राहू नये. म्हणजे मग घरातील भांडणे आणि समाजातील हीनतेची स्थिती नाहीशी होईल.’’ स्वातंत्र्यपूर्वकाळात अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण घेतलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचे वरील उद्गार सामाजिक बदलासाठी मार्गदर्शक होते, परंतु आमच्या धर्म-संस्कृती आणि पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेने स्त्रियांच्या पायात आधी लोखंडाच्या बेडया टाकल्या होत्या, आता त्या सोन्याच्या असतात.

मुलगी कितीही शिकली तरी तिला तिच्यापेक्षा जास्त शिकलेला, जास्त पगार आणि वय असणारा नवराच शोधला जातो. अगदी मुलीकडील लोकही घरंदाज, खानदानी वगैरे लेबलं असणा-या मुलांनाच प्राधान्य देतात. त्यामुळे ‘मनुस्मृती’ आधुनिक पिढीच्या विस्मृतीत गेली असेल, परंतु तिच्या विकृत विचारांची पाळेमुळे अजून शाबूत आहेत, हे दिसते. लहानपणी मुलगी वडील आणि भावांच्या धाकात असलेली आजही पाहायला मिळते. ती लग्नानंतर पतीच्या आज्ञेत राहते आणि पतीनिधनानंतर वा वृद्धापकाळी मुलाबाळांच्या आश्रयाने जगते, ही घरोघरी दिसणारी वस्तुस्थिती आहे.

या शेकडो वर्षे पुराण्या परंपरेच्या वस्तुस्थितीत स्त्रियांवरील अत्याचाराची कारणे दडलेली आहेत. या पारंपरिक व्यवस्थेने सदैव मुलाला ‘कुलदीपक’ मानले आणि मुलीला ‘परक्याचे धन’ ठरवले. ती तारुण्यात आल्यावर याच चलाख सांस्कृतिक परंपरांनी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी अशा पतिव्रतांच्या कथा रचल्या. त्या कथांनी तिला पतिव्रतांचे महत्त्व तर सांगितलेच पण ‘स्त्रीचे चारित्र्य म्हणजे जणू काचेची वस्तू, एकदा फुटली तर पुन्हा सांधता येणार नाही’ असेही ठसवले. त्याउलट पुरुषाला ‘मर्दुमकी’ गाजवण्याची शास्त्रसंमत परवानगी. त्याला कृष्णासारख्या देवाच्या कथांचा नव्हे लीलांचा सबळ आधार पुरवला गेला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक टप्प्यावर आमच्या देशात स्त्रियांवर घोर अन्याय झाला, आजही होतोय. खरे सांगायचे तर आता त्याचे प्रमाण जास्त गंभीर होत आहेत, कारण स्त्रिया नुसत्या शिकलेल्या नाहीत, त्यांनी पुरुषांची सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत.

आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी आर्थिक आणि वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त केले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला नेतृत्वाचे कोंदण लाभल्यामुळे समाजाच्या विविध स्तरांत स्त्रियांची प्रगती होताना दिसते. नेमकी हीच गोष्ट पारंपरिक भारतीय समाजाच्या पचनी पडत नाही, असे दिसते. स्त्रियांचे आर्थिक, शैक्षणिक खरे तर सर्वार्थाने सक्षम होणे, हा जणू आपल्या अस्तित्वाला धोका आहे, अशा पद्धतीने बहुतांश भारतीय पुरुष विचार करतात. त्यातील काही अप्रत्यक्ष तर बरेच प्रत्यक्षपणे व्यक्त होतात. अशा थेट व्यक्त होणा-या लोकांच्या मनात ‘स्त्री ही केवळ स्त्री’ हीच भावना असते. तिचे शिक्षक, वकील, इंजिनीअर वा आपले ‘बॉस’ होणे अजिबात पसंत नसते. ती जर वर्गात वा ऑफिसात जास्त हुशार असेल तर तिला नाव ठेवण्यासाठी पुरुषांसाठी तिचे स्त्रीत्व, हे सगळ्यात मोठे आणि सोपे लक्ष्य ठरते. ती जोवर टप्प्यात नसते तोवर पुरुषांच्या मनात दडलेला आदिम हिंस्र पशू तिला शब्दांनी छेडण्यात, प्रसंगी टोमणे मारण्यात धन्यता मानतो. आणि परिस्थितीने जर ती त्याच्या ‘संरक्षित क्षेत्रात’ आलीच तर त्या माणसातील पाशवी वृत्ती तिच्यावर सहजपणे बलात्कार करतात. मुख्य म्हणजे माणसातील हा पशू जागा होण्याच्या प्रक्रियेचा आणि त्याच्या शिक्षणाचा, पदाचा, प्रतिष्ठेचा, वयाचा, नात्याचा कसलाच, होय अगदी कसलाच संबंध नसतो. त्याच्या वासनेला फक्त स्त्रीची भूक असते. सगळ्यात मोठे दुर्दैव म्हणजे त्या क्षणी स्त्री असणे हिच स्त्रीची चूक असते!

भारत स्वतंत्र झाला, अगदी तेव्हापासून खरे तर स्त्रियांच्या संरक्षणाच्या या ज्वलंत विषयावर लक्ष देणे आवश्यक होते. तेव्हा ते झाले नाही. म्हणून आज या समस्येने अवघा महिलावर्ग होरपळून निघतोय. १९५३मध्ये स्वतंत्र भारतातील पहिलावहिला ‘गुन्हे सर्वेक्षण अहवाल’ प्रसिद्ध झाला होता. त्यात भारतीय पोलिस दल कोणत्याही गुन्ह्याचा तपास करायला किती अकार्यक्षम आहे, याचा स्पष्ट उल्लेख होता. ‘पोलिसांच्या तपासकार्याच्या एकंदर पद्धतीमध्ये कोणतीही प्रगती दिसत नाही. त्यांच्या तपासकामाला शास्त्रीय आधार नसतो. खेडय़ातील वा शहरातील पोलिस ठाण्यात एखाद्या गुन्ह्याचा शास्त्रशुद्ध तपास करण्यासाठी जी साधने लागतात, ती अजिबात दिसत नाहीत,’ हे ६० वर्षापूर्वीचे विधान आजही तंतोतंत खरे आहे. त्यामुळे गुन्हा कोणताही असो, तो सिद्ध करणे मोठे कठीण बनते.

एक वेळ चोरी, खून, मारामारीचे गुन्हे ख-या-खोटया साक्षीदारांच्या बळावर पुढे नेता येतात, पण बलात्कार वा विनयभंगाच्या केसेस पोलिसांपर्यंत जाण्याचे प्रमाण आधीच कमी आहे. कारण भारतात घडणा-या १० पैकी ९ बलात्काराच्या केसेसमध्ये माहितीतल्या, ओळखीच्या किंवा नात्यातील व्यक्तीकडून बलात्कार होतो, असे शासकीय आकडेवारी सांगते, त्या परिस्थितीत बलात्कारित स्त्रीला, घर-परिसरातून केस मागे घेण्यासाठी दबाव येतो. ब-याचदा पोलिस समजूतदारपणाचे ढोंग करून त्या पीडित स्त्रीला कायद्याच्या चक्रव्यूहाचे भय दाखवतात. तरीही ती स्त्री बधली नाही तर तिला बदनाम केले जाते. प्रसंगी धमकावले जाते. एवढे करूनही ती मागे हटली नाही, तर कायद्याच्या चौकटी पुढे करून तिला रोखले जाते. आज दिल्ली-डोंबिवलीतील स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांनी समाजमन अस्वस्थ झालेले आहे. त्यामुळे बलात्कार करणा-याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी होत आहे. पण जर कायदेशीर प्रक्रियेतून आरोपी मोकळे सुटण्याची परंपरा कायमच राहणार असेल तर फाशीच्या शिक्षेची तरतूद करून काय फायदा होणार आहे?

‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो’ने पाहिल्यांदा बलात्काराच्या गुन्हेविषयक आकडेवारी १९७३ मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यावर्षात देशभरातील पोलिस ठाण्यांमध्ये २९१९ बलात्काराच्या घटनांची नोंद झाल्याचे आढळते. २०१० मध्ये हेच बलात्काराचे प्रमाण जवळपास दसपटीने वाढून २०,२६२ झालेले दिसते. १९७३ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या सुमारे पाच हजार होती तर २०१० मध्ये ती ९० हजार झालेली दिसते. विशेष म्हणजे, या घटना पोलिस ठाण्यातून न्यायालयात गेल्या म्हणून अहवालात त्यांची नोंद आहे. पोलिसांपर्यंत न जाणा-या घटनांचे प्रमाण आपल्या देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे स्त्रियांच्या स्त्रीत्वाचा अपमान करणा-या मनोवृत्तीचा नायनाट करणे, ही आता काळाची गरज बनली आहे. त्यासाठी सुशिक्षित म्हणवणा-या प्रत्येक व्यक्तीने स्त्रीला देवी किंवा आईचा दर्जा दिला नाही तरी चालेल, त्याने तिच्याशी समान पातळीवरील नाते जोडावे. तिला तिला सन्मान द्यावा.

आपल्या पुढील पिढीतही हा संस्कार रुजवावा. तरच आपल्याकडील स्त्रियांचे जीवन बदलेल. मानवी उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्रियांचे आयुष्य बदललेले दिसते. राहुल सांकृतायन यांनी आपल्या ‘वोल्गा ते गंगा’ या पुस्तकात ‘स्त्रीसत्ताक कुटुंब जीवनपद्धती’ शेती करायला लागल्यानंतर पुरुषसत्ताक’ कशी झाली या स्थित्यंतराचे समर्पक वर्णन केलेलं आहे. त्यानंतर नजीकच्या मानवी इतिहासात फ्रेंच राज्यक्रांती, इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती आणि रशियातील साम्यवादी क्रांती या तीन महत्त्वाच्या घटनांनी जगातील स्त्रियांच्या जगण्याला आकार दिला. त्याहीपेक्षा स्त्रियांच्या समान हक्कांना मनापासून पाठिंबा दिला. अमेरिकेतील लोकशाहीवादी समाजात, भलेही आरंभीच्या काळात स्त्रियांना आपल्या हक्कासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागला होता, परंतु त्यानंतर गेल्या १०० वर्षात अमेरिकन स्त्रियांनी आपल्या मूलभूत स्वातंत्र्याबरोबर जगण्याचा संपूर्ण अधिकार मिळवला आहे.

आपल्या भावभावनांपासून जगण्याच्या पद्धतीपर्यंत स्त्रिया स्वत:चा निर्णय स्वत: घेण्यास समर्थ आहेत. तशी परिस्थिती आणि तशी मोकळीक भारतीय स्त्रियांना मिळाली तर ख-या अर्थाने आपल्या देशाची प्रगती आज जी पुरुषाच्या एकहाती नेतृत्वाकडे आहे, ती स्त्रियांच्या समर्थ खांद्यावर सोपवली पाहिजे. सर्व क्षेत्रांतील स्त्री सहभागाशिवाय आणि पुढाकाराशिवाय देशाला प्रगती करता येणार नाही, हे आपण सा-यांनी मान्य केले पाहिजे. शालेय शिक्षणापासून नोकरीतील समान हक्कांपर्यंत, महत्त्वाच्या पदांवरील समान संधीपर्यंत प्रत्येक टप्प्यांवर स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले, तर बलात्कार वा अत्याचाराच्या घटना कमी होतील. निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी ती अत्यावश्यक गोष्ट ठरेल.

ठळक अनुमान

कायद्यातील सुधारणा आणि चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मोहिमा होत असल्या तरी १९७३पासून बलात्काराच्या खटल्यात आरोपी हे दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.

खुनांच्या खटल्यातील आरोपींवर दोष सिद्ध होण्याचे प्रमाणही घटले असले तरी न्यायालये बलात्कारापेक्षा खुनाच्या खटल्यात आरोपींना दोषी ठरवण्याची शक्यता जास्त आहे, यावरून गुन्हेगारी न्यायालयांचा पक्षपातीपणा दिसून येतो.

अधिकाधिक महिला बलात्काराची तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. पण हे खटले धोक्याचा इशारा द्यावा इतक्या प्रचंड प्रमाणात अनिर्णीत आहेत.

बलात्कारपीडितांना अल्प न्याय

या वर्षात पोलिसांनी नोंदवलेल्या ताज्या घटनाखटल्याप्रकरणी कोठडीत किंवा जामिनावर असणा-यांची संख्यासंशयित गुन्हेगारांविरोधात पूर्ण झालेले खटलेएकत्र केलेले किंवा मागे घेतलेले खटलेसंशयित गुन्हेगारांविरोधात सिध्द झालेले गुन्हेदोषी सिध्द झालेल्या संशयित गुन्हेगारांची टक्केवारी
भारतातील १९७३ मधील गुन्हेगारी, बलात्कार तौलानिक खून२९१९
१०७५४
४९९१
२६९७८
१५११
९७२५
२६
२०७
६६९
४५८४
४४.२८
४७.१४
भारतातील १९८३ मधील गुन्हेगारी, बलात्कार, तौलानिक खून६०१९
२५११२
१०७१६
१७४२०२
५९८५
४५७७३
१०२
२९१
२०४
१८३१८
३६.८३
४०.०२
भारतातील १९९३ मधील गुन्हेगारी, बलात्करा, तौलानिक खून१२२१८
३८२४०
३८१७८
१२५८४३
६२९३
१९२०६
१३७
३०३
१९०७
७९५८
३०.३०
४१.४३
भारतातील २००३ मधील गुन्हेगारी, बलात्कार, तौलानिक खून१५९१३
३६९२९
७०१९७
१७९६८०
१३१०७
२७६६६
३६१
३९५
३४२३
९४३३
२६.१२
३४.१०
भारतातील २०१० मधील गुन्हेगारी, बलात्कार, तौलानिक खून२०२६२
३५५३१
८९७०७
१७६०५७
१४२६३
२२८२०
१४९
८४
३७८६
८३८३
२६.५४
३६.७४

तुमचे शहर कितपत सुरक्षित?
शहरपोलिसांकडे नोंदवलेले बलात्काराचे गुन्हे २०१०प्रतिलाख लोकसंख्येमागे नोंदवलेले बलात्काराचे गुन्हे
चैन्नई४७०.७
बंगळुरु६५१.१
दिल्ली४१४३.२
कोलकात्ता३२०.२
मुंबई१९४१.२
हैदराबाद४५०.८
कोच्ची२०१.५
कोईम्बतूर१५
विशाखापट्टणम५३
पुणे९१२.४
लखनौ५२२.३
फरीदाबाद५१४.८
जबलपूर८१७.३

Categories:

Leave a Reply