Mahesh Mhatre

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जाणारा आमचा देश भविष्यात आर्थिक महासत्ता होईल, अशी आशा लावून बसलेल्या मध्यमवर्गीयांचा आता अपेक्षाभंग होऊ लागला आहे. त्यांच्या बुद्धिमान पोरा-बाळांनी कधीच इंग्लंड-अमेरिकेची वाट धरलेली आहे. जे देशात उरलेत त्यांनी या देशात जे काही आहे, ते वाईट, त्याज्य आहे, अशी भूमिका घेतलेली आहे. संख्येने कमी असणारा, जातीय आधार नसलेला हा वर्ग अल्पसंख्य आहे, म्हणून व्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी तो नित्यनवे मार्ग शोधत असतो. कधी अण्णा हजारेंची टोपी चढवून मैदानात येतो, कधी रामदेवबाबांच्या इशा-यानुसार ‘आंदोलनासन’ करू लागतो. ‘हातचा खेळ’ असणाऱ्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करून हा भित्रा परंतु घातकी वर्ग समाजातील मान्यताप्राप्त व्यक्ती, प्रतीके आणि संस्थांचे भंजन करताना दिसतो. व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी हे याच अस्वस्थ, आत्ममग्न आणि उन्मत्त मध्यमवर्गाचे अपत्य आहे. गांधी-भगतसिंग यांच्याबद्दल या मध्यमवर्गाला अजिबात प्रेम नाही. परंतु त्यांचे नाव किंवा नाणे हातात घेतल्याशिवाय भारतात कुणालाच ‘किंमत’ मिळत नाही, हे हा लबाड मध्यमवर्ग ओळखून आहे. त्यामुळे असीमला अटक होण्याची वाट पाहणारा हा वर्ग तशी वेळ येताच चोहोदिशांनी एकत्र आला. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत सुटला. जणू काही स्वातंत्र्ययुद्धाची लढाई लढतो आहोत, अशा आवेशात पंचविशीतील असीम भाषण ठोकू लागला.. या एकंदर घटनेला लोकांचा पाठिंबा मिळू शकतो, हे लक्षात येताच तमाम राजकारणी पोपटासारखे बोलू लागले. परिणामी असीमची भडकावू व्यंगचित्रे हा आपल्या देशासमोरचा राष्ट्रीय प्रश्न बनला.. त्यामुळे आर्थिक टंचाई, मंदी आणि गरिबीने गांजलेला आमचा देश, बौद्धिक दिवाळखोरीकडे जाताना दिसला. देशाचे हे ‘व्यंगचित्र’ बदलायला आता शिवबा राजांसारखा समाज शिल्पकार हवा आहे.

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि ‘कॉमन मॅन’चे जनक आर. के. लक्ष्मण आणि त्यांच्या पत्नी कमला यांना कतारच्या सत्ताधिशांनी एकदा शाही पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्या दौ-यादरम्यान आर. के. लक्ष्मण यांचे जाहीर व्याख्यानही आयोजित केले होते. एका अत्यंत आलिशान सभागृहात लक्ष्मण यांना ऐकण्यासाठी श्रोत्यांनी गर्दी केली होती. लक्ष्मण सावकाशपणे उठले आणि अत्यंत सौम्यपणे बोलू लागले. त्यांच्या पहिल्याच वाक्याने अवघे सभागृह हादरले, थक्क झाले. ते म्हणाले, ‘जेव्हापासून मी तुमच्या देशात पाऊल टाकले आहे, मी प्रचंड दु:खी झालो आहे. खरे सांगायचे तर अगदी अस्वस्थ आहे,’ लक्ष्मणसाहेबांच्या या वाक्याने श्रोत्यांपेक्षा शाही यजमान खूपच जास्त अस्वस्थ झालेले दिसत होते. सगळयांना आता पाहुणे पुढे काय म्हणतात, याची उत्सुकता लागली होती. नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या खिशात हात घालून लक्ष्मण बोलू लागले, ‘‘येथे मी सकाळी १० वाजता गाडी घेऊन येण्यास ड्रायव्हरला सांगितले, तर तो पाच मिनिटे वेळेपूर्वीच येऊन उभा असतो, अगदी एसी वगैरे सुरू करून. मला गाडीचा दरवाजाही उघडावा लागत नाही. तो मला पाहताच चपळाईने गाडीबाहेर येतो आणि अदबीने दार उघडतो. मी जेव्हा तुमच्या देशात फिरतो तेव्हा माझ्या पोटात गोळा येतो; कारण तुमच्या इथे रस्त्यात खड्डेच नसल्याने प्रवास अगदी आरामात होतो, मला आपली खड्डयांची सवय. बरं इथे रस्त्यावरील प्रत्येक दिवा पेटलेला दिसतो. भिंतीसुद्धा अगदी स्वच्छ, पानाची कुठेही पिचकारी उडलेली दिसत नाही. मग मला आता सांगा, अशा देशात माझ्यासारख्या मुंबईकराला नैराश्य येणार नाही का?’’ आर. के. लक्ष्मण यांच्या या वाक्याने सभागृहात हास्यस्फोट झाला, टाळयांच्या गजराने सभागृह दुमदुमून गेले होते.


एका व्यंगचित्रकाराच्या ‘निरीक्षणा’ला रंग, रेषा, चित्र किंवा कागदाच्या मदतीशिवायही लोकांची दाद मिळू शकते, याचे त्या प्रसंगातून प्रत्यंतर मिळाले होते. ख-या व्यंगचित्रकाराची तीच खरी ओळख असते. आर. के. लक्ष्मण यांनी चार दशकांहून आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून भारतीय समाजमनाची मशागत केली. त्यांच्याच जोडीने ‘फ्री प्रेस- नवशक्ति’मध्ये आपल्या कुंचल्याच्या फटका-याने भल्याभल्यांची झोप उडवणा-या बाळासाहेब ठाकरे यांनी तर चार दशकांहून अधिक काळ मराठी मनावर अधिराज्य गाजवले. अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरू झालेला हा व्यंगचित्रांचा किंवा अर्कचित्रांचा प्रवास आता कधी नव्हे एवढा अडथळयांचा बनलाय. चारेक महिन्यांपूर्वी प्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर यांनी काढलेल्या पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्रांनी संसदेत अक्षरश: रणकंदन माजलेले दिसले. सुमारे ६० वर्षापूर्वीच्या त्या व्यंगचित्रांचा आमच्या ‘सुज्ञ’ लोकप्रतिनिधींनी आजच्या परिप्रेक्ष्यातून विचार केला. काही ‘शहाण्या’ लोकांना त्यात ब्राह्मण-दलित संघर्षाची किनार दिसली. परिणामी नेहरू आणि आंबेडकर या विचारवंत नेत्यांना लाज वाटली असती, अशा अत्यंत खालच्या पातळीवर या अर्कचित्रावरील चर्चा गेली. शेवटी भेदरलेल्या सरकारने ते पुस्तकच अभ्यासक्रमातून काढून टाकले, तेव्हा कुठे तो वाद शांत झाला होता.

असीम त्रिवेदी या पंचविशीतील तरुणाने एकंदर शासन व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचारविरोधी जन-आंदोलनात भाग घेताना व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपला आक्रोश व्यक्त केला होता. त्यानंतर अनेक महिने झोपलेल्या आमच्या पोलिसांना अचानक जाग आली. असीमला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर चक्क राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. या घटनेने पुन्हा देशभर गदारोळ माजला. अण्णा हजारे, रामदेवबाबा यांच्या उत्साही अनुयायांना एक नवाच मुद्दा मिळाला. व्यंगचित्रकार असलेले राज ठाकरेही असीमच्या बाजूने मैदानात उतरले. पुन्हा एकदा या वादग्रस्त व्यंगचित्रांच्या निमित्ताने आमचा सगळा देशच व्यंगचित्रांची मालिका आहे, ‘कार्टून नेटवर्क’ आहे, हे सिद्ध झाले.

समाजातील प्रस्थापित मंडळींच्या वागण्याची टिंगल करणे, प्रसंगी त्या बडया लोकांवर टीका करणे, हा खरे तर बहुतांश भारतीयांचा आवडता छंद असतो. तो आजचा नाही तर अगदी इतिहासकाळापासून चालत आलेला आहे. प्राचीन वाडमयात, संस्कृत नाटकात दिसणारे विदूषकाचे पात्र, खास त्यासाठीचे निर्मिलेले असायचे. हा विदूषक वेडयाचे सोंग घेतलेला असे. राजदरबारातील सगळया महत्त्वाच्या विषयांवर मत असणारा विदूषक आपल्या अचूक शे-याने भल्याभल्यांची दांडी उडवू शकायचा. आजच्या युगात व्यंगचित्रकाराकडे तीच भूमिका आलेली आहे. भारतात इंग्रजांच्या साहचर्यामुळे शंभर-सव्वाशे वर्षापूर्वी व्यंगचित्रांची कल्पना रुजली. मुळात इंग्रजांच्या काळात भारतीय लोकांना कोणतेच स्वातंत्र्य नसल्यामुळे विचार, उच्चार स्वातंत्र्याची गोष्टच न केलेली बरी. त्यातही लोकमान्य टिळक यांच्यावर ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ या अग्रलेखासाठी केलेली कठोर कारवाई सर्वाना ठाऊक होती. भारतीय दंड संहितेच्या ‘१२४ अ’ या कलमानुसार ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला भरून त्यांची मंडालेच्या तुरुंगात रवानगी केली होती.

भारतात आपले बस्तान व्यवस्थित बसले पाहिजे. जो कुणी त्यात अडथळे आणेल त्याला आम्ही नेस्तनाबूत करू, या ‘ब्रिटिश पॉलिसी’नुसार १८३७ मध्ये तयार केलेल्या ‘मेकॉले ड्रॉफ्ट पिनल कोड’मध्ये हे कलम होते. त्यानंतर १८६० मध्ये जेव्हा भारतीय दंड संविधान लागू झाले, त्यावेळी अखेर ही राष्ट्रद्रोहाची तरतूद वगळण्यात आली; परंतु अवघ्या १० वर्षातच इंग्रजांना त्या तरतुदींची गरज वाटली आणि त्या कायदेशीर तरतुदीचा वापर करून इंग्रजांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधींसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात डांबले. महात्माजींनी या राष्ट्रद्रोहाच्या कलमाबद्दल आपले मत व्यक्त करताना स्पष्ट शब्दात सांगितले होते की, ‘नागरिकांच्या मुक्त जीवनावर निर्बंध घालण्यासाठी भारतीय दंड संहितेतील अनेक कलमांमध्ये राजद्रोहाचे कलम प्रमुख आहे.’ तर अशा या ‘१२४ अ’ कलमासंदर्भात १९६२ मध्ये गाजलेल्या केदारनाथ सिंग विरुद्ध बिहार सरकार खटल्यात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, प्रत्येक नागरिकाला कोणत्याही विषयावर सरकारवर आपले मत मांडण्याचा, टीका करण्याचा अधिकार आहे; परंतु आपल्या टीकेद्वारे लोकांना भडकावणे, हिंसेला प्रवृत्त करून गोंधळ निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न करू नये.’ 

आपल्याकडील न्यायालय आणि सरकार खरे तर एकूणच व्यवस्थेने या जुन्या-पुराण्या, कालबाह्य कायद्याला कधीच मूठमाती द्यायला हवी होती; परंतु तसे झाले नाही. स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे व्यक्त न होणा-या व्यंगचित्रकारांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टीका-टिप्पणी करायला फारसा वाव नव्हता.

गांधी – नेहरूंसारखे लोकोत्तर नेते राजकारणात होते. पटेल, आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, राधाकृष्णन अशा दिग्गज नेत्यांनी राष्ट्रीय राजकारण व्यापले होते. मुख्य म्हणजे भारतीय घटनेची निर्मिती करताना स्वातंत्र्य-समता-बंधुता या त्रिसूत्रीचा अगदी मुक्तकंठाने पुरस्कार केला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची घटनेने हमी दिली होती. थोडक्यात सांगायचे तर, स्वतंत्र भारताची सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली होती, तरीही चाणाक्ष व्यंगचित्रकार स्वस्थ बसणे शक्य नव्हते. ‘शंकर्स विकली’च्या माध्यमातून उदयाला आलेल्या शंकर यांच्या व्यंगचित्रांनी धम्माल उडवली होती. पंडित नेहरू आणि डॉ. आंबेडकर यांचे वादग्रस्त ठरलेल्या व्यंगचित्रांसह शंकर यांनी नेहरूंवर टीका करणारी सुमारे ९० व्यंगचित्रे काढली होती. त्या अर्कचित्रांमध्ये नेहरूंवर कोरडे ओढले होते; पण तरीही पंडितजी शंकर यांना भेटल्यावर एक वाक्य आवर्जून बोलत, ‘शंकर, मलाही तू सोडू नकोस..’ हा मनाचा मोठेपणा, उमदेपणा हल्ली कुठेच दिसत नाही. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत अमेरिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार डॅरिल केगल आले होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एक चांगली टिप्पणी केली होती. ते म्हणाले, ‘जर एखाद्या देशात तुम्ही पंतप्रधानांचे व्यंगचित्र काढू शकत असाल तर त्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असे समजायला हरकत नाही.’ १९७० पासून अमेरिकेतील सर्वच बडया प्रकाशनांमध्ये आपल्या व्यंगचित्रांमुळे गाजलेल्या केगल यांच्या मते, ‘व्यंगचित्र म्हणजे रेषांच्या माध्यमातून व्यक्त होणे.

साधारणत: लोक शब्दांच्या माध्यमातून आपल्या भावना प्रकट करतात. व्यंगचित्रकार तेच काम रंग-रेषांद्वारे करतो.’ गेली चार दशके व्यंगचित्र काढणा-या केगल यांनी आपल्या कुंचल्याच्या फटका-याने अमेरिकेतील बडया-बडयांना हैराण केलेले आहे. त्यांच्या काही व्यंगचित्रांमुळे तर वादाचे मोहोळ उठले होते. एका विद्यार्थ्यांने त्यांना त्याविषयी प्रश्न विचारला असता ते सहजपणे उत्तरले, ‘अमेरिकेत आजही धर्म, गर्भपात, इस्रायल आदी विषयांवर कार्टून काढली तर लोक नाराज होतात. एखाद्याने वादग्रस्त विषयावर लेख लिहिला तर लोक पटकन चिडत नाहीत; पण जर कुणी त्याच भूमिकेतून व्यंगचित्र काढले तर लोकांना लगेच राग येतो.’ आपल्या प्रकट मुलाखतीमध्ये केगल यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की, ‘मी माझ्या व्यंगचित्रांची पातळी कधीच घसरू दिली नाही. त्यात अश्लिलता, असभ्यपणा येऊ दिला नाही; कारण मी माझ्यासाठी काही सीमारेषा आखलेल्या आहेत.’’

केगल यांच्यातील ही परिपक्वता आम्हाला असीम त्रिवेदी यांच्या व्यंगचित्रांमुळे उठलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची वाटते. पंचविशीतील असीम देशातील एकंदर स्थितीबद्दल जेव्हा चित्रातून व्यक्त होतो, तेव्हा त्याच्यातील आक्रमकपणाला अनिर्बंध जोश असणे हे त्याच्या वयानुरूप योग्य आहे; परंतु वर्षानुवर्षे व्यंगचित्र काढणारे लोक ज्यावेळी असीमच्या व्यंगचित्रातील त्या अनावश्यक आक्रमकपणाचे समर्थन करू लागतात, त्यावेळी त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. स्वातंत्र्य आणि स्वैराचारामध्ये एक अत्यंत अस्पष्ट सीमारेषा असते. एकदा उन्माद चढला की, माणूस ती सीमारेषा कधीही पार करतो, हे वारंवार सिद्ध होत असते. त्यामुळे कोणत्याही स्वातंत्र्याच्या अगदी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही पुरस्कार करणा-या मंडळींना अनेकदा स्वैराचार हे त्या स्वातंत्र्याचे प्रगत स्वरूप वाटत असते; परंतु कोणताही स्वैराचार हा सामाजिक स्वास्थ्यासाठी घातकच असतो, याचे भान असीम त्रिवेदीच्या व्यंगचित्रांचे समर्थन करणा-या सगळयाच संधिसाधू सुधारकांनी ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर या देशात अनागोंदी माजेल, चुकीच्या गोष्टींना प्रतिष्ठा मिळेल आणि भलतेच पायंडे पडतील.

आपल्या देशातील सुमारे ३० कोटी जनता निरक्षर आहे. साधारणत: आणखी तेवढीच किंबहुना त्याहून जास्त लोकसंख्या वाचन वगैरे करत नाही. म्हणजे देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या स्वत: न वाचता, ऐकीव बातम्यांवर जगत असते. फार दूर कशाला जायचे, महाराष्ट्राची आजची लोकसंख्या १० कोटींच्या घरात पोहोचली आहे. आपल्याकडे मराठी पुस्तकाची एक आवृत्ती फक्त ११०० प्रतींची असते. राज्यातील कोणत्याच वृत्तपत्राची एक आवृत्ती १० लाखांच्या आसपास पोहोचलेली नाही. इतक्यात पोहोचणारही नाही; कारण आमच्या देशात-राज्यात वाचनसंस्कृती रुजलेली नाही. इलेक्ट्रॉनिक मिडियाकडून मिळणा-या माहितीत मनोरंजनाचा भाग जास्त असल्यामुळे एकंदर समाजाच्या बौद्धिक विकासाचे तीन-तेरा वाजलेले दिसतात. त्यामुळे जिथे बौद्धिक दुष्काळ आहे, तिथे विचारमंथन कसे होणार? भारतात जेव्हा समाजात विचार करणा-या लोकांना, त्यांच्या बुद्धीला मान होता, त्यावेळी ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ हे वचन सर्वमान्य होते. त्यावेळी तत्त्वासाठी होणारा ‘वाद’ हा ‘संवादा’चा भाग होता. हल्ली ‘वाद’ हा शब्द ‘वादळ’ या शब्दाचा भाग बनलेला दिसतो, हे आमचे दुर्दैव. वाचनाची सवय नसणारा, चांगले पाहण्याची, कलेचा आस्वाद घेण्याची आवड नसणारा समाज कोणाचेही कसे ऐकत नाही, याचा प्रत्यय आपल्या देशात येऊ लागलाय. मुख्य म्हणजे ज्या मंडळींनी, समाजधुरिणांनी या अज्ञानी समाजाचे प्रबोधन केले पाहिजे, ते लोकच जर स्वार्थाध असतील तर समाजाने पाहायचे कुणाकडे?

असीम त्रिवेदीच्या व्यंगचित्रांच्या संबंधात उठलेल्या वादळात एक व्यंगचित्रकार या नात्याने राज ठाकरे यांनी मत मांडणे साहजिक होते. राज यांनी असीमच्या आक्रमक, आवेशपूर्ण व्यंगचित्रांचे समर्थन करताना जोशपूर्ण भाषण केले. याच राज ठाकरे यांनी सात वर्षापूर्वी प्रेषित महंमद यांची व्यंगचित्रे काढणा-या डॅनिश व्यंगचित्रकारांचा निषेध करणा-यांचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते. त्यावेळी त्यांची भूमिका होती की, ‘प्रेषित महंमद यांचे एकही चित्र उपलब्ध नाही. ज्याचे चित्रच नाही, त्याचे व्यंगचित्र कसे असू शकते?’ असे म्हणणारे राज आज असीमने काढलेल्या व्यंगचित्रांचे समर्थन करतात. हा त्यांचा वैचारिक गोंधळ आहे, असे मी म्हणणार नाही. त्यांना व्यंगचित्र म्हणजे नेमके काय, हे अद्याप कळलेले नाही, असे म्हणण्याचाही प्रश्न येत नाही; परंतु त्यांच्यातील व्यंगचित्रकारावर, आलेली संधी साधून श्रेय मिळवणारा राजकारणी स्वार झालेला या प्रसंगाच्या निमित्ताने दिसला. एका नामवंत व्यंगचित्रकाराची ही स्थिती, मग अन्य राजकारण्यांबद्दल न बोललेलेच बरे.

सध्या आपल्या देशात वादंग माजवणा-या ‘दबंग’ किंवा ‘सवंग’ राजकारण्यांची चलती आहे. भूगर्भात असलेल्या कोळशाचे आर्थिक व्यवहार झाले आणि त्यातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असा ‘शोध’ लावून या राजकारण्यांनी अवघी संसद वेठीला धरली आहे. देशातील वाढती लोकसंख्या, घटत्या सोयी-सुविधा, गरीब-श्रीमंतांमधील वाढती दरी, रोजगारापासून आरोग्यापर्यंत सर्वसामान्यांना छळणा-या प्रश्नांचे वाढते प्रमाण, या सगळय़ाच विषयांकडे पाठ फिरवून या राजकारण्यांनी ‘सत्ताप्राप्ती’ हे एकच लक्ष्य समोर ठेवलेले दिसतेय. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र राजकारण्यांचे, नेत्यांचे, कार्यसम्राटांचे, समाजसेवकांचे, जाणत्या राजा-राण्यांचे अक्षरश: पेव फुटलेले आहेत. देशाचे हे चित्र मन अस्वस्थ करणारे आहे. कारण लक्ष-लक्ष हुतात्म्यांच्या आत्मबलिदानातून साकार झालेल्या भारत नामक देशाचे आम्ही अपात्र भारतीयांनी ‘व्यंगचित्र’ बनवले आहे..

Categories:

Leave a Reply