कोणे एकेकाळी संगणक क्षेत्रातील मक्तेदारी मिरवणा-या ‘मायक्रोसॉफ्ट’ या अतिबलाढय़ कंपनीने आता संकटकालीन बचावाचा मार्ग म्हणून सत्या नडेला या ४६ वर्षीय भारतीय अभियंत्याकडे सूत्रे दिली आहेत. सत्याऐवजी फोर्ड मोटर कंपनीचा सीईओ अॅलन मुलाली किंवा एरिकस्नचा सीईओ हॅन्स वेस्टरबर्ग यांची तिथे नेमणूक होऊ शकली असती, पण माहिती-तंत्रज्ञानातील प्रावीण्यामुळे सत्याने बाजी मारली. त्याच्या या यशामुळे भारतातील लोकांनी जो जल्लोष केला, तो मन थक्क करणारा होता. कदाचित हल्ली आपल्या लोकांना कोणताही प्रसंग ‘साजरा’, ‘सेलिब्रेट’ करण्याची सवय जडली असावी.. त्यातही सत्याला दरमहा ९-१० कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ पगार म्हणून मिळणार आहे, म्हणून आमच्या मध्यमवर्गीयांना खास आनंद, पण खरा प्रश्न आहे पगारात आनंद मानण्याच्या, आयुष्यात जोखीम किंवा जबाबदारी न घेण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा. सत्याच्या पगाराला भुलणा-या आमच्या मंडळींनी बिल गेट्सच्या कार्यकुशलतेचा आणि जोखीम काम करण्याच्या उद्योजकतेचा हेवा करायला सुरुवात केली पाहिजे..
आपल्या देशात कोणत्या गोष्टीचा आनंद, जल्लोष किंवा शोक कसा साजरा केला जाईल याचा नेम नाही. ऊर्दूत एक छान म्हण आहे, ‘बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना’. आमचेही अगदी तसेच. मध्यंतरी उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे लहान भाऊ प्रमोद यांनी आपल्या मुलीच्या लग्नावर सुमारे साडेपाचशे कोटी रुपये खर्च केल्याच्या बातम्या गाजल्या. त्यानंतर कधी भारतीय लेखकाला बुकर वा तत्सम पुरस्कार मिळो वा सौंदर्यस्पर्धेत एखादी तरुणी विश्वसुंदरी होवो, आम्ही जणू काय जग जिंकले अशा आविर्भावात नाचू लागतो. सध्या ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेल्या सत्या नडेला या ४६ वर्षीय अभियंत्याच्या पगाराच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या आहेत. बहुतांश वृत्तपत्रांनी, दूरदर्शन वाहिन्यांनी तर सत्याच्या यशाच्या बातम्या अशा दिल्या की, त्याच्या आगमनाने जणू ‘सत्य युग’ अवतरणार आहे. मायक्रोसॉफ्ट ही अत्यंत महत्त्वाची कंपनी आहे. जगभरातील संगणकक्रांतीला वेग देणा-या बिल गेट्स यांनी स्थापन केलेली ही कंपनी सध्या फार मोठय़ा स्थित्यंतराला सामोरी जात आहे. ‘अॅपल’ आणि ‘गुगल’ या दोन मोठय़ा कंपन्यांनी नवनव्या संशोधनांच्या माध्यमातून नवीन पिढीचे मन काबीज करण्याचा सपाटा लावला आहे. त्या स्पर्धेत मागे पडलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’चे, ज्या कंपनीचे अर्थबळ ४६८० अब्ज रुपये आहे, यश अधिक वाढावे, पर्यायाने बिल गेट्स यांच्या संपत्तीत आणि अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीत भर पडावी, यासाठी सत्या नडेला काम करणार आहे. त्यासाठी त्याला दरमहा नऊ कोटी रुपये पगार, भत्ते आणि अन्य सवलतींतून मिळेल. एका भारतीयाला एवढा चांगला मान जागतिक स्तरावर मिळतोय ही चांगली गोष्ट, पण त्यामुळे तुम्ही-आम्ही हुरळून जायचे कारण काय?
तिकडे सत्या ‘मायक्रोसॉफ्ट’चा सीईओ बनला आणि इकडे भारतात त्याच्या अभिनंदनाचे सत्र सुरू झाले. फेसबुक, व्हाट्सअॅप, टेलिग्राम आणि ट्विटरमुळे हल्ली फुकटात देशप्रेम, धर्मप्रेम, संस्कृतीप्रेम आणि तत्सम प्रेमाची जाहिरात करता येते, मग काय सगळीकडे सत्याच सत्या.. मग या स्पर्धेत मोठे नेते का मागे राहतील? केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम् यांनी दिल्लीतील श्रीराम कॉलेजात भाषण करताना ‘सत्याची नियुक्ती ही भारतीय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्तेचे उत्तम उदाहरण आहे,’ असे आवर्जून सांगितले आणि टाळ्या वसूल केल्या. महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आपला आनंद फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त करताना जागतिक आयटी क्षेत्रातील भारतीयांच्या सामर्थ्यांचा गौरव केला. हे सारे चांगले आहे, पण हा मणिपाल विद्यापीठातून अभियंता झालेला सत्या जर भारतातच राहिला असता, तर त्याला आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर एवढी मजल मारता आली असती का, हा प्रश्न सगळ्यांसाठीच यक्षप्रश्न बनतो.
२००९ च्या नोबेल पुरस्कारांच्या यादीत फक्त एकमेव नाव ‘आपले’ वाटावे असे होते. वेंकटरमण रामकृष्णन यांनी रसायनशास्त्रात संशोधन केल्यामुळे त्यांना जगातील तो सर्वोत्तम पुरस्कार लाभला होता, त्या दिवशी अमेरिकेत राहून अमेरिकन झालेल्या रामकृष्णन यांना काही उत्साही भारतीयांनी फोन केला. एका भारतीयाला नोबेल पुरस्कार मिळाल्याचा आनंद या फोन करणा-या लोकांच्या आवाजातून व्यक्त होत होता, पण त्यामुळे रामकृष्णन यांना आनंद झाला नाही. काहीशा उर्मटपणे त्यांनी उत्तर दिले, ‘आपण सारे माणसे आहोत, आपण कुठल्या देशात जन्मावे हा तर निव्वळ अपघात असतो.’
त्यांच्या त्या वाक्यांनी गोंधळून गेलेल्या देशप्रेमी लोकांनी, मग रामकृष्णन यांच्या उर्मटपणालाही प्रसिद्धी दिली. अर्थात त्यामुळे रामकृष्णन यांना काही फरक पडला नाही. त्यानंतर एका मुलाखतीत तर ते चक्क म्हणाले होते, ‘अहो, हल्ली मला ‘कोणतेही’ लोक ई-मेल पाठवतात, माझा मेलबॉक्स भरून टाकतात.. अर्थात त्यांच्या मेल्स उडवून टाकायला मला तासभरही लागत नाही.’ या नोबेलविजेत्याचा सारा रोख भारतातून येणा-या ई-मेल्सवर होता, हे येथे वेगळे सांगायला नको. एकूणच काय तर नामवंत परदेशस्थ भारतीयांच्या या अरेरावीचे नेहमीच दर्शन घडत असते. अर्थात सगळेच असे असतात असे नाही, पण पाश्चात्त्य संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या या पहिल्या वा दुस-या पिढीतील अनिवासी भारतीयांचे जगणे-वागणे ब-यापैकी बदललेले असते, पण बदलत नाही त्यांची भारतीय मानसिकता. दुस-यांच्या यशाची मनमोकळी स्तुती करणे हे सर्वसामान्य पाश्चात्त्य माणसाचे आवडते काम. आपल्याला अगदी थोडी मदत करणा-याला सहजपणे ‘थँक्स’ म्हणणे हे त्यांच्या अंगवळणी पडलेले असते. अगदी सारे आयुष्य पाश्चात्त्य देशात घालवणा-या भारतीय लोकांमध्ये हे गुण उतरतातच, असे नाही, पण न शिकवता आलेला स्पष्टवक्तेपणा फटकळपणात परिवर्तित होऊन आलेला मात्र हटकून दिसतो. अर्थात सर्वसामान्य माणसाला त्याचे कधीच दर्शन घडत नसते, त्यामुळे तो बिच्चारा या विदेशात जाऊन नाव काढणा-यांच्या कौतुकात रमलेला असतो. ‘पेप्सिको’च्या सीईओपदी बसणा-या इंद्रा नुयी, ‘मास्टर कार्ड’चे सीईओ अजय बंग, ‘डॉईश बँके’चे अंशू जैन, ‘बोईंग’चे डॉ. दिनेश केसकर, ‘सिटी बँके’चे विक्रम पंडित यांच्या कार्यकर्तृत्वाचा आपण सा-यांनी अभिमान बाळगलाच पाहिजे, पण त्याच जोडीला हे सारे बुद्धिवंत बाहेर का गेले, याचाही विचार झाला पाहिजे.
आपल्याकडे ‘ब्रेनड्रेन’ म्हणजेच बुद्धिमान लोक देशाबाहेर जाण्याच्या प्रक्रियेला ऐंशीच्या दशकात सुरुवात झाली. आणीबाणीच्या धक्क्यातून सावरलेला देश ‘नवनिर्माणा’चे विदुषकी पर्याय पाहून हादरला होता. राजनारायण, चरणसिंह, महेंद्र सिंह टिकैत, चंद्रशेखर, मधू लिमये आणि त्यांच्यासारख्या ‘लहरी’ नेत्यांनी सारा राजकीय अवकाश व्यापला होता, त्यामुळे उठणा-या राजकीय तरंगांनी आमची एकूण व्यवस्था अस्वस्थ झाली होती. सी. राजगोपालाचारी यांनी ज्याचे वर्णन ‘लायसन्स आणि परमिट राज’ असे केले होते, तशी लालफितशाही त्या काळात सर्वव्यापी बनली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या अल्पजीवी सरकारने मध्यमवर्गीयांच्या ‘सुराज्या’च्या कल्पना मोडीत काढल्या होत्या. त्यामुळे आणीबाणी तसेच तत्पूर्वीच्या सर्वच जनआंदोलनात सक्रिय सहभागी होणारा मध्यमवर्ग राजकीय प्रक्रियेपासून दूर होण्याची सुरुवात झाली होती. ‘ब्रेनड्रेन’ हे त्याचेच फलित. ज्या रा. स्व. संघ, कम्युनिस्ट वा समाजवादी विचाराच्या लोकांनी आणीबाणीत आंदोलने केली, तुरुंगवास भोगला होता, त्यांची कुशाग्र बुद्धीची मुले-नातवंडे आयआयटी आणि एमबीबीएसच्या पदव्या घेऊन इंग्लंड-अमेरिकेत घुसली आणि तिकडेच विसावली. नाही म्हणायला त्यातील काही मंडळींनी आपल्या देशातील गोरगरिबांची आठवण ठेवली; पण बहुतांश नोकरी करणा-या या मंडळींच्या दानाला आणि समाजसेवेला मर्यादा होत्या, आहेत. इथे पुन्हा, आपली कोणतीही रिस्क, जोखीम न घेण्याची मानसिकताच दिसते. आज इंग्लंड-अमेरिकेत वैद्यकीय, आयटी, संशोधन आदी क्षेत्रांत भारतीय वंशाच्या लोकांचा ब-यापैकी प्रभाव दिसतो; परंतु आमची बहुतांश मंडळी नोकरदार असतात, त्यामुळे त्यांच्या यशालाही मर्यादा पडलेल्या दिसतात. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात ‘डॉटकॉम’चा फुगा फुटला त्या वेळी आपले इंजिनीयर फार तर बेकार बनले, दिवाळखोर झाले नाहीत. आजही इतक्या वर्षानंतर स्थिती बदललेली नाही. म्हणून एनआरआय नोकरदारांचे किती कौतुक केले पाहिजे, हे आपण ठरवायला हवे.
विशेषत: जागतिक शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत असताना तर आम्हाला आमच्या सद्य:स्थितीचा विचार केलाच पाहिजे. सध्या जगातील बहुतांश प्रगत देशांनी संगणक क्रांतीचा मन:पूर्वक स्वीकार केलेला आहे. त्याउलट आपल्या देशातील ३७ टक्के प्रौढ लोक अंगठेबहाद्दर असलेले दिसतात. मग संगणकसाक्षरतेची गोष्टच करायला नको. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ही श्रीमंतांची मक्तेदारी बनली आहे. गरिबांची पोरे शाळेत फक्त दुपारच्या जेवणासाठी जातात. ते चांगले दिले की, शिक्षकाची जबाबदारी संपली. मध्यंतरी एका आदिवासी आश्रमशाळेत गेलो होतो. तिथले सारे शिक्षक, मुख्याध्यापक आठवडय़ाचा ‘मेन्यू’ ठरवण्याच्या कामात गढलेले, तर पोरे खेळण्यात, मजा करण्यात गुंग. मुख्याध्यापकांना विचारले ‘सर, आज काय सुट्टी आहे का?’ सर त्वरेने उत्तरले, ‘नाही हो, पोरांना शिकवण्यापेक्षा सध्या चांगले जेवण देण्याचा सरकारी आदेश आहे. पाच-पन्नास पोरे दहावीला नापास झाली तर आम्हाला काही होणार नाही, पण खाण्यात काही आले आणि उलटय़ा-जुलाब झाल्या, तर मुख्याध्यापक थेट तुरुंगात, मध्ये-अध्ये काही नाही. तेच महत्त्वाचे काम करतोय. आठवडय़ाचे भोजन पदार्थ ठरवतो, पुढील आठवडय़ात आमदारसाहेब ‘व्हिजिट’ देण्याची शक्यता आहे.’ असे बोलून मुख्याद्यापक पुन्हा आपल्या कामाकडे वळले.
जी अवस्था आमच्या प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाची, तीच गत आहे उच्चशिक्षणाची. आज भलेही आम्ही भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून स्वत:ची पाठ थोपटत असू. जगातील सर्वात ‘तरुण देश’ म्हणून आम्हाला आमच्या तारुण्याचा अभिमान वाटत असेल; पण जगातील पहिल्या दोनशे दर्जेदार विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही. ही वस्तुस्थिती मन अस्वस्थ करणारी आहे. त्या पार्श्वभूमीवर आमच्या पदवीधर तरुणांचा जगातील उत्तम विद्यापीठात शिकणा-या इंग्लिश, अमेरिकन वा चिनी तरुणांसमोर कसा टिकाव लागणार? यासंदर्भात सध्या कोणताही राजकीय नेता उपाय सुचवताना दिसत नाही. सत्या नडेलाच्या झगमगीत यशाने ज्यांचे डोळे दिपले आहेत, त्यांनी ही वस्तुस्थिती नजरेआड करू नये. आमच्या उच्चशिक्षणासमोर उभ्या असलेल्या या धोक्याचा आपण वेळीच वेध घेणे गरजेचे आहे, कारण त्यावरच आमच्या भावी पिढय़ांचे पर्यायाने देशाचे भवितव्य अवलंबून असेल.
बदलत्या काळाने आता ‘ब्रेनड्रेन’च्या प्रमाणातही घट होत आहे. गेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘आऊटसोर्सिग’ हा महत्त्वाचा मुद्दा होताच, शिवाय भारतीय नोकरदारांना देण्यात येणारा ‘व्हिसा’ हासुद्धा चर्चेचा विषय होता. विशेषत: २००८ च्या जागतिक मंदीमुळे बदललेल्या अमेरिकन सरकारने दहशतवादाचा बागुलबुवा पुढे करून आपली व्हिसाविषयक धोरणे कडक केली होती. इंग्लंड सरकारने तर त्यावर कडी केली. त्यांनी तर व्हिसासाठी भली मोठी अनामत रक्कमच आकारायला सुरुवात केली होती. परिणामी उच्चशिक्षण घेतल्यानंतर मायदेशी येणा-यांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेतील व्यावसायिक अस्थिरतेला कंटाळून बरेच चाळिशी-पन्नाशीतील बुद्धिमान भारतात परतले. ही ‘रिव्हर्स ब्रेनड्रेन’ची प्रक्रिया आमच्या देशातील कोण्या विद्यापीठाला अभ्यासण्याची बुद्धी झाली नाही, पण अमेरिकेतील हार्वर्ड लॉ स्कूलने या मायदेशी परतलेल्यांच्या मुलाखती घेतल्या आणि दोन महिन्यांपूर्वी सखोल अहवालही प्रसिद्ध केला. नोक-या देणा-या ‘केली सव्र्हिसेस’ नामक संस्थेने दिलेली माहिती तर या बदलत्या स्थितीची निदर्शक आहे. त्यांच्या मते २०१५ पर्यंत कॅनडा, युरोपीय महासंघ, इंग्लंड आणि अमेरिकेतील अंदाजे तीन लाख अनिवासी भारतीय मायदेशी येतील. हार्वर्ड लॉ स्कूलच्या अहवालात तर भारतात परतणा-या डॉक्टर्स, इंजिनीयर्स आणि संशोधकांना परदेशातील नोक-यांपेक्षा चांगल्या संधी मिळतात, असे म्हटले आहे. त्या अहवालातील एक गोष्ट फार आशादायी आहे, ती म्हणजे त्यांनी ज्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्यातील ८६ टक्के लोकांना भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरच सोन्याचे दिवस येतील, अशी आशा आहे. विशेष म्हणजे, या बुद्धिवंतांपैकी ५३ टक्के लोकांनी भारतात स्वतंत्र उद्योग-धंदा काढण्याचा मनोदय व्यक्त केला. ८९ टक्के लोकांना भारतात चांगली नोकरी मिळाल्यामुळे परत यावेसे वाटले तर ६१ टक्के तरुणांना अमेरिकेपेक्षा चांगली नोकरी व पगार मिळाला आहे. एकूणच काय तर, सगळी स्थिती चांगल्या दिशेने बदलत आहे. कौतुकच करायचे तर या मायदेशी परतणा-या तरुण-तरुणींचे केले पाहिजे. ‘गार्डियन’मध्ये याच विषयावर सडेतोड लेख लिहिणारे अरुण गुप्ता म्हणतात, ‘अरे कौतुक करायचे तर थेट अन्यायाविरोधात लिहिणा-या अरुंधती रॉय यांचे करा. सिएटलमध्ये, अगदी ‘मायक्रोसॉफ्ट’च्या मुख्यालयाजवळच्या न्यू सिटी कौन्सिलच्या सदस्य बनलेल्या क्षमा सावंत यांचे करा.
न्यूयॉर्कमधील हजारो टॅक्सीचालकांची युनियन बांधणा-या भैरवी देसाई किंवा कॅनडात इमिग्रेशनच्या विषयावर लढा देणा-या हर्षा वालिया यांचे कौतुक करा, कारण त्यांचा लढा हा जागतिक आदर्श आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आहे.’ होय, दरमहा नऊ कोटी रुपये पगार मिळविणार म्हणून सत्या नडेला याचा आम्ही का अभिमान बाळगावा?आमच्याकडे त्यापेक्षा जास्त पैसे कमावण्याची क्षमता असूनही देशसेवेत रमणारे नंदन निलेकणी आहेत. दानशूरतेत अन्य सगळ्यांना मागे टाकणारे अझीम प्रेमजी आहेत, म्हणून आम्ही जर आमच्या पुढील पिढय़ांसमोर हे चांगले आदर्श ठेवले तर स्वकेंद्रित मध्यमवर्गीय जाणिवा जोपासणा-या ‘सत्या’मागील अर्धसत्यही लोकांना कळतील. त्यामधून पूर्णसत्य स्वीकारून त्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आज आपला देश सगळ्या विचित्र गोष्टींसाठी जगभरात ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात आमचा देश म्हणजे नाग, वाघ, भिकारी आणि जटाधारींचा इंडिया म्हणून जगभरात प्रसिद्ध होता. त्यानंतरही थोडय़ा फार फरकाने ही ‘इमेज’ तशीच राहिली. आजही ती प्रतिमा बदलण्यासाठी चांगले प्रयत्न होत नाहीत, त्यामुळे भारतातील गर्भपात, टीबी, मलेरियासारखे रोग, महिलांवरील अत्याचार, दारिद्रय़, बेकारी या सगळ्या भयंकर गोष्टी तिकडच्या प्रसारमाध्यमांमध्ये दिसतात. त्यात आमचा अपमान करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मध्यंतरी एक इंग्रजी सिनेमा पाहिला होता, टिपिकल हॉलिवुडचा युद्धपट होता तो. त्या सिनेमात अगदी शेवटच्या टप्प्यात थरारक प्रसंग सुरू असताना अडचणीत सापडलेला अमेरिकन सैनिक आपल्या मुख्यालयाला फोन करतो. त्याचा फोन थेट भारतातील कॉलसेंटरवर येतो. तिथे बसलेला भारतीय तरुण, नाकात बोट घालत अत्यंत बेजबाबदारपणे तो फोन घेताना दिसतो. त्याला अमेरिकन सैनिकाचे बोलणेच कळत नाही. त्यामुळे चिडलेला तो सैनिक जोरदार शिवी हासडून फोन आपटतो आणि चित्रपट अधिक वेगाने पुढे सरकू लागतो.. आजही तो सीन डोळ्यासमोर आला की, सर्वसामान्य अमेरिकन माणसाची भारतीय लोकांबद्दलची भावना किती तीव्र आहे हे प्रकर्षाने जाणवते. आपण ही वस्तुस्थिती विसरता कामा नये. म्हणूनच सत्या नडेला वा तत्सम भारतीयांच्या नोकरीतील ‘यशाने’ ‘नोकरदार मानसिकता’ असणा-या लोकांना आनंद होत असेल तर होऊ द्या. पण आमच्या नवीन पिढीने तरी या पगारदारी महत्त्वाकांक्षांना व्यावसायिकतेचे आणि कल्पकतेचे पंख दिले पाहिजेत. त्यामधूनच नवीन भारत निर्माण होईल.
Categories:
आवर्तन