पुणे हे भन्नाट शहर आहे आणि पुणेकर हा एकदम वेगळा प्राणी आहे. हे शहर गणपतीच्या अकरा दिवसांत ज्या श्रद्धेने जागते, त्याच श्रद्धेने ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त दाद द्यायला हजर असते. पंढरपूरच्या वारीला सामोरा जाणारा पुणेकर ‘वसंत व्याख्यानमाले’ची वारीही कधी चुकवत नाही. महाराष्ट्राला विवेकनिष्ठेचे धडे आगरकरांच्या माध्यमातून पुण्यानेच दिले. पुढे डॉ. श्रीराम लागू-डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हा विवेकनिष्ठ समाजनिर्मितीचा लढा पुण्यातूनच चालवला. पुण्याने देशाला स्वातंत्र्याची दिशा दिली. सामाजिक विचार आणि शैक्षणिक प्रगतीचा मार्ग दाखवला. संशोधन आणि विज्ञानाची, उद्योग आणि आधुनिक ज्ञानाची पुण्याने कायम कास धरली. मुख्य म्हणजे आर्थिक आणि भौतिक प्रगती करताना पुणेकरांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व मनोमन जपले. त्यांच्या त्या प्रामाणिक समाजभानाने पुण्यातील नेत्यांना देशपातळीवर नेले, पण आता ही सारी प्रक्रिया खंडित होत चालली आहे. आधीचे पुणे आता राहिले नाही. पूर्वी चिखलात कमळ उगवायचे. हल्ली कमळात चिखल भरलेला दिसतो. आणि म्हणूनच जेव्हा पद्मपुरस्कारांच्या यादीवर पुणेकरांची छाप दिसते, तेव्हा आनंद व दु:खाच्या समिश्र भावनेने मन भरून जाते आणि डोळ्यासमोर येते गझलकार दुष्यंत कुमार यांची तेजतर्रार कविता.
कैसे मंजर सामने आने लगे हैं
गाते-गाते लोग चिल्लाने लगे हैं
अब तो इस तालाब का पानी बदल दो
ये कँवल के फूल कुम्हलाने लगे हैं
पुणेरी लग्नपत्रिकेवरील अगदी ताजी टीप : (वधू-वरांस आहेर देताना पाकिटात २००५ पूर्वीच्या नोटा भरू नयेत ही विनंती)
पुणेकरांच्या या अखंड सावधपणाचे, चतुराईचे आणि कर्तबगारीचे असंख्य किस्से सांगितले जातात. गेल्या पाचेक वर्षात उगवलेल्या सोशल नेटवर्किंगच्या साइट्सनी तर पुण्याच्या पाटया, शाब्दिक कोटया आणि पुणेकरांच्या स्वभाव वर्णनाची झिम्मड उडवून दिली आहे. असा मान आजवर ना मुंबईला मिळाला ना नागपूर, औरंगाबाद, दिल्ली वा हैदराबादला लाभला. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत, देशाचा क्रमांक दोनचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘पद्मविभूषण पुरस्कार’ ज्या दोन लोकांना मिळाला त्यांची नावे वाचून पुन्हा पुणे शहराचे वेगळेपण ठळकपणे नजरेसमोर आले. ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या खालोखाल महत्त्वाच्या मानल्या जाणा-या या पुरस्कारावर नाव कोरणा-या प्राचीन आणि आधुनिक या दोन वेगवेगळ्या ज्ञानमार्गाचा पुरस्कार करणा-या पुणेकरांची कामगिरीही तेवढीच महत्त्वाची. १९३७ मध्ये पुण्यात योगशिक्षणाचे रोपटे लावणारे योगमहर्षी बी. के. एस. अय्यंगार आणि आधुनिक ज्ञान विज्ञानाची कास धरून भारताच्या प्रगतीचे स्वप्न पाहणारे डॉ. रघुनाथ माशेलकर हे दोघेही ध्येय्यवेडे. वयाच्या ९६ व्या वर्षीही अय्यंगार आपले योगशिक्षणाचे काम पूर्वीच्याच जोमाने करीत आहेत. देश-विदेशात शास्त्रशुद्ध योगशिक्षण पोहोचले पाहिजे यासाठी झटत आहेत. तद्वत जागतिकीकरणाच्या लाटेत भारतीय शास्त्रज्ञांना बौद्धिक संपदा विकासासाठी प्रवृत्त करणारे डॉ. माशेलकरही वयाच्या ७१ व्या वर्षीही नवनवीन संशोधनात रमलेले दिसतात. अत्यंत गरिबीतून वर आलेल्या अय्यंगार आणि माशेलकर या दोन्ही पुणेकरांनी अथकपणे ध्येयाचा मागोवा घेतला आणि ध्येयपूर्तीची मार्गक्रमणा करीत असताना आपल्या मनातील राष्ट्रभक्तीची ज्योत अखंड तेवत राहील, अशी दक्षता घेतली. अन्यथा या दोन्ही विलक्षण बुद्धिमान लोकांसाठी इंग्लंड-अमेरिकेचे दरवाजे सताड उघडे होते. मान, वैभव आणि मन मोहविणा-या संपत्तीचे प्रलोभन झुगारून या दोघांनी आपल्या देशवासीयांचा विचार केला. आणि म्हणूनच या दोघांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन अवघ्या भारतवर्षाने त्यांचा गौरव केला.
या दोन्ही महान लोकांचा बालपणापासूनचा संघर्ष प्रेरणादायी आहे. अत्यंत गरिबीत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश खेचून आणले, पण ते करताना नेहमी दुस-यांचा विचार केला. अय्यंगार ज्या वेळी पुण्यात योग शिकविण्यासाठी आले, त्या वेळी ते ऐन पंचविशीत होते. महात्मा फुले यांच्या शिक्षण प्रसाराला ज्या कर्मठ पुणेकरांनी विरोध केला होता, त्यांच्याच वंशजांनी १९३७ साली पुण्यात डेरेदाखल झालेल्या अय्यंगार गुरुजींना छळले. योगाभ्यास ही काही ‘कुणीही’ करण्याची गोष्ट आहे का? असा सवाल विचारून या धर्ममरतडांनी अनंत अडथळे आणले होते; परंतु महान चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी पुढाकार घेऊन अय्यंगार गुरुजींचा योगशिक्षणाचा मार्ग सोपा केला. परिणामी धार्मिक चौकटीत बंद असलेल्या योगासनांचा सर्व थरातील घरांमध्ये प्रसार होऊ लागला. आपल्या या योगप्रचाराच्या कार्याबद्दल अय्यंगार गुरुजी सांगतात, ‘मी वयाच्या सतराव्या वर्षापासून योग शिकवीत आहे, परंतु माझे भाग्य म्हणून म्हणा अथवा माझा स्वत:च्या साधनेवर असलेला भर आणि पूर्ण विश्वास यामुळे म्हणा, १९३० ते ४० या दरम्यान मी सर्वसामान्यांपासून ते थोरामोठय़ांपर्यंत सर्वाना योग शिकवीत गेलो. माझ्या विद्यार्थ्यांत कंबरदुखीचा त्रास होणारे सुतार, धोबी होते. हात, बोटे व मानदुखी यामुळे हैराण झालेले नाभिक होते. कुटुंब संगोपनाच्या सततच्या कामामुळे अंगदुखीस सामोरे जावे लागणा-या भगिनी होत्या. शस्त्रक्रियेसाठी तासन् तास उभे राहणारे डॉक्टर्स, सर्जन्स, मानसिक ताणतणाव जाणवणारे काही तत्त्वज्ञानी, विचारवंत अशांचा या योग शिकणा-यांमध्ये समावेश होता. माझ्या शिकविण्याचा परिणाम या सर्वावर योग्य पद्धतीने होत गेल्याने त्यांचा माझ्यावरील विश्वास वाढत गेला. माझीही माझ्या साधनेवरील श्रद्धा, विश्वास व निष्ठा दृढ होत गेली.’
अय्यंगार गुरुजींनी योगसाधनेतील जुन्या वाङ्मयाचा अभ्यास करून नव्या युगासाठी आवश्यक असा नवा ‘अय्यंगार योगमार्ग’ विकसित केला. त्यांच्या या कामगिरीमुळे आपल्या जन्मभूमीतूनच लोप पावत चाललेल्या योगमार्गाला नवचेतना लाभली. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर अय्यंगार गुरुजी स्वत: योगविद्येचे ‘ब्रँड अॅम्बॅसेडर’ बनले आणि त्यांनी हा योग जगभर पोहोचवून त्यावरील भारताचा ‘अधिकार’ शाबूत ठेवला. अन्यथा आज जगातील बहुतांश देशांत विविध पद्धतीने योगाभ्यास केला जातो. त्यापैकी कोणत्या तरी एका वेगळ्या नावाच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत आला होता. याआधी जसे ज्यूडो-कराटे हे आपल्या ‘कलरिपट्ट’चे चिनी-जपानी अवतार आम्ही सहर्ष स्वीकारले, तद्वत योगाभ्यासाचेही झाले असते; पण अय्यंगार गुरुजींच्या आयुष्यभराच्या साधनेने योगमार्गाचे भारतीयत्व जपले. अगदी माशेलकर यांचीही कामगिरी अशीच, राष्ट्रीय बाणा जपणारी. त्यांनी हळद वा बासमतीच्या पेटंटसाठी दिलेला लढा सर्वसामान्य माणसांना ठाऊक आहे. पण त्यांचे काम त्याहून खूप मोठे आहे. जर अय्यंगार योगर्षी असतील तर माशेलकर ज्ञानर्षी आहेत. ज्ञान आणि सर्जनशीलता यांच्याच जोरावर पुढील जग चालणार आहे, यावर माशेलकरांचा संपूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ज्या नवीन पिढीच्या माध्यमातून ही ज्ञानसाधना होऊ शकते त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना आवडते. या उगवत्या पिढीच्या प्रतिनिधींना डॉ. माशेलकर एकच सल्ला देतात, ‘मुलांनो अस्वस्थ व्हा.’ आज भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या पंचविशीच्या आतील आहे. त्या तरुणाईने ठरवले तर येत्या दहा वर्षात भारत महासत्ता होऊ शकेल. दोन वर्षापूर्वी डॉ. माशेलकरांनी एका लेखात लिहिले होते की, ‘तरुणाई ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी ताकद असून देवळाच्या रांगेत उभे राहणारे तरुण, विज्ञानाची कासही तेवढयाच श्रद्धेने धरतात. आता या तरुणाईने भ्रष्टाचार, अन्याय आणि मरगळ यांच्याविरोधात अस्वस्थपणे उभे राहून एकदिलाने काम केले तर देशाचे चित्र नक्कीच बदलेल. त्यासाठी आता ‘क्विट इंडिया’ (भारत छोडो) या चळवळीच्या धर्तीवर ‘माय इंडिया’ (माझा भारत) अशी चळवळ उभी राहायला हवी.’ ते म्हणतात, ‘मुलांनो अस्वस्थ व्हा, देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगा. भारतातील पाण्याची टंचाई, विजेची टंचाई, घरांची टंचाई, अन्नधान्याची टंचाई, अशिक्षितता या सगळ्यांवर मात फक्त विज्ञानच करू शकेल, तुम्ही फक्त जिद्दीने पुढे या.’
तिनेक वर्षापूर्वी ‘ऑब्र्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशन’च्या सुधींद्र कुलकर्णी यांच्या एका चर्चासत्रात डॉ. माशेलकर यांना भेटण्याचा योग आला होता. पहिल्याच भेटीत समोरच्याला आपलेसे वाटावे असे बोलणे आणि कमालीचा साधेपणा यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे खूप सोपे गेले. त्या दिवशी त्यांनी ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’च्या कामासंदर्भात भाषण केले होते. त्यामुळे साहजिकच चर्चेचा विषय ज्ञान-विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाचे जगणे सोपे करणारा कसा होईल हाच होता. व्यासपीठावरून जेवढया तळमळीने ते बोलले होते, तेवढयाच आत्मियतेने खासगी बैठकीतही ‘नवनिर्माणा’च्या प्रेरणेने ते बोलत होते. आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाच्या संशोधनवृत्तीला दाद देताना त्याच्या संशोधनाला व्यावसायिकांच्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत नेण्याचा ध्यास माशेलकरांनी धरला, म्हणून त्यांचे काम नेहमीच आपल्या भोवतीच्या चौकटी तोडणारे ठरले. भारतीय लालफीत आणि खेकडयाच्या मनोवृत्तीविरोधात कधीही चकार शब्द न काढता माशेलकरांनी जेथे काम केले, तेथील संपूर्ण व्यवस्था सकारात्मक केली. अफाट आशावाद, अथक मेहनत आणि नि:स्वार्थी वृत्तीच्या जोरावर या वैज्ञानिकाने अवघ्या देशाला पुढे नेण्याचे स्वप्न पाहिले. अनेकांना तसे स्वप्न दाखवले आणि कायम ‘ध्वज विजयाचा उंच धरा’ अशी ललकारी दिली. हे सारे पुण्याच्या मातीत घडले म्हणून गेल्या तीन शतकांत पुणे घडविणा-या तमाम महामानवांच्या पुण्याईचे अप्रूप.
‘पुणे तेथे काय उणे’ अशी एक म्हण पुण्यात प्रचलित आहे आणि पक्का पुणेकर असणारा माणूस ती म्हण खरी ठरवण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. त्यामुळे मराठी साहित्यात, चित्रपट वा नाटकात पुण्याच्या मजेदार पाटया, तेथील लोकांचे चमत्कारिक वागणे-बोलणे अशा विविध गोष्टींवर विनोद करण्याची जणू प्रथाच पडली आहे आणि सगळ्यात गंमतीचे म्हणजे, पुण्यात राहून पु. ल. देशपांडे यांनी पुणेकरांची जी प्रतिमा तमाम मराठी वाचकांकडे उभी केली, त्यामुळे तर पुणेकरांची भलतीच पंचाईत झाली होती, पण प्रसंग कितीही बाका असला तरी बेधडकपणे सामोरे जाणे हे ज्यांच्या रक्तात भिनले आहे, ते पुणेकर पुढे त्या विनोदालाही सरावले.. आणि चक्क हसायलाही लागलेले दिसले. पु. ल. गेल्यानंतर आता पुणेही बदलत आहे. वाडे पडले आणि टोलेजंग इमारतींनी अवघ्या शहराला चोहोबाजूंनी अक्षरश: वेढा घातलाय. रस्ते फारसे मोठे झालेले नसले, तरी माणसे आणि मोटारींची संख्या अफाट वाढल्याने तिथे ‘रात्रंदिन युद्धाचा प्रसंग’ पाहायला मिळतो. बीपीओ आणि संगणक क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी गेल्या पंधरा-वीस वर्षात पुण्यात ठाण मांडलेले आहे; त्यामुळे देशभरातील नवतरुण या शहराकडे खेचले गेले. आज महाराष्ट्रात मुंबईखालोखाल इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रे पुण्यात खपतात. पूर्वी पुणेरी मिसळ, अमृततुल्य चहा, मराठी पद्धतीची भोजनथाळी आदींसाठी प्रसिद्ध असणा-या या शहरात आता डझनावारी तारांकित हॉटेल्स, विविध देशांचे खाद्यपदार्थ खाऊ घालणारी रेस्टॉरंट्स यांना चांगले दिवस आलेले दिसतात.
हा सा-या बदलत्या काळाचा परिणाम, पण या बदलत्या काळातही या शहराने आपले असामान्यत्व जपलेले आहे. ज्ञान, बुद्धी, कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर प्रामाणिकपणे एखाद्या विषयाचा ध्यास घेणे, त्यासाठी सर्वस्व पणाला लावणे, यासाठी पुणेकर प्रसिद्ध आहेत.
इ.स. १६३० पासून सुरू झालेल्या मोगली टोळधाडींमुळे पुण्याची वारंवार लुटालूट होत होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शहाजी राजे भोसले यांनी छोटया शिवबाला त्याच्या आईसोबत, जिजाऊ माँ साहेबांबरोबर पुण्यात धाडले आणि पुण्याचे पूर्वपुण्य जणू फळाला आले. कसबा पेठेत श्री गणेशा करून जिजाऊंनी पुण्याच्या कसदार मातीत सोन्याचा नांगर फिरवला होता, तेव्हापासून या पुण्यभूमीतून एकाहून एक सरस माणसे पैदा होत गेली. शिवबा राजांनी आपल्या मावळच्या जहागिरीला पार दक्षिणेपर्यंत पोहोचवले. छत्रपतींच्या त्या अफाट पराक्रमाने या पुणे-मावळ परिसरातील मावळ्यांना मैदान मारण्याची जणू चटकच लागली होती. त्यामुळेच मराठय़ांचा भगवा पुढील शंभर वर्षात अटक ते कटकपर्यंत मोठया डौलाने नाचत होता. अठराव्या शतकात आणि एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मराठय़ांचा धाक देशभर होता; पण ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकीच्या लढाईत ब्रिटिशांकडून दुस-या बाजीरावाला हार पत्करावी लागली. परिणामी शनिवार वाडयावर इंग्रजांचा झेंडा, युनियन जॅक फडकला. एकेकाळी पेशवाईचे केंद्र असणारे पुणे अगतिकपणे मुंबई इलाख्याचा भाग म्हणून ओळखले जाऊ लागले. पुण्याची अवघी रया गेली. सरदार-सावकार भुकेकंगाल बनले आणि भल्या मोठया चौसोपी वाडय़ांमध्ये स्मशानशांतता भरली होती, पण या जीवघेण्या पराभवातूनही पुण्याने आपला कसदार कणखरपणा सोडला नव्हता. आपल्या दु:ख, संकटांचा सामना करण्यासाठी ज्ञानसंपादन करण्याशिवाय अन्य मार्ग नाही, याची सर्वात आधी जाणीव एका पुणेकराला झाली. त्यामधूनच तीन जुलै १८५१ रोजी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची मुलींची शाळा अस्तित्वात आली. या शाळेला बुरसटलेल्या विचारांच्या सनातनी लोकांनी खूप विरोध केला. तरीही तिचे काम वाढतच गेले. त्या वाढत्या कामाची व्यवस्था पाहण्यासाठी पुढे ‘अतिशुद्रादिकास विद्या शिकविण्याविषयी मंडळी’ या नावाची संस्था स्थापन झाली होती. एकीकडे शैक्षणिक उन्नतीशिवाय पर्याय नाही असे गर्जून सांगत असतानाच महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८६३ रोजी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना करून माणुसकीशून्य हिंदू धर्मसंकल्पनांविरोधात एल्गार केला होता. त्यांच्या जळजळीत लिखाणाने रूढी-परंपरांच्या जाळ्यात अडकलेला हिंदू समाज सावध होऊ लागला होता. अगदी त्याच काळात लोकहितवादी देशमुख या सरदार घराण्यात जन्मलेल्या असामान्य संपादकाने जीवनाच्या र्सवकष विकासासाठी एकहाती लढाई सुरू केली होती. शासकीय सेवेत असूनही आपल्या समाजाच्या विकासासाठी लोकहितवादी अखंडपणे कार्यरत होते. पेशवाई बुडाल्यानंतर देशभर सत्ता गाजवणा-या मराठय़ांना, पर्यायाने पुणे नगरीला मरगळ आणि अवकळा आलेली असताना फुले-लोकहितवादी या दोन लेखक-संपादकांनी केलेले काम अतुलनीय होते. १८७२ साली न्या. महादेव गोविंद रानडे यांची पुण्यात न्यायाधीश म्हणून बदली झाली आणि फुले लोकहितवादींच्या सामाजिक कार्याचा चोहोअंगाने विस्तार झाला. एकूणच काय तर पेशवाईत, मराठय़ांच्या परमोत्कर्षाच्या काळात, जे पुणे शहर दिल्लीच्या तोडीचे राजकीय सत्ताकेंद्र बनले होते, त्या शहराचे राजकीय महात्मा संपल्यानंतर फुले-लोकहितवादी-गोखले आदी मंडळींनी पुण्याला ज्ञानप्रसाराचे केंद्र बनवले, त्यामुळे शिक्षणासह राजकारण, अर्थकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला आदी विविधांगी प्रगतीचे धुमारे या शहरास फुटले, महात्मा फुले आणि लोकहितवादी यांचे लिखाण मुख्यत: मराठीतच होते, त्यामुळे आरंभीच्या काळात त्यांचे कार्य महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले, त्याउलट न्या. रानडे यांनी इंग्रजीतून आपले विचार व्यक्त केल्याने अल्पावधीतच पुणे हे राजकीय-सामाजिक चळवळीचे केंद्र बनले. रानडे यांच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विचारांनी शिक्षित वर्ग खडबडून जागा झाला. लोकमान्य टिळकांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘महाराष्ट्र हा थंड गोळा होऊन पडला होता. तेव्हा रावसाहेबांनी रानडय़ांनी त्याला चेतना दिली.’ पेशवाई पडल्यानंतर अवघ्या पन्नास-साठ वर्षात झालेला हा बदल स्तीमित करणारा होता. पुण्याला आलेल्या या महत्त्वामुळेच मवाळ, नेमस्त न्या. रानडे यांचे राजकीय विरोधक असूनही लोकमान्य टिळक यांची राष्ट्रीय राजकारणाची वाट सोपी झाली. टिळकांच्या नंतर देशाचे नेतृत्व हाती घेणा-या महात्मा गांधी यांनाही न्या. रानडे यांचे शिष्यत्व पत्करूनच पुढील वाट चालावी लागली, तर असे हे ज्ञानमार्गी पुणे, आजही काही अफलातून लोकांना आपल्या कडी-खांद्यावर घेऊन उभे असलेले दिसते. यंदा दोन्ही पद्मविभूषण पुरस्कार पटकावणा-या पुणेकरांनी पद्मश्री पुरस्कारावरही आपला ठसा उमटवलेला दिसतो. जबलपूरहून पुण्यात येऊन स्थायिक झालेले श्रेष्ठ तबलापटू विजय घाटे, ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी प्राणाचे मोल देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.
प्रतापराव पवार यांनी गेल्या चार दशकांपासून पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीसाठी फार मोठे योगदान दिले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे लहान भाऊ ही त्यांची एक ओळख असली तरी प्रतापरावांनी स्वकर्तृत्वावर अनेक मोठी कामे केली आहेत. ‘सकाळ’सारखे माध्यम हाताशी असूनही त्यांच्या या सामाजिक कार्याचा त्यांनी फारसा गवगवा होऊ दिला नाही. पुण्यातील अंध मुला-मुलींची शाळा, बालग्राम, किर्लोस्कर फाऊंडेशन, बालकल्याण संस्था, निर्धार ट्रस्ट, परिवार मंगल सोसायटी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अशा डझनावारी संस्थांशी ते संबंधित आहेत. त्यांच्याच काळात ‘मराठा चेंबर’ची अत्यंत सुंदर इमारत पुण्यात उभी राहिली, याशिवाय देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या इंडियन न्यूजपेपर्स सोसायटी आणि इंडियन लॅग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन या संस्थांचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स’ या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेतही उपाध्यक्ष म्हणून प्रतापरावांनी काम केले आहे. पवार कुटुंबीय हे पुण्यापासून ११० कि.मी. अंतरावर असलेल्या बारामतीनजीकच्या काटेवाडीचे. शिक्षणाच्या निमित्ताने शरदराव आणि प्रतापराव पुण्यात आले. शरदरावांनी यशवंतराव चव्हाण यांचे शिष्यत्व पत्करून मुंबई गाठली, तर प्रतापरावांनी फाऊंड्री उद्योगात पदार्पण करून पुण्यातच घर केले. पवारांच्या घरात सामाजिक कार्याचा वारसा असल्यामुळे उद्योगधंद्यात रमलेले प्रतापरावही अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कामात समरसून गेले. स्वत: प्रतापराव मात्र आपल्या सा-या यशाचे श्रेय पुण्यातील सामाजिक वातावरण आणि सहकार्य करणा-या साथीदारांना देतात. आपल्या या म्हणण्याच्या पुष्टय़र्थ प्रतापरावांनी फार सुंदर रूपक वापरले. ते म्हणतात, ‘तसं पाहिलं तर मी बारामतीहून पुण्यात आलो होतो, पण इथल्या चांगल्या वातावरणामुळे मी टिकलो. एक रोपटं तुम्ही चांगल्या बागेत लावा आणि दुसरं जंगलात लावा. बागेत त्याची चांगली निगा राखली जाते, त्याचे रक्षण केले जाते. परिणामी अल्पावधीत त्या रोपटयाचा वृक्ष बनतो. त्याला फळे-फुले लगडतात. त्याउलट जंगलातील रोपटयाची स्थिती असते. पुण्यातील सर्वाना सामावून घेणा-या लोकांनी आम्हाला अगदी आरंभापासून मदत केली म्हणून आमच्या हातून कामे झाली, हेच जर मी पुण्याऐवजी चंडिगडला स्थायिक झालो असतो, दिल्लीत गेलो असतो, तर माझ्या हातून एवढी कामे घडली असती का? ठाऊक नाही; पण या शहराला सामाजिक-शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाची एक आंतरिक प्रेरणा आहे, त्यामुळे बाहेरून आलेले अय्यंगार गुरुजी, तबलापटू घाटे येथे रुजतात आणि वाढतात.’ असे त्यांनी सांगितले.
पुण्याला सामाजिक वा शैक्षणिक कार्याची भली मोठी परंपरा असली तरी या शहराचे एकूण व्यक्तिमत्त्व गोंधळात टाकणारे. इथे मुंबईत आवश्यक असणारा झकपक दिखाऊ थाट नसला तरी चालेल, दिल्लीत गरजेची असणारी ‘जी हुजुरी’ची खोटी लीनता नसती तरी फरक पडत नाही. कलकत्त्यात लागणारी हिशेबी चलाखी नसली तरी येथे कुणाचे अडत नाही. तुमच्या वेगळ्या विचारांना, कल्पनांना कडाडून विरोध करणारे माथेफिरू येथे असतात, तद्वत तुम्हाला जीवापाड जपणारे सहकारीही हे शहर देते. ज्ञानदानाचा वसा घेतलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना छळणा-या याच शहराने पुढे ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून लौकिक मिळवला. लोकमान्य टिळकांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत चहा घेतला म्हणून त्यांना प्रायश्चित्त घ्यायला लावणा-या या शहरात पन्नासेक वर्षानी तोच चहा ‘अमृततुल्य’ ठरला. या पुण्यनगरीत हल्ली मुली पॅन्ट किंवा पंजाबी ड्रेस घालून फिरतात, पण १९३० च्या सुमारास महिलांनी नऊवारी नेसावे की पाचवारी, सकच्छ की विकच्छ, असा शास्त्रशुद्ध वाद रंगला होता. मुलींचे लग्नाचे वय असो वा विधवा विवाहाला सामाजिक मान्यता देण्याचा प्रश्न असो, सगळ्याच विषयात चर्चा करायला पुणेकर पुढे. टिळक-आगरकरांमधील वाद पुण्यातील वृत्तपत्रांमध्ये जेवढा रंगला त्याहून जास्त रस्त्यावर गाजला. या पुण्याने जशी देवांना ‘खुन्या मारुती’ वगैरे सारखी नावे दिली तशी वेगळ्या माणसांनाही दिली. १८७०-९० च्या काळात प्रत्येक सार्वजनिक कामात हौसेने भाग घेणारे गणेश वासुदेव जोशीनामक महत्त्वाचे नेते होते. त्यांना ‘सार्वजनिक काका’ असे नाव पुणेकरच देऊ शकतात. तर अशा या शहराने आपल्या विद्वान पुत्रांच्या जोरावर जेवढी प्रतिष्ठा मिळवली, तेवढीच बदनामीही सहन केली. ज्या नरेंद्र दाभोलकर यांनी आपले अवघे आयुष्य समाज जागृतीसाठी घालवले. त्यांची निर्घृण हत्या याच ‘पुण्यनगरा’त झाली. त्याआधी या शहरात विवेकनिष्ठेचा पुरस्कार करीत जुन्या रूढी-धर्मपरंपरांना आव्हान देणा-या ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली गेली होती. आणि पुढेतर ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे नामक धर्मवेडयाने महात्मा गांधी यांची निर्घृण हत्या करून पुण्याच्या इभ्रतीला काळिमा फासला होता; परंतु तरीही पुण्यातील समाजसेवकांची कामगिरी इतकी बलवत्तर की, त्या धक्क्यातूनही पुणे शहर बाहेर आले, मात्र मोठा बदल घेऊन. गांधीजींच्या हत्येनंतर पुण्यातील सत्ताकेंद्र ब्राह्मणेतरांकडे सरकले. सत्यशोधक समाज, शेकाप, समाजवादी, कम्युनिस्ट आदी चळवळी पुण्यातच फोफावल्या. काकासाहेब गाडगीळ, सेनापती बापट, शंकरराव देव, केशवराव जेधे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मोहन धारिया, आचार्य अत्रे अशी पुण्यात गाजलेली अनेक नावे घेता येतील. पु. ल. देशपांडे, भीमसेन जोशी, जयंत नारळीकर, सतीश आळेकर, डॉ. जब्बार पटेल, डॉ. विजय भटकर, डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे, उद्योगपती शं. वा. किर्लोस्कर, दि. पु. चित्रे, उद्योजक राहुल बजाज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आदी सर्वच क्षेत्रांत नाव कमावणा-या लोकांनी पुण्याला आधुनिक काळात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले.
पण पुण्यातील या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना ‘मोठेपण’ दिले सर्वसामान्य पुणेकरांनी. महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या भवितव्याला घडविणा-या बहुतांश संस्था पुण्यात जन्मल्या, त्याही एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. आजही त्यातील पुणे सार्वजनिक सभा, पुणे नगर-वाचन मंदिर, वसंत व्याख्यानमाला, वेदशास्त्रोत्तेजक सभा, वत्कृत्वोत्तेजक सभा आदी संस्था कार्यरत असलेल्या दिसतात. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हिंद सेवक समाज, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, भारत इतिहास संशोधन मंडळसारख्या राजकारण आणि संशोधनाला वळण देणा-या संस्था पुण्यातच सुरू झाल्या, कारण या सगळ्या खटाटोपासाठी लागणारे कार्यकर्ते पुण्यात विपुल प्रमाणात होते. महात्मा गांधी म्हणूनच ‘महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे.’ असे म्हणायचे. त्यांच्यापाशी हल्लीच्या कार्यकर्त्यांकडे असणारी ‘हुशारी’ नव्हती, पण प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची समज होती. म्हणूनच ‘हमाल पंचायती’ची कल्पना घेऊन बाबा आढाव कामाला लागले. नशेबाज लोकांना माणसात आणायचे या एकाच ध्येयाने डॉ. अनिल अवचट कार्यरत झाले. पुण्याने संगीत-नाटक जेवढे आनंदाने पाहिले, ऐकले, तेवढयाच तन्मयतेने पुणेकर गंभीर चर्चासत्रांमध्ये बसतात. सामाजिक कामात उतरतात, म्हणून गेल्या तीन वर्षात पुण्यात डझनभर पद्मपुरस्कार आले असावेत; पण हल्ली अशी महान कामगिरी बजावणा-यांची संख्या पुण्यातच नव्हे तर देशात सर्वत्रच कमी होताना दिसत आहे. मी, माझे कुटुंब आणि माझे भवितव्य याच्याभोवती ज्यांचे जीवनचक्र फिरते, असे नेतृत्व सध्या समाजाच्या सर्वच क्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी बसलेले आहे. ‘करण्यापेक्षा जास्त दाखवून चमकून घ्या’ असे बोधवाक्य या सगळ्याच मंडळींनी आपल्या डोक्यावर घेतल्यामुळे समाजातील कार्यकर्ता वर्ग नाकर्ता बनलाय. कार्यकर्ता हा कोणत्याही संस्था वा संघटनेचा आधार असतो. याआधी मध्यमवर्गीय घरातील कार्यकर्ते पदरची वर्गणी भरून संस्था-संघटना चालवीत. लोकांना उपकारक ठरतील असे कार्यक्रम करीत, पण हल्ली सारा भर मुख्यमंत्री निधीवर, सरकारी अनुदानावर असतो. तेही कमी पडले, तर स्थानिक आमदार-खासदारांचा निधीही असतोच. मग अशा संस्थेतून राष्ट्रीय शिक्षण किंवा सामाजिक भान निर्माण व्हावे, अशी आशा आपण कशी करणार? तर अशा सर्वच ‘सरकारी कृपापात्र’ संस्थांमुळे आमच्या देशातील सामाजिक, शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सांस्कृतिक वातावरण फारच दूषित झाले आहे. वातावरणातील प्रदूषणाचा तुम्ही-आम्ही जेवढा विचार करतो तेवढा जरी विचार शिक्षण वा संशोधनाचा केला, तरी पुण्याची पुण्याई व महाराष्ट्राचे महानत्व घेऊन भारतवर्षातील लोकशाही लोकांसाठी राबेल.
Categories:
आवर्तन