Mahesh Mhatre

मराठी वृत्तपत्रांमध्ये दिल्लीतील राजकीय घडामोडींपासून साहित्यिक हालचालींपर्यंतच्या सर्व क्षेत्रांविषयी एक नवी जाणीव निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांचे निधन ही त्यांच्या लिखाणावर प्रेम करणा-या प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी बातमी. विशेषत: सध्या ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि कंपूने राजकीय धुमाकूळ घातलाय. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात जे धूमशान रंगलंय अशा काळात तिरकस, बोचरे आणि परखड विश्लेषण करणारे अशोक जैन यांचे जाणे फारच दु:खद आणि क्लेशदायक. मराठी वृत्तपत्रसृष्टीला आपल्या ‘कलंदर’ वृत्तीने आत्मभान देणा-या जैन यांना दिल्लीतील राजकीय परीक्षणाएवढेच पुस्तक वा नाटय परीक्षणात रस होता. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणे त्यांना आवडायचे आणि साधायचेदेखील. ते शरद पवार यांच्याशी ज्या सहजपणे बोलायचे त्याच आत्मीयतेने त्यांचा कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याशी संवाद चाले. खरे सांगायचे तर जैन यांना संवादाएवढेच वादही आवडायचे. फटकळपणाच्या जवळ जाणारा स्पष्टवक्तेपणा अंगी असल्यावर वादाचे वादळ उठणारच! जैन ते वादळ उठवायचे आणि त्यावर स्वारही व्हायचे. दिल्लीतील असाच एक किस्सा त्यांनी सांगितला होता. १९७८ ते १९८९ या काळात त्यांनी दिल्लीतील अनेक राजकीय घटनांवर भाष्य करणारे लेख लिहिले होते. त्या लेखांमुळे अनेक बडे राजकारणी त्यांच्यावर नाराज होते. तत्कालीन केंद्रीय नभोवाणीमंत्री वसंत साठे, हे त्या नाराजांपैकी एक. बराच काळ त्यांनी जैनांशी अबोला धरला होता. एकदा महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला साठे यांना बोलावण्यात आले होते. त्या व्यासपीठावर जैनही होते. त्यावेळी साहित्य- संस्कृतीविषयक जैन यांनी असे काही भाषण केले की, साठे यांनी आपला राग विसरून त्यांना सर्वासमक्ष मिठी मारली आणि मोकळ्या मनाने उद्गारले, ‘अशोक, तुमच्या अवगुणांपेक्षा गुणच जास्त चांगले आहेत. मी उगाचच तुमच्याशी अबोला धरला.’ खळखळून हसत जैन यांनीही तो विषय तिथेच संपवला.

जैन हे उत्तम पत्रकार होते, त्यांचे राजकीय विश्लेषण अचूक असायचे. खोचक टीका करताना त्यांच्या लेखणीला अगणित मिच्र्या फुटायच्या. त्या इतक्या तिखट असायच्या की, ‘मधु’ मधाळ लेखकरावांच्या तोंडून शिवराळ जाळ निघायचा. राजकारण्यांच्या खुच्र्या हलायच्या. त्यामुळे ते सारे जैनांना ‘हलविण्यासाठी’ पुढे यायचे. पण मोकळ्या मनाचे जैन त्या प्रतिक्रियांमध्येही रमायचे. मुख्य म्हणजे आपल्यावर कोणी काय टीका केली, हे सांगून सहजपणे हसायचे. वर वर पाहताना ही गोष्ट साधी वाटते. पण ती खरे तर खूप कठीण गोष्ट आहे. स्वत:च्या दाढीपासून गाडीपर्यंत प्रत्येक विषयावर कोटी करणे, हा त्यांचा आवडता छंद. एकदा त्यांच्यासोबत फोर्टमधील पारशी पद्धतीच्या भोजनालयात गेलो होतो. सगळ्या हॉटेलात आम्हीच तेवढे मराठी होतो. बाकी सारे पारशीच दिसत होते. जैन त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वेटरला हाक मारते झाले, ‘अरे, इकडे ये’ आणि सारे लोक आमच्या दिशेने पाहू लागले. गंमत म्हणजे शेजारच्या टेबलावरील एका पारशी बावाजीने त्यांच्याकडे पाहून हात केला, जैनांनीही प्रतिसाद दिला. आणि पुढे सुरू झाला पारशी खाद्ययात्रेचा रसिला प्रवास. पारशी मटन धनसाक, पात्रानी मच्छी आणि झिंगानी खिचडीने पोट भरले. खमंण ना वडा आणि फालुदा कुल्फीने त्या चटकदार खाद्ययात्रेवर कळस चढवला. पण खरे सांगायचे तर त्या प्रत्येक पदार्थाबद्दल सांगताना जैन ज्या पद्धतीने माहिती देत होते, ते ऐकून मन तृप्त झाले होते. त्यामुळे न राहवून त्यांना विचारले, ‘तुम्हाला या पारशी पदार्थाबद्दल एवढी कशी माहिती, तुम्ही तर ‘जैन’ आहात ना?’ त्यावर गडगडाटी हास्य करत ते उत्तरले, ‘अरे माझे आडनाव जैन नव्हे, चैन असायला हवे होते!’

जैन यांचा पत्रकारितेतील प्रवास १९६१पासून पुण्यात बातमीदारीतील उमेदवारीने सुरू झाला आणि पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यकारी संपादकपदापर्यंत ते पोहोचले होते. पण त्यांच्यातील ‘बातमीदार’ हा आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत सक्रिय होता. बातमी हा त्यांच्या कायम जिव्हाळ्याचा, औत्सुक्याचा, प्रेमाचा आणि आस्थेचा विषय होता. म्हणूनच दुस-या वृत्तपत्रातील बातमीदारांच्या चांगल्या बातम्यांचे कौतुक करण्यात ते नेहमी पुढे असत. मोकळेपणाने नवख्या बातमीदाराचे कौतुक करताना जैनसाहेब प्रेमाचे, मोलाचे सल्लेही देत. त्यामुळे त्या नवख्या पत्रकाराची उमेद वाढायची. जैनांचे समकालीन बडे पत्रकार जेव्हा कंपू निर्माण करून त्यातच रमलेले दिसत होते त्या काळात जैन आपल्या स्वभावानुसार ‘एकला चालो रे’च्या भूमिकेत दिसायचे. फक्त लिखाणातच नव्हे, तर खासगी गप्पांमध्येही त्यांना आपले खरे मत मांडणे आवडायचे. त्यामुळेच असेल कदाचित महत्त्वाच्या पदी बसण्याची पुरेपूर पात्रता अंगी असूनही हा स्पष्टवक्तेपणा आड येत असावा. तसा तो अनेकांना महागात पडला. राजकारणाचा अफाट व्यासंग, जबरदस्त जनसंपर्क आणि सुंदर लेखनशैली असूनही वरुणराज भिडे मागे पडतात. अर्थकारणापासून युद्धशास्त्र, क्रिकेटपासून वैद्यकशास्त्र आणि जीवनाच्या विविधांगांचा प्रचंड अभ्यास असूनही मिलिंद गाडगीळ मूळ प्रवाहापासून दूर फेकले जातात. अगदी जैन यांचेही तसेच घडले. हल्ली ज्याला ‘व्यावहारिक शहाणपण’ म्हणतात त्या तडजोडीच्या हुशारीला त्यांनी कधीच जवळ केले नाही. आपल्या लिखाणाच्या प्रेमात आकंठ बुडालेले असल्यामुळे जैनांना ‘व्यावसायिक आखाडया’चे कधीच आकर्षण नव्हते. तो त्यांचा प्रांतही नव्हता. त्याचे परिणाम व्हायचे तेच झाले. पत्रकारितेत व्यावसायिक तणाव हे नेहमीच आरोग्य आणि कुटुंबावर जास्त आघात करतात. पण आघाताने डगमगतील ते जैन कुठले. पक्षाघाताला आपल्या विनोदाच्या बळावर आणि सुनीतीजींच्या साथीने त्यांनी अक्षरश: जिंकले होते. शारीरिक व्याधीला न घाबरता जैन यांनी सुप्रसिद्ध लेखकांच्या नामवंत पुस्तकांचे अनुवाद करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव (अंत:स्थ), माजी राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर (इंदिरा : अंतिम पर्व), आर. के. लक्ष्मण (लक्ष्मणरेषा), अरुण गांधी (कस्तुरबा) इत्यादी डझनावारी पुस्तके मराठीत आणून त्यांनी मराठी वाङ्मयाची फार मोठी सेवा केली. अगदी शेवटपर्यंत ते लिहीत राहिले आणि नव्या पत्रकार, संपादकांना हिताचे सल्ले देत राहिले. म्हणूनच जैन यांच्या जाण्याचे दु:ख वाटते.

जैन यांचा जन्म टिपिकल मारवाडी कुटुंबात झाला होता. पुण्याजवळील घोडेगाव हे त्यांचे मूळ गाव. ज्या काळात पुण्यात चार-सहा लोकांकडे मोटारी होत्या, त्यावेळी जैनांच्या आजोबांकडे मोटार होती. अशी त्यांच्या परिवाराची आठवण शरद पवार यांनी एका पत्रकारांच्या कार्यक्रमात सांगितली होती. एकूणच काय तर जैनांनी परंपरेने आलेले व्यावसायिक चातुर्य नाकारून शब्दांवर प्रेम करण्याचा वेडेपणा स्वीकारला. त्यामुळे मराठी पत्रकारितेला चांगल्या राजकीय बातम्या, विश्लेषण आणि बोचरे उपहासगर्भ लिखाण कसे करता येते, हे समजले. त्यांनी मराठीला ‘मौनी खासदार’, ‘चित्रपश्चिमा’सारखे अनेक नवे शब्द दिले. अनुवादाच्या कामाने मराठी भाषा समृद्ध केली, तरी त्यांच्या या कार्याची साहित्यविश्वाने म्हणावी तेवढी दखल घेतली नाही. अर्थात जैनांना त्याची अजिबात पर्वा नव्हती. एक मात्र खरे की, जैनांचे हे योगदान पत्रकार आणि पत्रकारितेचे विद्यार्थी तरी कायम स्मरणात ठेवतील.. तीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल!

Categories:

Leave a Reply