Mahesh Mhatre

विवेकनिष्ठ समाजनिर्मितीचे स्वप्न पाहणा-या संत आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्राला वारसा आहे, परंतु गेल्या काही वर्षापासून सगळेच बिनसलेले दिसते आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाचा अद्याप तपास लागलेला नाही. ज्या सनातनी वृत्तीच्या लोकांनी डॉ. दाभोलकरांना मृत्यूनंतरही सोडले नाही तेच लोक आता अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी विधेयकाची प्रक्रिया रोखायची भाषा करताहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करवून घेण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध करणा-या सनातनी हिंदुत्ववाद्यांनी वारक-यांच्या काही स्वयंघोषित ‘प्रवक्त्यां’ना पुढे केले आहे. समाजात संभ्रम निर्माण करून विधेयकाला विरोध करण्याचा, हा डाव वेळीच हाणून पाडणे गरजेचे आहेच. त्याचबरोबर वारकरी संप्रदायात घुसलेल्या बोगस अनिष्ट आणि आत्मघातकी गोष्टी बाहेर घालवणेसुद्धा निकडीचे बनले आहे. एकेकाळी महाराष्ट्राचा आचारधर्म म्हणून ओळखला जाणारा हा भागवत धर्म आठशेंहून अधिक वर्षे मराठी समाजमन घडवत आला आहे. त्याचे ते मोठेपण पुढील पिढय़ांच्या हाती देण्याची निसर्गदत्त जबाबदारी आपल्या पिढीवर आहे.. ‘ एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. ते विसरून आपल्याला पुढील वाटचाल करता येणार नाही.


पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे, तर ज्ञानोबा-तुकाराम, हा म-हाटी समाजाचा श्वास-उच्छवास आहे. म्हणूनच सध्याच्या दिल्या-घेतल्याच्या जमान्यात ‘कशाच्या तरी मोबदल्यात’ भक्ताला पावणा-या देव-देवतांचे, स्वयंघोषित संत-महंतांचे स्तोम वाढत असताना ‘तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी’ असे थेट सांगणा-या रोखठोक वारकरी तत्त्वज्ञानाची नव्याने मांडणी करण्याची गरज आहे. गेल्या आठशे वर्षापासून मराठी मनाची जडणघडण करणा-या वारकरी संत-विचारांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ‘राइज ऑफ द मराठा पॉवर’ (मराठी सत्तेचा उत्कर्ष) या ग्रंथामध्ये लिहिले आहे, ‘‘ज्ञानेश्वर- तुकारामादी साधुसंतांनी पंढरपुरी वाळवंटात भक्तीचा झेंडा रोवून चहूंकडे या नीती-आचारप्रधान भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य अधिक सोपे झाले.’’ न्या. रानडे यांच्या या मताला पुष्टी देताना थोर विचारवंत, ह.भ.प. शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर म्हणतात, ‘न्या. रानडय़ांची न्यायबुद्धी सोने तोलायच्या तराजूप्रमाणे अतिशय काटेकोर होती, त्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सर्वकष योगदानाबद्दल दिलेल्या अभिप्रायाचे मोल फार मोठे आहे. त्यांच्या या अभिप्रायाचा आशय असा की, वारकरी साधुसंतांनी जे भक्तिप्रधान तत्त्वज्ञान पेरले, त्यामुळे पताका-गंध टिकून राहिले. मुसलमानी आक्रमणाचे चपेटे वाजत असतां, त्यांच्या वलीमुर्शदांच्या आरोळ्यांनी आकाश कोंदून गेले असतानाही संतांनी हे महत्कार्य केले. हे ध्यानी घेतले, म्हणजे त्यांच्या कार्याचे मोठेपण लक्षात येते.’ एकूणच काय तर जातिभेदाने ग्रस्त आणि रूढी-अंधश्रद्धांनी त्रस्त झालेल्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकासह अनेक राज्यांतील वैष्णवजनांना वारकरी संतांनी जगण्याचा मार्ग दाखवला. धर्माभोवती जमलेले कर्मकांडाचे अवडंबर कोणताही ‘क्रांतिकारक’ आव न आणता आमच्या संतमंडळींनी दूर केले आणि सामाजिक-राजकीय संकटांनी घेरलेल्या त्या आठशे वर्षापूर्वीच्या काळात संत नामदेवराय मोठय़ा विश्वासाने म्हणाले,

काळवेळ नसे नाम संकीर्तनी।
उंच नीच योनी हेही नसे।
धरा नाम कंठी सदा सर्वकाळ।
मग तो गोपाळ सांभाळील।

त्यांच्या त्या आश्वासक शब्दांनी उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी या भेदांनी विखुरलेल्या मराठी लोकांना भागवत धर्माच्या झेंडय़ाखाली एकत्र आणले होते. विशेष म्हणजे ज्ञानदेव-नामदेवांच्या नेतृत्वाखाली अठरापगड समाज प्रबोधन पर्वाच्या वारीत सामील होण्याच्या काळातच धर्म आणि राज्यसत्तेतील अधिकारी मंडळी अंधश्रद्धा, जाचक प्रथा-परंपरांचे जोखड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते. देवगिरीचा शक्तिवान राजा रामदेवरायाचा ‘महाकर्णाधिप’ म्हणजे अर्थमंत्री असणा-या हेमाद्री पंडिताने ‘चार्तुवण्र्य चिंतामणी’ हा सर्व जातींना कर्मकांडाच्या बंधनात अडकविणारा ग्रंथ त्याच काळात लिहिला होता. शिवाय तंत्रमार्गाच्या वामाचाराने सर्वत्र थैमान घातले होते; त्यामुळे समाजाच्या सर्व थरातील लोक मूळ धर्मापासून, माणुसकी आणि सद्वर्तनापासून दूर गेले होते. त्यांना प्रेम-शांती-बंधुभाव आणि सद्भावाचे शिक्षण देण्याचे काम नामदेवरायांच्या पुढाकाराने सुरू झाले होते. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतच्या अगम्य शब्दांमध्ये दडलेला धर्माचा अर्थ सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भाषेत ऐकविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या काळात धर्मज्ञान फक्त संस्कृतमध्येच सांगण्याचा दंडक होता, पण आपल्या ‘अमृताशी पैजा जिंकणा-या’ मराठीचा अभिमान बाळगणा-या ज्ञानोबारायांनी मोठय़ा प्रेमाने धर्म संकीर्तनाची परंपरा सुरू केली. या प्रबोधनकारक धर्मकार्याचा ‘ज्ञानदेवे रचिला पाया.. तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. कारण तत्कालीन समाजस्थितीला अनुकूल होईल, असे बदल घडविताना ज्ञानेश्वरांनी सर्वसमावेशक वृत्ती धारण केली होती. नामदेव महाराजांनी आपल्या जोडीला चोखामेळा, सावता माळी, जनाबाई, गोरा कुंभारादी दुर्लक्षित समाजघटकातील लोकांना लिहिते केले; त्यामुळे बहुजन समाजाला आत्मभानासोबत जगण्याची दिशा सापडत गेली. वारक-यांचे जीवनलक्षी तत्त्वज्ञान सहज सोपे करून सांगताना ज्ञानेश्वरांनी सगळे कर्मकांड नाकारले होते. ‘सहयज्ञा : प्रजा : सृष्टा :’ या श्लोकाचे निरूपण करताना ज्ञानोबा माऊली म्हणतात, ‘तुम्ही स्वधर्माचे आचरण करा, तुमच्या सा-या इच्छा पूर्ण होतील, त्यासाठी वेगळी व्रत-वैकल्ये करायची गरज नाही. तप करून शरीराला पीडा देणेही नको. कामनायुक्त आराधना नवस-सिद्धी साधनांच्या मागेही जाऊ नका. इतर देवतांची उपासना सोडा आणि स्वधर्माचे पालन करा, की पुरे.’ ज्ञानोबारायांचा हाच विचार अगदी सोपा करून सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

पुण्य परउपकार पाप ते परपीडा।
आणिक नाही जोडा दुजा यासी।
सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म।
आणि हे वर्म दुजे नाही।।
तुका म्हणे उघडे आहे हित घात।
जयाचे उचित करा तैसे।।

एकूणच काय तर सर्वच वारकरी संतांनी समाजाची चौकट एकसंध राहावी यासाठी शांततामय मार्गाने क्रांती घडवली. तिचा आजवर महाराष्ट्राला फायदा झाला, पण तो यापुढे होईलच, असे सांगता येत नाही. याचे पहिले कारण म्हणजे ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले’ या न्यायाने वारक-यांमध्ये कृतिनिष्ठ नेतृत्व मानण्याची पद्धत आहे, तेथे आज निर्नायकी अवस्थेमुळे वैचारिक गोंधळ माजलेला दिसतोय; त्यामुळे राज्य सरकारने पुढे आणलेल्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी जसे काही वारकरी पुढे येताना दिसतात, तद्वत विठ्ठलाचा गाभारा सोन्याचा करावा, यासाठीही काही स्वयंघोषित ‘प्रवक्ते’ तावातावाने बोलताना दिसतात. स्वत:ची शेती, छोटे-मोठे व्यवसाय आणि घर-प्रपंच सांभाळून परमार्थाची वारी करणा-या वारक-यांना या वाद-विवादामागील हेतूच ठाऊक नसतात; परंतु त्यांचे पुढारपण करणा-या शास्त्री-बुवा-महाराजांचा थाट मात्र आम्हीच वारक-यांचे प्रतिनिधी आहोत, असा असतो. त्यामुळे बनेल हिंदुत्ववादी संघटनांना अशा एखाद्या वारकरी बुवाला हाताशी घेऊन तमाम वारकरी आमच्या बाजूने आहेत, असा आभास निर्माण करणे सोपे जाते. ज्ञानोबा-तुकोबांनी ज्या अंधश्रद्धांचा परखड शब्दांत समाचार घेतला होता, त्या संताचाच वारसा सांगणारे काही लोक जेव्हा अंधश्रद्धेला कायदेशीर आळा घालणा-या प्रक्रियेस विरोध करतात, त्या वेळी आश्चर्य वाटते. ज्या तुकोबांनी ‘सेंदरी हें देवी दैवते। कोणती पुजी भुतेंखेतें।’ अशा शब्दांत अंधश्रद्धांचा समाचार घेतला होता. ‘डोई वाढवूनि केश। भुते आणिती अंगास। तरी ते नव्हति संतजन’ असे सांगून त्यांनी भोळ्या-भाबडय़ा लोकांना सावध केले होते. या ढोंगी, अधर्मी लोकांचा बुरखा फाडताना तुकोबांचे शब्द वज्रासारखे कठोर होतात. ‘तुका म्हणे मैंद। नाही त्यापासी गोविंद’ मईंद म्हणजे ढोंगी-परमार्थाचे सोंग घेऊन लोकांना फसवणारे जोगी. त्याच्या लांब लांब जटा, शिष्यांची बैठक, चमत्काराच्या अफवा हा सारा देवाला बाजारात विकण्याचा प्रकार. तुकोबा या सगळ्याचा निषेध करणारे; परंतु त्याच पाऊलवाटेवर जाणा-या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला वारक-यांच्या ‘प्रवक्त्यां’चा विरोध. अर्थात, त्यामागील मूळ कारणही दुर्लक्षिण्यासारखे नाही. सुमारे विसेक वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली काही ‘महामानवांनी’ थेट ज्ञानोबा-तुकारामांवरच टीकेची झोड उठवली होती. आठशे किंवा चारशे वर्षापूर्वीच्या लिखाणाला प्रचलित विज्ञान युगाचे निकष लावताना तारतम्य बाळगणे गरजेचे होते; परंतु ‘अंनिस’ने स्वत:ची अक्कल पाजळताना वारकरी संतांची प्रतिमा डागाळण्याचे पाप केले होते. शाम मानव यांनी १९८८ मध्ये ठाण्यातील भाषणात तर इतका कहर केला होता की, त्यांची सभाच उधळून लावण्यात आली होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. म्हणून माझे सहकारी अ‍ॅड. संतोष पाटील-जोहेकर, अ‍ॅड. प्रदीप टिल्लू यांच्यासह आम्ही ‘कोकण विद्यार्थी आघाडी’च्या बॅनरखाली प्रा. मानव यांची जाहीर सभा आयोजित करून ठाण्यातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्याच वादग्रस्त विधानांचा, घटनांचा वापर करून काही कडव्या हिंदुत्ववाद्यांनी आज वारक-यांना भडकावण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. ही वस्तुस्थिती विवेकनिष्ठ समाजनिर्मितीचे स्वप्न पाहणा-या सर्वच विचारी माणसांना विवेकाचे महत्त्व सांगणारी आहे. आज जे लोक ‘अंधश्रद्धा निर्मूलन विधेयका’ला नावापासून विरोध करीत आले आहेत, ते कर्मठ आणि कडवट परंपरावादी आहेत. त्यांच्या पूर्वजांनी, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई या अनाथ लेकरांना संन्याशाची पोरं ठरवून वाळीत टाकले होते. या कोवळ्या वयातील मुलांना चतकोर भाकर तुकडा मिळू नये, म्हणून दुष्टावा करणा-या ब्रह्मवृंदांनीच त्यांच्याकडून शुद्धिपत्राची मागणी केली होती. ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा। येरांनी वाहावा भार माथा।।’ असे म्हणत आक्रमकपणे आपला आध्यात्मिक अधिकार सांगणा-या तुकाराम महाराजांना मारहाण करणारा मंबाजी, रामेश्वर शास्त्री किंवा तत्सम पुरोहित वर्गाच्या जातकुळीतील लोकच आज काही वारक-यांना हाताशी धरून परिवर्तनाचे चक्र उलटय़ा दिशेने फिरवण्याचा प्रयत्न करताहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे.

केवळ अंधश्रद्धा-जादूटोणा विरोधी विधेयकाला काही वारक-यांचा विरोध हेच वारकरी संप्रदायाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उमटविणारे एक कारण नाही. या संतांच्या विचारवारशावर उभ्या असलेल्या ‘इमारती’ला खिळखिळे करणा-या इतर कारणांचीही आपण चिकित्सा केली पाहिजे. अवघे वारकरी तत्त्वज्ञान दयेवर, करुणेवर आणि प्रेमावर आधारलेले आहे. त्यात वर्तनातील साधेपणा, आचरणातील सच्चेपणाला महत्त्व आहे. मठ-मंदिरांच्या स्थापनेचा, स्वत:चे स्तोम माजविण्याचा वारकरी संप्रदायात निषेध केला जातो, पण आज संतांनी त्यांच्या आचरणातून शिकविलेल्या या सगळ्या गोष्टींच्या अगदी उलट व्यवहार सुरू असलेला दिसतोय. साधुसंतांच्या नावाने नित्यनवी ‘संस्थाने’ उभी राहत आहेत. पूर्वी राजांची, नवाबांची संस्थाने असत, आता ‘महाराजां’ची संस्थाने पाहायला मिळतात. कीर्तनात ‘काही न मागे कोणासी। तोचि आवडे देवासी।’ हा तुकोबांचा अभंग घेणारे महाराज कुणा तरी भक्ताची गाडी घेऊन आलेले पाहायला मिळतात. तीच गोष्ट बिदागीची. एकीकडे श्रोत्यांना ‘भक्त ऐसे जाणा जे देही उदास। गेले आशापाश निवासनी।’ म्हणणा-या कीर्तनकार वा प्रवचनकारांना संसारी लोकांपेक्षा जास्त आशा असतात, मग अशा लोकांकडून मिळणा-या उपदेशाचा लोकांवर काय परिणाम होणार?

मध्यंतरी एका कीर्तनास जाण्याचा योग आला. बुवांचे नाव मोठे प्रसिद्ध असल्यामुळे बरीच गर्दी जमली होती. कीर्तनाच्या अर्धा तास आधी बुवा आले. हसतमुख चेहरा, कानात मोत्याची भिकबाळी, खांद्यावर करवत काठी उपरणे आणि हातात लक्षवेधी नक्षीदार सोटा, असे भारदस्त रूप. बुवांची हातातील सोटा जमिनीवर टेकविण्याची पद्धत अगदीच ‘स्टायलिश’, त्यावरून तो सोटा गरज म्हणून हाती घेतलेला नाही, हे स्पष्ट होत होते. बुवांचे तरुण वय पाहता, तो आधारासाठी ‘कृत्रिमपणे’ वापरला जाणारा सोटा खटकत होता. म्हणून मी त्यांच्या ‘जवळच्या’ शिष्याला त्याबद्दल विचारले. त्यावर तो उत्तरला, ‘ते अमके महाराज कसे सोटा घेऊन कीर्तनाला उभे राहतात, म्हणून आमचे महाराजही सोटा वापरतात’, मी म्हणालो, ‘अहो, ते महाराज आता म्हातारे झालेत..’ तो उत्तरला, ‘मग काय झाले, आमचे महाराजही ज्ञानवृद्ध आहेत.’ त्यांच्या या बोलण्यावरून वारकरी संप्रदायातील कीर्तनकार-प्रवचनकारांच्यात होत असलेला ‘बदल’ प्रकर्षाने जाणवला.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कीर्तन-प्रवचनाची बदललेली पद्धत. गेल्या काही वर्षापासून निरूपणात संस्कृत आणि इंग्रजीचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढतोय. ज्या संप्रदायाची स्थापनाच मुळी संस्कृतमधील ज्ञान मराठीतून देण्याच्या हेतूने ज्ञानदेव-नामदेवादी संतांनी केली होती, त्या मूळ हेतूला बाधा पोहोचवून स्वत:चे महत्त्व वाढवण्याचे काम अनेक नामवंत भरभक्कम बिदागी घेऊन करताना दिसतात, तर काही थोडं फार इंग्रजी जाणणारे, त्यातील उपमा-अलंकारांचा वापर करून आपण ‘स्मार्ट’ बुवा आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात आणि हे सारे करताना ‘ग्यानबा-तुकाराम’ हा गजरही करतात. सगळाच भोंदूपणा. ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत, ‘या खळांची व्यंकटी सांडो’ म्हणजे त्यांना आलेले हे ‘वाकडेपण’ किंवा लागलेले वाईट वळण जावो एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. कारण सगळ्याच वारकरी संतांनी लोकांना उपदेश करताना आपले हृदय मोकळे केले होते. अवघ्या भूतमात्रांविषयी त्यांच्या मनातील दया आणि करुणा त्यांच्या प्रेमळ वाणीतून प्रकट होत असे. त्यांचे अवघे जीवन प्रत्येक कर्म, मग ते चिंतन असो वा आत्मप्रकटीकरण सारे सारे जनहितासाठी असे. ज्ञानोबा माऊलींनी ‘अनुभवामृत’ लिहिले. त्याचा शेवट करताना माऊली म्हणते, ‘या अनुभवामृताच्या सेवनाने सगळ्या जगाने आनंदाचा सण साजरा करावा.’ किती उदात्त भाव आहे हा. प्रत्येक माणसाच्या जीवनातील अंध:कार विश्वसूर्याच्या प्रकाशाने दूर व्हावा, यासाठी स्वत: दु:ख भोगून संतांनी सुखाच्या राशी दीन, दुबळ्या बहुजनांच्या दारात ओतल्या. त्याच भावनेतून नामदेवराय ‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। माझिया सकळा हरीच्या दासा।’ असे मागणे मागतात. एरवी ‘शब्दांची शस्त्रे’ करणारे तुकोबा भक्तांशी संवाद साधताना मेणाहून मऊ होताना दिसतात आणि विनवतात, ‘सर्वभावे झालो वैष्णवांचा दास। करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची।’ पण हल्लीचे वारकरी बुवा-महाराज ही सारी परंपरा विसरायला, खरे तर विसर्जित करायला निघालेले दिसतात. त्यांचे विचार इतके जुनाट आहेत की, त्यांनी मानवधर्माचा उद्घोष करणा-या संतांनाही जातीच्या चौकटीत ढकलेले आहे.

दैनंदिन वर्तनातील त्यांच्या दांभिकपणाला आषाढी-कार्तिकीच्या वारीच्या दरम्यान तर अक्षरश: ऊत येतो. फडकरी, दिंडीकरी, मालक, महंत आणि मठाधीशांचा तोरा एखाद्या राजकीय नेत्याला लाजवेल असा असतो. दिंडीत लोकांच्या श्रद्धांचा महापूर आलेला असताना, सर्वत्र हरिनामाचा कल्लोळ उठलेला असताना या ‘मान्यवर’ महाभागांचा मानपमानाचा खेळ रंगलेला असतो. दिंडीतील रथावर कोणी चढावे, कोणाला प्रसादाला बोलवावे इथपासून तर दिंडीच्या स्वागताच्या वेळी कोणी उपस्थित असावे इथपर्यंत वाद चालतात. कारण, ‘नीचपण (लहानपण) बरवे देवा। नचले कोणाचाही हेवा’ हे तुकोबांचे वचन गाथेत गुंडाळून हे सारे मोठे लोक दिंडीत वावरत असतात. लहान-थोर लोकांचे नमस्कार घेत फिरत असतात. आपल्याच खांद्यावर दिंडीचा भार आहे, असे मानणा-या आणि दर्शविणा-या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. पण आठशे वर्षाहून अधिक काळापासून ही वारीची परंपरा मराठी मातीत रुजलेली आहे, ही वस्तुस्थिती सोयीस्करपणे दुर्लक्षिली जाते. परकीय आक्रमणांमुळे प्राण संकटात असताना, प्लेगसारख्या जीवघेण्या रोगांनी माणसे मरत असतानाही वारीची परंपरा सुक्या भाकर तुकडय़ांच्या शिदोरीवर सुरू होती. कारण उन्हा-पावसाची पर्वा न करता ‘माझ्या जीविची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी’ या संतशब्दांनी अवघ्या वारकरी संप्रदायाला जगण्याची नवी प्रेरणा दिली होती. आजही जेव्हा आपण दिंडीत येणा-या बहुजन समाजाचे बहुआयामी रूप पाहतो, तेव्हाच आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रातील समस्यांचे ‘बहुरूपीत्व’ थोडय़ाफार प्रमाणात कळते. पोशाख-पेहरावावरून, वागण्या-बोलण्यावरून आणि एकंदर जगण्यावरून आपल्याला त्यांच्या मागासलेपणाचा अंदाज येतो. ते मागासलेपण फक्त आर्थिक वा सामाजिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर ते बौद्धिक स्तरावरही आहे. तसे पाहायला गेल्यास दिंडीतील पंधरा-वीस दिवस सत्कारणी लावता येणे सहजशक्य आहे. सूर्यास्तानंतर जेव्हा दिंडय़ा तळावर पोहोचतात त्या वेळी बहुतेक बडी मंडळी आपल्या मोबाइलला ‘रेंज’ मिळेल का, याच्या विचारात असतात, तर विविध व्यसनांचे शौकिन लोक आपली नशेची चीज ‘अरेंज’ करण्याच्या नादात असतात. हे मी स्वत: पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. मुंबई-पुण्यात अंमली पदार्थ घेणा-या लोकांवर कडक कारवाई होते, पण दिंडय़ांमध्ये अफू-गांजा घेणा-या लोकांच्या टोळ्या आपले वेगळे अस्तित्व घेऊन फिरताना दिसतात. त्यांच्या रात्री उशिरापर्यंत चालणा-या एकतारीवरील भजनांनी दिंडीच्या तळांवरील रात्रीसुद्धा जाग्या असतात, हे मी जवळजवळ दरदिवशी अनुभवलंय. दिंडीतील अंमली पदार्थाच्या स्त्रोताचा जेव्हा अधिक शोध घेतला त्या वेळी एकाहून एक धक्कादायक माहिती हाती येत गेली. मुख्य म्हणजे बहुतांश दिंडीमालकांना या सगळ्या प्रकारांची कल्पना असूनही कोणी त्याविरुद्ध बोलताना दिसत नव्हते. एकूणच काय तर आषाढी-कार्तिकीच्या वारीमध्ये संतबोधाचे, हरिनामाचे अखंड स्मरण अपेक्षित असताना नको त्या गोष्टींना महत्त्व आलेले दिसतेय. त्यावर कुणीतरी उपाय शोधणे गरजेचे आहे. दिंडय़ांमध्ये असणा-या गैरसोयी आणि पंढरपुरातील अस्वच्छ वातावरण, हा सुद्धा चिंतेचा विषय आहे.

तीन वर्षापूर्वीच्या आषाढी दिंडीतून पंढरपुरात पोहोचल्यावर २३ तास दर्शनरांगेत थांबून मी तेथील चीड आणणारी दुरवस्था अनुभवलेली आहे. त्या पावसाळ्याच्या दिवसांत दर्शनरांगेसाठी साधे छप्परही उभारलेले नव्हते आणि उर्वरित ठिकाणी अक्षरश: जनावरांपेक्षाही वाईट स्थितीत माणसांना तासनतास उभे राहणे भाग पाडले होते. खेडय़ापाडय़ातील आया-बाया, म्हातारे-कोतारे ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ पाहण्यासाठी त्या तशा अवस्थेत गप्प उभे होते. ते पाहून चीड येत होती. शेवटी २३ तास झाले तरी रांग का हलत नाही, हे पाहण्यासाठी जेव्हा रांग सोडून मंदिराजवळ गेलो, तेव्हा पोलिसच आपल्या आप्त-इष्टांना रांगेत घुसवताना दिसत होते. सगळाच चीड आणणारा प्रकार; परंतु ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान’ हे शब्दश: प्रमाण मानणा-या वारक-यांना त्याचे काहीच वाटत नव्हते. परंतु तमाम महाराष्ट्राच्या वतीने पांडुरंगाची महापूजा करणा-या मुख्यमंत्र्यांनी तरी वारक-यांच्या या गैरसोयीकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्याहून जास्त जबाबदारी आहे, वारक-यांचे पुढारपण करणा-या मान्यवरांची. त्यांनी अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी विधेयकापेक्षा वारक-यांच्या सर्वागीण उत्कर्षाचा प्रामाणिक प्रयत्न केला, तरच वेगाने बदलत चाललेल्या समाजात वारकरी संप्रदाय टिकेल. अन्यथा ‘मानभावीपणाचा’ अतिरेक केला, तर सबंध संप्रदाय कसा लयास जातो, हे महाराष्ट्राने पाहिले आहे.

लोककल्याणकारी वारकरी संप्रदायाची त्यांच्याप्रमाणे गत होऊ नये आणि आधुनिक जीवनाला उपकारक असणारा ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण’ असा व्यवहारसिद्ध विचार इंटरनेट, मोबाइलच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचावा. ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात ‘जो जे वांछिल। तो ते लाहो’ अशी सर्वत्र सुखकारक स्थिती निर्माण व्हावी.

Categories:

Leave a Reply