Mahesh Mhatre

गेल्या दोनेक वर्षापासून, जेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी होऊ लागली तेव्हा पुन्हा मराठी लोकांना ‘गाथा सप्तशती’ची आठवण झाली. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमून राज्य सरकारने मराठी कशी अभिजात भाषा ठरते, याचा अहवाल मागवला आणि त्याच गडबडीत उत्तम वाङ्मय प्रसिद्ध करणा-या अरुण जाखडे यांनी ‘गाथा सप्तशती’ नव्या रूपात छापली. हा आद्य मराठी ग्रंथ म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे सांस्कृतिक लेणे आहे.. त्याचा अभिमान बाळगताना आम्ही चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, नरेंद्र, तुकाराम, जनाबाई, बहिणाबाई या एकाहून एक सरस मराठीप्रेमींचे स्मरण केलेच पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य चळवळीत मराठीला पुन्हा एकदा लोकभाषेकडून राजभाषेकडे नेण्याचा जो यशस्वी प्रयत्न झाला, त्याचेही स्मरण केले पाहिजे आणि हा सारा खटाटोप करणा-या आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकरांसह लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, लोकहितवादी ते आचार्य अत्र्यांपर्यंतच्या थोर संपादकांचे ऋण मान्य केले पाहिजे; पण त्याच जोडीला स्वातंत्र्य चळवळ आणि दुस-या महायुद्धानंतर बदललेल्या सामाजिक स्थितीत सर्वसामान्य मराठी माणसाला वाङ्मयीन अस्तित्व देणा-या नव्या ‘धारे’च्या साहित्य चळवळींचेही कौतुक झाले पाहिजे. नामदेव ढसाळांनी दलित जाणिवांचा विश्वव्यापी प्रत्यय देताना मराठी साहित्याला वेगळे आत्मभान दिले तर नेमाडे, पाध्ये यांनी ग्रामीण आणि शहरी जीवनातील उपेक्षित कथाविषयांना अक्षरश: आकाशाएवढे केले. मी ‘कोसला’ किंवा ‘वासुनाका’तील पात्रांच्या भाषेत बोलणा-या पिढीतील असल्यामुळे आजच्या ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर ‘बाता मारणा-या पिढीबद्दल मला प्रेम वाटते. त्यामुळे एखाद्याच्या डॅशिंग फेसबुक प्रोफाइलवर जेव्हा ‘सर्व मुलींचा दावा आहे, गौरांग छावा आहे,’ अशी कॉमेंट वाचायला मिळते, तेव्हा आपल्या बदलत्या पिढीची, बदलती भाषा समजते.



वसईचा नाका, नाक्याव धक्का
धक्याव बत्ती, बत्ती काय जलते
काय गं भीमा, बत्ती काय जलते

सत्तरी ओलांडलेली, एक नऊवारी नेसलेली स्त्री मोठया आत्मविश्वासाने गाणे गाताना दिसत होती. तिच्या आवाजाला साथ होती फक्त एका वाद्याची, ढोलकीची; पण कडूबाईंचा गोड आवाज, त्या ढोलकीच्या कडकडाटातही विजेच्या चपळाईने लखलखताना दिसत होता. मी स्तिमित होऊन त्यांच्या एकूण सादरीकरणाकडे पाहत होतो. त्यांच्या गीताचे बोल, ताल आणि एकूणच गाण्याचा बाज विलक्षण साधा; परंतु तरीही समोर बसलेल्या विविध वयाच्या श्रोत्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त दिसत होता. त्या वेळी एका फ्रेंच मित्राचे शब्द आठवले, ‘लोकगीत आणि लोकसंगीत तुम्हा भारतीयांच्या डीएनएमध्ये, रक्तामध्ये भिनलेले आहे. तुमच्यावर कितीही पाश्चात्त्य संस्कार झाले तरी तुम्ही या लोककलांना विसरू शकणार नाहीत. पण त्यासाठी या सर्व लोककलांचा सांभाळही केला पाहिजे.’

टाळ्यांच्या कडकडाटात, मालती मधुकर कडू ऊर्फ कडूबाई यांचे गाणे संपले. निवेदकाने त्यांच्या सर्वत्र गाजत असणा-या सीडी, डीव्हीडींची माहिती सांगत कौतुकाचे शब्द उधळले. बाई मात्र निर्विकार चेह-याने आपल्या जागेवर जाऊन बसल्या. त्या वेळी मला त्यांची खरी ओळख पटली. गायिका म्हणून त्यांना हल्ली, हल्ली म्हणजे पासष्टीनंतर प्रसिद्धी मिळालीय. त्याआधी त्या भाजीविक्री करायच्या. ज्या ‘वसईचा नाका’ या गीताने त्यांना ‘गायिका’ बनवलं, त्या वसईकडून त्यांनी भाजी विकण्याचा धंदा सुरू केला होता. काही कारणांमुळे त्या वाडे गावात आल्या आणि स्थिरावल्या. आता ठाणे जिल्हय़ात कुठेही हलदीचा किंवा तेल्याचा कार्यक्रम असला की, कडूबाईंना गाण्यासाठी बोलावले जाते आणि मग अख्खी रात्र त्यांचा कार्यक्रम सुरू असतो. वयाची, वातावरणाची किंवा आरोग्याची पर्वा न करता पंचाहत्तरीकडे झुकलेल्या कडूबाई गात असतात.. आपल्या नकळत दोन हजार वर्षाहून जुनी कृषी, ग्रामीण आणि कष्टकरी वर्गाची लोकपरंपरा पुढे नेत असतात. ‘वडाला विला कोनी मारीला.. गाडीवाल्यानं डोला मारीला..’ अशी अकृत्रिम शब्दरचना आणि थेट विषयाला स्पर्श करण्याची सहजसोपी पद्धत, यामुळे सध्याच्या ‘हायब्रीड कल्चर’च्या काळातही कडूबाईंसारखे हजारो कलाकार ग्रामीण भारतात विखुरलेले आहेत. त्यांची कला, त्यांचे काम याचे रास्त कौतुक होणे गरजेचे आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, कोणतेही व्यावसायिक शिक्षण नसताना त्यांनी मिळवलेल्या कलासंचिताचा ठेवा पुढील पिढीपर्यंत नेण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. अशा निराशाजनक परिस्थितीत याच महाराष्ट्र भूमीत दोन हजार वर्षापूर्वी होऊन गेलेल्या हाल या सातवाहन राजाने संपादकाच्या भूमिकेत शिरून संपादित केलेल्या ‘गाथा सप्तशती’ या अजोड ग्रंथाची प्रकर्षाने आठवण येते. आज जशी इंग्रजी भाषेने आपल्या राजसत्तेला भुरळ पाडली आहे, तशी त्या काळात संस्कृतची जादू चालायला सुरुवात झाली होती; पण या हाल सातवाहन राजांनी प्राकृत म्हणजे आजच्या मऱ्हाटमोळय़ा भाषेवरील आपले प्रेम कायम ठेवले. मुख्य म्हणजे सातवाहन राजांचे हे मराठी प्रेम प्रामाणिक असल्यामुळेच आज दोन हजार वर्षे उलटल्यानंतरही त्याची चर्चा होत आहे; पण महाराष्ट्राला सातवाहन राजांच्या या भाषाप्रेमाची जाणीव अशी सहजासहजी झालेली नाही. त्यासाठीही बराच काळ जावा लागला; कारण सातवाहन राजांनी महाराष्ट्रापाठोपाठ आंध्र प्रदेशावरही बराच काळ राज्य केले होते. त्यामुळे तिकडच्या पंडितांनी त्यांचा उल्लेख ‘आंध्र राजे’ म्हणून केला. वास्तविक पाहता, सातवाहनांची राजधानी पैठणला होती. त्यांनी वारंवार मराठीचा पुरस्कार केला. यामुळे त्यांचे मराठीपण वादातीत होते. मात्र तरीही काही ‘विद्वानांनी’ सातवाहन राजांना आंधळेपणाने आंध्र प्रदेशी ठरवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु स.आ. जोगळेकर यांच्या रूपाने एक असामान्य संशोधक पुढे आला आणि सातवाहन राजांचे मराठीपण सिद्ध करणा-या ‘गाथा सप्तशती’ या महान कलाकृतीची ओळख समोर आली.

‘गाथा सप्तशती’ संशोधित करून, अर्थासह नव्या समाजापुढे आणताना स. आ. जोगळेकर यांनी मराठी भाषेवर आणि समाजावर अनंत उपकार करून ठेवले आहेत. आपल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत जोगळेकर यांनी प्रत्येक ‘गाथे’चा पापुद्रान् पापुद्रा उलगडून दाखवला आहे. संस्कृत साहित्याचे अभ्यासक डॉ. कीथ यांनी ‘गाथे’चे कौतुक करताना किती प्रामाणिक मत दिले होते, हे सांगताना जोगळेकर म्हणतात, ‘त्या काळी इतिहास म्हणजे राजांच्या पराक्रमांचे वर्णन अशी महाराष्ट्रीयांची समजूत नव्हती. राजांच्या प्रासादांत व लीलांतच काव्य संभवते, असे ते समजत नव्हते. ग्रामीण जनतेतही, घरोघरी खरे प्रासादिक काव्य आढळते, अशी त्यांची निष्ठा होती. हे महाराष्ट्राचे एक वैशिष्टयच मानले पाहिजे. अन्य प्राकृत भाषांत किंवा अन्य प्रदेशांत असे प्रयत्न झालेलेच नाहीत. ग्रामीण जनतेच्या जीवनावर त्यांच्याच भाषेत रचलेला असा ‘गाथा सप्तशती’ हा एकमेव ग्रंथ आहे. भारतातील संस्कृत पंडितांच्या प्रशंसेचा हव्यास न बाळगता, राजकुलाच्या विक्रमांचे वर्णन करण्याचा स्वार्थसाधक उपक्रम टाळून, शेतांवर राबणा-या आणि रानावनांतच राहणा-या ग्रामीण व वन्य जनतेवर आपली काव्यप्रतिभा केंद्रित करणारे कवी महाराष्ट्रातच निर्माण झालेले आहेत. गाथा सप्तशतीचा संपादक हाल सातवाहन हा राजा होता.’ जोगळेकरांच्या प्रस्तावनेतील प्रत्येक पानामध्ये या मराठमोळ्या, कविताप्रेमी राजाचा मोठा गौरवपूर्ण उल्लेख वाचायला मिळतो आणि नकळत आपलाही ऊर आनंदाने भरून येतो.

सध्या महाराष्ट्रात गाथा सप्तशतीला पुन्हा महत्त्व येण्यामागे वेगळीच कारणे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात जर्मन अभ्यासक डॉ. वेबर किंवा डॉ. कीथ यांच्यासारख्या पाश्चात्त्य विद्वानांनी गाथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा शोध, संग्रहही केला होता. डॉ. रामकृष्ण भांडारकर, नारायण विष्णू बापट, राजारामशास्त्री भागवत, पुरातत्त्वभूषण राजवाडे, महामहोपाध्याय मिराशी आदी देशी अभ्यासकांनीही गाथा सप्तशतीचा अभ्यास केला होता. जोगळेकरांनी मात्र देशभर विखुरलेल्या वेगवेगळय़ा मुद्रित आवृत्त्या, त्यावर लिहिल्या गेलेल्या टीका, या सगळयांचा सखोल अभ्यास करून ४४० पानांची प्रदीर्घ आणि वाचनीय प्रस्तावना लिहिली. १९५६मध्ये हा ग्रंथ बाहेर आला; पण ज्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील काव्य त्यातून मांडले गेले होते, त्यांच्यापर्यंत तो पोहोचलाच नाही. परंतु गेल्या दोनेक वर्षापासून, जेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी होऊ लागली तेव्हा पुन्हा मराठी लोकांना गाथा सप्तशतीची आठवण झाली. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमून राज्य सरकारने मराठी कशी अभिजात भाषा ठरते, याचा अहवाल मागवला आणि त्याच गडबडीत नेहमी पदराला खार लावून उत्तम वाङ्मय प्रसिद्ध करणा-या अरुण जाखडे यांनी ‘गाथा सप्तशती’ नव्या रूपात छापली. विख्यात चित्रकार रवी मुकुल यांच्या मुखपृष्ठाचा साज लेवून आलेला हा आद्य मराठी ग्रंथ म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे सांस्कृतिक लेणे आहे.. त्याचा अभिमान बाळगताना आम्ही चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, नरेंद्र, तुकाराम, जनाबाई, बहिणाबाई या एकाहून एक सरस मराठीप्रेमींचे स्मरण केलेच पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य चळवळीत मराठीला पुन्हा एकदा लोकभाषेकडून राजभाषेकडे नेण्याचा जो यशस्वी प्रयत्न झाला, त्याचेही स्मरण केले पाहिजे आणि हा सारा खटाटोप करणा-या आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकरांसह लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, लोकहितवादी ते आचार्य अत्र्यांपर्यंतच्या थोर संपादकांचे ऋण मान्य केले पाहिजे; पण त्याच जोडीला स्वातंत्र्य चळवळ आणि दुस-या महायुद्धानंतर बदललेल्या सामाजिक स्थितीत सर्वसामान्य मराठी माणसाला वाङ्मयीन अस्तित्व देणा-या नव्या ‘धारे’च्या साहित्य चळवळींचेही कौतुक झाले पाहिजे. भाऊ पाध्ये, बा. सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे, दि. पु. चित्रे, अरुण कोलटकर आदी बिनीच्या शिलेदारांनी ‘सदाशिवपेठी’ आणि साचेबद्ध साहित्याला आम माणसाच्या जगण्याचा अनुभव दिला. ढसाळांनी दलित जाणिवांचा विश्वव्यापी प्रत्यय देताना मराठी साहित्याला वेगळे आत्मभान दिले, तर नेमाडे, पाध्ये यांनी ग्रामीण आणि शहरी जीवनातील उपेक्षित कथाविषयांना अक्षरश: आकाशाएवढे केले. ‘कोसला’ने नेमाडेसर गाजले, तर भाऊ पाध्येंच्या ‘राडा’ आणि ‘वासुनाका’ या कादंब-यांनी तरुण पिढी अक्षरश: झपाटून गेली. मी ‘कोसला’ किंवा ‘वासुनाका’तील पात्रांच्या भाषेत बोलणा-या पिढीतील असल्यामुळे आजच्या ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर बाता मारणा-या पिढीबद्दल मला प्रेम वाटते. त्यामुळे एखाद्याच्या डॅशिंग फेसबुक प्रोफाइलवर जेव्हा ‘सर्व मुलींचा दावा आहे, गौरांग छावा आहे,’ अशी कॉमेंट वाचायला मिळते, तेव्हा आपल्या बदलत्या पिढीची, बदलती भाषा समजते. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम ‘कोसला’ आणि त्यानंतर ‘राडा’सारख्या कादंब-यांनी असाच धक्कादायक बदल दाखवून दिला होता.

बाई मृताचे धर्म : जिवतां प्रति : कैसे निरूपावे

नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीची वरील ओळ म्हणजे ‘अर्पणपत्रिका.’ साठोत्तरी साहित्याला नवविचारांच्या पायावर खडे करण्यासाठी पंचविशीतील नेमाडे जेव्हा उभे राहिले, त्या वेळी साहित्यातील सगळ्याच ढुढ्ढाचार्यानी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते; पण आज पन्नास वर्षानंतरही ‘कोसला’ आणि त्या कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर येणा-या प्रत्येक पिढीला वास्तवाचा आत्मप्रत्यय देताना दिसत आहे. १९६३ मध्ये ‘कोसला’ प्रसिद्ध झाली, त्या काळात सगळ्याच कथा-कादंब-यांना एक ठराविक साचा होता. कथाबीज, विषय प्रवेश, विस्तार आणि साधारणत: सुखमय शेवट अशाच पद्धतीने कथा-कादंबरी आकाराला येत असे. बंगाली धाटणीची नावे, टिपिकल शहरी, उच्चवर्णीय जाणिवा आणि त्या सगळ्याला प्रागतिक विचारांची सावध व साजूक फोडणी, असा सारा बेत असे. त्या काळात ‘कोसला’, ज्या शब्दाचा अर्थ ‘कोष’ आहे, हे बहुतांश मराठी वाचकांना ठाऊक नव्हते, ते शीर्षक घेऊन, पांडुरंग सांगवीकर असा अस्सल देशी रांगडा नायक घेऊन नेमाडे मराठी साहित्यात अवतरले. बरे, कादंबरीच्या आरंभीच ‘उदाहरणार्थ, मी आज २५ वर्षाचा आहे, वगैरे सांगून झाले की’ ‘हे म्हणजे भलतेच’ असे सांगत नेमाडे वाचकांसमोर सांगवीकरचे जगणे उभे करत गेले. हे सगळेच साचेबद्ध मराठी वाङ्मयाला हादरे देणारे होते. मुख्य म्हणजे हा सर्व नवा आत्मशोधाचा मार्ग धुंडाळताना नेमाडे कधीही आपण काही ग्रेट करत असल्याचा आव आणत नाहीत. त्यांची भाषा, निवेदन आणि अवघे कथानक सरळ आणि साधे आहे. पांडुरंग तरुण आहे, बराचसा मोकळाही आहे; पण कादंबरीत कुठेही शिव्या किंवा लैंगिक संबंधांची नकोशी वाटावी, अशी वर्णने येत नाहीत. नायकाने पराभवाआधीच पराभव स्वीकारल्यामुळे वाचकांना ‘पुढे काय होणार’ अशी उत्कंठा नाही. रटाळ आणि काहीशा कंटाळवाण्या मार्गाने कथानक पुढे जात राहते. तरीही कादंबरीचा शेवट झाल्यावर आपण अगतिक आणि अस्वस्थ होतो, हेच या कादंबरीचे यश आहे.
नेमाडेंचेच समकालीन असणा-या भाऊ पाध्ये यांच्या ‘डोंबा-याचा खेळ’ पाठोपाठ आलेल्या ‘वैतागवाडी’, ‘राडा’ तसेच ‘वासुनाका’ या कादंब-यांनी नव्या पिढीला अक्षरश: भारावून टाकले. १९६५च्या भारत-चीन युद्धात झालेल्या पराभव आणि बहुचर्चित अन्नटंचाई या दोन मोठय़ा प्रश्नांनी वैतागलेल्या नवशहरी कॉलेजवयीन मुला-मुलींना ख-या अर्थाने भाऊंनी ‘आवाज’ दिला. ‘उद्दिष्टहीन समाज ही जर वस्तुस्थिती असेल तर तिला सामोरे जायला मला आवडते,’ असे स्पष्टपणे सांगत भाऊंनी मराठीमध्ये नवा प्रवाह आणला. ज्या पद्धतीने सुर्वे, मर्ढेकर कवितेतून महानगरी जाणिवा आणि अस्तित्व हरवलेल्या शहरी भावना नव्या प्रतीकांमधून मांडत होते, अगदी त्याच चालीवर भाऊंच्या कादंब-या मोठया वेगाने दौडत होत्या. मुख्य म्हणजे स्वातंत्र्य चळवळीची ओळख नसलेली नवी पिढी वाढत असल्यामुळे साने गुरुजींचा आदर्शवाद, सावरकरांचा आधुनिक हिंदुत्ववाद यापेक्षा खूप वेगळय़ा, आत्मकेंद्रित जगण्याचा भाऊ शोध घेतात. त्या जगण्यात समाज वा राष्ट्र फक्त कथानकाच्या ‘बॅकग्राऊंड’ला दिसत असतं; पण भाऊ मात्र मोठय़ा मोठय़ा ताकदीने या बदलत्या आणि चमत्कारिक जीवनशैलीचा वेध घेताना दिसतात. भाऊंच्या निधनानंतर ३ नोव्हेंबर १९९६रोजी अशोक शहाणे यांनी ‘भाऊचा अखेरचा धक्का’ हा लेख लिहिला होता. त्याच्या शेवटी शहाणे कळवळून लिहितात, ‘आम्ही मराठी माणसं मुर्दाड आहोत. आमचा मख्खपणा एका ज्ञानेश्वरानं जात नाही, एका तुकारामानं जात नाही, एका साने गुरुजीनंसुद्धा जात नाही. भाऊ पाध्येनं तर तसा प्रयत्नही केला नव्हता. त्यामुळे भाऊचं लिखाण काय प्रतीचं होतं, याबद्दल आम्ही अडाणी राहिलो असलो तर नवल वाटायचं काहीच कारण नाही.’

सध्या मराठी समाज कधी नव्हता एवढय़ा मोठय़ा संक्रमणावस्थेतून चाललेला दिसतोय. शेतीचा वर्षभर, खरे सांगायचे तर आयुष्यभर गुंतवून ठेवणारा जोखडबाज आणि जोखमीचा धंदा सोडून शेतक-यांची नवी पिढी गावखेडय़ातून कधीच बाहेर पडली आहे. जे खेडय़ात उरलेत, त्या तरुणांना राजकारणाच्या व्यसनांनी आणि व्यसनांच्या विविध कारणांनी पार पोखरून टाकलेले दिसते. आर्थिक उदारीकरणामुळे, जागतिकीकरणाच्या ‘खुल्या’ (खरं तर खुळय़ा) निमंत्रणामुळे आपल्या नव्या पिढीच्या डोक्यात घुसलेल्या प्रगतीच्या तथाकथित कल्पनांनी कुटुंबसंस्थानामक प्रकाराचा पार चुथडा करून टाकलाय.. कृषी संस्कृतीच्या प्रभावामुळे पूर्वी ‘समाजाभिमुख’ असलेला आपला समाज आता नव्या स्वकेंद्रित जाणिवांना कुरवाळत बसलेला दिसतोय. त्याला सुखलोलुप आकांक्षांचा तेवढा ध्यास आहे, बाकीच्या इतर कशात त्याला रस नाही. त्यामुळे त्याच्याकडे एखाद्या विषयावर समतोल विचार करण्याची शक्तीच उरलेली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे, विवेकशून्य अविचाराची ही लागण फक्त तरुणांमध्येच नाही, तर स्वाध्याय विसरलेल्या सगळ्याच लब्धप्रतिष्ठित वर्गात पाहायला मिळते. त्यामुळे हल्लीचे विचारवंत ‘टाळीबाज’ झालेले आहेत. साहित्यिक, कवी, लेखक हा वर्ग तर फार आधीपासूनच ‘टोळीबाज’ झालेलाच आहे. त्यामुळे मोबाइल आणि इंटरनेटने केलेल्या सामाजिक आणि भावनिक क्रांतीकडे लक्ष देण्यासाठी ना त्यांच्याकडे वेळ आहे, ना पुरेशी अक्कल. ते त्यांच्या जुन्या तत्त्वज्ञानात किंवा कल्पनांमध्ये मश्गुल असलेले दिसतात आणि म्हणूनच असेल कदाचित ‘मोदित्व’ किंवा ‘आम आदमी’ची लाट आमच्या आधीच बेभान असणा-या समाजाला बेलगाम करताना दिसते. असेच जर घडत राहिले तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीतही या मानसिक गोंधळाचे प्रतिबिंब पडेल.

इतर सगळे देश प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करीत असताना ‘तरुणां’च्या देशाने मागे पडावे, हे लक्षण काही ठीक नाही आणि म्हणूनच जेव्हा आपल्या अवतीभवतीच्या घरातील पोरं-पोरी ‘फेसबुक’च्या चव्हाटय़ावर बोलत असतात, त्या वेळी मी त्याकडे लक्षपूर्वक पाहतो.. त्यांच्या व्यक्तिवादी सुखलोलुपतेने कौटुंबिक आनंदाच्या कल्पनेला कधीच मागे टाकले आहे. म्हणून ते अगदी सहजपणे ‘होऊ दे खर्च, खूप आहे घरचं’, किंवा थेटच ‘होऊ दे तोटा, बाप आहे मोठा’ असे बोलतात. ‘मंदीत संधी’ साधण्याची त्यांची मानसिकता आहेच, शिवाय ‘आला मौका तर मारीन चौका’ अशी सोयीची आक्रमकता ही पिढी जपताना दिसते. पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांमध्ये जशी एकमेकांना ‘राजे’ म्हणण्याची पद्धत आहे, तशीच ‘छावा’ म्हणून एकमेकांची ‘स्तुती’ करण्याचा प्रघात हल्ली फेसबुकच्या भिंती-भिंतीवर दिसतो. भलेही सिंहाचा छावा आणि कडकडीत देहयष्टीचा ‘आधुनिक छावा’ यात जमीन-अस्मानाचा फरक असला तरी कोणालाच काही फरक पडत नाही. त्यामुळे आपल्या गावातील दादा किंवा भाऊला खूश करण्यासाठी लिहिले जाते, ‘भाऊची भलेही नसेल बॉडी, पण दारात उभी आहे गाडी.’ हे स्तुती प्रकरण तेवढय़ावर थांबत नाही, मग पुढे एक जण लिहितो, ‘चर्चा तर होणारच..’ चर्चेला आपली ना नाही, पण हल्लीच्या तरुणाईची ‘भाषाच’ वेगळी बनलीय. ते म्हणतात, ‘पृथ्वी गोल आहे, कारण भाऊंचा विषय खोल आहे.’ ‘प्रत्येक गोष्टीला अंत आहे. म्हणून भाऊ शांत आहे.’ पण ‘नाद कराचा नाय’ या आधुनिक सुभाषितांवर प्रेम असूनही पोरं ठीक वागतीलच असे नाही. त्यामुळे कधी ‘परिस्थिती गंभीर पण सुमाताई खंबीर,’ तर कुठे ‘एकच फाइट, वातावरण टाइट’, अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते.. सगळ्यात भीतिदायक वाटणारी भाषा म्हणजे, ‘आज खर्च, उद्या सरपंच’ किंवा ‘आला कंटाळा, केला घोटाळा..’ दोन हजार वर्षात आमचा मराठी समाज कसा बदलत गेलाय ना.. पण असा बदल आपल्याला अभिप्रेत होता का

Categories:

Leave a Reply