Mahesh Mhatre


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उच्चवर्णीयांमधून समाजाच्या सर्व थरांत जावा, यासाठी नजीकच्या चार-पाच दशकांत ज्यांनी प्रयत्न केले, त्या मोजक्या नेत्यांमध्ये विलासजी फडणवीस यांचे नाव घेता येईल. उत्तम संघटक, जिद्दीचा प्रचारक आणि प्रेमळ मार्गदर्शक असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणा-या विलासजींचे सात नोव्हेंबरला निधन झाले. त्यांच्या शोकसभेचे आयोजन नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत बुधवार, २० नोव्हेंबरला केले आहे. कठोर शिस्तीसाठी प्रसिद्ध असणा-या संघामध्ये राहून आपल्या प्रेमळ आणि मनमोकळ्या स्वभावाने वेगळी ओळख निर्माण करणा-या विलासजींच्या जीवनपटाचा मागोवा घेत संपादक महेश म्हात्रे यांनी वाहिलेली आदरांजली.


अडीच हजार वर्षापूर्वी यज्ञ-याग कर्मकांडामध्ये भरकटलेल्या आणि अडकलेल्या लोकांना तथागत गौतम बुद्ध यांनी दररोज जगण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी जीवनप्रणाली दिली होती. नैतिकतेवर आधारलेल्या या अभिनव जीवन दर्शनात सत्कर्मापेक्षा प्रेमाला त्यांनी अधिक महत्त्व दिले होते. एका प्रवचनात बुद्ध म्हणतात, ‘जे प्रेम हृदयाला मुक्त करते, त्या प्रेमाची सोळावा हिस्सा एवढीही किंमत सा-या सत्कर्मानी मिळून होणार नाही, कारण हृदयाला मोक्षसुख देणा-या प्रेमात सारी सत्कर्मे असतातच. प्रेम प्रकाशते, प्रकाश पसरवते आणि तेज देते.’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह म्हणून अनेक वर्षे कार्यरत असलेल्या विलासजी फडणवीस यांच्याबद्दल लिहिताना बुद्धांनी सांगितलेल्या प्रेम महिम्याची प्रकर्षाने आठवण झाली. कारण संघासारख्या शिस्तकठोर आणि आत्ममग्न संघटनेत राहूनही विलासजींनी आपल्या हृदयाचे हळवेपण आणि मोकळेपण जपले होते. अन्यथा रा. स्व. संघ म्हणजे गुप्ततेच्या पोलादी पडद्याआड लपलेले भलेमोठे राज्ययंत्र, त्याची चावी सरसंघचालक, सरकार्यवाह यांच्यासह फक्त पाच प्रमुख लोकांच्या हाती. त्यांनी मनात आणले तर हजारो सकाळ-संध्याकाळच्या शाखांवर जमणारे ‘स्वयंसेवक’ सामाजिक कामाचे मळे फुलवणार.. आणि त्यांनी ठरवले तर देशात अशांतता माजवणार.. विलासजी या अशा संघाच्या रेशीमबागेतील ‘राज्ययंत्रा’च्या अगदी जवळ राहणारे. थोडीथोडकी नाही, तर गेली चार-पाच दशके त्यांनी संघाला ‘एकचालकानुवर्तित’ पद्धतीने चालवणा-या श्री. गोळवलकर गुरुजींपासून विद्यमान मोहनजी भागवत यांच्यापर्यंतच्या प्रत्येक सरसंघचालकांसोबत काम केले. पण त्यांच्यावर खरा पगडा होता, गोळवलकर गुरुजी यांचा. नागपुरातील त्यांच्या छोटेखानी घरात गेल्यावर सर्वप्रथम नजरेस पडायचा गोळवलकर गुरुजी यांचा संघाच्या गणवेशातील फोटो आणि त्याच्या जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृष्णधवल छायाचित्र. मी त्यांच्या घरी गेलो असताना साहजिकच ‘त्या’ फोटोंनी माझे लक्ष वेधून घेतले. मी काही विचारण्याच्या आतच मंदस्मित करत विलासजी उद्गारले, ‘होय! तो फोटो अगदी दुर्मीळ आहे. फार कमी लोकांकडे तसा फोटो आहे. श्री गुरुजी दस-याच्या दिवशी गणवेशात असत, परंतु केस लांब असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर टोपी नसे.’ – विलासजींनी पुस्ती जोडली.

डॉ. आंबेडकरांचा फोटोपण खूप वर्षापासून आमच्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. आपण कमीत कमी बोलून दुस-यांना बोलते करण्याची चांगली कला त्यांना अवगत होती. विशेष म्हणजे, त्यांचे हे बोलणे सहज आणि सरळ असे. त्यामुळेच असेल कदाचित रा. स्व. संघातील ‘अन्यायग्रस्त’ प्रचारक वा अडचणीतील कार्यकर्त्यांसाठी त्यांचे घर म्हणजे हक्काचे ‘निवारा केंद्र’ बनले होते. मला आठवते, संघाच्या एका प्रचारकाला सात-आठ वर्षे पूर्णवेळ काम केल्यानंतर त्याला सर्वसामान्य माणसाप्रमाणे संसार करण्याची इच्छा झाली होती. आता पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करताना त्याने जे लौकिक शिक्षण घेतले होते, ते एव्हाना कालबाह्य झाले होते. त्या माणसाला साहित्यात रुची होती. म्हणून नोकरीसाठी हक्काचे स्थान समजून त्याने ‘तरुण भारत’चा दरवाजा ठोठावला, परंतु नेमक्या त्याच सुमाराला ‘तरुण भारत’ने संगणकक्रांतीला मान्यता दिली होती. परिणामी ‘संगणक निरक्षर’ असल्याच्या कारणावरून त्या प्रचारकाला ‘तरुण भारत’मध्ये प्रवेश मिळाला नाही. पण तो जेव्हा आपले गा-हाणे घेऊन विलासजींकडे गेला त्यावेळी त्याच्या नोकरीपासून संसार थाटण्यापर्यंतच्या सगळ्या समस्यांची एकापाठोपाठ एक उत्तरे मिळत गेली. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे जगणे थोडेफार तरी सुखावह करावे, यासाठी विलासजी धडपडायचे. अर्थात, त्यांच्या या सा-या प्रयत्नांना त्यांच्या पत्नी विनया वहिनींची मन:पूर्वक साथ असलेली दिसायची. परवा घरी गेलो असताना विलासजींच्या आठवणींचा रेशीमबंध हळूवारपणे उलगडताना त्या गहिवरून गेलेल्या दिसल्या. आपल्या लग्नाची एक आठवण त्यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, ‘आमचे घराणे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराचे! माझे वडील तर संघाचे स्वयंसेवक. त्यामुळे जेव्हा माझ्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा वडील नातेवाइकांना म्हणाले, ‘मला दुसरे काही नको, नवरा मुलगा संघ शाखेत जातो का, एवढेच बघा’ आणि त्यांच्या या म्हणण्यानुसार जे पहिले स्थळ पाहिले, तिथेच लग्न जमले.’

विलासजींचे अध्यापनाचे काम आणि संघाचे काम इतके असे की, त्यातून त्यांना घर-कुटुंबासाठी फार वेळ मिळत नसे, परंतु तरीही सर्व महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हजर राहण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्या या कुटुंबवत्सल स्वभावामुळेच असेल कदाचित जो कुणी त्यांच्या परिचय परिघात आला, त्याच्याशी त्यांचा स्नेहबंध जुळत असे. विशेष म्हणजे, तो स्नेह जात, धर्म, विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन जपण्याचा उमदेपणा संघाच्या कर्मठ वातावरणात राहूनही त्यांनी जपला होता. म्हणून उत्तर नागपुरातील दलितबहुल भागामध्ये संघाच्या शाखा उघडणे आणि तेथील ‘निळ्या आकाशा’वर भगवा ध्वज फडकवणे त्यांना शक्य झाले असावे. रा. स्व. संघाला चातुर्वण्र्य मान्य आहे, असे म्हणणा-या गोळवलकर गुरुजींच्या प्रभावाखाली असूनही विलासजींनी आयुष्यभर दलित-बहुजनांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये काही विशेष ‘योजना’ नसावी. पण पिढयान् पिढया उच्चवर्णीय हिंदूंनी ज्या वर्गाला आपल्या स्वार्थासाठी क्षुद्र ठरवून दास बनवले होते, त्यांची सेवा करून, त्यांना संघाकडे आणण्याचा प्रयत्न करणारा ‘स्वयंसेवक’ अशी त्यांची ओळख सत्तरच्या दशकापासूनच झाली होती. खरे तर चातुर्वण्र्याच्या चौकटीत अडकलेल्या संघाला ‘माणसात’ आणण्यासाठी ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढया लोकांनी प्रयत्न केले, त्या मोजक्या लोकांमध्ये विलासजींची गणना होते. संघाचे पश्चिम क्षेत्राचे कार्यवाह म्हणून त्यांनी महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काम केले. तसे पाहिले तर त्यांच्या कार्यकाळात या राज्यांमध्ये भाजपने सत्तेची चव चाखलेली असल्याने, संघाच्या पदाधिका-यांच्या शब्दांनाही मोठी ‘किंमत’ आलेली होती. आयुष्यभर त्यागाच्या रखरखीत वाळवंटात फिरलेल्या प्रचारकांना सत्तेच्या हिरवळीच्या दर्शनानेच भोवळ येताना दिसत होती. अनेकांना या ‘हिरवळी’ची इतकी भुरळ पडली होती की, त्यांनी लोकलज्जा त्यागून ती अधाशीपणे ओरबाडण्याचा प्रयत्न केला. विलासजी या सा-या मोहापासून दूर राहिले. नाही म्हणायला त्यांचे वागणे-बोलणे त्यांच्या नावाला साजेसे होते. पण सत्तेच्या सान्निध्याने येणारा ‘राजविलास’ त्यांनी आवर्जून नाकारला. कामाच्या वेळी अफाट काम, खाण्याच्या वेळी चवीने खाणे, स्वत: सुगंधी अत्तर लावताना, ते आपल्या आसपासच्या लोकांनाही लावून सारा परिसर सुगंधित करणे त्यांना आवडायचे. पण प्रवासात असताना ते कधीही हॉटेलात वा सरकारी विश्रामगृहात उतरायचे नाहीत.

त्यांना आपल्या स्वयंसेवकांच्या घरीच राहायला आवडायचे. हे सांगताना विनया वहिनींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. जवळपास चार तपांच्या वैवाहिक प्रवासाचा हा जोडीदार आठवणींचा अक्षय स्मृतिगंध मागे सोडून पुढे गेला आहे. त्या स्मृतींची नव्या पिढीला विस्मृती होऊ नये, यासाठी आपल्या नातवाने, शंतनूने आणि नात श्रेयाने त्यांच्या लाडक्या आबांवर, विलासजींवर आठ-दहा ओळी तरी लिहाव्यात, यासाठी त्यांचा प्रेमळ आग्रह सुरू होता. त्याच वेळी ‘हेडगेवार रक्तपेढी’चे अविनाशजी संगवई यांच्याशी त्या एका वेगळ्याच विषयावर बोलत होत्या. अविनाशजी म्हणाले, ‘उदकशांतीच्या दिवशी जेवढे लोक येणार आहेत, त्यांना आपण जे लाडूंचे पाकीट देणार आहोत, त्यात संत तुकारामांच्या अभंगातील ओळी टाकू या का?’

‘विसर तो न पडावा।
माझा देवा तुम्हासी।।’

विनया वहिनींनी तात्काळ होकार दिला.. आणि तो विषय तिथेच थांबला. प्रा. रवीजी जोशी आणि अन्य लोक येऊ लागले. वहिनींचा निरोप घेतला आणि क्षणभर विलासजींच्या फोटोसमोर थबकलो. प्रत्यक्ष भेटीत पाहायला मिळणारे त्यांचे तेच स्मितहास्य, दिव्याच्या प्रकाशात अधिक उजळून निघालेले दिसले..

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मन शांत व गंभीर ठेवावे, सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम, सहानुभूती बाळगावी, असे बुद्धांनी अनुशासिले आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात बुद्ध कधीही पापाविषयी बोलत नाहीत. पाप म्हणजे अज्ञान, मुर्खता असे ते म्हणतात आणि ते अज्ञान ज्ञानाचा प्रकाश आणून दूर करता येते, असेही सांगतात. ते पाप प्रेम, सहानुभूतीच्या माध्यमातून नष्ट करता येते, यावर बुद्धांचा विश्वास होता. रा. स्व. संघात ‘दाखवण्यासाठी’ गांधी, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज वा बुद्ध यांचे विचार वा फोटो कोणीही वापरतात. पण विलासजींनी या महापुरुषांचे नाव न घेता, प्रत्यक्षात त्यांचे विचार कृतीद्वारे लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांचे स्मरण करणे महत्त्वाचे ठरते.

Categories:

Leave a Reply