आपल्या देशात निवडणुका जवळ आल्यावर धर्म, प्रादेशिकवाद, महापुरुषांचे नव्याने स्मरण आदी गोष्टींना अक्षरश: ऊत येतो. सगळेच राजकीय पक्ष आणि राजकारणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असणा-या संघटनांना तर नवनवे वादविषय उकरून काढण्याची संधीच हवी असते. यापूर्वी राष्ट्रीय राजकारणात असे वादग्रस्त विषय काढून वातावरण तणावग्रस्त करणारे होतेच; पण त्यांचे राजकीय स्थान नरेंद्र मोदी यांच्याएवढे महत्त्वाचे नव्हते. आणीबाणीच्या काळात नवनवे विषय उकरून काढण्याचे काम राजनारायण करायचे, त्यानंतर डॉ. सुब्रमण्यम् स्वामी, ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांनी त्यांची जागा घेतली. नजीकच्या काळात समाजवादी पक्षाचे अमरसिंह यांनी कुरापती काढून कलागती लावण्याची परंपरा सुरू ठेवली होती; पण आज भाजपने ज्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरवलेले आहे, ते गुजरातचे ‘यशस्वी’ मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने वायफळ बडबड करीत आहेत, ते पाहून त्यांची आणि त्यांना चुकीचे मार्गदर्शन करणा-या त्यांच्या ‘थिंक टँक’ची कीव करावीशी वाटते.
परवा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचा शुभारंभ करताना मोदींनी इतिहासाची मोडतोड केली. पंडित नेहरू यांच्याऐवजी वल्लभभाई पंतप्रधान झाले असते, तर आज भारताचे चित्र वेगळे झाले असते, असेही तारे त्यांनी तोडले. वल्लभभाईंच्या या अतिविशाल स्मारकाची मोदी सरकारने देशभरात अतिप्रचंड (खरे तर अतिखर्चिक) जाहिरातबाजी केल्यामुळे मोदींचे भाषण बहुतांश प्रमुख वृत्तवाहिन्यांनी थेट घराघरात पोहोचवले. मोदी जेव्हा सरदार पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे होते, असे मोठया आवेशात बोलत होते, त्या वेळी जैमिनी पाठक यांच्या अभिनयाने नटलेले ‘महादेवभाई’ हे नाटक प्रकर्षाने आठवले. त्यात गांधीजी आणि सरदार पटेलांमधील एक संवाद खूप बोलका आहे. एकदा गांधीजींनी वल्लभभाईंना थेट विचारले, ‘‘देश स्वतंत्र झाल्यावर आपले जे मंत्रिमंडळ स्थापन होईल, त्यात तुम्हाला कोणते पद हवे?’’ क्षणाचा विलंब न लावता वल्लभभाई उत्तरतात, ‘‘मला काही नको, स्वातंत्र्य मिळाल्यावर मला संन्यासी व्हायची इच्छा आहे. मी एकतारा हाती घेऊन देवाची भजने गात फिरेन. भिक्षेसाठी माझ्या हाती एक कटोरा असला की पुरे. दुसरे मला काही नको?’’ वल्लभभाईंची ही निर्मोही आणि नि:स्वार्थी सेवावृत्ती त्यांच्या ‘लोहपुरुष’ या प्रतिमेपेक्षा खूप लोभस आणि मोहवून टाकणारी आहे. चार जानेवारी १९३२ ते आठ मे १९३३ या काळात गांधीजी आणि वल्लभभाई पुण्याच्या येरवडा तुरुंगात एकत्र होते. त्या वेळी सरदारांचे करारी व्यक्तिमत्त्व अनेकदा प्रकट होई. एका चर्चेदरम्यान महात्माजींना ते तोंडावर म्हणाले होते, ‘‘आजवर वाचन आणि लिखाण करून कोणीही अमर झालेला नाही. जो संघर्ष करतो तोच अजरामर होतो.’’ सरदारांच्या या कणखर आणि प्रखर वर्तणुकीमध्ये आईच्या मायेचा ओलावा होता. त्याबद्दल गांधीजींनी एका पत्रात लिहिले आहे. ‘‘पटेलांच्या सहवासात राहायला मिळणे, ही माझ्या आयुष्यातली सर्वोच्च आनंदाची गोष्ट होती. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि सळसळते राष्ट्रप्रेम मी जाणून होतो; पण सोळा महिन्यांच्या सहवासात मला त्यांच्या हृदयातील ममतेच्या, वात्सल्याच्या पैलूचे अनोखे दर्शन लाभले. त्यांच्यामध्ये आईचे प्रेमळ हृदय असेल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती; पण त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी असलेले प्रेम आणि सेवाभाव पाहून मला माझ्या आईची प्रकर्षाने आठवण होत होती.’’
आधी लालकृष्ण अडवाणी यांना ‘नवे लोहपुरुष’ घोषित करून संघ परिवाराने वल्लभभाई पटेल यांच्या विचार-वारशाचे राजकीय अपहरण करण्याचा घाट घातला होता. आता अडवाणी यांना अडगळीत टाकून त्यांनी नवा ‘वाणी’ मोदींच्या रूपात पुढे आणला आहे. मोदींनी तर रा. स्व. संघावर पहिली बंदी आणणा-या सरदार पटेल यांना डोक्यावर घेऊन नाचण्याची एकच झिम्मड उडवली आहे.. परंतु त्यांच्या या नव्या नौटंकीने इतिहास थोडीच बदलणार आहे?
दीड हजार वर्षापूर्वीचे प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण येथे राज्य करणारा सातवाहन राजा बराच हुशार होता. त्याला अनेक राण्या होत्या, त्यातील एकीला चांगले संस्कृत येत होते. ती राजाशी संस्कृतमध्येच संभाषण करी. एकदा राजा सर्व राण्यांसमवेत जलक्रीडा करीत होता.
जलक्रीडेदरम्यान त्या संस्कृततज्ज्ञ राणीने राजाला विनवले, ‘मोदकै: सिंच’ त्याचा मराठीत अर्थ होतो, ‘अंगावर पाणी उडवू नका’, पण राजाला वाटले, राणीला मोदकांनी आंघोळ करायची आहे. त्याने तत्काळ दासीला हाक मारली आणि ताबडतोब शे-पाचशे मोदक बनवून आणा, असा आदेश दिला. त्याचा तो चमत्कारिक आदेश ऐकून राण्या खळाळून हसल्या आणि त्यांच्या हसण्यामागील कारण समजल्यावर राजाला आपल्या अज्ञानाची शरम वाटली आणि त्याच क्षणी नव्याने अभ्यासाला लागण्याची प्रतिज्ञा घेतली.. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मात्र अजून आपल्या अज्ञानाची शरम वाटल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांचे ‘नमो’ या आद्याक्षरांप्रमाणे ‘फेकू’ हे नाव लोकांमध्ये जास्त लोकप्रिय होत चालले आहे.. खोटे बोलावे, पण रेटून बोलावे या रा. स्व. संघपरंपरेवर दृढनिष्ठा असल्यामुळे असेल कदाचित; पण नरेंद्र मोदी हल्ली खूपच खोटे बोलू लागले आहेत. त्यांच्या मते, फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेले प्राचीन तक्षशिला विद्यापीठ बिहारमध्ये आहे.
जगज्जेता सिकंदर, ज्याला प्रत्यक्षात सतलज नदीसुद्धा ओलांडणे शक्य झाले नव्हते, त्याला मोदींनी थेट गंगेच्या काठावर आणून उभे केले. मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याला तर मोदींनी त्याच्या मृत्यूनंतर सुमारे साडेसातशे वर्षानंतर होऊन गेलेल्या गुप्त साम्राज्याचे अधिपती म्हणून घोषित केले.. बरं आता इतिहासाशी एवढे खेळून हा गडी कुठेतरी थांबावा ना, पण नाही. परवा भारताचे पहिले गृहमंत्री, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात अगदी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समोर त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाचे प्रदर्शन केले. भारतीय स्वतंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक तथ्यांचे आणि सगळयांना ठाऊक असणा-या सत्याचे दाखले नाकारून मोदी यांनी सरदार पटेल यांना मोठे करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भारतीय विकासाची पायाभरणी करणारी कामगिरी छोटी करण्याचा प्रयत्न केला. ‘देवालये नकोत शौचालये हवीत’ किंवा उत्तर प्रदेशातील उन्नावच्या भोंदूबाबाच्या ‘स्वप्नातील सोन्याची आधी टिंगल मग माफी मागण्याची गोष्ट असो’, मोदी वारंवार तोंडघशी पडत आहेत. त्यांच्या या ‘बोलबच्चन’ शैलीवर लोक हसत आहेत. तरीही मोदी थांबायला तयार नाहीत; कारण ‘अज्ञानात सुख असते’ या सार्वकालिक सत्यवचनावर त्यांचा विश्वास असावा. त्याबद्दलही आपला आक्षेप असण्याचे कारण नाही; परंतु जेव्हा मोदींसारखा नेता आहे तो इतिहास आपल्याला सोयीचा व्हावा, असा प्रयत्न करायला सुरुवात करतो तेव्हा विचार करणा-या लोकांनी जागे होण्याची गरज असते. रा. स्व. संघ आजवर हिटलरच्या एकचालकानुवर्तित्व नेतृत्वपद्धतीचा म्हणजे हुकूमशाहीचा प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे पुरस्कार करीत आला आहे. त्या हिटलरने गोबेल्स या विश्वासू सहका-याला हाताशी धरून आधी जर्मनीचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम होऊन जणाचा भूगोल कसा बदलत गेला, हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षातर्फे ज्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे, त्या नरेंद्र मोदी यांच्याकडून होणारी इतिहासाची नवी मांडणी धोक्याचा इशारा देणारी आहे. आज मोदी आणि रा. स्व. संघाच्या या सामान्यजनांचा बुद्धिभेद करणा-या कारवायांचे विश्लेषण आणि विच्छेदन करण्याचा फारसा कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. काँग्रेसमधील काही नेते आणि काँग्रेसमधील पदांवर डोळा ठेवून बसलेले काही स्वयंघोषित प्रवक्ते आज ज्या पद्धतीने मोदींना विरोध करीत आहेत, तो अत्यंत वरवरचा आणि तकलादू स्वरूपाचा दिसतो आणि सगळ्यात वाईट बाब म्हणजे मोदींच्या सुनियोजित प्रचारतंत्राच्या वणव्याला विरोध करण्यासाठी जाणा-या या मतलई, खरे तर ‘मतलबी’ वा-यांनी मोदी वणवा विझण्याऐवजी अधिक भडकवण्याचे काम होताना दिसते. त्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक अनंतमूर्ती असोत, थोर अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन असोत वा कवी-विचारवंत जावेद अख्तर असोत, हे विचार करणारे लोक जेव्हा व्यक्त होतात, तेव्हा समाजाला ख-या अर्थाने धीर मिळतो.
भाजपप्रणीत मोदी सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचे अतिभव्य स्मारक बनवण्याच्या निमित्ताने भारतीय इतिहासाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करणे, ही काही नवी गोष्ट नाही. गतवर्षीपासून द्रष्टे विचारवंत स्वामी विवेकानंद यांची दीडशेवी जयंती धूमधडाक्यात साजरी करताना संघ परिवाराने विवेकानंदांचा विचार-वारसा वेगळ्या पद्धतीने नव्या पिढीसमोर नेण्याचा प्रयत्न केला. अर्थात, जसे काँग्रेसी विचारपरंपरेचा पुरस्कार करणारे आणि रा. स्व. संघावर पहिली बंदी आणणारे सरदार पटेल यांचे पद्धतशीर ‘अपहरण’ करण्याचा आज प्रयत्न सुरू आहे. अगदी त्याच पद्धतीने विवेकानंद यांच्या पूर्वाश्रमीच्या ‘नरेंद्र’ या नामसाधम्र्याच्या भांडवलावर मोदी यांनी वर्षभर विवेकानंद जयंतीचा अक्षरश: धडाकाच लावला होता; परंतु हे करताना त्यांनी विवेकानंदांचे खरे विचार-कार्य मांडण्याचे टाळले; कारण तसे करणे त्यांना सोयीचे ठरणारे नव्हते. आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने प्रत्येक घटनेची सामाजिक दृष्टिकोनातून चिकित्सा करणारे प्रताप भानू मेहता यांनी संघ परिवाराच्या या कृतीविरोधात लिखाण करताना निधर्मी विवेकानंद खूप छान पद्धतीने मांडले आहेत, ‘‘विवेकानंद यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचा सुयोग्य मिलाफ घडवून आणला पाहिजे, असे प्रतिपादन केले होते. ‘‘वेदांताचा मेंदू आणि इस्लामचे शरीर हीच माझ्या मातृभूमीच्या विकासाची आशा आहे,’’ असे स्वामी विवेकानंद म्हणाले होते. येथे स्वामीजींना सगळ्यांना समान मानणारा अद्वैत सिद्धांत ‘प्रॅक्टिकल’मध्ये वापरावासा वाटतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हे ‘अद्वैत’ ज्यांच्याशी साकारायचे आहे, त्या इस्लाममध्येसुद्धा समानतेच्या आचरणावर जास्त भर दिला जात असल्याने त्यांच्या या एकूण विचारामागे एकत्वाची कल्पना दिसते.’’ मातृभूमीच्या विकासासाठी विवेकानंदांनी पाहिलेल्या या अभूतपूर्व ऐक्याचे स्वप्न संघ परिवार आणि नरेंद्र मोदी यांना ठाऊक नाही, असे नाही; परंतु इतिहासच बदलायचा जेव्हा निर्णय घेतला जातो, तेथे वस्तुस्थितीचा विपर्यास अनिवार्य ठरतो.
नरेंद्र मोदी यांनी जसा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तद्वत ते इतिहास विसरण्याचाही कसून सराव करताना दिसतात. होय, आज मोदी ज्या पद्धतीने सरदार पटेल यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने देशहिताच्या भावनेचे ‘प्रदर्शन’ करीत आहेत. ते त्यांना बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीच्या निमित्ताने करता आले असते; पण नरेंद्रभाईंना ११ मार्च २०१३ रोजी संपलेल्या या दीडशेव्या जयंती वर्षात युगद्रष्टया सयाजीरावांची साधी आठवणही झाली नाही. मग त्यांचे भव्य स्मारक वा अन्य कार्यक्रम होण्याचा प्रश्नच उद्भवणार कसा?
१९४१मध्ये काँग्रेसमधील सोशालिस्ट मंडळींना बाहेरची वाट दाखवण्याचा घाट घालण्यात गांधीजींचे निकटवर्तीय लोक यशस्वी झाले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते मीनू मसानी यांच्यापाठोपाठ जयप्रकाश नारायण हेसुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडण्यास प्रवृत्त झाले होते. त्या वेळी ज्येष्ठ समाजवादी नेते युसूफ मेहेरअली यांनी या सगळया प्रकारामागे कोण आहे, यावर गमतीने टिपणी केली होती. ‘राजगोपालाचारी हे गांधीवाद्यांचे मेंदू आहेत, तर वल्लभभाई प्रत्यक्ष काम करणारे, मार्ग दाखवणारे हात आहेत.’ गांधी-नेहरूप्रणीत काँग्रेसच्या नव्या रचनेत ज्यांचा मोलाचा वाटा होता, ते चक्रवर्ती राजगोपालाचारी एका भाषणात म्हणाले होते की, ‘‘हिंदुस्थानात दोनच खरे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि सयाजीराव गायकवाड;’’ पण मोदींना आणि त्यांचे ‘बोलविते धनी’ असणा-या संघ परिवारातील मंडळींना सयाजीराव महाराजांची आठवण करणे सोयीचे नाही. त्यांना सरदार पटेलांची वारंवार आठवण येते; कारण गुजरातेतील सर्वार्थाने प्रबळ असणाऱ्या पटेल जातीच्या पाठबळाशिवाय सत्ता टिकवणे अशक्य आहे. गेल्या पन्नास वर्षात चार वेळा राष्ट्रपती राजवटींचा सामना करणा-या गुजरातेत हितेंद्रभाई देसाई यांनी १९६५ ते १९७१ दरम्यान सलग तीनदा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यानंतर माधवसिंह सोळंकी यांनी चारदा मुख्यमंत्रीपद मिळवले; परंतु बाबूभाई, केशुभाई आणि चिमणभाई या तीन पटेलांनी आठ वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद मिळवून, गुजरातच्या राजकारणावर पटेलांचा किती पगडा आहे हे दाखवून दिले होते. मोदींनी आपल्या पक्षातील केशुभाई पटेल यांचे प्रभुत्व संपवताना कुटिल नीतीचा वापर तर केलाच; पण त्याचबरोबर काँग्रेसमधील पटेलांना कौशल्याने निष्प्रभही केले. परिणामी गेल्या तीन टर्ममध्ये मोदी यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान मिळाले नाही. ते भविष्यातही मिळू नये आणि आपण गुजरातबाहेर पडलो तरी संपूर्ण राजकारण आपल्या हातात राहावे यासाठी मोदींनी मोठया खुबीने ‘पटेल कार्ड’ वापरणे सुरू केले आहे. सयाजीरावांचे कार्यकर्तृत्व पटेलांच्या तुलनेत कित्येकपट मोठे होते, हे सांगायला मला आज येथे अभिमान वाटतो; पण मोदींच्या वातावरणनिर्मितीच्या भूलभुलैयात अडकलेले आमचे मराठी भाजप वा सेना नेते वस्तुस्थितीकडे डोळेझाक करतात त्या वेळी त्यांच्या असहायतेची दया येते. मोदींच्या सभेत आशाळभुतासारखे बसणारे सेना-भाजपचे नेते मोदींना ‘तुम्ही आमचे सयाजीराव मराठी होते म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले का?’ असा सवाल विचारू शकणार नाहीत, याची मला पूर्ण खात्री आहे; पण मोदींच्या राजकारणावर उठसूट बोलणा-या काँग्रेसच्या अधिकृत वा अनधिकृत प्रवक्त्यांनाही ही बाब खटकली नाही, याचे आश्चर्य वाटते. आमच्या सयाजीराव महाराजांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी अफाट मेहनत घेतली. इंग्रजांचा रोष पत्करून, जीवाची बाजी लावून ते राजकीय स्वातंत्र्यासाठी जेवढे झटले तेवढेच त्यांनी सामाजिक क्रांतीसाठी योगदान दिले आहे. सयाजीरावांनी बडोद्यात राहून लोकमान्य टिळक, ना. गोखले, लाला लजपतराय, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यापासून महात्मा गांधी यांच्यापर्यंत सर्वाना स्वातंत्र्य संग्रामासाठी स्फूर्ती दिली. महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याला खुला पाठिंबा दिला होता, तर डॉ. आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी मदत दिली. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन बडोदा संस्थानात अस्पृश्यता बंद केली. त्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
स्त्री-शिक्षणासाठी शाळा उघडल्या. गुजराती आणि मराठी भाषेत शालेय शिक्षण असावे, यासाठी खास अभ्यासक्रम तयार केले. या जाणत्या राजाने, ज्याचा जन्म नाशिकजवळच्या कवळाण्यात झाला होता, अत्यंत सामान्य घरात बालपण गेले होते; पण नशिबाने लाभलेल्या राजेपदाला मेहनत, कर्तबगारीने सार्थ करून दाखवले होते. सयाजीराव महाराजांनी आपले बडोदे संस्थान प्रशासनात युरोपीय देशांच्या तोडीचे व्हावे, असा ध्यास घेतला होता. त्यासाठी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पंचायतराजसारखा अभूतपूर्व उपक्रम त्या काळात राबवला. त्यांच्या या लोकाभिमुख प्रशासनाची तेव्हा केवळ भारतातच नव्हे तर युरोप, इंग्लंडातही चर्चा होत होती. त्यामुळे बडोदा नरेशांना जागतिक स्तरावरील कार्यक्रमात सन्मानाने आमंत्रित केले जाई. १८७५ ते १९३९ या सुमारे ६४ वर्षाच्या कालखंडात सयाजीरावांनी राज्य कसे चालवावे, याचा आदर्श जगापुढे उभा केला. राज्यात नैसर्गिक आपत्ती आली तर, दुष्काळाने कहर माजवल्यावर हा ‘लोकांचा राजा’ दुर्गम, दुर्लक्षित भागामध्ये धाव घेई, त्यांच्या राज्यात धार्मिक कर्मठपणाला, जातीय वर्चस्वाला स्थान नव्हते; परंतु प्रत्येक माणसाला चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. ज्ञान घेण्याचा अधिकार आहे, तेथे त्याची जात वा धर्म आडवा येणार नाही, याची सयाजीराव महाराज काळजी घेत असत. त्यांच्या या युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वाची झलक त्यांच्या भाषणातून पाहायला मिळते. ‘साकेत प्रकाशन’ने महाराजांच्या भाषणांचे तीन खंड काढले आहेत. पहिल्या खंडात शिक्षण, धर्म व तत्त्वज्ञान, दुसरा आणि तिस-या खंडात राज्य प्रशासन आणि राज्य व्यवहार यासंदर्भात त्यांची मते वाचायला मिळतात. या तिन्ही खंडांना प्रख्यात समीक्षक व विचारवंत डॉ. रमेश वरखेडे यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. प्रस्तावनेत डॉ. वरखेडे लिहितात, ‘कागदी राज्यघटनेपेक्षा कायद्याच्या अंमलबजावणीवर आणि सामाजिक पुनर्घटनेवर भर दिला पाहिजे. हा सयाजीरावांचा दृष्टिकोन त्यांच्या भाषणातून आपल्याला कळतो. जनतेला नागरी हक्कांबरोबरच राजकीय सत्तेत सहभाग, धर्ममूल्ये आणि नागरीमूल्ये यांची सांगड, अल्पसंख्याकांचे संरक्षण, शाश्वत विकासासाठी जमीन सुधारणा, सिंचन, आरोग्य, शिक्षण, दळणवळणाच्या साधनांचा विकास यावर त्यांचा भर होता. विकासाची फळे सर्वसामान्य माणसाला लाभावी याकडे त्यांचा कल होता. राष्ट्राची प्रगती होण्यासाठी कर्तबगार माणसे लागतात या जाणिवेतून सयाजीरावांनी विविध खात्यांतील लोकसेवकांच्या कर्तव्याची संहिता तयार केली व त्यांना राज्य-प्रशासनाचे प्रशिक्षण दिले होते. म्हणून राजकीय प्रयोगांची संपूर्ण माहिती असलेली ही भाषणे लोकप्रशासनाच्या दृष्टीने एखाद्या ‘राज्योपनिषदा’सारखी आहेत. सुप्रशासनासाठी लागणारे बौद्धिक चैतन्य निर्माण करण्याची क्षमता ठासून भरलेली ही भाषणे जागरूक नागरिक, शासकीय अधिकारी, कामगार संघटनांचे नेते आणि राज्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरतील,’ असा विश्वास डॉ. वरखेडे यांनी प्रस्तावनेत व्यक्त केला होता; पण आमचे दुर्दैव असे की, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि आयुष्यभर मराठी अस्मितेचा अभिमान बाळगणा-या या लोकोत्तर राजाच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हा मराठी लोकांनाच विसर पडलेला दिसतोय, मग मोदींसारख्या गुज्जुभाईकडून आम्ही वेगळ्या वर्तणुकांची काय अपेक्षा करावी?
मोदी आज आपल्या राजकीय स्वार्थासाठी सरदार पटेल यांच्या नावाचा वापर करताहेत. पंतप्रधानपदाच्या आशेच्या झुल्यावर ते इतके दंग झाले आहेत की, आपण झोपाळ्यावर बसलेलो नसून गगनभरा-या मारत आहोत, असा त्यांचा समज झालेला दिसतोय. त्याउलट सर्व संस्थानिकांना ‘सरळ’ करून भारताचे एकीकरण घडविणारे ‘पोलादीपुरुष’ वल्लभभाई यांचे पाय जमिनीवरच होते. एखाद्या शेतक-याला साजेसा असा धोतर, कुर्ता आणि जाकीट असा पेहराव, पायात साध्या चपला आणि बोलण्यात गांधीजींप्रमाणे विनम्रता, हे सरदारांचे गुण घेणे डिझायनर कपडे घालून, मॉडेलप्रमाणे पोझ देणा-या, उर्मट भाषेत बोलणा-या नरेंद्र मोदी यांना जमणे शक्य नाही, पण हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर वल्लभाईंनी फार सुरेख उद्गार काढले होते, त्याचा येथे उल्लेख करावासा वाटतो. प्रसिद्धीच्या शिखरावर आरूढ झालेले वल्लभभाई तेव्हा म्हणाले होते, ‘‘हे जग बुद्धिबळाच्या पटासारखे आहे आणि आपण त्यावरची साधी प्यादी आहोत. त्यानुसार आपण छोटया किंवा मोठया घटनांमध्ये सहभागी होत असतो. या सहभागाबद्दल आपण परमेश्वराचे आभारच मानले पाहिजेत.’’ पटेलांचे हे म्हणणे नरेंद्रभाईंना ‘पटेल’ असे मात्र वाटत नाही.
Categories:
आवर्तन