Mahesh Mhatre

जगातील सगळयाच देशांमध्ये राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, अपवाद फक्त भारताचा. आपला देश स्वतंत्र होईपर्यंत लक्षावधी लोकांनी प्राणत्याग – स्वार्थत्याग करून लढा दिला. मध्यमवर्ग या सगळ्या लढाईत पुढे होता. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत भारतीय समाजमनाला दिशा दाखवण्यासाठी लेखक, विचारवंत, संपादक, प्राध्यापक, डॉक्टर्स आणि समाजसेवकांनी भरलेला मध्यमवर्ग पुढे असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र प्रत्येक पांढरपेशा माणूस स्वतंत्रपणे वागू लागला. देशापेक्षा स्वहितासाठी राबू लागला. देशाला काही देण्यापेक्षा स्वत:साठी सर्व मागू लागला. परिणामी देशाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. वाईट स्थितीत कर्ता-कमावता मुलगा घर सोडून जावा, तद्वत १९६० पासून आमच्या देशातील बुद्धिमंत – प्रज्ञावंत वर्ग युरोप-अमेरिकेत जाऊन त्यांच्या सेवेत रमला आणि एन.आर.आय. (अनिवासी भारतीय) झाला. आजही त्या परिस्थितीत बदल झालेला नाही. भारतातील प्रतिष्ठेपेक्षा तिकडे मिळणा-या डॉलर्सपुढे लाचार झालेला हा वर्ग अपमानाला सरावला आहे. म्हणून त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे, ‘देश तुम्हाला काय देतो, यापेक्षा तुम्ही देशाला काय देता हे महत्त्वाचे’ हे सुप्रसिद्ध वाक्य लक्षात राहत नाही. इतकंच नव्हे तर त्यांच्या डोळयांसमोर असणारे लंडनच्या ट्रॅफलगार चौकातील ‘ब्रिटन एक्सपेक्टस् एव्हरीबडी टू डू हिज डयुटी’ (प्रत्येकाने आपले कर्तव्य – कर्म चोख बजावले पाहिजे, ही ब्रिटनची अपेक्षा आहे) हे वाक्यही दिसत नाही. स्वार्थामुळे आई – बापांची पर्वा नसते, मग त्यांच्याकडून भारतमातेने काय अपेक्षा करावी? चीनच्या एकूण आर्थिक प्रगतीत विदेशात राहणा-या चिनी उद्योजकांचे मोलाचे योगदान आहे. त्या तुलनेत आमचे अनिवासी भारतीय खूपच अनास्था दाखवतात, असे का?

भारतीय वंशाच्या निना धवळुरी या २४ वर्षीय तरुणीने ‘मिस अमेरिका’चा किताब पटकावणे, ही खरे तर अमेरिकेच्या बाजारपेठेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेतील ऐतिहासिक घटना. १९२१ साली अमेरिकेत सुरू झालेल्या या सौंदर्यस्पर्धेमध्ये प्रथम येणारी निना ही पहिली भारतीय वंशाची ‘मिस अमेरिका’ ठरली. यासंदर्भात ‘टाइम’ मॅगझिनने, ‘‘सोनेरी केस रंगविणा-या कचकडयाच्या बार्बी डॉल्सचा जमाना आता मागे पडलाय, हेच निनाच्या जिंकण्याने सिद्ध झाले आहे,’’अशी खूप मार्मिक टिप्पणी केली, परंतु अमेरिकेतील गौरवर्णीय वर्चस्ववाद्यांच्या अभिमानाला निनाच्या विजयाने तडा गेला असावा. म्हणून फेसबुक, ट्विटरसह सर्वच सोशल नेटवर्किंग साइट्सवर निनाच्या संदर्भात अत्यंत असभ्य भाषेत टीका करण्याची जणू स्पर्धाच लागली. हे खरेच आहे की, फेसबुक असो वा ट्विटरवर तत्काळ प्रतिक्रिया देणारे बहुतांश लोक, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या म्हणीला न्याय देणारे असतात. त्यांच्या आक्रमक उत्साहाला अज्ञान आणि अविवेकाचा जोरदार ‘तडका’ दिलेला असतो. त्यामुळे तडकाफडकी व्यक्त होणारे हे फेसबुके आणि ट्विटरे दुस-या व्यक्तीला, संस्थेला वा संघटनेला तडाखा देण्याच्या नादात सामाजिक सामंजस्याला तडा जाईल, असे वर्तन करीत असतात. अगदी निनाच्या विजयानंतर तिची संभावना ‘दहशतवादी’ किंवा ‘अरब’ अशी करताना या मंडळींना तिच्या भारतीयत्वाबद्दल अजिबात माहिती नसणे, हे अमेरिकेतील सार्वत्रिक अज्ञानाचे निदर्शक आहे. त्याबद्दल आपल्याला काही आक्षेप असण्याचे कारण नाही; परंतु तेथील तरुणांमध्ये, विशेषत: गौरवर्णीय वर्गात असणारा वर्णाभिमान ज्या पद्धतीने व्यक्त झाला त्याचा आम्ही भारतीयांनीदेखील विचार केला पाहिजे.
युरोप-अमेरिकेत फिरताना कोणत्याही आशियायी माणसाला ‘पाकी’ म्हणजे ‘पाकिस्तानी’ म्हणून हिणवणे गो-या लोकांना किती आवडते, ते पाहायला मिळते. कॉलेज वा विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी, टॅक्सी चालवणारा तरुण, गुरुद्वारात चाललेला वयोवृद्ध माणूस अथवा कपाळावर टिकली लावणारी स्त्री अशी कोणत्याही वर्गातील वा वयोगटातील भारतीय व्यक्ती या वर्णद्वेषी व्यक्तींच्या रोषाला कोणत्याही क्षणी बळी पडते आणि सगळयात दु:खाची गोष्ट म्हणजे ही वर्णद्वेषी मनोवृत्ती जेवढी रस्त्यावरील गुंडाच्या अंगी भिनलेली असते, तेवढीच तेथील पोलिस वा कस्टम्स अधिका-याच्या डोळयांत उतरलेली दिसते. अर्थात आडनावावरून समोरच्या माणसाच्या जातीचा अंदाज लावून त्याच्या कुवतीचा निर्णय घेणारे ‘जात्याभिमानी’ भारतीय आणि अहंकारी गो-यांमध्ये काडीचा फरक नाही. दोन्ही प्रवृत्ती सारख्याच समाजविघातक. फरक एवढाच की, युरोपीय समाजाने फ्रेंच राज्यकांतीपासून ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या त्रिसूत्रीचा जयघोष करताना त्या प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला. तेथे करुणेचा पुरस्कार करणा-या ख्रिश्चन धर्मतत्त्वांच्या प्रभावामुळे समाजवाद-साम्यवाद आणि बंधुभावावर आधारलेला मानवतावाद रुजला आणि फोफावला. आपल्याकडे सर्वप्रथम बुद्ध आणि महावीराने माणसाच्या माणूसपणाला केंद्रभागी आणून धर्माची चौकट उभारली. त्यामुळे निर्गुण, निराकार आणि निराधार भगवंतावर आधारलेले यज्ञ-परलोक-पुनर्जन्मावर आधारित धर्मकर्म मागे पडले होते. बुद्धाच्या या बुद्धिवादी विचारसरणीने प्रज्ञा-शील-करुणा यावर भर देणारा मध्यममार्ग म्हणून धम्म पुढे आला आणि त्यामुळे त्याच्या प्रभावामुळे भारताच्या एकूणच विकासप्रक्रियेवर सुपरिणाम झाले होते. म्हणूनच असेल कदाचित चिनी पुराणकथांमध्ये भारताचे वर्णन ‘पश्चिमेचा स्वर्ग’ असे होत होते. युरोपीय देशांमध्ये तर भारतीय सुबत्तेच्या एवढया कथा पसरल्या होत्या नि ‘इंडिया’मध्ये जाणे हे प्रत्येक धाडसी दर्यावर्दीचे स्वप्न होते. त्यामुळे चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पेन असो वा पोर्तुगाल, इंग्लंड असो वा फ्रान्स या सगळया देशांतील राजे – रजवाडयांना सुवर्णभूमी भारताचे वेध लागले होते; परंतु पंधराव्या शतकानंतर जसजसा बौद्धधम्माचा प्रभाव ओसरत गेला, तसतसा भारतीय समाज भौतिक आणि नैतिक पातळयांवर घसरत गेला, असे इतिहास सांगतो. त्यामुळे आज अमेरिकेतील मूठभर गो-यांच्या वर्णद्वेषी विचारांवर टीका करण्यापूर्वी आम्हाला आमच्या देशातील आत्मकेंद्रित उच्चभ्रू वर्गाच्या एकूण वर्तनाचाही विचार करण्याची वेळ आली आहे.


‘मिस अमेरिका’ झालेल्या निनाचे आई-वडील दोघेही हैदराबादचे आहेत. तिच्या वडिलांचे नाव धवळुरी कोरेश्वर चौधरी. ते १९८१ मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले. ते स्वत: स्त्री-रोगतज्ज्ञ आणि निनाची आईसुद्धा डॉक्टरच आहे. निनाचा जन्म अमेरिकेतच झाला. त्यामुळे ती जन्माने अमेरिकन नागरिक आहे; परंतु असे असताना अमेरिकेतील बहुतांश तरुणांनी माथेफिरूपणा करून तिच्यावर असभ्य भाषेत टीका केली. सगळयात महत्त्वाचे म्हणजे ती अमेरिकी नाही, असे सांगत तिला ‘देशातून चालती हो’ असे म्हणणे अत्यंत दु:खदायक आहे आणि त्याहून वेदनादायी आहे अशा अपमानास्पद स्थितीत आमच्या लोकांनी परदेशात सेवा देत राहणे..

गौरवर्णीयांचा प्रभाव असलेल्या देशात भारतीयांचा अपमान होण्याची खूप मोठी ‘परंपरा’ आहे. आमचे राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना जवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असूनही त्यांना रेल्वेतून उचलून फेकण्यात आले होते. पीटर मॉरिसबर्ग स्टेशनावरील प्लॅटफॉर्मवर अपमानास्पदरीत्या उतरवले गेलेले गांधी दु:खी, कष्टी आणि व्यथित झाले होते. त्यांना आपला अपमान करणा-या गो-या माणसाचा राग आला नव्हता; पण वर्णवर्चस्वाचा पुरस्कार करणा-या गो-या माणसांच्या काळया वृत्तीला बदलवण्याचा त्यांनी निर्धार केला होता. त्या एका भयंकर अनुभवाने गांधीजींना अंतर्बाहय बदलून टाकले आणि त्यामुळे भारताचे भवितव्य बदलले..

भारताला ‘श्वेतक्रांती’चा मार्ग दाखवून एक नवी समाजरचना उभी करणारे डॉ. वर्गिस कुरियन, भूकमुक्तीचा ध्यास घेऊन भारतीय गरिबांना पुरेसे अन्न मिळावे यासाठी आपले आयुष्य वेचणारे ‘हरितक्रांती’कार डॉ. स्वामीनाथन, भारताला दूरसंचार तंत्राच्या माध्यमातून जोडणारे सॅम पित्रोदा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील भक्कम पगाराची नोकरी सोडून आलेले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, देशाला ‘आधार’ देण्यासाठी पुढे सरसावलेले नंदन निलेकणी अशी शेकडो नावे आपल्या डोळयांसमोर येतील. ज्यांनी स्वत:च्या आर्थिक विकासापेक्षा, सुखी कौटुंबिक आयुष्यापेक्षा देशाच्या आणि देशबांधवांच्या सुखाचा विचार केला. आज भारत जो काही प्रगती करीत आहे, ती या मोजक्या आणि चांगल्या लोकांच्या परिश्रमामुळे साध्य होत आहे. याचा तुम्ही – आम्ही सगळयांनी विचार केला पाहिजे आणि त्याच जोडीला परदेशाची आणि परदेशी नागरिकांची सेवा करणा-या आमच्या विद्वान, विचक्षण आणि विवेकी देशबांधवांनीही याचा विचार करण्याची गरज आहे.
‘ब्रेन ड्रेन’ ही संकल्पना साधारणत: साठच्या दशकात चर्चेत येऊ लागली होती. फक्त भारतच नव्हे तर चीन, जपान आणि छोटया युरोपीय देशांतील बुद्धिमंतांचा प्रवाह इंग्लंड – अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडे वळला होता. त्यामागे काही निश्चित कारणेही होती. इंग्लंड-अमेरिकेने संशोधनाच्या क्षेत्रात आघाडी घेताना, परदेशी बुद्धिमान संशोधकांना अगदी वेचून, वेचून आपल्याकडे वळविण्याचा सपाटा लावला होता. त्यामधूनच अमेरिकेने हरगोविंद खुराणा, सुब्रमण्यम् चंद्रशेखर आणि वेंकटरामन रामकृष्णन् यांच्यासारख्या नोबेल पुरस्कार जिंकणा-या संशोधकांना आपल्या देशात ठेवून घेतले. अर्थात डॉ. स्वामीनाथन यांच्यासारख्या अनेक गांधीवादी देशप्रेमी संशोधकांनी अमेरिकेऐवजी मायभूमीचा रस्ता धरला म्हणून देश उद्धरला, हे आम्ही सर्वानी मोकळेपणाने मान्य केले पाहिजे.

१९६० मध्ये अमेरिकेत स्थायिक होणा-या एकूण परदेशी लोकांमध्ये भारतीय बुद्धिमंतांचे प्रमाण फक्त ०.५ टक्के होते. आणि २०११ मध्ये ते पाच टक्क्यांवर पोहोचले आहे. ‘मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिटयूट’तर्फे अमेरिकेत येणा-या भारतीयांच्या स्थितीवर प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अमेरिकेत सध्या १९ लाख भारतीय राहतात. त्यातील ७५ टक्के भारतीयांचे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. अमेरिकेतील स्थानिकांच्या तुलनेत भारतीयांची शैक्षणिक सरासरी खूपच चांगली आहे. गतवर्षी ६६ हजार भारतीयांना कायदेशीररीत्या अमेरिकेत कायम वास्तव्याचा परवाना (ग्रीनकार्ड) मिळाला होता.

अमेरिकेत जाणारे बहुतांश भारतीय स्त्री-पुरुष नोकरीच्या व्हिसा मिळवून जातात. या नोकरदारांपैकी सरासरी २० टक्के लोक व्यवस्थापन, अर्थ आणि व्यवसायाच्या क्षेत्रांत काम करतात. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुरुष २९ तर महिलांचे प्रमाण १६ टक्क्यांपर्यंत आहे. विक्रीच्या क्षेत्रात ११ टक्के भारतीय कार्यरत आहेत. एकूण काय तर आजघडीला पाच लाख १५ हजार हुशार स्त्रिया आणि सात लाख १७ हजार बुद्धिवान पुरुष अमेरिकेतील उद्योग व्यवसायात आपला ठसा उमटवत आहेत; परंतु जेव्हा त्यांच्याचपैकी कुण्या एका डॉक्टरची मुलगी निना धवळुरी ‘मिस अमेरिका’ होते, तेव्हा तिच्या रंगावरून तिच्या राष्ट्रीयत्वाबद्दल संशय घेतला जातो, तेव्हा या बुद्धिवंतांपैकी एकाच्याही मनात आपल्या मातृभूमीची, आपल्या देशबांधवांची आठवण जागी का होत नाही? आणि जर असे असेल तर आमच्या एकूणच शिक्षण पद्धतीत काही तरी भयंकर दोष निर्माण झाले असावेत. आपल्याकडे इंग्रजांनी जी ‘वसाहतवादी शिक्षण पद्धती’ रुजवली आहे, त्या शिक्षण-पद्धतीविषयीचे तज्ज्ञ मेफ्यू यांनी सुमारे ऐंशी वर्षापूर्वी आमच्या शैक्षणिक पद्धतीतील त्रुटी आणि विसंगतीवर अचूक बोट ठेवले होते. ते म्हणतात, ‘ज्या समस्यांशी सामान्य लोक झगडत असतात, त्याचे पुसटसे प्रतिबिंबही भारतातील शालेय अभ्यासक्रमांच्या आखणीत दिसत नाही. शाळेत ज्ञान म्हणून जे काही मिळते त्याचा आणि शालेय विद्यार्थ्यांना जे विषय आत्मियतेचे वाटत असतात, त्याचा काहीच संबंध नसतो. शिवाय दुर्बल घटकातील लोकांना ज्या चिंता वाटत असतात, त्याच्याशीही या शिक्षणाचा दुरान्वयानेही संबंध नसतो.
सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्यांचा शिक्षण व्यवस्थेत मागमूस दिसत नाही. त्याहून गंभीर म्हणजे, शिकवले जाणारे बहुतांश विषय हे आर्थिक व सांस्कृतिकदृष्टया बलिष्ठ वर्गाच्या हितांशी संबंधित असतात. मात्र ही वस्तुस्थिती झाकण्यासाठी अशा विषयांवर ‘राष्ट्रीय समस्येशी निगडित’ असे गोंडस आणि आकर्षक वेष्टन चढविले जाते. अशा त-हेच्या केवळ उच्चवर्णियाभिमुख अभ्यासक्रमांच्या आखणीमुळे शाळेत वर्तमान संदर्भाचे ज्ञान देण्याची संधी, तर गमावली जातेच शिवाय त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेही एकूण नुकसानच होते. अशा अभ्यासक्रमातून केवळ ‘दुभंग व्यक्तिमत्त्वेच घडवली जातात’ आणि त्यांचे सदसद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्यही नष्ट होते. मेफ्यूसाहेबांनी ऐंशी वर्षापूर्वी केलेले भाष्य आजच्या युरोप-अमेरिकेत अपमान सहन करून सेवा देणा-या ‘दुभंग व्यक्तिमत्त्वां’ना पुरेपूर लागू पडते.

पैशासाठी, करिअरसाठी आणि सुखी आयुष्यासाठी युरोप-अमेरिकेत गेलेल्या भारतीयांचे आयुष्य खरोखर दोन संस्कृतीत दुभंगलेले दिसते. रस्त्यावर, कार्यालयात आमचे लोक व्यक्तिवादी अमेरिकन संस्कृतीचे पुरस्कर्ते असतात, तर घरामध्ये समाजाभिमुख भारतीय संस्कृतीनुसार वागण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. येथे मी मुद्दाम कुणाच्या धार्मिक वा सांस्कृतिक परंपरा जपण्याबद्दल बोलू इच्छित नाही. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे; परंतु अमेरिकन संस्कृतीत वाढणारी नवी पिढी जेव्हा त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षा खुलेपणाने प्रकट करते, त्या वेळी ‘समाज काय म्हणेल?’ असा टिपिकल भारतीय विचार करणा-या पालकांशी त्यांचा संघर्ष होणे अपरिहार्य असते आणि येथे त्या संघर्षाची अखेर घर दुभंगण्यात होते. हे अनेक घरांमध्ये घडताना दिसत आहे. थोडक्यात सांगायचे तर परदेशात गेलेल्या या भारतीयांची स्थिती अंतिमत: ‘ना घरका, ना घाटका’ अशीच होते. मग त्यांनी ही स्थिती टाळण्यासाठी ‘देशाचा’ आणि ‘देशवासीयांचा’ होऊन पाहावे.. त्याचा त्यांनाही फायदा होईल आणि अर्थात ज्यांच्या पैशावर त्यांनी शिक्षण घेतले त्या भारतीय करदात्यांनाही निश्चितच लाभ मिळेल.
यंदाच्या वर्षी भारतात १७१ आयएएस अधिकारी, ७०० पायलट, तीन लाख एमबीए व १५ लाख इंजिनीयर्स आणि ४५ हजार एमबीबीएस डॉक्टर्स तयार होतील. सबंध अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश मिळून जेवढे इंजिनीयर्स आणि एमबीए तयार होत नाहीत, त्यापेक्षा जास्त कुशल मनुष्यबळ भारतात तयार होते. आमच्या ‘आयआयटी’च्या इंजिनीर्यसना जगभर मागणी असते; कारण पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या शैक्षणिक संस्थांमधून उत्तम प्रकारचे शिक्षण दिले जाते. या ‘आयआयटी’च्या शिक्षणावर शासनाने आजपर्यंत अक्षरश: हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. एक इंजिनीयर तयार करण्यासाठी सरकार सरासरी दीड कोटी रुपये खर्च करते आणि त्याचे फलीत काय? तर आज सुमारे २५ हजार आयआयटियन्स अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. कोण आहेत हे तुमच्या-आमच्या पैशांवर शिकलेले लोक? हे सारे भारतीय मध्यमवर्गातील, उच्चभ्रू समाजातील स्वकेंद्रित लोक आहेत. त्यांना आपल्या म्हाता-या आई-वडिलांचीदेखील पैशांपुढे पर्वा नसते, ते भारतमातेचा काय विचार करणार?

आमच्या आयआयटियन इंजिनीयर्सची जी स्थिती तीच आमच्या एमबीबीएस डॉक्टर्सची. चार वर्षापूर्वी ‘एआयआयएमएस’ (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) या वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेने आपल्याकडे शिकणा-या एमबीबीएस डॉक्टर्सच्या शिक्षणावर होणा-या खर्चाचा अभ्यास केला होता. रुग्णालय व्यवस्थापनाचे विभागप्रमुख डॉ. शक्ती गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पाहणीमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती बाहेर आली. ती म्हणजे एक एमबीबीएस डॉक्टर तयार करण्यासाठी शासनाला एक कोटी ७० लाख रुपये खर्च येतो. ‘एआयआयएमएस’च्या प्रांगणातून १९५६ ते १९९७ या दरम्यान डॉक्टर झालेल्या २१२९ जणांचा डॉ. गुप्ता आणि त्यांच्या सहका-यांनी शोध घेतला असता १४७७ जणांपर्यंत त्यांना पोहोचता आले. या संपर्क झालेल्या डॉक्टर्सपैकी ५२ टक्के म्हणजे ७८० डॉक्टर्स परदेशात नोकरी-धंदा करीत असल्याचे समजले. गेल्या तीन वर्षात देशातील तीन हजार डॉक्टर्स उच्चशिक्षणासाठी परदेशी गेले, ते परत आलेच नाहीत. भारतात दर हजारी माणसांमागे एक डॉक्टरही नाही. जागतिक आरोग्य संघटना म्हणते की, एक हजार लोकांसाठी किमान चार डॉक्टर्स पाहिजेत. मुंबईसारख्या महानगरात जेथे दीड कोटीच्या आसपास लोक राहतात, तेथे फक्त ३३ हजार अधिकृत डॉक्टर्स आहेत. तीच स्थिती दिल्लीची. येथे ४१ हजार डॉक्टर्स आहेत. ‘आयएमएस’तर्फे करण्यात आलेल्या १२० शहरांतील डॉक्टर्स आणि केमिस्टच्या जनगणनेत असे आढळून आले की, या शहरात तीन लाख ७३ हजार डॉक्टर्स आणि ९९ हजार औषधविक्रेते आहेत. त्यामुळे आपल्या देशातील गरिबांना बोगस डॉक्टर्स आणि केमिस्टकडे जावे लागते आणि लक्षावधी लोकांना पुरेशा वैद्यकीय सुविधांअभावी मृत्यूच्या दारात जावे लागते आणि या सगळया स्थितीच्या उलट परिस्थिती अशी की, इंग्लंडमध्ये ४० हजारांहून अधिक, अमेरिकेत ५० हजारांहून अधिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड येथे प्रत्येकी १५ ते २० हजार भारतीय डॉक्टर्स रुग्णांना सेवा देत मेवा खात आहेत. हे सारे आकडे इंग्लंड, अमेरिका आणि अन्य देशांतील भारतीय डॉक्टर्सच्या संघटनांनी जाहीर केलेले आहेत. त्यामुळे ते खरे मानले तरी परदेशात सेवा देणा-या भारतीय डॉक्टर्सची ही संख्या आणखी जास्त असावी, असे मला वाटते. मुख्य म्हणजे आयआयटियन्सप्रमाणे हे एमबीबीएस डॉक्टर्ससुद्धा पांढरपेशा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय समाजघटकातील आहेत. त्यात दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसींचे प्रमाण खूपच कमी आहे. आपण कुठल्याही ‘नृपा’ (अनिवासी भारतीयांच्या पालकांची संघटना)च्या कार्यक्रमाला जा किंवा त्यांची वेबसाइट पाहा, तुम्हाला त्या ठिकाणी चालणा-या चर्चा वा कार्यक्रमांतून उच्चभ्रू अस्मितेचा अभिमान ठळकपणे जाणवेल. सगळयात खेदाची गोष्ट म्हणजे स्वदेश अत्यंत कठीण काळातून चालला आहे. देशाची आर्थिक स्थिती धोक्यात आहे, असे म्हणून गळा काढणारा हाच मध्यमवर्ग हुकुमशाही वृत्तीचे नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघीय विचारसरणीची भलामण करताना दिसतो. त्याच वेळी त्याला परदेशाची सेवा करणा-या आणि ‘डॉलर्स’ पाठवणा-या पोराचा वा पोरीचा अभिमानही वाटतो.. हे सगळंच आमच्या देशातील सुशिक्षितांच्या ‘दुभंगलेल्या मन:स्थितीचे’ निदर्शक आहे. या देशात राहून त्याला जुन्या वैभवाप्रत नेण्यासाठी विचार करणा-यांनी मात्र त्यांच्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही. या एन.आर.आय. मंडळींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी त्यांचे इंग्लंड-अमेरिकेसारखे ‘मालक’ देश आणि तेथील उद्दाम गोरे समर्थ आहेत.. आपण मात्र या अफाट लोकसंख्येच्या देशाला अभंग ठेवण्यासाठी आणि अजिंक्य करण्यासाठी बेल-भंडारा हाती घेऊ या.

Categories:

Leave a Reply