गणपती, म्हणजे गणांचा, लोकांचा नेता. हा लोकनायक ‘सकळविद्यांचा अधिपती’ आहे. ज्ञानी असला, पराक्रमी असला तरी विनम्र आहे. तो लोकांना तापदायक ठरणा-या असुरांचा नायनाट करतो, म्हणून त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात. त्याचे दर्शन, मार्गदर्शन सगळ्या लोकांना सुखदायी असायचे म्हणून तो सुखकर्ता आणि मंगलमूर्ती म्हणून ओळखला जातो. मनासारख्या चंचल असणा-या उंदराला त्याने आपले वाहन केल्यामुळे तो ‘मूषकवाहन’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या अवाढव्य शरीरामुळे त्याला ‘तुंदिलतनू’ म्हणतात, पण तसे असूनही तो छान नर्तन करू शकतो, हे त्याचे वैशिष्टय. त्याला गोड आवडते. मोद म्हणजे आनंद, आनंददायी मोदक तर गणपतीची ओळख बनली आहे, त्यामुळे जेव्हा घरोघरी गणपती येतात तेव्हा मोदकाच्या प्रतीकातून आनंदही घराघरात पसरतो. गजमुख, गणेश हा बुद्धिमत्ता, विद्या आणि समंजसपणाचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यात अफाट सामर्थ्य आहे, पण तो त्याचा फक्त लोकरक्षणासाठी वापर करतो, त्याच्याकडे बुद्धी आहे, पण ती त्याने व्यासांकडे ‘महाभारत’ लिहिण्यासाठी वापरली. असा हा अवघ्या मराठी मनांना मोहवणारा लेखक गणेश विलक्षण हुशार आहे, म्हणून रिद्धी-सिद्धी त्याच्या शेजारी उभ्या असतात. आजवर बौद्धिक क्षेत्रात देशाला मार्गदर्शन करणा-या मराठी लोकांनी गणपतीचा हा गुण ओळखला होता, पण आता मात्र कुणालाच विद्येची आराधना करण्यास, विज्ञानाची साधना करण्यास वेळ नाही. सर्वाना हवाय रिद्धी-सिद्धींच्या माध्यमातून मिळणारा सुखोपभोग.. तसे शक्य नाही. देवासमोर रांगा लावून यश आणि सुख मिळायला, देवकृपा म्हणजे रेशनिंगचे धान्य आहे का?
नाही म्हणायला गणेशभक्तीची परंपरा महाराष्ट्रात खूप वर्षापासून सुरू आहे. इतिहासकार वि. का. राजवाडे यांच्या मते, गणेशपूजा अडीच हजार वर्षापासून प्रचलित असावी. आपले हे मत मांडण्यासाठी राजवाडे नारायण उपनिषदातील ‘गणेश गायत्री’चा आधार घेतात; पण त्यांच्या या कालनिश्चितीला वैज्ञानिक पुरावा नाही, पण सुप्रसिद्ध इतिहासकार डॉ. भांडारकर आपल्या ‘‘वैष्णवाइज्म अँड शैवाइज्म’’ या ग्रंथात म्हणतात की, विनायकाची उपासना इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती; परंतु अंबिकापुत्र विनायक गणपतीचा समावेश वैदिक धर्मातील उपास्य देवतांच्या समूहात झाला तो ब-याच नंतरच्या काळात.’’ आपल्या या म्हणण्याला वस्तुस्थितीचा आधार देताना डॉ. भांडारकर सांगतात की, गुप्तकालीन एकाही कोरीव लेण्यात गणपतीचा उल्लेख नाही; पण वेरूळच्या लेण्यात सप्तमातृकांच्या सोबत गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. यावरून इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंतच्या दरम्यान गणपतीची उपासना प्रचलित झाली असावी, असा निष्कर्ष डॉ. भांडारकर यांनी काढला होता. महाराष्ट्रात गणेशपूजा देवगिरीच्या यादवांच्या राज्यात जास्त वाढली. त्या काळात बहुतेक मोठया नगरांमध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गणपतीचे मंदिर बांधण्याची प्रथा होती. म्हणूनच असेल कदाचित राजमान्य आणि लोकमान्य बनलेला हा देव तत्कालीन ग्रंथांमध्ये, काव्यांमध्ये आवर्जून पाहायला मिळतो. यादवकाळातील, विशेषत: राजा रामदेव रायाच्या काळातील दोन महत्त्वाचे मराठी ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आणि कवी नरेंद्र यांचे ‘रुक्मिणी स्वयंवर.’ कोटयवधी मराठी मनांमध्ये आजही मानाचे स्थान असणा-या या दोन्ही ग्रंथांची सुरुवात गणेश स्तवनाने झालेली दिसते. ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाला जगाचे आदिकारण ठरवून ‘ॐ नमोजी आद्या’ म्हटले आहे. याची बहुतांश मराठी लोकांना कल्पना आहे. ज्ञानेश्वरांनी गणपतीला वाङ्मयरूप देताना वापरलेल्या कल्पना आणि प्रतिमांमागील अर्थ ठाऊक नसला तरी लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजाने चित्तात ठसलेल्या ज्ञानोबांच्या त्या शब्दांचा आपल्याला परिचय आहे; पण महानुभाव हा पंचकृष्णांव्यतिरिक्त अन्य देव न मानणा-या पंथात प्रवेश करण्यापूर्वी कवी नरेंद्राने केलेली गणेशस्तुतीही मनोवेधक आहे. ‘रुक्मिणी स्वयंवरा’च्या आरंभी त्यांनी एका ओवीत म्हटले आहे,
गणेशे मनोरथमुद्रा दीधली।
विता पढिक सेश भरिली।
तव पुढा सारदा देखिली।
सारस्वत फळेसी॥
विता पढिक सेश भरिली।
तव पुढा सारदा देखिली।
सारस्वत फळेसी॥
गणेशाला ‘विद्यांचे नंदनवन’ म्हणणारा नरेंद्र गणेशाकडून ‘मनोरथमुद्रा’ म्हणजे कविता करण्याची शक्ती मागतो, ज्ञानेश्वर ज्याच्यात ‘शब्दब्रह्म पाहतात तो ‘वाङ्मय गणेश आजच्या काळात विस्मृतीत गेलेला दिसतो.
अथर्वशीर्षात गणेशाचे वर्णन ‘त्वं वाङ्मय त्वंचिन्मय:’, ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि’ असे येते. गणपतीला मानणा-या गाणपत्य संप्रदायात ज्या ग्रंथाला सर्वात जास्त मानले जाते त्या मुद्गल पुराणात तर तो वेगळ्याच रूपात भेटतो. या पुराणात जे रूपकात्मक वर्णन आहे, त्यात क्रोधासुर, लोभासुर, कामासुर, मदासुर आणि मत्सरासुर यांचा गणेशाने कसा नाश केला, याच्या कथा सांगितलेल्या आहेत. येथे वाङ्मयमूर्ती असणारा गणपती पूर्णपणे आध्यात्मिक स्थितीत गेलेला दिसतो. आम्हाला गणेशपूजा करताना त्याच्या या गुणांचा आणि कार्याचाही विसर पडलेला दिसतो.
आज गणेशोत्सव मग तो सार्वजनिक असो वा घरगुती ज्या पद्धतीने साजरा होतो, त्याचा अवघ्या मराठीजनांनी कधी तरी विचार करण्याची वेळ आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आपण गेलात तर वर-वर दिसायला धार्मिक वाटणारा हा उत्सव ‘देखाव्यांपुरता’ मर्यादित झाल्याचे पाहायला मिळेल. ही गणपतीभोवती केलेली दिखावटी सजावट कुणाचे राजकीय स्थान, कुणाचे धार्मिक मान वा एखाद्याची सामाजिक शान दाखविणारी असते. त्या सबंध उत्सव परिसरात सामाजिक कर्तव्याचे भान असणारे कार्यकर्ते विरळाच आढळतात आणि म्हणूनच गणपती, जो सकल कलांचा अधिपती आहे, बुद्धिदाता आहे, त्याची त्याला न आवडणा-या पद्धतीने उपासना होते आणि उत्सवाचा मूळ हेतू बाजूला पडतो.
स्वातंत्र्यपूर्व काळातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप खरोखरच राष्ट्रीय विचारांना चालना देणारे होते. त्या काळात गणपतीच्या ११ दिवसांत मेळे साजरे होत. त्या मेळ्यांमध्ये आपण काय सादर करणार, याची वर्षभर तयारी चाले, जणू काय मेळे म्हणजे राष्ट्रीय आकांक्षा जपणा-या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा हुंकार बनले होते, कुणी गाणे सादर करून, नव्या नाटकाची रचना करून तर कुणी एकपात्री प्रयोगाद्वारे आपल्या भावना व्यक्त करीत, त्याच सुमारास राष्ट्रीय भावनेने जागृत झालेले विद्वान, नेते आणि सामाजिक कार्यकर्ते लोकांना स्वातंत्र्य चळवळीसाठी मार्गदर्शन करायचे, त्यांच्या भाषणांनी, व्याख्यानांनी लोकांच्या मनातील स्फुल्लिंग पेटत असे. त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंत गणेशोत्सवाचे हे सांस्कृतिक वैभव टिकून होते. या सार्वजनिक व्यासपीठाने शेकडो कलाकारांना, गायकांना, वादकांना त्यांच्या आयुष्यातील सादरीकरणाची पहिली संधी दिली असल्याने अनेक नामवंत कलावंतांचे गणेशोत्सवाशी भावनिक नाते होते; पण ऐंशीच्या दशकात आलेल्या व्हीडिओ-रंगीत टीव्हीच्या जोडीने आणि मोठया पडद्यावरील चित्रपटांनी सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवात वेगळया प्रकारच्या ‘जागरणा’ची प्रथा निर्माण केली. आम्ही एका रात्रीत किती जास्त सिनेमे पाहिले, हे दुस-या दिवशी तारवटलेल्या डोळयांनी सांगण्यात नव्या पिढीला अभिमान वाटू लागला आणि तेव्हापासून खरे तर गणेशोत्सव, घरातला किंवा चौकातला फक्त मनोरंजनाचा मजा मारण्याचा पर्वकाळ ठरू लागला. या स्थितीचा फायदा घेण्यासाठी सगळयात आघाडीवर होते राजकीयदृष्टया सजग लोक. गणपती म्हणजे मज्जा, हे समीकरण रूढ झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सवात तरुणांची गर्दी वाढू लागली. हे तरुण आपल्याबरोबर असतील तर राजकीय शिडीच्या पाय-या चढणे सोपे जाईल, हे ओळखून नवे नेते पुढे आले. त्यांनी गणेशोत्सवाची सूत्रे हाती घेता-घेता स्थानिक अर्थकारण आणि राजकारण ताब्यात घेतले. त्यामधून गणपतीला पैसा आणि गणपतीच्या पैशातून मंडळाची कमाई असे ‘मौलिक’ समीकरण तयार झाले. आजही ते तसेच आहे. त्यामुळे गणपतीच्या दारावर कधी गुटख्याचे तोरण, तर कधी दारूच्या बाटल्यांची आरास असते. त्याच परिसरातील चाळक-यांना छळणा-या बिल्डरची जाहिरात गणेशसाक्षीने झळकत असते. गणपतीसमोर सकाळ-संध्याकाळी गणेशदर्शनाला भलेही हजारो लोक रांगा लावत असतील, देव नवसाला पावेल या आशेने तिष्ठत बसत असतील; पण त्याचा ‘उत्सव’ करणा-या मंडळांना तो चांगली बुद्धी का देत नाही, याचा विचार कुणी करताना दिसत नाही. कदाचित आम्ही गणपती हा ज्ञान देणारा, विज्ञान सांगणारा देव आहे, हेच विसरलो आहोत आणि म्हणूनच आज महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि बौद्धिक पिछेहाट होताना दिसत आहे.
तुम्ही जगातील कोणताही धर्म घ्या आणि त्यांच्या दैवतविषयक संकल्पना पाहा, त्या सगळयात आपल्याला त्या-त्या समाजाच्या प्रगतीचे प्रतिबिंब दिसते. अर्थात त्यात समाजाची अधोगतीही तेवढयाच ठळकपणे उमटत असते; परंतु ती मान्य करण्यासाठी धाडस लागते. ते धाडस मराठी समाजमनाने फार क्वचितच दाखवले आहे आणि म्हणूनच जेव्हा प्रख्यात बौद्धतत्त्वज्ञ, भाषातज्ज्ञ आणि महात्मा गांधींचे ज्येष्ठ सहकारी धर्मानंद कोसंबी यांच्या अफाट बुद्धीच्या मुलाने दामोदर कोसंबी यांनी आपल्या धर्मकल्पनांची वेगळया पद्धतीने चिकित्सा केली, तेव्हा मराठी विचारवंतांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हार्वर्ड विद्यापीठात ज्यांच्या बुद्धिमत्तेची तारीफ होत होती, गणितासोबत पुरातत्त्वशास्त्र, खादीचा प्रचार, भाषा अभ्यास अशा वेगवेगळया क्षेत्रांत ज्यांनी अफाट आणि अचाट कार्य केले त्या दामोदर कोसंबींची कर्मठ, रूढीवादी मंडळींनी सतत उपेक्षाच केली. त्यामुळेच असेल कदाचित आमच्या समाजात कडवट हिंदुत्वाचे स्तोम माजले. धर्माचा मनाजोगा अर्थ लावून लोक ‘धार्मिक’ बनू लागले.
आज या तथाकथित धार्मिकतेनेच आमच्या मानसिकतेला दुबळे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेबांनी पुणे शहर वसविताना कसबा पेठेत गणपतीची स्थापना केली होती; पण महाराजांनी वा त्यांच्या मावळयांनी कधी गणपतीच्या भक्तीचे जाहीर प्रदर्शन केल्याचा इतिहासात उल्लेख नाही. आज मुंबईतील सिद्धिविनायक असो वा टिटवाळयाचा गणपती सगळीकडे मंगळवार असो वा रविवार, चतुर्थी असो आणखी कोणते निमित्त.. भाविकांची ही गर्दी जमते.. हजारो भक्तांसोबत मग शेकडो भिकारी, फुलवाले, वडा-पाव विकणारे, पाकीटमारी करणारे, अगदी नाना प्रकारचे लोक देवळाभोवती जमतात. सार्वजनिक गणेशोत्सवातही असेच चित्र पाहायला मिळते. गल्लोगल्लीतील ‘नवसाला पावणारे’ राजे म्हणून जेव्हा गणपतीच्या अतिविशाल मूर्ती उभ्या करण्याची स्पर्धा लागते, तेव्हा तर हसावे की रडावे, असा प्रश्न पडतो. गणपतीचा उत्सव हा सगळया पर्यावरणाला आणि परिसराला आनंद देणारा असला पाहिजे; पण आम्ही नद्या-नाले, समुद्र-खाडया प्रदूषित करणा-या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अतिविशाल मूर्तीचा आग्रह धरतो. गणपतीला मोठे कान आहेत, म्हणून तुम्ही ठणाणा आवाजात लाउड स्पीकर आणि डीजे लावता. या ध्वनिप्रदुषणाने आपल्या परिसरातील वृद्धांना, विद्यार्थ्यांना, रुग्णांना किती त्रास होतो, याचा कुणीही विचार करत नाही. हा सगळा गोंधळ, गोंगाट कमी म्हणून की काय, नाशिक बाजा नामक ध्वनिप्रदूषणाचा उच्चांक गाठणारा बँडबाजाही आणला जातो आणि हे सगळे केले जाते, सर्वसामान्य गणेशभक्तांच्या किंवा काही हितसंबंधी लोकांच्या पैशातून.
गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे, मग त्याच्यासमोर पडणा-या पैशातून, त्याच्या नावावर गोळा होणा-या वर्गणीतून विद्येची साधना करणा-यांना का मदत होत नाही? सार्वजनिक गणेशोत्सवात सगळयात प्रसिद्ध असलेले मंडळ म्हणजे लालबागचा राजा. या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील भक्तांची झुंबड उडत असते. सोन्याचे भाव कितीही वाढो; पण येथे येणारे गणेशभक्त बाप्पाला सोन्याच्याच वस्तू वाहतात. २०१० मध्ये लालबागच्या राजाला साडेसहा किलो सोने अर्पण करण्यात आले होते, २०११ मध्ये ते सात किलो झाले. म्हणजे दरवर्षी देवाला वाहण्यात येणा-या सोन्यात वाढ होत आहे. २०१० साली १३ कोटींच्या आसपास असणा-या देणग्या गतवर्षी २० कोटींच्या आसपास पोहोचलेल्या दिसल्या. गतवर्षी तर एका भक्ताने गणपतीला चक्क सोन्याचा फुटबॉल दिला होता, अगदी भलामोठा. त्याशिवाय सोन्या-चांदीच्या वस्तूंचा ढीग असतो. मुंबई-पुण्यातील अशा शेकडो मंडळांकडे भक्तांच्या हातून कोटयवधी रुपये जमा होतात, ते कुठे जातात? हुशार मंडळवाले चार-दोन ग्रंथालय, अभ्यासिका काढल्याचे दाखवतात. पाच-पन्नास विद्यार्थ्यांना फुटकळ शिष्यवृत्त्या देऊन चांगली प्रसिद्धी मिळवतात; पण या गणपतीच्या गणसेवकांकडून ख-या विद्यार्थ्यांना आधार देण्याचे जे काम व्हायला पाहिजे ते अजिबात होताना दिसत नाही. सध्या महाराष्ट्रातील सर्वच छोटया-मोठया शहरांत शिक्षण घेणे, हा सर्वसामान्य लोकांसाठी कठीण विषय बनत चालला आहे. त्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना भलेही सहामाही किंवा वार्षिक परीक्षेचा सामना करावा लागत असेल; परंतु वाढत्या महागाईने नाडलेल्या गोरगरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना दर महिन्याच्या अखेरच्या काळात ‘परीक्षे’ला सामोरे जावे लागते. ही परीक्षा असते खर्चाचा मेळ बसविण्याची आणि म्हणूनच कठीण.. मुंबई-महाराष्ट्रातील २५ गणेशोत्सव मंडळे एकत्र आली तर अशा गरीब घरातील किमान पाच हजार विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करू शकतील. तेवढयाच संख्येच्या मुलांना पदव्युत्तर शिक्षणासाठी मदतीचा हात देऊ शकतील. फक्त त्यासाठी तसा विचार केला पाहिजे. होय, दरवर्षी कोटयवधी रुपयांच्या दानाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करणा-या शिर्डी वा सिद्धिविनायकसारख्या असंख्य श्रीमंत देवस्थांनांनीही आपल्या परिसरातील गोरगरिबांचे जगणे सुलभ करण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आपल्या ‘पुराणकथा आणि वास्तवता’ या जगभर गाजलेल्या ग्रंथात प्रा. दामोदर कोसंबी म्हणतात, ‘मानवी व्यक्तिमत्त्वाची अधिभौतिक पातळीवर पूर्णता, ही जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या भौतिक गरजा भागवल्या जातील, तेव्हा पुष्कळच सुलभ होईल. त्याचा अर्थ असा की, सर्व आपत्तींचे मुख्य कारण सामाजिक आहे. सामाजिक दु:खाची मूलभूत कारणे मानवी दृष्टीपासून आता लपलेली नाहीत. त्यावरचे उपाय धर्मशास्त्रात सापडणारे नसून ते समाजवादात सापडतील; योजनाबद्ध प्रयोगांपासून मिळणा-या तार्किक अनुमानांवर आधारलेल्या प्रगत विज्ञानाचा सामाजिक सुधारणेत वापर करण्यानेच ते मिळतील..
आधुनिक ज्ञान-विज्ञान जर आजकालच्या मानवी जीवनाला समृद्ध करणारे आहे, तर मग आम्ही ज्या गणेशाला ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि’ म्हणतो, त्याची त्याला आवडेल अशा ज्ञानमार्गाने, वैज्ञानिक साधनेने आराधना का करीत नाही? दु:ख, दारिद्रय़ आणि अनारोग्याने गांजलेला आणि सुख-समृद्धी गमावलेला आपला देश ‘सुखकर्ता’ होण्यासाठी तोच एकमेव मार्ग आहे.
Categories:
आवर्तन