भारत स्वतंत्र झाला त्या वेळी आनंदित झालेल्या करोडो भारतीयांचा आत्मस्वर बनून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘हा नियतीशी करार आहे’, असे उद्गार काढले होते. भारताला प्रगतिपथावर नेण्याचा तो निर्धार आजही कायम असला, तरी त्यामागील सर्वागीण प्रगतीचा उद्देश फसला आहे. त्यामुळे आमचे नेते भलेही भारताला अमेरिका, मुंबईला शांघाय किंवा सिंगापूर वा अन्य काही करायचे म्हणत असतील; पण आम्ही तसे काही होण्याआधी जगात महिलांवरील अत्याचारासाठी प्रसिद्ध असलेल्या पापुआ न्यू गिनी या देशासारखेच ‘महिलांच्या वास्तव्यासाठी धोकादायक स्थान’ बनत चाललो आहोत..
‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ या म्हणीची वारंवार आठवण यावी, अशी मारामारी सध्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सुरू आहे. भाजपमधील लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांसह किमान अर्धा डझन नेते पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, तर दुसरीकडे ‘डॅशिंग’ नरेंद्र मोदी आपणच पंतप्रधानपदासाठी कसे योग्य आहोत, याचा प्रचारही करायला लागलेले दिसतात. बड्या उद्योगसमूहांचे सर्वेसर्वा, विविध औद्योगिक संघटना आणि प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने ‘नमो’ अर्थात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदासाठी अक्षरश: रान उठवले आहे. गुजरातेत सलग तीन वेळा सत्तासंपादन करणा-या नरेंद्रभाईंनी अगदी अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवार जशी पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी करतात, तशीच ‘फिल्डिंग’ लावली आहे. २००२च्या गुजरातमधील जातीय दंगलींचे भूत पुन्हा मानगुटीवर बसू नये यासाठी सर्वधर्मसमभाव किंवा दलित-आदिवासींचे मूलभूत प्रश्न यासंदर्भात अवाक्षर न काढता मोदींनी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात नवनव्या भूलथापांचे भ्रमजाल निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. ‘खोटे बोला, पण रेटून बोला’ या भाजपच्या मूळ नीतीला धरून मोदी वारंवार चुकीचे संदर्भ आणि फसवे दावे कसे सादर करतात, यावर ज्येष्ठ संपादक किंग शुक नाग यांनी लिहिलेल्या ‘द नमो स्टोरी : अ पोलिटिकल लाइफ’ या पुस्तकात चांगलाच प्रकाशझोत टाकलेला आहे, परंतु तरीही मोदी आपली खोटे बोलण्याची सवय सोडायला तयार नाहीत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर त्यांच्या या सवयीवर जाहीर टीका केली. शिवाय मोदी यांना ‘पंतप्रधानपदाचे उमेदवार’ ठरवले तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची धमकीही दिलेली आहे. शिवसेनेनेही आता कधी नव्हे ते तोंड उघडले आहे आणि मोदीविरोधाची पुडी सोडून दिली आहे. थोडक्यात सांगायचे तर पक्षातून, पक्षाबाहेरून सगळीकडून विरोध होत असताना नरेंद्र मोदी आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करताहेत. पण पुढील वर्षात त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपच्याच गोटातून ‘मोदींना मोडीत काढण्याची’ तयारी सुरू आहे.. त्यांचा निकाल लवकरच लागेल!
‘विद्येविना मति गेली’ असे सांगत ‘वित्ताविना शुद्र खचले’ आणि हे ‘इतके अनर्थ एका अविद्येने केले’ अशी जाणीव-जागृती करणा-या महात्मा फुले यांना गुरू मानून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक-आर्थिक आणि राजकीय दास्यात अडकलेल्या अज्ञानी दलितांना ‘ज्ञानमार्गी’ केले होते. म्हणून भारतात सामाजिक स्थित्यंतराच्या चक्राला गती लाभली. महात्मा गांधी यांनी याच विषयासंदर्भात खूप समर्पक विवेचन केले होते. महात्माजी म्हणतात, ‘‘माणसे शिकू शकत नाहीत, कारण ती दरिद्री आहेत. आणि माणसे संपत्तीवान बनू शकत नाहीत, कारण ती शिकलेली नाहीत, असे एक चक्र आहे. या चक्रात एखाद्याने गरीब असणे, दरिद्री असणे, हा तुम्ही त्याचा गुन्हा ठरवता आहात. ज्या समाजात सधन असणे ही सार्वत्रिक परिस्थिती नाही, तो सामान्य नियम नाही. त्या समाजात गरीब असणे हा गुन्हा ठरू नये.’’ महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू आदी सगळ्याच महान नेत्यांनी, विचारवंतांनी या देशातील गोरगरिबांना प्रगतिपथावर नेण्याची, विकासाची समान संधी देण्याची स्वप्ने पाहिली; परंतु हल्लीच्या काळात उपमुख्यमंत्रीपद भूषविणारे अजित पवारांसारखे राजकारणी जेव्हा गरिबांच्या दारिद्रय, दु:ख, वेदनांची अत्यंत अर्वाच्य भाषेत टिंगल करतात आणि विरोधासाठी विरोध करणारे शिवसेना आणि मनसेचे नेते-कार्यकर्तेही अत्यंत खालच्या पातळीवर जातात, तेव्हा आमच्या सामाजिक न्यायाची आशा दाखवणा-या लोकशाही राज्यव्यवस्थेचे विकृत स्वरूप लक्षात येते आणि मनात प्रश्न थैमान घालू लागतो.. या कोटयवधी भारतीयांच्या दारिद्रय़ाचे करावे तरी काय?
आपल्या देशात टोकाचे दारिद्रय आणि ‘अँटिलिया’च्या उंचीची श्रीमंती आहे. त्यामुळे जगातील पहिल्या दहा धनाढयांमध्ये जशी भारतीय नावे आहेत, तद्वत विश्वातील सर्वात जास्त दरिद्री – भुकेकंगाल आपल्याच देशात आढळतात. हा विरोधाभास सर्वच क्षेत्रांत ठळकपणे प्रकट करण्याची जणू स्पर्धाच लागलीय. सिनेमा आणि दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांवर जसे चकचकीत – चमचमीत कार्यक्रम पाहण्यास मिळतात, तद्वत क्रिकेटसारख्या खेळाला झटपट मनोरंजनाचे माध्यम बनविण्यात आले आहे. लोकांच्या दैनंदिन गरजा पुरवण्यापेक्षा त्यांचे मनोरंजन करण्याला सगळीच माध्यमे प्राधान्य देऊ लागली आहेत. त्यामुळे आज ‘इंडियन प्रीमियर लीग’चा जो मनोरंजनाचा ‘शो’ सुरू झालाय, तो दिसायला आकर्षक असला तरी ‘घुणाक्षर-न्याय’ आहे.. संस्कृत साहित्यात हा ‘घुणाक्षर-न्याय’ प्रसिद्ध आहे. ‘घुणाक्षर’ या शब्दांत ‘घुण’ आणि ‘अक्षर’ हे दोन शब्द आहेत. ‘घुं’ आवाज करणारा भुंग्यासारखा एक प्रकारचा किडा असतो, जो लाकूड पोखरतो. पोखरता पोखरता छिद्राला असा काही आकार मिळतो की, ते एखादे अक्षरच वाटावे. त्या किडयाने अक्षर गिरवण्यासाठी काही लाकूड पोखरलेले नसते; परंतु अनायासे त्यातून अक्षर निर्माण झालेले असते. म्हणूनच अचानक किंवा अकल्पित काही ‘कलात्मक’ घडले, तर ते घुणाक्षर-न्यायाने घडले असे म्हणतात.. पैसे कमावण्यासाठी निर्माण झालेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या टी-२० सामन्यांच्या झगमगाटाने आज जगाचे डोळे दीपले आहेत; परंतु कृषिमंत्री शरद पवार यांच्यासारख्या मान्यवरांनी या ‘आयपीएल’एवढेच ‘बीपीएल’ म्हणजे दारिद्रयरेषेखालील लोकांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे; परंतु तसे न होता, ‘आयपीएल’ जनतेच्याच पैशावर डल्ला मारताना दिसते. हे सगळे आता थांबवलेच पाहिजे.