भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या दलितमुक्तीच्या प्रयोगांनी शतकानुशतके दु:ख-दारिद्रयाच्या खाईत पडलेला मागासवर्गीय समाज माणसात आला. समाज परिवर्तनाच्या या लढाईमुळे भारतातील उपेक्षित वर्गाला आत्मभान मिळाले, हे अवघे जग जाणते. त्यामुळेच असेल कदाचित डॉ. आंबेडकरांना त्यांच्या हयातीतच देवदुर्लभ लोकप्रियता लाभली. ती आजही कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्या आंबेडकरी चळवळीशी संबंधित विचारवंताने केवळ मार्क्सवादी क्रांतीचे समर्थन करण्यासाठी ‘डॉ. आंबेडकर यांच्या दलितमुक्तीच्या प्रयत्नांना अपयश आले,’ असे म्हणणे धक्कादायक आहे.
गेल्या पंधरवडयात ‘कॉ. अरविंद स्मृती न्यास’ या कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित संघटनेने आयोजित केलेल्या ‘जातिप्रश्न व मार्क्सवाद’ या विषयावरील परिसंवादात तेलतुंबडे यांनी तोडलेले तारे पाहून माओवादी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे दर्शन घडते. माओच्या रक्तरंजित क्रांतीचे समर्थन करीत नक्षलवाद्यांनी आजवर देशाच्या दुर्गम-आदिवासी भागात मृत्यूचे थैमान घातले होते. परंतु २१ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओवादी कम्युनिस्ट पार्टी’च्या नव्याने झालेल्या स्थापनेनंतर त्यांना देशातील ग्रामीण-शहरी भागात घुसण्याचे वेध लागलेले दिसतात. त्यांच्या पक्षाच्या मसुद्यातच ज्यात पक्षाचे ध्येय निश्चित केलेले दिसते, त्या २१ क्रमांकाच्या मुद्दय़ात ‘संधिसाधू दलित नेत्यांना उघडे पाडून त्यांचे सत्तेचे राजकारण हाणून पाडणे’ हा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे. थोडक्यात सांगायचे तर, दलित चळवळीतील राजकीय नेतृत्वाचा अभाव लक्षात घेऊन माओवाद्यांनी घुसखोरी करण्याचे ठरवलेले दिसतेय. तेलतुंबडे यांची स्फोटक विधाने हा त्याचाच एक प्रयत्न आहे. तो वेळीच रोखला पाहिजे, अन्यथा भावी पिढया आपल्याला माफ करणार नाहीत.खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या अर्थपूर्ण अभिसरणाने १९९१पासून भारतीय अर्थकारणाला वेगळे वळण दिले आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात रखडलेली आर्थिक प्रगती नव्वदच्या दशकात ख-या अर्थाने गतिमान झालेली दिसली आणि एकविसाव्या शतकाच्या चाहुलीने तर या नव्याने अर्थभान आलेल्या भारतीय मध्यमवर्गाला जागतिक अर्थसत्ता होण्याची स्वप्ने पडू लागली. आजही या ‘काल्पनिक नंदनवनात’ वावरणारे अनेक तथाकथित अर्थतज्ज्ञ, विचारवंत आणि उजवे नेते आपली भाषणे, लिखाणातून ‘भारत लवकरच क्रमांक एकची अर्थसत्ता होणार’ असे बरळत असतात. शहरात, शहरी माध्यमांमध्ये या गोष्टी घडत असताना भारताच्या ग्रामीण भागात, डोंगरी आदिवासी क्षेत्रांत काय सुरू आहे, याची कुणालाच पर्वा नाही. खासगीकरण आणि जागतिकीकरणाने भारतीय अर्थव्यवस्थेला चांगला वेग दिला. परिणामी आमच्या उद्योगधंद्यांनी दुर्गम-आदिवासी भागातील खाण-कोळसा-विद्युत आणि तत्सम प्रकल्पांवर ‘ताबा’ मिळवला. डोंगरद-यांमध्ये शतकानुशतके ढकलल्या गेलेल्या या आदिवासी बांधवांचे ‘जल-जंगल आणि जमीन’ या तीन गोष्टींवरच जगणे आधारित होते, परंतु नव्याने आलेल्या शेकडो प्रकल्पांनी आदिवासींच्या जगण्याचा हा आधारच आपल्या ताब्यात घेतल्याने ते निराधार झाले, अशा निराधार दुर्बल आणि हतबल आदिवासींपर्यंत पोहोचण्यात शासकीय नोकरशहांना रस नव्हता, कारण या दुर्लक्षित समाजघटकाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे आजही आमची नोकरशाही मानत नाही. त्यामुळे साहजिकच हा दुखावलेला आणि दुरावलेला आदिवासी तरुण माओवादी - नक्षलवाद्यांच्या हातात आयता सापडला. या आदिवासी तरुणांना ‘क्रांती’च्या नावाने भडकवून माओवाद्यांनी आज देशात जे मृत्यूचे थैमान घातले आहे, ते हादरवून सोडणारे आहे. देशातील एकूण ६६० जिल्ह्यांपैकी दोनशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये माओवादी सक्रिय आहेत. नेपाळपासून बस्तपर्यंत पसरलेला ‘दंडकारण्य’ म्हणून नक्षलवादी वाङ्मयात उल्लेखला जाणारा हा सगळा जंगली भाग आज ‘रेड कॉरिडॉर’ म्हणजे ‘नक्षलग्रस्त’ म्हणून ओळखला जातो. अगदी सरकार दरबारीही त्याची तशीच नोंद आहे, तर आजवर वनविभागात हिंसाचाराचा नंगानाच घालणारे माओवादी आता ग्रामीण आणि शहरी भागात घुसताहेत. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अरण्यक्षेत्रात आदिवासी तरुणांना भडकवून किंवा धमकावून आपल्या ‘वर्गलढय़ात’ सामील करून घेणा-या माओवाद्यांची नजर आता दलित-बहुजनवर्गातील तरुणांकडे वळली आहे. मुख्य म्हणजे आदिवासी क्षेत्रात आपला पाया घट्ट रोवत असताना गेल्या वर्षभरात माओवाद्यांना खूप मोठा फटका बसला आहे. त्यांचे डझनभर वरिष्ठ नेते आणि सुमारे दोनशे दहशतवादी पोलिसांच्या कारवाईत ठार झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात माओवादी चळवळ पुन्हा तीव्र करण्यासाठी दलित-मुस्लीम आणि बहुजनवर्गातील तरुणांना आकर्षित करण्याचे शिस्तबद्ध प्रयत्न सुरू झाले आहेत. दलित चळवळीतील उमदे विचारवंत म्हणून ओळखल्या जाणा-या आनंद तेलतुंबडे यांचे गेल्या पंधरवडयात झालेले भाषण हा या माओवादी प्रयत्नांचा एक भाग आहे, असे आमचे मत आहे.
लखनौस्थित ‘कॉ. अरविंद स्मृती न्यास’ या कम्युनिस्ट विचारमंचातर्फे १४ मार्च रोजी चंदीगढ येथे ‘जातिप्रश्न व मार्क्सवाद’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. त्या वेळी तेलतुंबडे यांनी जे विचार मांडले, तेच जर अन्य दलितेतर विचारवंताने मांडले असते, तर देशात गहजब उडाला असता. मध्यंतरी समाजशास्त्रज्ञ डॉ. आशीष नंदी यांनी मागासवर्गीय सरकारी नोकरांमध्ये वाढत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल एक टिप्पणी केली होती. त्यावरून देशातील समस्त मागासवर्गीय संघटनांनी किती तीव्र प्रतिक्रिया दिली होती, हे आपण सारे जाणतो. प्रकरण अगदी डॉ. नंदी यांना अटक करा, अशा मागणीपर्यंत वातावरण तापवण्यात आले. अखेर नंदी यांनी बिनशर्त माफी मागून स्वत:ची या वादातून सुटका करून घेतली. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तेलतुंबडे यांनी केलेली टीका समस्त दलित संघटनांना पटली असावी, असे दिसतेय. कारण तेलतुंबडे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या दलितमुक्तीच्या प्रयोगाला ‘अपयशी प्रयत्न’ म्हणून संबोधले. देशभरातील दलितांनी मुक्तीसाठी क्रांतीचा मार्ग पत्करला पाहिजे, असे सांगताना तेलतुंबडे कम्युनिस्टांवरही घसरले. ते म्हणाले, ‘‘भारतातील डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने मार्क्सवाद रुजवला. त्यांनी जातीप्रथा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीच, शिवाय जातिव्यवस्थेविरुद्ध लढण्याची रणनीतीही विकसित केली नाही.’’
डॉ. आंबेडकर यांना मार्क्सवादाचा सखोल अभ्यास नव्हता. त्यांनी आखलेली आरक्षणाची नीतीसुद्धा चुकीची होती. ती सूत्रबद्ध पद्धतीने मांडण्यात आंबेडकर अपयशी ठरल्यामुळे आरक्षणनीतीचा फक्त दहा टक्के लोकांना फायदा झाला आहे, असे तेलतुंबडे म्हणाले.
‘‘भविष्यात दलितांना मुक्ती हवी असेल तर क्रांतीचा मार्ग योग्य आहे आणि दलितांच्या व्यापक सहभागाशिवाय या देशात क्रांती शक्य नाही. त्यामुळे व्यापक मुक्तीलढय़ासाठी दलित व कम्युनिस्टांनी एकत्र येणे गरजेचे आहे,’’ असे तेलतुंबडे यांनी आवर्जून सांगितले. देशभरातील दलितवर्गाला झोंबतील अशी विधाने केल्यानंतर तेलतुंबडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘‘आपण तसे बोललोच नाही’’, ‘‘आपला तसे बोलण्याचा उद्देशच नव्हता’’ असा पवित्रा घेतला, परंतु ‘अरविंद स्मृती न्यास’च्या पत्रकातील त्यांची विधाने त्यांच्या भूमिकेची साक्ष देतात. बाबासाहेबांच्या दलितमुक्तीच्या प्रयोगाला अपयशी ठरवत त्याची चिकित्सा करण्याचा तेलतुंबडे यांचा अधिकार आपण मान्य करू. तसेच ज्या मार्क्सवादाच्या जंजाळातून बाबासाहेबांनी दलितांना बाहेर काढले आणि बुद्धधम्माचा प्रकाशमय मार्ग दाखवला होता, त्या बाबासाहेबांनी नाकारलेल्या डाव्या विचारसरणीच्या बौद्धिक दावणीला तेलतुंबडे यांनी स्वत:ला जुंपणे, हेही आपण मान्य करू, परंतु त्यांनी समस्त दलितांनी कम्युनिस्टांच्या हातात हात घालून क्रांतीसाठी सिद्ध व्हावे, हे म्हणणे म्हणजे अवघी आंबेडकरी विचारधारा आणि चळवळीचा घोर अपमान आहे. तेलतुंबडे यांना भलेही भविष्यातील दलित-मार्क्सवादी युतीची स्वप्ने पडत असतील, पण देशातील खासकरून महाराष्ट्रातील दलितांच्या १९५२ च्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या कम्युनिस्टांची कूटनीती अजूनही लक्षात आहे. ‘घटनेचे शिल्पकार’ म्हणून देशभरात बाबासाहेबांचा गौरव होत असताना ५२च्या निवडणुकीत काँ. डांगेंसारख्या पुरोगामी कम्युनिस्ट नेत्याने आंबेडकरांना मिळू शकणारी ५० हजार मते हेतुत: कुजवली आणि त्यामुळे बाबासाहेबांना पराभूत व्हावे लागले होते, हे विसरण्याएवढा आंबेडकरी समाज दूधखुळा आहे, असे माओवाद्यांना वाटत असेल तर तो त्यांचा फार मोठा भ्रम आहे.
डॉ. आंबेडकर यांनी अन्य कोणतीही राजकीय वा धार्मिक विचारसरणी स्वीकारण्यापूर्वी त्या सगळ्यांचा सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे तेलतुंबडे यांच्यासारख्या ‘विचारी’ माणसाने ‘बाबासाहेबांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला नव्हता’, असे अविचारी वक्तव्य करणे आश्चर्यकारक वाटते. बाबासाहेब हे प्रकांडपंडित होते. जो विषय हाती घेत, त्याच्या मुळापर्यंत जाणे हा त्यांचा गुणधर्म सर्वश्रृत आहे. त्यामुळेच असेल कदाचित २० नोव्हेंबर १९५६ रोजी, म्हणजे महानिर्वाणाच्या पंधरा दिवस आधी काठमांडू येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या भाषणाची तेलतुंबडे यांना आठवण करून द्यावीशी वाटते. विविध आजारांनी थकलेले शरीर घेऊन डॉ. आंबेडकर खूप आग्रह झाल्यामुळे त्या परिषदेत गेले होते. जगभरातील मान्यवर बौद्ध भिख्खू आणि विचारवंत तेथे खास बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आले होते. त्या मान्यवर मंडळींच्या आग्रहाखातर बाबासाहेबांनी ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या विषयावर उत्स्फूर्तपणे विचार मांडले. ज्या काळात ‘शीतयुद्धा’मुळे जग दोन तुकडय़ांत विभागलेले होते. रशिया, चीन आदी कम्युनिस्ट देश भारतीय जनमानस प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्या काळात बाबासाहेबांनी, ‘‘बुद्धविचार हा मार्क्सच्या विचारांपेक्षा श्रेष्ठ आहे’’ असे छातीठोकपणे जगाला गर्जून सांगितले होते. ‘‘साम्यवादी विचारांपेक्षा बुद्धविचार श्रेष्ठ आहे, बुद्ध धम्माने सांगितलेली जीवनप्रणाली सरस आहे. बुद्धधम्म हाच एकमेव सर्वोत्तम जीवनमार्ग आहे.’’ असे सांगून ते पुढे म्हणाले होते, ‘‘शोषण आणि त्यामुळे उद्भवणारे दारिद्रय व दु:ख यांचे गौतम बुद्धाने सर्वात आधी प्रतिपादन केले होते. जगामध्ये दु:ख आहे, तसेच दु:ख निवारण्याचा मार्गही आहे, हे तथागत बुद्ध यांनी पहिल्याच प्रवचनात सांगितले होते. ‘धम्मचक्रपरिवर्तन सुत्त’ यामध्ये तसा उल्लेख आढळतो.’’ असे सांगून बाबासाहेब पुढे म्हणतात, ‘‘ज्या लोकांच्या मनावर कार्ल मार्क्सच्या विचारांचा पगडा आहे, त्यांना मला हेच सांगायचे आहे की, तुम्ही धम्मचक्रपरिवर्तनसुत्ताचा अभ्यास करा व बुद्धाने काय म्हटले आहे हे समजून घ्या. मला खात्री आहे की, त्यात तुम्हाला आदर्श मानवी जीवनप्रणालीचा मार्ग निश्चित सापडेल.’’
आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत साम्यवादी-मार्क्सवादी परंपरेची चिरफाड करताना बाबासाहेब म्हणतात, ‘‘साम्यवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्ल मार्क्स आणि अन्य साम्यवादी विचारवंत कोणता मार्ग दाखवतात? साम्यवाद प्रस्थापित करण्यासाठी साम्यवाद्यांचा मार्ग अत्यंत हिंसाचाराचा आहे. विरोध करणाऱ्याला ठार करून टाकणे हा साम्यवादी मार्ग आहे आणि हाच तर साम्यवाद आणि धम्ममार्ग यातील मूलभूत फरक आहे.’’
धम्मप्रसारासाठी लोकांना बुद्धविचार समजावून सांगणे, त्यांचे मनपरिवर्तन करणे तसेच नैतिक शिकवणीतून प्रेमपूर्वक लोकांची मने वळवणे हा बुद्धाचा मार्ग आहे. बुद्धाला आपल्या विरोधकांना बळजबरीने वा सत्तेच्या धाकाने जिंकायचे नाही, तर प्रेम व आपुलकीने आपलेसे करावयाचे आहे. धम्म तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यासाठी बुद्ध हिंसाचाराला मान्यता देत नाही. तर साम्यवाद्यांना रक्तपाताशिवाय चैन पडत नाही. येथेच बुद्धधम्म मार्क्सवादापेक्षा सरस ठरतो.’’
बाबासाहेब अगदी स्पष्ट शब्दांत म्हणाले होते, ‘‘बुद्धाने जगाला एक महान संदेश दिला आहे. मनुष्याची पर्यायाने जगाची मानसिकता बदलल्याशिवाय या जगाची उन्नती होऊ शकणार नाही.’’ ते पुढे म्हणतात, ‘‘आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, भीतीपोटी कोणतीच विचारप्रणाली मूळ धरू शकत नाही. समाजाची योग्य मानसिकता तयार केली नसेल तर सत्तेची नेहमीच गरज भासेल. याच कारणास्तव मला बुद्धाचे आकर्षण वाटते. बुद्धाची विचारसरणी ही खऱ्या अर्थाने लोकशाही मार्ग मानणारी विचारसरणी आहे. बुद्धाचे विचार आणि कार्ल मार्क्सचे विचार यांची जेव्हा मी तुलना करतो, तेव्हा मी असेच म्हणेन की, बुद्धाचाच मार्ग सर्वात योग्य व सुरक्षित आहे.’’
दादागिरी आणि हिंसेला उत्तेजन देणारा साम्यवाद आपल्या अनुयायांनी कदापि स्वीकारू नये, असे बाबासाहेबांना मनापासून वाटत होते. म्हणून अत्यंत पोटतिडिकेने ते आपल्या दलित बांधवांना म्हणतात, ‘‘साम्यवादाने तुम्ही भुलून जावू नका. बौद्ध तत्त्वज्ञानाचा एक दशांश भाग जरी आत्मसात केला, तर साम्यवाद जे घडवून आणण्याचे सांगतोय ते तुम्ही प्रेम, न्याय आणि सद्भावनेच्या बळावर निर्माण करू शकाल, यात काहीच शंका नाही.’’
आज आनंद तेलतुंबडे आणि त्यांच्यासारखे मार्क्सवादी विचारवंत भलेही काही म्हणत असतील; परंतु हे जग सोडण्याआधी त्या महामानवाने जगाला आणि आपल्या अनुयायांना ठणकावून सांगितले होते की, ‘‘मार्क्सने दिलेल्या सिद्धांतात काहीच नावीन्य नाही. आणि एक आदर्श जीवनप्रणाली शोधण्यासाठी कोणत्याही बौद्ध बांधवाला साम्यवाद्यांच्या दारात याचना करण्यासाठी जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. कार्ल मार्क्सच्या जन्माच्या अडीच हजार वर्षे आधीच तो मार्ग गौतम बुद्धाने सांगितलेला आहे.’’
भारतातील कोटय़वधी दलित आणि बहुजनांच्या दुर्दैवाने बुद्धधम्माचा मार्ग दाखवणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मदीक्षेनंतर अल्पकाळातच महानिर्वाण झाले. त्यामुळे बौद्धधम्माचे खरे मर्म आम्हा भारतीयांना समजावून घेता आले नाही. बाबासाहेबांच्या नंतर समस्त दलित चळवळीची स्वार्थाच्या खडकावर फुटून शकले झाली. अजूनही होत आहेत. दलित नेत्यांनी बाबासाहेबांचे विचार न अंगीकारता स्वत:ला त्यांच्यापेक्षा मोठे मानण्याचे प्रयत्न केले. सत्ता संपादन करण्यासाठी कोणत्याही तडजोडी करणे, हा दलित चळवळीतील परवलीचा विषय बनला आणि या तडजोडीच्या राजकारणाने देशभरातील, महाराष्ट्रातील दलित चळवळ नेहमीच मोडीत निघत गेली, हा इतिहास अगदी ताजा आहे. त्या पार्श्वभूमीवर दलित नेतृत्वाकडून आपण फसवले गेलो आहोत, अशी धारणा असलेल्या दलित युवाशक्तीला कोणत्या दिशेने जावे याचे आकलन होत नसताना, माओवादी त्यांच्यासमोर शस्त्राचा पर्याय ठेवत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आदिवासी तरुणांना जंगलात बरोबर घेऊन माओवाद्यांनी देशातील दुर्गम-डोंगरी भागात आपले वर्चस्व निर्माण केले आहे, आता त्यांचे पुढील लक्ष्य ग्रामीण, निमशहरी-शहरी भागातील तरुणांकडे लागले आहे. ‘विद्रोहा’चा नारा देत माओवादी-नक्षल्यांनी गेल्या काही वर्षात गाव-खेडयातील दलित-मुस्लीम आणि बहुजनवादी तरुणांमध्ये शिरकाव केला आहे. ती घुसखोरी वाङ्मय, कला, नाटय़ आणि नैमित्तिक चळवळींपुरती होती, तोपर्यंत ठीक होते; पण त्या विद्रोहाच्या कल्पनेने पछाडलेली अनेक मराठी मुले माओवादी - दहशतवादी होऊ लागली आहेत. गेल्या वर्षभरातील पुणे, डोंबिवली, नागपूर आदी परिसरात अटक करण्यात आलेले माओवादी हे यापूर्वी आंबेडकरी चळवळीशी संबंधित होते, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तरी देशभरातील दलित नेतृत्वाने जागे व्हावे आणि बाबासाहेबांनी गतिमान केलेले हे धम्मचक्र उलटया दिशेने जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्यांनी काहीही विधान केले तरी बाबासाहेबांना मानणारे कोटय़वधी अनुयायी बुद्धाने दाखवलेल्या धम्ममार्गावरून दूर हटणार नाहीत. तथागतांच्या देशात बाबासाहेबांनी धम्मचक्र परीवर्तनाचे नवे पर्व आणले आणि लुप्तप्राय झालेल्या बुद्धधम्माला संजीवनी दिली होती. जोवर हे विश्व अस्तित्वात असेल तोवर भारतात शांतीचा संदेश देणा-या तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले पंचशील लोकांना प्रेरणा देत राहिल आणि कोटयवधी कंठ त्रिसरणाचा गजर करतील..
बुद्धम् शरणं गच्छामि
संघम् शरणं गच्छामि
धम्मम शरणं गच्छामि
Categories:
आवर्तन