भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या दलितमुक्तीच्या प्रयोगांनी शतकानुशतके दु:ख-दारिद्रयाच्या खाईत पडलेला मागासवर्गीय समाज माणसात आला. समाज परिवर्तनाच्या या लढाईमुळे भारतातील उपेक्षित वर्गाला आत्मभान मिळाले, हे अवघे जग जाणते. त्यामुळेच असेल कदाचित डॉ. आंबेडकरांना त्यांच्या हयातीतच देवदुर्लभ लोकप्रियता लाभली. ती आजही कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्या आंबेडकरी चळवळीशी संबंधित विचारवंताने केवळ मार्क्सवादी क्रांतीचे समर्थन करण्यासाठी ‘डॉ. आंबेडकर यांच्या दलितमुक्तीच्या प्रयत्नांना अपयश आले,’ असे म्हणणे धक्कादायक आहे.
महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि समंजस लोकनेत्यांची परंपरा आहे. थोर विचारवंत असलेले बाळासाहेब भारदे हे त्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे नाव. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर विधानसभेचे सभापती झालेल्या भारदेबुवांनी ‘विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनताजनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता! प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक!’ या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या; परंतु गेल्या आठवडय़ात विधिमंडळात झालेल्या आमदार-फौजदार हाणामारीने विधानसभेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे. ज्या घटनेने या सा-या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली, ती घटना तशी पाहिली तर क्षुल्लक. त्यात गाडी वेगाने नेणारा आमदारांचा वाहनचालक जेवढा दोषी, तेवढाच आमदारांना अरे-तुरे करणारा फौजदारही दोषी ठरतो. परंतु या एका घटनेने राज्यात ‘खाकी विरुद्ध खादी’ पोलिस विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवा वाद निर्माण केला आहे.. ‘लोकशाही म्हणजे शांततामय मार्गाने समाज परिवर्तनाची प्रक्रिया. शांततेच्या नावाखाली स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली अशांततेला उत्तेजन मिळू नये. हा समतोल साधण्यासाठी संसदीय परंपरेची जपणूक सर्वानीच कटाक्षाने केली पाहिजे’, असे बाळासाहेब भारदे यांचे सांगणे होते. आमच्या राज्यातील फक्त खाकी-खादीधारी मंडळींनी नाही, तर प्रसारमाध्यमांतील सर्व जबाबदार लोकांनीही ही जबाबदारीची जाणीव प्राणपणाने जपली पाहिजे.
महात्मा गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी स्वातंत्र्यचळवळ चालवता चालवता भारतातील मागासलेल्या आणि पिढयान्पिढया दारिद्रयाच्या खाईत खितपत पडलेल्या उपेक्षितांचे अंतरंग जाणले आणि त्यांना माणसांत आणण्याचे प्रयत्न केले. ठक्करबाप्पा, महर्षी कर्वे, ताराबाई मोडक, आचार्य भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी अशा एकाहून एक महान त्यागी लोकांची शांततामय सेनाच जणू दारिद्रय, दु:ख आणि अज्ञानाविरुद्ध उभी ठाकली होती. देशाच्या कानाकोप-यात सुरू असलेल्या त्या कामाने अनेक पिढया घडवल्या. स्वदेशी, श्रमप्रतिष्ठा, स्वभाषा, साधेपणा, सच्चेपणा आणि स्वबांधवांवरील असीम प्रेमामुळे, निष्ठेमुळे या गांधीवादी कार्यकर्त्यांनी समाजसुधारणा केल्या, पण आज स्वातंत्र्य मिळून सहा दशके उलटल्यानंतर या समाजसेवेची किंमत कमी झालेली दिसते. सगळीकडे बाजारीकरणाचे वारे वाहत असल्यामुळे समाजसेवा हा अनेकांच्या उपजीविकेचा मार्ग बनला आहे.
चालणे ही प्रक्रिया तशी पाहिली तर अत्यंत साधी, पण आदिमानव जेव्हा चालण्याचे तंत्र शिकला तेव्हापासूनच ख-या अर्थाने मानवजातीच्या सर्वागीण विकासाला गती आली. हल्ली रस्ते गाडयावाल्यांच्या ताब्यात गेल्याने मात्र रस्त्यावर चालणे धोकादायक आणि कंटाळवाणे बनलेले दिसते. ‘जो चालतो, त्याचे नशीबही चालते’ अशी एक जुनी म्हण आहे. म्हणूनच महात्मा गांधी, विनोबाजी आवर्जून सांगायचे, ‘चरैवैती, चरैवैती.. चालत राहा!’
अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी महिलांना सक्षम करण्याची प्रतिज्ञा केली आहे. मुली, तरुण आणि तमाम गरिबांकडे लक्ष देण्याचा मनोदय व्यक्त करून चिदंबरम यांनी महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा ही सामूहिक जबाबदारी असल्याचे जाहीर केले आहे. शासनाची ही प्रामाणिक भूमिका लोकांच्या हिताची आहे; परंतु लोककल्याणासाठी अफाट खर्च करताना आमच्या नियोजनकर्त्यांनी समाजस्वास्थ्य बिघडवणा-या गोष्टींचाही विचार केला पाहिजे. वाढते मद्यपान ही आपली राष्ट्रीय समस्या बनत चालली आहे. एकेकाळी ‘दारू पिणे’ ही गोष्ट गावाच्या वेशीबाहेर होती. ती आता थेट जाणत्या लोकांच्या घरात घुसली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण हे त्यामागील एक कारण आहे; परंतु त्याचबरोबर शासकीय पातळीवरील अनास्थासुद्धा देशातील दारूड्यांची संख्या वाढण्याला कारणीभूत आहे. आपला प्रगत ‘महाराष्ट्र’ तर गावोगावी उघडलेल्या बीयर शॉपींमुळे ‘मद्यराष्ट्र’ बनत चालला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही गावात संध्याकाळच्या वेळी जा, वाचनालयातील खुर्च्यांवर बसायला माणसे नसतात आणि त्याच परिसरातील मद्यालयात माणसांना बसायला खुर्च्या नसतात. नशेने होणा-या या सामाजिक दुर्दशेने आमची तरुण पिढी उद्ध्वस्त होत चालली आहे. नशेच्या अधीन झालेल्या तरुणाईला सुधारण्याऐवजी अप्पलपोटे ‘राज’कारणी हिंसेला प्रवृत्त करतात, असे दारुण चित्र राज्याच्या कानाकोप-यात पाहायला मिळते. ते बदलण्यासाठी जशी राजकीय इच्छाशक्ती हवी तशी दारूला मिळत चाललेली समाजमान्यताही कमी होणे गरजेचे आहे. बीयर, व्हिस्की वा वाइन आदी मादक पदार्थ आपल्याकडे पाश्चिमात्य संस्कृतीतून आले आहेत. त्यामुळे ते कसे, कधी आणि किती घ्यावेत, यासंदर्भात आपल्या समाजाचे संपूर्ण अज्ञान आहे. ते दूर करण्यासाठी आणि दारूचे धोके लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी एक व्यापक मोहीम उभारली पाहिजे..