Mahesh Mhatre

‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येशी मिळतीजुळती आहे. जागतिकीकरणाने आता राष्ट्रीय सीमा तोडून अवघे जग एकत्र आणलेले दिसते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या न्यायाने ‘लोकल टू ग्लोबल’ असा एक सांस्कृतिक परीघ निर्माण होताना दिसतोय. ही अठराव्या शतकातील औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सुरू झालेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया आता ख-या अर्थाने स्थिरावतेय. या सगळ्या प्रक्रियेत महाराष्ट्राला स्वत:चे असे एक स्थान आहे, हे इंग्लंडचे पंतप्रधान कॅमेरॉन यांच्या मुंबईभेटीने सिद्ध झाले. यांनी गुजरातमध्ये यावे यासाठी मुख्यमंत्री मोदी यांनी ‘सॉलिड फिल्डिंग’ लावली होती. परंतु कॅमेरॉन तिकडे गेले नाहीत. ते मुंबईत आले, त्यांच्या काही दिवस आधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद येऊन गेले, दोन्ही राष्ट्रप्रमुखांची भेट आर्थिक गुंतवणूक वाढावी यासाठी होती; कारण आजही भारतात गुंतवणूक करणा-या जगातील कोणत्याही उद्योगाची पहिली पसंती महाराष्ट्राला असते. महाराष्ट्राच्या या महत्त्वाचे आकलन जगभरातील लोकांना होते, पण राजकीय स्वार्थाने अंध झालेल्या मंडळींना गुजरातच्या प्रगतीचा उगाचच ‘गर्व’ वाटतो. म्हणूनच असेल कदाचित महाराष्ट्र नीटपणे न समजून घेणारे मुंबईचे नगरसेवक गुजरातमधील महापालिका बघायला निघाले आहेत.. जगभरातील बडया नेत्यांना ‘महाराष्ट्रवाद’ शिवरायांच्या भूमीत खेचून आणत असताना शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महापालिकेतील नगरसेवकांचे हे असे वर्तन छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणा-यांना शरमेचे वाटत नाही?

महाराष्ट्र आणि म-हाटे हे दोन्ही शब्द अनेक शतकांपासून पराक्रम या शब्दाला समानार्थी म्हणून वापरले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने निर्माण झालेल्या या भगव्या वादळाने अवघ्या जगाला महाराष्ट्रवादाचा परिचय करून दिला होता. म्हणूनच ३४१ वर्षापूर्वी, फेब्रुवारी १६७२ मध्ये ‘द लंडन गॅझेट’ या वृत्तपत्रात छत्रपती शिवाजी राजांच्या सूरतेवरील स्वारीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या बातमीमध्ये सूरतेच्या ब्रिटिश गव्हर्नरने महाराजांचे वर्णन असे होते, ‘शिवाजी.. मुघलांना अनेक लढायांमध्ये खडे चारणारा बंडखोर आता या देशातील सर्वेसर्वा बनला आहे.’ मराठयांना पराक्रमाचे धडे देणा-या छत्रपतींच्या वंशजांनी पुढे अटकेपर्यंत धडक मारली आणि ‘महाराष्ट्रवाद’ हिंदुत्व व भारतीयत्वाचा जन्म होण्यापूर्वी सर्वत्र प्रचलित केला. नेमक्या याच गोष्टीचा आजच्या मराठी लोकांना विसर पडलाय. रामायणातील हनुमानाला आपल्यातील शक्ती-सामर्थ्यांची आठवण करून द्यावी लागत असे, मगच त्याच्या शरीरात बळ संचारायचे आणि तो अचाट कार्य करण्यास सज्ज व्हायचा. अगदी तसेच काहीसे आमच्या म-हाटयांचे झालेले आहे. त्यांच्या पराक्रमी इतिहासावर पिढया न् पिढया राखच जमा होत गेली त्यामुळे आपल्यातील अग्नी विझला असावा, अशी त्यांनी खात्री करून घेतलेली दिसते. त्यांच्यातील हा जन्मदत्त अग्नी पेटवण्यासाठी आता एक दिवा पाहिजे.. नवा एक ‘शिवा’ पाहिजे..

होय, महाराष्ट्राच्या आधारावर गेली अनेक शतके हे भारतवर्ष उभे आहे. महाराष्ट्राने भारताला ‘स्वराज्याचा मंत्र’ जसा मुघलांच्या दमनकारी राजवटीत दिला तसा ब्रिटिशांच्या अन्याय्य कारकीर्दीतही ‘स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे’ ही सिंहगर्जना महाराष्टातूनच घुमली. याच महाराष्ट्राने गांधीजींना गुरू दिले. शहीद भगतसिंग यांना राजगुरू दिले. स्त्रीशिक्षण असो वा लैंगिक शिक्षण, महाराष्ट्र नव्या ज्ञानमार्गाचा आद्य पुरस्कर्ता ठरला. आजही ठरतोय. म्हणून चित्रपटाची मुहूर्तमेढ असो वा क्रिकेटचा खेळ किंवा महासंगणक बनविण्याचे काम, मराठी माणूस सर्वत्र पुढे असतो.

भारतीय राज्यघटना लिहिण्याचे काम असो वा देशाचे कृषी वा अर्थकारण ठरविण्याचे धोरण, मराठी माणूस नेहमीच ‘राष्ट्रवादा’ला आत्मीयतेने ‘महाराष्ट्रावादा’मध्ये परावर्तित करण्याची धडपड करीत असतो. त्याच्या या महाराष्ट्रवादात भारताला जगभरात मोठे करण्याची तळमळ असते म्हणूनच सेनापती बापट यांनी म्हटले आहे की,

मराठा मेला तरी राष्ट्र मेले
मराठयाविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा

सेनापती बापट यांचे हे उद्गार ५० वर्षापूर्वीचे आहेत. मधल्या काळात महाराष्ट्रात बरेच बदल झालेले आहेत. औद्योगिक प्रगतीसोबत शिक्षण आणि सामाजिक सुधारणांमुळे मराठी समाज वेगाने प्रगतिपथावर जात आहे. कुपोषण, दारिद्रय, रोगराई आदी एक ना अनेक संकटातून वाटचाल करीत म-हाटी जन पुढे जात असताना त्यांच्या बुद्धिकौशल्याला, पराक्रमाला दाद देणे आवश्यक आहे. तसे केल्याने ‘महाराष्ट्रवादा’चा प्रसार जास्त वेगाने होईल.. अवघे जग एकविसाव्या शतकात चालले असताना आपणही ‘खेकडयाची वृत्ती’ सोडून प्रगतीचे मनोरे बांधण्याची आता ‘प्रॅक्टिस’ केली पाहिजे.

समाजव्यवहारात नित्यनव्या घटना घडत असतात. त्याचवेळेला त्या घटनांचे पडसादही उमटत असतात. या घटनांमागील कारणे आणि त्यावर समाजात उमटणा-या प्रतिक्रिया यांच्यात कार्यकारणभाव असण्याचे कारण नसते. कधी एखाद्या गंभीर विषयावर जबाबदार व्यक्तीकडून हास्यास्पद प्रतिक्रिया ऐकायला मिळते, तर कधी एखादी हसण्यावारी नेण्यासारखी घटना भलत्या गांभीर्याने घेतली जाते. सध्या मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचे परराज्यातील दौरे असेच अकारण गाजत आहेत. देशातील अनेक छोटया राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त बजेट असणारी मुंबई महानगरपालिका आणि तिचा एकंदर आवाका खूप मोठा आहे. त्याची बरोबरी देशातील कोणतेच शहर करू शकत नाही, ही वस्तुस्थिती. अशा या मुंबई मनपाच्या कारभारात सहभागी असणा-या नगरसेवकांना नजीकच्या गुजरातमधील सूरत, अहमदाबाद वा केरळच्या कोची शहराचा अभ्यासदौरा करून काय मिळणार, असा साधा आणि सरळ प्रश्न कोणत्याही सुजाण व्यक्तीला पडू शकतो; परंतु आपल्याला पडलेल्या अशा प्रश्नाचे उत्तर जेव्हा प्रसारमाध्यमांतून दिले जाते, मग भलेही ते खरे असो वा खोटे लोकांच्या माथी मारले जाते, त्यावेळी अप्रत्यक्षपणे आम्ही आमच्या समाजातील राष्ट्रीय वृत्तीचे खच्चीकरण करत असतो. दुस-या राज्याला वा देशाला कमी लेखणे आणि तसे करताना अत्यंत खालच्या पातळीवर जाणे, हा सवंग लोकप्रियता मिळवण्याचा ‘राज’मार्ग बनला आहे. अवघे जग आता बाजारीकरणाच्या रेटयाने हालचाली करायला, खरे तर जगायला शिकत असताना आम्ही भारतीय मात्र आपापसांतील प्रांतभेद, भाषा-जाती आणि धर्मभेद या अधोगतीकडे नेणा-या मुद्दयांवर काथ्याकूट करीत बसलो आहोत. आम्हाला जर आमच्या समाजाची आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय अशी चहुअंगाने प्रगती करायची असेल तर जागतिकीकरणाचा नवा अर्थ समजून घ्यावा लागेल.

आधुनिकीकरणाच्या मुशीमध्ये जन्मलेल्या या जागतिकीकरणाचा खरा अर्थ आणि फायदा ज्यांना कळला त्यांचे वर्तन काळानुरूप बदलत गेले. नुकतेच मुंबई-दिल्ली दौ-यावर येऊन गेलेले इंग्लंडचे पंतप्रधान कॅमेरॉन यांनी ९३ वर्षापूर्वी घडून गेलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल व्यक्त केलेले दु:ख हासुद्धा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. भारतातील मध्यमवर्गीय जाणिवा अद्यापि इतिहासात रेंगाळत आहेत, हे चलाखपणे जाणून शंभर उद्योगपतींचा ताफा घेऊन आपली बाजारपेठ काबीज करायला आलेल्या ब्रिटिश पंतप्रधानांनी जाता-जाता भारतीयांच्या भावनेला हात घातला. त्यावर काही विद्वान म्हणाले, ‘कॅमेरॉन यांनी त्या हत्याकांडासाठी सा-या भारतीयांची माफी मागावी’, तर काही विचारवंत कॅमेरॉन यांच्या कृतीने भारावून गेलेले दिसले; परंतु प्रत्यक्षात मात्र फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांच्यापाठोपाठ भारतभेटीवर आलेल्या कॅमेरॉन यांना बाजारपेठेच्या आर्थिक-राजकीय रेटयामुळे भारतात येणे भाग पाडले होते. २००८-२००९ पासून तीव्र झालेल्या आर्थिक मंदीच्या वादळाने अमेरिका-युरोपसह इंग्लंडला चांगलेच झोडपून काढलेले आहे. स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थांना हलवून सोडणा-या या मंदीच्या प्रपातामधून सावरण्याचा प्रयत्न भारतासह सगळेच देश करीत आहेत. परंतु ज्यांच्या भूमीत औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणाचे अंकुर फुटले आणि पुढे त्याचे जागतिकीकरणाच्या विश्वव्यापी संस्कृतीत रूपांतर झाले त्या पाश्चिमात्य देशांनी पुन्हा आघाडी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय लोकांनी भाषा व प्रदेशाच्या मुद्दयावर भांडत बसणे म्हणजे स्वत:च्या पायावर कु-हाड मारण्यासारखे आहे.

आपले बहुतांश लोकप्रतिनिधी किंवा नोकरदार जेव्हा परराज्यात किंवा परदेशात एखाद्या विषयाचा अभ्यास करायला जातात, तेव्हा त्यांच्या दौ-याचा सगळा खर्च शासनाकडून म्हणजे पर्यायाने जनतेच्या पैशातून होतो. त्यामुळे बाहेर गेलेल्या या प्रतिनिधींनी अन्य शासकीय संस्थांचा अभ्यास करून काय मिळवले, ही बाब खूप महत्त्वाची ठरते; परंतु जेव्हा या नगरसेवकांच्या दौ-यांचे त्रोटक अहवाल तयार केले जातात, तेव्हा त्यामागील फोलपणा लक्षात येतो. मग प्रश्न निर्माण होतो की, जर नगरसेवकांना पर्यटनच करायचे होते, तर त्याला ‘अभ्यासदौरा’ असे भारदस्त नाव का दिले जाते? हल्ली तर अनेक ‘हुशार’ लोकप्रतिनिधींना घरातील लग्न, बारसे या अन्य कुठल्याही कार्यक्रमासाठी ‘प्रायोजक’ मिळवता येतात, हे दाखवून द्यायला सुरुवात केलेली आहे. मग अशा दौ-यांचाही खर्च भागवण्यासाठी नगरसेवकांना अडचण येण्याचे काही कारण दिसत नाही. त्यातही भाजपच्या काही गुजराती नगरसेवकांनी, ज्यांचा ओढा नितीन गडकरींपेक्षा नरेंद्र मोदी यांच्याकडे जास्त आहे, त्यांनी गुजरात दौ-याचा आग्रह धरलेला आहे. गुजरातमध्ये कायद्याने दारूबंदी असली तरी तेथे किराणा दुकानातही हवा तो ‘ब्रँड’ उपलब्ध असतो. तुम्ही त्या सगळ्याची चिंता करू नका, असे सांगत काही नगरसेवक मोदी यांची वेळ मिळवण्याची, खटपट करीत आहेत. तर काहींनी हा दौरा सगळ्यांना ‘पटेल’ आणि रुचेल, अशी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. काही ज्येष्ठ भाजप नगरसेवकांना मोदींशी जवळीक साधायची संधी या दौ-याच्या निमित्ताने मिळणार आहे आणि पर्यायाने मोदींनाही ‘विकास म्हणजे गुजरात’ हे नव्याने निर्माण झालेले किंवा केलेले तथाकथित समीकरण मुंबईकर नगरसेवकांच्या मनावर ठसवण्याची संधी लाभेल. या सगळ्या संधीसाधूंच्या कारभाराने मुंबई मनपाच्या किंवा नगरसेवकांच्या कार्यशैलीत थोडा जरी फरक पडला असता तरी आम्ही या दौ-याला पाठिंबाच दिला असता; परंतु तसे काही होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही. म्हणूनच गुजरातच्या पर्यटनाला निघालेल्या मुंबईच्या नगरसेवकांनी आधी आपला महाराष्ट्र समजून घ्यावा, असे सांगावेसे वाटते. महाराष्ट्र राज्य भारत स्वतंत्र होण्याआधीपासून आर्थिक आणि औद्योगिकदृष्टया समृद्ध आणि संपन्न आहे. अगदी आजही परकीय गुंतवणूक असो वा बँकेत ठेवी ठेवण्याचे प्रमाण असो, महाराष्ट्रच सगळ्यात आघाडीवर आहे. फक्त आर्थिक वा औद्योगिक प्रगतीच नाही तर भारताला वैचारिक मार्गदर्शन करणारे समाजसुधारक, प्रगतीला दिशा देणारे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक प्रकाश दाखवणारे संत अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत महाराष्ट्र पुढे आहे आणि पुढे राहील. महाराष्ट्राला जेवढी पराक्रमाची परंपरा आहे तेवढीच त्यागाची. महाराष्ट्रावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केल्यामुळे म-हाटी लोकांना फारसे स्थलांतर करावे लागले नाही. त्याउलट गुजरात-राजस्थानची स्थिती. निसर्गाच्या अवकृपेमुळे त्या भागात जन्मणा-यांना पिढयान्पिढया स्थलांतर करावे लागले. परिणामी त्या भागातील लोक देशभर-जगभर विखुरले गेले. ज्यावेळी माणूस आपल्या मातृभूमीपासून दूर जातो तेव्हा त्याच्या वर्तनात खूप फरक पडतो. तो नम्र बनतो, तडजोडींसाठी तयार असतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यश मिळवण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न करतो. म-हाटयांचा इतिहास पाहिला तर वरील तीनही गोष्टीत आम्ही किती कमी होतो आणि आजही त्याचे महत्त्व आम्हाला कसे कळलेले नाही, याची खात्री पटते. वास्तविक पाहता, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सतराव्या शतकात लावलेले स्वराज्याचे तोरण अवघ्या दीडशे वर्षात देशभरात पोहोचले होते. अटकेपार मुलुखगिरी करणा-या पेशव्यांनी एकोणिसाव्या शतकात एक तृतियांश भारत आपल्या ताब्यात घेतला होता; परंतु ज्या ठिकाणी मराठयांनी राज्य मिळवले होते, त्या सगळ्याच संस्थानात राहून आम्ही राज्य टिकवले नाही. गुजरातमधील बडोदा वा मध्य प्रांतातील ग्वाल्हेर, इंदूर इत्यादी अपवाद वगळता बहुतांश संस्थानी प्रदेशात आता म-हाटी संस्कृती व समाज नावापुरता उरलेला दिसतोय, कारण गुजराती वा मारवाडी लोकांप्रमाणे आपण आपला ‘मुलुख’ विसरू शकलो नाही आणि पराक्रमाने मिळवलेला मुलुख टिकवू शकलो नाही, हे वास्तव आहे. त्यासंदर्भात तरुण पिढीचे प्रबोधन करून त्यांना देशोदेशीच्या सीमा पार करायला उद्युक्त करणे, ही काळाची गरज आहे. त्या जोडीला श्रमसंस्कृतीचे महत्त्व, सद्वर्तनाची गरज आणि ध्येयासक्ती या नव्या पिढीमध्ये संक्रमित केली पाहिजे. दुर्दैवाने तसे होत नाही. तरुणांना उद्यमी करून त्यांच्याकडून सकारात्मक काम करवून घेणे दूरच राहिले, आमच्याकडील काही नेते या तरुणांची माथी भडकावून त्यांना वेगळ्याच दिशेकडे नेत आहेत. त्यामुळे आज सर्वच माध्यमांमध्ये मराठी माणसाची प्रतिमा हट्टी, हेकट, आक्रमक आणि दुस-यांचा दु:स्वास करणारी अशी झाली आहे. आम्ही तसे आहोत का? मग एखाद दुस-या नेत्याच्या भडक ठाकरी भाषेला अवघ्या मराठीजनांचा उद्गार समजण्याची जी प्रथा पडत चालली आहे, ती आम्ही प्रयत्नपूर्वक रोखली पाहिजे.

महाराष्ट्राने स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाला वैचारिक आणि राजकीय मार्गदर्शन केले आहे. ज्या गुजरातची आजकाल राज ठाकरेंपासून भाजपच्या चिल्लर-थिल्लर नेत्यांपर्यंत सगळे जण स्तुती करताहेत त्या गुजरातचे वैचारिक-आध्यात्मिक भरणपोषण बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड, लोकसभेचे पहिले अध्यक्ष मावळंकर, विनोबा भावे, ‘स्वाध्याय’कार पांडुरंगशास्त्री आठवले, ‘दत्तबावनी’कार रंगावधूत महाराज, भागवत कथाकार डोंगरेजी महाराज अशा एकाहून अनेक महत्त्वाच्या मराठी लोकांनी केले आहे. फार दूर कशाला जाता, ज्या नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांनी आमच्याकडील नेते प्रभावित झाले आहेत, त्यांनी माहिती घेतली तर मोदी यांच्या एकूण जडणघडणीमागे किती मराठी लोकांचा त्याग आहे हे कळून येईल; परंतु एकदा का तुम्ही आपले ते सारे वाईट आणि दुस-याचे ते चांगले अशी स्वत:ची भावना केली की, विचारप्रवाह थांबतो आणि मनाला होणारे भास आपल्याला सत्य वाटू लागतात. गेल्या आठ-दहा वर्षात सुधारलेल्या गुजरातकडे पाहणा-या सगळ्यांची आज तशी अवस्था झाली आहे. अशा या शहाण्यासुरत्या लोकांनी जर इतिहासात डोकावून पाहिले तरी महाराष्ट्राचे महानत्व दिसेलच; परंतु त्यांनी अगदी वर्तमानातही डोळे उघडून पाहिले, तर महाराष्ट्राचे मोठेपण लक्षात येईल.

तेराव्या शतकात गुजरातमधून महाराष्ट्रात महानुभाव संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी आलेले चक्रधर स्वामी गुजरातीभाषिक होते, परंतु त्यांना महाराष्ट्रभूमीची महानता एवढी भावली होती की ते आपल्या अनुयायांना आवर्जून सांगायचे, ‘महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र। महाराष्ट्री वसावे।’ या सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी मराठीला आपल्या महानुभव पंथाची धर्मभाषा केली होती. त्यामुळे आज मराठीतील पहिले उपलब्ध गद्य वाङ्मय ‘लीळाचरित्र’ आहे. चक्रधरांचा हा सल्ला मानून लक्षावधी गुजराती महाराष्ट्रात आले आणि इथलेच झाले. अगदी देशातील सगळ्यात श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे अंबानी कुटुंबीयसुद्धा महाराष्ट्रातच राहतात; कारण महाराष्ट्राची महानता आणि मुंबईची अपूर्वाई त्यांनी जाणली आहे. बरं, ही महाराष्ट्राची कामगिरी आजवर कोणत्याही जाहिरातबाजी किंवा पद्धतशीर ‘कॅम्पेन’ राबवून दाखवलेली नाही. ती परदेशी गुंतवणुकीच्या आकडयांमधून दिसते. महाराष्ट्राच्या रोजगार देण्याच्या क्षमतेतून प्रगट होते. हे सगळे जाणून घेण्यासाठी थोडाफार अभ्यास करावा लागतो. शाळेतला अभ्यास एखाद्याला जमला नाही, महाविद्यालयात कुणाचा जीव रमला नाही, हे आपण समजू शकतो; परंतु राजकारणात आल्यावरही राज ठाकरेंसारखा नेता केवळ राजकीय स्वार्थासाठी मोदींसारख्या ‘हिटलरी’वृत्तीच्या माणसाची भलामण करतो, त्यावेळी हसावे की रडावे, असा प्रश्न पडतो. त्यातूनही गुजरातच्या विकासकामांबद्दल कुणाला खूपच कौतुक असेल, त्या राज्याबद्दल आस्था असेल तर एक भारतीय नागरिक म्हणून त्याला तसा अधिकार आहे. आमच्या राष्ट्रगीतातही आम्ही, ‘पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा..’ असे सहजपणे म्हणतो, त्यातून महाराष्ट्र-गुजरातची भौगोलिक आणि सांस्कृतिक सलगता व्यक्त होते. त्यामुळे गुजरात म्हणजे परराष्ट्र नाही की, ज्याची स्तुती केल्यामुळे म-हाटी रक्त खवळेल, परंतु गुजरातला नसलेला मोठेपणा चिकटवत असताना जर कुणी महाराष्ट्राला कमीपणा आणत असेल, तर त्याला आम्ही ‘महाराष्ट्रवाद’ शिकवणारच.

होय, हा महाराष्ट्रवाद राष्ट्रीय एकात्मतेला जेवढे महत्त्व देतो, तेवढय़ाच आत्मीयतेने महाराष्ट्राचे महानत्व सांगतो. आज जगभरात आर्थिक मंदीची लाट उसळली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करीत आहे. आपले अर्थकारण वाढवणे आणि आर्थिक संबंधांचा विस्तार करणे, हे या मंदीच्या काळातून बाहेर येण्याचे प्रमुख मार्ग.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद आणि इंग्लंडचे पंतप्रधान कॅमरून या तिन्ही महत्त्वाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी भारताशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, असा जो प्रयत्न चालवला आहे, त्यामागे अर्थकारणच आहे. अगदी चीनलाही आता भारताशी नव्याने मैत्री करायची आहे, कारण प्रत्येक देशाला आपली अर्थव्यवस्था मजबूत करावीशी वाटते. गेल्याच वर्षी बिहार, गुजरात, ओरिसा आदी राज्यांनीही आपल्याकडे थेट परकीय गुंतवणूक यावी, यासाठी खूप प्रयत्न केले.

मोदींनी तर अमेरिकेत, इंग्लंडमध्ये जाण्याचेही प्रयत्न करून पाहिली, युरोपियन युनियनला पटविण्याचा प्रयत्न केला. तरीही २००२ च्या जातीय दंगलीमुळे ‘मौत का सौदागर’ अशी झालेली त्यांची प्रतिमा ते पुसू शकले नाहीत. परदेशी गुंतवणूकदार आपले पैसे त्या राज्यात वा देशात तेव्हाच गुंतवतो जेव्हा त्याला व्यवसाय, सुरक्षा, प्राथमिक सोयी आणि भविष्याची हमी असते. महाराष्ट्रात ती हमी आहे, म्हणून आजही थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्रथम प्राधान्य दिले जाते. २०१०-११ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात २७ हजार ६९९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. २०११-१२ मध्ये ती ४४ हजार ६४४ कोटींवर गेली तर २०१२-१३ मध्ये ३५ हजार कोटी होती. गुजरात आणि महाराष्ट्र अशी तुलनाच करायची तर गेल्या १२ वर्षात महाराष्ट्रात आलेली थेट गुंतवणूक आहे, दोन लाख ८१ हजार ५६५ कोटी रुपये तर तेवढयाच काळात गुजरातमध्ये ३८ हजार ४६५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झालेली दिसते. महाराष्ट्र इथेच थांबायला तयार नाही. नवीन औद्योगिक धोरण मांडताना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुढील पाच वर्षात राज्यात पाच लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याद्वारे राज्यातील सुमारे २० लाख तरुणांना रोजगार मिळेल आणि राज्याचा र्सवकष विकास होईल. अर्थात, हे सगळं वास्तव चित्र जगासमोर मांडतांना महाराष्ट्राने कोणतीही जाहिरातबाजी केली नाही, कारण तशी गरजच पडली नाही. म्हणूनच या ठिकाणी ‘द एण्ड ऑफ हिस्ट्री अॅ ण्ड द लास्ट मॅन’ लिहून उदारमतवादी लोकशाहीचे समर्थन करणा-या फ्रांसिस फुकुयामा यांची आठवण येते. जगाला नवा चेहरा देणा-या जागतिकीकरण आणि उदारीकरण याची सैद्धांतिक मांडणी करताना फुकुयामा यांनी कार्ल मार्क्सम यांच्या विधानाचा आधार घेतला. ‘दास कॅपिटल’च्या प्रस्तावनेत मार्क्सा म्हणतो, ‘औद्योगिकदृष्टया जो देश अधिक प्रगत असतो, तो कमी प्रगत देशांना फक्त आपली भविष्यातील प्रतिमाच दाखवत असतो.’ शंभर उद्योगपतींचा जत्था घेऊन सुवर्णमंदिरात माथा टेकवायला गेलेले इंग्लडचे पंतप्रधान असो वा फ्रान्स-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, हे भारताशी व्यवहार करताना आपली वर्तमानातील मंदीची बाजू झाकून भविष्याची उज्ज्वल आशा दाखवतात. परदेशांचे ठीक आहे, पण शेजारच्या गुजरातमधील नरेंद्रभाई मोदीसुद्धा जर तसेच आभासी चित्र निर्माण करत असतील आणि आमचे मठ्ठ राजकारणी त्यांना भुलून त्यांच्या मागे जात असतील, तर यासारखे दुसरे दुर्दैव नाही.   

Categories:

Leave a Reply