सेक्स हे सगळ्या मनोविकारांचं मूळ आहे, हे सांगणा-या सिग्मंड फ्रॉइडचं आकलन आजच्या आपल्या समाजाने करण्याची किती गरज आहे, हे सध्या भवताली घडणा-या घटनांवरून दिसून येतंय. मानवी हिंसक मनोवृत्तीमागे कामक्षुधा कारणीभूत असते, हे सांगणाराही फ्रॉइडच. या पार्श्वभूमीवर आमच्या तरुणाईची ‘कामक्षुधा’ भडकावणा-या सगळ्याच माध्यमांची आम्ही नव्याने मांडणी करणं आजच्या काळाची गरज आहे. ‘बीपी’ आणि ‘शाळा’सारखे चित्रपट याला चालना देतील?
वीस वर्षापूर्वी देशातील अवघ्या १५ जिल्ह्यांमध्ये असलेला माओवाद आज एक तृतीयांश म्हणजे सुमारे २०० जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. नक्षली कारवायांचा उपद्रव असलेल्या राज्यांची संख्या आज १७ झाली आहे. देशाच्या निमलष्करी दलाची मोठी शक्ती या बंदोबस्तासाठी खर्ची पडत आहे. गेल्या वर्षात हरक, गुंडेती शंकर, मन्गु पद्दम, विजय मडकम, सिद्धार्थ बुरागोहेन, अजय गन्जु, स्वरूपा, समिरा, अमीला, अरुणा हे महत्त्वाचे माओवादी मोहरे राखीव पोलिस दलांनी टिपले. सरकारी यंत्रणांचा रोख या रेड कॉरिडॉरवर आहे. मात्र हा उपद्रव असलेला इलाखा जरी जंगलातला असला तरी या अतिडाव्या विचारांचं रोमँटिक आकर्षण असलेला बुद्धिवाद्यांचा एक मोठाच वर्ग शहरांच्या अस्तन्यांमध्ये संचार करून आहे. त्यांच्याकडूनच जंगलातल्या या कारवायांना सर्व प्रकारचा रसदपुरवठा केला जातो. एवढंच नाही तर या विचारांचा संसर्ग आभासी बुद्धिवाद्यांमध्ये करून प्रस्थापित यंत्रणेतच ‘आपली’ माणसे यांनी तयार करून ठेवली आहेत. म्हणूनच पाकिस्तानी सैनिकांच्या अघोरी कृत्याचा सर्व थरांतून निषेध होत असताना माओवाद्यांनी लातेहारमध्ये राखीव पोलिस दलाच्या १० जवानांच्या केलेल्या निर्घृण हत्यांविरोधात मात्र फारसा गहजब होत नाही. आदिवासींचा सक्रिय पाठिंबा असलेली ‘सलवा जुडूम’सारखी चळवळ मानवाधिकाराची कारणं पुढे करून दाबून टाकली जाते. निवडणूक प्रक्रियेमध्ये डाव्यांची पीछेहाट होत असताना लोकशाही प्रक्रियेवर अविश्वासाचं धुकं पसरवून बंदुकीच्या नळीतून समांतर सत्तेचे प्रयोग १७ राज्यांमध्ये रक्तिमा दाखवू लागले आहेत. आता तर माओवाद्यांना बंदुकीपेक्षाही अधिक सक्षम अशा सिनेमाध्यमावर आपली पकड आवळायला सुरुवात केली आहे. रूपेरी माध्यमातून मटरूच्या तोंडवळ्याने माओ आता बुद्धिभेदासाठी सज्ज झाला आहे.
मराठी साहित्य संमेलन हा अन्य भाषिकांसाठी कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय असतो. जे साहित्यिक हे संमेलन भरवतात त्यांच्यासाठी तो उत्सवाचा, स्वपूजनाचा किंवा वादाचा जलसा असतो. या संमेलनाच्या आयोजनासाठी स्वखुषीने खिशात हात घालू देणा-या सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी साहित्य संमेलन म्हणजे स्वत:ची प्रतिभा नव्हे प्रतिमा उजळवण्याची एक संधी असते. परंतु याप्रसंगी पदरमोड करून येणा-या सर्वसामान्य मराठी वाचक, रसिकांसाठी साहित्य संमेलन आनंदाची पर्वणी असते. आपल्याला कथा, कविता किंवा कादंबरीतून भेटलेल्या अनेक लेखक-कवी मंडळींना ‘याचि देही- याचि डोळा’ पाहण्याची संधी साहित्य संमेलनात मिळते. सामान्य वाचक या कवी-लेखकांचे बोल ऐकण्यासाठी संमेलनाला हजेरी लावतो आणि धन्य धन्य होतो. पंढरपूरचा वारकरी जसा घरी परतताना अबीर बुक्का आणि प्रसाद घेऊन माघारी येतो. तद्वत साहित्य पंढरीचे वारकरी संमेलनातून घरी परतण्यापूर्वी आवडीची पुस्तके खरेदी करतात आणि माय मराठीला कधीही अंतर न देण्याचे वचन देत आपापल्या गावी जातात. या सामान्य वाटणा-या असामान्य मराठी लोकांच्या निस्सीम प्रेमामुळे, असीम निष्ठेमुळे दरवर्षी भरणा-या साहित्य संमेलनांना गर्दी होते. परंतु बडव्यांच्या ताब्यात असलेल्या पंढरपुरात जसे वारक-यांच्या भक्तीकडे दुर्लक्ष केले जाते, त्याचप्रमाणे ज्या रसिक वाचकांच्या आश्रयावर मराठी साहित्य जगले आहे, त्यांच्याकडे साहित्य संमेलनात दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मराठी साहित्य संमेलन कोणत्याही चांगल्या निर्णयामुळे लक्षात राहात नाही. पण चांगल्याच रंगणा-या वादांमुळे ‘अविस्मरणीय’ ठरतात. चिपळुणात भरलेली ही साहित्यिक जत्रा तरी त्याला अपवाद कशी राहील?