सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन 119 वर्षे उलटली आहेत. महाराष्ट्रातील लोकांमध्ये राजकीय जागृती आणि राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी, या हेतूने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले होते. पण काळाच्या ओघात गणेशोत्सव बदलत, बदलत ‘गणेश फेस्टिव्हल’ झाला. उंच मूर्ती, भपकेबाज आरास आणि नवसाला पावणारा, अशी जाहिरात यामुळे सार्वजनिक गणपतींच्या दर्शनाला येणा-यांच्या रांगा वाढू लागल्या. अवघा गणेशोत्सव, नव्या अर्थकारणाच्या चक्राभोवती फिरू लागलाय. त्यामुळे त्याचा मूळ उद्देश हरवत चाललाय; पण सर्वसामान्य मराठी घरांमध्ये गणपतीच्या आगमनाची उत्सुकता, आतुरता अजूनही कायम आहे. कायम राहील. कारण आमचा गणपती हा ‘अंधेरी, लालबाग वा वांद्र्याचा राजा’ नाही, तो आहे अवघ्या विश्वाला व्यापून उरणारा ज्ञानेश्वरांच्या शब्दातील ओमकार स्वरूप विश्वनायक.. त्याचे लोककल्याणकारी कार्य पुन्हा एकदा नव्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे.
विद्येची देवता, विघ्नहर्ता आणि सुखकर्ता म्हणून प्रसिद्ध असणारा गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. कोणत्याही पूजेत, कार्यात ज्याला अग्रपुजेचा मान दिला जातो, त्या गणेशावर म-हाटी लोकांचे विशेष प्रेम. अगदी सातव्या शतकापासून आपल्याकडे गणेशभक्ती वाढत गेली. 12व्या शतकात यादवांच्या काळात गणेशभक्तीला राजाश्रय लाभल्यामुळे महत्त्वाच्या गावांच्या मध्यवर्ती चौकात गणेश मंदिर स्थापन करण्याचा प्रघात सुरू झाला होता. कदाचित गणेशाला असलेल्या या लोकमान्यतेमुळेच संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘भावार्थ दीपिका’ अर्थात ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘ओम नमोजी आद्या’ ही अप्रतिम गणेशस्तुती प्रगटली असावी. ज्ञानेश्वरांच्याच काळातील दुसरा प्रसिद्ध कवी नरेंद्र याने महानुभाव संप्रदायात जाण्यापूर्वी ‘रूक्मिणी स्वयंवर’ लिहिताना गणेशस्तवन करूनच पुढील काव्य रचलेले दिसते.
त्यानंतरच्या काळात, विशेषत: बहामनी कालात झालेल्या बहुतांश ग्रंथरचनेच्या आरंभी श्रीगणेशाचे स्तवन आवर्जून केलेले दिसते. चिंचवडच्या ‘मोरया गोसावी’ यांनी स्थापलेल्या गणपतीला तर बादशाही इनामे-वतने मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची तर गणेशावर नितांत श्रद्धा होती. गणेशभक्तीचा हा वारसा त्यांना जिजाऊ माँसाहेबांकडून लाभला होता. त्यामुळेच शिवाजीराजांच्या हातून कसबा पेठेतील गणपतीची स्थापना झाली होती. स्वत: छत्रपती चतुर्थीचा उपवास करीत असत, असे उल्लेख बखरीत मिळतात. शिवकालात गणेशपूजेला खूपच महत्त्व आले होते. त्याचे प्रतिबिंब महाराजांचे समकालीन संत श्री तुकाराम महाराज आणि श्री रामदास स्वामी यांच्या काव्यरचनेत उमटलेले दिसतात. आज घरोघरी म्हटली जाणारी ‘सुखकर्ता, दु:खहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी..’ ही समर्थानी रचलेली आरती इतक्या वर्षानंतरही लोकांच्या ओठावर आहे.
छत्रपतींच्या नंतर सर्वसत्ताधीश बनलेल्या पेशव्यांच्या काळात गणेश उपासनेला अधिक महत्त्व आले. कोकणातून घाटावर येऊन राज्यकर्ते बनलेल्या पेशव्यांचे गणपती हे उपास्य दैवत होते. अष्टविनायकांपैकी येऊरचा गणपती हे तर पेशव्याचे श्रद्धास्थान. कदाचित त्यामुळेच थोरल्या माधवरावांनी अखेरचा श्वास घेण्यासाठी येऊरची निवड केली असावी. स्वत: ब्राह्मण असल्यामुळे पेशव्यांच्या प्रत्येक धार्मिक कृत्यात यज्ञ-याग, जप-जाप्य याचे खूप स्तोम असायचे. दानधर्माची, जेवणावळींची रेलचेल असे. त्यामुळे शनिवारवाड्यातील गणेश महालात साजरा होणारा पेशव्यांचा गणेशोत्सव आपोआप ‘सार्वजनिक’ झाला होता. पेशव्यांच्या गणेशभक्तीने प्रेरीत झालेल्या अन्य सरदारांनीही आपापल्या भागात गणेश मंदिरे स्थापन केली. सांगलीच्या पटवर्धन घराण्यातील गणपती, सरदार रास्ते, सरदार खाजगीवाले, यांचे गणेशोत्सव पुढे प्रसिद्ध झाले. विशेषत: 1893 साली खाजगीवाले यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. देशातील राजकीय असंतोष वाढवण्यासाठी गणेशोत्सवाचे सार्वजनिकरण केले पाहिजे, ही दूरदृष्टी लोकमान्य टिळक यांना होती. त्यामुळे त्यांनी या उत्सवाला लोकांपर्यंत नेण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले. जातीपातीत विखुरलेल्या हिंदुंना एका उत्सवात आणणे, हे तसे कठीण काम होते. लोकांना त्यांच्या राजकीय अधिकारांबाबत जागृत करताना टिळकांनी हे ऐक्याचे कामही केले. मुख्य म्हणजे या सार्वजनिक उत्सवाने आम लोकांमधील सुप्त कलागुणांना आणि नेतृत्वगुणांना चांगलाच वाव मिळाला.
सार्वजनिक गणेशोत्सवाने विद्येची देवता असणा-या गणपतीचे मूळ स्वरूप लोकांसमोर ठसठशीतपणे मांडल्यामुळे समाजात ज्ञानसंपादन करण्याची, विद्यादानाची एक परंपरा निर्माण झाली. टिळकांनी गणेशोत्सवात सामाजिक ऐक्याचा पुरस्कार केलेला होता, त्यामुळे सामाजिक कार्याला एक प्रतिष्ठा मिळाली. आज 119 वर्षानंतर आपल्यासमोर होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने आपला मूळ हेतू गमावलेला दिसतो. खरे सांगायचे तर देशातील सद्य:परिस्थितीत राष्ट्रीय भावनेचा लोप होत आहे. अंतर्गत यादवीने देश पोखरलेला असताना परकीय सत्ता देशाचे लचके तोडायला बसलेल्या दिसतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवाद्वारे लोकांचे चांगले प्रबोधन करता येईल. आज देशातील 50 कोटींच्या आसपास लोक भुकेकंगाल आहेत. त्यांच्या पोरा-बाळांना ज्ञानाचे सामर्थ्य दिले, तरच त्यांचे दारिद्र्य मिटेल, याची जाण ठेवून करोडोंची उलाढाल करणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या तळा-गाळातील ‘बालगणेशां’कडे यापुढे तरी दुर्लक्ष करू नये, असे वाटते; परंतु हल्लीची मंडळे नको त्या विषयात इतकी गुंतून पडलेली दिसतात की, त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवामुळे ध्येयाचाच विसर पडलेला दिसतोय. स्वत:च्या गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हे बिरुद मिळावे यासाठी लालबागच्या गणेश गल्लीतील जुन्या मंडळाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या वादात स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे ‘मुंबईचा राजा’ याच नावाने संकेतस्थळ चालवणा-याला दिलासा मिळाला. या गोष्टीतून मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरी भागात वाढलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या एकूण वागण्याचाही अंदाज येतो.
गेल्या दोन दशकांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘मोठे’ होण्याची चुरस प्रचंड वाढलेली दिसते. या स्पर्धेतूनच गणपती मूर्तीची उंची वाढत गेली. आरास-देखाव्यांची भव्यता लाभली, परिणामी खर्चाचे आकडे आणि गर्दीच्या रांगाही वाढत असताना गणेशोत्सवाचे स्वरूपच पालटले. देखावे-सजावट यासाठी लागणा-या लक्षावधी रुपयांचा खर्च वसूल करण्यासाठी सुरुवातीला गुटखा आणि तत्सम पदार्थाच्या जाहिरातींना गणेशोत्सवात ‘प्रतिष्ठा’ मिळाली. त्याचा गुटखा उत्पादकांना अफाट फायदा झाला; पण शहरी भागातील हजारो तरुणांचा जीव गेला. गेल्या दशकात बांधकाम व्यवसायाला अक्षरश: सुगीचे दिवस आले, त्यामुळे साहजिकच सगळा उत्सवच बिल्डर मंडळींनी ‘हायजॅक’ केला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अर्थकारण जे पूर्वी परिसरातील दुकानदारांच्या 51 रुपयांच्या पावतीवर चालायचे तिथे लाखोंचा व्यवहार सुरू झाला. त्यातून परिसरातील तरुणवर्गाला आकर्षित करणा-या स्पर्धा, कार्यक्रम यांचा धडाका सुरू झाला. पुढे याच कार्यकर्त्यांमधील हुशार मंडळींमधून नगरसेवक, आमदार होऊ लागले. त्यामुळे 11 दिवसांच्या गणेशोत्सवातून पुढे नवरात्र, साईबाबांची पालखी, दिवाळी पहाट कार्यक्रम आणि नव-वर्षाचे स्वागत करणारी जंगी पार्टी असे एकापाठोपाठ एक ‘इव्हेंट’ साजरे होऊ लागले. धार्मिक आधारावर केलेल्या भावनेच्या राजकारणातून सत्तापदे आणि पुन्हा ती सत्तापदे टिकवण्यासाठी धार्मिक उन्मादाला खतपाणी घालण्याचा दुर्दैवी पायंडा आज महाराष्ट्रात पडलेला दिसतोय. त्याविरोधात बोलण्याचे कुणीच धाडस करत नाही; कारण ‘मला काय त्याचे’ अशी वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणारी भूमिकाच सगळय़ांनी घेतलेली दिसते. परंतु आजची बिघडलेली सामाजिक स्थिती पाहता बदललेले पर्यावरण लक्षात घेता आम्ही आमच्या सार्वजनिक उत्सवांचे स्वरूप बदलणे, ही काळाची गरज आहे. अवघ्या देशात जेव्हा धर्म-भाषेच्या आधारावर भांडणे सुरू असताना या उत्सवांद्वारे माणसांना जोडण्याची गरज आहे; पण तसे प्रयत्न होताना दिसत नाही. भपका आणि भोंदुपणा यांचा मिलाफ झाल्यामुळे ‘आमचाच गणपती नवसाला पावतो’ अशी जाहिरात करण्याची सगळ्याच मंडळांमध्ये स्पर्धा लागलेली असते. स्पर्धेच्या नादात आपण आपल्या देवतेचाच अपमान करीत आहोत, हे लोक विसरतात; कारण त्यांना गणपतीचे महत्त्वच ठाऊक नाही. गणपती वा गणेश या शब्दांचा अर्थच मुळी ‘गणांचा अधिपती किंवा देव’ असा आहे. प्राचीन काळात अस्तित्वात असलेली गण संघ पद्धत ही आजच्या लोकशाहीचे प्राथमिक स्वरूप होते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. या गणांचा नेता, नायक तो गणनायक बनला.
दक्षिणेकडील प्रांतात गणेशाला ‘विनायक’ म्हणूनच ओळखतात. विनायक म्हणजे ‘विशिष्ट रूपाने जो नायक’ आहे तो. तर हा गणपती, आपल्या गणतंत्रातील लोकांसाठी सुखकर्ता आहे, तो लोकांवर आलेली विघ्ने दूर करतो. इतकेच नव्हे तर तो ‘हेरंब’ आहे, दीनदुबळ्या लोकांचा उद्धारकर्ता आहे. अशा या लोकांमधून निर्माण झालेल्या लोकदैवताचा उत्सव करताना लोकहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष व्हावे, यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही.
गणेशोत्सव मंडळातील स्पर्धेपोटी गणपतीच्या उंचच उंच मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि पाण्यात प्रदूषण करणारे रंग वापरून बनवल्या जात आहेत. उत्सवातील 11 दिवस प्रचंड ध्वनिप्रदूषण होते, ते कमी म्हणून की काय, गणपती बाप्पाला आणताना आणि निरोप देताना ढोल, ताशे, बँड, नाशिक बाजा यांच्या जोडीला फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि धुरळा यांचा सामना करावा लागतो. गणपतीला वाहिलेल्या निर्माल्याचे काय करावे, हासुद्धा मोठाच प्रश्न असतो. लोक मखरासह हे निर्माल्य पाण्यात टाकतात आणि मोकळे होतात. हे सगळे आता कुठे तरी थांबले पाहिजे. महाराष्ट्राने आजवर पिढ्यांपिढ्या शाडूच्या गणपतीची पूजा केली. फुला-पानांच्या मखरात आपले आराध्य दैवत बसवून त्याला आपल्या ऐपतीप्रमाणे नैवेद्य दाखवला, हे सर्वजण जाणतात, मग आताच या सगळ्या कृत्रिम आणि निसर्गविरोधी वस्तूंचा आम्हाला हव्यास लागला आहे. गणेशोत्सव हे समाजजागृतीचे, ज्ञानोपासनेचे, प्रबोधनाचे आणि राष्ट्रीय ऐक्य वाढवणारे एवढे चांगले साधन असताना त्याचा मर्यादित लोकांच्या आकांक्षापूर्तीसाठीच उपयोग केला जातो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुंबई, ठाणे, पुणे असो वा अन्य कोणत्याही शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव बघितल्यास तेथील मंडळात तुम्हाला ज्ञानी, विचारी लोक शोधून सापडणार नाहीत. स्थानिक राजकारणी, बिल्डर आणि माफिया या तिन्ही घटकांतील लहान-मोठ्या मंडळींच्या एकीतून बहुतांश मंडळांचे काम चालते. त्याला काही धार्मिक-सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बसवले जाणारे गणपती अपवाद ठरतात. त्यांच्यामार्फत अनेक चांगले उपक्रमही राबवले जातात. त्याबद्दल वाद नाही, परंतु ज्या मंडळांकडे अमाप निधी व भक्तांच्या देणग्यांमधून येतो, त्याचा वापर संकटग्रस्त लोकांचे संकट दूर करण्यासाठी, अज्ञानी लोकांना ज्ञान देण्यासाठी होत नाही. यासाठी या सगळ्या मंडळांच्या कारभारावर स्थानिक लोकांनी नजर ठेवलीच पाहिजे. तसेच सर्वच मंडळांना रजिस्ट्रेशन (पंजीकरण) सक्तीचे करून दरवर्षीचा आर्थिक अहवाल सादर करण्याची अट ठेवूनच परवानगी दिली पाहिजे.
गणपती ही विद्येची, समृद्धीची देवता म्हणून आता देशात-विदेशात लोकप्रिय ठरू लागली आहे. पूर्वी फक्त देवघरात दिसणा-या ठरावीक पद्धतीच्या गणेशमूर्ती आपला आकार बदलत्या काळानुसार बदलत आहेत. कलाकारांच्या प्रतिभेला, निर्मितीकौशल्याला आव्हान देणा-या गणेशाच्या वाद्य वाजवणा-या, नृत्य करणा-या अशा विविध स्वरूपांतील मूर्ती सध्या सर्वच भेटवस्तू विकणा-या दुकानांमध्ये प्रचंड संख्येने दिसतात. गणपती हा केवळ चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती नाही तर तो महाभारत लिहून काढणारा व्यासांचा लेखनिकही आहे. त्यामुळे हल्ली गणपतीच्या लेखकापासून संगणेशापर्यंत (संगणक वापरणारा गणपती) विविध रूपांत गणपती घराघरात पोहचताना दिसतो; पण तो ‘भेटवस्तू’ किंवा ‘गिफ्ट आयटम’ म्हणून मर्यादित राहणे, हे देवपूजेचे निर्थक स्तोम माजवणे जेवढे चुकीचे असेल, तेवढेच अयोग्य ठरेल.
इतिहासकाळात भारताबाहेर मेक्सिको, श्रीलंका, ब्रह्मदेश, भूतान, नेपाळ आदी देशांत प्रसिद्ध असलेला गणपती जेव्हा विविध रूपांत युरोप, अमेरिकेतील ‘गिफ्ट शॉप्स’मध्ये दिसतो तेव्हा बरे वाटते. मी एकदा दक्षिण कोरियातील सेऊल शहरात एका मोठ्या दुकानात गणपतीची मूर्ती पाहिली. बुद्धाच्या विविध आकार, प्रकारांच्या मूर्तीमध्ये आपला गणपती बाप्पा एकटाच उभा होता.. अत्यंत सुंदर कोरीव काम, देखणे डोळे आणि मनमोहक मुद्रा पाहून माझे पाय एकाच जागी थबकले. माझी नजर गणेशमूर्तीवर खिळलेली पाहून विक्रेती पुढे झाली आणि त्या मूर्तीबद्दल सांगू लागली ‘हा गजानन आहे, आम्ही तो नेपाळमधून आणलाय वगैरे.’ मी तिला एकाच शब्दात सांगितले, ‘मला तो हवाय’, माझ्याबरोबरचे भारतीय लोक आश्चर्यचकित झाले. त्यातल्या तरुण पटेलने शेराही मारला, ‘हा बघ मराठी माणूस. त्याला कोरियातपण गणपतीच घ्यावासा वाटतो.’ तरुणचे म्हणणे बरोबर होते.. गणपती कोकणी माणसाच्या डीएनए किंवा जीन्समध्येच असेल तर तो तरी काय करणार?
Categories:
आवर्तन