Mahesh Mhatre

बालपणीचा काळ सुखाचा, ही म्हण आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर दिसत आहे, कारण बालपणातील बालसुलभ निरागसताच हरवत चालली आहे. पुण्याच्या ‘रिव्हर व्ह्यू’ रिसॉर्टवर मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या 750 ते 800 अल्पवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या वर्तनाने आपण ‘लहान’ राहिलो नसल्याचे जाहीर केले आहे. आठवी ते बारावी या अभ्यासाच्या, करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या इयत्तांमध्ये असणा-या या चांगल्या घरातील मुला-मुलींना अशा प्रकारची दारू-पार्टी करावीशी वाटणे, यातून आमचा मध्यमवर्गीय समाज कोणत्या स्तरापर्यंत घसरलेला आहे हे सिद्ध होते. मुख्य म्हणजे ‘विद्येचे माहेरघर’ समजल्या जाणा-या पुण्यामध्ये अशा प्रकारच्या ‘चिल्लर पार्ट्या’ ब-याच दिवसांपासून होत होत्या. यावेळी दिवट्याकार्ट्यांच्या पैशाच्या मागणीने वैतागलेल्या पालकांनीच थेट पोलिसांत तक्रार केल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.. त्याची समाजाच्या सर्व स्तरांवर योग्य ती दखल घेतली गेली पाहिजे..

इंग्लंडचे गाजलेले पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी एका भाषणात म्हटले होते, ‘तुम्हाला जर एखाद्या देशाचे भविष्य जाणून घ्यायचे असेल, तर त्या देशातील तरुणांच्या ओठांवर कोणती गाणी आहेत, ते पहा. तुम्हाला त्या देशाचे भवितव्य काय आहे, हे कळेल.’ आत्ता या वेळेस जर चर्चिलसाहेब भारतात आले तर त्यांना दिसेल – ‘मुन्नी बदनाम हुई’ किंवा ‘शिला की जवानी’.

..तर मग आम्ही आमच्या देशाच्या भवितव्याचा काय अंदाज बांधायचा? नुकत्याच उघडकीस आलेल्या पुण्यातील ‘चिल्लर पार्टी’च्या बातम्यांनी आपल्या भावी पिढीच्या, पर्यायाने भारताच्या भविष्याचा प्रश्न नव्याने उभा राहिला आहे.

भारतात 1991 पासून सुरू झालेल्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने सुखवस्तू मध्यमवर्गीयांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात भर टाकली, आज जगातील सगळ्यात लक्षणीय मध्यमवर्गीयांची संख्या, जी चाळीस कोटींच्या आसपास आहे, ती भारतात दिसते. अगदी त्याच जोडीला देशाची निम्मी लोकसंख्या पंचविशीच्या आत असलेली दिसते. आर्थिक सुबत्ता आल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या जगण्याला एक वेगळीच दिशा लाभलेली दिसते. देश स्वतंत्र झाला, त्यावेळी शहरी लोकांसाठी ‘सुट्टी’चा आनंद उपभोगणे म्हणजे ‘गावी जाणे’ किंवा ‘ग्रामीण भागात राहणा-या नातेवाईकांकडे जाणे’ हे जणू ठरलेले असायचे. गेल्या पाच वर्षात युरोपातील अनेक देशांमध्ये येणा-या पर्यटकांमध्ये सर्वाधिक प्रवासी भारतातून जातात असे आढळून येत आहे. जरा दोन-तीन दिवस सलग सुट्ट्या लागून आल्या की, लोक रिसॉर्ट, हॉटेल्सच्या दिशेने पळतात. त्यामुळे शहरातील मुला-मुलींचा आपल्या गाव-खेड्यात राहणा-या नातेवाईकांचा संपर्क तुटला. नातेसंबंधांची वीण आपोआप तुटली. त्याचबरोबर ही शहरी युवापिढी ग्रामीण संस्कृतीपासूनही दूर लोटली गेली. कुटुंबाची आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी अथक आणि अफाट मेहनत करणा-या आई-बाबांना नोकरी-व्यवसायातील स्पर्धेमुळे सतत ‘बिझी’ राहण्यास भाग पाडलेले आहे. कुटुंबप्रमुख कामात मग्न असतो, कारण कुटुंबासाठी मोठे घर, गाडी, आधुनिक मोबाईल, टॅब, परदेश प्रवास, शॉपिंग, हॉटेलिंग अशी लांबलचक यादी त्याच्या डोळ्यासमोर दिसत असते. त्या सुखांच्या पर्वतरांगेतील एकेक शिखर पार करणा-या या आधुनिक युगातील आई-बाबांची चांगलीच दमछाक होताना दिसते. मग श्रमपरिहार म्हणून ‘ड्रिंक्स’चा (दारूला ‘दारू’ म्हटलेले हल्ली लोकांना आवडत नाही!) आधार घेतला जातो.

तुम्ही सुट्टीच्या दिवशी कोणत्याही मध्यमवर्गीयाकडे जा, तुम्हाला बायका-मुलांच्या साक्षीने, ब-याच ठिकाणी साथीने ‘पिण्याचा कार्यक्रम’ अगदी साग्रसंगीत सुरू असलेला दिसेल. थोड्याच वर्षात ‘सोशल ड्रिंकिंग’चे व्यसनात रूपांतर झालेले असते. त्याच्या शारीरिक दुष्परिणामांनी अवघे कुटुंब अस्वस्थ, काही वेळा उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळते. आपल्याकडे व्यसनांच्या अतिरेकामुळे पस्तिशीत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्या पाठोपाठ रक्तदाब, मधुमेह आदी विकारांनी आमच्या अवघ्या समाजव्यवस्थेलाच पोखरून काढायला सुरुवात केलेली दिसतेय. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुढील दशकात जगातील सर्वाधिक मधुमेह आणि हृदयविकाराचे रुग्ण भारतात आढळतील. आज या ‘श्रीमंतांचे आजार’ म्हणून ओळखल्या जाणा-या या जीवघेण्या रोगांचा प्रादुर्भाव जर सर्व थरातील लोकांमध्ये झाला, तर त्यांच्या उपचाराचे काय, हा प्रश्न उपस्थित होतो. थोडक्यात काय तर आर्थिक सुबत्तेने देशातील सुमारे पस्तीस-चाळीस टक्के लोकांना चांगले राहणीमान लाभले. परंतु आर्थिक स्थैर्य आल्यानंतर या मध्यमवर्गीय कुटुंबांनी आपल्या प्रकृतीपासून परिवारापर्यंत सगळीकडेच दुर्लक्ष केल्यामुळेच सगळा अनर्थ ओढवलेला दिसतोय.

2011 च्या जनगणनेचा आधार घेऊन करण्यात आलेल्या अभ्यासानुसार शहरी भागातील विभक्त कुटुंब वाढताना दिसतात. आपण दिल्ली आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांचा आढावा घेतला, तरी लक्षात येते की, पूर्वी आजी-आजोबा, काका-काकी, चुलत भाऊ-बहिणींनी गजबजलेली घरे जवळजवळ कालबाह्य होत आहेत. दिल्लीत एकूण घरांपैकी 70 टक्के घरात एकच कुटुंब राहते. फक्त 17 टक्के घरात आई-वडील आणि मुलगा-सून असा परिवार राहतो. आई-वडील आणि दोन किंवा जास्त भाऊ, त्यांचा परिवार एकत्र राहण्याचे प्रमाण अत्यल्प दिसते. एकाच घरात नऊपेक्षा जास्त सदस्य असणा-या घरांचे प्रमाण दिल्लीत फक्त 5.9 टक्के आहे. दिल्लीच्या तुलनेत मुंबईतील जागेचे प्रमाण आणि भाव जास्त आहेत. त्यामुळे गेल्या दशकात मुंबईतील विभक्त कुटुंब पद्धतीची वाढ खुंटलेली दिसते. मुंबापुरीची एकूण स्थिती पाहिली तर येथेही दिल्लीप्रमाणेच 60 टक्क्य़ांहून अधिक विभक्त कुटुंबे आहेत, परंतु गेल्या 10 वर्षात मुंबईत एकत्र कुटुंबाची संख्या लक्षणीय पद्धतीने वाढलेली दिसते. 2001 पेक्षा 2011 मध्ये उपनगरात, आई-वडील, मुलगा-सून राहतात, अशी एक लाख 21 हजार कुटुंबं अधिक आढळून आली. शहर परिसरात ही वाढ पस्तीस-हजाराहून अधिक होती. पुण्यात तर गेल्या 10 वर्षातील शहरीकरणाने कौटुंबिक संबंधांच्या व्याख्याच बदलून टाकलेल्या दिसतात.

थोडक्यात सांगायचे तर पुण्यासारख्या संस्कृती-संवर्धनाचा अभिमान बाळगणा-या शहरात 14 ते 17 वयोगटातील थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल आठशे मुलं-मुली मद्यधुंद अवस्थेत एका रिसॉर्टवर नाचताना, बिभत्स चाळे करताना सापडणे, हे आमच्या मध्यमवर्गाच्या घसरणीचे उदाहरण आहे. विशेष म्हणजे 19 वर्षाच्या आशिष लिमये आणि 20 वर्षाच्या दर्शिल चव्हाण या दोन तरुणांनी ही पार्टी आयोजित केली होती. त्यांना पोलिसांनी अटक केली, पण त्यांचे इतर पाच साथीदार पळून गेले. त्यांचीही नावे आता पुढे येणे आवश्यक आहे. पुण्यामध्ये याआधी ‘रेव्ह पार्ट्यां’वर धाडी टाकल्यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणा-या तरुण-तरुणींच्या एकंदरीत वर्तनाच्या बातम्या वृत्तपत्रांत, दूरदर्शनवर झळकल्या होत्या. त्या पार्ट्यांमध्ये दारूबरोबर अंमली पदार्थाचे सेवन करण्यात मध्यमवर्गीय सुखवस्तू घरातील तरुण-तरुणी किती पुढे असतात, हेही त्यामुळे स्पष्ट झाले होते. परंतु नववी ते बारावी या विद्यार्थिजीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यांवर असलेले विद्यार्थी भरदिवसा दारू पिऊन तर्र होऊ शकतात, यावर कुणाचाच विश्वास बसणे शक्य नव्हते. अगदी या अल्पवयीन मुलांच्या पार्टीची माहिती पोलिसांना द्यायला गेलेल्या पालकांनाही असाच अनुभव आला. ‘सुरुवातीला पोलीस अशी पार्टी होऊच शकत नाही असे म्हणत होते,’ एका आयटी कंपनीत महत्त्वाच्या पदावर काम करणा-या पित्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ‘माझी मुलगी नववीतून दहावीत गेल्यापासून तिने पार्ट्यांसाठी पैसे मागायला सुरुवात केली होती. त्याआधी तिचे वागणे अगदी साधे होते. आम्हीही चार-पाचशे रुपये सहजपणे देत होतो. मध्यंतरी श्रावण महिना लागण्याच्या आधी घरात काही पाहुणे आले होते. तेव्हा कन्येने सहजपणे बीअरचा एक ग्लास घेतला. त्यावेळीच आम्ही सावध व्हायला हवे होते. पण सगळ्यांनी तिची गंमत केल्यामुळे आम्हीही त्याकडे दुर्लक्ष केले होते. पण या पार्टीत तिला झिंगलेल्या अवस्थेत पाहिले आणि आम्ही भानावर आलो.’

पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अधिकारी भानूप्रताप बर्गे यांनी ‘रिव्हर व्ह्यू’ नामक रिसॉर्टवर ‘पार्टी’ करायला जमलेल्या या अल्पवयीन मुला-मुलींना पकडले. सगळीच मुले ‘चांगल्या’ घरातील असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही. सुज्ञ पालकांना पोलीस स्टेशनात बोलावून त्यांच्या मुलाला वा मुलीला पोलिसांनी घरी पाठवले. मद्यधुंद 800 मुलांपैकी जवळपास 600 मुले-मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांच्या एकंदर कारवाईलाही मर्यादा पडल्या. परंतु आई-वडिलांच्या लाडाने शेफारलेल्या या अल्पवयीन मुलांनी पोलिसांशीही उर्मटपणे वागून आपल्या ‘संस्कारां’चे प्रदर्शन घडवले, असे पोलिसांनी सांगितले. दारूच्या नशेतील या मुला-मुलींना रोखण्यासाठी पोलीस ज्यावेळेस रिसॉर्टवर पोहचले, त्यावेळी तेथील स्विमिंग पुलमध्ये सातशेच्या आसपास मुले-मुली कर्णकर्कश्श आवाजात लावलेल्या गाण्यांच्या तालावर नाचत होते. वस्तुत: तरणतलाव कितीही मोठा असला तरी त्यात दोनशेहून अधिक लोक मावू शकत नाहीत. पण ‘रिव्हर व्ह्यू’मधील दृश्य अजब होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुले-मुली धुंदीत पाहून पोलीसही चक्रावले. त्या मुला-मुलींना तलावातून बाहेर आणेपर्यंत पोलिसांच्या नाकीनऊ आले होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दारूच्या नशेत बेताल झालेल्या या मुला-मुलींच्या पालकांनी नंतर पोलीस ठाण्यात आपल्या दिवट्यांच्या ज्या कहाण्या सांगितल्या, त्या अधिक धक्कादायक होत्या. एका पालकाने पोलिसांना आपला इयत्ता अकरावीत शिकणारा मुलगा दर आठवड्याला ‘पॉकेटमनी’ म्हणून एक हजार रुपये मागतो, जर त्याला सोमवारी पैसे मिळाले नाहीत तर घरात गोंधळ घालतो, असे सांगितले. एका प्राध्यापक महिलेने आपल्या मुला-मुलींच्या बेताल वर्तनामुळे सगळे कुटुंबच किती कंटाळले आहे, याचे पाढे वाचले. रागीट मुला-मुलींनी रागाच्या भरात मोबाईल, टीव्ही लॅपटॉप कसे फोडले याच्या कहाण्या ऐकून पोलीसही चक्रावून गेले. सगळ्यात धक्कादायक गोष्ट एका व्यक्तीने आम्हाला सांगितली. ते म्हणाले, ‘आमच्या शेजारच्या अकरावीतील मुलाने, जो अभ्यासात चांगला हुशार होता, त्याने रागाच्या भरात आपल्या आजीच्या डोक्यात फ्लॉवरपॉट फेकून मारला होता. दहावीत या मुलाने चांगले मार्क्‍स मिळवले होते, म्हणून त्याच्या आई-बाबांनी त्याला लॅपटॉप घेऊन दिला होता. थोड्याच दिवसात त्याने आईपाशी आग्रह धरून त्यावर इंटरनेटही घेतले. पुढे त्याला ‘फेसबुक’ची चटक लागली. तो तासन्तास लॅपटॉप घेऊन बसायचा. अगदी खाता, पितानाही त्याचे फेसबुक अकाऊंट सुरूच असायचे, चॅटिंगही सुरू असायची. आजी त्याला सतत हटकायची. आई-बाबा नोकरीला जायचे. त्यामुळे दिवसभराच्या गोष्टी त्यांना कळायच्या नाहीत. दिवसभर काम करून थकल्यामुळे ते लवकर झोपायचे. चिरंजीव मात्र रात्री उशिरापर्यंत फेसबुकवर चिकटलेले दिसायचे. एक दिवस आजीने जरा जास्तच कडक शब्दात नातवाला सुनावले. त्यावर चिडलेल्या मुलाने जवळचा फ्लॉवरपॉट तिच्या डोक्यात घातला. आजी जागीच गतप्राण झाल्या. आम्ही शेजारी असूनही त्यांच्या मृत्यूची बातमी आम्हाला दुस-या दिवशी कळली. मध्यंतरी त्या मुलाच्या घरूनच आम्हाला आजीच्या मृत्यूचे खरे कारण कळले. आता या अशा मुलांना आवरायचे कसे?’ हल्लीच्या बहुतांश पालकांना हाच प्रश्न पडलेला दिसतोय.

तरुण पिढी बिघडण्यामागे विभक्त कुटुंबातील कमावते आई-बाप आपल्या एक किंवा दोन मुलांसाठी काहीही करायला तयार असतात, हे कारण फार महत्त्वाचे आहे. आपली घरातील अनुपस्थिती, आपण मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही अपराधी भावना, यामुळे कमावते पालक मुलांना हवी ती वस्तू देऊ लागतात. परिणामी मुलांना ‘नाही’ ऐकण्याची सवय राहत नाही. लहानपणी खेळण्यासाठी हट्ट धरणारा मुलगा दहावीचा टप्पा पार करताच महागडी बाईक मागू लागतो. लहानपणी व्हिडीओ गेम्ससाठी हट्ट करणारी मुलगी पॉश मोबाईल, टॅब मागायला सुरुवात करते. पालकांनी या गोष्टी महाग आहेत किंवा तू अजून लहान आहे, असे सांगितले तर त्या मुलांची एकूण प्रतिक्रिया भयंकर असते. ते काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात, कारण तोवर त्यांची प्रत्येक मागणी पुरवली गेलेली असते.

पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये जे शारीरिक बदल होत असतात, त्या बदलांमुळे त्यांची मानसिक स्थिती अस्थिर असते. त्या काळात त्यांच्यावर बरोबरीच्या मुलांची नको त्या विषयात ‘बरोबरी’ करण्याची धडपड सुरू असते. समजा एका मुलाकडे आयफोन आला तर किमान आठ-दहा मुलं-मुली त्याच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न सुरू करतात. यात जशी पालकांवर दबाव आणून हौस पुरवून घेणारी मुले असतात, तशी चो-या करून हौस पुरवून घेणारी मुले असतात. दर आठ-पंधरा दिवसांनी अशा मोटरसायकल चोरणा-या, सोनसाखळी खेचणा-या, मोबाईल पळवणा-या चांगल्या घरातील अल्पवयीन मुलांच्या बातम्या वाचायला मिळतात. मध्यंतरी तर ताडदेवच्या एका शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या खोलीचा दरवाजा तोडून चाचणी परीक्षेचे पेपर पुन्हा लिहिण्याचा पराक्रम केल्याचे आढळले. ही मुले इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असल्यामुळे त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले नाही, असे शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले होते.

कुमारवयीन मुलांच्या एकूण वर्तनावर विभक्त कुटुंबपद्धती, पालकांमधील ताणलेले संबंध आणि बदलती समाजव्यवस्था याचा जेवढा परिणाम होतो, तेवढाच परिणाम माध्यमांचाही होतो. विशेषत: टीव्हीच्या जाहिराती, मालिका आणि सिनेमामधून आज जे काही या लहान आणि कुमारवयीन मुलांमध्ये झिरपत आहे, ते अत्यंत धोकादायक आहे. टीव्ही या लहान मुलांना महागडे कपडे, अलिशान गाड्या, घरे आणि हाय-फाय जगण्याचे स्वप्न दाखवतो. मालिका वा सिनेमातील नायकाचे जगणे, आपणही जगू शकतो, अशी खोटी आशा निर्माण झाल्यावर या मुला-मुलींचे वास्तव जीवनाशी नाते उरत नाही.

यापूर्वी माध्यमांचा फारसा प्रसार नसल्याने अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक जाणिवा उशीरा जागृत होत असत; परंतु टीव्ही, सिनेमा आणि इंटरनेटने या लहान मुलांमधील कामप्रेरणा खूप लवकर जाग्या केल्या आहेत. या बदलाची कल्पना नसलेल्या पालकांना आपल्या पाल्याचे बदलते वागणे समजत नाही. जगप्रसिद्ध मनोव्यापारतज्ज्ञ डॉ. सिग्मंड फ्रॉइड आणि त्यांच्या सहका-यांनी खूप आधीपासून अल्पवयीन मुलांच्या या मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करून कामप्रेरणेच्या कोंडमा-याने कोणत्या समस्या निर्माण होतात, त्यांचे निराकारण कसे करावे याची जगाला माहिती दिली होती. मुख्य म्हणजे कामवासना दाबल्यामुळे मानसिक आणि लैंगिक विकृती कशी निर्माण होते, हे सिग्मंड फ्रॉइड यांनी सप्रमाण दाखवल्याने जगभरातील मानसशास्त्राच्या अभ्यासाची चौकटच बदलून गेली. पुण्यातील ‘चिल्लर पार्टी’मध्ये ‘अल्पवयीन जोडपी’ मोठ्या प्रमाणात सापडली. थोडक्यात काय तर, आपल्या अवतीभवतीच्या समाजात अल्पवयातच कामवासना जागृत होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. टीव्ही, सिनेमा, इंटरनेटद्वारे मिळणारे ‘ज्ञान’ हे त्याचे मुख्य कारण आहे. या माध्यमांनी अल्पवयीन मुला-मुलींची ‘कामक्षुधा’ वाढवल्यामुळे हल्ली सातवी, आठवीतच प्रेमात पडणे सुरू होते. ‘मॉडर्न’ युगामध्ये दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर मुला-मुलींना एकत्र सिनेमा, पिकनिक, पार्ट्यांना जाण्यास घरातील पालकांकडूनच प्रोत्साहन मिळते; परंतु समजण्याचे वय नसलेल्या या किशोरवयीन पिढीला आपण कुठे जात आहोत, ते कळत नाही आणि त्यामधूनच एकतर्फी प्रेम, प्रेमभंग, ऑनर किलिंग, खून, मारामा-या असे प्रश्न उपस्थित होतात.

हल्ली टीव्हीच्या जोडीला मोबाईल फोनद्वारे ‘हातात’ आलेल्या इंटरनेटच्या आभासी विश्वाने तर या अल्पवयीन मुला-मुलींचे बालपणच हिरावून घेतलेले दिसते. ‘सोशल नेटवर्किंग’च्या जाळ्यात जाणारी ही तरुण पिढी पुन्हा मनाने घरात परतत नाही, हे आई-वडिलांना कळायला फार उशीर होतो.

पुण्याच्या ‘रिव्हर व्ह्यू’मध्ये झालेली बच्चे कंपनीची दारू पार्टी ‘फेसबुक’वरूनच ‘बुक’ करण्यात आली होती, अशी माहिती आता पुढे आली आहे. याचा अर्थच असा होतो की, लिमये आणि चव्हाण यांनी या आधीही अशा पार्ट्या आयोजित केल्या होत्या. पालकांना काहीही कळू न देता मुले-मुली अनेकदा मौजमजा करून घरी येत होते. पालकांना मात्र त्याची काहीच गंधवार्ता नव्हती. यावरून आपल्या मध्यवर्गीय घरातील मुलांचे आणि आई-वडिलांचे संबंध किती दुरावले आहेत हे लक्षात येते. यापुढे हे सगळे थांबवायचे असेल तर समाजातील सर्वच थरातील लोकांनी विचार करण्याची वेळ आली आहे.

हा प्रश्न आता काही घरांपुरता मर्यादित उरलेला नाही. त्याची झळ थोड्याफार फरकाने सगळ्याच मध्यमवर्गीयांना बसताना दिसते. श्रीमंत-अतिश्रीमंत वर्गात हा प्रश्न याआधीच गंभीर झालेला आहे. त्याची झळ अकारण सोसणारे अनेक मान्यवर लोक पाहिले की, कुटुंबातील संस्कारांची नव्याने ‘किंमत’ कळते. एका अब्जाधीश हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाने जमिनीच्या वादातून आपल्या धाकट्या बहिणीला गोळी घालणे किंवा एका धनाढ्य बिल्डरच्या मुलीने आपल्या भावाला संपवण्यासाठी एका एनजीओला सुपारी देणे, हे प्रकार प्रसारमाध्यमांमध्ये उघडपणे चर्चिले जातात. अर्थात हा श्रीमंत वर्ग अल्पसंख्य असल्यामुळे त्यांच्या घरातील लाडक्यांचे प्रताप त्यांनी कुणाला गाडीखाली चिरडले तरच वादग्रस्त ठरतात. अन्यथा त्याकडे कुणी जास्त गांभीर्याने पाहात नाही. परंतु समाजाचा सुकाणू असणा-या मध्यमवर्गातील नवी पिढी जर अशी किडली तर अवघा देश पोखरून निघायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या ‘चिल्लर पार्टी’कडे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे. मुलांचे वर्तन सुधारण्याआधी पालकांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात जगण्याची कला शिकवणे जसे आवश्यक आहे, तद्वत आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान याचा सकारात्मक पद्धतीने कसा वापर करता येतो, हेही मुलांना प्रात्यक्षिकांसह शिकवले पाहिजे. मुलांच्या एकूण वर्तनाची मानसशास्त्रीय चिकित्सा करून त्यांना दरवर्षी लैंगिक शिक्षणाचे धडेही दिले गेले पाहिजेत. तरच आपल्या मुलांच्या वर्तनाला चांगले वळण लागेल. अन्यथा मातीचा गोळा घट्टा झाला की तो निगरगट्ट होतो.. त्याला तुम्ही आकार द्यायला गेलात की तो मोडून पडतो. अगदी याच न्यायाने निराश मुले थेट आत्महत्येचा मार्ग कसा चोखाळतात, हे सगळे पालक जाणतात.. मग तसे वागत का नाहीत?

Categories:

Leave a Reply