Mahesh Mhatre

आधुनिक पत्रकारितेला चटकदार गेयगतीच्या शीर्षकांची नव्याने ओळख करून देणारे आणि जाहिरातक्षेत्राला देखणी मराठी शब्दकळा बहाल करणारे वसंत सोपारकर आज आपल्यात नाहीत. त्यांचे चिरंजीव आदित्य सोपारकर यांनी त्यांच्या आयुष्यावर ‘सो’ हे शब्दचित्रमय पुस्तक सादर केलंय. त्यानिमित्ताने वसंतकाकांना ही शब्दपुष्पांजली..

वसंत ऋतू म्हणजे पृथ्वीच्या, निसर्गाच्या सृजनाचा उत्सव असतो. या ऋतूची अपूर्वाई त्याच्या नवनवोन्मेषशाली निर्मितीमुळे अधिक खुलते. आपल्या शैलीदार लिखाणासाठी आणि कलंदर जीवनासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत सोपारकर यांचे अवघे आयुष्य म्हणजे ‘प्रतिभाविलासाचा अखंड वसंतोत्सव’ होता.प्रतिभावंत पत्रकार आणि देखण्या शब्दकलेचा जाहिरातलेखक ही त्यांची ओळख.. या विविधरंगी, स्वच्छंदी आनंदयोग्याचे समग्र आयुष्य ‘सो’ या शब्दचित्रमय पुस्तकाद्वारे आदित्य वसंत सोपारकर यांनी समोर आणले आहे.


जन्माला आलेला प्रत्येक माणूस जगतो. काही लोक जगायचे म्हणून जगतात, काही लोक एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन जगतात. वसंतकाका आपले आयुष्य मनस्वीपणे जगले. या आनंदमग्न जगण्यात आत्ममग्नतेचा अभिनिवेश अजिबात नसायचा. पोकळ औपचारिकतासुद्धा नसायची. त्यांच्या मनस्वी वर्तनाला मायाळू शब्दांची साथ होती. त्यामुळे पहिल्याच भेटीत कोणीही त्यांच्या प्रेमात पडत असे.

समोरच्या माणसाला समजून घेऊन त्यांच्याशी बोलण्याचे त्यांचे कसब लिखाणातही प्रतिबिंबित होत असे.. मराठीत चटकदार परंपरा वसंतकाकांनी आणली होती. परंतु ‘श्री’ साप्ताहिकानंतर ते पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले, त्यामुळे त्यांच्या लिखाणाची ‘स्टाइल’ दुर्लक्षित राहिली. परंतु जाहिरातलेखनात सोपारकरांनी आपली लेखणी चालवून स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला होता.. व्हील साबण असो वा कासवछाप अगरबत्ती, वसंतकाकांच्या शब्दांनी या वस्तू घराघरात पोहोचल्या, प्रसिद्ध केल्या. ‘सो’ या पुस्तकात त्यांचा अवघा जीवनपट रंगतदार पद्धतीने मांडलेला आहे.

वसंतकाकांच्या आयुष्यात गणेशोत्सवाचे स्थान फार महत्त्वाचे होते. हातातील सारी कामे बाजूला ठेवून वसंतकाका आपल्या गावी वाडयाला येत आणि गणपतीसमोर आपल्या प्रतिभेचे रंग उधळत. यंदा काकांच्या अनुपस्थितीत येणारा पहिला गणेशोत्सव. पण या पुस्तकाने त्यांची अनुपस्थिती जाणवणार नाही.

Categories:

One Response so far.

  1. छान .. एरवी पत्रकाराविषयी फारसे बोलले, लिहीले जात नाही .. कारण तोच सगळ्यांवर लिहीत असतो.. या पुस्तकामुळे एका वेगळ्या पत्रकाराच्या आयुष्याची धाटणी कळेल.. धन्यवाद

Leave a Reply