Mahesh Mhatre

गंगा नदी ही तमाम भारतीयांसाठी केवळ जीवनदायिनी नाही, तर ती पापनाशिनीसुद्धा आहे. म्हणून असेल कदाचित वाराणसी मतदारसंघात पाऊल ठेवण्याआधीपासून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेले नरेंद्र मोदी यांनी गंगास्तुती सुरू केली होती. गंगा स्वच्छतेचा आणि वाराणसीच्या सर्वकष विकासाचा आराखडा घेऊन ते निवडणुकीला सामोरे गेले आणि विजयी झाले. आता गंगा सफाईचे अभियान मोदी किती गांभीर्याने आणि समर्थपणे पुढे नेतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.


गंगा नदी ही तमाम भारतीयांसाठी केवळ जीवनदायिनी नाही, तर ती पापनाशिनीसुद्धा आहे. म्हणून असेल कदाचित वाराणसी मतदारसंघात पाऊल ठेवण्याआधीपासून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेले नरेंद्र मोदी यांनी गंगास्तुती सुरू केली होती. गंगा स्वच्छतेचा आणि वाराणसीच्या सर्वकष विकासाचा आराखडा घेऊन ते निवडणुकीला सामोरे गेले आणि विजयी झाले. आता गंगा सफाईचे अभियान मोदी किती गांभीर्याने आणि समर्थपणे पुढे नेतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. मोदी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी वाराणसीची भूमी निवडून खरे तर आपला मनोदय स्पष्ट केला होता. मोदींमुळे वाराणसी आणि पर्यायाने गंगेला राजकीय वजन आले आहे, त्यामुळे गंगा स्वच्छता हा आजवर धार्मिक आस्थेशी निगडित असलेला विषय पुढे राजकीय मुद्दा बनू शकतो. कदाचित भावी राजकारण या विषयाभोवतीच फिरू शकते. साधारणत: ३२०० वर्षापूर्वी गंगेच्या खो-यात आर्य टोळ्यांच्या आगमनाने मानवी संस्कृती रुजली, फुलली आणि फळली. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह ९ राज्यांतील सुमारे ५० कोटी लोकांना गंगा ‘जीवन’ देते. देशातील एकूण सिंचनाखालील जमिनीपैकी निम्मे क्षेत्र गंगेच्या खो-यात आहे. २५२५ कि. मी. प्रवास करीत गंगोत्रीहून ती सागरापर्यंत जाते. या जलप्रवासात गंगा प्रदूषित करण्याची एकही संधी आम्ही सोडलेली दिसत नाही. कानपूरपासून गंगेत विविध उद्योगांतील रसायनयुक्त पाणी, सांडपाणी, मल-मूत्र, कचरा अशा नको त्या गोष्टी ‘अर्पण’ होत जातात. परिणामी गंगाजल तीर्थ घेण्यासाठी हातावर घेतले तरी हाताला खाज सुटते, अशी अनेक ठिकाणची स्थिती झाली आहे, मग गंगाजल प्राशन करण्याची गोष्टच दूर. तरीही ज्या गावांना, खेड्या-पाड्यांना जलशुद्धीकरणाची सोय नाही, तेथे गंगेचे पाणी पिणे म्हणजे जलजन्य रोगांना निमंत्रण देणे, हे समीकरण बनले आहे. १९७० मध्ये एका सरकारी संशोधनात असे सिद्ध झाले होते की, प्रदूषणाने गंगेच्या ६०० कि. मी. प्रवाहक्षेत्रातील जैवविविधता संपुष्टात आणली होती. सध्याच्या स्थितीत हे प्रमाण कितीतरी पट वाढले आहे. जसजशी गंगेच्या ओटीपोटातील जैवसंपदा नष्ट होत आहे, किना-यावरील वृक्षतोडीने, भूस्खलनाने तिची गती मंद होत आहे, तसतशी गंगा मृत्युपंथाला लागण्याची भीती वाढत आहे. या सा-या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवून पहिल्यांदाच गंगा आणि काशीला राजकीय पटलावर उभे केलेले दिसते. एकीकडे विकासाचे आश्वासन आणि दुसरीकडे धार्मिक आवाहन अशा दुहेरी राजकारणाची कल्पक मांडणी करून मोदी आणि संघ परिवाराने एक नवी खेळी खेळलेली आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आदी सगळ्याच राजकीय पक्षांना भाजपच्या या ‘डावात’ खेळावेच लागणार आहे.. पहिली चाल मोदी-अमित शहांनी केलेली असल्यामुळे सगळी सूत्रे मात्र त्यांच्याच हाती राहतील.. हे वास्तव सगळ्यांनी ध्यानात घेतले पाहिजे.

काशीमधील ती संध्याकाळ अशी अविस्मरणीय ठरेल, असे अजिबात वाटले नव्हते. मतदानाला दोनच दिवस उरलेले असल्यामुळे, अवघे शहर आणि परिसर राजकीय पक्षांच्या मिरवणुकांनी अगदी गजबजून गेला होता. त्यात उन्हाचा कहर इतका की, धडधाकट माणसाची गोगलगाईगत मंदावस्था व्हावी, अशी जिवाची काहिली करणारी गंगेच्या काठावरील ती संध्याकाळ. काशीच्या गल्लीबोळात हरवलेल्या गर्दीपेक्षा कितीतरी बरी, अशी आशा करून मी दशाश्वमेध घाटाच्या पुढील राणा महल घाटाजवळून जात होतो. तेवढय़ात एक ओळखीचा चेहरा हसत माझ्या दिशेने येताना दिसला. राजू त्याचे नाव. अत्यंत बडबड्या, विदेशी पर्यटकांचा ‘गाईड’ म्हणून तर देशी लोकांसाठी नावाडी, वाटाड्या म्हणून काम करणारा. ‘चलीये, गंगा मय्या मे सैर करेंगे,’ असे म्हणत, माझ्या होकाराची वाट न बघता, तो घाटाच्या पाय-या उतरू लागला. सूर्य मावळतीला गेल्यामुळे गंगेच्या पाण्यावर प्रकाशाची आरास उतरली होती. होड्यांच्या आसपास प्लॅस्टिकचे चहाचे कप, बाटल्या, अर्धवट सडलेल्या फुलांच्या माळा अशा नको त्या गोष्टी तरंगत होत्या. तोंडातील पान घाटाजवळील दगडावर थुंकत राजू होडक्यात चढला. त्याला मी काही बोलणार, एवढय़ात तो वल्ही हातात घेता-घेता थोडा वाकला, गंगेच्या पाण्याची ओंजळ तोंडात घेऊन अगदी सहजपणे चूळ भरून मोकळा झाला. त्याच्या तोंडातील लालसर पाणी काही क्षण एका रेषेत तरंगताना दिसले. जवळच आंघोळ करणा-या लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते. ‘गंगा मय्या की जय’च्या जयजयकाराने अवघा गंगा किनारा निनादून निघाला होता.

वल्ह्यांचा सपक-सपक आवाज करीत होडी घाट मागे टाकण्याच्या घाईत होती. गंगेच्या मध्यावर पोहोचेपर्यंत माणसांचा कोलाहल कमी झाला होता. दूरवरून दिसणारे गंगेचे घाट आणि त्यांचा इतिहास अनेक रंगीबेरंगी कथांसह राजूच्या मुखातून शब्दबद्ध होत होता, जणू एखादी जिवंत ‘डॉक्युमेंटरी’ सुरू होती. खरे सांगायचे तर काशीत येण्यापूर्वी येथील राजकीय समीकरणापेक्षा सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक इतिहासाचे मिळतील तेवढे संदर्भ वाचून काढले होते. डायना इकने मोठय़ा परिश्रमपूर्वक लिहिलेले ‘बनारस : सिटी ऑफ लाईफ’, विश्वनाथ मुखर्जी यांचे मिश्कील आणि खुसखशीत ‘बना रहे बनारस’, पुष्पा त्रिलोकेकर यांचे ओघवत्या शैलीतील ‘प्रकाशनगरी काशी’, डॉ. देवदत्त यांचे ‘मिथ अ‍ॅण्ड मिथ्या’ ही पुस्तके वाचलीच, पण पं. राहुल सांकृत्यायन यांचे ‘व्होल्गा ते गंगा’चे पुन्हा एकदा ‘पारायण’ केले होते. राजूच्या ‘रनिंग कॉमेंट्री’मुळे मात्र अनेक नवे संदर्भ समोर येत होते. हरिश्चंद्र घाटाजवळ एक प्रेतयात्रा आलेली दिसली. त्या प्रेतयात्रेतील लोकांची गर्दी जवळ आल्यामुळे असेल कदाचित आधीच धडाडून पेटलेल्या चितांमधील अग्नी अधिक जोमाने आकाशाच्या दिशेने झेपावला होता. तिरडीवरील प्रेत गंगेच्या काठावर ठेवले, तसे मी राजूला म्हणालो, ‘वहा चलो.’ आम्ही हरिश्चंद्र घाटाजवळ पोहोचेपर्यंत काही जाणत्या लोकांनी त्या प्रेताला गंगास्नान घडवण्यास सुरुवात केली होती. एव्हाना संध्याकाळ अधिक गहिरी होत चालली होती. इकडे एका प्रेताचे ‘स्नान’ सुरू होत असताना, त्याच्या अगदी जवळच उभ्या असलेल्या एका होडीवर लगबग सुरू होती. माझे तिकडे लक्ष वेधत राजू म्हणाला, ‘वो देखो, डेडबॉडी गंगा मे छोडने जा रहे है.’ मी लगबगीने फोटो काढायचा प्रयत्न करू लागलो, पण आमच्या चाहुलीने गोंधळलेला नावाडी खूप वेगाने खोल पाण्याच्या दिशेने निघाला होता. मी नजरेने त्याचा पाठलाग करीत बसलो. गंगेच्या मध्याजवळ दगडाने बांधलेले ते प्रेत पाण्यात फेकण्यात आले. सांजभरले गंगाजल थरारले आणि क्षणात आपले तरंग आवरून-सावरून स्थिर झाले. जणू काही घडलेच नाही. इकडे गंगेच्या सर्व घाटांवरील लक्ष-लक्ष दिवे प्रकाशमान झाले होते. काळ्याशार गंभीर गंगाजलातील त्या तेजोशलाकांची किळस वाटू लागली होती. एवढय़ात एक पंधरा-सोळा वर्षाची चुणचुणीत मुलगी होडी वल्हवत आमच्या दिशेने आली. ‘बाबूजी गंगा मय्या की आरती किजीए, सिर्फ दस रुपयें में,’ असा आग्रह करू लागली. तिच्या आग्रहाला घाटावरील गंगा आरतीची जोड मिळाली होती, पण माझ्यासमोर पापी माणसाला पावन करणारी गंगा, गटारगंगा बनलेली दिसत होती. संपूर्ण वाराणसी शहरातील घाण-मैला, लगतच्या हॉटेल्समधील मल-मूत्र आणि सडलेल्या, जळलेल्या प्रेतांनी गंगेच्या पात्राला ‘कुपात्र’ करून टाकलेले दिसत होते. त्या आर्जव करणा-या मुलीच्या हाती दहा रुपयांची नोट टेकवत, मी तिने दिलेल्या दिव्याचा द्रोण तिच्याच होडीत ठेवला. ते पाहून राजू सहजपणे म्हणाला, ‘साहब, आपके इक दियेसे थोडीही गंगा मय्या मैली हो रही है. पुरे काशी का मैला इसमे आता है. पहले उसे रोकना पडेगा, तब गंगा निर्मल होगी.’ मी त्याच्याकडे पाठ करून गंगेच्या विशाल पात्राकडे बघत बसलो..

नगाधिराज हिमालयाच्या कुशीत गंगोत्री येथे गंगेचा उगम आहे. उगमापासून सागर संगमापर्यंतचा २५२५ किलोमीटरचा गंगेचा प्रवास हा आज जागतिक संशोधनाचा आणि चिंतेचा विषय बनलाय. नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून विजयी झाल्यानंतर फक्त काशीच्या परिसरातील गंगा शुद्धीकरणाकडे लक्ष दिलेले दिसते. त्याऐवजी व्यापक भूमिका घेणे गरजेचे आहे, कारण आजही कितीही प्रदूषित असली तरी भारतातील एकूण पाण्यापैकी सुमारे २५ टक्के पाणी गंगेच्या पात्रातून मिळते. तिच्या दोन्ही किना-यांवर वसलेल्या ३० मोठय़ा शहरांतील, ऐंशी गावांतील आणि असंख्य खेड्या-पाड्यांतील सुमारे ५० कोटींहून अधिक लोकांचा गंगा ‘जीवनाधार’ आहे, पण स्वत:ला गंगापूजक म्हणवणा-या दांभिक भारतीयांनी आपल्या प्रदूषित हातांनी हा ‘आधार’ तोडण्याचा एककलमी कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलाय. तो वेळीच रोखला नाही, तर कालांतराने गंगासुद्धा सरस्वतीप्रमाणे लुप्त होईल, पृथ्वीवरून गुप्त होईल.

उगमापाशी अत्यंत शुद्ध, स्वच्छ आणि खळाळती गंगा ऋषिकेशपर्यंत, पहिल्या १४२ मैलांच्या प्रवासापर्यंत खूप सुंदर दिसते. तिचे नितळ, आरस्पानी रूप, तिच्या भारदस्त प्रवाहाचा जबरदस्त ओघ आणि तिच्या कुशीत फुललेले मानवी जीवनाचे मळे, सारे काही विलक्षण, मनाला वेड लावणारे. त्यामुळेच असेल कदाचित अनेक पिढय़ांपूर्वी गंगेच्या खो-यात येऊन स्थिरावलेल्या लोकांनी तिला ‘मय्या’, ‘आई’ हाक मारायला सुरुवात केली असावी. उगमापासून गंगा आपल्याला विविध रूपांत भेटते. शिवाच्या सान्निध्यात रुद्रावतार धारण करणारी म्हणून ‘रुद्र गंगा’, विपुल खनिजांचा जीवनोपयोगी खुराक आपल्या पिलापाखरांसाठी पोटात साठविणारी ‘कृष्णगंगा’ किंवा ‘नीलगंगा’ म्हणून ती ओळखली जाते. ऋषिकेशपर्यंत तिच्या शुभ्रधवल रंगाला माणसांची नजर लागलेली नसते म्हणून ती ‘धवलगंगा’ असते. प्रयागच्या त्रिवेणी संगमापर्यंत गंगेची ही शुभ्रता काही प्रमाणात टिकते. कारण प्रयागच्या त्रिवेणी संगमांवर जेव्हा ती यमुनेला भेटते त्या वेळी कृष्णप्रिया कालिंदी यमुनेच्या सावळ्या रंगापेक्षा गंगारूप वेगळे असते. तुम्हाला सहज नजर टाकताच गंगा आणि यमुनेच्या पाण्यातील फरक लक्षात येतो. गुप्त झालेली सरस्वतीही या संगमात सहभागी झालेली आहे, असा लोकांमध्ये समज आणि भाविकांमध्ये श्रद्धा आहे. आपल्या पूर्वजांनी चुकीच्या पद्धतीने सरस्वतीचे पाणी अडवण्याचा आणि फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या जीवनसलिला सरस्वतीचा प्राणरस आटून गेला, हे सर्वश्रुत आहे. अन्यथा कर्पूरगौर शिवप्रिया गंगेच्या पांढ-याशुभ्र, कन्हय्यासखी यमुनेच्या नीलकृष्ण रंगाबरोबर ‘तुषार हार धवला’ सरस्वतीही भेटली असती. असो, आता जे हातातून गेले आहे, त्याबद्दल अश्रू ढाळण्यापेक्षा जे आहे ते टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

गंगेचे पावित्र्य, शुचित्व आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व टिकविण्याचे आजवर अनेक प्रयत्न झाले. १८५७च्या स्वातंत्र्यलढय़ात गंगा आणि वाराणसीला मिळालेले महत्त्वाचे स्थान महात्मा गांधी जाणून होते. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच गंगा सफाई अभियानाची गरज वारंवार व्यक्त केली होती, त्यानंतर ‘भूदान आंदोलना’चे प्रणेते विनोबा भावे यांनी गंगेच्या स्वच्छतेसाठी मोठय़ा प्रमाणात जनजागरण घडवून आणले, पण स्व. राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर गंगा शुद्धीकरणाला सर्वप्रथम शासकीय पातळीवर सुरुवात झाली होती. सरकार आणि लोकांमधील दरी कमी करत राजीव गांधी यांनी ‘गॅप’ (गंगा अ‍ॅक्शन प्लॅन) समोर आणला. अर्थात, या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेत त्यांनी सर्व संतमहंतांना, मठ-मंदिरांच्या प्रमुखांना सोबत घेतले होते, जेणेकरून या शुद्धिमोहिमेला लोकांचा पाठिंबा मिळेल. विज्ञाननिष्ठा जोपासणा-या, संगणक आणि दूरसंचार क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणा-या राजीवजींनी ‘मला गंगा मय्याने हाक दिली म्हणून मी तिचा पुत्र हे सफाई अभियान घेऊन आलो आहे’, असे एकदाही उद्गार काढले नाहीत किंवा गंगेची आरती करून आपल्या मोहिमेची यशापूर्वीच जाहिरात केली नाही, तरीही त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना सामान्य माणसांनी, भाविकांनी चांगलेच उचलून धरले होते. राजीवजींनी गंगासफाई हे आपली आई इंदिरा गांधी यांचे स्वप्न होते, असे सांगून १४ जून १९८६ रोजी ‘गॅप’चे वाराणसी येथे उद्घाटन केले. त्या वेळी केलेल्या भाषणात ते पुढे म्हणाले, ‘आपण सर्वानी गंगेच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. वाराणसीतून सुरू झालेला हा उपक्रम देशाच्या कानाकोप-यांत अगदी छोटय़ा-मोठय़ा नदी-नाल्यापर्यंत पोहोचला पाहिजे.’ थोडक्यात सांगायचे तर गंगेच्या शुद्धीकरणासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू झाले होते. शासकीय निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. स्वत: पंतप्रधानांकडे ‘गॅप’चे अध्यक्षपद असल्यामुळे सर्व कामे वेगात सुरू झाली होती, पण पुढे राजीवजींची निर्घृण हत्या, अस्थिर केंद्र सरकारे आणि राजकीय स्थित्यंतरात ‘गॅप’कडे सर्वच पंतप्रधानांनी दुर्लक्ष केले. परिणामी गंगासफाईचे काम ‘हात की सफाई’ दाखविण्यात तरबेज असणा-या नोकरशहांसाठी चरण्याचे कुरण बनले. आजवर या कामावर शासनाकडून २ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. तरीही गंगा दिवसेंदिवस अधिकाधिक मैली होत आहे.

ज्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे नरेंद्र मोदी आता प्रतिनिधित्व करत आहेत, तेथून सलग पाच वेळा भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. वाराणसीतून निवडून येणा-या मुरली मनोहर जोशी यांनी केंद्रात महत्त्वाचे मंत्रीपद भूषविलेले आहे, शिवाय गेली २७ वर्षे वाराणसी शहराचे पालिका प्रशासनही भाजपच्याच हातात आहे, पण अधिकृत आकडेवारीनुसार काशीतील गंगेत जेवढे मानवी विष्ठेचे प्रमाण आहे, तेवढे जगाच्या पाठीवरील कोणत्याही नदीत नाही आणि म्हणूनच येथे नरेंद्र मोदी यांच्या गंगा सफाई मोहिमेचा खरा कस लागणार आहे.

पंतप्रधानांच्या सगळ्याच घोषणा किंवा ध्येयधोरणे त्यांच्या हाताखालील लोक गांभीर्याने घेतातच असे नाही. विशेषत: गंगास्वच्छतेच्या बाबतीत आजवरच्या सर्वच पंतप्रधानांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या, परंतु परिस्थिती बदलली नाही. कारण या सगळ्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणा-या जलसंशोधक आणि शासकीय अधिका-यांनी हातमिळवणी करून सफाईचे उद्दिष्टच बदलले. ‘गॅप’चे मूळ उद्दिष्ट गंगेच्या पाण्यातील प्रदूषण कमी करून तेथील जैवविविधता वाढवणे हा होता. त्याद्वारे पाण्याची शुद्धता तर वाढलीच असती शिवाय एकूण गंगेच्या खो-यातील जीवनमानावर त्याचा चांगला परिणाम झाला असता, पुढे गंगेच्या शुद्धीकरणाचा हा प्रयोग देशातील अन्य नद्यांच्या सर्वागीण विकासासाठी वापरणे हा ‘गॅप’चा खरा अजेंडा होता, पण तत्कालीन नियोजन आयोगाचे सदस्य असणा-या प्रा. एम. जी. के. मेनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका समितीच्या बैठकीत ‘गंगेचे पाणी लोकांना आंघोळीसाठी योग्य करणे’ एवढय़ापुरते ‘गॅप’चे काम मर्यादित करण्याचे ठरले. माझ्या मते, त्या एकाच निर्णयाने गंगा सफाई अभियान ‘पाण्यात गेले’ असावे. सरकारचे दोन हजार कोटी रुपये खर्चूनही त्याचा सुपरिणाम गंगेच्या पाण्यावर झालेला दिसत नाही. ‘गंगापुत्र’ मोदींनी आपली पुढील ध्येयधोरणे आखताना या ताज्या इतिहासाची दखल घेतली पाहिजे.

गंगेचे प्रदूषण टाळणे आणि तिला पूर्णपणे शुद्ध करणे ही गोष्ट तमाम भारतीयांना भावनिकदृष्टय़ा मोहवणारी आहे. मोदींच्या आधी संघपरिवाराने राम शिलापूजनाच्या सोबत गंगापूजनाच्या यात्रा देशभरात काढून हिंदुत्वाला अधिक लोकमान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला होता. कारण गंगा ही आजही भारतीय समाजमनात खळाळत वाहते. भारतीय मग तो कोणत्याही पंथ, परंपरा वा सांस्कृतिक घटकाशी संबंधित असो, त्याला मरताना गंगेचे तीर्थ ओठात घेऊन हे जग सोडायची इच्छा असते. गंगेचे, यमुनेचे, सरस्वती वा नर्मदेचे आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी प्राशन केलेले पाणी पिढय़ान् पिढय़ा आपल्या हृदयात साठलेले असावे. म्हणूनच असेल कदाचित नळावर आंघोळ करतानाही ‘गंगेच, यमुनैच’ अशा शब्दातून हे जलसंस्कार तन-मन चिंब भिजवून टाकतात. अशा भारतीय अस्मितेचे प्रतीक असणा-या गंगेची शुद्धता करण्यास नव्या सरकारने प्राधान्य देणे, ही खूप चांगली घटना आहे.

गंगेतील प्रदूषण वाढण्यास, तिच्या पात्रातील जैवविविधता नष्ट होण्यात, गंगेचा चांगुलपणा कारणीभूत ठरलेला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. ‘‘गंगा ही सगळ्या वाईट गोष्टींचे चांगल्यात रूपांतर करणारी नदी’’ हा आपल्याकडील ‘पुराणप्रसिद्ध’ समज. ती जशी पापी माणसाला पुण्यवान करते तद्वत कच-याचेही कल्याण करते, अशी आजवरची समाजमान्यता. अगदी गंगेत आत्महत्या करा किंवा तुमचे प्रेत गंगार्पण करा, तुम्हाला गंगेतून स्वर्गात जाण्याचा ‘शॉर्टकट’ उपलब्ध आहे, अशी भावना आम्ही अनेक शतके जोपासली. त्यामुळे खरे तर ज्या गंगेच्या पाण्यात हिमालयातील, विविध द-या-खो-यांतील चांगली खनिजद्रव्ये वाहून येत, त्यामुळे गंगाजल हे अन्य नद्यांच्या पाण्यापेक्षा वेगळे होते. ते अनेक वर्षे देव्हा-यातील कलशात टिकायचे, नदीतील जैवविविधतेमुळे येणा-या मल-मूत्र वा प्रेताची विल्हेवाट लावणे शक्य होते. त्यामुळे देशातील अन्य नद्यांच्या तुलनेत गंगेचे पाणी शास्त्रीय संशोधनातही जास्त शुद्ध होते हे सिद्ध झाले. पण गंगेच्या ‘सगळे काही पोटात सामावून घेण्याच्या वृत्तींमुळे’ स्वार्थी माणसांचे फावले आणि गंगेने सत्त्व गमावले. प्रदूषणाने गंगेचे पावित्र्य, सौंदर्य आणि समाथ्र्य क्षीण केले आहे. तरीही वाराणसी येथे गंगास्नान करणे आणि काशीविश्वेश्वराचे दर्शन घेणे या दोन गोष्टी बहुतांश हिंदू भाविकांच्या मनात कायम घर करून असतात. वाराणसी हे नाव काशीला ‘वरुणा’ आणि ‘असी’ या दोन नद्यांमुळे मिळालेले आहे. वरुणा व असी गंगेला ज्या ठिकाणी मिळतात ते स्थान म्हणजे वाराणसी. काशीत फिरताना मी मुद्दाम या दोन्ही नद्या पाहायला गेलो, पण त्यांच्या जागी दिसले कच-याने खचाखच भरून वाहणारे नाले. काशीत सुमारे चौ-यांशी घाट आहेत, होडीतून ते सारे पाहायचे म्हणजे संपूर्ण दिवस हवा. ते शक्य नव्हते म्हणून असी घाट ते मनकर्णिका घाट हा फेरा मारला. प्रत्येक घाटावरील मठ-मंदिरांच्या हॉटेल्स आणि घरांच्या गर्दीतून सांडपाणी, मल-मूत्र वाहून नेणारे भलेमोठे पाइप गंगेच्या प्रवाहात सोडलेले दिसत होते. मधेच एखाद्या गाय-बैलाचा फुगलेला मृतदेह गंगेच्या पाण्याबरोबर हेलकावत असलेला दिसायचा.

राजू नावाडी त्याला चुकवत होडी वेगाने हाकत असताना मी त्याला विचारले, ‘दिवस-रात्र गंगेला पाया पडणारे हे लोक आपली घाण नदीत कशी टाकतात? स्थानिक पालिका प्रशासन त्यावर काहीच का करत नाही.’
थोड्याशा खिन्नपणे तो उद्गारला, ‘आपको भारतेंदु हरिंश्चंद्र मालुम होंगे ना’, मी मान डोलवली ‘भारतेंदुजी तो हिंदी साहित्य के भीष्म पितामह थे. उन्हे कौन नही जानता.’

यावर उत्साहित होऊन राजू उद्गारला, ‘तो फिर सुनिये काशी की इस सब स्थितीपर भारतेंदुजी क्या कहते है..

देखी तुमरी कासी, लोगो देखी तुमरी कासी।
जहाँ विराजे विश्वनाथ.. विश्वेश्वरजी अविनासी॥
आधी कासी भाट भंडेरिया, ब्राह्मन और संन्यासी।
आधी कासी रंडीमुंडी, राँड खानगी खासी॥
लोक निकम्मे भांगी गंजड लुच्चे बे – विसवासी।
महा आलसी झूठे शुहदे बेफिकरे बदमासी॥
आप काम कुछ कभी करे नही कोरे रहे उपासी।
और करे तो हँसी बनावे उसको सत्यानासी॥
देखी तुमरी कासी, लोगो..

Categories:

Leave a Reply