जगातील अवघी मानवजात नद्यानाल्यांच्या आश्रयाने राहिलेली आणि वाढलेली पाहायला मिळते. मानवी संस्कृतीमध्ये व्होल्गा ते गंगा हा जीवनप्रवास कशा पद्धतीने झाला, याचे अत्यंत सुरेख चित्रण राहुल सांकृत्यायन यांनी ‘व्होल्गा से गंगा’ या पुस्तकामध्ये केलेले आहे. त्या एकूण सांस्कृतिक प्रवाहामध्ये माणसे पाण्याच्या दिशेने कशी सरकत गेली आणि पाण्याबरोबर त्यांची जीवनगंगा कशी वाहत गेली, हे आपल्याला वाचायला आणि अनुभवायलाही मिळते. गेल्या अनेक शतकांपासून झालेला हा माणसांचा प्रवास, तो या गंगेच्या खो-यामध्ये आल्यानंतर स्थिरावलेला दिसतो, विशेषत: गंगेतील खो-यातील हा माणसांचा प्रवास जास्त करून काशीमध्ये आल्यानंतर गंगेबरोबर वसलेला आहे आणि त्या एकूणच मानवी जीवनाला गंगेने फक्त स्थिरता दिलेली नाही तर काशीच्या परिसरात तिला एक वेगळ्या प्रकारची संपन्नता आणि समृद्धता दिलेली दिसते. त्यामुळेच असेल कदाचित काशीतील गंगा आणि तेथील विश्वनाथ अवघ्या भारतवर्षासाठी पूजनीय बनले असावेत.
गंगेने आजवर अनेक अभिसरणे अनुभवली आहेत. अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे पाहिलेली आहेत. आज नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्यातील निवडणुकीच्या निमित्ताने गंगेचे पाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने ढवळून निघताना दिसते. परंतु या शहराने गेल्या अनेक शतकांपासून अशी सांस्कृतिक घुसळण अनेकदा बघितलेली आहे. औरंगजेबाचे स्मरण आजही काशीत जाणा-या प्रत्येकाला आवर्जून व्हावे, असा स्थानिक पंडे-ब्राह्मणांचा प्रयत्न असतो. कारण औरंगजेबाने काशीमधील सुप्रसिद्ध विश्वनाथांचे मंदिर पाडले होते. आज ज्या मंदिरात काशी विश्वेश्वराची पूजा केली जाते, त्याच्या बाजूलाच औरंगजेबाने बांधलेली मशीद उभी असलेली पाहायला मिळते. त्या औरंगजेबाचे भाऊ दारा शिको यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील ५२ उपनिषदांचा पर्शियन भाषेत अनुवाद केला होता. म्हणजे एका भावाने काशीतील धर्मसंस्कृतीचा विध्वंस केला तर दुस-याने या देशातील धर्मतत्त्वज्ञान जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जगभरातील विद्वानांना भारतीय तत्त्वज्ञान काय आहे हे, दारा शिको यांनी पर्शियन भाषेत उपनिषदांचे भाषांतर केल्यानंतर कळले. त्यानंतर पाश्चिमात्य विद्वानांचा काशी किंवा बनारसकडे ओढा मोठय़ा प्रमाणावर वाढला होता. ही गोष्ट आज नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकूण राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला प्रकर्षाने लक्षात घ्यावीशी वाटते. आपल्या देशात सुरू असलेला एकांगी धार्मिक प्रचार किती चुकीचा आहे, हे काशीत फिरताना स्पष्टपणे जाणवते. गंगेच्या पाण्याने आम्हाला पाणीदार बनवले आहे, म्हणून आम्ही क्रूरकर्मा औरंगजेबाचा द्वेष करायचा आणि सद्वर्तनी आणि विचारवंत दारा शिकोला विसरायचे का?
‘पृथ्वीतलावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, तरीपण त्या सर्व तीर्थक्षेत्राचे पुण्य एकत्र केले तरी त्याची बरोबरी त्या काशीक्षेत्रातील एका धुळीच्या कणाबरोबरसुद्धा होऊ शकणार नाही. अनेक नद्या समुद्राच्या दिशेने वाहत नाहीत का? तरीपण त्या सर्व नद्यांची तुलना आपण स्वर्गातून आलेल्या काशीच्या गंगेबरोबर करू शकतो का? या जगात मोक्षासाठी अनेक पवित्र स्थळे आहेत, परंतु काशीच्या छोटय़ा भागाबरोबरसुद्धा या सर्व स्थळांच्या माहात्म्याची तुलना करता येणार नाही. काशीमध्ये गंगा, शिव आणि काशी असा त्रिवेणी संगम झालेला आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर जो तुम्हाला आनंद मिळतो तो मोक्षाकडे नेणारा परमानंद आहे, त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही.’
‘काशीखंडा’मध्ये हे जे वाराणसीचे वर्णन आलेले आहे, या वर्णनावरून आपल्याला काशीचे हिंदू धर्मामध्ये असलेले माहात्म्य लक्षात येते. लहानपणापासून मी एक म्हण ऐकत आलो आहे. ‘काशीसी जावे नित्य वदावे’ म्हणजे मी काशीला जाईन, काशीला जाईन असे आपण सातत्याने बोलत राहावे, असे वयोवृद्ध माणसांच्या तोंडून ऐकायला मिळायचे. त्याचे कारण एकच आहे, ते म्हणजे काशीचे हिंदू धर्मामध्ये असलेले अनन्यसाधारण महत्त्व. जगातील अनेक जुन्या शहरांमध्ये ज्या शहराचे वर्णन करता येईल असे काशी हे एक तीर्थक्षेत्र आहे. आजवर जगातील जेरुसलेम, अथेन्स किंवा बिकिंगसारख्या जुन्या शहरांबद्दल आपण ऐकलेले आहे, परंतु काशीचे माहात्म्य त्या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे आणि काशीला भारतीय समाजमनामध्ये एक प्रतिष्ठा आहे. ती प्रतिष्ठा कशामुळे आली, हेसुद्धा बघणे एक मनोरंजक आहे.
काशी या नावातच या नगरीचे वेगळेपण दडलेले आहे. ‘काश’ या धातूपासून काशी हा शब्द निर्माण झाला. काश म्हणजे प्रकाशमान होणे आणि त्यामुळे जी प्रकाशमान होते ती काशी. आजवर काशीबद्दल खूप ऐकले होते, काशीबद्दलच्या आख्यायिका, कथा ऐकल्या नाहीत असा माणूस भारतामध्ये सापडणार नाही. मी सात वर्षापूर्वी जेव्हा जेरुसलेमला गेलो होतो, तेव्हा जेरुसलेममध्ये फिरत असताना जेरुसलेमच्या एकूण जुनेपणाबद्दल, प्राचीनत्वाबद्दल तिथले लोक ब-यापैकी बोलताना आढळले.
तिथले लोक जेरुसलेमचा इतिहास काळानुरूप कसा बदलत गेला, हे सांगायचे. जेरुसलेम या शहरामध्ये ज्युडाईजमच्या बरोबर ख्रिश्चन, इस्लाम हे तिन्ही धर्म रुजले, वाढले, फोफावले आणि जगभरात गेले. त्यामुळे जेरुसलेमबद्दल सर्वसामान्य ख्रिस्ती, मुस्लीम आणि ज्यू लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे. त्या भागातील या तिन्ही धर्माची तीर्थस्थळे बघत असताना मला सतत वाटायचे, आपण काशीमध्ये जाऊन, आपल्या भारताची एकूण संस्कृती या शहराशी निगडित कशी आहे, हे बघितले पाहिजे.
सर्वसामान्य माणसांचे एकूणच जगणे आणि मरणे या शहराशी निगडित आहे. तसे पाहायला गेले तर पूर्वीच्या काळी काशीची तीर्थयात्रा ही खूप कठीण गोष्ट होती. तुम्ही गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास’ हे १८५७च्या बंडाच्या काळातले प्रवासवर्णन वाचल्यानंतर लक्षात येते की, त्या काळातील सर्वसामान्य माणसांसाठी काशीपर्यंत जाणे म्हणजे किती खडतर तपश्चर्या होती. काशीला जाण्यासाठी माणसे किती आटापिटा करत, हेही त्या पुस्तकावरून लक्षात येते. तसे पाहायला गेले तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या सगळ्या जुन्या गोष्टी, प्रवासवर्णने किंवा घटनेचा इत्थंभूत आढावा घेत जगणे किंवा लिहिणे, ही आपल्या देशामध्ये परंपरा नव्हती आणि त्यामुळे असेल कदाचित, काशीपर्यंत येण्याचा जो सगळा लोकांचा प्रवास असायचा, तो आतापर्यंत शब्दबद्ध झाला नव्हता.
आता ब-याच इंग्रजी लेखकांनी काशीसंदर्भात पुस्तके लिहून ती उणीव भरून काढली आहे. तत्कालीन समाजात एक म्हण मोठय़ा प्रमाणात प्रसिद्ध होती, ‘पड पड कुडी गंगा भगीरथीच्या तीरी’ याचा अर्थ असा होता की, मला मरण आहे, हे मरण आले तरी ते गंगा, भगीरथीच्या तीरीच यावे. जेणेकरून मला मोक्षप्राप्तीकडे जाण्याचा मार्ग मिळेल. तर अशा या भारतीयांच्या मनामध्ये अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेल्या शहराला गेल्या काही महिन्यांपासून एक वेगळे स्वरूप प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळते आहे. जी काशी आजपर्यंत हिंदूंचे पवित्र धर्मस्थळ म्हणून ओळखली जायची, ज्याच्याशी सर्वसामान्य माणसाशी आस्था निगडित होती, त्या शहराला पहिल्यांदा राजकीय पटलावर अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. सगळ्यात मोठे कारण म्हणजे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काशी-वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय. त्यांना आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा काशीमधून निवडणूक लढवण्याचे ठरवले. त्यामुळे कधी नव्हे तेवढे राजकीय महत्त्व काशीला आले आहे.
इतकेच नव्हे तर संपूर्ण राजकारणामध्ये या काशीबद्दल किंवा काशीतील समस्यांसंदर्भात, येथील गंगेच्या पावित्र्याबद्दल आणि शुद्धतेबद्दल, येथील घाटांच्या एकूण व्यवस्थेबद्दल आणि दुरवस्थेबद्दल सर्व राजकीय पक्ष बोलायला लागले. इथला राहणारा, मग तो ज्याच्या हाताने बनणा-या बनारसी शालूंना जगभर प्रसिद्धी आहे असा बुनकर (विणकर) समाज असेल किंवा सर्वसामान्य भाविकांना मोक्षाची वाट दाखवणारा आणि त्यांच्या धार्मिक कर्मकांडावर ज्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, असा ब्राह्मण वर्ग असो अथवा त्याहून अत्यंत महत्त्वाचा म्हणजे या काशीतून व्यापार करणारा पुरातन काळापासून या शहराच्या ऐश्वर्यात भर टाकणारा वैश्य वर्ग असो, या तिन्ही समाजघटकांमध्ये आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याची जी चुरस निर्माण झालेली आहे, ती बघण्यासारखी आहे.
त्यामुळेच असेल कदाचित, सध्या देशभरातील ३० ते ४० हजार कार्यकर्ते भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा प्रचार करण्यासाठी काशीमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्या राजकीय प्रचारात काशीविषयी बरेच अज्ञान दिसते. त्या अज्ञानाचा काळोख या काशीवास्तव्याच्या निमित्ताने जावा, एवढीच अपेक्षा.
काशीतील प्रकाशामागे निसर्गाचे गुपित आहे. निसर्गाने जो वरदहस्त गंगेला बहाल केलेला आहे, त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. हिंदूंची जी श्रद्धा आहे ती दक्षिण दिशा. ही यमाची दिशा आहे आणि यमाची दिशा टाळून गंगा उत्तरेकडे परत निघाली. उत्तरेऐवजी तिने पूर्वेचा रस्ता पकडला, त्यामुळे गंगेकडे मोक्षदायिनी म्हणून पाहिले जाते. ब-याच लोकांना या गोष्टीची कल्पना नसेल की, शंकराच्या त्रिशुळावर वसलेली काशी अधांतरी वसलेली आहे, असा जो समज आहे, तो निर्माण होण्याचे विशिष्ट कारण आहे.
काशीमध्ये जी गंगानदी येते, ती दोन उंच टेकाडाच्या डुवाबामधून माघारी येते. ती पूर्वेकडे निघते, त्यामुळे तिला चंद्राकृती असा एक आकार मिळालेला आहे. आपल्याकडे जशी पंढरपूरला चंद्रभागा आहे, तशाच प्रकारे काशीला आलेल्या गंगेला चंद्राकार मिळाला आहे. गंगा नदीच्या पूर्वेला काशी शहर वसलेले आहे. सूर्योदयानंतर नदीच्या काठावर वसलेल्या शहरावर सूर्याची किरणे येतात, तेव्हा ती दुहेरी येतात. म्हणजे गंगेच्या पाण्यात पडतात आणि तिथून ती मध्ययुगीन काळाच्या किंवा त्याहून प्राचीन इमारतीवर परावर्तित होतात. त्यानंतर अवघे शहर लख्ख प्रकाशाने भरून गेलेले दिसते. त्यामुळेच असेल कदाचित काशीनगरीमध्ये सूर्योदय पाहणे ही एक विलक्षण आनंददायी गोष्ट असते.
सकाळच्या वेळेला सूर्योदय होण्याच्या आधीपासून साधारणत: साडेचार-पाच वाजल्यापासून पूर्व दिशेला लालिमा पसरलेला असतो. त्या पूर्वेचे तांबडे गंगा नदीच्या पात्रांमधून लखलखायला लागलेले असते. सगळीकडे अत्यंत वेगळ्या प्रकारची ऊर्जा भरलेली असते. गंगेच्या काठावर माणसांची लगबग इतकी असते, की सर्व म्हणजे साठहून अधिक घाट माणसांनी गजबजून गेलेले असतात. मंदिरातून घंटा किणकिणायला लागलेल्या असतात आणि मोठय़ा प्रमाणावर संस्कृत श्लोक आसमंतात घुमायला लागतात. दुपारच्या वेळेलासुद्धा संपूर्ण आसमंत या परावर्तित होणा-या पाण्याने एकदम लखलखून गेलेला असतो. त्यामुळे आपल्याला लक्षात येते की, काशीचा काश म्हणजे प्रकाशनगरी या शब्दाशी का संबंध आलेला असेल. संध्याकाळच्या वेळेची तर हवा वेगळीच असते. सूर्य जरी अस्ताला निघाला असला, तरी त्याची किरणे गंगेच्या पात्रावर रेंगाळत असतात.
बराच उशिरापर्यंत गंगेचा काठ या सूर्यकिरणांनी लखलखत असतो आणि या मावळत्या सूर्यकिरणांची आभा आकाशातून नष्ट होण्याचा जरासा अवकाश की, गंगेच्या काठावरचे सर्व घाट लक्षलक्ष दिव्यांनी उजळून निघतात. त्यानंतर काही क्षणांत सुरू होते गंगेची आरती. गंगेची आरती पाहणे हा एक वेगळा आनंददायी अनुभव असतो.
गेल्या अनेक शतकांपासून काशी ही विद्यानगरी म्हणूनही ओळखली जाते. येथील ज्ञानाचा प्रकाश जगभरात गेला. या विद्यानगरीमध्ये देशोदेशीचे विद्यार्थी, विविध प्रकारचे ज्ञान घेण्यासाठी, त्याची साधना आणि आराधना करण्यासाठी या नगरीत येत असतात. अजूनही ही परंपरा संपलेली नाही, कारण डॉ. अॅनी बेझंट यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या सक्षम नेतृत्वाने विकसित झालेल्या बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये आजही ज्ञानाची साधना वेगळ्या आणि चांगल्या पद्धतीने केली जाते. तरीही भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार आणि काशीतून निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे साथीदार अमित शहा हे आम्ही काशीला विद्येचे आणि संस्कृतीचे केंद्र बनवू, असा जो दावा करतात, तेव्हा त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते.
कारण ज्या काशीने भारताला आध्यात्मिकच नव्हे तर कला, शास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य यापासून तर गायन, वादन, शिल्पकला, मल्लविद्या सर्व प्रकारच्या कलाकसबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नावलौकिक मिळवून दिला आहे, ज्या शहराने भारतीय संस्कृतीवर, तत्त्वज्ञानावर आणि समग्र भारतीय लोकजीवनावर पिढय़ान् पिढय़ा प्रभाव टाकलेला आहे, त्या शहराला आम्ही सांस्कृतिक आणि बौद्धिक क्षेत्रात नाव मिळवून देऊ, असे म्हणण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यासारख्या राजकारण्यांनी करावा, यासारखा काशीचा दुसरा अपमान नाही.
नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांना ठाऊक नसेल, परंतु काशीने अनेक शतकांपासून विद्यानगरी म्हणून आज स्वत:चे एक स्थान फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात निर्माण केलेले आहे, त्यामुळे उच्चविद्या अभ्यासासाठी चीनपासून वेगवेगळ्या आखाती देशांमधून अभ्यासू, जिज्ञासू अनेक शतकांपासून भारतामध्ये येत आहेत आणि काशीमध्ये ज्ञान मिळवून ते आपल्या देशामध्ये घेऊन जात आहेत, त्यामुळे आजही काशीमध्ये संस्कृत असेल, तत्त्वज्ञान असेल, साहित्य असेल, धर्म असेल या सगळ्यांची जोपासना अधिक चांगल्या पद्धतीने केली जाते. फक्त हिंदूच नव्हे, तर या काशीने जैन आणि बुद्ध तत्त्वज्ञानाला ख-या अर्थाने आपले स्थान निर्माण करण्यासाठी एक पृष्ठभूमी उपलब्ध करून दिली होती.
काशीमध्ये धम्मचक्र प्रवर्तनासाठी गौतम बुद्ध यांनी सारनाथला येऊन काम केलेले आहे. त्यांनी इथेच सर्वप्रथम पाच ब्राह्मणांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. जैन धर्माच्या मूळ तत्त्वज्ञानाची पायाभरणीसुद्धा काशीमध्येच झाली. जैनांचे तेवीसावे र्तीथकर पार्श्वनाथ यांनी आपल्या धर्माची जी चतु:सूत्री सांगितली आहे, त्या अस्तेय्य, अपरिग्रह, अनृत आणि अहिंसा. या चतु:सूत्रीवर पुढे चोवीसावे र्तीथकर महावीर यांनी एकूणच जैन तत्त्वज्ञानाची पायाभरणी केली आहे.
इतकेच नव्हे जैन आणि बुद्ध तत्त्वज्ञानाला आरंभीच्या काळात आधार देणा-या या शहरामध्ये सर्व प्रकारचे पंथो-पंथ फुललेले, वाढलेले दिसतात. यामध्ये शाक्त आणि अघोरी यासारख्या समाजबाह्म मानल्या जाणा-या तंत्रांचे किंवा समाजबाह्म मानले जाणा-या एकूणच धार्मिक अधिष्ठानाचे व्यासपीठसुद्धा काशीमध्ये असलेले आपल्याला दिसते. त्यामुळे सर्व प्रकारच्या तत्त्वज्ञानाला, सर्व प्रकारच्या धार्मिक साधनांना आपली भूमी उपलब्ध करून देणा-या या गंगेच्या काठावरील शहराचे महत्त्व संपूर्ण भारताला ज्ञात आहे, परंतु त्याला आजवर कधीच राजकीय रंग प्राप्त झाला नव्हता. तो या निवडणुकीच्या निमित्ताने प्राप्त झालेला दिसतो आणि त्यामुळे काशीतील गंगेचे आधी गढूळ झालेले पाणी अधिक गढूळ झालेले पाहायला मिळते. काशीला वैचारिकदृष्टय़ा आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मोठेपण मिळवून देणारे आणखी दोन अत्यंत महत्त्वाचे संत म्हणजे कबीर आणि तुलसीदास.
कबीर हे विणकर जातीत जन्माला आलेले आणि ते आपला व्यवसाय करत करत जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगत. कर्मकांडाला आव्हान देत त्यांनी एकूणच आपले साहित्य रचले. त्यांच्या रचना पाहिल्यानंतर लक्षात येईल की, प्रचलित कर्मकांडावर प्रखर टीका करत आपल्याकडील संत तुकाराम महाराजांच्या धाटणीने कबीर महाराज अत्यंत परखडपणे या प्रचलित कर्मकांडाची चिकित्सा करतात. त्याचबरोबर तुलसीदासांनी लिहिलेल्या ‘तुलसीरामायणा’ने संपूर्ण हिंदी भाषिक जनमनाचा ज्या पद्धतीने कब्जा घेतलेला आहे, त्याला खरोखरच तोड नाही. आज अनेक खेडय़ापाडय़ातील लोकांच्या मुखी तुलसीदासांच्या शब्दांची पखरण बघायला मिळते. या तुलसीदासांनी संपूर्ण भारतावर एक अनोखे उपकार केलेले आहेत, ते म्हणजे त्यांनी काशीतील तुलसीघाटावर सर्वप्रथम रामलीला केली होती.
त्या रामलीलेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला समजेल, असे रामायण सादर करण्याची त्यांनी जी प्रथा पाडलेली आहे, ती आज फक्त भारतातच नव्हे तर जिथे जिथे हिंदी भाषिक लोक गेलेले आहेत, तिथे तिथे तिचे पालन केले जाते. अशा या भूमीमध्ये जे सध्या राजकीय मन्वंतर सुरू आहे, ते इथले एकूणच समाजमन घुसळून टाकणारे दिसते.
हिंदू पुराणांमध्ये वेगवेगळ्या माहात्म्यांमध्ये काशीचे वर्णन खूप वेगळ्या पद्धतीने केलेले आपल्याला आढळते. पद्मपुराणात काशीबद्दल खूप चांगले वाक्य आहे, ते असे की, तुम्ही काशीमध्ये दररोज जरी एकेक किंवा दोन-दोन पवित्र स्थानांना भेटी दिल्या तरीपण पूर्ण वर्ष काशीतील पवित्र स्थानांचे दर्शन घेऊन होणार नाही, कारण काशीमध्ये प्रत्येक पावलावर एक पवित्र स्थळ आहे. यातील अतिशोयोक्ती जरी टाळली तरीपण लक्षात येईल की, काशीमध्ये जागोजागी तुम्हाला देवदेवतांची स्थापना केलेली दिसते. काशीमध्ये शिवाने आणि पार्वतीने वास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वच देवांनी इथे येऊन आपले ठाण मांडलेले आहे.
इथे शैव देवतांबरोबर वैष्णव, शाक्त, वेगवेगळ्या परंपरेतील देवता, गाणपत्य, यक्ष आणि गंधर्व या सर्व प्रकारच्या आर्य-अनार्य देवतांच्या प्रतिमा आपल्याला गल्लीबोळातही पाहायला मिळतात. कदाचित गंगेमध्ये मोक्षाचे आश्वासन असल्यामुळे माणसांएवढीच देवांनासुद्धा वाराणसीची ओढ लागली असावी. काशीचे जे प्राचीनत्व आहे, तत्त्वज्ञानातील स्थान आहे, या सगळ्या प्रकाशमान वैभवाची भुरळ जगातील अनेक नामवंतांना पडलेली दिसते. मार्क ट्वेन यांच्यासारखा ख्यातनाम लेखक काशीला आल्यानंतर इथल्या एकूणच अलौकिकपणाबद्दल तो म्हणतो, ‘काशी ही इथल्या इतिहासापेक्षाही जुनी आहे, वृद्ध आहे. जेवढय़ा दंतकथा आहेत, त्यांच्यापेक्षाही जुनी आहे.
या सगळ्या गोष्टी म्हणजे इतिहास, परंपरा, संस्कृती आणि आपल्या सा-या दंतकथा एकत्र मिळवल्या तरी काशी या सगळ्याच्या दुप्पट जुनी आहे.’ मी काशीमध्ये प्रवेश केला, त्यावेळेस एका अंत्ययात्रेने माझे लक्ष वेधून घेतले. ती अंत्ययात्रा साधीसुधी नव्हती. बॅण्डबाजासोबत अत्यंत आनंदात निघालेला जनसमुदाय होता. तिरडी खूप सुंदर पद्धतीने सजवलेली होती, तिला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी कापडांनी आणि फुलांनी सजवलेले होते. मी आमच्या गाडीच्या ड्रायव्हरला विचारले की, ‘हे असे सजवून का नेताहेत?’ त्याने सांगितले की, काशीत वास्तव्यच हीच मुळी आम्हा काशीत राहणा-या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते.
काशीत मरण येणे ही तर तर त्याहून अधिक पुण्यदायी घटना. विशेष म्हणजे, मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार व्हावा यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असतो. ही अंत्ययात्रा त्या घाटाच्या दिशेनेच निघालेली दिसते.’ एकूणच त्या माणसाचे जगणे सार्थक होणे आपण समजू शकतो, परंतु त्यापेक्षा त्याचे मरणच सार्थक झालेले दिसते. ही इथल्या लोकांची भावना आहे. अशाच समजुती अन्य धर्मामध्येसुद्धा पाहायला मिळतात.
एकूण काय तर संपूर्ण हिंदू धर्मात जे विश्वाचे केंद्रबिंदू किंवा मुख्य स्थान म्हणून ज्या शहराकडे बघितले जाते ते शहर सध्या भारतीय राजकारणात एक महत्त्वाचे स्थान पटकावताना दिसते आहे. या राजकीय स्थानमाहात्म्यासंदर्भात तुम्ही काशीत फिरल्यानंतर एक लक्षात येते ते म्हणजे, पूर्वापार या शहरामध्ये ज्ञानाची साधना होत असल्यामुळे असेल, कदाचित इथला सर्वसामान्य माणूस मग तो नाव चालवणारा, न शिकलेला एखादा तरुण किंवा मोठय़ा दुकानात तकिया लोडाला टेकलेला एखादा धनाढय़ असेल, त्याच्या तोंडामध्ये एक प्रकारची रसवंती असते आणि ते आपले मुद्दे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला पटवून देताना दिसतात.
कारण यांच्या डीएनएमध्येच कदाचित ज्ञानाची बीजे रोवली गेलेली असणार. त्यामुळे अशा लोकांच्या नगरीला आता राष्ट्रीय राजकारणात महत्त्व आल्यामुळे पुन्हा एकदा काशीकडे सगळ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. १८५७च्या उठावात काशीने महत्त्वाची भूमिका बजावली होती, परंतु तो यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर अनेक वर्षानी आता पुन्हा काशीकडे इतिहास घडवण्याची जबाबदारी आली आहे. काशी कोणाच्या बाजूने कौल देते, हे लवकरच कळेल.
Categories:
आवर्तन