भारतीय संस्कृतीमध्ये मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण मानले जाते. पूर्वीच्या काळी हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला जात असे. हल्ली कोणालाच तसे करावेसे वाटत नाही. वृद्धाश्रम हा माता-पित्यांच्या उपकारातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असे समजणा-यांची संख्या जशी वाढत आहे, तशीच ‘फेसबुक’ वा ‘ट्विटर’वर ‘सापडणारा’ वर्ग म्हणजे समाज, असा गैरसमज दिवसेंदिवस दृढ होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कितीही निवडणुका आल्या आणि गेल्या तरी समाजातील दु:खी-पीडितांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी आपण समाजसेवेसाठी आयुष्य झोकून देणा-या आमटे कुटुंबीयांसारख्या मंडळींना साथ दिली पाहिजे. २८ एप्रिल ते दोन मे २०१४ या दरम्यान डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’चे छायाचित्र-प्रदर्शन डोंबिवलीत भरणार आहे. श्रीगणेश मंदिर संस्थान येथे दररोज सकाळी १० ते रात्रौ ९.३०पर्यंत हे प्रदर्शन खुले राहील. कुणी तरी नेता आपले आयुष्य बदलेल, अशा भ्रमात राहण्यापेक्षा स्वबळावर जग बदलणा-या आमटे कुटुंबीयांचे काम तमाम मुंबई-ठाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळेल. आपापल्या आर्थिक ताकदीनुसार त्या समाजसेवेच्या गोवर्धनाला हातभार लावता येईल. राजकारणाएवढीच आपण समाजकारणामध्येही रुची दाखवली तर देश नक्कीच बदलेल.
सध्याचे दिवस व्हच्र्युअल रिअॅलिटीचे म्हणजे आभासी वास्तवाचे आहेत, पण आभास आणि वास्तव हे वेगवेगळे असते. टीव्ही, इंटरनेट आणि मोबाइल यांच्या माध्यमांतून भाजपचे नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल सर्वसामान्य लोकांसमोर ‘उज्ज्वल भविष्याचे’ जे चित्र रंगवत आहेत, ते आभासी आणि अतिरंजित आहे. यंदाच्या निवडणुकीत सहभागी होणा-या दहा कोटींहून अधिक तरुण, अननुभवी मतदारांना या भ्रमाच्या पायावर राजकारण करणा-या पक्षांच्या वास्तवाची वेळीच जाणीव करून द्यायला हवी, अन्यथा भ्रमजालाला भुलून तरुणाईचे हे हत्यार या पक्षांच्या हाती गेल्यास देशात अराजक माजेल. जगभरातील पुढारलेल्या देशांत सत्तेची सूत्रे तरुण लोकप्रतिनिधींच्या हाती येत आहेत. या परिस्थितीत आपल्याकडे लोकशाही दृढ व्हायची असेल तर आपल्या देशाचे ख-या अर्थाने वास्तववादी भवितव्य घडवू पाहणा-या राहुल गांधी यांच्यासारख्या युवा नेत्याची निवड करणे, हेच मतदार म्हणून परिपक्वतेचे आणि समजूतदारपणाचे ठरेल.
राजकारण हे अर्थकारणाच्या पायावर उभे असते. ज्या देशात अर्थकारण बिघडते त्या देशातील राजकारण आणि पर्यायाने समाजकारण अशुद्ध होते. हा सर्वसाधारण नियम आहे. गेल्या दोनेक वर्षात आपल्या अर्थक्षेत्रात धोकादायक पद्धतीने चढ-उतार येत आहेत. डॉलर्सच्या तुलनेत रुपया खाली जात आहे. शेअर बाजार वर उसळ्या मारीत आहे. आणि दुसरीकडे...