मराठीपुढे नवतंत्रज्ञानाधारित इंग्रजीने मोठे आव्हान उभे केले आहे. त्याला तोंड देण्यासाठी जर साहित्यिक वा राजकीय नेते पुढे येत नसतील, तर मावळ्यांच्या निष्ठेने तुम्ही-आम्ही सर्वांनी छातीचा कोट करून मन:पूर्वक मराठी जपली पाहिजे…
आपली भाषा ही फक्त संवादाचे साधन नसते, तर ती असते आपला श्वास आणि जगण्याचा ध्यास. आपण स्वप्ने मायबोलीतच पाहातो आणि स्वप्नपूर्तीचा आनंदही मायबोलीतच साजरा करतो. ठेच लागल्यावर आपण कळवळतो, ‘आई गं..’ म्हणून आपल्या आईच्या भाषेत आणि रागाचा पारा डोक्याच्या वर गेल्यावर शब्दांचा कडकडाट होतो मातृभाषेतूनच. जवळच्या मित्राची थट्टा-मस्करी वा प्रेयसीशी गुजगोष्टी या सगळ्याला आणते रंगत आपली मायबोली. आपली मराठी, तर अवीट गोडीची. ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात सांगायचे तर ‘अमृताशी पैजा जिंकणारी’, पण आमची नवी पिढी इंग्रजीच्या आमिषाने मराठीपासून दूर चालली आहे. आमच्या डोळ्यादेखत आमची नवी पिढी म-हाटी भाषेपाठोपाठ संस्कृती आणि संस्कारांपासून दूर चाललेली दिसतेय. आजवर कधी आले नव्हते, एवढे मोठे आव्हान मराठीपुढे नवतंत्रज्ञानाधारित इंग्रजीने उभे केले आहे. त्याला तोंड देण्यासाठी जर साहित्यिक वा राजकीय नेते पुढे येत नसतील, तर मावळ्यांच्या निष्ठेने तुम्ही-आम्ही सर्वानी छातीचा कोट करून मन:पूर्वक मराठी जपली पाहिजे.
मराठी साहित्य आणि मराठी लेखक-कवी-विचारवंत यांची सध्याची स्थिती काय आहे, असा प्रश्न तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यांला, रस्त्यावरील तरुणाला किंवा एखाद्या मध्यमवयीन गृहिणीला विचारून पाहा. त्यांना लेखक म्हणजे पु. ल. देशपांडे, कवी म्हणजे कुसुमाग्रज किंवा मंगेश पाडगावकर अशी चार-दोन नावे त्यांच्या साहित्यकृतींशिवाय ठाऊक असलेली दिसतील. सध्याच्या काळातील लेखक-कवींबद्दल सर्वसामान्य माणसाला काही ठाऊक असण्याचे कारणच नाही, कारण नव्वद टक्के काव्यसंग्रह कवी मंडळींना पदरमोड करून छापावे लागतात. ते, त्यांच्या आप्त-इष्ट-नातेवाइकांच्या गोतावळ्यात ‘प्रसिद्ध’ होतात आणि तिथेच वितरित केले जातात. काही ‘जनसंपर्कतज्ज्ञ’ साहित्यिक आपला वृत्तपत्रसंपर्कवापरून आपल्या गोतावळ्यातील लेखक-कवींना पुरवण्यांच्या पानांमध्ये घुसवून मोठे करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचा पुस्तक खपासाठी फार मोठा उपयोग होत नाही, असे अनुभवींचे मत आहे. त्यामुळेच असेल कदाचित दहा कोटींहून अधिक लोकसंख्या असणा-या मराठी समाजासाठी प्रसिद्ध होणा-या बहुतांश, ९५ टक्क्यांहून अधिक पुस्तकांची ‘आवृत्ती’ फक्त अकराशे प्रतींपुरती मर्यादित असते. सगळ्यात दु:खाची गोष्ट म्हणजे नामवंत लेखकांच्या नशिबीही दुस-या आवृत्तीचा योग येत नाही. मग नव्या अननुभवी साहित्यिकांबद्दल आणि त्यांच्या साहित्यकृतींबद्दल काही न बोललेलेच बरे. तर अशा समाज घडविण्याची भाषा करणा-या ‘स्वकेंद्रित’ साहित्यिक मंडळींना राजकारणी आणि प्रसिद्धीच्या जवळ नेणारी जत्रा म्हणजे साहित्य संमेलन. हे साहित्याच्या नावे होणारे, भाषेच्या विकासाचा दावा करणारे संमेलन अधिकाधिक वायफळ ठरत चाललेले दिसते. राजकारण्यांच्या लक्षभोजनांना नाके मुरडणा-या आमच्या ‘लेखकूंना’ साहित्य पंढरीत खाण्यासोबत पिण्याचीही सोय हवी असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाच्याही संमेलनात वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी, भाषिक अभिसरणासाठी किंवा वैचारिक आदान-प्रदानावर चर्चा झाली नाही. राजकारण्यांपुढे मिरवून मोठय़ा झालेल्या सत्तानिष्ठ मैफिलबाजांकडेच संमेलनाची सूत्रे गेल्यानंतर आपण आणखी वेगळी अपेक्षा काय करावी?
‘सूर्यास्ताच्या वेळेस खुज्या माणसांच्या सावल्याही लांब दिसू लागतात,’ असे थोर विचारवंत कार्लाइल यांनी म्हटले आहे. आपल्या सावल्यांच्या लांबीला ‘उंची’ समजणारे लोक आणि संस्था हल्ली महाराष्ट्र देशी खूप वाढलेल्या आहेत. साहित्याच्या प्रांतात तर त्यांचा सुळसुळाट झालेला दिसतोय. त्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही, मराठी भाषेचा ‘जलसा’ म्हणून ओळखल्या जाणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची फक्त कार्यक्रमपत्रिका पाहिली तरी आपली वाङ्मयीन दुरवस्था लक्षात येते आणि म्हणूनच मराठीच्या भविष्याची चिंता वाटते.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रांतात मराठी भाषिकांची वस्ती प्रामुख्याने आढळते. गेल्या दोनेक हजार वर्षापासून विविध भाषांचे संस्कार, विकार आणि आधार घेत मराठी भाषेचा हा महावृक्ष महाराष्ट्र देशी रुजला आणि अन्य प्रांतांत फोफावला. साधारणत: अकराव्या शतकापासून प्रथम नाथ, नंतर दत्त आणि त्यापाठोपाठ महानुभाव संप्रदायाने मराठीतून धर्मज्ञान देण्यास सुरुवात केली; त्यामुळे त्या संप्रदायासोबत मराठीही सर्वदूर पसरायला सुरुवात झाली होती. तेराव्या शतकापासून ज्ञानदेव-नामदेवादी संतांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन मराठीचा लौकिक वाढवला. हा सारा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक आहे, पण लेखक, कवी, विचारवंत यांच्यापेक्षा भाषेचा प्रसार हा राजसत्तेकडून जास्त प्रमाणात होतो, हे मात्र मराठी लोकांना कळत असूनही वळत नाही. जेव्हा अवघा महाराष्ट्र मोगली भाषा, धर्म आणि संस्कारांच्या प्रभावाखाली होता, त्या वेळी सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला ख-या अर्थाने राजव्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांच्या त्या प्रयत्नांमुळे अवघ्या दीडशे वर्षात मराठी सत्तेच्या प्रसारासोबत मराठी भाषाही पसरत गेली. कर्तृत्ववान सत्ताधा-यांची भाषा सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते, हे आपण मोगल आणि इंग्रजांच्या राज्यात अनुभवले आहे. इंग्रजीच्या बाबतीत म्हणायचे तर इंग्रजांचे राज्य गेल्यानंतरही त्यांच्या भाषेची भारतीय समाजमनावरची पकड ढिली होण्याऐवजी अधिकाधिक घट्ट होत गेलेली दिसतेय आणि सगळ्यात दु:खाची गोष्ट म्हणजे मराठीच्या या पीछेहाटीबद्दल छत्रपतींचे नाव घेणा-या एकाही राजकारण्याला खेद वा खंत वाटत नाही.
जागतिकीकरणाचा माहौल सर्वत्र पसरलेला असताना आणि ज्या वातावरणात इंग्रजीला अनन्यसाधारण महत्त्व आले असताना आपण इंग्रजी नाकारावी, असे सांगण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. येणा-या काळाची आव्हाने समजून घेऊन इंग्रजीला कमी न लेखता मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांच्या विकासाचे उत्तम तंत्र आपण सर्वानी आत्मसात करण्याची गरज आहे. इंग्रजीला स्वीकारताना आम्ही आमचे म-हाटपण तेवढय़ाच निष्ठेने जपले तर भाषिक विकासासोबत ‘ग्लोबल’ आणि ‘लोकल’ या दोन्ही प्रवाहांचे एक उत्तम मिश्रण महाराष्ट्रदेशी तयार होऊ शकेल. दुर्दैवाने तसा प्रयत्न इंग्रजी जाणणा-या मराठी अभिजनवर्गाकडून होताना दिसत नाही. मराठी साहित्याचे इंग्रजीत आणि इंग्रजी साहित्याचे मराठी अनुवाद करून एक चांगला भाषा सेतू उभारता येऊ शकला असता. पण, गेल्या ५० वर्षात तसे काही लक्षणीय प्रयत्न झाले नाहीत. तीच गोष्ट नवीन वैज्ञानिक आणि संगणकीय शब्दसंकल्पनांना मराठी रूप देण्याचे, त्यातही आमचा आत्ममग्न अभिजनवर्ग मागे राहिला. त्यामुळे हे तंत्रज्ञान जाणणा-या नव्या पिढीला मराठीचे आकर्षण वाटेनासे झाले. या सगळय़ा गोष्टी आपण आजही दुरुस्त करू शकतो.
मराठी भाषा आणि मराठी भाषकांचा कैवार घेत राजकारण करणा-या सेना तर निवडणुकीशिवाय मराठीचा मुद्दा हातीच घेत नाहीत आणि म्हणून मराठी जगवण्यासाठी, अधिक समृद्ध करण्यासाठी भंपक साहित्यिक आणि चलाख राजकारण्यांकडून काही होईल, अशी अपेक्षा करता येणार नाही आणि म्हणूनच मराठीवर प्रेम करणा-या, मराठी बोलणा-या प्रत्येक व्यक्तीने मराठीच्या रक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम प्राथमिक शिक्षणातून मराठीचे होत असलेले जाणीवपूर्वक उच्चाटन थांबवले पाहिजे. आमच्या शिक्षण खात्याने मराठी समाजाच्या नवीन पिढीला मातृभाषेपासून तोडण्याचा जणू चंगच बांधलेला दिसतोय. एकीकडे इंग्रजी ज्ञानभाषेबरोबर चांगला रोजगार देणारी भाषा म्हणून रुजत असताना आमच्या विचित्र शैक्षणिक धोरणाने मराठी भाषेची मुळे उखडून टाकण्याचे निर्णय घेतलेले दिसतात. यातील सगळ्यात घातक ठरला इयत्ता आठवीपर्यंत मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय. या निर्णयामुळे प्राथमिक स्तरावर असलेला शैक्षणिक ताण संपला. परिणामी भाषा विषयांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती बळावली. नाही म्हणायला, आमच्या मायबाप सरकारने याआधीच दहावी-बारावीतील गणित-शास्त्र विषयांतील गुणांनुसार वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी पदवी-पदविका प्रवेशाला मान्यता देऊन मराठी ‘निरुपयोगी’ ठरवली होती. त्याच्या दहा पावले पुढे जाऊन आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्याचे धोरण ठरवले गेले.
प्राथमिक स्तरावरही मराठीकडे गांभीर्याने बघण्याची गरज नाही, असेच शासनाने दर्शवून दिले. शिक्षण खाते तेवढय़ावरच थांबले नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सढळ हाताने परवानग्या देत असतानाच आमच्याकडे मराठी शाळांवर ‘सेमी इंग्लिश’ संस्कृतीच ‘कलम’ करण्याचा निर्णय झाला. बरे, आठवीपर्यंत मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय जसा घाईत, कोणताही सखोल अभ्यास न करता झाला होता, त्याप्रमाणे ‘सेमी इंग्लिश’ अभ्यासक्रमही घाईत राबवला गेला. परिणामी इंग्रजीच्या वाढत्या दबाव-प्रभावामुळे मराठीकडे दुर्लक्ष होत गेले. आज अगदी गाव-खेडय़ातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटताना दिसत आहे. पूर्वी स्थानिकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी ध्येयाने झपाटलेले लोक शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने दिसायचे. त्यांचे राजकीय विचार भलेही भिन्न असतील; परंतु आपल्या देशातील नवी पिढी ज्ञानसमृद्ध व्हावी, हा त्यांचा समान हेतू असे. हल्ली अशा संस्था आणि असे ध्येयवेडे लोक कमी झाले आहेत. विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी तर आमच्या गरीब-मध्यमवर्गीय घरातील मुलांचे शिकणे ‘महाग’ केले आहे. अगदी ज्युनियर केजीपासून देणगी, प्रवेश फी घेणा-या या संस्था गणवेश, पुस्तके इतकेच काय, तर चप्पल-बूटसुद्धा विकतात. शिवाय मुलांच्या सहली, मेळावे, स्पर्धाचा खर्च वेगळाच. पंधरा-वीस वर्षापूर्वी शाळा भलेही साध्या असतील, शिक्षक कडक वागत असतील, मुले नापास होत असतील; परंतु त्या काळात गरिबांच्या, गरजूंच्या मुला-बाळांची मोफत शिक्षणाची गणवेश-पुस्तकांची व्यवस्था होत होती. हल्ली ‘ज्याला परवडेल त्यालाच शिक्षण’ अशी स्थिती बनलेली आहे; त्यामुळे ज्या पालकांकडून खिशाला चाट लावून मुलांना शिक्षण दिले जाते, ते पालक मराठी भाषक असूनही आपल्या मुलाने इंग्रजी, गणित किंवा शास्त्रीय विषयात अधिक प्रावीण्य मिळवावे, असा प्रयत्न करतात. परिणामी, अगदी लहानपणापासून तो मुलगा वा मुलगी स्वभाषेपासून दूर जाऊ लागते. महाविद्यालयात गेल्यानंतर, तर अभ्यासक्रमात मराठी औषधालाही उरत नाही. मग काय, त्या मुलाला फक्त बोलण्याशिवाय भाषेचा सरावच उरत नाही.
काही घरात तर इंग्रजी वा हिंदीतून बोलण्याची ‘फॅशन’ असते, मग तिथे तर काही बोलण्याचाही प्रश्न उरत नाही. एकूण काय तर आम्ही आमच्या महाराष्ट्रात ‘शासनमान्य’ पद्धतीने मातृभाषा, जी ‘तथाकथित’ राजभाषाही आहे, ती कशी मारावी, याचे जिवंत उदाहरण बनत आहोत आणि तरीही आमच्या जागरूक साहित्यिकांना किंवा राजकीय नेत्यांना त्याची पर्वा नाही; कारण जसे आमचे लेखक-कवी कधीच सर्वार्थाने लोकभावनांचे वाहक बनले नाहीत, त्याप्रमाणे आमच्या सर्वपक्षीय राजकारण्यांनीही लोकांच्या ख-या प्रश्नांची दखल घेतली नाही. भाषिक अस्मिता हा विषय केवळ मतांपुरता मर्यादित ठेवणा-या शिवसेनेने सत्ता मिळूनही मराठी भाषेच्या विकासासाठी कधी ठोस पावले उचलली नाहीत. नाही म्हणायला ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ करून देशभरात नामांतराच्या लाटेचे अकारण जनकत्व मात्र घेतले. तीच गोष्ट राज ठाकरे यांच्या ‘दगडफेकी’ राजकारणाची. भाषिक अभिमान दाखवण्यासाठी उपद्रवमूल्य सिद्ध करणे, हे खरे तर मानसिक दुबळेपणाचे लक्षण आहे. आपल्या गल्लीत ‘गर्जना’ करून ताकद दाखवणे हे राज यांचे ‘कर्तृत्व’ जेव्हा अखिल भारतीय पातळीवर जाते, त्या वेळी प्रसारमाध्यमांमधून मराठी लोकांच्या अरेरावीपणाची ‘जाहिरात’ होते, याची आमच्या ‘शेणानायकां’ना ना जाण असते, ना भान. त्यांना फिकीर असते ती फक्त स्वत:च्या राजकारणाची आणि राजकीय अस्तित्वाची. मग, अशा मंडळींकडून मराठीची जपणूक कशी होणार?
संगणक ते मोबाइल अशा दोन बिंदूंमध्ये समग्र विश्व सामावण्याची आता प्रक्रिया सुरू झाली आहे. या अतिवेगाने होणा-या प्रक्रियेत दर चार-सहा महिन्यांनी आमूलाग्र बदल होताना दिसतात. हे बदल तंत्रज्ञानासंदर्भात असले तरी त्याचा परिणाम समग्र जगण्यावर होतो; त्यामुळे या बदलत्या स्थितीमध्ये भाषा वाचणे, खरे तर पसरणे जास्त महत्त्वाचे ठरते. इंटरनेटच्या आगमनाने जगभरात इंग्रजीचे प्रस्थ जास्त वेगाने वाढले. त्यामुळे किमान शंभरेक भाषांवर गंभीर परिणाम झाला, असे जागतिक भाषातज्ज्ञांचे मत आहे. आता तर मोबाइलच्या वाढत्या प्रसाराला इंटरनेटची जोड मिळाल्यामुळे अनेक भारतीय भाषाही धोक्यात आल्या आहेत. आजमितीला आपल्या देशात ९५ कोटी मोबाइलधारक आहेत. हे बहुतांश मोबाइल संच चीन, कोरिया, तैवान किंवा सिंगापूरमध्ये बनतात; त्यामुळे त्यात मराठी वा अन्य भारतीय भाषा वापराची सुविधा उपलब्ध नसते. असली तरी त्यातील तांत्रिक किचकटपणामुळे सर्वसामान्य माणसाला ती कशी वापरावी, ते कळत नाही. अशा वेळी भाषेचा विचार करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर येते. गेल्या दशकात, जेव्हा जग आपापल्या भाषांसह एकविसाव्या शतकात पाऊल ठेवण्याचा विचार करून पुढे निघाले होते, तेव्हा आम्ही मायभाषेचा पदर न धरता इंग्रजीचा झगा पकडून प्रगतीची स्वप्ने पाहिली. त्यातील फोलपणा मांडण्यासाठी ना कुणी विचारवंत पुढे आला, ना कुण्या साहित्यिकाला त्यासाठी पुढे यावेसे वाटले आणि म्हणूनच आज मराठीसह बहुतांश भारतीय भाषा आपल्या लोकांपासून दूर जात आहेत, ही काही अभिमान वाटावा, अशी स्थिती नाही. भाषा म्हणजे लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी सहजसुलभ पद्धत आहे.
अगदी बालपणापासून आपण आपल्या जवळच्या लोकांशी ज्या भाषेत बोलतो ती भाषा आपल्या नकळत अभिमानाचा विषय बनते, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत स्वराज्य स्थापल्यानंतर आपल्या मायबोलीचा गौरव वाढवला. महाराष्ट्रापासून दूर ग्वाल्हेर, इंदूर, धार, देवास, बडोदा, तंजावर इत्यादी मराठी संस्थानिकांनी शिवाजी महाराजांचे अनुकरण करीत मराठीला प्रतिष्ठा मिळवून दिली. शेतात राबणा-या, काबाडकष्ट करणा-या, रांगडय़ा म-हाटमोळ्या लोकांची मराठी राजदरबारातही तेवढय़ाच दिमाखात वावरली; कारण तिच्या लेकरांना तिचा अभिमान होता. मुख्य म्हणजे आपल्या मायबोलीचा अभिमान बाळगणा-या म-हाटी राजांच्या तलवारीला धार होती, म्हणून अठराव्या, एकोणिसाव्या शतकात मराठी देशभरात प्रचलित होती. गेल्याच आठवडय़ात तामिळनाडू, पुद्दुचेरीत फिरताना त्याचे एक सुरेख उदाहरण पाहायला मिळाले. २७-२८ डिसेंबरच्या सर्व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये त्रावणकोरचे विद्वान महाराजा स्वाती तिरुनल यांच्या १६७व्या जयंतीनिमित्त लेख छापून आले होते. आज त्रावणकोरचे संस्थानिक थिरुअनंतपुरम येथील श्रीपद्मनाभस्वामी मंदिरातील अब्जावधी रुपये किमतीच्या खजिन्यामुळे प्रसिद्धीस आले आहेत. महाराजा स्वाती त्या त्रावणकोर संस्थानचे २८ ऑगस्ट १८१३ रोजी अधिपती झाले होते. त्या वेळी त्यांचे वय होते फक्त पाच महिने. अगदी बालपणापासून गायन, वादन, लेखन अशा विविध विषयांत अफाट गती असणा-या या राजाने विविध भाषांमध्ये प्रावीण्य मिळवावे, अशी त्यांच्या काकींची, राणी पार्वतीबाईंची इच्छा होती. त्यासाठी त्या काळातील प्रसिद्ध विद्वान तंजावुर सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी संस्कृत, पर्शियन, कन्नड, हिंदी आणि मराठीचे शिक्षण घेतले. संगीतामध्ये अद्वितीय रचना करणा-या या राजाने त्याही पुढे जाऊन मेरुस्वामी या कथाकाराकडून मराठी काव्यरचना शिकून घेतली आणि विशेष म्हणजे पद्मनाभ देवाच्या स्तुतीपर मराठीतून अभंग आणि छंदरचना केली. महाराजा स्वाती तिरुनल यांच्या या मराठीसह विविध भाषांतील गीतरचनांचा दरवर्षी ‘स्वाती संगीतोत्सवम्’ साजरा केला जातो.
दरवर्षी सहा ते १२ जानेवारीदरम्यान त्रावणकोरचे विद्यमान महाराजा राम वर्मा यांच्या पुढाकाराने हा उत्सव त्रिवेंद्रमला होत असतो. त्याला देशभरातील संगीताचे दर्दी आणि नृत्याचे अभ्यासक हजेरी लावतात. महाराजांच्या लोकविलक्षण गुणांचे कौतुक करतात, पण आपल्या महाराष्ट्रातील साहित्यिकांना महाराजा तिरुनल यांच्या मराठी रचनांची साधी माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात लिखाण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशभरात असे अनेक मराठी सारस्वत होऊन गेले आहेत. त्यांचा उल्लेख व्हावा, त्यांचे लिखाण प्रसिद्ध व्हावे आणि त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी एवढाच आमचा प्रयत्न आहे; कारण मराठी वाचली तर त्या भाषेसोबत जन्मलेले आणि वाढलेले म-हाटमोळे संस्कार टिकतील. अन्यथा धड ना इथला ना तिथला असा त्रिशंकू अवस्थेतील समाज निर्माण होईल.. स्पष्टच सांगायचे तर तशी तीन भाषांत अडकलेली त्रिशंकू स्थिती आजच आपली झाली आहे. लोकल गाडीत जशी स्थानक जवळ आल्यावर तीन भाषांमध्ये उद्घोषणा होते, त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आधी मराठी, मग हिंदी आणि नंतर इंग्रजीत सरकारी घोषणा करतात, म्हणून त्यांना हसण्याचे कारण नाही. बहुतांश मराठी लोक आजकाल घरात मराठी, रस्त्यावर-बाजारात हिंदी आणि कार्यालयात इंग्रजीत बोलतात.. परिणामी आमच्या नवीन पिढय़ा भाषिक गोंधळात सापडलेल्या आहेत आणि हा सारा गडबड-गोंधळ निस्तरण्याची ताकद फक्त प्रसारमाध्यमांमध्ये आहे. वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि संकेतस्थळांवरून मराठी लिहिणा-या-बोलणा-यांना मार्गदर्शन करणे शक्य आहे. नव्या तंत्रज्ञानाने आपल्याला ‘स्वयंप्रकाशित’ होण्यासाठी ब्लॉग्ज आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइट्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे; पण त्यातील तांत्रिक सुलभता अधिक वाढवण्याची आणि त्याचा सर्व थरातील लोकांमध्ये प्रचार-प्रसार करण्याची गरज आहे.
मराठी भाषा संवर्धनाचा, रक्षणाचा आणि पसरवण्याचा हा उपक्रम साधा नाही. पण, जसा श्रीकृष्णाने गोवर्धन उचलायचा निर्णय घेतल्यावर तमाम गोपाळांनी आपल्या काठय़ा उंचावून त्यावर गोवर्धन पर्वत तोलून धरला त्याप्रमाणेच तमाम मराठीप्रेमी मंडळींनी आपली कोणत्याही चांगल्या कामात ‘काडय़ा करण्याची’ वृत्ती बाजूला ठेवून, या मराठी भाषा संरक्षणाच्या कामात हातभार लावावा. जेणेकरून बालवाडीपासून विद्यापीठापर्यंत मराठी बोल घुमतील. उच्च न्यायालयापासूनसंसदेपर्यंत मराठी विचारांचे हुंकार उमटतील. होय, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यापेक्षा किंवा स्वकेंद्रित साहित्य वर्तुळात रमणा-या साहित्यिकांपेक्षा ही तुमची-माझी प्रत्येकाची व्यक्तिगत जबाबदारी आहे. ज्या भाषेत आपल्या आई-वडिलांनी संस्कार केले, ज्या भाषेने आपल्या अनेक पिढय़ांना ‘आवाज’ दिला, ती भाषा जिला ज्ञानोबा माऊली ‘अमृताशी पैजा जिंकणारी माझी मराठी’ असे म्हणाले होते, तिला इंग्रजी वा हिंदीच्या मा-याने वा नवतंत्रज्ञानाच्या भाराने मरणपंथाला जावे लागत असेल, तर तो आपला दोष आहे. त्यासाठी दुस-या कुणाला जबाबदार धरणे म्हणजे स्वत:ची दिशाभूल करणे आहे.
सहा वर्षांपूर्वी इस्रायल सरकारच्या निमंत्रणावरून त्या छोटय़ाशा देशाचा दहा दिवसांचा दौरा केला होता. त्या दौ-यामध्ये हिब्रू भाषेचा सार्वत्रिक वापर लक्षवेधी होता. हैफा विद्यापीठात मला एक रसायनशास्त्राचे प्राध्यापक भेटले. मी त्यांना कुतुहलाने विचारले की, ‘तुमची हिब्रू भाषा तर जवळजवळ मृतप्राय झाली होती. तिला तुम्ही गेल्या सहा दशकात फक्त जिवंतच नाही केली, तर तिला सर्वसमावेशक बनवली. अगदी शास्त्रीय परिभाषा असो वा संगणकीय शब्द, तुम्ही सर्वत्र हिब्रूच वापरता, हे कसे शक्य झाले?’ त्या प्राध्यापकाने सहजपणे सांगितले, ‘कारण आम्ही आमच्या हिब्रूवर प्रेम करतो, अगदी वेडय़ासारखे.’मराठीला अशा हजारेक वेडय़ांची गरज आहे.
साहित्य संमेलनात नाक वर करून बोलणा-या ‘शहाण्यांचे’ शहाणपण त्यांचे त्यांना लखलाभ.. अजूनही गाव-खेडय़ात मराठीत जगणारे, मराठीत मरणारे कोटय़वधी मावळे जिवंत आहेत, त्यांच्या हृदयात मराठी अभंग करूया!
Categories:
आवर्तन