भाजपाची निर्मिती रा. स्व. संघाच्या जहाल हिंदुत्ववादी विचारातून झाली आहे, कम्युनिस्ट पक्षाच्या विविध गटांनी मार्क्स, लेनिन आणि माओच्या नावाने आपली दुकाने थाटली आहेत. राम मनोहर लोहिया यांच्या स्वप्नातील वर्गविहीन समाज निर्मितीचा प्रयत्न करणाऱ्या समाजवादी विचारसरणीचे तीन-तेरा वाजले आहेत. लालूप्रसाद यादव, नीतीशकुमार, उत्तरप्रदेशचे मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान आणि शरद यादव प्रभृतींनी समाजवादातील ‘स’ खोडून उत्तर भारतात ‘माजवाद्यां’ची दहशत निर्माण केलेली दिसते. या अशा कचकडय़ा विरोधकांकडून काँग्रेसच्या महाशक्तीला आव्हान दिले जाणे कल्पनेतही शक्य दिसत नाही. त्यातल्या त्यात भाजपाची गेल्या दहा वर्षांत झालेली घसरण तर लोकशाहीप्रेमींना चिंता वाटावी एवढी भयानक आहे.
यंदा आपल्या देशात तब्बल 25 कोटी टन इतके धान्य उत्पादन झाले आहे. शासकीय गोदामे अक्षरश: धान्याने ओसंडून वाहत आहेत. तरीही भारतात दररोज 7 हजार लोक उपासमारीने मरतात, ही वस्तुस्थिती मन अस्वस्थ करते. देशातील 11 कोटी टन धान्य पाऊसपाण्याने सडते, खराब होते, उंदरांच्या पोटात जाते; पण देशातील 23 कोटी लोक रोज उपाशीपोटी झोपतात. भाकरीचा चंद्र शोधण्यात त्यांची हयात जाते.. भारत सरकारने ‘चांद्रयान’ मोहिमेची घोषणा केली त्या वेळी आपल्या सर्वाना किती आनंद झाला होता; पण तसे पाहिले तर चंद्रावर पोचण्यासाठी यानाची गरज काय? अन्न महामंडळाच्या गोदामात वर्षानुवर्षे पडून असलेल्या धान्याच्या पोत्यांचा एकावर एक असा थर रचला तर माणूस सहज चंद्रापर्यंत पोहचेल.. आणि हो, त्या माणसाला उतरण्यासाठीही पोत्यांची रास रचता येईल, एवढे मुबलक धान्य आपल्याकडे पडलेले आहे.. ते सडते आहे. आपल्या रोगट आणि कुबट प्रशासनाला मात्र अद्याप जाग येत नाही. रोमन तत्त्वज्ञ सेनेका यांनी सांगून ठेवले आहे, ‘भूकेली जनता सबबी ऐकत नाही, कायद्याची पर्वा करत नाही आणि प्रार्थनांना जुमानत नाही.’
युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्यदैवत आहे. आषाढी-कार्तिकीची वारी हा मराठीजनांचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि नियंत्रणाशिवाय वारीचा सोहळा साजरा होतो. सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझे जीवीची आवढी। पंढरपूरा नेईन गुढी’ असा निर्धार केला होता. माऊलींनी प्रगट केलेली ती इच्छा आजही चढत्या-वाढत्या उत्साहानं लक्षावधी वारकरी पूर्ण करत असतात. आज आणि उद्या ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतील..‘ज्या देशाचे लोक पंढरपूरच्या वारीला जातात, त्या देशाला महाराष्ट्र म्हणतात’, अशी एक महाराष्ट्राची व्याख्या मानववंशशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांनी केली आहे. त्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या वारीविषयी..