Mahesh Mhatre

समाज म्हणजे तरी काय, बटाटयाचे पोते. विविध आकारांच्या माणसांना रितीरिवाजाच्या, नीतिबंधनाच्या पोत्यात भरलेले असते, म्हणून एकसंधपणे ‘उभा’ असणारा समाज बरा दिसतो. पण जेव्हा नीतिमत्तेची, संस्कृतीबंधाची शिवण सैल होते, त्या वेळी पोत्यातील बटाटे खाली घसरू लागतात. ही ‘घसरण’ साथीच्या रोगासारखी सगळयाच बटाटयांमध्ये पसरण्याचा धोका असतो. त्यासाठी वेळीच त्या पोत्याची शिवण विचारपूर्ण मनाने करणे जरुरीचे असते. ते झाले नाही तर अस्ताव्यस्त होण्यासाठी, स्वत:ला नासवण्यासाठी आतुर असलेले बटाटे एकामागोमाग एक खराब होत जातात. त्यातून समाजाच्या उच्चस्थानावर असणारे ‘बटाटे’सुद्धा सुटत नाहीत. परिणामी त्यांच्या दरुगधीने सारा परिसर भरून जातो.. 

कुठे भ्रष्टाचार, कुठे महिलांवरील अत्याचार, कुठे मन अस्वस्थ करणारा अनाचार तर कुठे विचारवंतांचा वेडाचार.. सगळीकडे दरुगधीच दरुगधी..आणि म्हणूनच ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या इशा-याची प्रकर्षाने आठवण येते. ‘आधी समाजसुधारणा करू, मग लोकांना राजकीय स्वातंत्र्यासाठी सिद्ध करू’ असे आगरकर कळकळीने सांगत होते, पण लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. संतापलेल्या सनातनी पुणेकरांनी आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली होती, पण तरीही आगरकरांनी आपला ‘सुधारकी’ बाणा सोडला नाही. आपणही तो स्वीकारला पाहिजे. १७ जून ही आगरकरांची पुण्यतिथी महाराष्ट्रात फार कमी लोकांच्या लक्षात राहते. यावेळी आपण ती आगरकर विचार स्मरणाने साजरी केली तरी नव्या बदलाची सुरुवात होईल.



‘प्रत्येक माणसामध्ये अफाट सामर्थ्य दडलेले असते, पण लोक या सामर्थ्यांचा वापरच करीत नाहीत. आपण सर्वानी हे सामर्थ्य वापरले तर अवघा समाज सुखी-समाधानी होईल’, असा आशावादी आग्रह हेन्री डेव्हिड थोरो या अमेरिकन विचारवंताने सातत्याने मांडला. एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या थोरो यांच्या या निसर्गवादी विचारांचा प्रभाव विसाव्या शतकावरही पडला. भारताच्या बाबतीत सांगायचे तर महात्मा गांधी यांना थोरो लिखित ‘वाल्डेन’ ग्रंथाने खूपच प्रभावित केले होते. निसर्गाशी समरस होत, शारीरिक श्रम आणि संयमी जीवन जगण्याची अवघ्या जगाला प्रेरणा देणा-या थोरो यांनी गांधीजींच्या शांततापूर्ण आणि अहिंसावादी क्रांतिकल्पनेला वैचारिक बैठक दिली होती. गांधीवादाने फक्त भारतालाच स्वातंत्र्य मिळवून दिले असे नाही, तर दक्षिण आफ्रिकेपासून म्यानमापर्यंतच्या र्सवकष समाजक्रांतीला गांधी तत्त्वज्ञानाची प्रेरणा लाभली, आजही लाभतेय. फक्त ज्या देशात हे मानवी सहजीवनाची सुख स्वप्न पाहणारे तत्त्वज्ञान जन्माला आले तेथे मात्र त्याची पदोपदी पायमल्ली होताना दिसते आणि दुसरीकडे देशातील सगळ्याच ‘सुशिक्षितांचे’ डोळे आकाशवेधी शेअरबाजारावर खिळलेले असल्यामुळे, आपल्या पायाखाली काय जळतेय याकडे कुणाचेच लक्ष नाही..

काय सुरू आहे आमच्या समाजात?

कोणतेही वृत्तपत्र उघडा. एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या भयंकर बातम्या असतील तर दुसरीकडे त्याच्या समर्थनाच्या. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासारखा जबाबदार माणूस ‘घरोघरी पोलिस बसवले तरी महिलांवरील अत्याचार कमी होणार नाहीत,’ असे ठासून सांगतो. पुन्हा आपल्या म्हणण्याचा ‘तसा अर्थ’ नव्हता, असे बोलून मोकळाही होतो, तर तिकडे उत्तर प्रदेशात तरुण मुख्यमंत्री अखिलेश उद्दाम आणि उर्मट वक्तव्यांनी अत्याचारग्रस्त महिलांवर शाब्दिक हल्ला करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.. मनात सहज प्रश्न येतो, महिला वाचकांच्या मनात अशा बातम्या वाचताना संतापाचा लाव्हा कसा उसळून येत असेल.. त्याची दाहकता लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतरही काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा समाजवादी पक्षाला न जाणवण्याएवढे हे पक्ष संवेदनाहीन, गेंडय़ाच्या कातडीचे झाले असतील का?

रस्त्यांवरील, रेल्वेमार्गातील आणि नदी-नाल्यांमधील अपघात हे असेच आपल्याकडील बातम्यांचे विषय. आपल्या देशात किती सहजपणे अक्षरश: किडया-मुंग्यांसारखी माणसे मरतात. ब-याचदा स्वत:ची कोणतीही चूक नसताना, छोटी सावधगिरी न बाळगल्यामुळे एकावेळी पाच-पन्नास माणसे सहजपणे मरतात. परवा आंध्र प्रदेशातून हिमाचल प्रदेशात सहलीला गेलेल्या इंजिनीयरिंगच्या २५ विद्यार्थ्यांचा धरणाचे पाणी अचानक सोडल्यामुळे झालेला भीषण मृत्यू मन हादरविणारा होता. तारुण्याच्या उंबरठयावर असणा-या त्या २५ विद्यार्थ्यांच्या घरात त्या बातमीने उडालेला दु:खाचा उद्रेक प्रत्येक संवेदनशील मनाला चटका देणारा होता. आमच्या बथ्थड डोक्याच्या सरकारी यंत्रणेला मात्र त्यामुळे काहीच दु:ख होत नाही का, की लोकांचे हे असे हकनाक मरणे आमच्या शासनव्यवस्थेने गृहीत धरले असावे.

माणसाच्या जगण्याला आपल्याकडे किंमत उरलेली नाही, मग त्याचे मरणेही सुसह्य व्हावे याचा विचार करायला कुणाला वेळ असेल? प्रत्येक माणसात ‘देव’ पाहण्याची भाषा आम्ही खूप करतो, पण जेव्हा कृतीची वेळ येते त्या वेळी त्या ‘देवाला’ किंवा ‘देवीला’ रस्त्यावर फेकण्यास मागेपुढे पाहिले जात नाही. स्त्रीभ्रूण हत्या किंवा नवजात बाळ उकीरडय़ावर फेकणे या गोष्टी आपल्या देशात तशा ‘कॉमन’ मानल्या जातात, पण रुग्णालयातील आजारी माणसे रस्त्यावर फेकण्याची नवी ‘भिवंडी पद्धत’ सुरू झाली आहे. गेल्याच आठवडयातील गोष्ट आहे. भिवंडी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सत्येंद्र पांडे (२७ र्वष) आणि बिरेन वर्मा (३० र्वष) हे दोन रुग्ण दाखल केले गेले होते. उत्तर भारतातून आलेल्या या दोन गरीब तरुणांचे आजार बळावल्यामुळे ते सारे नैसर्गिक विधी जागेवरच करीत. रुग्णालयातील स्वच्छतेचे काम ठेकेदाराकडे दिलेले असल्यामुळे डॉक्टर-नर्सेस आणि अन्य कर्मचारी त्या रुग्णांकडे डोळेझाक करीत. परिणामी ठेकेदार महेश शिर्के याच्या सफाई कामगारांना काम करावे लागत होते. त्यावर तोडगा म्हणून ठेकेदाराने चक्क या दोन्ही रुग्णांना ठाण्यातील एका कमी रहदारीच्या आडवाटेवर फेकून दिले. त्यामुळे एका रुग्णाचा जीव गेला. दुसरा अखेरच्या घटका मोजीत आहे. पोलिसांनी या प्रकरणी ठेकेदारासह दोन सफाई व रुग्णवाहिकेच्या चालकाला अटक केली आहे, पण तो काही या बदलत्या मानसिकतेवर उपाय होत नाही. सेवा नाकारणा-यांना अटक करून आमच्या किडलेल्या समाजमनाला, बिघडलेल्या शासनयंत्रणेला सुधारता येणार नाही. त्यासाठी आमच्या प्रत्येक प्रश्नाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे, पण तसा अभ्यास करण्याची, एखाद्या विषयाच्या मुळाशी जाण्याची पद्धतच स्वातंत्र्यानंतर आमच्या समाजात विकसित झालेली दिसत नाही. विद्यापीठे, वृत्तपत्रे, विविध अकादम्या या आणि अशा इतर विचार-वर्तनाचे विश्लेषण करणा-या संस्थाही समाजाचाच भाग असल्यामुळे तेथील वैचारिक प्रगती कधीच सखोल झाली नाही. परिणामी समाजाच्या पृष्ठभागावर दिसणा-या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बदलांना, तवंगांना प्रगतीचे तरंग मानण्याची पद्धत रूढ झाली. स्वातंत्र्यानंतर ज्या संस्थांकडून समाजमनाचा तळ गाठून तेथील बदलांचा अभ्यास केला जाईल अशी आशा होती, त्या संस्था एकतंत्री कारभार, एकांगी विचारसरणी आणि एकांडय़ा कार्यपद्धतीमुळे लोकांपासून तुटल्या. वाईची प्रज्ञा पाठशाळा, पुण्याची यशदा, आंबेडकर प्रबोधिनी, गोखले अर्थशास्त्र संस्था, भांडारकर इन्स्टिटयूट आदी समाजप्रबोधनाची क्षमता असणा-या संस्था ‘ठरावीक लोकांनी, खास लोकांसाठी चालविलेल्या संस्था’ कधी बनून गेल्या हे ना त्या संस्था चालवणा-यांना कळले, ना महाराष्ट्राला त्याची कधी जाणीव झाली. ज्याप्रमाणे कृषी विद्यापीठामध्ये चालणारे संशोधन फार क्वचितच शेतक-याच्या शेतात पोहोचते, तद्वत या मान्यवर संस्थांमध्ये होणारी वैचारिक घुसळण सामान्य माणसांच्या परिघाबाहेरच राहते. हे कुठे तरी थांबले पाहिजे. तसेच नवीन तंत्रज्ञान, जीवनपद्धती आणि नवविचारांचा वेध घेणा-या संशोधन संस्था निर्माण होणे गरजेचे आहे. पण तसे होत नसल्यामुळे आमच्याकडील ‘केजी टू पिजी’ अशी खालपासून वपर्यंतची शिक्षणव्यवस्था उपयोगी आहे की नाही, यावर साधी चर्चाही कुणी करताना दिसत नाही. मग त्यात बदल सुचविणे फार पुढची गोष्ट. दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आलेल्या अफाट महत्त्वावर कुणी शिक्षणतज्ज्ञ तोंड उघडायला तयार नाही. इंग्रजी माध्यम हा यशाचा राजमार्ग नाही. आपल्या मातृभाषेत शिक्षण घेऊन तुम्ही अफाट यश मिळवू शकता, असे सांगणारा एकही जाणकार माणूस अवती-भवती दिसत नाही. परिणामी पुढील पिढीच्या चांगल्या आयुष्याची, खरे सांगायचे तर इंग्लंड-अमेरिकेतील ऐषारामाची स्वप्ने पाहणारे पालक आपल्या मुला-मुलींना ‘रॅट रेस’मध्ये ढकलतात. अगदी ज्युनियर के. जी. च्या वर्गात प्रवेश मिळवण्यापासून शाळेच्या एकाहून एक किमती मागण्या पूर्ण करण्यासाठी हे पालक ऊर फुटेस्तोवर धावतात. मुलांचे कपडे, फी, शिकवण्या, मोबाइल, टॅबसारख्या महागडया हौशी पुरवताना या पालकांची अक्षरश: दमछाक होत असते. पण तरीही त्यांच्या या वर्तनातील गुणदोषांची चिकित्सा करण्यासाठी एकही शिक्षणतज्ज्ञाला पुढे यावेसे वाटत नाही, कारण आमच्या समाजातील ‘विचारवंतां’चे रूपांतर परोपजीवी, दुस-यांचे शोषण करणा-या ‘विकारजंता’मध्ये झाले आहे. तत्कालिक फायदा मिळतो म्हणून आज पालकांच्या आयुष्यभराच्या पुंजीवर डल्ला मारणा-या या सुशिक्षितांच्या बुभुक्षित नजरा आता पालकांना लुबाडण्याचे नवनवे स्वप्नमार्ग शोधत आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे. कारण या यशाचे दावे करणा-या शिक्षणतज्ज्ञांच्या मुखवटयाआड एक विकारी व्यापारी दडलेला असतो. आपल्या फायद्यापलीकडे त्याला दुसरे काहीच दिसत नसते. त्यासाठी आपली ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढवून लोकांना जाळ्यात ओढायचे यासाठी तो कसे नवनवे डाव टाकतो हे नुकतेच  जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालाने कळले. आजवर चाटे, लाटे मंडळींनी शिक्षणाचा बाजार मांडला होता. त्यांच्या बौद्धिक मर्यादांमुळे तो बाजार लवकर उठला, पण जेव्हा एखादा निवृत्त आयएएस अधिकारी, जो ऊठसूठ संघ परिवाराच्या प्रथा-परंपरांचे समर्थन करीत असतो, ज्याला नरेंद्र मोदी चक्क येशू ख्रीस्तासारखे वाटतात, तो शैक्षणिक पेढी थाटून बसतो, तेव्हा लोकांची फसवणूक जास्त प्रमाणात होण्याची शक्यता वाढते. पालकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या नावावर ६० हजार ते ८० हजार अशी जबरदस्त फी आकारणाऱ्या या ‘रुपयाधिका-यांनी’ आपल्या शिक्षण संस्थेच्या नावात आवर्जून ‘परिवार’ हा शब्द योजिला आहे. ज्याच्या बळावर संघ परिवाराच्या शैक्षणिक संस्थांचे सहकार्य आपोआप प्राप्त करता येते. पण ज्या व्यक्तिरेखेचे नाव भारतात, नि:स्वार्थी, निरपेक्ष आणि निरलस सेवेसाठी प्रसिद्ध आहे, अशा ‘चाणक्या’चे नाव वापरून बेफाट अर्थप्राप्ती करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आम्हाला पडलाय. ज्यांच्या डोळ्यांत मुलांच्या यशाची स्वप्न आहेत, त्यांना तो पडेलच असे नाही. आर्थिक कुवत नसताना अनेक पालक अशा फसव्या जाहिरातींच्या आहारी जात असतील, त्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी शासकीय पातळीवरून पद्धतशीर पावले उचलली गेली पाहिजेत. सोज्वळ चेह-याचा आव आणत डाव साधणा-या सगळ्याच कोचिंग क्लासेसना कायद्याच्या चौकटीत आणणे गरजेचे आहे. त्यांच्या ‘हमखास यशा’च्या वर्षानुवर्षे यशस्वी होणा-या ‘फॉम्र्युल्यां’ची कसून चौकशी झाली पाहिजे. क्लाससंचालक, परीक्षा नियंत्रक आणि पेपर तपासणा-यांच्या युतीमुळे आजवर किती गोंधळ झालेला आहे, हे शासनातील उच्चपदस्थ जाणतात, म्हणून त्यांनी आता तरी पुढाकार घेऊन शिक्षणाला लागलेली ‘खासगी किड’ संपवली पाहिजे. तरच समृद्ध आणि सुविचारी समाजाची कल्पना करता येईल. अन्यथा जग नैतिक आणि भौतिक प्रगती करत पुढे जात असताना आम्ही अगतिक होऊन मागे पडू. 

तसे पाहिले तर तांत्रिकदृष्टया आज आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. ज्ञानाधिष्ठित जीवनमूल्ये मानणारे आधुनिक तंत्रज्ञान मनाच्या वेगाने जगाच्या कानाकोप-यात पसरत आहे. हे तंत्रज्ञान जिथे जन्मले त्या युरोप-अमेरिकेसारख्या मानवी मूल्यांचा आदर करणा-या देशात त्याचा उपयोगही जगणे सोपे करण्यासाठी झाला. तिकडे लागणा-या सर्व आधुनिक शोधांमध्ये समग्र मनुष्यमात्राचा विकास ही संकल्पना मुख्य असते. परिणामी त्या वैज्ञानिक शोधातून विकसित झालेले तंत्र सामान्य माणसाच्या हातात सोपे करून देण्याकडे तेथील शास्त्रज्ञ आणि संशोधक आवर्जून लक्ष देतात. त्याउलट आपल्याकडील कोणत्याही विषयातील तज्ज्ञ मंडळी घ्या (अर्थात त्याला माजी राष्ट्रपती कलामसाहेब किंवा प्रसिद्ध संशोधक माशेलकर साहेबांसारखे अनेक सन्माननीय अपवाद आहेत.) आधी ते आपले संशोधन किंवा वैचारिक विवेचन सामान्य माणसाला कळणारच नाही, या मतावर ठाम असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची कोणी चिकित्सा केलेली त्यांना आवडत नाही आणि त्याहून दुर्दैवाची बाब म्हणजे, आपण ज्या क्षेत्रात मेहनत करून ज्ञान प्राप्त केले, त्याचा उपयोग सर्वसामान्य माणसाचे जगणे सुलभ होण्यासाठी व्हावा, अशी फार कमी लोकांची अपेक्षा असते. १९ व्या शतकात आपला देश भलेही पारतंत्र्यात होता. साक्षरतेचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे अत्यल्प होते. अफाट गरिबी होती, अंधश्रद्धांच्या मगरमिठीत अवघा समाज सापडलेला होता. या साऱ्या नकारात्मक वातावरणातही त्या काळातील लोकांमध्ये जे विचारमंथन होत होते, त्याचा समाजाला उपयोग होत होता. आजच्याप्रमाणे त्या काळातील विद्यापीठे ‘पदव्यांचे कारखाने’ बनले नव्हते, त्यामुळे विद्यापीठात ज्ञानसाधना होत होती. त्या काळातील विद्यापीठांमध्ये बहुतांश प्राध्यापक इंग्लंड-युरोपातून येत असत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मुक्त वाव मिळे. आज देशातील जास्तीत जास्त दहा टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसे वातावरण उपलब्ध आहे. उर्वरित ठिकाणी आनंदी आनंद. सारे प्राध्यापक आपापल्या अभ्यासक्रमात इतके गढलेले की त्यांना त्या पलीकडील जगाची फिकीर उरलेली नाही, त्यामुळे मर्यादित ज्ञानात भरपूर गुण मिळविण्याच्या ‘यशस्वी फॉर्म्युल्यां’ची ‘मास्टर की’ ही अध्यापन क्षेत्रातील मंडळींची ‘मास्तरकी’ बनलेली दिसते. मग अशा शाळेतून, महाविद्यालयांतून बाहेर पडणारी मुले-मुली प्रगल्भ सामाजिक जाणिवा घेऊन समाजात जातील अशी अपेक्षा कशी करावी?

आम्ही ज्या पाश्चात्य देशांतील आधुनिक तंत्रज्ञान, स्वकेंद्रित जीवनशैली आणि वैश्विक अर्थज्ञान आज मिळवलेले आहे, ते मिळवताना फक्त ‘कॉपी-पेस्ट’चेच कष्ट आम्हाला पडलेत. त्याउलट संगणक ते इंटरनेट आणि त्यानंतर आता मोबाइल ते फोर-जी किंवा त्यापुढील माहिती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या प्रगत देशांतील शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. म्हणून त्या देशांमध्ये हे तंत्रज्ञान जेव्हा लोकांच्या हाती जाते तेव्हा त्याच्या वापराची आचारसंहिताही तयार केली जाते, पण तेच संगणक वा मोबाइलवर आधारित आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशात येते त्या वेळी त्याच्या ‘वापरा’ऐवजी ‘गैरवापरा’ची शक्यता जास्त वाढते. साधे मोबाइलचेच उदाहरण घेऊया. मोबाइल या एकाच यंत्रामध्ये भ्रमणध्वनी, कॅमेरा, रेडिओ, संगणक, टॉर्च, इंटरनेट, डायरी या तुम्हाला सर्वार्थाने उपयोगी पडतील अशा सुविधा उपलब्ध असतात. ‘सोशल मीडिया’द्वारे तुम्ही मोबाइल म्हणजे ‘गप्पांचा कट्टा’ बनवू शकता. तर दूरच्या प्रवासात मोबाइल तुम्हाला गाणी ऐकवून वा सिनेमा दाखवून मनोरंजन करू शकतो. हे सारे कितीही खरे असले तरी मोबाइलचा वापर किती व कसा करावा याचेही नियम आहेत. मी अमेरिका, जर्मनी, इस्रयल, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि बेल्जियमसारख्या प्रगत देशातील विद्यापीठांमध्ये फिरलो आहे. तेथील परिसंवादांमध्ये विद्यार्थ्यांसह सहभागी झालो आहे, पण एकाही कॅम्पस्मध्ये मला मोबाइल हातात घेतलेला मुलगा वा मुलगी दिसली नाही. त्यामुळे तेथील कार्यक्रमांमध्ये ‘कृपया तुमचा मोबाइल बंद करा’ अशी उद्घोषणा ऐकायला मिळाली नाही. आपल्याकडे एखाद्या नेत्याची प्रचारसभा असो किंवा एखाद्या नामवंत व्यक्तीची शोकसभा, भयंकर आवाजातील रिंगटोन वाजणारच याची खात्री असते. रेल्वे वा बस प्रवासात तर हे असे मोबाइलधारक म्हणजे मोठा ताप असतो. ते कधी मोठमोठयाने आपला खासगी संवाद जगजाहीर करीत असतात, तर कधी मोबाइलमधील गाणी लोकांना ऐकण्याची सक्ती करतात. जर तुम्ही त्यांना समजवायला गेलात, तर ते तुम्हालाच दोन शब्द ऐकवण्याच्या तयारीत असतात. रस्त्यावर, रेल्वे रूळ पार करताना कानात इयरफोन लावून मोबाइलधारक यमलोकी गेल्याच्या आजवर अनेक बातम्या ऐकल्यात, पण तरीही आमचे लोक सुधारायला तयार नाहीत. गाडी चालवताना मोबाइल कानाला लावून बोलणे हे बेकायदेशीर असले तरी दररोज हजारो भारतीय क्षणाक्षणाला हा कायदेभंग करत असतात. कारण सर्वाना पोलिस पकडू शकत नाहीत आणि पकडले तरी काही मोठी शिक्षा करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने मोबाइलचे फार समर्पक शब्दांत वर्णन केले होते. तो म्हणतो, ‘मोबाइल हे माणसाला खोटे बोलायला प्रवृत्त करणारे यंत्र आहे.’ तुम्ही तुमच्या आसपासची उदाहरणे पाहा, लोक मोबाइलवर किती सहजपणे खोटे बोलतात. माणूस घरी असेल तर ऑफिसला आहे असे सांगतो. ऑफिसमध्ये गप्पा मारत असेल तरी मीटिंगमध्ये आहे असे सांगतो. बहुतांश वेळा काहीही कारण नसताना मोबाइलधारक खोटे बोलतो आणि नकळतपणे आपल्या संवेदनशील मुलाबाळांवर तेच संस्कार करतो. आज आपल्या देशात मोबाइल वापरणा-या मुलांची संख्या वेगाने वाढतेय. भारतात लोकसंख्या १२१ कोटी आणि मोबाइलधारक शंभर कोटींहून अधिक अशी स्थिती झाली आहे.

आपल्या देशातील ६० कोटींहून अधिक तरुण वयाची पंचविशी पार न केलेले असल्यामुळे बहुतांश मोबाइलधारक तरुण आहेत. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक घरासाठी मोबाइल जणू ‘स्टेटस सिम्बॉल’ प्रतिष्ठेचे प्रतीक बनलाय. ‘टीसीएस जेन वाय’तर्फे या अशा घरातील शाळकरी मुलांच्या मोबाइल वापरासंदर्भात एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. जुलै ते डिसेंबर २०१३ या कालावधीत मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, कलकत्त्यासह देशातील १४ प्रमुख शहरांतील, १२ ते १८ वयोगटांतील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांशी बोलून हा अहवाल तयार केला आहे. त्यातील निष्कर्ष आमच्या भावी पिढीचे ‘भविष्य’ अधोरेखित करणारे आहेत. महानगरातील १० पैकी ९ विद्यार्थी मोबाइल वापरतात. त्यातील बहुतेकांचा कल स्मार्टफोनकडे असतो. मोबाइलवर इंटरनेटचा वापर करणे त्यांना आवडते. ८७ टक्के मुले सोशल मीडियाद्वारे माहिती मिळवण्याला प्राधान्य देतात. सुमारे ७० टक्के विद्यार्थी ‘ऑनलाइन’ खरेदी करतात. शहरातील कुमारवयीन विद्यार्थ्यांचा फेसबुककडे अजूनही ओढा आहे. ७६ टक्के मुला-मुलींचे फेसबुक अकांउट आहे. त्यापैकी ४८ टक्के विद्यार्थी दररोज तीन वेळा फेसबुकवर काही तरी लिहितात. महानगरातील विद्यार्थ्यांएवढेच नव्याने शहरीकरण होत असलेल्या निमशहरी भागातील मुलेही मोबाइलचा ‘स्मार्ट’पणे वापर करतात हे या सर्वेक्षणात आढळून आले आहे, पण टाटा उद्योग समूहाचा एक महत्त्वपूर्ण भाग असणा-या ‘टीसीएस’ने या पाहणीमागे  स्वार्थापलीकडे पाहिले असते तर या अहवालाचा समाजाला खूप उपयोग झाला असता. त्यांचे हे सर्वेक्षण त्यांच्या फायद्याच्या विषयांपुरतेच मर्यादित ठेवले गेले. या अठरा हजार मुला-मुलींना जर ते कोणत्या वेबसाइटवर जातात, कोणत्या प्रकारचे व्हीडिओ पाहतात, पालकांना ते मोबाइलला हात लावू देतात की नाही, असे प्रश्न विचारले असते तर अनेक धक्कादायक निष्कर्ष हाती लागले असते आणि त्याचा या उमलत्या पिढीच्या बदलत्या मनोव्यापाराचा अभ्यास करण्यासाठीही फायदा झाला असता. जो अभ्यास करणे ही काळाची गरज बनली आहे. सध्याच्या बदलत्या युगात माहिती-तंत्रज्ञानाने माणसांच्या जगण्याचा साचा पार बदलून गेला आहे. कौटुंबिक नातेसंबंधांची चौकट चार दिशांना फेकली जात आहे. परिणामी संगणक-मोबाइलच्या माध्यमातून माणसे ‘व्हॅर्च्युअल वर्ल्ड’ आभासी विश्वात जगण्यासाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे मोबाइल गेम्स असो वा सोशल मीडियावरील उथळ प्रेम, या सगळ्यांचा आमच्या संपूर्ण समाजावर परिणाम होत आहे. संपर्क आणि संवादाच्या या बदलत्या संदर्भाचा जर आपण वेळीच समन्वय साधला नाही, तर आज वरवरचे वाटणारे प्रश्न त्सुनामीसारखे उसळून अंगावर येतील..तुम्हाला तसे वाटत नाही का?

Categories:

Leave a Reply