समाज म्हणजे तरी काय, बटाटयाचे पोते. विविध आकारांच्या माणसांना रितीरिवाजाच्या, नीतिबंधनाच्या पोत्यात भरलेले असते, म्हणून एकसंधपणे ‘उभा’ असणारा समाज बरा दिसतो. पण जेव्हा नीतिमत्तेची, संस्कृतीबंधाची शिवण सैल होते, त्या वेळी पोत्यातील बटाटे खाली घसरू लागतात. ही ‘घसरण’ साथीच्या रोगासारखी सगळयाच बटाटयांमध्ये पसरण्याचा धोका असतो. त्यासाठी वेळीच त्या पोत्याची शिवण विचारपूर्ण मनाने करणे जरुरीचे असते. ते झाले नाही तर अस्ताव्यस्त होण्यासाठी, स्वत:ला नासवण्यासाठी आतुर असलेले बटाटे एकामागोमाग एक खराब होत जातात. त्यातून समाजाच्या उच्चस्थानावर असणारे ‘बटाटे’सुद्धा सुटत नाहीत. परिणामी त्यांच्या दरुगधीने सारा परिसर भरून जातो..
कुठे भ्रष्टाचार, कुठे महिलांवरील अत्याचार, कुठे मन अस्वस्थ करणारा अनाचार तर कुठे विचारवंतांचा वेडाचार.. सगळीकडे दरुगधीच दरुगधी..आणि म्हणूनच ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या इशा-याची प्रकर्षाने आठवण येते. ‘आधी समाजसुधारणा करू, मग लोकांना राजकीय स्वातंत्र्यासाठी सिद्ध करू’ असे आगरकर कळकळीने सांगत होते, पण लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. संतापलेल्या सनातनी पुणेकरांनी आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली होती, पण तरीही आगरकरांनी आपला ‘सुधारकी’ बाणा सोडला नाही. आपणही तो स्वीकारला पाहिजे. १७ जून ही आगरकरांची पुण्यतिथी महाराष्ट्रात फार कमी लोकांच्या लक्षात राहते. यावेळी आपण ती आगरकर विचार स्मरणाने साजरी केली तरी नव्या बदलाची सुरुवात होईल.