Mahesh Mhatre

गुढीपाडवा, म्हणजे आपला नववर्ष दिवस. हल्ली या दिवसाला शोभायात्रांमुळे अगदी उत्सवी स्वरूप आलेले दिसते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा या उत्सवाला जास्तच उधाण येईल, अशी चिन्हे दिसताहेत. आमचा दिग्विजयी राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी १९३५ वर्षापासून आम्ही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी कालगणना वापरत आहोत. श्रीशालिवाहन शक म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि मध्य प्रदेशातील लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली ही कालगणना भारत सरकारने अधिकृतपणे भारतीय कॅलेंडर म्हणून मान्य केली आहे. एका पराक्रमी मराठी राजाच्या नावाचे जवळपास दोन हजार वर्षानंतरही होत असलेले स्मरण जेवढे आनंददायी, तेवढाच मराठी लोकांना आपल्या राजाचा पडलेला विसरही वेदनादायी वाटतो. गणपतीच्या मिरवणुकीत, नवरात्रातील दांडियात नाचणारी मराठी तरुणाई आता गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतही तेच रंग उधळताना दिसते.. त्यांनी शिवरायांप्रमाणे, शालिवाहन राजाचेही रूप आठवून पाहावे..


बदलते हवामान, वाढते तापमान आणि राजकीय मानापमान यामुळे सध्या सर्वसामान्य माणूस अक्षरश: ‘संतप्त’ झालेला दिसतोय. गारपिटीने कंबरडे मोडलेला शेतकरी वर्ग असो वा, दररोजच्या जीवनसंघर्षाने वैतागलेला शहरी वर्ग, सगळेच त्रासलेले. त्यात भरीस भर म्हणजे बदलत्या नातेसंबंधांनी क्षीण होत चाललेली कुटुंबव्यवस्था आणि या कौटुंबिक चौकटीवर ‘उगवणारे’ घर, नोकरी आणि तसेच काही महत्त्वाचे प्रश्न. घरोघरी दिसणा-या स्वार्थमूलक अंतर्विरोधाच्या विषवल्लीने रक्ताच्या नात्याला पाण्यापेक्षा पातळ करून टाकलंय. अशा विचित्र सामाजिक आणि आर्थिक संक्रमणावस्थेतूनअवघा भारतीय समाज जात असताना आमच्याकडे सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. निवडणूक म्हटली की ‘सर्व प्रकारचे’ राजकारण आलेच. अर्थात, ते सर्वपक्षीय सहमतीने चालणारे असते, त्यामुळे ते कशा प्रकारे व्हावे, हे मतदार नव्हे तर बडय़ा राजकीय पक्षांच्या मर्जीवर चालते. खेदाची बाब म्हणजे या सा-या राजकीय गदारोळात सामान्य माणसाला काय हवे, हे कोणालाच ऐकू जात नव्हते. आजवर त्याच्या ‘मता’ला, म्हणण्याला या राजकीय प्रक्रियेत किंमत नसायची. त्यामुळे बडया राजकीय पक्षांविरोधात बोलण्याची मतदारांकडे हिंमत नसायची, पण आता स्थिती बदलतेय.. नवतंत्रज्ञानाच्या साथीने, एकजुटीने मतदार बोलू लागलेत आणि राजकीय पक्ष बदलू लागले आहेत. जणू तरुणांच्या मनात गुढीपाडव्याच्या आधीच ‘विचारांची गुढी’ मोठया विश्वासाने उभारली जात आहे. तसे मोठया प्रमाणावर झाले, तर आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेवर कोणताही पक्ष आला तरी त्यामागे उभा असणारा सामान्य मतदार राजकीय घडामोडींचा ‘मूक साक्षीदार’ असणार नाही. अवती-भवतीच्या परिस्थितीचा जाणकार असणारा हा मतदार जागरूक असेल. त्याला फक्त आपल्या हक्कांचीच नव्हे तर कर्तव्यांचीही जाण असेल, अशी आशा करायला हरकत नाही.. गुढीपाडवा हा सणच चांगल्या जगण्याची आशा दाखवणारा आहे. दरवर्षी नव्या नवलाईच्या नवनिर्माणाची निसर्गकळा उंचावत येणारा चैत्राचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. बोच-या थंडीचे काटे आणि फाटे फाल्गुनाच्या होळीत भस्म झाल्यानंतर वसंताचा हिरवा शृंगार लेवविणारा चैत्र येतो, आनंदाचे हिरवे आश्वासन घेऊन. म्हणूनच असेल कदाचित आंब्याची डहाळी आणि कडुनिंबाचा पाला ही आयुष्यातील ब-यावाईट अनुभवांसारखी गोड-कडू प्रतीके पाडव्याशी निगडित झाली असावीत. आपणही दररोजच्या अडीअडचणींच्या कटू आठवणी विसरून जसे सणाचा आनंद घेतो अगदी त्याच उत्साहाने राजकीय प्रक्रियेतही आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत ८१ कोटी ४५ लाख मतदार आपला हक्क बजावतील. ‘जगाच्या पाठीवरील सगळय़ात मोठी निवडणूक’ म्हणून जिचे वर्णन केले जाते, अशा या १६व्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणा-यांची संख्या १० कोटी आहे. गेल्या दहा वर्षात १४ कोटी ४५ लाख मतदार वाढलेत. म्हणजे साधारणत: १५ कोटी मतदार हे वय वर्ष १८ ते ३० च्या दरम्यानचे आहेत. भारतीय समाजवृक्षाला हिरवे आत्मभान देणारी ही कोवळी तरुणाई भलेही नवी आहे. हिवाळ्या-पावसाळ्याची ‘परिस्थिती’ भलेही तरुणाईने पाहिली नसेल. पण समाजवृक्षाचा जीवनरस लाभल्याने अनोख्या उंचीवर पोहोचलेल्या या ‘पोपटी’ पानांकडे एक वेगळी दृष्टी आहे. या पालवीकडे स्वत:चे सळसळते अस्तित्व दाखवण्याची सहजता आहे. वृक्षांच्या अन्य फांद्या-पानांपेक्षा शेवटच्या टोकावरील पानांना जास्त विश्वदर्शन होत असते, हे आपण सारेच जाणतो. अगदी त्याच न्यायाने संगणक-इंटरनेट-मोबाइल या त्रिसूत्रीने ज्यांचे जगणे वेगळे बनले आहे, अशी तरुणाई वेगाने वाढत आहे. आपल्या मनातील भाव-भावना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मांडत आहे आणि त्यातून बदलही घडत आहेत. फार दूर कशाला जायचे, परवाचीच घटना पाहा ना! प्रमोद मुतालिक या ‘श्रीराम सेने’च्या प्रमुखाला भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर काही तासांतच पक्षाला त्याची हकालपट्टी करावी लागली, हे सर्वश्रुत आहे. मुतालिक हा अत्यंत आक्रस्ताळी भाषा वापरणारा, पबमध्ये घुसून तरुणींना मारणारा, प्रेमदिनाला विरोध करणारा असा कडवा हिंदुत्ववादी म्हणून गाजलेला. नरेंद्र मोदींप्रमाणे रा. स्व. संघाच्या मुशीत तयार झालेल्या या नेत्याला भाजपमधून उमेदवारी मिळणार, असेही वातावरण निर्माण झाले होते. पण नवतंत्रज्ञानाच्या चमत्काराने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला धक्का दिला. मुतालिक याच्या पक्षप्रवेशाची बातमी वृत्तवाहिन्या आणि विविध वेबसाइट्सवर झळकताच संतप्त तरुणाईची ‘रागवाणी’ ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वर उमटू लागली. विशेष म्हणजे, महिलांना मारहाण करणा-या या ‘संस्कृतीरक्षक’ प्रमोदाची सगळयात जास्त धुलाई महिलांनी केली. या निवडणुकीत सोशल नेटवर्किंग साइट्सचा सर्वाधिक वापर, खरे तर गैरवापर करणा-या भाजपच्या मुखंडांनी सर्वसामान्य मतदारांच्या मुतालिकविरोधी उद्रेकाचा धसकाच घेतला. परिणामी प्रवेशानंतर काही तासांतच मुतालिक याला भाजपमधून काढून टाकावे, अशी चर्चा सुरू झाली. या अनपेक्षित प्रकाराने भाजपला अडचणीत आणले. मग भाजपचेच गोव्यातील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही मुतालिक विरोधात आघाडी उभारल्याचा देखावा निर्माण केला. मुतालिकसारख्या ‘अतिरेकी’ संस्कृतीरक्षकाला पक्षात स्थान देऊ नका, असे पर्रिकर यांनी पक्षाच्या केंद्रीय समितीला सुनावताच, मुतालिक यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. थोडक्यात काय, तर प्रत्यक्ष मतदानाआधी आपल्याला कोणता नेता हवा किंवा नको हे ठरवता येते, हे आमच्या तरुणाईने दाखवून दिले आहे. म्हणून येणा-या भविष्याविषयी आशा वाटते. 

तडफदार पत्रकार शुभ्रांशू चौधरीचे यश हे या बदलत्या स्थितीचेच द्योतक मानले पाहिजे. शुभ्रांशूने नुकताच जगातील सगळयात मोठा ‘डिजिटल अ‍ॅक्टीव्हिजम् अ‍ॅवॉर्ड’ मिळवला. जगभरातील जाणकार, विद्वान लोकांकडून ‘इंडेक्स ऑन सेन्सॉरशिप’ नामक लंडनस्थित संस्था अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढणा-या लोकांची नावे मागवते. यंदा शुभ्रांशू यांच्या जोडीला ‘विकिलिक्स’चा कर्ता एडवर्ड स्नोडेन यांचेही नाव स्पर्धेत होते. पण जगभरात गाजलेल्या स्नोडेन यांना मागे टाकत शुभ्रांशूने बाजी मारली. कारण त्याने छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात पोलिस आणि माओवाद्यांच्या कचाटयात सापडलेल्या २० लाखांहून जास्त आदिवासींना ‘आवाज’ दिला आहे. ‘बीबीसी’ आणि ‘गार्डियन’सारख्या प्रतिष्ठित वृत्तसंस्थांसाठी दहा वर्षे काम केल्यानंतर ३५ वर्षीय शुभ्रांशूने छत्तीसगडमधील आदिवासी बांधवांना त्यांचे हक्काचे माध्यम मिळावे, त्यांना त्यांच्या हक्काच्या विचारपीठावर व्यक्त होणे शक्य व्हावे, असा निर्णय घेतला. त्यातूनच ‘सीजीनेट स्वरा’ ही कल्पना जन्मली. सीजी ही छत्तीसगढ नावाची आद्याक्षरे, इंटरनेटच्या, माहितीच्या महाजालात सगळयांना एकत्र आणण्याचा हेतू, म्हणून त्यासाठीचा शब्द ‘नेट’ आणि लोकांच्या भावनांना आवाज देण्याचे प्रतीक ‘स्वरा’ अशा अनोख्या संकल्पनेतून ही लोकचळवळ उभी राहिली. आपल्या देशात संवादाचा अभाव हे अनेक समस्यांचे मूळ कारण आहे. नक्षलवाद ही समस्याही त्याला अपवाद नाही. छत्तीसगढमध्ये, जिथे शुभ्रांशू आणि त्याच्या सहका-यांनी ‘सीजीनेट स्वरा’चे संपर्कजाळे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तिथे तर संवादाचा अभावच होता. त्यामुळे जेव्हा एका पत्रकाराकडून त्यासाठी प्रयत्न होऊ लागला, तेव्हा त्याला जेवढा विरोध नलक्षलवाद्यांकडून झाला, तेवढाच पोलिसांकडूनही झाला. पण ही चळवळ थांबली नाही. जंगलात वीजही उपलब्ध नसते, मग संगणकाचा विचारच करणे अशक्य. गोंड अणि कुरूख भाषा बोलणा-या २० लाख आदिवासींना हिंदीचे जुजबी ज्ञान. त्यामुळे संवादासाठी भाषेचा मोठा अडसर होता; पण, त्याच सुमारास फोफावत चाललेल्या मोबाइल क्रांतीने हा प्रश्न सोडवला. शुभ्रांशू आणि त्याच्या सहका-यांनी ‘मोबाइल बातमीपत्र’ ही एकदम वेगळी ‘आयडिया’ समोर आणली. छत्तीसगडमधील कोणत्याही व्यक्तीला काही माहिती-बातमी द्यायची असेल तर त्याने ‘सीजीनेट स्वरा’च्या फोनवर संपर्क साधायचा. तुम्ही ‘मिस्ड कॉल’पण देऊ शकता. त्यानंतर ‘स्वरा’चे सहकारी तुमचे म्हणणे रेकॉर्ड करून घेणार. तुम्ही दिलेल्या माहितीची, अगदी नाव-गाव-पत्त्याची पूर्णपणे खातरजमा करून झाल्यावर तुमची बातमी, तुमच्या आवाजात नेटवर जाणार. जी फोनवरूनसुद्धा ऐकता येणे शक्य आहे.

शुभ्रांशू चौधरीच्या या अभिनव कल्पनेने त्या आदिवासीबहुल भागातील सामान्य लोकांना ‘पत्रकार’ केले आणि म्हणूनच असेल कदाचित जगभरात गाजलेल्या स्नोडेनऐवजी तो अत्यंत मानाचा पुरस्कार शुभ्रांशूला मिळाला. जगभरातील माध्यमतज्ज्ञ, मानवाधिकार चळवळीतील मान्यवर, वकील, विचारवंत यांच्या उपस्थितीत झालेल्या मोठया सोहळयात हा पुरस्कार त्याने स्वीकारला. त्यावेळी केलेल्या भाषणात शुभ्रांशूने फार महत्त्वाचा विचार मांडला. तो म्हणतो, ‘आम्ही आमचा हा सुसंवादाचा प्रयत्न आणखी विस्तारणार आहोत. सध्या आम्ही संगणक, मोबाइल आणि इंटरनेटच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण करतोय. भविष्यात आम्ही यामध्ये रेडिओचा समावेश करून बातमीचा प्रवास उलटय़ा दिशेने होईल, असे पाहू. सध्या ‘मास मीडिया’ मूठभर लोकांच्या हाती आहे. त्यामुळे बातमी वरून खाली येते. आम्हाला ती खालून वर पाठवायची आहे. तरच आपली लोकशाही व्यवस्था टिकेल.’

माओवादी घातपाताच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असणा-या छत्तीसगडमधील एका पत्रकाराने केलेला हा अभिनव प्रयोग सध्या जगात गाजतोय. आजवर आपल्या देशातील बहुतांश माध्यमांनी त्याच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले होते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर ‘स्वरा’ची थोडी तरी दखल घेतली गेली; पण, जेवढी प्रसिद्धी विश्वसुंदरी स्पर्धेत हरल्यानंतरही एखाद्या तरुणीला मिळते किंवा सलग अनेक सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघावर जेवढे लिहिले जाते, तेवढीही प्रसिद्धी शुभ्रांशू चौधरीच्या यशाला भारतात मिळाली नाही. त्याला कारणे काहीही असोत, पण आज आमचे जगणे, खाणे-पिणे, वागणे-बोलणे हे सारे मनोरंजनविश्वाच्या धर्तीवर सुरू असते. त्यामुळेच त्या विश्वातील मनोवेधक घडामोडीच आम्हाला आवडतात. मग त्यात अचकट-विचकट ‘कॉमेडी शो’ असतील वा सासू-सुनेच्या भयंकर मालिका वा मॅच फिक्सिंग करणारे चालू क्रिकेटपटू यांची चर्चा करण्यात आपण धन्यता मानतो. त्या विश्वाबाहेर काही जग आहे, याची आपल्याला पर्वाही नसते. शुभ्रांशू आणि त्याच्यासारखे शेकडो तरुण अशा वेगळया जगातील लोकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न करताहेत. आम्ही त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली पाहिजे आणि आपणही हा सुसंवाद वाढवला पाहिजे.

आपल्याकडे कोणतेही नवे संशोधन फार कमी प्रमाणात होते. नवे तंत्रज्ञान आपण बाहेरच्या देशातून ‘आयात’ करतो. मुख्य म्हणजे ते नवतंत्रज्ञान आपल्या हाती आले तर त्याचा दुरुपयोग कसा करावा, याची पहिली माहिती घेतली जाते. सध्या कोटयवधी तरुणांच्या ‘हातात’ आलेले सोशल नेटवर्किंग साइट्सचे हत्यार हे त्याचे उत्तम उदाहरण होय. ‘फेसबुक’च्या स्थापनेमागील उद्देश सांगताना मार्क झुकेरबर्ग म्हणतो, ‘सुरुवातीला ‘फेसबुक’ एक कंपनी म्हणून निर्माण करण्याचा आमचा विचारच नव्हता. आम्ही ठरवले होते, एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून फेसबुक पुढे न्यायचे, हे जग अधिक जवळ आणण्यासाठी.’ तो पुढे म्हणतो, ‘फेसबुक हे सुसंवाद आणि आपली कथा सांगण्यासाठीचे माध्यम आहे. आम्हाला नेहमी वाटते, लोकांनी त्याचा वापर करावा. समजा तुम्ही अवयवदानाविषयी माहिती टाकली तर गरजूंना नक्कीच त्याचा उपयोग होईल.’ झुकरबर्गचे हे विचार त्याच्या वयाच्या किंवा त्याहून लहान असणा-या मुला-मुलींना ठाऊक असतील की नाही, हे मला ठाऊक नाही. परंतु ‘फेसबुक’ असो वा ‘ट्विटर’, या माध्यमांचा आपल्या देशात संवादापेक्षा वादासाठीच जास्त वापर होताना दिसतो. विशेषत: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या माध्यमाची शक्ती-क्षमता ओळखल्याने तेथेही राजकारण घुसले. आपल्याकडे संगणक, इंटरनेट आणि मोबाइलचा गैरवापर करणा-यांना रोखण्यासाठी पुरेसे कायदे नाहीत. या क्षेत्रात होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे ज्यांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी किंवा अण्णा हजारे यांचे सामाजिक वा राजकीय योगदान ठाऊक नाही, ती पोरं-टोरं या प्रसिद्ध व्यक्तींची यथेच्छ टवाळकी करताना दिसतात. संगणकीय कलाकारी करून बनवलेली हिडीस चित्रे आणि अश्लील भाषा पाहून तर आमची तरुणाई कोणत्या दिशेने जात आहे, असा प्रश्न पडायचा, अजूनही पडतो. पण ही माध्यमे आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरणा-या राजकीय पक्षांना तसा प्रश्न का पडत नाही, याचे आश्चर्य वाटते.

तरुणाई हे आमचे बलस्थान आहे. ती बिघडवून आम्हाला चालणार नाही. आज जर तुम्ही आपल्या शहरी भागात फिरलात तर प्रत्येक तीन लोकांमध्ये एक तरुण दिसेल. २००१ मध्ये शहरी तरुणांची लोकसंख्या ३५ कोटी ३० लाख होती, ती २०११ मध्ये ४३ कोटींवर पोहोचली आहे. २०२० मध्ये ती ४७ कोटींवर जाईल. म्हणजे त्या वेळी देशातील काम करणा-या एकूण लोकसंख्येपैकी ६४ टक्के लोक तरुण असतील. त्याच काळात चीन, जपानसारख्या देशातील काम करणा-यांचे हात लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत. 

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण आपली शिक्षण-प्रशिक्षणाची समग्र यंत्रणा मजबूत करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी ‘आयआरआयएस नॉलेज फाउंडेशन’च्या वतीने शहरी तरुणाईच्या रोजगार आणि राहणीमानाच्या संदर्भात एक सर्वकष अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये शहरी लोकसंख्येपैकी २० टक्के तरुणाई दिवसाला ६० रुपयांपेक्षा कमी मोलात राबते, असे आढळले होते. उर्वरित तरुणांचे उत्पन्न ग्रामीण भागातील तरुणांपेक्षा जास्त भासत असले तरी शहरातील जीवनमान अधिक महागडे असल्याने शहरी तरुणाई आर्थिकदृष्टया कायम दुर्बल राहते. परिणामी ते काहीच बचत करू शकत नाहीत. चांगली वैद्यकीय किंवा शैक्षणिक सुविधा त्यांना परवडत नाही. या अहवालात शहरी भागातील तरुणींच्या आरोग्याची स्थिती किती दयनीय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. शहरी तरुण महिलांना पुरेसे अन्न आणि पोषक आहार मिळत नसल्यामुळे ५० टक्क्यांहून अधिक तरुण अ‍ॅनिमिक आहेत तसेच अजूनही गरोदरपणात होणारे मृत्यू हे शहरातील तरुणींच्या अकाली मृत्यूमागील महत्त्वाचे कारण आहे. एकूणच काय तर देशातील वाढत्या शहरीकरणामुळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि व्यक्तिगत समीकरणे बदलत आहेत. त्यात आधुनिक माहिती-तंत्रज्ञान, संपर्क आणि दळणवळणाच्या साधनांनी गावा-माणसांमधील अंतर एकदम कमी केले आहे. पण त्याचबरोबर गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी मोठया प्रमाणात वाढवण्यास हेच बदल कारणीभूत होताना दिसत आहेत. हे मन अस्वस्थ करणारे वास्तव राजकीय सभांमधून भाषणे करणा-या बड्या नेत्यांपासून ‘फेसबुक’वर वटवट करणा-या रिकामटेकडया विचारवंतांपर्यंत कोणालाच खटकत नाही, हे आपले सगळय़ात मोठे दुर्दैव आहे. म्हणूनच असेल कदाचित या अशा बिकट काळात आमचा शालिवाहन राजा आठवतो. त्या घराण्याला सातवहन म्हणूनही ओळखले जाते. मराठीतील दोन हजार वर्षापूर्वीचा आद्यग्रंथ ‘गाथासप्तशती’ ही या राजघराण्याने मराठीला दिलेली सगळयात मोठी भेट. आपण मराठी माणसे ज्याच्या नावाने कालगणना करतो, तो शालिवाहन राजा कोण होता, हेदेखील आपल्याला ठाऊक नसते. पण तरीही शालिवाहन शकाच्या वर्षारंभी, गुढीपाडव्याला शोभायात्रेत आपण मोठया उत्साहाने सामील होतो. नाचतो, मिरवतो, गोड-धोड खातो आणि पुन्हा सगळे विसरून जातो. सध्याचा काळ पाहता आपण शालिवाहन राजा कोण होता, प्रचलित काळात त्याचा पराक्रम आठवणे का गरजेचे आहे. त्यांचे कार्य लक्षात घेण्याची आणि कायम स्मरणात ठेवण्याची वेळ आली आहे.. गौतमीपुत्र सातकर्णी हे या शालिवाहन राजाचे नाव. खूप पराक्रमी, अगदी १९३५ वर्षापूर्वीचा शिवाजी राजाच. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आणि मध्य भारतात त्याने साम्राज्य विस्तार केला होता. आज मराठी म्हणून प्रचलित असलेल्या प्राकृतचा या सा-या सातवाहन राजांना खूप अभिमान. ख्रिस्तपूर्व दुस-या शतकात पुष्पमित्र शुंग आणि पहिला सातकर्णी सातवाहन राजा यांनी एकत्रितपणे परदेशी आक्रमक मीनँडर, ऊर्फ मिलिंद राजाला देशाबाहेर हुसकावले होते. दुस-या सातकर्णीनेही माळव्यात घुसून शकांचा पाडाव केला होता. ज्याच्या नावाने आपण भारतीय अधिकृतपणे आपली कालगणना करतो तो गौतमीपुत्र सातकर्णी तर सगळयात प्रभावशाली होता. त्याच्या काळात राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजची पैठण नगरी युरोप, आखाती देशांशी जोडलेली होती. भारतीय कपडे, दागिने, कलाकुसरीच्या वस्तू, मसाल्याचे पदार्थ जगभर पोहोचले, ते याच काळामध्ये. इतिहासकार रा. श्री. मोरवंचीकर, ज्यांनी गौतमीपुत्र आणि संपूर्ण सातवाहन घराण्याचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, ‘‘शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातील पहिले पराक्रमी घराणे आणि गौतमीपुत्र हा त्या घराण्यातील सगळयात शूर राजा. त्याच्याच काळात संस्कृतपेक्षा प्राकृत, म्हणजे मराठीला पहिल्यांदा राजाश्रय मिळाला होता.’

गौतमीपुत्र राजाच्या संदर्भात अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यातील एक दंतकथा खूप सूचक आहे. या राजाने गुजरातमध्ये जाऊन सौराष्ट्रातील शहरात राजांचा उच्छेद केला होता. एकदा त्याच्यावर शत्रू सैन्याने आकस्मिकपणे हल्ला केला. तेव्हा या राजाने मातीचे घोडदळ आणि सैनिक तयार केले आणि त्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून त्यांना जिवंत केले आणि आक्रमकांच्या सैन्याचा नि:पात केला.. प्रत्येक दंतकथेत सत्याचा थोडाफार अंश असतो, असे इतिहासतज्ज्ञ म्हणतात. गौतमीपुत्राच्या या दंतकथेत मला त्याने मातीच्या गोळयाप्रमाणे अचेतन असलेल्या तत्कालीन समाजाला लढण्यास प्रवृत्त केले असावे, असा अर्थ लागतो. सामान्य माणसाला त्याने तलवार हाती घेऊन पराक्रम करण्याची शिकवण दिली म्हणून ही दंतकथा लोकांमध्ये पसरली. विशेष म्हणजे आज जवळपास दोन हजार वर्षानंतरही आपण तिची चर्चा करत आहोत, त्या कथेतील मतितार्थ लक्षात घेऊन. आज गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आपण सारे आपल्या लोकशाहीत प्राण फुंकण्याची प्रतिज्ञा करू या.. तसे सगळयांनी केले तर भारतात सुवर्णयुग येणे अशक्य नाही.

Categories:

Leave a Reply